Home Blog Page 1438

म.फुलेंची तुलना करत चित्रा वाघ यांचे वादग्रस्त विधान

पुणे-पुण्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अजब विधान केलं आहे, सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल बोलत चित्रा वाघ यांनी थेट ज्योतीबांशी दोघांची तुलना केली आहे .पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आली शिवाय ज्यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची कारकीर्द ,अपारदर्शक , संशयाची राहिली त्या हेमंत रासने यांचीही तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आली आहे. . यामुळे माळी समाजात आणि सावित्रीमाई आणि ज्योतीबांना मानणाऱ्या सर्वच नागरिकांत  असंतोष निर्माण होण्याची चिन्हे आहेत .

चित्रा वाघ म्हणाल्या की, तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र हेमंत रासने आणि चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे, असे विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे. हेमंत रासने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चित्रा वाघ बोलत होत्या. दरम्यान चित्रा वाघ यांच्या विधानामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

विश्वचषक पटकावणाऱ्या भारतीय महिला संघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक

मुंबई, दि. २९ : – विश्वचष्क पटकावून भारतीय महिला युवा क्रिकेट संघाने भारतीय महिलांच्या कर्तबगारीवर मोहोर उमटवणारी कामगिरी केली आहे. त्यामुळे हा भारतीय महिला युवा क्रिकेट संघ कौतुकास पात्र आहे. या विजयामुळे नव्या वर्षात भारतीयांनी एक चांगली भेट मिळाली आहे, या कौतुकोद्गारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला युवा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या १९ वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट युवा संघाचे अभिनंदन केले आहे.

भारतीय महिला संघाने केवळ ६७ धावांत इंग्लडच्या संघाचा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंचे कौतुक केले आहे. हा विजय भारतातील क्रीडा क्षेत्रासह, सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या  भगिनींचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. या विजयामुळे भारतीयांचा  क्रिकेटमधील कामगिरीचा लौकिकही उंचावला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संघातील सर्व क्रिकेटपटूंचे, त्यांचे प्रशिक्षक तसेच मार्गदर्शकांचेही अभिनंदन केले आहे.

पुण्यातील १६ जणांची एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.

– श्रुंतल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी

पुणे:
कोल्हापूर येथे प्रजासत्ताक दिन (रिपब्लिक डे ) 26 जानेवारी निमित्त लोंगेस्ट सेवन अवर्स मॅरेथॉन एक्स्ट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेण्यात आली. त्यामध्ये 135 मुलांनी सहभाग घेतला होता. यात पुण्याचे श्रुंतलआर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी मधून १६ जणांनी सहभाग घेतला. या रेकॉर्डची नोंद एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली. या रेकॉर्डचे निरीक्षक श्रीजीत चिंतन, गौरव पाटील यांनी केले.
सात तास मॅरेथॉन एक्स्ट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे तसेच विविध जिल्ह्यातील मुलांनी सहभाग घेतला या रेकॉर्डचे आयोजन सचिन टॉपर्स स्केटिंग अकॅडमी टीम कोल्हापूर आणि श्रुंतल आर्ट अकॅडमी यांनी केले होते. हे रेकॉर्ड घेण्यासाठी प्रशिक्षक सचिन इंगोले यांनी परीश्रम घेतले. परीक्षक श्रीराज बाळासाहेब पाटील यांची भोसरी टीम मधील मुले मुली आणि महिला यांचा यात समावेश होता. त्यांची नावे पुढीलप्रमाणे. 1)श्रीराज पाटील वय वर्ष:- 38
2) ललिता चौधरी वय वर्ष:-13
3) शांभवी शेलार वय वर्ष:-16
4) सुनिता केंगारे वय वर्ष:-10
5) सुनिल केंगारे वय वर्ष:-11
6) पृथ्वीराज फुगे वय वर्ष:-10
7) मैत्रेय मचाले वय वर्ष:- 6
8) पार्थ कामथे वय वर्ष:-12
9) अथर्व शेटे वय वर्ष:-10
10) वलय टिंगरे वय वर्ष:- 10
11) वेदांत आहिरे वय वर्ष:- 13
12) प्रज्ञक्ष देसाई वय वर्ष:- 15
13) मोनिया देसाई वय वर्ष:- 41
14) महादेव मुधोळ वय वर्ष:- 11
15) आदिती फलके वय वर्ष:- 14
16) अश्विन खांडेकर वय वर्ष:-16

एससीओ प्रदेशातील चित्रपट दिग्दर्शकांमध्ये समन्वय घडवण्याबाबत एससीओ चित्रपट महोत्सवात चर्चासत्र

मुंबई -शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी, “संस्कृती, व्यक्तिरेखा आणि देश यांचा संगम, या संकल्पनेवर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात, आर्मेनियाचे दिग्दर्शक गुरेश गझारियन आणि हायक ऑर्डियन तसेच कझाकस्तानचे बोलाट कालिम्बेटोव्ह यांनी सहभाग घेतला. या सत्राचे सूत्रसंचालन किर्गिस्तानमधील दिग्दर्शक आणि टीव्ही निवेदक गुलबारा तोलोमुशोवा यांनी केले.

बोलाट कालिम्बेटोव्ह यांनी या चर्चासत्रात, आज विस्मृतीत जात असलेल्या प्रेम आणि मैत्रीसारख्या भावना पुन्हा एकदा अभिव्यक्त करण्याची गरज असल्याबद्दल भर दिला. त्यांनी, स्वतःच ‘मुकागली’ सारखे रेट्रो चित्रपट बनवून असा प्रयत्न केल्याचेही सांगितले. चित्रपटात, प्रेम आणि मैत्री यांसारख्या मानवी भावनांचे चित्रण कसे रंगवतात याबद्दल माहिती देत, हायक ऑर्डियन यांनी चर्चेत भर घातली. कोविड नंतरच्या काळात, ‘मानवांमधील परस्पर संबंध’हा विषय ऐरणीवर आला आहे, असे ते पुढे म्हणाले.

चर्चासत्र पुढे नेत, गुरेश गझारियन यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशातील चित्रपट कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यातील सहकार्य वाढवण्याची गरज व्यक्त केली. एससीओ प्रदेशातील चित्रपट निर्मात्यांमध्ये, अधिक समन्वय हवा, असे ते म्हणाले. तसेच, यात लघुपटांची भूमिका महत्वाची असल्याचे, त्यांनी सांगितले.

राज कपूर यांच्या ‘आवारा’ आणि ‘मेरा नाम जोकर’ या पूर्वीच्या सोव्हिएत रशियात लोकप्रिय ठरलेल्या  चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देत सर्व सदस्यांनी चर्चासत्राचा समारोप केला. आगामी काळात देशांमध्ये असाच जोम आणि सहकार्य पुन्हा निर्माण करण्याच्या गरजेवर बोलाट कलेम्बेटोव्ह यांनी  भर दिला.

‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

आयुष्याच्या कन्फ्युजनची क्लॅरिटी देण्यास ‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा ट्रेलर झालाय सज्ज

‘ढिशक्यांव’ चित्रपटाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. अशातच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता ताणायला सज्ज झाला आहे. नुकताच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला. ‘शिवाय एंटरटेनमेंट’ आणि ‘राठोड एंटरटेनमेंट’ यांनी ’18 डिग्री’ येथे झालेल्या या सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी स्विकारली. निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील निर्मित तर ‘फिल्मस्त्र स्टुडिओ’ आणि ‘झटपट फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट येत्या १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

‘ढिशक्यांव’ चित्रपटाच्या नुकत्याच झालेल्या ट्रेलर अनावरण सोहळ्याला चित्रपटातील सर्वच कलाकारांनी चारचाँद लावले. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रथमेश परब आणि लातूरच्या अहेमद देशमुखने चित्रपटात चांगलाच कल्ला केलेला दिसतोय. दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित ‘ढिशक्यांव’ हा चित्रपट असून निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. ‘फिल्मस्त्र स्टुडिओ’ आणि ‘झटपट फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ढिशक्यांव’ चित्रपट असून चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवादाची धुरा लेखक संजय नवगिरे यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. प्रथमेश परब सोबत या चित्रपटात संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता संदीप पाठक आणि सुरेश विश्वकर्मा यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. सुरेशजींनी कमाल व्यक्तिरेखा साकारत चित्रपटाची शोभा वाढवलीय.

‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अल्पावधीतच साऱ्या मायबाप प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल यांत शंकाच नाही. तर येत्या १० फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

“सर्वसाधारण विजेतेपदासाठी आमचे खेळाडू उत्सुक” : कांबळे

भोपाळ – आमच्या खेळाडूंना सरावाच्या वेळी अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि सर्वोत्तम मार्गदर्शन मिळाले असल्यामुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया गेम्स मध्ये महाराष्ट्राचा संघ सर्वसाधारण विजेतेपद मिळविणारच असा आत्मविश्वास महाराष्ट्र संघाचे पथक प्रमुख श्री. चंद्रकांत कांबळे यांनी येथे व्यक्त केला.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या काही खेळाडूंचे येथे आगमन झाले असून हे खेळाडू येथील विविध क्रीडा संकुलांमध्ये सरावही करू लागले आहेत. स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना आणि संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी येथील संयोजकांनी अतिशय चांगली व्यवस्था केली आहे.
महाराष्ट्र संघाच्या तयारीविषयी श्री. कांबळे पुढे म्हणाले,” गतवर्षी पंचकुला येथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया गेम्स मध्ये आम्ही शेवटपर्यंत यजमान हरियाणाच्या खेळाडूंना चांगली लढत दिली होती. यंदा हरियाणा व यजमान मध्य प्रदेश यांच्यापेक्षा आमच्या पथकात कमी खेळाडू असले तरीही आमचे खेळाडू या दोन्ही राज्यांच्या खेळाडूंपेक्षा अधिक उज्वल कामगिरी करतील आणि सर्वाधिक सुवर्णपदकांसह सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरतील. आमचे खेळाडू भलेही संख्येने कमी असले तरी दर्जाबाबत ते कुठेही कमी नाहीत अशी मला खात्री आहे.”

ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत असलेल्या २७ क्रीडा प्रकारांपैकी २२ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राचे पावणे चारशे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्या मदतीसाठी सव्वाशेहून अधिक सपोर्ट स्टाफचा सहभाग असणार आहे. खो खो व कबड्डी इत्यादी सांघिक खेळांमध्ये आम्हाला विजेतेपदाची खात्री आहे. या संघांनी खूप चांगली तयारी केली आहे या खेळाडूंना नियमित मार्गदर्शकांबरोबरच अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंचेही विशेष मार्गदर्शन लाभले आहे. त्यांना मेंटल ट्रेनर, फिजिओ, व्हिडिओ ॲनेलिसिस, मेडिटेशन इत्यादी बाबतही अनुभवी तज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.”
महाराष्ट्र पथकाबरोबर नोडल अधिकारी म्हणून श्री. अनिल चोरमले तर व्यवस्थापक म्हणून श्री. अरुण पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनीही महाराष्ट्राच्या कामगिरीविषयी आत्मविश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंना सराव शिबिरात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी आम्ही घेतली असल्यामुळे आणि खेळाडूंनीही मनापासून एकाग्रतेने सराव केला आहे. हे लक्षात घेतले तर महाराष्ट्राचे खेळाडू या स्पर्धेत वर्चस्व गाजवतील अशी आम्हाला खात्री आहे.

आजपासून मिशन खेलो इंडिया युथ गेम्स

: महाराष्ट्र पदकाच्या त्री-शतकासाठी सज्ज; खो-खो संघांना विजयी सलामीची संधी

आजपासून पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स

जबलपूर
दोन वेळचा चॅम्पियन महाराष्ट्र संघ पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विक्रमी पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज सोमवारपासून पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स ला सुरुवात होत आहे. चार वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र महिला व पुरुष खो-खो संघांना पहिल्याच दिवशी विजय सलामीची मोठी संधी आहे. जानकी पुरस्कार विजेती जान्हवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघ जबलपूरच्या मैदानावर सलामी सामन्यात तामिळनाडू विरुद्ध मोठ्या विजयासाठी सज्ज झाला आहे. वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता नरेंद्र आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाला तेलंगणा विरुद्ध विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे.

महाराष्ट्र खोखो संघ उघडणार विजयाचे खाते
आतापर्यंत खेलो इंडिया स्पर्धेत सोनेरी यशाचा पल्ला गाठणारा महाराष्ट्र महिला व पुरुष खो-खो संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. मुख्य प्रशिक्षक मनीषा मानकर, प्रशांत पवार, संजय मुंडे आणि संतोष वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही संघांनी पुण्याच्या बालेवाडीत कसून सराव केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र संघाला सलामी सामन्यात मोठ्या विजयाची संधी आहे.

जान्हवी तिसऱ्यांदा स्पर्धेत, प्रिती, संपदामुळे महिला संघ मजबूत
जानकी पुरस्कार विजेती जान्हवी महाराष्ट्र महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. तिच्यासोबतच संघामध्ये जानकी पुरस्कार विजेते प्रीती अश्विनी आणि संपदा मोरे यांचा समावेश आहे. त्यामुळे महिला संघाला किताबाचा प्रभाव दावेदार मानले जात आहे.

नरेंद्रची हॅट्रिक; आदित्य, किरण, सचिन फार्मात
वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता नरेंद्र हा तिसऱ्यांदा या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळत आहे. त्यामुळे या हॅट्रिकच्या स्पर्धेत संघाला सोनेरी यश मिळवून देण्याचा त्याचा निर्धार आहे. सोबतच वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता किरण वसावे, आदित्य आणि सचिन पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे संघाला निर्विवादपणे आपले वर्चस्व कायम ठेवत सोनेरीय संपादन करण्याची मोठी संधी आहे.

महाराष्ट्राचे ३७७ खेळाडू सहभागी
आतापर्यंत दोन वेळा २०० पेक्षा अधिक पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्र संघाची नजर आता मध्य प्रदेशातील स्पर्धेत पदकांचे तिहेरी शतक साजरे करण्यावर लागली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा ३७७ सदस्य संघ सहभागी होणार आहे.

दोन वेळा महाराष्ट्र संघ चॅम्पियन
महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मधील कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे. तळागाळातील गुणवंत युवा खेळाडूंनी २०१९ आणि २०२० मध्ये महाराष्ट्राला चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवून दिला. २०२० मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र संघाने विक्रमी २५६ पदकांची कमाई केली होती. या दरम्यान महाराष्ट्र संघाने ७८ सुवर्णपदकांचा बहुमान पटकावला होता. तसेच २०१९ मध्ये पुणे येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघ २२८ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला होता.

योगासन, मल्लखांब, कुस्ती, कबड्डीमध्ये प्रबळ दावेदार
पारंपारिक वारसा लाभलेल्या योगासन मल्लखांब या खेळ प्रकारात महाराष्ट्राचे खेळाडूंनी गुजरातीतील नॅशनल गेम्स मध्ये सोनेरी यशाचा पल्ला गाठला. त्यामुळे आता याच कामगिरीला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्राचे खेळाडू सज्ज झाले आहेत. यातून महाराष्ट्र संघाला योगासन, मल्लखांब, कबड्डी, खो-खो आणि कुस्ती या खेळ प्रकारात सोनेरी ही यशाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मल्लखांब आणि योगासन या खेळामध्ये महाराष्ट्राचे युवा खेळाडू निश्चितपणे मोठ्या संख्येत पदकांची कमाई करताना दिसतील.
निश्चितपणे महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळेल: क्रीडा आयुक्त
गुजरात येथील नॅशनल गेम आणि महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक स्पर्धेदरम्यान युवा खेळाडूंनी प्रचंड मेहनत करत मोठे यश संपादन केले आहे. त्यामुळे याच कामगिरीला उजाळा देत महाराष्ट्राचे खेळाडू मध्य प्रदेश येथील खेलो इंडिया युथ गेम्स गाजवतील. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सराव शिबिरातून हे खेळाडू कसून मेहनत करत आहेत. तज्ञ प्रशिक्षक आणि अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून हे खेळाडू आपल्या गुणवत्तेचा दर्जा उंचावत आहेत.यातून महाराष्ट्र संघ निश्चितपणे या स्पर्धेदरम्यान सर्वसाधारण विजेते पदाचा मानकरी ठरेल, असा विश्वास क्रीडा आयुक्त डॉ.सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.

२२ खेळामध्ये महाराष्ट्राचे ३७७ खेळाडू
मध्यप्रदेश येथे आयोजित पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्राचे ३७७ खेळाडू सहभागी होणार आहेत. हे खेळाडू २२ खेळ प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. यामध्ये टेबल टेनिस, खो- खो, बॉक्सिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, तिरंदाजी, नेमबाजी, कयाकिंग व कनोइंग, योगासन, गटका, सायकलिंग ट्रॅक, ॲथलेटिक्स, कबड्डी, वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, तलवारबाजी, कुस्ती आणि जलतरण या खेळ प्रकारांचा समावेश आहे.

सिनेमाच्या माध्यमातून सीमांचे बंधन मोडून काढणे, संस्कृतीचा शोध आणि भारताच्या वाढत्या लोकप्रियतेचे रहस्य या विषयावरील चर्चा सत्राने गाजवला एससीओ चित्रपट महोत्सवाचा दिवस

मुंबई-शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) चित्रपट महोत्सवाच्या विविध सत्रांमध्ये चित्रपट उद्योगातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. महोत्सवात चित्रपट प्रदर्शनाव्यतिरिक्त, संगीतापासून अॅनिमेशन आणि बौद्धिक संपदा अधिकारांपर्यंतच्या विविध विषयांवर चर्चा सत्रे आयोजित करण्यात आली होती.

महोत्सवात आजच्या दिवसाची सुरुवात ‘द लास्ट फिल्म शो’ या गुजराती चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाली. स्पर्धा विभागात कझाकस्तानचा मॉम आय ऍम अलाइव्ह!, रशियाचा पोडेलनिकी (द रॉयट), चीनचा बी फॉर बिझी आणि गोदावरी या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन झाले. 

आजच्या दिवसातली पहिली पॅनल चर्चा ‘Creating Infinite Worlds using Animation (अॅनिमेशन वापरून अनंताचे जग निर्माण करणे)’ या विषयावर होती. पॅनेलमधील सदस्य,  ग्राफिटी मल्टीमीडियाचे संचालक मुंजाल श्रॉफ आणि टून्झ अॅनिमेशनचे सीईओ जयकुमार प्रभाकरन यांनी भारतीय अॅनिमेशन उद्योगातील त्यांचे अनुभव सांगितले. पॅनेलच्या सदस्यांनी सिनेमा आणि टेलिव्हिजन सांस्कृतिक आविष्कार आणि त्याचे सामाजिक परिणाम याच्याशी कसे जोडले गेले आहेत, यावर देखील चर्चा केली.

“एससीओ क्षेत्रामधील भारतीय सिनेमाची वाढती लोकप्रियता’ या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्यासह ख्यातनाम चित्रकर्मी राहुल रवैल आणि रमेश सिप्पी सहभागी झाले. पॅनेलच्या सदस्यांनी सिनेमावरील सांस्कृतिक प्रभावांसह भारतीय सिनेमाला इतका आकर्षक  बनवणाऱ्या घटकांवर चर्चा केली. सिनेमामधील पात्रांच्या साधेपणामुळे सीमारेषा पुसत झाल्याचं मत रमेश सिप्पी यांनी नोंदवलं. आशा पारेख म्हणाल्या की या संबंधांसाठी संगीत कारणीभूत आहे, तर राहुल रवैल यांनी भारतीय सिनेमासाठी असलेल्या आकर्षणाचे श्रेय त्याच्या कालातीत ताजेपणाला दिले.

कझाकिस्तानचे गायक आणि संगीतकार दिमाश कुडायबर्गेन यांच्याबरोबरच्या ‘ब्रेकिंग बॅरियर्स’ या ‘फायर साइड चॅट’ने आजच्या दिवसाची सांगता झाली. स्टारडमपर्यंतचा आपला प्रवास सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्यावर, दिमेश कुडैबर्गेन म्हणाले की संगीत ही एक भाषा आहे जी सर्व सीमा पार करते.   

दिमाश कुडायबर्गेन यांनी डिस्को डान्सर चित्रपटातील ‘जिम्मी जिमी’ हे हिट बॉलीवूड गीत गायलं आणि टाळ्यांच्या कडकडाटात, सहवास आणि परस्परांच्या सहकार्याच्या खऱ्या आविष्काराने आजच्या सत्राची आणि दिवसाची सांगता झाली.

सावित्रीमाई यांचा फोटो तुमच्या घरी आहे काय ? आ. अमोल मिटकरी यांचा प्रश्न

धर्म हिंदूंचा धोक्यात नाही , धर्म शेतकऱ्यांचा धोक्यात आहे …

पुणे – सतीची चाल बंद करण्यापासून तुमच्या शिक्षणासाठी दगडे खाणाऱ्या सावित्रीमाई फुले यांचा फोटो तुमच्या घरात आहे काय ? असा सवाल उपस्थित करत आजच्या पिढीच्या डोळ्यात आज येथे अंजन घालणारे वक्तव्ये आमदार अमोल मिटकरी यांनी केली . ते म्हणाले भारत हे नाव महाभारतात हि आहे , ,हिंदू धर्म धोक्यात आहे असे सांगून तांडव माजविले जाते पण हिंदू धर्म धोक्यात नाही तर शेतकऱ्याचा धर्म धोक्यात आहे हे लक्षात घेतले पाहिजे .

सध्या देशामध्ये अनेक माथेफिरूंकडून समाजाला धर्माचे गाजर दाखवून देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या फक्त स्वैराचार सुरू असून त्यामुळे केवळ भारताचे संविधानच नव्हे तर एकात्मतेलाही तडा जाण्याची शक्यता आहे, अशी भीती आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजित ६ व्या युवा संसदेमध्ये ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य अतिरेक? गळचेपी?’ या विषयावर अमोल मिटकरी बोलत होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, विद्यार्थी नेता हर्षवर्धन हरपुडे आदी यावेळी उपस्थित होते.अमोल मिटकरी म्हणाले, महात्मा गांधी यांच्या विचारांवर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानावर भारताच्या लोकशाहीची वाटचाल चालू आहे. परंतु सध्या मात्र हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण केला जात आहे. धर्म महत्त्वाचा की सर्वसामान्यांना जगवणारा शेतकरी महत्त्वाचा हे आपण ओळखले पाहिजे. हिंदू आणि मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्मापेक्षा शेतकऱ्यांचा धर्म सध्या धोक्यात असून तो धर्म वाचवला तरच आपला देश खऱ्या अर्थाने वाचू शकेल.आजच्या तरुणांनी सरकारला ठामपणे विचारले पाहिजे की आम्हाला कोणत्याही रंगाशी काहीही घेणे देणे नाही. आम्हाला आमचा रोजगार महत्त्वाचा असून तो रोजगार आम्हाला केव्हा मिळणार.? पाकिस्तान हा आमचा शत्रू होताच आणि राहणारच आहे. परंतु भारतामध्ये राहणारा प्रत्येक मुसलमान हा आमचा शत्रू आहे, हे चित्र सध्या रंगवले जात आहे . ही परिस्थिती देशाच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यापासून तरुणांनी सावध राहिले पाहिजे, असा सल्लाही अमोल मिटकरी यांनी यावेळी दिला.

नेमबाजीसाठी माझ्या भावाने मला प्रेरित केले; मला मदत करण्यासाठी तो सदैव तत्पर – शिवा नरवाल

मुंबई – भारताच्या अव्वल नेमबाजांपैकी एक आणि टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मनीष नरवालने 2021 मध्ये नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करत टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास घडवला.

त्याच्या या पराक्रमाने त्याला प्रतिष्ठित खेलरत्न पुरस्कार तर मिळवून दिलाच पण शेकडो मुलांना नेमबाजी करायला आणि खेळाची आवड जोपासण्यासाठी प्रेरित केले.

पण 2021 च्या त्याच्या कामगिरीपूर्वी, मनीषने घरातल्या जवळच्या व्यक्तीला केवळ नेमबाजीच नाही तर त्याच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी आणि मैदानात स्वतःची छाप पाडण्यासाठी प्रेरित केले ती व्यक्ती म्हणजे त्याचा धाकटा भाऊ शिवा नरवाल

शिवाने, वर्ष 2020 च्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर पुन्हा 2021 च्या युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले. 17 वर्षीय शिवाने, गेल्या वर्षी इजिप्त वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही वरिष्ठ गटात पदार्पण केले होते आणि 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर आणि 8 व्या स्थानावर येत, पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता.

त्यानंतर त्याने जागतिक अजिंक्यपद पदक गमावल्यानंतरच्या आलेल्या निराशेचा उपयोग आशियाई एअरगन चॅम्पियनशिपमध्ये केला आणि पुरुषांच्या एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

मनीषने आता देशातील सर्वोत्कृष्ट पॅरा-शूटर म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे, तर शिवाचे सध्याचे ध्येय केवळ खेलो इंडिया युथ गेम्समध्ये आणखी एक पदक जिंकणे नाही तर त्याची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करणे हे आहे.

“खेलो इंडिया युथ गेम्स 2022 साठी माझी पुन्हा निवड झाल्याबद्दल मला खरोखर आनंद झाला आहे. भूतकाळातल्या, केआयवायजी (KIYG) 2020 आणि केआयवायजी (KIYG) 2021 मधील माझी कामगिरी खरोखरच चांगली राहिली आहे आणि मला आशा आहे की मध्य प्रदेशातही माझी कामगिरी चांगली राहील आणि मी हरियाणासाठी पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकेन.”

मनीषचा भाऊ असल्याने काही अतिरिक्त दबाव आहे का असे शिवाला विचारले असता, ‘तो नेहमी माझ्या मदतीसाठी तत्पर असतो.’

“माझी मोठी बहीण आणि भाऊ दोघेही नेमबाज असून मनीषची एअर पिस्तुल इव्हेंटमध्येधली चांगली कामगिरी पाहून मी सुद्धा नेमबाजी सुरू केली,” असे शिव सांगतो.

त्यानंतर तो पुढे म्हणाला की, “मला शुटिंगमध्ये काही अडचण आली तर मनीष नेहमीच मला मदत करतो आणि मदतीसाठी तो नेहमीच तत्पर असतो.”

मागच्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शिवाने पात्रता फेरीत 588 गुण मिळवत वर्चस्व गाजवले होते, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या त्याचा सहकारी सम्राट राणापेक्षा तो पाच गुणांनी आघाडीवर होता. या स्पर्धेत त्याने नंतर सुवर्णपदक जिंकले होते, त्याचवेळी त्याची बहीण शिखा नरवाल हिने मुलींच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांना पुणेकरांतर्फे मानवंदना

सैनिक मित्र परिवार चा पुढाकार ; महाराणा प्रताप उद्यानातील स्मृतीस्तंभाला नमन
पुणे : जम्मू येथे अतिदहशग्रस्त भागात सुरुंग काढण्याचे काम करीत असताना वीरमरण आलेल्या सदाशिव पेठेतील कॅप्टन सुशांत गोडबोले यांना पुणेकरांनी मानवंदना दिली. वीरमातेचे करतो रक्षण, सैनिका त्रिवार तुझ वंदन… असे म्हणत भारत माता की जय… च्या जयघोषात गोडबोले यांच्या २० व्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस्तंभाला नमन करण्यात आले.

सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या महाराणा प्रताप उद्यानातील स्मृतीस्तंभ परिसरात मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोडबोले यांचे वडिल चंद्रकांत गोडबोले, अशोक मेहेंदळे, शाहीर हेमंत मावळे, आनंद सराफ, शुभांगी आफळे, रवींद्र रणधीर, अजित चंदेल यांसह नवचैतन्य हास्यक्लबचे सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीताचे समूहगान देखील करण्यात आले.

आनंद सराफ म्हणाले, सन २००१ ते २००३ या कालावधीत आॅपरेशन पराक्रम अंतर्गत जम्मू येथे कॅप्टन सुशांत गोडबोले यांनी अतिदहशतग्रस्त असलेल्या विभागात २३ किलोमीटर लांब व २५ मीटर रुंदीचा रणगाडा विरोधी सुरुंग पेरण्याचे काम २ महिन्यात पूर्ण केले. त्यानंतर पुढील २६ दिवसात काही भाग काढून झाला. मात्र, पुढील टप्प्यात रणगाडा विरोधी सुरुंग काढताना झालेल्या स्फोटात २९ जानेवारी २००३ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांना जम्मू येथे वीरगती प्राप्त झाली. सैनिकांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण सातत्याने होत रहावे याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेट

पुणे, दि.२९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. मंदिर उभारण्याशी निगडीत अडचणी दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले, माजी मंत्री बाळा भेगडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशिद पाटील आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करायला आणि वारकऱ्यांना भेटायला आल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. अशा पावन भूमीत येण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. भंडारा डोंगर आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरला आहे. या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे जगातील अतिशय भव्य मंदिर इथे उभे राहिल. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे श्री.शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या रुपाने समाजाला दिशा देणारी मोठी शक्ती महाराष्ट्रात आहे. आपले सण, उत्सव, परंपरा पुढे नेण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. ही परंपरा आपणही पुढे न्यायला हवी. वारकरी संप्रदायाने समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य सातत्याने केले आहे. आध्यात्मिक विचाराने जीवन सफल होतं. आध्यात्मिक सोहळ्यातून अनेकांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होत असते. उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार बारणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पालखी मार्गाचे काम आणि पंढरपूर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी वारकरी दत्तात्रेय कराळे यांनी पाच लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला

प्रास्ताविकात श्री. काशिद पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामाची माहिती दिली.

कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.29 : शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे  दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठे पाठबळ मिळत असून आपले  शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी  केले.

नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी व अध्यात्मिक विकास मार्ग व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘जागतिक कृषी महोत्सव, 2023’ निमित्त महोत्सवाच्या चौथ्या दिवशी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार सुहास कांदे, आमदार सीमा हिरे, आमदार संजय शिरसाट, श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आण्णासाहेब मोरे, जिल्हाधिकारी गंगाधरन. डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपले शासन सर्वसामान्य जनतेचे आहे. कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, समाजातील प्रत्येक घटकाचे हे शासन आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक निर्णय हा जनतेच्या कल्याणार्थ घेत आहोत. शेतीवर येणाऱ्या अतिवृष्टी, रोगराई आदी संकटांमध्ये देखील राज्य शासन आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. एनडीआरएफच्या नियमांना डावलून यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्यात आली आहे. शेतीचे जे नुकसान एनडीआरएफ च्या नियमात बसत नव्हते त्यावर योग्य निर्णय घेऊन शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्यातील 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय  शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत प्रयत्नशील आहोत. ४५० महिला बचत गटांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यातील जनता सुखी असली पाहिजे, हा राज्य व केंद्र सरकारचा अजेंडा आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे विकासाला मोठी चालना मिळाली आहे. सर्वत्र सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे.

बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा ‘गेम चेंजर’ असा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतमाला अवघ्या काही तासात राज्यासह परदेशात पाठविणे अतिशय वेगवान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला अधिकाधिक चालना मिळाली आहे. याशिवाय नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेऊन राज्यातील साखर उद्योगांच्या अडचणी सोडविण्याबाबत चर्चा केली आहे. लवकरच राज्यातील साखर उद्योगांच्या अडचणी देखील सोडविण्यात येणार आहेत. राज्याकडून केंद्राकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रस्तावाला केंद्र सरकार तत्काळ मंजुरी देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद केली असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कृषी महोत्सवाचे हे 12 वे वर्ष आहे. याठिकाणी अनेक राज्यातील नागरिक, शेतकरी येवून भेटी देत शेती संदर्भातील योग्य माहिती जाणून घेतात. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, कृषी विभागातील तज्ज्ञ मंडळी, शेतकरी यासोबत जोडले गेले आहेत. या कृषी महोत्सवात असलेल्या सातत्यामुळे शेतकऱ्यांना मोठे पाठबळ मिळत आहे. आयोजकांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी, आपुलकी व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून चालविलेला हा कृषी महोत्सव जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना उर्जा देतो. याठिकाणी लावण्यात आलेल्या 250 हून अधिक स्टॉलच्या माध्यमातून प्रगती शेतीसह गटशेती, योग्य बियाणे कसे निवडावे याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळाली आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे सुरु असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात अनेक समाजपयोगी कार्यक्रम पार पडले आहे. या कृषी महोत्सवात गुरुमाऊलींनी 11 सामूहिक विवाह लावून दिले आहेत. तसेच सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील 51 गावे श्री स्वामी समर्थ ट्रस्टने वर्षभरासाठी दत्तक घेतल्यामुळे या सर्वांचे पुण्य गुरुमाऊली मोरे यांच्या पदरी पडत असून ते देखील हे पुण्य कृषी महोत्सवातून जनतेपर्यंन्त पोहचवित आहेत. या जागतिक कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाला अधिकाधिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले’आदर्श नगरसेवक’ पुरस्काराने सन्मानित

पुणे-माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना जाधवर इंस्टिट्यूट तर्फे ‘आदर्श नगरसेवक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .जाधवर इंस्टीट्यूट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या “6वा युवा संसद’ कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता . या कार्यक्रमात खासदार रणजीतसिंह नाईक निबाळकर, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने श्रीनाथ भीमाले यांनी युवकांशी संवाद साधला. ते म्हणाले की भारताचे उज्ज्वल भविष्य हे अण्वस्त्र नसून युवा पिढी आहे. पंतप्रधान मोदी यांनी या गोष्टीचे महत्व ओळखून युवकांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत. प्रत्येक स्तरावर युवकांना यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. युवकांनी आज भारताच्या राजकारणामध्ये आले पाहिजे. आपले प्रयत्न प्रभावशाली असतील तर यश हे आपलेच आहे. युवकांच्या सक्रिय सहभागामुळे भारत नक्कीच लवकरच महासत्ता बनेल.

बागेश्वर महाराज यांच्यावर तत्काळ कारवाई करा-लक्ष्मीकांत खाबिया

पुणे संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर महाराज यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बागेश्‍वर महाराज यांचा संत तुकाराम महाराजांबाबत अवमानकारक टिप्पणी करणारी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून वारकरी संप्रदायात संताप व्यक्त केला जात आहे. बागेश्वर महाराजांच्या वक्तव्यामुळे समस्त वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राची वाटचाल ही वारकरी संप्रदायाच्या विचारांवर सुरू आहे. संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू आहेत. त्यामुळे तुकाराम महाराज यांच्याविषयीचे अवमानकारक भाष्य सहन केले जाणार नाही, असा इशारा खाबिया यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.