Home Blog Page 1440

ज्या लायकीचे लोक त्याच लायकीचे सरकार आणि मिडिया देखील… संजय आवटे

मीडियाचा खरा मालक कोण? या चर्चासत्रामध्ये मान्यवरांचे मत : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे ६ वी युवा संसद

पुणे : पूर्वी माध्यमांच्या समोर देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक विकास हे मुख्य विषय व उद्देश होता. परंतु आता सर्व माध्यमे ही जाहिरात, खप, टीआरपी यामध्ये अडकली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मीडियाचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिककरण होत असून हे व्यावसायिकरण देशासाठी घातक आहे, अशी भावना माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे संस्थेच्या नऱ्हे येथील कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदेमध्ये ‘मीडियाचा खरा मालक कोण’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रामध्ये माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी माध्यमात सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा आढावा घेतला. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, विलास बडे, युवा नेता अमोल देशपांडे, स्नेहल जाधव, संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते. संजय आवटे म्हणाले, सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सोशल मीडिया आला आहे, त्याचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर तरुण या देशाच्या विकासाला चांगली चालना मिळवून देऊ शकतो. परंतु सध्या तरुण हे सोशल मीडियाकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहत असल्यामुळे त्याचा योग्य वापर होत नाही. समाजाचे मन जागे करणे हे माध्यमांचे काम आहे. परंतु सध्या माध्यमे ही केवळ समाजाला भूल देण्याचे आणि योग्य प्रश्नांपासून दूर नेण्याचे काम करत आहे. विलास बडे म्हणाले, माध्यमाचे होणारे व्यावसायिकरण अपरिहार्य आहे, परंतु त्यामुळे माध्यमांनी सामाजिक भान विसरता कामा नये. सामाजिक भान विसरल्यामुळेच माध्यमांची विश्वासार्हता कमी होत चालली आहे आणि त्यातूनच मीडियाची अधोगती दिवसेंदिवस वाढत आहे. उद्योगपतींच्या हातामध्ये माध्यमे आल्यामुळे ही बाब अधिकच चिंताजनक झाली आहे.

चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेला परदेशी पाहुण्यांची हजेरी

मल्लखांब हा अतिशय उत्कृष्ट आणि शरीरासाठी उपयुक्त असल्याची भावना

पुणे -भारतीय खेळ नवोदित खेळाडूंमध्ये रुजावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोचावा यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून पुण्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील चषक 2023-निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेला राज्यभारातील‌ मल्लखांब प्रेमींसह परदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली. मल्लखांबची प्रात्यक्षिके पाहून हा अतिशय उत्कृष्ट आणि शरीरासाठी उपयुक्त व्यायाम असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेची मान्यता असलेली ही स्पर्धा पटवर्धन बाग येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोरील मैदानावर होत आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे सहकार्य लाभले असून दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील संस्थांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच 750 पेक्षा जास्त खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवत आहेत.

आज पहिल्याच दिवशी नेदरलँड्सचे हर्बर्ट एगबर्ट्स आणि लेस्ली विल्किस या परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. हे दोघेही क्रीडा प्रेमी असून, महाराष्ट्रातील मातीतल्या खेळांवर संशोधन करत आहेत. आज उद्घाटनप्रसंगी मुलांनी मल्लखांबची विविध प्रात्यक्षिके सादर केली. ही सर्व प्रात्यक्षिके पाहून हर्बर्ट आणि लेस्ली अतिशय प्रभावित झाले. मल्लखांब हा शरीरासाठी अतिशय उत्तम व्यायाम प्रकार असून, याचा प्रचार आणि प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाला पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

पुणेकसबा पोटनिवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे. मी स्वतः पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. सर्व कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली. कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची महाबैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,माजी सभागृह नेते गणेश बिडकर,
भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक पोटे, गणेश घोष, संदीप लोणकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कसबा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पांडे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपाचे ४० असे मतदारसंघ आहेत; जिथे कोणतीही राजकीय समीकरणे तयार झाली, तरी भारतीय जनता पक्षाचाच विजय होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. खासदार गिरीश बापट यांनी पक्षाची भक्कम बांधणी करुन, हा बालेकिल्ला तयार केला आहे. आपल्याला असे शंभर मतदारसंघ तयार करायचे आहेत‌. त्यामुळे मुक्ताताईंच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे.

पाटील पुढे म्हणाले की, कसबा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील राजकीय समितीचे प्रमुख पद आ. माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. संजयनाना काकडे त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहतील. त्यासोबतच संघटनात्मक कामांसाठी राजेश पांडे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली असून, राजेश येनपुरे त्यांना मदत करतील. तर व्यवस्थापन समिती कसबा‌‌ मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वात काम करेल.‌

ते म्हणाले की, कसबा निवडणुकीसाठी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, निवडणुकीच्या अनुषंगाने किमान शंभर घरी भेट देणार आहे. त्यासाठी मी माझ्या वेळापत्रकात ही बदल केला आहे. कार्यकर्त्यांनीही आपापल्या कामाचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांच्या भक्कम पक्षबांधणीमुळे पाचवेळा या मतदारसंघातून भाजपाला विजय मिळाला. आजही ते पक्षाचं काम रुग्णालयातून करत आहेत. त्यामुळे बापट साहेबांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शहरातील प्रत्येक पदाधिकारी काम केले पाहिजे.

मुळीक पुढे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे हास्यास्पद नेतृत्व ठरत आहेत. सध्या ते ‘भारत जोडो’ यात्रा करत आहेत. पण त्यांचेच पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताची फाळणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अशा पक्षांना लोक उभे करणार नाहीत. भारतीय जनता पक्षालाच कसब्याची जनता विजयी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. माधुरी मिसाळ म्हणाल्या की, यंत्र, तंत्र आणि मंत्र या त्रिसूत्रीवर आपण काम केले, तर कसबा विधानसभा मतदारसंघ आपल्याला सहज जिंकणे शक्य आहे. इथला प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी आपुलकी जपतो; आणि हीच आपुलकी आणि प्रेम भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळाले आहे. त्यामुळे आपण कसबाची पोटनिवडणूक शंभर टक्के जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा उपाध्यक्ष संजय काकडे म्हणाले की, कसबा आणि चिंचवड हे पुणे जिल्ह्यातील भाजपाचे बालेकिल्ले आहेत‌. पण तरीही कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत गाफील राहू नये. पक्ष नेतृत्व ज्यांना उमेदवारी देईल, त्यांचा सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करुन निवडून आणू‌, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले की, आज मोदींचे नेतृत्व जनसानसात आज रुजलेलं आहे.‌याचं एकमेव कारण म्हणजे बूथ वरील कार्यकर्ता. बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. त्यामुळे बूथ कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

बैठकीचे प्रास्ताविक मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू काकडे यांनी केले. तर छगन बुलाखे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांचा खून केला-माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत


युवा संसद २०२३ मध्ये आयडिया ऑफ इंडिया या विषयावर सत्र

पुणे : आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते, परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावी झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे, परंतु महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरु यांनी केला हे स्विकारावेच लागेल, अशी टीका राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसतर्फे संस्थेच्या नऱ्हे कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडिया या सत्रामध्ये सदाभाऊ खोत बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर, इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, विद्यार्थी नेता पार्थ पटले, कुणाल दंडवते आदी यावेळी उपस्थित होते. रंजना गायकवाड यांना आदर्श सरपंच पुरस्कार, संजय गिराम यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार तर राजेश पाडवी यांना आदर्श आमदार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.

सदाभाऊ खोत म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून देशाचा विकास केला, परंतु इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून देशाची लुबाडणूक केली. अशीच व्यवस्था कायम राहिली तर देशामध्ये समान विकास कसा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास आपण निर्माण केला पाहिजे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, भारतामध्ये पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतील. पंडित नेहरू यांना दिल्लीतील रायसोनी हिल्स हाच भाग भारत वाटत होता. परंतु नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात विकासाची पाळेमुळे नेऊन पोहचवले खऱ्या अर्थाने आज भारताचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला दिसत आहे.

बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले – सदाभाऊ खोत
सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता अनुभवत आहेत. परंतु हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत . कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले. यामुळे बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पाइन सर्जरी सेंटर सुरू करणार- डॉ. राजेंद्र मिटकर यांची घोषणा


पुणे, दि. २८ जानेवारीः वैद्यकीय क्षेत्रात नव नवीन प्रयोग करणारे व कोथरूड हॉस्प्टिलमध्ये शिकायला येणार्‍या परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांना हॉस्पिटलतर्फे फेलोशिप देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पाइन सर्जरी सेंटर व डायबिटीज सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अशी घोषणा कोथरूड हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर यांनी केली.
हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी कोथरूड हॉस्पिटलचे संचालक डॉ राजेंद्र गुंडावार, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तुषार दाते, डॉ. मंजुषा प्रभूणे, डॉ. लिना दोभाडा, डॉ. दिप्ती पोफळे, डॉ. हिमांशू पोफळे आणि हॉस्पिटलचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व वर्धापन दिनाचे औचित्य साधून हॉस्पिटल तर्फे सर्व नागरिकांनसाठी विनामूल्य आरोग्य शिबिर व मोफत औषधांचे वाटप केले. या शिबिरचा लाभ २०० नागरिकांनी घेतला. शिबिरात हाडांच्या आजारांवर विशेष उपचार व निदान करण्यात आले. हाडांच्या सर्व तपासण्यांसह मधुमेह, रक्तदाब, ईसीजी यांसह विविध आजारांच्या तपासण्या केल्या. डॉ. निखिल ओझा, बालरोग तज्ञ डॉ. रघुवंशी व डॉ. अर्चना मुदखेडकर यांनी तपासण्या करून योग्य उपचार व मार्गदर्शन केले.डॉ. राजेंद्र मिटकर म्हणाले,“ कोथरूड वासियांसाठी आम्ही नवीन संकल्प केला आहे की नवजात बालांसाठी अत्याधुनिक एनआयसीयू उघडणार आहे. त्याच प्रमाणे महिलांना होणार्‍या विभिन्न आजारासंदर्भात प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मंजुषा प्रभूणे या वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय साधणे (मशिनरी) उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमधून रुग्ण आनंदी होऊनच बाहेर निघावा हा आमचा संंकल्प असून त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे.”
वर्ध्यांचे खासदार रामदास तडस व आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच विलास कथुरे यांनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

” अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या  बुधवार दि.  १ फेब्रुवारी रोजी  २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील  विविध घटकांपासून राजकारणी,  विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष भाववाढ किंवा चलनवाढीने ग्रासलेले होते आणि आता २०२३ मध्ये  मंदीसदृश्य परिस्थिती  अनुभवावी लागेल असा  अंदाज व्यक्त केला आहे. ही मंदी जागतिक पातळीवर राहण्याची शक्यता असून ती उथळ, तात्पुरती किंवा दीर्घ कालीन परंतु खोलवर जाणवणारी असेल किंवा नसेल याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यांमध्ये भाव वाढीला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढीचे  अस्त्र वापरले त्यामुळे गेल्या दोन दोन महिन्यांमध्ये तरी भाव वाढ अपेक्षेप्रमाणे आटोक्यात किंवा नियंत्रणात राहिली आहे. त्याचप्रमाणे चालू खात्यावरील तूटही कमी होत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.खरंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देशातील सद्यस्थितीबाबत जास्त ममता असणे स्वाभाविक आहे. नजीकच्या काळामध्ये फारशी व्याजदर वाढ टाळून एकूण अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण करण्यावर रिझर्व बँकेचा भर  राहील.  महागाईचा दर सहा वरून चार टक्क्यांपर्यंत खाली आणणे हे जरी उद्दिष्ट गाठले गेलेले नसले तरी  देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर हा आणखी चांगला कसा राहील याकडे मध्यवर्ती बँकेला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षभरात रिझर्व बँकेने देशातली अर्थव्यवस्था  रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले.यामुळे अर्थव्यवस्थेच्या एकत्रित करण्यासाठी ही सर्व जबाबदारी ही केवळ रिझर्व बँकेची नसून केंद्र सरकारवर म्हणजे पर्यायाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर आहे. या अंदाजपत्रकात त्यावरच भर देण्याची अपेक्षा आहे. मोदी सरकार समोर या वर्षात नऊ राज्यातील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षात लोकसभेची निवडणूक उभी ठाकलेली असली तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा “लोकानुनयी ” अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही अशी अर्थतज्ज्ञांची अपेक्षा आहे. जनतेच्या हातात पैसा खुळखुळावा म्हणून आर्थिक सवलतींचा मारा केला जाऊ नये किंवा गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी आर्थिक सवलतींची खैरात केली जाऊ नये अशी अर्थतज्ञांची अपेक्षा आहे. जगातील अनेक देश भारताकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्ट्या पाहत .  आपल्या शेजारील चीनची सध्याची आर्थिक स्थिती व तेथील गुंतवणुकीची भूराजकीय जोखीम लक्षात घेऊन भारताकडे सर्व देश आशेने पाहत आहेत. यामुळेच मोदी सरकारने त्यांचे पूर्णपणे लक्ष देशातील सर्व पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे प्रगतीशील डिजिटल भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टीगोष्टींवर भर देणे नितांत गरजेचे आहे. मोदी सरकारने  अंमलात आणलेल्या उत्पादकतेशी निगडित आर्थिक सहाय्य योजनेचा विस्तार मोठ्या, मध्यम व छोट्या कंपन्यांच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने करण्याची गरज आहे.विविध उद्योग क्षेत्रांसाठी ही योजना लागू केली पाहिजे.  जगातील विविध गुंतवणूकदार किंवा देशांना भारताकडे आकर्षित करण्यासाठीआर्थिक स्थैर्य व धोरणांबाबत विश्वासार्हता निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

गेल्या वर्षाच्या अखेरीस  जी-२०  देशांचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला लाभली. त्यामुळे २०२३-२४ या वर्षात आर्थिक विकासाचा दर किमान साडेसहा ते सात टक्के ठेवणे हे निर्मला सीतारामन यांच्या पुढचे मोठे आवाहन आहे. यामध्ये त्यांना यशस्वी होण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे की ती म्हणजे केंद्र सरकारने पुढील वर्षांमध्ये विकासावर मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च करण्याची गरज आहे त्याचबरोबर गेल्या तीन वर्षात केंद्र व राज्यांची वित्तीय तूट 10 टक्क्यांच्या घरात गेलेली आहे . ती कमी करणे हे गरजेचे आहे. जनतेसाठी आर्थिक सवलतींची लयलूट करणे थांबवले पाहिजे. ज्याला सध्या रेवडी संस्कृती म्हणतात ती संस्कृती निश्चित कमी केली पाहिजे किंवा बंद केली तर सर्वात चांगली गोष्ट होऊ शकेल. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये होणारा सरकारचा आर्थिक सवलती म्हणजे सबसिडींवरचा वाढता खर्च अर्थव्यवस्थेला मारक ठरत आहे.  त्यामुळेच विविध आर्थिक सवलतींचा आढावा करून त्याची फेररचना करण्याची गरज आहे. भारत हा आजही कृषीप्रधान देश आहे. देशातील काम करणाऱ्या वर्गापैकी 46% एवढे जनता कृषी क्षेत्रामध्ये अडकलेली आहे.  सध्याची स्थिती लक्षात घेता एवढ्या मोठ्या कामगारांना सामावून घेण्याची  कृषी क्षेत्राची क्षमता नाही.  त्यामुळे त्यांना बिगर शेती क्षेत्रामध्ये म्हणजे उत्पादन, सेवा क्षेत्राकडे वळवले पाहिजे.  त्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करून  कौशल्य  निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. आजही ग्रामीण भागातील शिक्षण पद्धती खूप खालच्या दर्जाचे काम करीत आहे. ग्रामीण व शक्तीतरुणांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य निर्माण करण्यातही आपण कमी पडत आहोत. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारक्षम करणे किंवा नवनवीन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी आवश्यक ते अर्थसहाय्य देणे आवश्यक आहे. शहरांमध्ये सध्या काही संस्था अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतात परंतु समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत त्याचा लाभ पोहोचला पाहिजे. देशातील बांधकाम क्षेत्र किंवा पायाभूत सुविधा क्षेत्र असो त्यांना आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञांची आज भारतामध्ये  वानवा आहे अगदी इलेक्ट्रिशियन पासून प्लंबर, पेंटर हे कारागि  कौशल्यपूर्णरित्या निर्माण केले पाहिजेत. त्यांची सध्या संख्या अपुरी आहे. या बाबतीत चीनचे उदाहरण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडे जेव्हा ग्रामीण भागातील शेती किफायतशीर ठरत नव्हती तेव्हा त्यांनी वीस कोटींपेक्षा जास्त कामगार दुसऱ्या क्षेत्रांकडे जाणीवपूर्वक वळवले. त्यात नवीन शहरांची निर्मिती तसेच पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली आणि मनुष्यबळाचा फार चांगला वापर देश हितासाठी केला. भारताच्या तुलनेत चीनची जवळजवळ निम्मी लोकसंख्या  शेती उद्योगात आहे. तरीही चीनचे कृषी उत्पादन  भारतापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. यापासून आपण बोध घेण्याची गरज आहे त्यांच्याकडे लोकांवर आर्थिक सवलतींची खैरात केली जात नाही. आज भारतात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याखाली ८० कोटी जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेखाली मोफत अन्नधान्य वाटप केले जाते. त्यात प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाच किलो तांदूळ किंवा गहू दिला जातो. यासाठी केंद्र सरकारचे  दोन लाख कोटी रुपये खर्च होतात. करोनाच्या काळात यापेक्षा जास्त अन्नधान्य वाटप केले गेले.  शेतकऱ्यांना खतासाठी दिली जाणारी आर्थिक सवलत  सुद्धा दोन लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. पंतप्रधान किसान योजनेसाठी आणखी 60 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. याशिवाय वेगवेगळ्या आर्थिक सवलतींची खैरात शेतकऱ्यांवरील सवलती पाच लाख कोटींच्या घरात जातात. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. याशिवाय देशातील उद्योग क्षेत्रांना उत्पादनाशी निगडित दिल्या जाणाऱ्या आर्थिक सवलतींचा वाटाही मोठा आहे,. देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन  “रेवडी” संस्कृतीला योग्य प्रमाणात आळा घालतील अशी अपेक्षा आहे. मात्र निवडणुका जिंकण्यासाठीचे राजकारण नेहमीच अर्थव्यवस्थेला मारक ठरते. त्यात बदल करण्याची गरज आहे.
.
देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची गरज आहे किंवा कसे याची गंभीर तपासणी करण्याची वेळ आलेली आहे.  गोरगरिबांना अन्नसुरक्षा कायद्याखाली मोफत धान्य वाटप करणे गैर नाही मात्र  त्या नावाखाली जे गरजू नाहीत त्यांनाही या मोफत अन्न वाटपाचा लाभ होतो किंवा कसे हे पाहणे पाहिजे. भारताची लोकसंख्या लक्षात घेता जवळजवळ दोन तृतीयांश जनतेला अन्नधान्य सुरक्षा द्यावी लागते म्हणजे एक तृतीयांश लोकही स्वतःसाठी अन्नधान्य कमवू शकत नाहीत. गेल्या 75 वर्षातल्या सर्व सरकारचे अपयश मानावे लागेल. दोन लाख कोटी अन्नधान्य सवलत देताना त्यात काही बचत करता येईल का याचा विचार केला गेला पाहिजे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गेल्या तीन वर्षाच्या अंदाजपत्रकात फार काही करता आलेले नव्हते २०२०-२१ मध्ये अंदाजपत्रक संसदेत सादर झाल्यानंतरलगेचच काही दिवसात देशभर लोक डाऊन जाहीर करण्यात आला होता. २०२१-२२ या वर्षात करुणाची दुसरी लाट आली,. २०२२-२३ मध्ये रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद. यामुळे गेल्या तिन्ही वर्षांमध्ये अर्थसंकल्पातील अंदाज महसूल, जमा खर्च याचा काही ताळमेळ साधता आला नव्हता. अर्थात जागतिक पातळीवरील ही परिस्थिती आपल्याला अनुकूल नव्हती. तरीसुद्धा मोदी सरकारने देशातील वाढती बेरोजगारी, अन्नधान्य उत्पादन , दारिद्र्यरेषेखालील जनता, शिक्षणातील त्रुटी किंवा कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी याचा सांगोपांग विचार करून नवीन आर्थिक धोरणांची आखणी केली पाहिजे. केवळ लोकप्रियतेसाठी सवलती न देता अर्थव्यवस्था अधीक सुदृढ , सक्षम करण्यासाठी कडक व खंबीर निर्णय घेतले पाहिजेत. दुर्देवाने आज ती शक्यता कमी वाटते.

प्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणेस्थित ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)*

सुरक्षा रक्षकांसाठी मिक्स मार्शल आर्ट्स चे सेमिनार आयोजित करणार-जॅकी श्रॉफ

अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. 

नवी मुंबई – अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशन तर्फे नवी मुंबईमधील सानपाडा येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या मुख्यालयात सुरक्षा रक्षकांसाठी  मोफत आरोग्य तपसणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांची देखील उपस्थिती होती . तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे समन्वयक संदीप घुगे, कामगार आयुक्त सुरेश जाधव, मुंबई / ठाणे सुरक्षा रक्षक मंडळाचे संचालक विलास बुवाजी हे देखील उपस्थित होते. या शिबिरास ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि डाबर इंडीया यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

आज आपण महाराष्ट्रातील जनतेला आपल्या सेवेतून सुरक्षा पुरवणाऱ्या कार्यतत्पर सुरक्षा रक्षकांचे आभार व्यक्त करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे ऋणी आहे. आपले सुरक्षा रक्षक बांधव आणि भगिनी दिवस रात्र आपले रक्षण करून बहीण आणि भावाची जवाबदारी पार पाडत आहेत त्यामुळे मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी त्यांच्या प्रती शक्य असेल तेवढी मदत करण्याचं आश्वासन देते अशी भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.

आज आपण रस्त्यावरून सुरक्षित चालू फिरू शकतो ते फक्त आपल्या पोलीस आणि सुरक्षा रक्षक बंधू भगिनींमुळे. त्यामुळे आपण देखील आपल्या आरोग्याकडे तितकेच काळजीने बघितले पाहिजे, मी लवकरच आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी मिक्स मार्शल आर्ट्स चे सेमिनार आयोजित करणार आहे असे आश्वासन अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी दिले.

कोविड काळात राज्यात डॉक्टर, नर्स पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपली जवाबदारी पार पाडली २६/११ च्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान आपल्या सुरक्षा रक्षकांनी समय सूचकता दाखवून कामगिरी पार पडली होती. आज दिव्याज फाऊंडेशच्या माध्यमातून अमृता यांनी हे आरोग्य शिबिर आयोजित केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे मत संदीप घुगे यांनी व्यक्त केले.

शाळेतील पिटी शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

पुणे-

पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका शाळेतील फिजीकल एज्युकेशन(पी.टी.) शिक्षक विद्यार्थीनींना मिठ्या मारुन तसेच चुंबन घेऊन विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार समुपदेशनमध्ये उघडकीस आला आहे. हा शिक्षक सदरचा प्रकार मागील दोन ते तीन महिण्यापासून करत होता ही बाब यानिमित्ताने समोर आली आहे. शाळेत झालेल्या समुपदेशनाच्या दरम्यान अल्पवयीन चार विद्यार्थीनींनी हा प्रकार समुपदेशक यांना सांगितला आहे. यानंतर संबंधीत शिक्षकाची शाळेच्यावतीने कोंढवा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

अविनाश गोविंद चिलवेरी ( 23, रा.बिडी कामगार वसाहत, येरवडा,पुणे) असे अटक शिक्षक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शाळेच्यावतीने 37 वर्षीय महिलेने पोलिसांकडे आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक चिलेवार विरुध्द विनयभंगसह पॉस्को अंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोंढव्यामध्ये एक इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा आहे. आरोपी चीलवेरी तेथे सात ते आठ महिण्यापुर्वीच पी.टी.शिक्षक म्हणून रुजू झाला होता. तो मागील दोन महिण्यांपासून तेथील विद्यार्थीनींना जबरदस्ती मिठी मारुन चुंबन घेत होता. तसेच त्यांना व्हॉटसअपव्दारे आयलव्हयू मेसेजही पाठवत होता.

हा प्रकार नोव्हेंबरपासून सुरु होता अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या शाळेतील समुपदेशान दरम्यान शाळेतील चार मुलींनी हा धक्कादायक प्रकार समुपदेशकांना सांगितला. त्यांनी ही बाब शाळेच्या शिक्षीकेच्या निदर्शनास आणून दिली.त्यानंतर शाळेने याबाबत मुलींकडे चौकशी करून दोषी शिक्षका विरोधात तक्रार पोलिसांकडे दिली आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलिस करत आहे.

रॅपिडो विरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील इंटरवेशन याचिका दाखल करणार : बाबा कांबळे

  • महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनच्या पाठपुराव्यानेच उच्च न्यायालयात यश
  • बोगस संघटनांकडून श्रेय घेत असल्याचा खोटा प्रचार

पिंपरी / प्रतिनिधी

रॅपीडो कंपनीने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक थांबवावी, यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रस्त्यावरची लढाई करून रिक्षा चालकांना न्याय दिला. उच्च न्यायालयात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनने याचिका दाखल करत लाखो रुपये खर्च करून वकिलाची नेमणूक केली. रिक्षा चालकांची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. मा. न्यायालयाने देखील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी मांडलेल्या मतांची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाची लढाई जिंकल्याचे श्रेय घेत असल्याचा काही रिक्षा संघटनांच्या आरोपांना हे उत्तर असून त्यांना चपराक देखील आहे. सध्या रॅपीडो कंपनीने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनही स्वखर्चाने वकील देऊन इंटरवेशन याचिका दाखल करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली. ३० जानेवारी रोजी दिल्लीत स्वतः उपस्थित राहून रिक्षा चालकांची बाजू मांडून तिथेही लढाई जिंकू, असा विश्वासही बाबा कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे भाजपा आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले जय महाराष्ट्र शिक्षण संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद वाहतूक सेवा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले राष्ट्रवादीचे संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे सावकाश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भालेराव आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, कायद्याच्या अधीन राहून सनदशीर मार्गाने न्याय मिळवता येतो, हे महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रॅपीडो कंपनीविरोधातला लढा जिंकून दाखवून दिले आहे. काही बोगस रिक्षा संघटनांनी कायदेशीर मार्ग न निवडता रिक्षा चालकांना संकटात टाकून, गुन्हे दाखल होईपर्यंत चुकीच्या मार्गाने आंदोलन केले. रिक्षा चालकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या चुका झाकून या रिक्षा संघटना महाराष्ट्र रिक्षा पंचायतवर खोटे आरोप करून सर्वसामान्य रिक्षा चालकांची अद्यापही दिशाभूल करत आहेत. रॅपीडो कंपनीविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायतने सहकारी मित्र रिक्षा संघटनांच्या वतीने रस्त्यावरची लढाई करत आंदोलन छेडले. रॅपीडोने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर तिथेही महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनने स्वखर्चाने वकील देत लढाई जिंकली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशनच्या पाठपुराव्यानेच उच्च न्यायालयात यश मिळाले आहे. न्यायालयाने आदेशात दोन्ही संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींची निरीक्षणे महत्वाची मानली असल्याचे नमूद केले आहे. मात्र काही रिक्षा संघटनांना याची माहितीच नसल्याने ते रिक्षा चालकांमध्ये चुकीचा संदेश देत आहेत. रिक्षा चालकांनी अशा रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींच्या भूलथापांना आता तरी बळी पडू नये, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

आनंद तांबे म्हणले सध्या रॅपिडो कंपनीने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत ३० जानेवारी रोजी सुनावणी आहे. रॅपीडो कंपनीविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशन देखील इंटरवेशन याचिका दाखल करणार आहे. स्वखर्चाने वकिलाची नेमणूक करून महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे स्वतः दिल्लीत उपस्थित राहून रिक्षा चालकांचे म्हणणे मांडणार आहेत. रस्त्यावरची लढाई तसेच उच्च न्यायालयात लढाई जिंकल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात देखील लढाई जिंकू, असा विश्वास देखील *आनंद तांबे यांनी व्यक्त केला आहे.

मधुरा चौकसकर आणि रिया बोगावतच्या अरंगेत्रमने प्रेक्षक मंत्रमुग्ध

पुणे – ‘मृदंगम्’मधून निघणारे तालाचे बोल, व्हायोलिनच्या सुरावटीतून निघणारा आर्त स्वर, नर्तकीचा मुद्राभिनय या सर्वांच्या संयोगाने होणारे भरतनाट्यमचे पदलालित्य यांचा अनोखा संगम प्रजासत्ताक दिनी अरंगेत्रममध्ये पहायला मिळाला. मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या सकल ललित कलाघर येथे भरतनाट्यम नृत्यांगना मधुरा चौकसकर आणि रिया बोगावत यांनी अरंगेत्रम सादरीकरण केले. गुरु सुचित्रा दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या आठव्या वर्षापासून भरतनाट्यमचे धडे घेणारी नृत्यांगना रिया आणि मधुरा हिने अरंगेत्रम सादर केले. या कार्यक्रमात दोघींनी भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या विविध छटा सादर केल्या.

कार्यक्रमात रिया आणि मधुरा हिने गंभीरनातई रागावर आधारित मल्लरी, नातई महा गणपतीम, यमन कल्याणी रागावर आधारित नवकार, खंडा तालावर आधारित अलरीप्पू, मध्यमावती रागावर आधारित ब्रम्ह संधी, हमसानंदी रागावर आधारीत जतिस्वरम, रागमालिकावर आधारित शब्दम, रागेश्रीवर आधारित वरणम, भैरवी शंकर श्रीगिरी,  शेंजूरुत्ती विषमकारा कन्नन, भजनी तालावर आधारित खेळ मांडीयेला, शिवरंजनी तिल्लाना, मध्यमावती मंगलमया प्रकाराचे सादरीकरण केले. ऊर्जाच्या नृत्यात ताल व सुर व पदलालित्याचा सुरेख संगम या वेळी पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनेत्री देविका दफ्तरदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नृत्य प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल फॉर डान्सच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.अ‍ॅड. मिनल जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सौ. गायत्री चौकसकर यांनी केले.

या कार्यक्रमात नट्टूवंगमची  साथ सूचित्रा दाते व श्रुती टेकावडे, मृदंगमची साथ पी आर चंद्रन, गायनाची साथ निथी नायर, बासुरीची साथ सुनिल अवचट, व्हायोलिनची साथ बालासुब्रमन्यम सर्मा यांनी दिली. वेशभूषा के. मोहन आणि लक्ष्मी मोहन, लाइट-साऊण्ड हर्षवर्धन केतकर, कार्ड डिजायनर शिबानी चौधरी, प्रात्याक्षिक इशा जोगळेकर, समृद्धी साका आणि तन्मयी शितोळे,

अरंगेत्रम सादर करणे हे प्रत्येक नृत्य शिकणाऱ्या शिष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. भरतनाट्यम  नृत्यशैलीतील एका विशिष्ट पातळीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच अरंगेत्रम् सादर करण्याची परवानगी असते. यामध्ये विविध प्रकारातील नृत्यरचना सलग सादर कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा दोन-चारच्या समुहात अरंगेत्रम् सादर करण्यावर भर दिला जातो. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली – काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजूच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे  काम आता पूर्ण झाले असून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला झाला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगदा दोन्ही बाजूकडून जोडण्यात आला आहे. या ऐरोली – काटई प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे सात किमी अंतर कमी होणार असून नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे नागरिकांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल.

राज्य शासनाच्या वतीने अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शिळफाटा ते कल्याण व कल्याण ते भिवंडी असा थेट एलिव्हेटेड उड्डाणपूल करणार आहोत. तसेच कल्याण ते तळोजा मेट्रो असा दुमजली रस्ता व मेट्रो असलेला मार्गाचे नियोजन आहे. याशिवाय मानकोली -डोंबिवली या खाडी पुलाच्या कामामुळे अंतर कमी होईल. ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चेंबूर फ्री वे जेथे उतरतो त्या ठिकाणाहून थेट फाऊंटनपर्यंत शहराच्या बाहेरुन बायपास करतोय. ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी असे अनेक प्रकल्प राबवित आहोत. मुंबई व  मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी डबलडेकर टनेल ही संकल्पना राबविणार आहोत. जेणेकरून मुंबई आणि एमएमआरमधल्या लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका होईल व त्यांचे जीवन सुसह्य होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

असा आहे प्रकल्प

ऐरोली काटई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागाला गेला असून भाग-१ अंतर्गत चा रस्ता हा ठाणे बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. सदर भागाची लांबी  ३.४ कि.मी. इतकी असून त्यामध्ये १.६९ कि.मी. लांबीचा दुहेरी बोगदा व उर्वरित  रस्ता व उन्नत मार्ग आहे. सदर प्रकल्पात असलेला बोगदा हा चार  ४+४ मार्गिकेचा आहे.( त्यामध्ये १+१ रेफ्युजी मार्गिका आहे.)

सदर बोगद्यांचे भुयारीकरणाचे काम हे  New Austrian Tunneling Method (NATM) कंट्रोलिंग ब्लास्टिंग या तंत्रज्ञान पद्धतीने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत बोगद्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाची उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

सद्यःस्थितीत प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावे लागत आहे. या प्रकल्पामुळे कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबई मधील अंतर ७ कि.मी. ने कमी होईल. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल. सदर प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

एमएमआरडीचे महानगर आयुक्त श्री. श्रीनिवास म्हणाले की, “पारसिक टेकड्यामधील भुयारीकरणाचे काम हे खूप अवघड आहे. आज डाव्या बाजूच्या बोगद्यात शेवटचा ब्लास्ट करून तो दोन्ही बाजूंनी खुला झाला आहे. ह्या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूच्या भुयारीकरणाचे  काम देखील लवकरच पूर्ण होईल. दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील महत्त्वाचा आणि अवघड टप्पा पार होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल आणि काटई नाका ते ऐरोली दरम्यानच्या प्रवासात ३० मिनिटांनी कमी होईल. ज्याचा फायदा मुंबईहून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल.

०००

उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पेठ-सांगली रस्त्याचे काम एक महिन्यात सुरू होणार

सांगलीइथेनॉल हे भविष्यातील इंधन असून उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे  यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पेठ नाका ते सांगली या 41.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. आष्टा शहर येथे झालेल्या या कार्यक्रमास कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील व धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मनसिंग नाईक, आमदार  विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले,  इंधन म्हणून इथेनॉलची मागणी वाढत आहे, यासाठी उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मिती झाल्यास त्याचा लाभ साखर कारखान्याबरोबरच शेतकरी सभासदांना होणार आहे. केंद्र सरकारने  ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरता  हार्वेस्टिंग सारखी योजना आणली असून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. या योजनेमुळे कमी वेळेत ऊस कारखान्यास जातील आणि उसाचा उतारा चांगला मिळेल असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले. इथेनॉल बरोबरच हायड्रोजन हे देखील भविष्यातील इंधन असून या इंधनाच्या निर्मितीसाठीही शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. हायड्रोजन इंधन निर्मितीतून शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवले पाहिजे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र हायड्रोजन निर्मितीचेचे हब होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. गडकरी म्हणाले, पेठ सांगली या रस्त्याचे काम एक महिन्यात सुरु होणार आहे  बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून या रस्त्याची बांधणी करण्यात येणार असल्याने हा रस्ता अधिक दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होईल व  या भागातील विकास झपाट्याने होईल. या रस्त्यावरून होणारा प्रवास आनंददायी होण्यासाठी या भागातील शैक्षणिक संस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून हा रस्ता ग्रीन हायवे करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पालकमंत्री डॉ.खाडे म्हणाले,पेठ – सांगली या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि  ह्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होत असल्याने जिल्हावासियांची  बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन  या भागातील विकासाला गती दिली त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.  मार्च नंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होवून चांगला व दर्जेदार रस्ता  होईल याची मला खात्री आहे असेही पालकमंत्री डॉ. खाडे  म्हणाले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले या रस्त्याची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे, याचे सारे श्रेय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यानाच द्यावे लागेल. हा रस्ता शिराळा मार्गे कोकणाला जोडल्यास त्याचा लाभ कोकणातील व या भागाच्या विकासाला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या रस्त्याच्या कामामुळे या भागातील गावे राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आल्याने या परिसराचा विकास झपाट्याने होईल.

पेठ-सांगली हा  रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या भागात विकासाचे दालन खुले झाले आहे असे खासदार संजय पाटील यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी प्रास्ताविक करून या रस्त्याच्या कामाची माहिती दिली.

पेठ-सांगली रस्त्याबाबत माहिती…

  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 एच पेठ नाका ते सांगली हा 41.25 किलोमीटरचा रस्ता ईपीसी तत्त्वावर काँक्रीट चौपदरीकरण करून पुनर्बांधणी व दर्जान्नतीकरण करण्याच्या कामासाठी 860 कोटी 45 लाख रूपये रक्कम मंजूर.
  • या  रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण होणार असून चार पदरी काँक्रीट रस्ता, मध्यभागी 0.6 मीटरचा दुभाजक, दुभाजक पासून दोन्ही बाजूस 7.5 मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता व 1.5  मीटर रुंदीची बाजू पट्टी असा हा रस्ता करण्यात येणार आहे.
  • या रस्त्यावर छोटे फुल 10, बॉक्स सेल मोरी 15, पाईप मोरी 60, ट्रक थांबे 2, बस शेड  10, मोठे जंक्शन 6, लहान जंक्शन 34, टोल नाका एक (तुंग ते कसबे डिग्रज दरम्यान), काँक्रीट गटार १४.२०४ कि.मी. दोन्ही बाजूस, खुली गटार 27.046 कि.मी. दोन्ही बाजूस करण्यात येणार आहे.
  • या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे लोक, स्थानिक लोक तसेच वाहतूक, रहदारी या सर्वांची सुरक्षितता वाढणार आहे. अपघाताच्या प्रमाणात घट होणार असून प्रवास सुखकर, सुरक्षित व आरामदायी होणार आहे.
  • हा रस्ता राज्य मार्ग 48 पासून इस्लामपूर आष्टा सांगली या शहरांमधून पुढे सोलापूर व कर्नाटक मध्ये जाणाऱ्या रस्त्यास जोडला आहे. या राष्ट्रीय महामार्गामुळे शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे.
  • सांगली हे निर्यातक्षम शहर हळद व बेदाणे उत्पादनात अग्रेसर असून सांगली बाजारपेठ ही या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे पुणे मुंबई बेंगलोर एन एच 48 या राष्ट्रीय महामार्गास जोडली जाणार आहे.
  • राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण होणार असल्याने वाहतूक जलद होऊन वाहनांच्या इंधन  खर्चात बचत होणार आहे.
  • हा राष्ट्रीय महामार्ग शेतीवर आधारित व्यवसाय तसेच सांगली कुपवाड व मिरज औद्योगिक वसाहती मधील व्यावसायिका करिता लाभदायक ठरणार आहे.
  • या राष्ट्रीय महामार्ग सभोवतालच्या परिसर व शहराच्या सर्वांगीण विकास व रोजगार निर्मितीस सहाय्य होणार आहे.

महावितरणने ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्तपत्रांतील वृत्त चुकीचे,दिशाभूल करणारे-महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक

दरवाढीच्या प्रस्तावाच्या बातमीने ग्राहकांत पसरत होता संताप ..

मुंबई, दि. २८ जानेवारी २०२३: महावितरणने महसुली तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत आगामी दोन आर्थिक वर्षात सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजेच ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव दिल्याचे विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. महावितरणने सहा वर्षांतील महसुली तूट भरून काढण्यासाठी २०२३ -२४ व २०२४ -२५ या दोन आर्थिक वर्षात दरवर्षी अनुक्रमे १४ टक्के आणि ११ टक्के सरासरी दरवाढ प्रस्तावित केली असून ही सरासरी प्रस्तावित दरवाढ एक रुपयाच्या जवळपास आहे. प्रस्तावित सरासरी दरवाढीमध्ये स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांचा समावेश केलेला आहे, असे महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.

ते म्हणाले की, वीज नियामक आयोगाने २०२० -२१ च्या आर्थिक वर्षापासून महावितरणसाठी बहुवार्षिक दररचना मंजूर करताना महावितरणसाठी जो महसूल अंदाजित केला होता तो महसूल कोरोना महासाथ आणि कोळशाच्या संकटामुळे वाढलेला खर्च यासह विविध कारणांमुळे गोळा झाला नाही. परिणामी गेल्या चार आर्थिक वर्षातील महसुली तूट आणि आगामी दोन आर्थिक वर्षातील अपेक्षित तूट या सहा वर्षांच्या तुटीचा विचार करता महावितरणने आगामी दोन वर्षांत भरपाई करण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे.

देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर वीजनिर्मितीसाठी आयात केलेल्या कोळशाचा वापर करण्यात आला. यामुळे वीज निर्मिती कंपन्यांनी वाढीव दर मागितला असता महावितरणने त्याला नियामक आयोगासह सर्व न्यायिक संस्थांकडे आव्हान दिले. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार निर्मिती कंपन्यांना वाढीव निधी द्यावा लागला. यामुळे आयोगाने बहुवार्षिक दररचनेमध्ये महावितरणसाठी जो खर्च मंजूर केला होता त्यापेक्षा हा अतिरिक्त खर्च झाला. परिणामी महावितरणची महसुली तूट वाढली.

याशिवाय यावेळी महसुली तुटीचे एक महत्त्वाचे वेगळे कारण आहे. राज्यामध्ये विजेच्या दरामध्ये क्रॉस सबसिडी नावाची संकल्पना कित्येक वर्षांपासून वापरली जाते. म्हणजे औद्योगिक व वाणिज्यिक अशा ग्राहकांना थोडा जास्तीचा वीजदर लाऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी किंवा छोट्या कुटुंबांना वीजदरात दिल्या जाणाऱ्या सवलतीची भरपाई केली जाते. आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ या काळात कोरोनाच्या महासाथीमुळे लॉकडाऊन होऊन आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परिणामी औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांचा वीजवापर खूप कमी झाला व त्यांच्याकडून अधिकच्या दराने होणारी वसुली कमी झाली. दुसरीकडे घरगुती ग्राहकांचा वीज वापर वाढला तर शेतीचाही वीज वापर चालू राहिला. या दोन्ही घटकांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा होतो. कोरोना काळात महावितरणने भारनियमन केले नाही. त्यासोबत देखभाल दुरुस्ती कायम ठेवली. कोरोना काळात घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांकडून वीज वापर चालू असला तरी त्या वेळच्या परिस्थितीमुळे अनेक ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा उशीरा केला. त्याच वेळी वीज खरेदी आणि ट्रान्स्मिशन यांचा महावितरणचा खर्च चालू राहिला. अशा परिस्थितीत महावितरणने कर्ज काढून ग्राहकांना अखंड वीजपुरवठा चालू ठेवला. त्या कर्जावरील व्याजाचा बोजा महसुली तुटीत दिसतो.

सन 2022 साली कोळशाच्या तुटवड्यामुळे 18 राज्यांमध्ये भारनियमन झाले पण महाराष्ट्रात झाले नाही. त्यासाठी अधिकचा खर्च करावा लागला. या सर्वांचा परिणाम म्हणून वीज नियामक आयोगाने अपेक्षित केलेला महसूल मिळाला नाही आणि महावितरणची महसुली तूट वाढली. महसुली तुटीच्या संदर्भात २३ वर्षांतील सर्वाधिक मागणी अशी टीका करताना गेल्या २३ वर्षांतील वाढलेले सेवा व वस्तुंचे दर आणि वाढलेली आर्थिक उलाढाल ध्यानात घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

देशाची बहुतांश संपत्ती ‘निवडक – घराण्याकडे’ असणे घातक.. याचा प्रत्यय येण्यास सुरवात… गोपाळ तिवारी

पुणे दि २७ – देशाचा ७४ वा “प्रजासत्ताक दिन” काल नुकताच साजरा झालेवर व अदाणी समुहाच्या आर्थिक घोटाळ्याच्या बातम्या काल माध्यमांत प्रसिध्द झालेवर आज “स्टॅाक मार्केट” पहील्या तीन तासांतच निफ्टी तब्बल ३५० हुन अधिक व सेंनसेक्स सु १००० पेक्षा ही जास्त पडला.. गेल्या ३ महीन्यात ही मार्केट मोठ्या प्रमाणात पडण्याची ही दुसरी तीसरी वेळ असुन, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील संपत्ती व मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्ती देखील केवळ २/३ घराण्याकडेच सुपुर्त करण्याचे कारस्थान हे लोकशाही साठी, देशाची सार्वभौमता व देशातील जनतेवर लादल्या जाणाऱ्या महागाई – बेकारी च्या संकटांचे निमंत्रक ठरतील व तसा प्रत्यय येऊ लागला आहे अशी उपरोधिक टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली..!
अमेरीकेतील ख्यातनाम “हिंडेनबर्ग या रिसर्च कंपनी ने गेल्या ४/५ वर्षात जगात ३ ऱ्या श्रीमंत झालेल्या अडाणी ग्रूप ला ८८ प्रश्न विचारले…पैकी त्यांना एकाचे ही ऊत्तर मिळु शकले नसल्याचा दावा सदर अमेरीकेतील रीसर्च कंपनी ने केला असुन, अडाणी ग्रूप चे सीए ॲाडीटर्स हे फारसा अनुभव वा जेष्ठता नसलेले दोन २३ व २४ वर्षांचे तरूण आहेत..(?) या विषयीचा त्यांचा आक्षेप हा गंभीर असल्याने त्यावर अदाणी ग्रूप ने तातडीने खुलासा करण्याची व देशातील अग्रगण्य ऊद्योगपती म्हणून ‘आर्थिक पत’ वाचवण्याची गरज आहे..व ते देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहे.. अन्यथा अदाणी ग्रूप मधील बहुतांश गुंतवणुकदारांनी धास्तीने अडाणी प्रकल्पां मधील विक्री मोठ्या प्रमाणात सुरू केली नसती.. अदाणी ग्रूप या संधीचा लाभ घेऊन स्वतः शेअर्स पुन्हा खरेदी देखील करतील ही, मात्र सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मात्र या ऊदभवलेल्या मार्केट च्या बिकट परिस्थिती मुळे नुकसान सोसुन शेअर्स विकावे लागतात ही देखील खेदाची बाब आहे.. व यातून पुन्हा देशातील सर्वसामान्य जनतेकडे असलेल्या मालकीचे शेअर्स पुन्हा एकाच घराण्याच्या मालकीचे होणार व हे अनिष्टचक्र पुन्हा सुरू राहणार याचे आर्थिक पडसाद उमटत राहणार.. या आर्थिक अनिष्ट प्रकारांमुळे सामान्य-जणांच्या आर्थिक बरबादीच्या कारणांचा बोध व संदेश देखील देशातील जनतेने योग्य वेळीच घ्यावा असे आवाहन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात केले..!
वास्तविक सरकारने, “सरकारी बँका, आयुर्विमा महामंडळ इ मधून “अदाणी उद्योग समूहाला” जी लाखो कोटी रुपयांची कर्जे दिली ती कंपनीच्या ताळेबंदाची कशा प्रकारे गुणवत्ता बघून दिली..? या बाबत ही मोदी सरकारने त्वरित खुलासा करावा अशी मागणी देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली

मराठी चित्रपटांच्या अर्थसहाय्य मंजूरी, दर्जा निश्चितीसाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना

मुंबई, दि. २७ : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी, चित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

ही पुनर्रचित समिती आता अर्थसहाय्याची शिफारस करेल. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख हे १५ अशासकीय सदस्य असतील. तर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत असेल.

०००