मुंबई -शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी, “संस्कृती, व्यक्तिरेखा आणि देश यांचा संगम, या संकल्पनेवर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात, आर्मेनियाचे दिग्दर्शक गुरेश गझारियन आणि हायक ऑर्डियन तसेच कझाकस्तानचे बोलाट कालिम्बेटोव्ह यांनी सहभाग घेतला. या सत्राचे सूत्रसंचालन किर्गिस्तानमधील दिग्दर्शक आणि टीव्ही निवेदक गुलबारा तोलोमुशोवा यांनी केले.
बोलाट कालिम्बेटोव्ह यांनी या चर्चासत्रात, आज विस्मृतीत जात असलेल्या प्रेम आणि मैत्रीसारख्या भावना पुन्हा एकदा अभिव्यक्त करण्याची गरज असल्याबद्दल भर दिला. त्यांनी, स्वतःच ‘मुकागली’ सारखे रेट्रो चित्रपट बनवून असा प्रयत्न केल्याचेही सांगितले. चित्रपटात, प्रेम आणि मैत्री यांसारख्या मानवी भावनांचे चित्रण कसे रंगवतात याबद्दल माहिती देत, हायक ऑर्डियन यांनी चर्चेत भर घातली. कोविड नंतरच्या काळात, ‘मानवांमधील परस्पर संबंध’हा विषय ऐरणीवर आला आहे, असे ते पुढे म्हणाले.
चर्चासत्र पुढे नेत, गुरेश गझारियन यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशातील चित्रपट कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यातील सहकार्य वाढवण्याची गरज व्यक्त केली. एससीओ प्रदेशातील चित्रपट निर्मात्यांमध्ये, अधिक समन्वय हवा, असे ते म्हणाले. तसेच, यात लघुपटांची भूमिका महत्वाची असल्याचे, त्यांनी सांगितले.
राज कपूर यांच्या ‘आवारा’ आणि ‘मेरा नाम जोकर’ या पूर्वीच्या सोव्हिएत रशियात लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देत सर्व सदस्यांनी चर्चासत्राचा समारोप केला. आगामी काळात देशांमध्ये असाच जोम आणि सहकार्य पुन्हा निर्माण करण्याच्या गरजेवर बोलाट कलेम्बेटोव्ह यांनी भर दिला.