Home Blog Page 1437

आरोग्यासाठी ७०० हून अधिक युवकांबरोबर वृध्द ही धावले

एचव्हीआर फिटनेस ट्राइबच्या मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद

पुणे, दि.  ३० जानेवारी: आजच्या व्यस्त जीवनात निरोगी शरीर आणि मन हे नागरिकांसाठी आव्हान आहे. आपण नियमित व्यायाम केला पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हा मुख्य उद्देश्य ठेऊन कोथरूड येथील हिल व्ह्यू रेसिडेन्सीच्या एचव्हीआर फिटनेस ट्राइब तर्फे मॅरेथॉन २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये  युवकांबरोबरच  आबाल वृद्धांपर्यत  सर्वांनी  मोठ्या उत्साहाने  सहभाग नोंदविला होता. ३ व ५ किमीच्या मॅरेथॉनमध्ये महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एचव्हीआर फिटनेस ट्राइब तर्फे आयोजित ही स्पर्धा कोथरूड येथील हिल व्ह्यू रेसिडेन्सीच्या मुख्य गेट पासून सुरू झाली. या मध्ये एकूण ७०० पेक्षा अधिक रहिवासी सहभागी झाले होते. यात सहभागी सर्वात लहान २ वर्ष आणि सर्वात वृध्द ८० वर्षाच्या धावपटूच्या चेहर्‍यावर ही आनंद दिसत होता. या वेळी झुम्बा, वॉर्मअप व स्ट्रेचिंगच्या विशेष सत्रांचे आयोजन ही करण्यात आले होते. येथे आहार तज्ञांनी नागरिकांना सकस आहाराच्या सवयींचा सल्ला दिला. आपला आहार सर्वंकष कसा असावा व त्यात कार्बोहायडे्रट आणि प्रथिने यांचा समावेश याचे मार्गदर्शन दिले गेले.
एचव्हीआर फिटनेस ट्राइब यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना टिशर्ट, मेडल व ब्रेकफास्ट दिला. या मॅरेथॉनमुळे आरोग्य जागृतीतून अप्रतिम अनुभव आला. असे सांगून नागरिकांनी एचव्हीआर फिटनेस ट्राइब चे आभार मानले. तसेच दर वर्षी अशी मॅरेथॉन घेण्याची विनंती केली. आज पुण्यात अनेक सोसायटी आहेत परंतू अशा प्रकारची मॅरेथॉन घेतली जात नाही. इतरांनी या सोसायटीचा आदर्श घेऊन अशा मॅरेथॉनचे आयोजन करावे.

नाना पेठेत तरुणाचा खून करणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’

पुणे-पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आतापर्यंत शहरातील आठ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.पुण्यातील नाना पेठ परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून तरूणाचा कोयत्याने विटांनी मारहाण करून निर्घृण खून करून परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (टोळी प्रमुख) याच्यासह इतर सातजणांविरूद्ध मोक्कानुसार पोलिसांकडून सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. कुचेकर याने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर 2022 मध्ये एका 28 वर्षीय तरूणाचा खून केला होता.

याप्रकरणी सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (वय 28 रा. नानापेठ,राजेवाडी,पुणे (टोळी प्रमुख) आदित्य राजु केंजळे (वय 18 रा. खडक चौक, धायरी) स्वरुप संतोष गायकवाड ( वय 18 रा. गुरुवार पेठ), राजन अरुण काऊंटर (वय 23 रा. नाना पेठ,राजेवाडी) तेजस अशोक जावळे (वय 32 रा नानापेठ), अतिष अनिल फाळके(वय 27 रा.नानापेठ, सर्व रा.पुणे) अशी कारवाई केलेल्या आरोपीची नावे आहेत. संबंधित गुन्हयामध्ये महिला आरोपीविरूद्ध ही पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी सुशांत ऊर्फ मट्या याने इतर साथीदारांच्या मदतीने प्रत्येक गुन्हयात संघटीत टोळी तयार करून गुन्हे केले आहे. अवैद्य मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने जबरी चोरी,जीवे ठार मारणे , गुण करण्यासाठी गट रचने पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे ,सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे ,बेकायदेशीर जमाव जमवणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. 23 नोव्हेंबर 2022 मध्ये सुशांत ऊर्फ मट्या यासह साथीदारांनी वर्चस्वाच्या जुन्या वादातून तरूणाचा खून केला होता.

सदर टोळी विरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याबाबत प्रस्ताव समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला होता. याबाबत सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त संदीप सिंह गिल, एसीपी सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, एपीआय प्रसाद लोणारे, दत्तात्रय भोसले, प्रमोद वायकर, प्रमोद जगताप, संतोष थोरात, किरण शितोळे, हेमंत पेरणे, रहिम शेख निलम कर्पे यांनी केली.

म.गांधी पुण्यतिथीदिनी सामुदायिक प्रार्थना,व्याख्यान,पुस्तक प्रकाशन

गांधीभवन येथे ३० जानेवारी रोजी आयोजन

पुणे :

राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे सोमवारी,३० जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता सामुदायिक प्रार्थना,ज्येष्ठ पत्रकार आणि गांधीविचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांच्या व्याख्यानाचे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीकडून आयोजन करण्यात आले आहे.यावेळी महात्मा गांधी लिखित ‘धर्मविचार भाग-१ आणि धर्मविचार भाग-२’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. हे कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड येथे होतील . महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रा. डॉ. मणीन्द्र नाथ ठाकुर यांचे व्याख्यान व संवाद सत्राचा २९ आणि ३० जानेवारीचा नियोजित कार्यक्रम रद्द झाला आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड , आदित्य आरेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘वाळवी’ची हिंदी चित्रपटावर मात

तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी

१३ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर तिसरा यशस्वी आठवडा असून प्रेक्षकांचा या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. ‘पठाण’ सारखा बिग बजेट चित्रपट शर्यतीत असतानाही ‘वाळवी’ चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही आपले स्थान कायम ठेवले आहे. यावरूनच मराठी प्रेक्षक ‘वाळवी’ला पसंती देत आहेत. या आठवड्यातही काही थिएटरमध्ये ‘वाळवी’चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षक अशा सर्वांनीच ‘वाळवी’चे भरभरून कौतुक केले.

प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘’तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद समाधान देणारा आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून ‘वाळवी’चे शोज वाढवण्यात आले आहेत. सध्या ‘पठाण’ सारख्या बॉलिवूड चित्रपटाची चलती असतानाही ‘वाळवी’वरही प्रेक्षक तेवढेच प्रेम करत आहेत. हिंदी चित्रपटासमोर मराठी चित्रपट ताकदीने उभा आहे, हेच खूप आनंददायी आहे. मुळात मराठी प्रेक्षकवर्ग हा चोखंदळ आहे. चांगल्या कॅान्टेटला ते नेहमीच पसंती देतात आणि म्हणूनच ते असे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतात. झी स्टुडिओज नेहमीच नाविन्यपूर्ण विषय प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे. ‘वाळवी’ हा सुद्धा असाच वेगळा विषय असून हा मराठीतील पहिला थ्रिलकॉम चित्रपट आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरील ‘वाळवी’ला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘वाळवी’ प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाला आहे.”

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

रिक्षा चालकांसाठी मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली

नवी दिल्ली – रॅपिडोच्या विरोधात हायकोर्टमध्ये सुरू असलेली लढाई जिंकल्यानंतर रॅपिडो कंपनीने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते आणि आता रिक्षा चालकांना सर्वोच्च न्यायालयामध्ये या विरोधातला संघर्ष करावा लागणार आहे.आज सर्वोच्च न्यायालयात याबाबत पहिली तारीख होती आणि आज न्यायालयात नेमकं काय घडतंय याची उत्सुकता संपूर्ण शहरातील रिक्षा चालकांना लागलेली होती. परंतु आज न्यायालयात न्यायमूर्तींनी दोन्ही बाजू जाणून घेतल्या आहेत व पुढील 2 दिवसांनंतरची तारीख देण्यात आली असल्याची माहिती,ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली,

महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीने बाबा कांबळे तर पुणेरीक्षा फेडरेशनच्या वतीने आनंद तांबे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरवेशन याचिका दाखल केले असून रिक्षा चालकांची टॅक्सी चालकांची बाजू ऐकल्याशिवाय कोणत्या निर्णय घेऊ नये अशी विनंती याचिका दाखल केली आहे महाराष्ट्र मध्ये 22 लाख ऑटो टॅक्सी चालक-मालक आहेत तर देशभरामध्ये 23 कोटी ऑटो टॅक्सी व परमिट धारक चालक-मालक आहेत त्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणारा हा निर्णय आहे यामुळे आमचे हक्क अधिकार अबाधित राहावेत यासाठी आमचे म्हणणे ऐकले जावे असे विनंती इंटरवेशन याचिकेमध्ये केली असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिले,

मुंबई उच्च न्यायालय मध्ये आम्हाला न्याय मिळाला न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला याच प्रकारे आज आम्ही दिल्लीपर्यंत या प्रश्नावर ती लढत असून सुप्रीम कोर्टातील मा.न्यायाधीश देखील आम्हाला न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे असे आनंद तांबे म्हणाले,त्यामुळे आता रॅपिडो वरील बंदी सर्वोच्च न्यायालयामध्ये कायम राहणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडलेला आहे. त्यामुळे संपूर्ण रिक्षाचालकांना आता पुढील दोन दिवसानंतर नेमकं न्यायालयामध्ये काय होते याची उत्सुकता लागलेली आहे.

राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज व गाडगेबाबा  भारतीय संस्कृतीचे खरे रक्षक


खासदार श्रीनिवास पाटील यांचे विचार ः विश्वशांती घुमटामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तत्त्वज्ञ संत गाडगे महाराज यांचा पुतळ्याचे अनावरण

पुणे, दि. ३० जानेवारी:“ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा हे खरे भारतीय संस्कृतीचे रक्षक आहेत. या देशाला स्वच्छतेच्या मंत्राबरोबरच माणसात देव शोधावा असा संदेश त्यांनी दिला आहे.”असे विचार सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मानवतेचे महान पुजारी तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना व अनावरण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, अमरावती येथील अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ गुरूकुंज आश्रमचे सरचिटणीस जनार्दन बोथे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, ग्रामगीताचार्य, गुरूकुंज आश्रमचे अरविंद राठोड, नागपूर येथील कृषितज्ञ प्रा. डॉ. रमेश ठाकरे, थोर विचारवंत प्रा. रतनलाल सोनाग्रा व योगेंद्र मिश्रा हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
तसेच एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ व डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५व्या पुण्यतिथी निमित्ताने पुतळयाला पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. तसेच, उल्हास पवार लिखित ‘ महात्मा गांधी आणि जग’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीनिवास पाटील म्हणाले,“ या दोन्हीं संतांचा जन्म व मृत्यू अमरावतीत झाला. यांनी मानवतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश देऊन स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून जी २० साठी विदेशातून येणार्‍या पाहुण्यांना या विश्वशांती घुमटाला भेट देण्याची विनंती करणार आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ साधू संतांच्या या भूमीत दोन्हीं संतांनी संपूर्ण मानवजातीला सुखी होण्याचा संदेश दिला. स्वामी विवेकानंद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारत माता ही विश्वगुरू म्हणून उदयास येईल. तसेच संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. ”
उल्हास पवार म्हणाले,“ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा उल्लेख मृत्यूंजय म्हणून करावा. कारण त्यांचे विचार हे मानव जातीला तारणारे आहेत. करूणा, दया, क्षमा आणि शांती याचा खरा अर्थ जाणून त्याचा अभ्यास करावा. आज राष्ट्रपिता महात्मा  गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या सारखे क्षमाशिला बनण्याचा संकल्प करावा.”डॉ. मंगेश कराड म्हणाले, संतांनी देशाला विचार दिला. त्यांच्यामुळे आम्ही विकास करू शकलो.  संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि ग्राम स्वच्छतेचा विचार दिला. राष्ट्रसंतांच्या विचाराने आपल्या गावात कार्य सुरू करावे. त्यांच्या विचाराने गावाचा विकास आणि नावलोकिकात वाढ होईल.
रमेश ठाकरे म्हणालेः“ संतांचे विचार नम्र व आचरणात आणण्यासाठी आहेे. शून्य आणि पुण्यांतून प्रगती होते. आज शुन्यातूनच विश्व निर्माण करावयाचे आहे. घुमटाच्या माध्यमातून  डॉ. कराड यांनी क्रांती केली आहे.”
प्रा.रतनलाल सोनाग्रा म्हणाले,“राष्ट्रपिता महात्मा गांधी भारत देशाची भाषा आहे.  त्यांनी संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्ग दाखविला आहे. वर्तमाना काळात माणसाच्या हदयात माणूस शोधा हा संदेश तुकडोमहाराज व संत गाडगेबाबा यांनी दिला आहे. त्यांचे पुतळे उभारूण संपूर्ण समाजाला मानवतेचा संदेश दिला आहे.”
यानंतर ज्ञानेश्वर रक्षक, अरविंद राठोड  योगेन्द्र मिश्रा, डॉ. संजय उपाध्ये आणि पं. वसन्तराव गाडगीळ यांनी आपले विचार मांडले
डॉ. एस.एन.पठाण यांनी प्रास्ताविक केले. तसेच श्री गुरूदेव सेवामंडळाचे प्रा. सुरेंद्र नावडे यांच्या मार्गदर्शनात खंजिरी भजनाचा कार्यक्रम झाला.
प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमधून पुणेकरांची तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची वार्षिक बचत

पुणे परिमंडलाचे वीजग्राहक ‘गो-ग्रीन’मध्ये राज्यात सर्वाधिक

पुणे, दि. ३० जानेवारी २०२३: महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजने अंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पुणे परिमंडलातील पर्यावरणस्नेही ९२ हजार ८१३ ग्राहकांकडून तब्बल एक कोटी ११ लाख ३७ हजार ५६० रुपयांची वार्षिक बचत सुरु आहे. पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी राज्यात या योजनेमध्ये आघाडी घेतली आहे. गेल्या २० दिवसांमध्ये पुणे परिमंडलामधील २६८१ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.  

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. ‘गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे’ असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरात ४९ हजार ४९२ ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये हडपसर-१ उपविभागामधील ५५४४, वडगाव धायरी- ४८७५, धनकवडी– ४५७१ व विश्रांतवाडी उपविभागामध्ये ३६५८ ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड शहरात ‘गो-ग्रीन’मध्ये २७ हजार १९९ ग्राहक सहभागी आहेत. यामध्ये सांगवी उपविभागातील सर्वाधिक ८३१९ तर आकुर्डी- ५१६४, चिंचवड उपविभागामध्ये ५३४२ ग्राहक मोठी संख्येने योजनेत सहभागी आहेत. तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये १६ हजार १२२ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील ४३५३ ग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

ज्यांनी तुमच्या उद्धारासाठी दगडांचा मार खाल्ला,शेणाचे गोळे अंगावर घेतले .. त्या सावित्रीमाईंचा फोटो तुमच्या घरात आहे काय ?अमोल मिटकरींच्या सवालाने तरुणाईची बोलती बंद

पुणे- ज्या सावित्रीमाई फुलेंनी सतीची चाल पासून तुमच्या शिक्षणापर्यंत तुमच्या उद्धारासाठी याच पुण्यात दगडांचा मार खाल्ला , अंगावर शेणाचे गोळे झेलले त्या सावित्रीमाई यांचा फोटो तुमच्या घरात आहे काय ? आ. अमोल मिटकरी यांनी विद्यार्थ्यांना सवाल केला आणि सार्यांचेच चेहरे पाहण्यासारखे झाले .सतीची चाल कशी होती ते मिटकरी यांनी 3/४ वाक्यात वर्णन करून सांगितले, शिक्षणा अभावी महिला मुलींची कशी हालत होती तेही सांगितले आणि त्यानंतर त्यांनी हा सवाल केला. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजित 6 व्या युवा संसदेमध्ये ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य अतिरेक? गळचेपी?’ या विषयावर अमोल मिटकरी बोलत होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, विद्यार्थी नेता हर्षवर्धन हरपुडे आदी यावेळी उपस्थित होते.

सध्या देशामध्ये अनेक माथेफिरूंकडून समाजाला धर्माचे गाजर दाखवून देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या फक्त स्वैराचार सुरू असून त्यामुळे केवळ भारताचे संविधानच नव्हे तर एकात्मतेलाही तडा जाण्याची शक्यता आहे, अशी भीती आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी व्यक्त केली.

हिंदुस्थान कि भारत ?

हिंदुस्थान आणि भारत या दोन शब्दांवर देखील मतकरी यांनी सुरेख विवेचन केले. महाभारतात देखील भारत शब्द आहे इतिहास, पौराणिक कथांमध्ये देखील भारत आहे, असे सांगून अमोल मिटकरी म्हणाले, महात्मा गांधी यांच्या विचारांवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानावर भारताच्या लोकशाहीची वाटचाल चालू आहे. परंतु सध्या मात्र हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण केला जात आहे. धर्म महत्त्वाचा की सर्वसामान्यांना जगवणारा शेतकरी महत्त्वाचा हे आपण ओळखले पाहिजे. हिंदू आणि मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्मापेक्षा शेतकऱ्यांचा धर्म सध्या धोक्यात असून तो धर्म वाचवला तरच आपला देश खऱ्या अर्थाने वाचू शकेल.अमोल मिटकरी म्हणाले, आजच्या तरुणांनी सरकारला ठामपणे विचारले पाहिजे की, आम्हाला कोणत्याही रंगाशी काहीही घेणे देणे नाही. आम्हाला आमचा रोजगार महत्त्वाचा असून तो रोजगार आम्हाला केव्हा मिळणार? पाकिस्तान हा आमचा शत्रू होताच आणि राहणारच आहे. परंतु भारतामध्ये राहणारा प्रत्येक मुसलमान हा आमचा शत्रू आहे, हे चित्र सध्या रंगवले जात आहे. ही परिस्थिती देशाच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यापासून तरुणांनी सावध राहिले पाहिजे.

गृहखाते सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या:सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले; कायदे फक्त विरोधकांनाच आहे का? असा सवाल

पुणे-

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच धारेवर धरले आहे. गृहमंत्रीपद सांभाळता येत नसेल, तर फडणवीसांनी आपल्या खात्याचा राजीनामा द्यावा, असे त्या स्पष्ट शब्दांत म्हणाल्यात.

राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दौंडमध्ये एकाच कुंटुबातील 7 जणांची हत्या, पुण्यातील कोयता गँगचा हैदोस, महिलांवर सातत्याने होत असलेले अत्याचार आदी घटनांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळें म्हणाल्या की, शिंदे – फडणवीस सरकारला ईडी सरकार म्हटलेले आवडते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यापुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. गृह मंत्र्यालयाचे हे अपयश आहे. राज्यातील कायदा-सुवस्था राखता येत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, हे माझे वैयक्तिक मत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना सुनावले आहे.

 कसब्यामध्ये भाजपचे झेंडे-आचारसंहितेचा भंग:कारवाई काहीच नाही

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कसब्यामध्ये भाजपचे झेंडे लागलेले दिसून येतात, त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसून येत असले तरी भाजपवर काहीच कारवाई होत नाही, यात काहीच मला आश्चर्य वाटत नाही, कारण हे सरकार नियमाने चालत नाही कायदे फक्त विरोधकांसाठी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येईल असेही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या राज्यात राबविल्या जात नाही, मात्र माझ्या मतदारसंघात राबविल्या जातात असे सांगताना अजित पवार पालकमंत्री असताना नेहमी जनतेसाठी उपलब्ध असायचे, शनिवारी लोकांना वेळ देत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारने महागाई आणि बेरोजगारीवर ठोस पावले उचलली पाहिजेत, केंद्र सरकारचे हे शेवटचे वर्ष आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुण्यातील मध्यवस्तीतील जुगार अड्डयावर छापा:12 जणांवर कारवाई अन सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

वर्षानुवर्षे हप्तेखोरीत चालतोय जुगार अड्डा : असे छापे झाले किती ?

पुणे- पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने विश्रामबाग परिसरात एका बंद खोलीत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकुन 12 जणांविरूद्ध कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 25 हजारांची रोकड आणि 8 मोबाइल असा 1 लाख 25 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित 12 इसमा विरूध्द विश्रामबाग पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाकडील अधिकारी आणि पोलिस अमलदार यांनी विश्रामबाग परिसरात गोपनियरित्या पाळत ठेवली. त्यावेळी एका बंद खोलीत असलेल्या ठिकाणी पत्त्याचा जुगार पैशांवर खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले असून दोघेजण पसार झाले आहे. त्यांच्याकडील 25 हजारांची रोकड आणि 08 मोबाईल असा 1 लाख 25 हजारांचा ऐवज घटनास्थळावरून जप्त केला.

याप्रकरणी पत्त्याचा जुगार खेळताना मिळून आलेले इसम व दोन पाहिजे असे एकूण बारा आरोपीं विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम चार, पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कारवाई करण्याकरीता विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या ताब्यात संबंधित आरोपी देण्यात आले आहे.

याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक,भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, अजय राणे, अण्णा माने, तुषार भिवरकर, संदिप कोळगे यांनी केली आहे.

डोळे उघडा अन्यथा मनुवादाच्या जोखडात अडकाल..काँग्रेस नेते सचिन सावंत यांचे आवाहन

मुंबई-बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनंतर आता काँग्रेसनेही त्यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी बागेश्वर बाबा यांच्या विधानामागे भाजप असल्याचा थेट आरोप केला आहे. ‘संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करण्याचे भाजप व भाजपप्रणित भोंदूंचे षडयंत्र आहे,’ असे ते म्हणालेत.

‘जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करण्याचे भाजप व भाजपप्रणित भोंदूंचे षडयंत्र आहे. सुधारणावादी विचारांना संपवून मनुवाद पुनर्स्थापित करण्यासाठी सुधारणावादी महापुरुषांचे प्रतिमाभंजन करण्याचा हा डाव आहे. जनतेने डोळे उघडले नाही, तर मनुवादाच्या जोखडात कायम जखडून घ्यावे लागेल,’ असे सचिन सावंत सोमवारी एका ट्विटद्वारे म्हणाले.

भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन ब्रँडिंग करणे गरजेचे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 30 : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्वाची ठरणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आज मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन दिवसांची आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या प्रस्तावाला जगभरातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे भरडधान्याच्या योगदानाचे महत्व, आणि पोषक आरोग्यदायी आहार म्हणून त्याची उपयुक्तता याबद्दल जनजागृती करण्यात येत असून याचाच भाग म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेमुळे आरोग्यदायी आहारामध्ये भरडधान्याचे महत्व आणि उपयुक्तता याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती आणि या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

या उद्घाटनप्रसंगी रामनारायण रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनुश्री लोकूर, पद्मश्री खादर वल्ली, व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष एस.पी. मंडळी, अॅड. एस. के. जैन, श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष अॅड.मिहीर प्रभुदेसाई, प्रा. कामिनी दोंदे, उपप्राचार्य डॉ.वर्षा शुक्ला तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू – खा. सुळे

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका
पुणे, दि. ३०
– दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागू, असा इशारा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्र सरकारला दिला. त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रवक्ते प्रदीप देशमुख, पंकज साठे, हरिदास शिंदे, मुणालिनी वाणी, भारती शेवाळे, आनंद सवाने, रणजित शिवतरे, आलीम शेख, त्रिंबक मोकाशी, कैलास मकवान, संभाजी होळकर, संतोष रेणुसे, संतोष घोरपडे, महादेव कोंढरे, काकासाहेब चव्हाण, माणिकराव झेंडे, अप्पासाहेब पवार, भरत झांबरे, मनाली भिलारे, सुषमा सातपुते यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, पुणे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवही या आंदोलनात सहभागी झाले होते. दिव्यांग बांधवाना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेले अनेक महीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही. याबाबत केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचवण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे. आजचे आंदोलन कोणाच्याही विरूद्ध नसून जेष्ठ आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाने वयोश्री योजनेअंतर्गत तपासणीचा संपूर्ण देशात विक्रम केला आहे. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी ही योजना संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिकांच्या खर्चातुन ही योजना संपुर्ण जिल्ह्यात राबवण्यात आली. वयोश्री योजनेचे तब्बल एक लाख दहा हजार, तर ADIP योजनेचे दहा हजार इतके लाभार्थी पाहून केंद्र शासनाला शंका आली. त्यामुळे तपासणीसाठी एक स्पेशल टिम पाठवण्यात आली होती. त्या टीमने सुद्धा लाभार्थी संख्या योग्य असल्याचे मान्य केले आहे.

साहित्य वितरण होत नसल्यामुळे आपण स्वतः केंद्रिय मंत्र्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. त्यात पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. कारण आपल्यासाठी दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांची सेवा महत्वाची आहे. असे असूनही इतर राज्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे वाटप होत असून महाराष्ट्राला मात्र डावलण्यात येत आहे. अगदी महाराष्ट्रातही काही ठराविक जिल्ह्यात याचे वाटप झाले आहे. असे असेल, तर केंद्र सरकारची ही योजना देशातील दिव्यांगासाठी आहे की कुठल्या राजकीय पक्षासाठी आहे. याचा खुलासा व्हायला, अशी मागणी यावेळी खासदार सुळे यांनी केली.

शिरूर आणि बारामतीला राष्ट्रवादीचे खासदार असल्यामुळे डावलण्यात येत आहे त्याचवेळी मावळ आणि पुणे शहरात त्यांच्याच पक्षाचे खासदार असूनही केवळ राजकारणासाठी त्या दोन खासदारांचा बळी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार स्मरणपत्रे पाठवली, मंत्र्यांच्या भेटी घेऊन मागणी केली, इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून हा विषय आपण केंद्र सरकारच्या लक्षात आणून आहे. सातत्याने आपला पाठपुरावा चालू आहे, तरीही आजपर्यंत याबाबर निर्णय न झाल्याने आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे, असे खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही दिव्यांगाना घरबसल्या प्रमाणपत्र पाठवतो. अशी सुविधा संपूर्ण देशात देशात फक्त आपल्याकडे आहे. ज्याच्यासाठी शासनाच्या योजना आहेत त्यालाच जर त्या मिळत नसतील तर त्यांचा उपयोग काय, असा सवाल करत सुळे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ”याच केंद्र सरकारने, ‘दिव्यांगाना लाभपासून वंचित ठेवणे गुन्हा आहे’, असा कायदा केला आहे. तर मग हे केंद्र सरकार गुन्हेगार आहे. केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आता येत्या दोन दिवसात याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात दाद मागू; आणि त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषण करण्यावाचून गत्यंतर नाही, याची सरकारने नोंद घ्यावी”.
महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात आपल्याला दिव्यांगाना न्याय द्यायचा आहे. आणि तो मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

कसबा विधानसभा :ठाकरेंच्या शिवसेनेत २ प्रवाह 

कसब्यावर हक्क कॉंग्रेसचा कि शिवसेनेचा? मविआमध्ये हलचल

पुणे-कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे वारे आता वाहू लागले असताना आणि येथील निवडणूक मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे त्यांच्याच कुटुंबातील एका साठी सोडून  बिनविरोध घ्यायची किंवा नाही ? यावर अजून महाविकास आघाडीतच एकमत झालेले नसताना आघाडीतील सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी लाट वगैरे काही नसल्याचा दावा करत आणि टिळकांच्या घरात आता कुठवर उमेदवारी द्यायची ? असे सवाल करत आपापली रणनीती आरंभ केली असून आज याच रणनीतीचा भाग म्हणून मोदी गणपती च्या परिसरात आघाडीच्या काही मान्यवरांनी चहापाणी करत एक बैठक घेतली .

या बैठकीत कसब्याचा उमेदवार म्हणून कॉंग्रेसने बाळासाहेब दाभेकारांना उमेदवारी दिली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही मान्यवरांनी ज्यांचा कसब्यात प्रभाव आहे , अशांनी दाभेकर यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला . खुद्द या बैठकीनंतर दाभेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि ,’ १९७२ पासून मी कॉंग्रेसचा सभासद आहे, पक्षाकडे मी फारसे काही कधी मागितलेले नाही , आणि आता मला कॉंग्रेस सह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मातब्बर लोकांकडून पाठींबा मिळतो आहे ज्यांच्या मागे मोठे जनमत आहे , त्यामुळे मी कॉंग्रेसच्या वतीने येथून इच्छुक आहे . आणि कॉंग्रेसने मला उमेदवारी दिली तर मी या सरावाच्या मदतीने निश्चित निवडून येऊ शकतो आणि भाजपचा बालेकिल्ला ढासळू शकतो .मात्र उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी प्रश्न पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आहे तो घेतील तो निर्णय अर्थात आम्ही मान्य करू .

तर दुसरीकडे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी मात्र चिंचवड जर कॉंग्रेसला देणार असाल तर कसबा शिवसेनेला दिलाच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले , आजवर कसबा भाजपचा बालेकिल्ला राहिला असे बोलले जाते , पण त्यामागे शिवसेनेने त्यांना दिलेली साथ हे प्रमुख कारण आहे . कसब्यात भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार विजयी होत आले .महाविकास आघाडीत आता शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आहे हे बरोबर आहे पण इथे भाजपच्या उमेदवाराला टक्कर द्यायची असेल तर शिवसेनेचाच उमेदवार द्यायला हवा .आमचे पदाधिकारी आणि मी देखील आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडे चहापाणी अगर अन्य बैठकांना जात असतो ,पण याचा रथ असा नाही किकॉंग्रेस च्या उमेदवाराला आताच आमच्याकडून कोणी पाठींबा दिला आहे. कस ब्यावर  पहिला हक्क शिवसेनाचा आहे हे कॉंग्रेसने किंवा अन्य पक्षांच्या नेत्यांना ठाऊक आहे.

मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार-मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

पुढील वर्षी पुण्यात रंगणार राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचा थरार

रुपाली गंगावणे आणि शुभांकर खवले ठरले सर्वोत्कृष्ट मल्लखांबपटू

पुणे-मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून नामदार चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अखिल भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव धरमवीर सिंह, विश्व मल्लखांब फेडरेशनचे संचालक महेंद्र चेंबूरकर, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष अभिजीत भोसले, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष मोहन झुंजे पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्षा राघवेंद्र बापू मानकर, आबासाहेब पटवर्धन क्रीडानगरीचे विश्वस्त सोमनाथ तेंडुलकर, शाहू कला क्रीडा अकादमीच्या संचालिका प्राध्यापिका अनुराधा ऐडके, सचिव राज तांबोळी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मल्लखांब हा आपल्या मराठी मातीतील क्रीडा प्रकार आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार होणे ही आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे हा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. तसेच पुढील वर्षी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे शाहू कला क्रीडा अकादमीच्या संस्थापिका अध्यक्षा प्राध्यापिका अनुराधा ऐडके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय भव्य दिव्य आणि देखण्या पद्धतीने आयोजन केले. आगामी काळात मल्लखांबसारख्या मातीतील खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी शाहू कला क्रीडा अकादमीला लोकसहभागातून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही नामदार पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी स्पर्धेतील विजेत्या मल्लखांबपटूंना विशेष पुरस्काराची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केली. यात स्परर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला गट आणि पुरुष गटातील मल्लखांब पटूंना एक वर्षासाठीचा सर्व‌ प्रवास खर्च उपलब्ध करून देणार. त्यासोबतच स्पर्धेतील अंतिम १८ स्पर्धकांचे प्रशिक्षकांचे मानधन आणि एक वर्षांचा पाच लाखांचा वैद्यकीय विमा सुरक्षा मिळवून देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव धरमवीर सिंह यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मल्लखांब हा स्वदेशी खेळ आहे. त्याचा प्रचार प्रसार व्हावा; आणि त्याला राजाश्रय मिळावा हा दादांचा प्रयत्न आहे. आजच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अर्जुन पुरस्कार विजेता देखील हिरीरीने सहभागी होऊन, त्याने चित्तथरारक कसरती सादर केल्या हे याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मल्लखांबसारख्या स्वदेशी खेळांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे, अशी त्यांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली.

या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम स्पर्धा रुपाली गंगावणे (मुंबई उपनगर) नेहा क्षीरसागर (सातारा), दृती प्रभू (मुंबई उपनगर), खुषी पुजारी (मुंबई), दिलीषा जैन (मुंबई उपनगर), हार्दिका शिंदे (मुंबई उपनगर) यांच्यात रंगली. मुलांमध्ये शुभांकर खवले (पुणे), चेतन मानकर (जळगाव), शार्दुल ऋषिकेश (मुंबई उपनगर), आदित्य पाटील (मुंबई शहर), निशांत लोखंडे (मुंबई उपनगर)
निरंजन अमृते (मुंबई शहर) यांच्यात पाहायला मिळाली.

या स्पर्धेतील‌ १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील पोल मल्लखांबमध्ये‌ हृदया दळवी (प्रथम) प्रपित ढमाल (द्वितीय) आणि शिवानी देसाई (तृतीय) क्रमांक पटकावला. तर रोप मल्लखांब मध्ये सायली गोरे (प्रथम) देवांशी‌ पवार (द्वितीय), सई शिंदे (तृतीय) क्रमांक पटकावला. १६ वर्षांखालील मुलींच्या पोल आणि रोप मल्लखांब मध्ये दृष्टी प्रभू (प्रथम), वेदिका सावंत (द्वितीय), दिलीषा जैन (तृतीय) क्रमांक पटकावला.

याशिवाय १४ वर्षांखालील मुलांमध्ये पोल आणि रोप मल्लखांबमध्ये‌ विराज अंबरे (प्रथम), समर्थ पांचाळ, (द्वितीय) आणि श्रेयांश शिंदे, (तृतीय) क्रमांक पटकावला. तसेच १८ वर्षांखालील मुलांच्या पोल गटांत निशांत लोखंडे (प्रथम), निरंजन अमृते (द्वितीय) आणि मंथन मिर्लेकर (तृतीय) क्रमांक पटकावला. रोप मल्लखांब गटात पद्मनाभ आदमाने (प्रथम), शार्दुल ऋषिकेश (द्वितीय) आणि निरंजन अमृते (तृतीय) क्रमांक पटकावला.

१६ वर्षांवरील मुलींच्या गटात पोल आणि रोप मल्लखांबमध्ये रुपाली गंगावणे (प्रथम), नेहा क्षीरसागर (द्वितीय) ,पल्लवी शिंदे (तृतीय) क्रमांक पटकावला. तसेच १८ वर्षांच्या पोल आणि रोप मल्लखांबमध्ये‌ शुभांकर‌ खवले (प्रथम), चेतन मानकरे (द्वितीय) आणि आदित्य पाटीलने (तृतीय) क्रमांक पटकावला.