Home Blog Page 1425

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे, दि. ६: जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून निरज सेमवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-१०५ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५४२४०९ असा आहे.

निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून अश्विनीकुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-२०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०० असा आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मंझरुल हसन यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-३०४ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०४ असा आहे.

निवडणूक निरीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९७२५४६ असा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

खडकी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्थानकांवरून पर्यायी रेल्वे सेवा सुरु करणार : खासदार गिरीश बापट

पुणे दि. ०६ : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून “पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा” आज सुरू करण्यात आली. या सेवेला खासदार गिरीश बापट यांनी ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन केले. या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, गौरव बापट व इतर पदाधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे उपस्थित होते.


यावेळी बोलताना बापट यांनी सांगितले की पुणे शहरासह उपनगरेही झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले केवळ पुणे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे सध्या या स्टेशनवर प्रचंड ताण येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे व पोलीस प्रशासनावर ताण, तसेच नागरिकांना वेळेवर इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब आणि आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच भविष्यातही पुणे स्टेशनवरील हा ताण असाच वाढत रहाणार असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला शहरातच पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील खडकी, शिवाजीनगर, हडपसर ही रेल्वे स्थानके विकसित करून या स्थानकावरून नवीन पर्यायी रेल्वे सेवा सुरु कराव्यात अशी माझी सातत्याने आग्रहाची मागणी होती. यासंदर्भात मी संसदेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे शिवाजीनगर रेल्वे फलाटाचे रुंदीकरण व नवीन लोकल रेल्वे सेवेचे आज उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे.
शिवाजीनगर स्टेशन वरून तळेगाव-लोणावळा लोकल सेवा सुरु करण्यात आली असून येत्या काही दिवसात अजून ४ नवीन रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहेत. तसेच स्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्म निवारा, टॉयलेट ब्लॉक, लाइटिंग, पंखे, FOB, वॉटर कुलर, घड्याळ, डस्टबिन, PAS, ट्रेन इंडिकेटर बोर्ड व इतर सुविधेसह प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचे काम करण्यात आले आहे.

नाना पटोलेंनी खा. बापटांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ

पुणे- एकीकडे अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर असताना ,कॉंग्रेसच्या वतीने रवी धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करून त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला असताना आज कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . नाना पटोले यांनी जरी बापट यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यास भेट घेतल्याचे सांगितले असले तरीही यावर चर्चा उस्लालते आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज पुण्यात कसबा पोटनिवडणुकीसाठी माहाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी आले होते. त्यांनी आज दुपारी त्यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा असून राजकीय नव्हती अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी भेटीनंतर दिली. मात्र या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
कसबा मतदार संघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. तर हिंदू महासभेचे आनंद दवे देखील उद्या अर्ज भरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी रंगतदार होणार आहे. दरम्यान काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इस्कॉनमध्ये १ कोटी रुपयांच्या सोन्याची झळाळी असलेल्या भव्य देव्हा-याचे अनावरण 

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे १० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित उत्सवाचा समारोप
पुणे : जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा, हरे राम हरे कृष्णा… च्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोन्याची झळाळी असलेल्या तब्बल १ कोटी रुपयांच्या भव्य देव्हा-याचे अनावरण झाले. भगवान राधा-कृष्ण, भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा तसेच हरिनाम आंदोनलाचे प्रणेते चैतन्य महाप्रभू व नित्यानंद महाप्रभू यांच्या मूर्ती या उत्कृष्ट कोरीवकाम केलेल्या देव्हा-यांमध्ये कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरामध्ये विराजमान झाल्या. 
आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉनच्या पुणे मंदिरातर्फे श्री श्री राधा वृंदावनचंद्र मंदिराच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पाच दिवसीय उत्सवाचा समारोप इस्कॉनमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात झाला. यावेळी प.पू.लोकनाथ स्वामी, चंद्रमौली स्वामी महाराज, नरसिंह आनंद प्रभु, गौरांग प्रभु, आमदार श्रीकांत भारतीय, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश पांडे, माजी आमदार योगेश टिळेकर, इस्कॉन पुणेचे जयदेव प्रभू, रसविग्रह प्रभू, रेवतीपती प्रभू, श्वेतद्वीप प्रभू, नटवर प्रभू यांच्यासह मंदिरातील भाविक, साधुगण, ब्रह्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
भक्तांच्या देणगीतून उज्जैन येथून साकारलेल्या देव्हा-याचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. विविध सामाजिक, धार्मिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेले चरणजीतसिंग, महेश सूर्यवंशी, किशोर चव्हाण, अंकुश मेहता, किशोर येनपुरे, अशोक गुंदेचा आदींचा विशेष सन्मान देखील यावेळी करण्यात आला. तसेच मंदिर उभारणीत योगदान देणा-यांना गौरविण्यात आले. 
श्रीकांत भारतीय म्हणाले, कलियुगामध्ये ईश्वरी निर्माणात अनेक संकटे आहेत. मात्र, निश्चय असेल तर सर्व काही शक्य आहे. राजकारणात चरित्र चांगले ठेवायचे असेल, तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले. राजेश पांडे म्हणाले, पद, पैसा यापेक्षा देण्याची वृत्ती कशी असावी, याची शिकवण मंदिरातून मिळते. समाजात सेवाभाव निर्माण करण्याचे मोलाचे कार्य इस्कॉनकडून होत आहे. 
श्री राधा-कृष्णांचे नौका विहार उत्सव, अन्नकूट महोत्सवामध्ये ४५० प्रकारचे नैवेद्य, आकर्षक रोषणाई, उत्सवात दररोज सुमारे ५०  हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. तसेच अमेरिका, लंडन, बहारीन आणि जगभरातल्या अनेक मंदिरांमधून सुमारे २५ वेगवेगळे कीर्तन समूह येथे आले होते. मागील ५ दिवस रात्रंदिवस विविध प्रकारचे कीर्तन मंदिरामध्ये सुरु होते, असे संपर्क प्रमुख संजय भोसले, जर्नादन चितोडे यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे-संभाजी ब्रिगेडने कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.संभाजी ब्रिगेडच्या वतीने कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवारअविनाश मोहिते पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे , प्रदेश संघटक संतोष शिंदे व सहसंघटक मनोज गायकवाड उपस्थित होते.

बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसबा पेठ येथून हेमंत रासने यांना तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर काँग्रेसने कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे.

संजय राऊत यांनी नुकतेच महाविकास आघाडीने जिंकणे हे एकमेव ध्येय असल्याचे वक्तव्य केले होते. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद, रस्सीखेच नाही. कसबा, पिंपरी, चिंचवड याठिकाणी आम्ही स्पिरीटने लढू. असेही राऊत यांनी स्पष्ट केले होते. मात्र संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची काही दिवसांपूर्वी युती झाली आहे. याबाबत मोठा सोहळा उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. अविनाश मोहिते आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे शिवसेना मात्र नक्कीच तोंडघशी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीनेही शिवसेनेसोबत युती केली आहे. मात्र संभाजी ब्रिगेडसोबतच वंचित बहुजन आघाडीनेही कसबा निवडणूत लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कसब्याची जागा लढायची की नाही याबाबत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आज निर्णय घेणार आहेत.

गौतम अदानी सर्वात फसवणूकदार व्यक्ती, जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव दुसरे

पुणे-अदानी यांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. गौतम अदानी जगातील सर्वात फसवणूकदार व्यक्ती आहे हे निष्पन्न झाले. अदानी याच्या शेअरची किंमत झपाट्याने घसरली असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उद्योगपती गौतम अदानी यांनी मागील 8 ते 9 वर्षात देशभरातील बँकाची मोठी कर्ज घेतली. एलआयसीला पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. 2014 मध्ये अदानी 614 क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते, परंतु सध्या ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत ठरले असे अमेरिका मधील फोर्ब्स मासिकाच्या अहवालात पुढे आले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एलआयसी एसबीआय व इतर वित्तीय संस्थांमधील गैरकारभाराविरोधात अलका टॉकीज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार संजय जगताप , आमदार संग्राम थोपटे, उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, अमिर शेख, लता राजगुरू, अजित दरेकर, शिवाजी केदारी, पुजा आनंद, मेहबुब नदाफ, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, साहिल केदारी, राहुल शिरसाट, प्रवीण करपे, सतिश पवार, सुनिल घाडगे, शोएब इनामदार, रमेश सकट, भुषण रानभरे, अनिल सोंडकर, भरत सुराणा, राहुल तायडे, रवि आरडे, शिवराज भोकरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, सुंदरा ओव्हाळ, पपिता सोनावणे, राधिका मखामले, सुमन इंगवले, सौरभ अमराळे, वाल्मिक जगताप, अजय खुडे, राकेश नामेकर, राजू नाणेकर, राजू शेख, गणेश शेडगे, रफिक शेख,सुनिल शिंदे,आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाच्या इतिहासात न भूतो न भविष्य असा भांडवली बाजारातील घोटाळा समोर आला आहे. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आले त्यावेळी त्यांनी गुजरात मध्ये जवळचे संबंध असलेले विजय मल्ला, गौतम अदानी, नीरव मोदी यांच्याशी जवळीक दाखवली. ठराविक उद्योगपती आपल्या जवळचे असल्याचे दाखवणे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आले.

वित्तीय संस्थांनी त्यानुसार नियमांना बगल देऊन या उद्योगपतींना कर्ज दिली. त्यानंतर उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी देशाबाहेर पळून गेले.अदानी याच्यामुळे एसबीआय बँक आणि एलआयसी संस्था यांचा अस्तिवतवास धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता तर त्यांनी याबाबत बोलणे अपेक्षित होते. याबाबत संसदेमध्ये केंद्र सरकार चर्चा घेत नाही. ईडी, सीबीआय धाडी टाकून अनेकांना मेटाकुटीला आणले जाते. परंतु अदानी यांना कोणी विचारणा करत नाही.

अशोक चव्हाण म्हणाले, ज्यांचे पैसे एसबीआय बँक , एलआयसी मध्ये गुंतवले त्यावर डल्ला मारण्याचे काम करण्यात आले आहे. केंद्र सरकारने तातडीने याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे. एलआयसी मध्ये सर्वसामान्य अनेकजण पॉलिसी काढतात ते पैसे पुढील आयुष्यासाठी वापरले जातात. मात्र, त्यांचे पैसे असुरक्षित करण्याचे काम करण्यात येत आहे. अदानी यांचे शेयरमध्ये पैसे गुंतवले गेले आणि शेअर कोसळल्याने हे पैसे नुकसान झाले आहे. अदानी याच्या कंपनी तोट्यात आलेल्या आहे.

हिंडेनबार्ग याचा अहवालबाबत चर्चा केंद्र सरकारकडून झालेली नाही. जनतेचे कोट्यावधी रुपये अदानी यांच्याकडे गुंतवले होते. ते गुंतवणूकदारांना परत दिले पाहिजे. लोकांच्या मनात आक्रोश झाला असून त्यांचे आयुष्य अंधकारमय करण्यात आले आहे.


या आंदोलनाचे सूत्रसंचालन ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर यांनी केले तर आभार सुजित यादव यांनी मानले.

भारतरत्न स्वरसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर यांना ‘विश्वाचे आर्त लतादीदी’ द्वारे ऑडिओरूपी भावांजली!ऐका स्टोरीटेलवर!

भारतरत्न स्वरसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर यांच्या जाण्यानं एका युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त केली गेली, ते खरंच आहे. ‘लता मंगेशकर’ हे सात अक्षरी स्वरवलय लौकीकार्थानं एक वर्षापूर्वी अंतर्धान पावलं तेव्हा एका गायिकेचा नव्हे, ‘युगाचा अस्त’ झाल्याची सार्वत्रिक भावना प्रकट झाली. खरोखर एक युग समाप्त झाल्याचीच जाणीव होती ती. आज लता दीदींची पहिली पुण्यतिथी. त्यानिमित्तानं लतादिदि गेल्या तेव्हा टि.व्ही.वरची अंतयात्रा पहाताना लतादिदींबद्दल थोर व्यक्ती काय म्हणाल्या हे जाणून घेणारा प्रसाद मिरासदार यांनी लिहिलेला अनुभव ‘विश्वाचे आर्त लतादीदी’ या ऑडिओ कथानाद्वारे स्टोरीटेल मराठीवर प्रकाशित आहे. आज त्यांच्या स्मृती जागवताना ही भावांजली ऐकावी असे आवाहन स्टोरीटेल मराठीने केले आहे.

फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरांनी व्यापून टाकणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत टि.व्ही लावला गेला. संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती. जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. लतादिदींच्या स्वरातील गाणी टि.व्ही. वर एका मागोमाग एक लावली जात होती. मधूनच त्यांच्या सुहृदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्याने ऐकताना एकच भाव मनात येत होता तो म्हणजे आर्तता..! लतादिदींच्या जाण्याने निर्माण झालेल्या दुःखासोबतच त्यांच्या स्वरांनी मनात जागृत झालेल्या करूणेचा अनुभव विलक्षण होता आणि ही करूणा सर्वांच्या मनात सातत्याने राहो हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात येत होती. हा एक विलक्षण अनुभव होता!

‘विश्वाचे आर्त लतादीदी’ हे स्टोरीटेल मराठीवरील ऑडिओकथन रसिका कुलकर्णी यांच्या आवाजात असून ६ फेब्रुवारी २०२२ या दिवसातील आर्तता आपल्या समृद्ध लेखनातून प्रख्यात लेखक प्रसाद मिरासदार यांनी दीदींच्या चाहत्यांसाठी शब्दबद्ध केली आहे. ‘विश्वाचे आर्त मध्ये लतादिदींच्या स्मृतिदिनी त्यांच्या बद्दल भालजी पेंढारकरांपासून कुमार गंधर्वांपर्यत आणि पु.ल.देशपांडेंपासून नौशाद पर्यंत अनेकांनी काढलेले गौरवोद्गार ऐका फक्त स्टोरीटेलवर!

‘विश्वाचे आर्त लतादीदी’ हे स्टोरीटेल मराठीवरील ऑडिओकथन ऐकण्यासाठील लिंक
https://www.storytel.com/in/en/books/vishwache-art-latadidi-1573231?appRedirect=true

कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

गौरव गिरीश बापट ,आणि स्वरदा बापट दोघांची उपस्थिती

पुणे-कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, शिवसंग्रामचे अध्यक्ष भारत लगड, शहर भाजप प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, किरण साळी, बाळासाहेब जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी ग्रामदैवत कसबा गणपतीची महाआरती करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत महायुतीचे हजारो कार्यकर्ते, गणपती मंडळ, संस्था-संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली. त्यापुर्वी रासने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रासने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नेहा कितवे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ!
हेमंत रासने यांचा विश्वास

गेल्या वीस वर्षांत कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली विविध विकासकामे, सेवा कार्याच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला जनसंपर्क, महायुतीच्या कार्यकर्त्यांची भक्कम संघटनात्मक फळी, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पाठींबा आणि कसब्यातील मतदारांचा दृढ विश्वास या बळावर विक्रमी मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

रासने म्हणाले, मी भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आजपर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळे पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना आणि गणेश मंडळाच्या पूर्ण ताकदीसह ही निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकू.

थोरात ,बागवे ,टिळक कोणी नाराज नाही,या तर वावड्या :नाना पटोले म्हणाले,’ आम्हाला फॉर्म भरायला जाऊ द्यात

पुणे- बाळासाहेब थोरात ,माजी मंत्री बागवे व त्यांचे पुत्र अविनाश ,तसेच रोहित टिळक असे कोणीही नाराज नाही ,या तर वावड्या आहेत, थोरातांचे पत्र तुमच्याकडे आहे काय ? असेल तर दाखवा ,आम्हाला फॉर्म भरायला जाऊ द्यात असे सांगून पत्रकारांच्या प्रश्नांना कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सहज बगल दिली तर थोरात हे नाराज आहेत कि नाहीत ते त्यांनाच विचारा असे विधान आज माजी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केले .

कसबा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसतर्फे आज रॅली काढण्यात आली. रॅलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे, शिवसेनेचे गजानन थरकुडे उपस्थित होते. पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन रॅली काढण्यात आली. त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते.

बागवे ,टिळक गैरहजर

भाजप हेमंत रासने यांच्या रॅलीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाला टिळक गैरहजर राहिले. त्याच सोबत खासदार गिरीश बापट, संजय काकडे देखील गैरहजर राहिल्याने नाराजीची चर्चा रंगली आहे. काँग्रेसमध्येही असाच प्रकार घडला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या रॅलीत काँग्रेसचे नेते रोहित टिळक, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे, त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे, शिवसेना नेते संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे गैरहजर राहिल्याने दोन्ही पक्षातील नाराजीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

होय आम्ही लढतोय, उद्या फॉर्म भरतोय; कसबा निवडणुकीवर हिंदू महासंघाची भूमिका

पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघासाठी हिंदू महासंघ या संघटनेने उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित केले आहे.हिंदुत्ववादी नेते आनंद दवे यांनी म्हटले आहे कि, आजच सायंकाळी साडेचार वाजता आम्ही शैलेशजी टीळकांच्या घरी त्यांच्या उपस्थितीत आम्ही स्वर्गीय मुक्ता ताईंच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहोत.आणि उद्या मंगळवारी उमेदारी अर्ज दाखल करणार आहोत

यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या संदेशात संघटनेने म्हटले आहे की,

होय आम्ही लढतोय… उद्या फॉर्म भरतोय

वंदनीय शिवप्रभू, संभाजी राजे आणि श्रद्धेय वीर सावरकर, पूजनिय हेडगेवारजी गुरुजी आणि गोळवळकरजी गुरुजी यांना स्मरून, स्वर्गीय मुक्तताईंचा आशीर्वाद घेऊन

हिंदु महासंघ ही निवडणुक लढवणार आहे… उद्या मंगळवारी दुपारी आम्ही अर्ज भरणार आहोत

खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्या बरोबरच

पुण्येश्वराला मुक्त करण आणि स्वच्छ, सुरक्षित आणि सभ्य कसबा हेच आमचं ध्येय असणार आहे

हिंदू महासंघ

आर्थिक आरक्षणासाठी आग्रही असणारे एकमेव राजकीय संघटन

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?

पुणे -कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत लागले आहेत. कसबा, पिंपरी-चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत.

बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले, तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र रासणे यांच्या नावाला हिंदू महासभेने विरोध केला आहे. आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले.

एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. चिंचवडमध्ये भाजपने ही परंपरा पाळली. मात्र, कसबापेठेत ही परंपरा पाळली नाही. त्यामुळे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू महासभेनेही यावरुन टीका केली आहे.

पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपला थेट प्रश्न विचारणारे बॅनर्स लागले आहेत. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला. टिळकांचा मतदारसंघ गेला. आता नंबर बापटांचा का?, असा सवाल या बॅनर्समधून करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या बॅनर्सवर एक जागरुक नागरिक असे लिहिण्यात आले आहे.

ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी पसरल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून चिंचवडमध्ये न्याय तर कसब्यात अन्याय केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आनंद दवे सोमवारी कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे कसब्यात हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले. मुक्ता यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही उमेदवारी मागितली होती. पण भाजपने दिली नाही. हा मुक्ता यांच्या कामावर अन्याय आहे. पुण्यात एकही ब्राह्मण उमेदवार नाही ही अन्यायाची भावना समाजातही आहे. पण आम्ही भाजपसोबत राहू, असेही ते म्हणाले.

आताच विसरले रासने,संजय काकडे आणि गिरीश बापटांना….कसब्यात चर्चेला उधाण

पुणे | कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. मात्र, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे आणि खासदार गिरीश बापट यांना निमंत्रण नसल्याची जोरदार चर्चा आहे.

हेमंत रासने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर संजय काकडे यांचा फोटो नाही. तसेच, अर्ज भरण्यासाठी भाजपकडून जो मेसेज व्हॉट्सॲप वर पाठवला आहे त्यातही संजय काकडे यांचा उल्लेख नाही. आणि विशेष म्हणजे खासदार गिरीश बापट यांचेही नाव त्या मेसेज मध्ये नाही.भाजपकडून या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. गिरीश बापट आजारी असल्याने ते अनुपस्थित असणे समजू शकते परंतु, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय काकडेंच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

वास्तविक कसबा पेठ विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजय काकडे यांना मानणारा मोठा मतदार आहे. काकडे यांचा जन्म घोरपडी पेठेतला आहे. वयाच्या 22 वर्षांपर्यंत काकडे यांचे घोरपडी पेठेत वास्तव्य होते. त्यामुळं घोरपडी पेठेबरोबरच 7 व 9 नंबर कॉलनी, गंज पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ यामध्ये काकडेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय कसबा पेठेतील मुस्लिम व दलित समाज देखील काकडेंना मोठ्या प्रमाणात मानतो.

गिरीश बापट हे विद्यमान खासदार आहेत. शिवाय त्यांनी सलग पाच वेळा कसबा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळं त्यांना देखील मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत.असे असून देखील भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या दोन ज्येष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आहे. संजय काकडे आणि गिरीश बापट यांना डावलले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो अशी चर्चादेखील होत आहे. हाथी आलेल्या वृत्ताने रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखला करण्यापूर्वी गणपतीची आरती केली यावेळी खासदार बापट यांचे पुत्र गौरव आणि सुनबाई स्वरदा हे दोघेही उपस्थित होते.

“…तर आम्ही टिळकांच्या घरात उमेदवारी देऊ,रासनेंचा उमेदवारी अर्ज भरतानाच; चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना आव्हान,म्हणाले ‘ अजून ४८ तास आहेत ..

पुणे- माझं नाना पटोलेंना आव्हान आहे, की निवडणुकीला अजूनही ४८ तास बाकी आहेत, आम्ही जर टिळकांच्या घरात उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे घोषित करावं”, अशी प्रतिक्रिया आज भाजपचे कसबा उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत निघालेल्या मिरवणुकीत माध्यमांशी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे .

कसबा मतदारसंघातून भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं नाना पटोले म्हणाले या माध्यमांच्या प्रश्नावर ते म्हणाले,’“आम्ही जगताप यांच्या घरातही उमेदवारी दिली आहे. मग काँग्रेस तिथे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का? मुळात काँग्रेसला पुण्यातील दोन्ही जागांची पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही. त्यामुळेच नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे, की निवडणुकीला अजूनही ४८ तास बाकी आहेत, आम्ही जर टिकळांच्या घरात उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे घोषित करावं”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच “नाना पटोले जे म्हणत आहे, ते न समजण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. आम्ही या निवडणुकीसाठी तयारी केली आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, 5 : पुणे -नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्री. फडणवीस यांनी आज श्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. श्री फडणवीस म्हणाले, रेल्वे मंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी मंत्र्यांचे आणि केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले. लवकरच राज्य शासनाचे संबंधित कंपनी आणि केंद्राचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबींना मूर्त स्वरूप देण्यात येईल असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राची दोन ऐतिहासिक शहर जोडण्याने राज्याच्या विकासाला गती मिळेल – रेल्वेमंत्री

पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या शहराच्या आर्थिक स्थितीला गती मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुकही त्यांनी केले.

वर्धेच्या ज्ञान यज्ञातील विचाराचे अमृत समाजाला नवी दिशा देण्याचे काम करेल – नितीन गडकरी

वर्धा, दि. ५ – वर्धेच्या ऐतिहासिक भूमीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या ज्ञान यज्ञातून विचाराचे अमृत मिळाले आहे. या विचारातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप श्री.गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तर पाहुणे म्हणून आ.पंकज भोयर, माजी खासदार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप दाते आदी उपस्थित होते.

साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचे, चांगल्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. जे त्रिकालाबाधित आहे ते जनतेपर्यंत नेण्याचे काम साहित्य करते. साहित्य, संस्कृतिचे समाजात फार मोठे योगदान आहे. साहित्य, काव्य,  नाटक, संगीताचा समाज व्यवहारावर परिणाम होत असतो. समाज जीवन कशा पध्दतीने घडवायचे याचे प्रतिबिंब साहित्यातून उमटते. मराठीत पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे यांच्यासह संत मंडळींनी सामाज जिवनावर परिणाम करणारे साहित्य दिले, असे पुढे बोलतांना श्री.गडकरी यांनी सांगितले.

समाज बदलायचा असेल तर व्यक्तीला बदलले पाहिजे. व्यक्ती बदलासाठी संस्कार महत्त्वाचे असतात. संस्कार विचारातून येतात आणि सकस विचारासाठी सकस साहित्य महत्त्वाचे आहे. पुस्तके वाचनाचा परिणाम विचारांवर होतो. यातूनच नवी ज्ञान पिढी निर्माण होते. समाजाला ताकद देण्याची क्षमता साहित्यात आहे. साहित्याचा परिणाम समाजमनावर होत असतो, असे श्री.गडकरी म्हणाले.

आताच्या पिढीत फार झपाट्याने बदल होत आहे. पिढीतील या बदलाची नोंद आणि अंतर लक्षात घेता साहित्य, काव्य, सादरीकरणात बदल करण्याची गरज आहे. नवनवीन माध्यमे येत असली तरी पुस्तकांचा वाचक वर्ग कायम आहे. मात्र नवीन पिढी पाहिजे तेवढे स्वारस्य वाचनात दाखवत नाही, हे दुर्दैवी आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग नव्या पिढीला वाचकप्रिय बनविण्यासाठी केला पाहिजे. रामायण, महाभारत, भगवतगिता, कुराण, बायबल यातून समाजकल्याणाचा संदेश देण्यात आला आहे, असे सांगून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रामगीता, गजानन महाराज यांची गाथा डिजिटल स्वरूपात करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलनाच्या आयोजनाठी प्रशासनाने केलेल्या चांगल्या सहयोगाबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले, राजकारण बाजूला ठेऊन साहित्य संमेलनात एकत्र येण्याची परंपरा आजवर टिकली आहे. कोणत्याही संमेलनाध्यक्षाला मिळाले नसेल इतके प्रेम मला मिळाले आहे. माणसे जोडली गेली पाहिजे हा संमेलनाचा उद्देश आहे. संमेलनात मनातला आवाज उमटला जातो, बुलंद होतो, असे न्यायमूर्ती चपळगावकर म्हणाले.

महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.दाते यांनी प्रास्ताविकातून संमेलनात तीन दिवस राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राबणाऱ्या व्यक्तींसह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी चरखा भेट देऊन सत्कार करण्यात आला. काही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोप समारंभास साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.