Home Blog Page 1424

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठाची सकारात्मक भूमिका

पुणे दि.६-गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर उपस्थित होते.

या बैठकीत पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार करण्यासंदर्भातील‌ प्रस्ताव समोर आला होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणानेही (पुम्टा) मान्यता दिली होती.

सदर कामाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला. यासाठी श्री. पाटील यांनी विद्यापीठ प्रशासन, महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा असे निर्देश या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

तसेच, उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत सदर मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याला विद्यापीठ प्रशासनानेही अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

धंगेकर सोने-चांदीचे कारागीर,संपत्ती 10 कोटींची

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची स्थावर जंगम मालमत्ता ५ कोटी ८८ लाख ९७ हजार १०७ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ८० हजार ६० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ४ कोटी ३५ लाख ३६ हजार ८९२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ३ लाख ५० हजार रुपये इतकी आणि १५ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १० कोटी २४ लाख ३३ हजार ९९९ इतकी आहे.अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. ते स्वतः सोने-चांदीचे कारागिरीचा व्यवसाय करत आहेत. तर त्यांच्या पत्नी या शेती तसेच बांधकाम व्यवसाय करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची विशेष करून दौंड तालुक्यातील पिंपळगाव आणि हवेली तालुक्यातील नांदोशी येथे जवळपास दहा एकर शेतजमीन तर पुणे शहरातील कोथरूड येथे पाच गुंठे जागा आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर अशी दोघांच्या नावे १० एकरहून अधिक जमीन आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे प्रत्येकी एक फ्लॅट देखील आहे.

रवींद्र धंगेकर यांनी आपले वार्षिक उत्पन्न ३ लाख ३६ हजार ९४० रुपये रुपये तर पत्नी प्रतिभा ३ लाख ९८ हजार ४०० रुपये इतके दाखवले आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांच्याकडे एक होंडा ऍक्टिव्हा, एक रॉयल एनफिल्ड अशी एक दुचाकी वाहन आहे.

रासने बांधकाम व्यावसायिक,पुण्यात 3 फ्लॅट,25 एकर शेती, एकूण संपत्ती १७ कोटीची

पुणे : बारावी पर्यंत शिक्षण झालेले कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही,अशी माहीती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्थावर जंगम मालमत्ता १२ कोटी ४९ लाख ४५४ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ३५ हजार ९०० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे.असे म्हंटले आहे. तसेच त्यांच्या पत्नी मृणाली रासने यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ४ कोटी ६२ लाख २६ हजार ८५२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम २२ हजार २०० रुपये इतकी आणि १८ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १७ कोटी इतकी असून त्यांचा जमीन खरेदी करणे याकडे जास्त कल असल्याचे दिसत आहे.

त्याचबरोबर त्यांनी आपला मुलगा आणि मुलीच्या नावाने जवळपास एक कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

हेमंत रासने यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते स्वतः बांधकाम व्यवसायाचे काम करत असून तीन कंपन्यामध्ये भागीदार आहेत. तर त्यांच्या पत्नी या व्यवसाय तसेच शेती करत असल्याचे जाहीर केले आहे.

त्यांची विशेष करून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळच्या बोरघर, टाळसुरे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळील पोंभुर्ले तसेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील म्हाळुंगे आणि भोर तालुक्यातील गोरड म्हशिवली येथे शेतजमीन आहे. हेमंत रासने आणि त्यांची पत्नी मृणाली रासने अशी दोघांच्या नावे २५ एकरहून अधिक जमीन आहे.

त्याचबरोबर पुणे शहरातील सदाशिव पेठ येथे दोन फ्लॅट बुधवार पेठ येथे एक फ्लॅट आहे.

हेमंत रासने यांनी आपले वार्षिक उत्पन्न ५ लाख ७५ हजार ४१० रुपये रुपये तर पत्नी मृणाली ४ लाख ३० हजार ८३० रुपये इतके दाखवले आहे. तसेच हेमंत रासने यांच्याकडे एक इनोव्हा कार आणि एक दुचाकी वाहन आहे.

जोरदार शक्ती प्रदर्शन करत धंगेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आज सकाळी साडेदहा वाजता ट्वीटर वरून कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यानंतर कसबा गणपतीचे दर्शन घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मिरवणुकीने जाऊन दाखल केला .तत्पूर्वी त्यांनी केसरीवाड्यात जाऊन टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दिवंगत आमदार मुक्त टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल यांची भेट घेतली . कसबा गणपती आरती समयी त्यांच्या समवेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , सुशिलकुमार शिंदे ,मोहन जोशी ,संग्राम थोपटे , विश्वजीत कदम, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, दीपक मानकर,संजय मोरे , प्रशांत जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .मिरवणुकीने जल्लोषात जाऊन त्यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे असलेल्या निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कसब्यात इतिहास घडणार..!!

यावेळी धंगेकर म्हणाले कि,’ मायबाप जनता व पुण्यनगरीच्या आराध्य दैवतांच्या कृपेने आजवर माझ्या सत् सत् विवेकबुद्धीने मदत करताना ज्या ज्या व्यक्ती २४ तासातील ज्यावेळी – ज्याकाळी माझ्याजवळ आल्या, त्या त्या व्यक्तीचे काम मार्गी लावण्याचे व्रत गेली ३० वर्ष मी माझे कर्तव्य म्हणून पूर्ण करत आलो आहे. आज हा सर्व काळ माझ्या डोळ्यासमोरून गेला,माझा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीतील अबाल – वृद्धांची गर्दी व त्यांचा उत्साह पाहताना मला या निवडणुकीत कसब्यात होणाऱ्या परिवर्तनाची झलक दिसून आली.कसबा विधानसभा मतदारसंघात करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न येत्या काळात माझा राहील. खरं पाहिलं तर हा कालावधी दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचा होता, परंतु त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या हातून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी या कसबा विधानसभा मतदारसंघातील निवडून येणाऱ्या उमेदवाराची असेल. सहाजिकच कसबा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी या नात्याने गेल्या 30 वर्षात केलेल्या कामांच्या अनुभवाच्या बळावर मायबाप जनतेने संधी दिल्यास येणारा काळ देखील कसब्यात सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून त्यांच्या सेवेत व्यतीत करेल, असा शब्द मी आज अर्ज भरल्यानंतर सर्वसामान्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे .

..तर रासनेंना बदलून टिळकांना उमेदवारी देऊ :भाजपाचा पवित्रा

पुणे- आज शिवसेनेच्या संजय मोरे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतल्यानंतर भाजपाने गतीने हालचाली करत सावध पवित्रा घेतला असून भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केसरीवाड्यात जाऊन टिळक कुटुंबियांची भेट घेतली . आणि त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना … जर कॉंग्रेस ची इछ्या खरोखर बिनविरोध निवडणूक करण्याचीच असेल तर अजूनही आमचे आवाहन आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही हवे तर रासने यांची उमेदवारी मागे घेऊन टिळकांना उमेदवारी देऊ , उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ आहे त्यांनीच याबाबत निर्णय घ्यावा असे सांगत बावनकुळे यांनी आता बिनविरोधाची सर्व मदार कॉंग्रेसवर ढकलली आहे.

पहा नेमके ते काय म्हणाले ……

वेटलिफ्टिंगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम

  • आकांक्षा व्यवहारेचे ४५ किलो गटात पहिले सुवर्ण
  • वेटलिफ्टिंगमध्येच अस्मिता ढोणेचाही विक्रम
  • टेनिसमध्ये महाराष्ट्राची अपेक्षित कामगिरी
  • कबड्डीत मुलींचा विजय, तर मुलांचा पराभव
  • नेमबाजीत सानियाला ब्राँझपदक

भोपाळ/इंदोर/खारगांव :

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षित सुरुवात करताना महाराष्ट्राचा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील पदकांचा वेग कायम राखला. महाराष्ट्र अजूनही पदकतालिकेत आघाडीवर असून, महाराष्ट्राची २८ सुवर्ण, ३० रौप्य आणि २५ ब्राँझ अशी एकूण ८३ पदके झाली आहेत. आता उद्यापासून सुरु होणाऱ्या जलतरण क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या कामगिरीची जोड मिळणार आहे. हरियाना २३, १८, १५ अशा ५६ पदकांसह दुसऱ्या, तर मध्य प्रदेश २३, १३, २० अशा ५६ तिसऱ्या स्थानावर आहेत. सुवर्ण आणि एकूण पदक संख्येत हरियाना, मध्य प्रदेशची बरोबरी असून, रौप्यपदकांच्या आघाडीने हरियाणाने दुसरे स्थान मिळविले.

वीणाताई आहेर हिने स्नॅचमध्ये ५७ आणि क्लिन ॲण्ड जर्क प्रकारात ७२ असे एकूण १२९ किलो वजन उचलून सुवर्णपदकाचा मान मिळविला. दोन्ही प्रकारात तिसऱ्या प्रयत्नांत तिने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. वीणाने दुसऱ्या क्रमांकावरील ज्योत्स्ना साबर (११८) आणि प्रितीस्मिता भोज (११७) या ओडिशाच्या दोघींना मोठ्या फरकाने मागे टाकले. वीणाने या स्पर्धेत क्लीन ॲण्ड जर्क प्रकारात आपली कामगिरी उंचावताना थेट राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. वीणाताईने आकांक्षा व्यवहारेच्या ७१ किलो वजनाचा विक्रम एका किलोने मोडीत काढला. आकांक्षाने गेल्यावर्षी मोदीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या विक्रमाची नोंद केली होती.
त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात आकांक्षाने ४५ किलो गटात स्नॅचमध्ये ६७ आणि क्लिन ॲण्ड जर्कमध्ये ७७ असे १४४ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. तिला महाराष्ट्राच्याच अस्मिता ढोणेकडून आव्हान मिळाले. मात्र, अस्मिता स्नॅच प्रकारात (६१ किलो) मागे राहिली. मात्र, क्लिन ॲण्ड जर्कमध्ये अस्मिताने ८२ किलो वजन उचलून नव्या विक्रमाची नोंद केली. ती १४३ किलो वजन उचलून रौप्यपदकाची मानकरी ठरली. या दोन्ही खेळाडूंना प्रवीण व्यवहारे आणि तृप्ती पराशर यांचे मार्गदर्शन मिळते.

नेमबाजीत सानियाला ब्राँझपदक कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील सानिया सापले हिने ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ब्राँझपदक.

सानिया हिचे खेलो इंडिया मधील हे पहिलेच पदक आहे. आतापर्यंत झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तिने जवळजवळ पन्नास पदकांची कमाई केली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कष्ट करायची तिची तयारी आहे. अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेणारी सानिया कोल्हापूर आणि नवी दिल्ली येथे वैयक्तिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.‌ महाराष्ट्राला नेमबाजीत येथे एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई झाली.

स्लॅलममध्ये अपयशी सुरुवात

महाराष्ट्राला साहसी क्रीडा प्रकारातील स्लॅलम (कॅनॉइंग-कयाकिंग) मध्ये अपयश आले. या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र प्रथमच सहभागी झाले होते. महाराष्ट्राची मनस्वी राईकवार ही ७२४.९७६ सेकंद अशी वेळ देत सहाव्या स्थानावर राहिली. यजमान मध्य प्रदेशाच्या मानसी बाथमने सुवर्ण, तर हरियानाच्या प्रिती पालने रौप्यआणि कर्नाटकाच्या धरिती मारियाने ब्रॉंझपदक मिळविले. या प्रकारातील दुसऱ्या म्हणजे कयाकिंगमध्ये उद्या जान्हवी राईकवार आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

कबड्डीत पुन्हा संमिश्र यश

कबड्डीत दुसऱ्या दिवशी देखिल संमिश्र यशावर समाधान मानावे लागले. पहिल्या दिवशी हरियाणाविरुद्ध पराभव पत्कराव्या लागणाऱ्या मुलींनी आज तेलंगणाचा ६४-१६ असा ४८ गुणांनी पराभव केला. हरजित, मनिषा, ऋतुजा यांच्या तुफानी खेळाने मंध्यतरालाच ३१ गुणांची आघाडी घेत महाराष्ट्राचा विजय निश्चित केला. उत्तरार्धात खेळाचा वेग काहीसा संथ केला. उत्तरार्धात आणखी १७ गुणांची कमाई करताना महाराष्ट्राने मोठा विजय मिळविला.
मुलांच्या संघाला बिहारविरुद्धच्या विजयी खेळातील सातत्य राखता आले नाही. मुलांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण, राजस्थानविरुद्ध हे प्रयत्न २७-२८ असे एका गुणाने कमी पडले.

टेनिसमध्ये विजयी सुरुवात

टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षित सुरुवात केली. महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. चौघांनीही एकतरर्फी विजयाची नोंद केली. मुलींच्या गटात पुण्याच्या अस्मी आडकरने बंगालच्या सोहिनी मोहंतीचा कडवा प्रतिकार १-६, ६-२, ६-१ असा मोडून काढला. मधुरिमा सावंतने दिल्लीच्या लक्ष्मी गौडा हिचा ६-१, ६-२, तर निशीत रहाणेने मेघालयाच्या इशान रावतचा ६-१, ६-० असा फडशा पाडला. रिया गायकैवारीला हरियानाच्या सुर्यांशी तन्वर हिने झुंजवले. रियाने तीन सेटपर्यंत रंगलेली लढत ६-१, ४-६, ६-१ अशी जिंकली.


नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या वतीने 22 व्या भारत रंग महोत्सव 2023 चे 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2023

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) वतीने 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान  22 व्या भारत रंग महोत्सव (बीआरएम), 2023चे  आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली, जयपूर, राजमुंद्री, रांची, गुवाहाटी, जम्मू, श्रीनगर, भोपाळ, नाशिक आणि केवडिया येथे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी केवडिया येथे समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

नाटके आणि सांस्कृतिक कलाविष्कार, जागतिक दृष्टीकोनातून रंगभूमीच्या जागतिक आणि धोरणात्मक महत्त्वाच्या अनेक विषयांवर आधारित परिसंवाद यांचा  22व्या भारत रंग महोत्सवात समावेश असेल.

नाटकांच्या सादरीकरणासाठी  विविध राज्यांतील संस्थांचे  सहकार्य घेण्यात आले आहे. यात स्थानिक कलाकारांचा सहभाग असेल आणि नाट्यकृती  स्थानिक लोकांना आकर्षित करतील हे या माध्यमातून सुनिश्चित केले जाईल.

नाटकांसोबतच पुस्तकांचे प्रकाशन, दिग्दर्शक संमेलन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गजांचा मास्टर क्लास असे इतरही संलग्न उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

अन्य देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध आणि सांस्कृतिक विनिमय  कार्यक्रम दृढ करणे हे भारत रंग महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. देशभरातील नाट्यपरंपरेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा महोत्सव  एक व्यासपीठ निर्माण करतॊ. केवळ कलाकारच नाही तर दिग्गज दिग्दर्शकही या भव्य महोत्सवात सहभागी होणार आहेत. 

भारतातील सर्व 75 रामसर स्थानांवर जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजरा

नवी दिल्‍ली/मुंबई, 6 फेब्रुवारी 2023

देशभरातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांतर्फे भारतातील सर्व 75 रामसर स्थळांवर जागतिक पाणथळ दिनानिमित्त 200 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रत्येक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला तसेच कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना पाणथळ जागांच्या संरक्षणाची शपथ देण्यात आली. जागतिक पाणथळ दिनानिमित्त विविध रामसर ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा, नवीन माहिती करून देण्याच्या उद्देशाने आयोजित विविध कार्यक्रम तसेच पक्षीनिरीक्षण इत्यादी उपक्रम राबवण्यात आले होते.

29 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणथळ जागांच्या सहभागात्मक व्यवस्थापनावर अधिक भर दिला होता. या जागांच्या जतन आणि संवर्धनात स्थानिक समुदायांच्या अनमोल भूमिकेचे देखील त्यांनी ठळकपणे वर्णन केले होते. पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या विचारांना अनुसरून जागतिक पाणथळ दिन साजरा करण्याची संकल्पना राबवण्यात आली.

महाराष्ट्रात देखील जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यासाठी लोणार, नांदूरमधमेश्वर आणि ठाणे या तीन रामसर स्थळांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक पाणथळ दिनाच्या निमित्ताने 2 फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील प्रसिद्ध लोणार तलावाच्या परिसरात वन खात्यातर्फे स्वच्छता मोहीम तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा उपक्रम राबवला. यामध्ये लोणार वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. परिक्षेत्र वन अधिकारी चेतन राठोड आणि इतर वन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवरास अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी उल्कापात झाल्याने हे सरोवर निर्माण झाले. यातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे-हिरवे शेवाळे असल्याने ते खाण्यासाठी रोहित (पक्षी) येथे नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे, फुलपाखरे येथे दिसतात.

नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारीतील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात 2 फेब्रुवारी 2023 रोजी जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. चापडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक वन्यजीव विभागातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भूषविले तर ज्येष्ठ पक्षिमित्र दत्ताकाका उगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पाणथळ भूमी संरक्षणाची शपथ दिली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, अध्यक्ष गणेश रणदिवे यांनी पाणथळ भूमीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहून योगदान देण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात विद्यार्थी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यातील खुल्या संवादवजा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या 75 रामसर स्थळांपैकी नांदूरमधमेश्वर हे 28 व्या क्रमांकाचे रामसर स्थळ आहे तर महाराष्ट्रातील 3 रामसर स्थळांपैकी प्रथम क्रमांकाचे रामसर स्थळ आहे. सुमारे 1198.657 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात 536 प्रकारच्या जमिनीवरील आणि पाण्यातील वनस्पती आढळतात. तसेच येथे 7 प्रकारचे सस्तन वन्यप्राणी, 300 जातींचे पक्षी, 24 प्रकारचे मासे आणि तब्बल 41 प्रकारची फुलपाखरे आढळतात.

ठाणे येथे असलेल्या फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यात जागतिक पाणथळ दिनानिमित्त कांदळवन प्रतिष्ठान आणि ग्रीनएडर्स संस्था यांच्यातर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती

पुणे, दि.६: भारत निवडणूक आयोगाने मतदार सुविधाकेंद्रीत निवडणूकांवर भर देण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्यादृष्टीने २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आदींसाठी मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देत आहेत.

सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी ८० वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकारी जागृती करत आहेत.

८० वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या तसेच दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी अशा मतदारांकडून मतदार नोंदणी करणारे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून ‘नमुना १२ डी’ नमुना अर्ज भरुन घेत आहेत.

त्याशिवाय दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचा समावेश असलेले मतदान यंत्र (ईव्हीएम), घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, आदीसंबंधाने चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रबोधन करण्यात आल्याची माहिती समन्वयक अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.

“पाणी टंचाई, दूषित पाणी टँकर” ही समस्या नाही तर नेता ही समस्या कायमची सोडवायला आप ला संधी द्या

पुणे: सर्वसामान्य नागरिकांचा पाणी, रस्ते, स्वच्छता या आपल्या समस्या नाहीत तर हे प्रश्न सोडवणारा योग्य उमेदवार,पक्ष आपण निवडून दिला नाही ही आपली समस्या आहे. असे आम आदमी पार्टीचे राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी सांगितले.
पाणी प्रश्न संदर्भात धायरी येथे आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित पाणी परिषदेच्या वेळी ते बोलत होते.
यावेळी सहप्रभारी महाराष्ट्र राज्य गोपाल इटालिया, महाराष्ट्र राज्य संयोजक रंगा राजुरे , महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, शहर समन्वयक अभिजीत मोरे, पाणी परिषद आयोजक आणि धायरी मधून आप चे इच्छुक उमेदवार धनंजय बेनकर, आप युवा राज्य संघटक संदीप सोनवणे, शहर संघटक एकनाथ ढोले , शहर संपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, आप मीडिया प्रमुख सुदर्शन जगदाळे, जल हक्क आंदोलन समिती अध्यक्ष आबासाहेब कांबळे, किशोर मुजुमदार, प्रीतम कोंढाळकर, राजाभाऊ बेनकर, राहुल बेनकर, संदीप बेनकर आदी उपस्थित होते.
यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने जलहक्क आंदोलन समितीच्या पाणीपुरवठा प्रश्न बाबत करण्यात आलेल्या पाठपुराव्या संदर्भात माहिती देण्यात आली. शहरात असलेली अपूर्ण पाणीपुरवठ्याची कामे, चाळीस टक्के पाणी गळतीच्या नावाखाली होत असलेली पाणी चोरी, तसेच समाविष्ट गावांना दररोज पाणी मिळत नसल्याची बाब यावेळी मांडण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे म्हणाले, स्मार्ट सिटी मध्ये पाणी मिळत नसेल तर याला सध्याचे सरकार जबाबदार आहे. नागरिकांनी आम आदमी पार्टी सोबत रस्त्यावर उतरून स्वतःचा पाणी प्रश्न सोडवून घ्यावा.
विजय कुंभार “या देशाचे मालक जनता आहे, प्रशासन काम करत नसेल, सध्याचे नेते काम करत नसतील तर नेते बदला. आप ला या वेळी संधी द्या पुणे शहर टँकर मुक्त करू”

यावेळी धायरी गाव परिसरातील महिलांनी आपला पाणी प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमोर यावेळी उपस्थित केला. फक्त पाईपलाईन व टाक्यांवर खर्च नको तर त्यामध्ये पाणी द्या असा प्रश्न यावेळी मांडण्यात आला.
या कार्यक्रमाला धायरी गाव परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय बेनकर यांनी केले होते.

मातृभाषेतील शिक्षण मुलांच्या पंखांमध्ये देते बळ-प्रसिद्ध लेखिका डॉ. नीलिमा गुंडी

 शिक्षण प्रसारक मंडळी मुलींची शिशुशाळा तर्फे  कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा सन्मान
पुणे : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले तरच आपली प्रगती होते, असा गैरसमज आज अनेक पालकांमध्ये निर्माण झाला आहे. परंतु आपल्या प्रगतीशी आपण कोणत्या भाषेमध्ये शिकतो याचा काहीही संबंध नसतो. मराठी भाषेमध्ये शिकूनही जागतिक स्तरावरील यश मिळवता येते. मातृभाषेतील शिक्षण हे खऱ्या अर्थाने मुलांच्या पंखांमध्ये बळ देते .त्यामुळे आपल्या मुलांची मराठी भाषेशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन जेष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी केले.

शिक्षण प्रसारक मंडळी मुलींची शिशु शाळा तर्फे शाळेच्या कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा सन्मान लोकमान्यनगरमधील शाळेच्या प्रांगणात  करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळीचे ऍड. मिहीर प्रभुदेसाई, श्रीरंग कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री एडगांवकर, प्राथमिक  शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा आद्दम आदी यावेळी उपस्थित होते. नेहा जोशी, मृण्मयी जोशी, सानिका खळदकर या कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला .नृत्य, नाट्य आणि संगीत विषयक  विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केले.

डॉ. नीलिमा गुंडी म्हणाल्या, आपल्या देशाला नोबेल पारितोषिक मिळत नाही, अशी आपण खंत व्यक्त करतो. परंतु आपण आपल्या भाषेपासून जर दूर जात राहिलो तर आपल्याला नोबेल कसे मिळणार? लहान मुलांना मराठी भाषेची असणारी गोडी आपण कायम ठेवली पाहिजे. त्यांच्या भाषेमध्ये होणाऱ्या चुका या मोजपट्टीमध्ये न मांडता मुलांना आपल्या मातृभाषेचा आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे, अशा प्रकारे मातृभाषेतून त्यांना शिक्षण दिले पाहिजे.

जयश्री एडगांवकर म्हणाल्या, इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु मराठी भाषेमध्ये शिकले तरीही पुढील शिक्षण घेण्यासाठी आणि कोणत्याही क्षेत्रांमध्ये कर्तृत्व मिळवण्यासाठी अडचणी येत नाही, हे आपल्या विद्यार्थिनींनी मराठी माध्यमांमध्ये शिकून दाखवून दिले आहे. मराठी भाषेचा न्यूनगंड पालकांनी दूर केला पाहिजे आणि त्यांनी आपल्या मुलांना मराठी भाषेची गोडी लावली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात उत्साहात स्वागत

मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून शोभायात्रा : पादुका पूजन आणि ठिकठिकाणी स्वागत
पुणे : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चा जयघोष… रांगोळीच्या पायघड्या… फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये ठेवलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सुरु असलेली लगबग आणि ठिकठिकाणी झालले स्वागत अशा भक्तीने भारलेल्या वातावरणात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थांच्यापालखीचे स्वागत पुणेकरांनी उत्साहात केले. मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून वाजत-गाजत निघालेला पालखी सोहळा कॉंग्रेस भवन येथे विसावला. 
व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश आसबे आणि पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी पुणे मराठी बांधकाम संघटनेचे नंदू घाटे, सचिव मिलिंद देशपांडे, संदीप चव्हाण, श्रीपाद थोरात, अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण उपस्थित होते.
मंडई चौकी – चितळे बंधू मिठाईवाले – नूमवि प्रशाला – अहिल्यादेवी शाळा- रमणबाग शाळा ते शिंदेपार आणि कॉंग्रेस भवन असा पालखीचा मार्ग होता. पालखी सोहळ्याचे यंदा २६  वे वर्ष आहे. मिरवणुकीची सुरुवात मंडईतील शारदा-गजानन मंदिरापासून झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारा आणि त्यामागे अश्वराज, राजकुमार, प्रभात, न्यू गंधर्व, स्वरांजली आदी बँडपथके सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या रथातील आकर्षक आरास केलेल्या पालखीचे पुष्पवृष्टी आणि रांगोळ््या घालून पुणेकरांनी ठिकठिकाणी स्वागत केले. 
पालखी सोहळ्याचे यंदा २६ वे वर्ष आहे.  दरवर्षी प्रदान करण्यात येणारा श्री स्वामी समर्थ पुरस्कार यंदा स्वामी भक्त बंडोपंत तिखे यांना देण्यात येणार आहे. मंगळवार दि. ७ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
रविवार, दिनांक ५  फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी आणि भक्ती गीते’ सादर करणार आहेत. तसेच सोमवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार असून दिवसभर रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवन येथे सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश विनामूल्य आहे.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे, दि. ६: जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून निरज सेमवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-१०५ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५४२४०९ असा आहे.

निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून अश्विनीकुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-२०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०० असा आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मंझरुल हसन यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-३०४ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०४ असा आहे.

निवडणूक निरीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९७२५४६ असा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

खडकी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्थानकांवरून पर्यायी रेल्वे सेवा सुरु करणार : खासदार गिरीश बापट

पुणे दि. ०६ : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून “पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा” आज सुरू करण्यात आली. या सेवेला खासदार गिरीश बापट यांनी ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन केले. या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, गौरव बापट व इतर पदाधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे उपस्थित होते.


यावेळी बोलताना बापट यांनी सांगितले की पुणे शहरासह उपनगरेही झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले केवळ पुणे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे सध्या या स्टेशनवर प्रचंड ताण येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे व पोलीस प्रशासनावर ताण, तसेच नागरिकांना वेळेवर इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब आणि आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच भविष्यातही पुणे स्टेशनवरील हा ताण असाच वाढत रहाणार असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला शहरातच पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील खडकी, शिवाजीनगर, हडपसर ही रेल्वे स्थानके विकसित करून या स्थानकावरून नवीन पर्यायी रेल्वे सेवा सुरु कराव्यात अशी माझी सातत्याने आग्रहाची मागणी होती. यासंदर्भात मी संसदेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे शिवाजीनगर रेल्वे फलाटाचे रुंदीकरण व नवीन लोकल रेल्वे सेवेचे आज उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे.
शिवाजीनगर स्टेशन वरून तळेगाव-लोणावळा लोकल सेवा सुरु करण्यात आली असून येत्या काही दिवसात अजून ४ नवीन रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहेत. तसेच स्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्म निवारा, टॉयलेट ब्लॉक, लाइटिंग, पंखे, FOB, वॉटर कुलर, घड्याळ, डस्टबिन, PAS, ट्रेन इंडिकेटर बोर्ड व इतर सुविधेसह प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचे काम करण्यात आले आहे.

नाना पटोलेंनी खा. बापटांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ

पुणे- एकीकडे अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर असताना ,कॉंग्रेसच्या वतीने रवी धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करून त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला असताना आज कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . नाना पटोले यांनी जरी बापट यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यास भेट घेतल्याचे सांगितले असले तरीही यावर चर्चा उस्लालते आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज पुण्यात कसबा पोटनिवडणुकीसाठी माहाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी आले होते. त्यांनी आज दुपारी त्यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा असून राजकीय नव्हती अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी भेटीनंतर दिली. मात्र या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
कसबा मतदार संघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. तर हिंदू महासभेचे आनंद दवे देखील उद्या अर्ज भरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी रंगतदार होणार आहे. दरम्यान काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.