Home Blog Page 1441

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली-उपमुख्यमंत्री

पुणे दि.२८: भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड’ या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ.गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही हे सुनावण्याचे काम परराष्ट्रमंत्री डॉ.जयशंकर यांनी केले, ही खंबीरता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यात अनेक वर्षांनी पहायला मिळाली असे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे धोरण देशाहिताचा विचार करणारे असून कोणाच्याही दबावात येणारे नाही हे जगाला दाखवून दिले. भारत जगाच्या पाठीवर मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याचवेळी अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावात ज्यांना यायचे नाही असे सगळे देश मोदींजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या पाठीशी उभे आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे.

जगातील देशांचा विश्वास हेच आपले यश
जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधानांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ.जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी आहे, असे त्यांनी सांगितले.

परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक
उपमुख्यमंत्री म्हणाले, पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन ओझी सांगितली आहेत. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आत्ताची भूराजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात आहे.

अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावीपणे लेखन झालेल्या पुस्तकाचा तितक्याच सोप्या आणि सुंदर भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. विविध समूहांना भारताचा विचार या पुस्तकातून समजेल. जागतिकीकरणाच्या संपूर्ण परिस्थितीत भारताची भूमिका स्पष्टपणे कळली पाहिजे. परराष्ट्र धोरणाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो म्हणून त्याची माहिती प्रत्येकाला मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने हे पुस्तक महत्वाचे असून ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

क्षमता आणि सहकार्याचा भारत मार्गच देशासाठी उपयुक्त-डॉ.एस.जयशंकर
परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर म्हणाले, जागतिकीकरण हे आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारतमार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.

परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे
स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारनुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार भारत मार्ग दर्शवतो.

सर्व राज्यांच्या कल्याणाच्या विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे
चांगले परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे.

चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल असे पुस्तकात मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.चौथाईवाले यांनी यावेळी ‘भारत मार्ग’ या पुस्तकाविषयी माहिती दिली. पररराष्ट्र धोरणाविषयी अत्यंत सोप्या शब्दात मांडणी पुस्तकात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.आफळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भारतीय विचार साधनाने आतापर्यंत ६३० पुस्तके प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्रकाशन संस्थेसाठी असलेला श्री. पु. भागवत पुरस्कार मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या सविता आठवले यांचा परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
000

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा, पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठीच्या २६ व्या तर महिलांसाठीच्या २१ व्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या.  पुरुष विभागात जे.एस.डब्ल्यू. संघाने ग्रामीण विभागात सलग चौथे जेतेपद पटकावले तर बँक ऑफ बडोदाने शहरी विभागात बाजी मारली. पश्चिम रेल्वे महिला विभागात अजिंक्य ठरले.

हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी मुंबई येथे दिनांक २४ ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ओएनजीसीचे महाप्रबंधक विवेक झिने, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक  विश्वास मोरे, सुप्रसिद्ध कबड्डीपटू रिशांक देवडिगा, स्पर्धा निरीक्षक सदानंद माजलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

ग्रामीण विभागात जे.एस.डब्ल्यू.चा अदिल पाटील, महिला विभागात सोनाली शिंगटे, तर शहरी विभागात बँक ऑफ बडोदाचा प्रणव राणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. विजेत्या संघाना कामगार कल्याण चषक आणि रोख ५० हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या संघास चषक आणि रोख ३५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

ग्रामीण विभागाच्या अंतिम सामन्यात जे. एस. डब्ल्यू. ने क्रांती अग्रणीचा ३७-३६ असा निसटता पराभव केला. महिलांच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने बँक ऑफ बडोदाला २९-२७ असे हरवले तर शहरी विभागात पुरुषांच्या अंतिम सामन्यात बँक ऑफ बडोदाने न्यू इंडिया इन्शुरन्सचा ३७-२४ असा पराभव केला.

ग्लॅडिएटर, माव्हरिक्स गटात अव्वल

न्याती माहेश्वरी फुटबॉल लीग, महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजन

पुणे : एमजेएम ग्लॅडिएटर, श्री माव्हरिक्स या संघांनी महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी सिक्स-अ-साइड फुटबॉल लीगमध्ये चमकदार कामगिरी करून आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावला.

गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमधील फुटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्धाटन  महाराष्ट्र विद्या प्रचारक मंडलच्या सचिव सुशीला राठी यांच्या हस्ते झाले. यावेळी महेश सेवा संघ युवा समिती अध्यक्ष विशाल राठी, सचिव केतन जाजू,प्रोजेक्ट चेअरमन आकाश झंवर,प्रोजेक्ट सेक्रेटरी ऋषी भुतडा, वेदांत करवा, महेश सेवा संघ सचिव ओमप्रकाश गट्टानी, उद्योजक गिरिधर काळे, डाॅ. प्राजक्ता काळे उपस्थित होते. 

अ गटात ग्लॅडिएटर संघाने पाच पैकी चार लढती जिंकल्या, तर एक लढत गमावली. ग्लॅडिएटर संघ १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. पीपी रॉयल्स संघ दोन लढती जिंकल्या, तर तीन लढती बरोबरीत सोडविल्या. नऊ गुणांसह हा संघ दुस-या क्रमांकावर आहे. रेडिएन्ट रोबेल्स हा संघ ८ गुणांसह तिस-या क्रमांकावर राहिला. 

ब गटात श्री माव्हरिक्स संघाने पाच लढतींपैकी तीन लढती जिंकल्या, तर दोन लढती बरोबरीत सोडविल्या. ११ गुणांसह माव्हरिक्स संघ अव्वल क्रमांकावर आहे. तपाडियाज थंडर संघाने पाच पैकी दोन लढती जिंकल्या, तर दोन लढती बरोबरीत सोडविल्या, एक लढतीत या संघाला पराभव पत्करावा लागला. थंडर संघ आठ गुणांसह दुस-या क्रमांकावर आहे. साई मिरॅकल डिस्ट्रॉयर्स संघ सहा गुणांसह तिस-या क्रमांकावर आहे.निकाल – एनपीएव्ही निंजाज – १ (निराज सोमानी) वि. वि. साई मिरॅकल डिस्ट्रॉयर्स – ०; व्हाइटफिल्ड  वारलॉर्ड्स – ६ (रोहित राठी ४, अभिनंदन बी. १) वि. वि. व्हरटेक्स अससिन्स – १ (यश दरक); 

श्री माव्हरिक्स – २ (मानस दरक १, अक्षत १) वि. वि. तपाडियाज थंडर – ०; पीपी रॉयल्स – ० बरोबरी वि. सीएनजी राठी रॉयल्स – ०; एमजीएम ग्लॅडिएटर्स – ३ (नवल मालपाणी १, निहार झंवर १, श्लोक झंवर १) वि. वि. रेडिएंट रेबेल्स – १ (नीरज डार्गा १); श्री माव्हरिक्स – २ (पवन १, अंकित मुंदडा १) वि. वि. एनपीएव्ही निंजाज – ०; एमजीएम ग्लॅडिएटर्स – १ (यश तोष्णीवाल १) बरोबरी वि. व्हरटेक्स अससिन्स – १ (निहार झंवर १) ; रेडिएंट रेबेल्स – २ (नीरज डार्गा १, हृषीकेश १) वि. वि. व्हाइटफिल्ड – १ (अभिनंदन बी. १) ; पी. पी. रॉयल्स – १ (धीर मंत्री १) वि. वि. एमजीएम ग्लॅडिएटर्स – ०; श्री माव्हरिक्स – ४ (सर्वेश २, अक्षत २) वि. वि. फँटम -०; पी. पी. रॉयल्स – २ (सागर कारवा १, भाग्येश १) बरोबरी वि. व्हाइटफिल्ड – २ (अभिनंदन बी. १, जय कारवा १) ; तपाडिया थंडर्ज – ३ (वरुण पोरवाल २, वेदांत मालू १) वि. वि. फँटम – ०.   

महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी खेळण्याचे ध्येय ठेवावे

पुणे,
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया गेम्स मध्ये अधिकाधिक पदके मिळवावी, पण आपल्याला भारतासाठी खेळावयाचे आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत आपल्या क्षमतेच्या शंभर टक्के इतकी कामगिरी करावी, असे आवाहन आंतरराष्ट्रीय खेळाडू शकुंतला खटावकर, शांताराम जाधव व निखिल कानेटकर यांनी केले.
मध्यप्रदेश मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 साठी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा नगरीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील सहभागी खेळाडूंना खटावकर, जाधव व कानेटकर यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जेष्ठ कबड्डी प्रशिक्षक सचिन भोसले, महाराष्ट्राचे पथक प्रमुख चंद्रकांत कांबळे, नोडल अधिकारी अनिल चोरमले तसेच वरिष्ठ अधिकारी सुहास पाटील, व्यवस्थापक अरुण पाटील व श्रीमती अडसूळ आदी यावेळी उपस्थित होते.
खेलो इंडिया गेम्स हे नवीन खेळाडूंसाठी आपले कौशल्य दाखविण्याची हुकमी संधी आहे या संधीचा खेळाडूंनी मनापासून फायदा घेतला पाहिजे. असे सांगून अजून पुरस्कार विजेते कबड्डीपटू व प्रशिक्षक शांताराम जाधव म्हणाले,” क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी आता भरपूर संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घेऊन खेळाडूंनी या क्षेत्रात सर्वोत्तम करिअर कसे करता येईल हे लक्षात ठेवले पाहिजे. चांगल्या करिअर बरोबरच स्वतःला आदर्श व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी क्रीडाक्षेत्र हे उत्तम व्यासपीठ आहे याचीही जाणीव खेळाडूंनी ठेवली पाहिजे.”
अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू व प्रशिक्षिका शकुंतला खटावकर यांनी सांगितले,” खेळाडूंना अतिशय अनुभवी व ज्येष्ठ प्रशिक्षकांकडून सर्वोत्तम प्रशिक्षण मिळाले आहे. स्वतःकडे असलेले कौशल्य पणाला लावून महाराष्ट्राला अधिकाधिक सुवर्णपदके कशी मिळतील असा प्रयत्न खेळाडूंनी केला पाहिजे.”
खेळाडूंनी फक्त महाराष्ट्राला पदके कशी मिळवता येतील याचा विचार न करता आपल्याला येथील पदकांचा फायदा घेत जागतिक स्तरावर करिअर करायचे आहे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. खेळाडूंनी अल्प संतुष्ट न राहता सतत सर्वोच्च यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे असे आवाहन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक निखिल कानेटकर यांनी केले.
खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा शुभेच्छा समारंभाप्रसंगी सहसंचालक चंद्रकांत कांबळे व नोडल अधिकारी अनिल चोरमले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविला. या कार्यक्रमाचे अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती अडसूळ यांनी आभार मानले.

जबलपूरमध्ये सुवर्ण क्रांतीने झगमगणार महाराष्ट्र खेळाडूंचे यश

महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो-खो संघाचे जबलपूर मध्ये आगमन; सोमवारपासून विजयी मोहीम

पुणे
निर्विवाद वर्चस्वासाठी उत्सुक असलेले महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो खो संघांचे शनिवारी मोठ्या उत्साहात जबलपूर मध्ये आगमन झाले.
प्रचंड मेहनत आणि जिद्दीचे बळावर सुवर्ण क्रांती घडवून जबलपूर मध्ये आपल्या संघाचे यश झगमगण्यासाठी युवा खेळाडू सज्ज झाले आहेत. सोमवार पासून पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स ला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील खो-खो इव्हेंटचे जबलपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे संघ दमदार सलामी देत आपल्या किताबाच्या मोहिमेला शानदार सुरुवात करण्यासाठी उद्यापासून मैदानावर उतरणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीचा अनुभव असलेले महाराष्ट्राचे युवा खेळाडू यंदा किताबाची प्रभाव दावेदार मानली जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र संघाला सोनेरी यशाची आपली परंपरा कायम ठेवण्याची संधी आहे.
घरच्या मैदानावर कसून सराव
तज्ञ प्रशिक्षक आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या बालेवाडी मध्ये महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो-खो संघांनी कसून सराव केला आहे. त्यामुळे किताबावरचे आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्याने दोन्ही संघांनी जय्यत तयारी केली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव सरस
महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघामध्ये यंदा सहभागी असलेल्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीचा प्रचंड अनुभव आहे. याच अनुभवाच्या बळावर खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा गाजवण्याचा खेळाडूंनी निर्धार केला आहे. त्यामुळे यंदाही महाराष्ट्राला आपला दबदबा कायम ठेवता येणार आहे. नुकत्याच झालेल्या युवा गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरली. यात सोनेरी यशाच्या कामगिरीला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्राचे संघ उत्सुक आहेत.

विमान वारीने गाठली जबलपूर नगरी
महाराष्ट्र महिला आणि पुरुष खो खो संघांनी खास विमान वारीतून मध्य प्रदेश मधील जबलपूरची नगरी गाठली आहे. दोन्ही संघातील 30 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासह 29 जणांना विमानाने जबलपूर मध्ये आगमन करता आले. पुण्यातील कसून सरावानंतर दोन्ही संघ खास बसने मुंबई येथे दाखल झाला होता. त्यानंतर दुपारी एक वाजता मुंबईतून जबलपूर कडे संघाने उड्डाण घेतली.

ज्या लायकीचे लोक त्याच लायकीचे सरकार आणि मिडिया देखील… संजय आवटे

मीडियाचा खरा मालक कोण? या चर्चासत्रामध्ये मान्यवरांचे मत : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे ६ वी युवा संसद

पुणे : पूर्वी माध्यमांच्या समोर देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक विकास हे मुख्य विषय व उद्देश होता. परंतु आता सर्व माध्यमे ही जाहिरात, खप, टीआरपी यामध्ये अडकली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मीडियाचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिककरण होत असून हे व्यावसायिकरण देशासाठी घातक आहे, अशी भावना माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे संस्थेच्या नऱ्हे येथील कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदेमध्ये ‘मीडियाचा खरा मालक कोण’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रामध्ये माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी माध्यमात सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा आढावा घेतला. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, विलास बडे, युवा नेता अमोल देशपांडे, स्नेहल जाधव, संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते. संजय आवटे म्हणाले, सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सोशल मीडिया आला आहे, त्याचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर तरुण या देशाच्या विकासाला चांगली चालना मिळवून देऊ शकतो. परंतु सध्या तरुण हे सोशल मीडियाकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहत असल्यामुळे त्याचा योग्य वापर होत नाही. समाजाचे मन जागे करणे हे माध्यमांचे काम आहे. परंतु सध्या माध्यमे ही केवळ समाजाला भूल देण्याचे आणि योग्य प्रश्नांपासून दूर नेण्याचे काम करत आहे. विलास बडे म्हणाले, माध्यमाचे होणारे व्यावसायिकरण अपरिहार्य आहे, परंतु त्यामुळे माध्यमांनी सामाजिक भान विसरता कामा नये. सामाजिक भान विसरल्यामुळेच माध्यमांची विश्वासार्हता कमी होत चालली आहे आणि त्यातूनच मीडियाची अधोगती दिवसेंदिवस वाढत आहे. उद्योगपतींच्या हातामध्ये माध्यमे आल्यामुळे ही बाब अधिकच चिंताजनक झाली आहे.

चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेला परदेशी पाहुण्यांची हजेरी

मल्लखांब हा अतिशय उत्कृष्ट आणि शरीरासाठी उपयुक्त असल्याची भावना

पुणे -भारतीय खेळ नवोदित खेळाडूंमध्ये रुजावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोचावा यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून पुण्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील चषक 2023-निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेला राज्यभारातील‌ मल्लखांब प्रेमींसह परदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली. मल्लखांबची प्रात्यक्षिके पाहून हा अतिशय उत्कृष्ट आणि शरीरासाठी उपयुक्त व्यायाम असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेची मान्यता असलेली ही स्पर्धा पटवर्धन बाग येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोरील मैदानावर होत आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे सहकार्य लाभले असून दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील संस्थांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच 750 पेक्षा जास्त खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवत आहेत.

आज पहिल्याच दिवशी नेदरलँड्सचे हर्बर्ट एगबर्ट्स आणि लेस्ली विल्किस या परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. हे दोघेही क्रीडा प्रेमी असून, महाराष्ट्रातील मातीतल्या खेळांवर संशोधन करत आहेत. आज उद्घाटनप्रसंगी मुलांनी मल्लखांबची विविध प्रात्यक्षिके सादर केली. ही सर्व प्रात्यक्षिके पाहून हर्बर्ट आणि लेस्ली अतिशय प्रभावित झाले. मल्लखांब हा शरीरासाठी अतिशय उत्तम व्यायाम प्रकार असून, याचा प्रचार आणि प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाला पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

पुणेकसबा पोटनिवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे. मी स्वतः पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. सर्व कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली. कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची महाबैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,माजी सभागृह नेते गणेश बिडकर,
भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक पोटे, गणेश घोष, संदीप लोणकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कसबा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पांडे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपाचे ४० असे मतदारसंघ आहेत; जिथे कोणतीही राजकीय समीकरणे तयार झाली, तरी भारतीय जनता पक्षाचाच विजय होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. खासदार गिरीश बापट यांनी पक्षाची भक्कम बांधणी करुन, हा बालेकिल्ला तयार केला आहे. आपल्याला असे शंभर मतदारसंघ तयार करायचे आहेत‌. त्यामुळे मुक्ताताईंच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे.

पाटील पुढे म्हणाले की, कसबा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील राजकीय समितीचे प्रमुख पद आ. माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. संजयनाना काकडे त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहतील. त्यासोबतच संघटनात्मक कामांसाठी राजेश पांडे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली असून, राजेश येनपुरे त्यांना मदत करतील. तर व्यवस्थापन समिती कसबा‌‌ मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वात काम करेल.‌

ते म्हणाले की, कसबा निवडणुकीसाठी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, निवडणुकीच्या अनुषंगाने किमान शंभर घरी भेट देणार आहे. त्यासाठी मी माझ्या वेळापत्रकात ही बदल केला आहे. कार्यकर्त्यांनीही आपापल्या कामाचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांच्या भक्कम पक्षबांधणीमुळे पाचवेळा या मतदारसंघातून भाजपाला विजय मिळाला. आजही ते पक्षाचं काम रुग्णालयातून करत आहेत. त्यामुळे बापट साहेबांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शहरातील प्रत्येक पदाधिकारी काम केले पाहिजे.

मुळीक पुढे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे हास्यास्पद नेतृत्व ठरत आहेत. सध्या ते ‘भारत जोडो’ यात्रा करत आहेत. पण त्यांचेच पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताची फाळणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अशा पक्षांना लोक उभे करणार नाहीत. भारतीय जनता पक्षालाच कसब्याची जनता विजयी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. माधुरी मिसाळ म्हणाल्या की, यंत्र, तंत्र आणि मंत्र या त्रिसूत्रीवर आपण काम केले, तर कसबा विधानसभा मतदारसंघ आपल्याला सहज जिंकणे शक्य आहे. इथला प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी आपुलकी जपतो; आणि हीच आपुलकी आणि प्रेम भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळाले आहे. त्यामुळे आपण कसबाची पोटनिवडणूक शंभर टक्के जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा उपाध्यक्ष संजय काकडे म्हणाले की, कसबा आणि चिंचवड हे पुणे जिल्ह्यातील भाजपाचे बालेकिल्ले आहेत‌. पण तरीही कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत गाफील राहू नये. पक्ष नेतृत्व ज्यांना उमेदवारी देईल, त्यांचा सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करुन निवडून आणू‌, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले की, आज मोदींचे नेतृत्व जनसानसात आज रुजलेलं आहे.‌याचं एकमेव कारण म्हणजे बूथ वरील कार्यकर्ता. बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. त्यामुळे बूथ कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

बैठकीचे प्रास्ताविक मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू काकडे यांनी केले. तर छगन बुलाखे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांचा खून केला-माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत


युवा संसद २०२३ मध्ये आयडिया ऑफ इंडिया या विषयावर सत्र

पुणे : आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते, परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावी झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे, परंतु महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरु यांनी केला हे स्विकारावेच लागेल, अशी टीका राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसतर्फे संस्थेच्या नऱ्हे कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडिया या सत्रामध्ये सदाभाऊ खोत बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर, इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, विद्यार्थी नेता पार्थ पटले, कुणाल दंडवते आदी यावेळी उपस्थित होते. रंजना गायकवाड यांना आदर्श सरपंच पुरस्कार, संजय गिराम यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार तर राजेश पाडवी यांना आदर्श आमदार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.

सदाभाऊ खोत म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून देशाचा विकास केला, परंतु इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून देशाची लुबाडणूक केली. अशीच व्यवस्था कायम राहिली तर देशामध्ये समान विकास कसा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास आपण निर्माण केला पाहिजे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, भारतामध्ये पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतील. पंडित नेहरू यांना दिल्लीतील रायसोनी हिल्स हाच भाग भारत वाटत होता. परंतु नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात विकासाची पाळेमुळे नेऊन पोहचवले खऱ्या अर्थाने आज भारताचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला दिसत आहे.

बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले – सदाभाऊ खोत
सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता अनुभवत आहेत. परंतु हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत . कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले. यामुळे बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पाइन सर्जरी सेंटर सुरू करणार- डॉ. राजेंद्र मिटकर यांची घोषणा


पुणे, दि. २८ जानेवारीः वैद्यकीय क्षेत्रात नव नवीन प्रयोग करणारे व कोथरूड हॉस्प्टिलमध्ये शिकायला येणार्‍या परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांना हॉस्पिटलतर्फे फेलोशिप देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पाइन सर्जरी सेंटर व डायबिटीज सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अशी घोषणा कोथरूड हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर यांनी केली.
हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी कोथरूड हॉस्पिटलचे संचालक डॉ राजेंद्र गुंडावार, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तुषार दाते, डॉ. मंजुषा प्रभूणे, डॉ. लिना दोभाडा, डॉ. दिप्ती पोफळे, डॉ. हिमांशू पोफळे आणि हॉस्पिटलचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व वर्धापन दिनाचे औचित्य साधून हॉस्पिटल तर्फे सर्व नागरिकांनसाठी विनामूल्य आरोग्य शिबिर व मोफत औषधांचे वाटप केले. या शिबिरचा लाभ २०० नागरिकांनी घेतला. शिबिरात हाडांच्या आजारांवर विशेष उपचार व निदान करण्यात आले. हाडांच्या सर्व तपासण्यांसह मधुमेह, रक्तदाब, ईसीजी यांसह विविध आजारांच्या तपासण्या केल्या. डॉ. निखिल ओझा, बालरोग तज्ञ डॉ. रघुवंशी व डॉ. अर्चना मुदखेडकर यांनी तपासण्या करून योग्य उपचार व मार्गदर्शन केले.डॉ. राजेंद्र मिटकर म्हणाले,“ कोथरूड वासियांसाठी आम्ही नवीन संकल्प केला आहे की नवजात बालांसाठी अत्याधुनिक एनआयसीयू उघडणार आहे. त्याच प्रमाणे महिलांना होणार्‍या विभिन्न आजारासंदर्भात प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मंजुषा प्रभूणे या वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय साधणे (मशिनरी) उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमधून रुग्ण आनंदी होऊनच बाहेर निघावा हा आमचा संंकल्प असून त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे.”
वर्ध्यांचे खासदार रामदास तडस व आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच विलास कथुरे यांनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

” अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या  बुधवार दि.  १ फेब्रुवारी रोजी  २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील  विविध घटकांपासून राजकारणी,  विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष भाववाढ किंवा चलनवाढीने ग्रासलेले होते आणि आता २०२३ मध्ये  मंदीसदृश्य परिस्थिती  अनुभवावी लागेल असा  अंदाज व्यक्त केला आहे. ही मंदी जागतिक पातळीवर राहण्याची शक्यता असून ती उथळ, तात्पुरती किंवा दीर्घ कालीन परंतु खोलवर जाणवणारी असेल किंवा नसेल याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यांमध्ये भाव वाढीला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढीचे  अस्त्र वापरले त्यामुळे गेल्या दोन दोन महिन्यांमध्ये तरी भाव वाढ अपेक्षेप्रमाणे आटोक्यात किंवा नियंत्रणात राहिली आहे. त्याचप्रमाणे चालू खात्यावरील तूटही कमी होत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.खरंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देशातील सद्यस्थितीबाबत जास्त ममता असणे स्वाभाविक आहे. नजीकच्या काळामध्ये फारशी व्याजदर वाढ टाळून एकूण अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण करण्यावर रिझर्व बँकेचा भर  राहील.  महागाईचा दर सहा वरून चार टक्क्यांपर्यंत खाली आणणे हे जरी उद्दिष्ट गाठले गेलेले नसले तरी  देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर हा आणखी चांगला कसा राहील याकडे मध्यवर्ती बँकेला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षभरात रिझर्व बँकेने देशातली अर्थव्यवस्था  रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले.यामुळे अर्थव्यवस्थेच्या एकत्रित करण्यासाठी ही सर्व जबाबदारी ही केवळ रिझर्व बँकेची नसून केंद्र सरकारवर म्हणजे पर्यायाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर आहे. या अंदाजपत्रकात त्यावरच भर देण्याची अपेक्षा आहे. मोदी सरकार समोर या वर्षात नऊ राज्यातील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षात लोकसभेची निवडणूक उभी ठाकलेली असली तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा “लोकानुनयी ” अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही अशी अर्थतज्ज्ञांची अपेक्षा आहे. जनतेच्या हातात पैसा खुळखुळावा म्हणून आर्थिक सवलतींचा मारा केला जाऊ नये किंवा गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी आर्थिक सवलतींची खैरात केली जाऊ नये अशी अर्थतज्ञांची अपेक्षा आहे. जगातील अनेक देश भारताकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्ट्या पाहत .  आपल्या शेजारील चीनची सध्याची आर्थिक स्थिती व तेथील गुंतवणुकीची भूराजकीय जोखीम लक्षात घेऊन भारताकडे सर्व देश आशेने पाहत आहेत. यामुळेच मोदी सरकारने त्यांचे पूर्णपणे लक्ष देशातील सर्व पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे प्रगतीशील डिजिटल भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टीगोष्टींवर भर देणे नितांत गरजेचे आहे. मोदी सरकारने  अंमलात आणलेल्या उत्पादकतेशी निगडित आर्थिक सहाय्य योजनेचा विस्तार मोठ्या, मध्यम व छोट्या कंपन्यांच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने करण्याची गरज आहे.विविध उद्योग क्षेत्रांसाठी ही योजना लागू केली पाहिजे.  जगातील विविध गुंतवणूकदार किंवा देशांना भारताकडे आकर्षित करण्यासाठीआर्थिक स्थैर्य व धोरणांबाबत विश्वासार्हता निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरीस  जी-२०  देशांचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला लाभली. त्यामुळे २०२३-२४ या वर्षात आर्थिक विकासाचा दर किमान साडेसहा ते सात टक्के ठेवणे हे निर्मला सीतारामन यांच्या पुढचे मोठे आवाहन आहे. यामध्ये त्यांना यशस्वी होण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे की ती म्हणजे केंद्र सरकारने पुढील वर्षांमध्ये विकासावर मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च करण्याची गरज आहे त्याचबरोबर गेल्या तीन वर्षात केंद्र व राज्यांची वित्तीय तूट 10 टक्क्यांच्या घरात गेलेली आहे . ती कमी करणे हे गरजेचे आहे. जनतेसाठी आर्थिक सवलतींची लयलूट करणे थांबवले पाहिजे. ज्याला सध्या रेवडी संस्कृती म्हणतात ती संस्कृती निश्चित कमी केली पाहिजे किंवा बंद केली तर सर्वात चांगली गोष्ट होऊ शकेल. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये होणारा सरकारचा आर्थिक सवलती म्हणजे सबसिडींवरचा वाढता खर्च अर्थव्यवस्थेला मारक ठरत आहे.  त्यामुळेच विविध आर्थिक सवलतींचा आढावा करून त्याची फेररचना करण्याची गरज आहे. भारत हा आजही कृषीप्रधान देश आहे. देशातील काम करणाऱ्या वर्गापैकी 46% एवढे जनता कृषी क्षेत्रामध्ये अडकलेली आहे.  सध्याची स्थिती लक्षात घेता एवढ्या मोठ्या कामगारांना सामावून घेण्याची  कृषी क्षेत्राची क्षमता नाही.  त्यामुळे त्यांना बिगर शेती क्षेत्रामध्ये म्हणजे उत्पादन, सेवा क्षेत्राकडे वळवले पाहिजे.  त्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करून  कौशल्य  निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. आजही ग्रामीण भागातील शिक्षण पद्धती खूप खालच्या दर्जाचे काम करीत आहे. ग्रामीण व शक्तीतरुणांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य निर्माण करण्यातही आपण कमी पडत आहोत. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारक्षम करणे किंवा नवनवीन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी आवश्यक ते अर्थसहाय्य देणे आवश्यक आहे. शहरांमध्ये सध्या काही संस्था अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतात परंतु समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत त्याचा लाभ पोहोचला पाहिजे. देशातील बांधकाम क्षेत्र किंवा पायाभूत सुविधा क्षेत्र असो त्यांना आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञांची आज भारतामध्ये  वानवा आहे अगदी इलेक्ट्रिशियन पासून प्लंबर, पेंटर हे कारागि  कौशल्यपूर्णरित्या निर्माण केले पाहिजेत. त्यांची सध्या संख्या अपुरी आहे. या बाबतीत चीनचे उदाहरण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडे जेव्हा ग्रामीण भागातील शेती किफायतशीर ठरत नव्हती तेव्हा त्यांनी वीस कोटींपेक्षा जास्त कामगार दुसऱ्या क्षेत्रांकडे जाणीवपूर्वक वळवले. त्यात नवीन शहरांची निर्मिती तसेच पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली आणि मनुष्यबळाचा फार चांगला वापर देश हितासाठी केला. भारताच्या तुलनेत चीनची जवळजवळ निम्मी लोकसंख्या  शेती उद्योगात आहे. तरीही चीनचे कृषी उत्पादन  भारतापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. यापासून आपण बोध घेण्याची गरज आहे त्यांच्याकडे लोकांवर आर्थिक सवलतींची खैरात केली जात नाही. आज भारतात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याखाली ८० कोटी जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेखाली मोफत अन्नधान्य वाटप केले जाते. त्यात प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाच किलो तांदूळ किंवा गहू दिला जातो. यासाठी केंद्र सरकारचे  दोन लाख कोटी रुपये खर्च होतात. करोनाच्या काळात यापेक्षा जास्त अन्नधान्य वाटप केले गेले.  शेतकऱ्यांना खतासाठी दिली जाणारी आर्थिक सवलत  सुद्धा दोन लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. पंतप्रधान किसान योजनेसाठी आणखी 60 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. याशिवाय वेगवेगळ्या आर्थिक सवलतींची खैरात शेतकऱ्यांवरील सवलती पाच लाख कोटींच्या घरात जातात. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. याशिवाय देशातील उद्योग क्षेत्रांना उत्पादनाशी निगडित दिल्या जाणाऱ्या आर्थिक सवलतींचा वाटाही मोठा आहे,. देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन  “रेवडी” संस्कृतीला योग्य प्रमाणात आळा घालतील अशी अपेक्षा आहे. मात्र निवडणुका जिंकण्यासाठीचे राजकारण नेहमीच अर्थव्यवस्थेला मारक ठरते. त्यात बदल करण्याची गरज आहे.
.
देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची गरज आहे किंवा कसे याची गंभीर तपासणी करण्याची वेळ आलेली आहे.  गोरगरिबांना अन्नसुरक्षा कायद्याखाली मोफत धान्य वाटप करणे गैर नाही मात्र  त्या नावाखाली जे गरजू नाहीत त्यांनाही या मोफत अन्न वाटपाचा लाभ होतो किंवा कसे हे पाहणे पाहिजे. भारताची लोकसंख्या लक्षात घेता जवळजवळ दोन तृतीयांश जनतेला अन्नधान्य सुरक्षा द्यावी लागते म्हणजे एक तृतीयांश लोकही स्वतःसाठी अन्नधान्य कमवू शकत नाहीत. गेल्या 75 वर्षातल्या सर्व सरकारचे अपयश मानावे लागेल. दोन लाख कोटी अन्नधान्य सवलत देताना त्यात काही बचत करता येईल का याचा विचार केला गेला पाहिजे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गेल्या तीन वर्षाच्या अंदाजपत्रकात फार काही करता आलेले नव्हते २०२०-२१ मध्ये अंदाजपत्रक संसदेत सादर झाल्यानंतरलगेचच काही दिवसात देशभर लोक डाऊन जाहीर करण्यात आला होता. २०२१-२२ या वर्षात करुणाची दुसरी लाट आली,. २०२२-२३ मध्ये रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद. यामुळे गेल्या तिन्ही वर्षांमध्ये अर्थसंकल्पातील अंदाज महसूल, जमा खर्च याचा काही ताळमेळ साधता आला नव्हता. अर्थात जागतिक पातळीवरील ही परिस्थिती आपल्याला अनुकूल नव्हती. तरीसुद्धा मोदी सरकारने देशातील वाढती बेरोजगारी, अन्नधान्य उत्पादन , दारिद्र्यरेषेखालील जनता, शिक्षणातील त्रुटी किंवा कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी याचा सांगोपांग विचार करून नवीन आर्थिक धोरणांची आखणी केली पाहिजे. केवळ लोकप्रियतेसाठी सवलती न देता अर्थव्यवस्था अधीक सुदृढ , सक्षम करण्यासाठी कडक व खंबीर निर्णय घेतले पाहिजेत. दुर्देवाने आज ती शक्यता कमी वाटते.

प्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणेस्थित ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)*

सुरक्षा रक्षकांसाठी मिक्स मार्शल आर्ट्स चे सेमिनार आयोजित करणार-जॅकी श्रॉफ

अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. 

नवी मुंबई – अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशन तर्फे नवी मुंबईमधील सानपाडा येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या मुख्यालयात सुरक्षा रक्षकांसाठी  मोफत आरोग्य तपसणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांची देखील उपस्थिती होती . तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे समन्वयक संदीप घुगे, कामगार आयुक्त सुरेश जाधव, मुंबई / ठाणे सुरक्षा रक्षक मंडळाचे संचालक विलास बुवाजी हे देखील उपस्थित होते. या शिबिरास ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि डाबर इंडीया यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

आज आपण महाराष्ट्रातील जनतेला आपल्या सेवेतून सुरक्षा पुरवणाऱ्या कार्यतत्पर सुरक्षा रक्षकांचे आभार व्यक्त करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे ऋणी आहे. आपले सुरक्षा रक्षक बांधव आणि भगिनी दिवस रात्र आपले रक्षण करून बहीण आणि भावाची जवाबदारी पार पाडत आहेत त्यामुळे मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी त्यांच्या प्रती शक्य असेल तेवढी मदत करण्याचं आश्वासन देते अशी भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.

आज आपण रस्त्यावरून सुरक्षित चालू फिरू शकतो ते फक्त आपल्या पोलीस आणि सुरक्षा रक्षक बंधू भगिनींमुळे. त्यामुळे आपण देखील आपल्या आरोग्याकडे तितकेच काळजीने बघितले पाहिजे, मी लवकरच आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी मिक्स मार्शल आर्ट्स चे सेमिनार आयोजित करणार आहे असे आश्वासन अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी दिले.

कोविड काळात राज्यात डॉक्टर, नर्स पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपली जवाबदारी पार पाडली २६/११ च्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान आपल्या सुरक्षा रक्षकांनी समय सूचकता दाखवून कामगिरी पार पडली होती. आज दिव्याज फाऊंडेशच्या माध्यमातून अमृता यांनी हे आरोग्य शिबिर आयोजित केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे मत संदीप घुगे यांनी व्यक्त केले.

शाळेतील पिटी शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

पुणे-

पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका शाळेतील फिजीकल एज्युकेशन(पी.टी.) शिक्षक विद्यार्थीनींना मिठ्या मारुन तसेच चुंबन घेऊन विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार समुपदेशनमध्ये उघडकीस आला आहे. हा शिक्षक सदरचा प्रकार मागील दोन ते तीन महिण्यापासून करत होता ही बाब यानिमित्ताने समोर आली आहे. शाळेत झालेल्या समुपदेशनाच्या दरम्यान अल्पवयीन चार विद्यार्थीनींनी हा प्रकार समुपदेशक यांना सांगितला आहे. यानंतर संबंधीत शिक्षकाची शाळेच्यावतीने कोंढवा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

अविनाश गोविंद चिलवेरी ( 23, रा.बिडी कामगार वसाहत, येरवडा,पुणे) असे अटक शिक्षक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शाळेच्यावतीने 37 वर्षीय महिलेने पोलिसांकडे आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक चिलेवार विरुध्द विनयभंगसह पॉस्को अंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोंढव्यामध्ये एक इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा आहे. आरोपी चीलवेरी तेथे सात ते आठ महिण्यापुर्वीच पी.टी.शिक्षक म्हणून रुजू झाला होता. तो मागील दोन महिण्यांपासून तेथील विद्यार्थीनींना जबरदस्ती मिठी मारुन चुंबन घेत होता. तसेच त्यांना व्हॉटसअपव्दारे आयलव्हयू मेसेजही पाठवत होता.

हा प्रकार नोव्हेंबरपासून सुरु होता अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या शाळेतील समुपदेशान दरम्यान शाळेतील चार मुलींनी हा धक्कादायक प्रकार समुपदेशकांना सांगितला. त्यांनी ही बाब शाळेच्या शिक्षीकेच्या निदर्शनास आणून दिली.त्यानंतर शाळेने याबाबत मुलींकडे चौकशी करून दोषी शिक्षका विरोधात तक्रार पोलिसांकडे दिली आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलिस करत आहे.

रॅपिडो विरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील इंटरवेशन याचिका दाखल करणार : बाबा कांबळे

  • महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनच्या पाठपुराव्यानेच उच्च न्यायालयात यश
  • बोगस संघटनांकडून श्रेय घेत असल्याचा खोटा प्रचार

पिंपरी / प्रतिनिधी

रॅपीडो कंपनीने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक थांबवावी, यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रस्त्यावरची लढाई करून रिक्षा चालकांना न्याय दिला. उच्च न्यायालयात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनने याचिका दाखल करत लाखो रुपये खर्च करून वकिलाची नेमणूक केली. रिक्षा चालकांची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. मा. न्यायालयाने देखील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी मांडलेल्या मतांची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाची लढाई जिंकल्याचे श्रेय घेत असल्याचा काही रिक्षा संघटनांच्या आरोपांना हे उत्तर असून त्यांना चपराक देखील आहे. सध्या रॅपीडो कंपनीने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनही स्वखर्चाने वकील देऊन इंटरवेशन याचिका दाखल करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली. ३० जानेवारी रोजी दिल्लीत स्वतः उपस्थित राहून रिक्षा चालकांची बाजू मांडून तिथेही लढाई जिंकू, असा विश्वासही बाबा कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे भाजपा आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले जय महाराष्ट्र शिक्षण संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद वाहतूक सेवा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले राष्ट्रवादीचे संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे सावकाश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भालेराव आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, कायद्याच्या अधीन राहून सनदशीर मार्गाने न्याय मिळवता येतो, हे महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रॅपीडो कंपनीविरोधातला लढा जिंकून दाखवून दिले आहे. काही बोगस रिक्षा संघटनांनी कायदेशीर मार्ग न निवडता रिक्षा चालकांना संकटात टाकून, गुन्हे दाखल होईपर्यंत चुकीच्या मार्गाने आंदोलन केले. रिक्षा चालकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या चुका झाकून या रिक्षा संघटना महाराष्ट्र रिक्षा पंचायतवर खोटे आरोप करून सर्वसामान्य रिक्षा चालकांची अद्यापही दिशाभूल करत आहेत. रॅपीडो कंपनीविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायतने सहकारी मित्र रिक्षा संघटनांच्या वतीने रस्त्यावरची लढाई करत आंदोलन छेडले. रॅपीडोने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर तिथेही महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनने स्वखर्चाने वकील देत लढाई जिंकली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनच्या पाठपुराव्यानेच उच्च न्यायालयात यश मिळाले आहे. न्यायालयाने आदेशात दोन्ही संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींची निरीक्षणे महत्वाची मानली असल्याचे नमूद केले आहे. मात्र काही रिक्षा संघटनांना याची माहितीच नसल्याने ते रिक्षा चालकांमध्ये चुकीचा संदेश देत आहेत. रिक्षा चालकांनी अशा रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींच्या भूलथापांना आता तरी बळी पडू नये, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

आनंद तांबे म्हणले सध्या रॅपिडो कंपनीने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत ३० जानेवारी रोजी सुनावणी आहे. रॅपीडो कंपनीविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशन देखील इंटरवेशन याचिका दाखल करणार आहे. स्वखर्चाने वकिलाची नेमणूक करून महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे स्वतः दिल्लीत उपस्थित राहून रिक्षा चालकांचे म्हणणे मांडणार आहेत. रस्त्यावरची लढाई तसेच उच्च न्यायालयात लढाई जिंकल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात देखील लढाई जिंकू, असा विश्वास देखील *आनंद तांबे यांनी व्यक्त केला आहे.

मधुरा चौकसकर आणि रिया बोगावतच्या अरंगेत्रमने प्रेक्षक मंत्रमुग्ध

पुणे – ‘मृदंगम्’मधून निघणारे तालाचे बोल, व्हायोलिनच्या सुरावटीतून निघणारा आर्त स्वर, नर्तकीचा मुद्राभिनय या सर्वांच्या संयोगाने होणारे भरतनाट्यमचे पदलालित्य यांचा अनोखा संगम प्रजासत्ताक दिनी अरंगेत्रममध्ये पहायला मिळाला. मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या सकल ललित कलाघर येथे भरतनाट्यम नृत्यांगना मधुरा चौकसकर आणि रिया बोगावत यांनी अरंगेत्रम सादरीकरण केले. गुरु सुचित्रा दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या आठव्या वर्षापासून भरतनाट्यमचे धडे घेणारी नृत्यांगना रिया आणि मधुरा हिने अरंगेत्रम सादर केले. या कार्यक्रमात दोघींनी भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या विविध छटा सादर केल्या.

कार्यक्रमात रिया आणि मधुरा हिने गंभीरनातई रागावर आधारित मल्लरी, नातई महा गणपतीम, यमन कल्याणी रागावर आधारित नवकार, खंडा तालावर आधारित अलरीप्पू, मध्यमावती रागावर आधारित ब्रम्ह संधी, हमसानंदी रागावर आधारीत जतिस्वरम, रागमालिकावर आधारित शब्दम, रागेश्रीवर आधारित वरणम, भैरवी शंकर श्रीगिरी,  शेंजूरुत्ती विषमकारा कन्नन, भजनी तालावर आधारित खेळ मांडीयेला, शिवरंजनी तिल्लाना, मध्यमावती मंगलमया प्रकाराचे सादरीकरण केले. ऊर्जाच्या नृत्यात ताल व सुर व पदलालित्याचा सुरेख संगम या वेळी पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनेत्री देविका दफ्तरदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नृत्य प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल फॉर डान्सच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.अ‍ॅड. मिनल जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सौ. गायत्री चौकसकर यांनी केले.

या कार्यक्रमात नट्टूवंगमची  साथ सूचित्रा दाते व श्रुती टेकावडे, मृदंगमची साथ पी आर चंद्रन, गायनाची साथ निथी नायर, बासुरीची साथ सुनिल अवचट, व्हायोलिनची साथ बालासुब्रमन्यम सर्मा यांनी दिली. वेशभूषा के. मोहन आणि लक्ष्मी मोहन, लाइट-साऊण्ड हर्षवर्धन केतकर, कार्ड डिजायनर शिबानी चौधरी, प्रात्याक्षिक इशा जोगळेकर, समृद्धी साका आणि तन्मयी शितोळे,

अरंगेत्रम सादर करणे हे प्रत्येक नृत्य शिकणाऱ्या शिष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. भरतनाट्यम  नृत्यशैलीतील एका विशिष्ट पातळीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच अरंगेत्रम् सादर करण्याची परवानगी असते. यामध्ये विविध प्रकारातील नृत्यरचना सलग सादर कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा दोन-चारच्या समुहात अरंगेत्रम् सादर करण्यावर भर दिला जातो. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.