Home Blog Page 1423

पुणे जिल्हा समन्वय समितीला आदर्श समन्वय समितीचा पुरस्कार

पुणे दि.७-महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघच्या ३७ व्या वर्धापदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा समन्वय समितीला आदर्श समन्वय समितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे येथील इंजी. विनायक लहाडे, नितीन काळे, अशोक मोहीते, इंजी. विलास हांडे, इंजी विठ्ठल वाघमारे, मोहन साळवी या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

…पुन्हा पुढं ढकलली,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणी

नवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी होणार होती. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात हे चौथ्या क्रमांकावर प्रकरण होतं. पण प्रकरण सुनावणीस येण्यापूर्वींच चार वाजता न्यायालयाचे कामकाज संपलं.त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणी पुढं ढकलली आहे. आता पुढची सुनावणी कधी होणार याची उत्सुकता आहे.

आज हे प्रकरण चौथ्या क्रमांकावर होते. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी होणार होती. पण दहा मिनिटे आधी तिसऱ्या क्रमांकाचं प्रकरण संपवलं आणि कोर्ट थेट उठलं. त्यामुळे पुन्हा एकदा सुनावणी पुढं ढकलली आहे. आता पुढची सुनावणी कधी होणार याची उत्सुकता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणी बऱ्याच काळापासून लांबली आहे. मुंबई, पुण्यासह 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांचा निवडणूका लांबल्या आहेत. ओबीसीचं आरक्षण लटकल्याने निवडणूका पुढं ढकलल्या जात होत्या.त्यानंतर जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टाने ग्रिन सिग्नल दिला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने एक आध्यादेश आणून वार्ड रचना बदलली होती. अर्थान हे एक निमित्त होतं. या सरकारला सेटल होण्यासाठी वेळ हवा होता. आता कायदेशीर प्रक्रियेत निवडणूक अडकली आहे.काही ठिकाणी तीन वर्षे होत आली आहेत. नवीन महापालिका अस्तित्वात आली नाहीय. प्रशासकाद्वारे कारभार चालवला जात आहे. 17 जानेवारीला सुनावणी होणार होती. तेव्हा देखील सुनावणी झाली नाही.या संदर्भात शेवटाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल 22 ऑगस्ट 2022 ला आला होता. त्यानंतर सात ते आठ वेळा सुनावणी पुढं ढकलली आहे.

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती संघाला संयुक्त अजिंक्यपद

पुणे, दि. ७ फेब्रुवारी २०२३: महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघ आणि नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाने संयुक्तपणे सर्वसाधारण अजिंक्यपदाचा मान पटकावला. पुणे-बारामती परिमंडल संघातील खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारात नेत्रदिपक कामगिरी करीत अटीतटीच्या क्रीडास्पर्धेत प्रथमच सर्वसाधारण विजेतेपद मिळवले आहे.

जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलामध्ये महावितरणच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा रविवारी (दि. ५) सायंकाळी समारोप झाला. यावेळी कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्रकांत डांगे यांच्याहस्ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी संयुक्त अजिंक्यपदाचा करंडक स्वीकारला. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक (वितरण/मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता कैलास हुमणे (जळगाव), भुजंग खंदारे (मुख्यालय), मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

महावितरणच्या चार दिवसीय क्रीडास्पर्धेत पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (पुणे) व श्री. सुनील पावडे (बारामती) यांच्या नेतृत्वात पुणे-बारामती संघाने यंदा क्रीडा स्पर्धेसाठी कसून तयारी करण्यात आली. खेळाडूंना प्रशिक्षण देणे, सराव शिबिर आदींचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडास्पर्धेचे समन्वयक तसेच उपमुख्य औद्योगिक अधिकारी श्री. शिरीष काटकर (पुणे) व श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) यांनी खेळाडूंची निवड चाचणी, सराव, प्रशिक्षण शिबिर आदींसाठी महत्वाचे योगदान दिले तर महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. अभय चौधरी यांनी संघप्रमुख म्हणून काम पाहिले. राज्यातील १६ परिमंडलांच्या ८ संयुक्त संघांतील ७३० पुरुष व ३५३ महिला असे एकूण १०८३ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. 

पुणे-बारामती परिमंडल संघाने सांघिक खेळात क्रिकेट, खोखो (पुरुष), बॅडमिंटन (महिला) स्पर्धेत विजेतेपद मिळविले तर कबड्डी (महिला) व कॅरम (पुरुष) मध्ये उपविजेता ठरले. वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पुणे-बारातमी संघाचे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे- धावणे १०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (उपविजेता), २०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (विजेता), ८०० मीटर (पुरुष)- प्रतीक वाईकर (विजेता), १५०० मीटर (पुरुष)- प्रतीक वाईकर (विजेता),  महिला गट- अर्चना भोंग (विजेती), ४ बाय १०० रिले (पुरुष)- प्रतीक वाईकर, सोमनाथ कांतीकर, कृष्णा लाड, गुलाबसिंग वसावे (उपविजेता), महिला गट- सुप्रिया लुंगसे, अर्चना भोंग, शर्वरी तिवटणे, माया येळवंडे (उपविजेता), गोळा फेक (पुरुष)- प्रवीण बोरावके (विजेता), थाळी फेक (पुरुष)- प्रवीण बोरावके (विजेता), लांब उडी (पुरुष)- सोमनाथ कांतीकर (विजेता), महिला गट- माया येळवंडे (उपविजेती), बुद्धीबळ (पुरुष)- अजय पंडित (विजेता) टेनिक्वाईट– (महिला दुहेरी)- शीतल नाईक, कोमल सुरवसे (विजेते), बॅडमिंटन महिला एकेरी- वैष्णवी गांगरकर (विजेती), पुरुष दुहेरी- इम्रान तासगावकर व गणेश काकडे (उपविजेता), कुस्ती ५७ किलो– आकाश लिंभोरे (विजेता), ६५ किलो- राजकुमार काळे (विजेता), ७४ किलो- अकील मुजावर (उपविजेता), ८६ किलो- अमोल गवळी (विजेता), ९२ किलो- वैभव पवार (विजेता)

लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचा इंदिरा कल्याण केंद्राच्या  खडकीभूषण पुरस्काराने सन्मान

पुणे- इंदिरा कल्याण केंद्राच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना खडकी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात गौरविण्यात आले.

            इंदिरा कल्याण केंद्राच्या मैदानात आयोजित करण्यात पुरस्कार वितरण समारंभात अभिनेत्री वृंदा बाळ, ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप देवकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. दुर्योधन भापकर, बाबा कांबळे, मेहबूब लियाकत शेख, मनिष आनंद, प्रदिप जांभळे, (पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, राष्ट्रपती पोलिस पदक विजेते), पूजा आनंद, अरिबा शेख (लंन्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड) यांना पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

          अभिनेत्री निशा मोरे, अभिनेत्री टीना क्षत्रिय, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता टाकवणे, अभिनेत्री, स्नेहल वाल्हेकर, अल्ताफ दादासाहेब शेख (राष्ट्रीय पुरस्कार विजेते, लेखक/ दिग्दर्शक), अभिनेता आनंद बूरूड, जाकिर हूसेन आदींना खडकी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

         कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा कल्याण केंद्राचे अध्यक्ष समीर चौधरी, गणेश कांबळे, अजहर खान, रवि गायकवाड, तनवीर खान, हारुण सय्यद, फिरोज शेख, महेबूब पिरजादे, विजय गायकवाड, आकाश सर्वदे, सईद शेख, लतीफ सत्तार शेख यांनी केले होते.

देशभक्त केशवराव जेधे करंडक वक्तृत्व स्पर्धा शनिवारी

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजन : राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते होऊन स्पर्धेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती स्पर्धा संयोजक आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. दिपाली आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संयोजन समिती सदस्य शिवाजी पाचरणे, प्राध्यापक डॉ. के.डी. गारगोटे, डॉ. अमित गोगावले  उपस्थित होते.डॉ. दिपाली पाटील म्हणाल्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेचे भान आणि जाण निर्माण होण्याच्या हेतूने व युवकांमध्ये वक्तृत्व व नेतृत्व गुण विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे हे प्रथम वर्ष आहे. शुक्रवार पेठेतील समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ही स्पर्धा होईल.

स्पर्धेचे उद्धाटन ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते होणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ५ वाजता उल्हास पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे आणि जेधे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून एका महाविद्यालयातील २ विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धेतील भाषणे मराठीत होतील.

नवीन शैक्षणिक धोरण – माझ्या अपेक्षा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वप्न आणि सत्य, राजर्षी शाहू महाराज ते देशभक्त केशवराव जेधे सत्यशोधकी वसा आणि वारसा संत साहित्य आणि समाज, पर्यावरणातील बदल आणि माझी भूमिका या विषयावर स्पर्धकांना बोलायचे आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ७ हजार, द्वितीय क्रमांकाला ५ हजाराला, तृतीय क्रमांकाला ३ हजार आणि उत्तेजनार्थ क्रमांकाला १ हजार रोख आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी डॉ. शिवाजी पाचारणे  ९८२२६२६७७८, डॉ.दीपक सुरवसे  ८०८७२१७९९९, डॉ.संतोष यादव  ९७६७७९०३९६, प्रा.शितल वाघमारे ९६०४१६७५७१, डॉ.अमित गोगावले ९९२२०७४८४७ या क्रमांकावर संपर्क साधता येतील

बीएमसीसीत ग्रंथप्रदर्शन सुरू


पुणे, दि. ७ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) आजपासून सुरू झालेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखिका लीना सोहोनी यांच्या हस्ते करण्यात आलेे.
सोहोनी म्हणाल्या, ”शिक्षणातून लौकिकार्थाने यश मिळते, ज्ञानातून आत्मिक उन्नत्ती होते. त्यासाठी लहानपणापासून वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक आहे.”
सोहोनी पुढे म्हणाल्या, “युवकांनी साहित्यिक बनले पाहिजे. त्यासाठी विचारांतील सुसूत्रता, ते पटवून देण्याची हातोटी, साधी भाषा, अनुभवातील जीवंतपणा, बहुश्रृतता आणि भरपूर वाचन हे गुण विकसित केले पाहिजेत.”


डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रबंधक डॉ. सविता केळकर, प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, ग्रंथालय प्रमुख डॉ. आसमा बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती. 
येत्या गुरुवारपर्यंत (९ फेब्रुवारी) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांच्या खरेदीवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

‘आरे’ वसाहतीचा कायापालट करण्यासंदर्भात कार्यवाही करावी – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 7 : ‘आरे’ दुग्धवसाहतीतील पडीक जमिनीचा वापरात आणून शासनाला उत्पन्न मिळण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात. तसेच आरे वसाहतीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

गोरेगाव येथील आरे दुग्धवसाहतीसंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री विखे-पाटील बोलत होते. बैठकीला विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त श्रीकांत शिपूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील यांनी आरे येथील राज्य शासनाच्या विविध विभागांना हस्तांतरीत जमिनी आणि तेथे सुरू असलेले प्रकल्प याबाबत आढावा घेतला. ज्या जमिनी पडीक आहेत, त्या संपादित करून शासनास उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. जे तबेले धारक आहेत, त्यांच्याकडून थकबाकी वसूल करावी तसेच डागडुजी व स्वच्छता राहील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. पर्यटन स्थळे, नौका विहार, पिकनिक गार्डन, व्यापारी गाळे, पॅराग्रास ठेका, संरक्षण भिंत, रस्ते या ठिकाणांचे संवर्धन व जतन करून ते पुन्हा सुरू करण्यात यावे. आरे वसाहतीतील जमिनींवर जनतेच्या उपयोगी प्रकल्प सुरू करून त्याचा कायापालट करण्यासाठी उपाययोजना आखून अहवाल तयार करावा, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

गायिका मनीषा निश्चल व सहकाऱ्यांचे सलग सहा तास गायन

प्रथम स्मृतिदिनानिमित्तस्वरस्वती’मधून गानसरस्वती लतादीदींना अभिवादन
पुणे : अमर स्वर लाभलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी सलग तास गायन करत अनोखे अभिवादन करण्यात आले. गायिका मनीषा निश्चल्स महक प्रस्तुत ‘स्वरस्वती’ या हिंदी-मराठी गायन मैफलीतून अजरामर गीतांचा नजराणा पुणेकरांनी अनुभवला. गीतांच्या सादरीकरणासोबतच शिल्पकार सुरेश राऊत यांनी लतादीदींचे लाईव्ह शिल्प साकारत लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, खैय्याम, पं. हृदयनाथ मंगेशकर, गीतकार गुलजार यांच्यासह इतर मान्यवरांनी लतादीदींबद्दल व्यक्त केलेल्या भावनांच्या गफार मोमीन यांनी संकलित केलेल्या ध्वनिचित्रफिती पाहून श्रोते भारावून गेले.
कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात लतादीदींनी गायलेली व संगीतबद्ध केलेली मराठी गाणी ५ ते ८ या वेळेत, तर हिंदी गाणी ९ ते १२ या वेळेत सादर झाली. गायिका मनिषा निश्चल यांच्यासह स्वप्नजा लेले, अंजली मराठे, गायक जितेंद्र अभ्यंकर, गफ़ार मोमिन यांचे बहारदार गायन झाले. प्रसन्न बाम (हार्मोनियम) यांच्या संगीत संयोजनात यश भंडारे (सिंथेसायझर), केदार मोरे (ढोलक), अमित कुंटे (तबला), अभय इंगळे (ड्रमसेट), अजय अत्रे (ऑक्टोपॅड), अनिल करमरकर (सॅक्सोफोन), शैलेश देशपांडे (व्हायोलिन व बासरी), राधिका अंतुरकर (गिटार), समीर सप्रे (अकॉर्डीयन) यांनी वाद्यांची साथसंगत केली. आयन मोमीन यांनी ध्वनिसंयोजन, तर विजय चेन्नूर यांनी प्रकाश व्यवस्था पाहिली.

‘गगन सदन’ने मैफलीची सुरुवात झाल्यानंतर ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘मी डोलकर’, ‘बाई बाई मनमोराचा’, ‘भय इथले संपत नाही’, ‘वारा गाई गाणे’, ‘मज सांग लक्ष्मणा’, ‘वादळ वारा सुटलो गो’ आदी अवीट गाण्यांना श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. मध्यंतरानंतर ‘डौल मोराच्या’, ‘आज गोकुळात रंग खेळतो’, ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’, ‘माझे राणी माझे मोगा’, ‘राजसा जवळी बसा’, माळ्याच्या मळ्यामंदी’, ‘लटपट लटपट तुझं चालणं’ अशा लोकप्रिय गाण्यांनी श्रोत्यांना ठेका धरायला लावला.

हिंदी गाण्याच्या मैफिलीने तर रसिकांवर स्वरवर्षावच झाला. आपल्या मंजुळ आवाजाने मनीषा निश्चल यांनी अजरामर ‘सत्यम शिवम् सुंदरम’ सादर करत उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यानंतर ‘अजीब दास्तान’, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘बेख़ुदी सनम’, ‘एहसान तेरा होगा’, ‘वो चांद खिला’, ‘बंगले के पीछे’, दिल तेरा दिवाना’, ‘यारा सिली सिली’, ‘होठों में ऐसी बात’ या गीतांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. ‘ये दिल और उनकी, निगाहों के साये’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘आजा सनम मधुर’, ‘मेरे नैना सावन भादो’, ‘आज फिर जीने की तमन्ना है’, ‘ना जिया लागेना’, ‘याद किया दिलने’ या आणि अशा बहारदार गीतांनी मैफलीत रंग भरला. ‘चलते चलते यूँ ही क़ोई’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेफलर इंडिया लिमिटेड; संचालक मंडळाच्या नव्या अध्यक्ष श्रीमती सुमिताश्री इरंती

पुणे ७ फेब्रुवारी २०२३: ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रातील आघाडीची पुरवठादार शेफलर इंडिया लिमिटेडने (बीएसई: ५०५७९०, एनएसई: SCHAEFFLER) श्रीमती सुमिताश्री इरंती यांना आपल्या संचालक मंडळाच्या नव्या अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

उद्योगांचे नेतृत्व, तंत्रज्ञान, सल्ला आणि आर्थिक सेवा क्षेत्रात २५ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या श्रीमती सुमिताश्री इरंती यांच्या अनुभव व ज्ञानाचा लाभ या नवीन जबाबदारीमध्ये निश्चितच खूप जास्त होईल.

तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये त्यांनी आजवर अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत, यामध्ये जागतिक सेवा पोर्टफोलिओचे नेतृत्व, सीएक्सओ सहयोग, पीअँडएल ओनरशिप, मोठ्या खात्यांचे व्यवस्थापन, व्यवसायविषयक सल्ला आणि उत्पादन विकास यांचा समावेश आहे. जर्मनी, भारत, यूएसए, युके आणि नेदरलँड्ससह ११ देशांमध्ये राहण्याचा व काम करण्याचा बहु-सांस्कृतिक अनुभव त्यांनी मिळवला आहे.

श्रीमती इरंती २०२० सालापासून शेफलर इंडिया लिमिटेडच्या बोर्डाच्या एक स्वतंत्र संचालक आहेत. त्या अविवा लाईफ इन्श्युरन्स कंपनी इंडिया लिमिटेडमध्ये संचालक मंडळाच्या अध्यक्ष आहेत आणि मंडळ सदस्य म्हणून इतर कंपन्यांशी देखील संबंधित आहेत.

२० वर्षांहून अधिक काळ कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर श्री. अविनाश गांधी सेवानिवृत्त झाले आहेत आणि आता अध्यक्षपदाची जबाबदारी श्रीमती इरंती यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शेफलर इंडियाचा विकास आणि यश यांना सातत्याने पुढे नेत राहण्याच्या संचालक मंडळाच्या मिशनचे नेतृत्व आता श्रीमती इरंती करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नावीन्य आणि उत्कृष्टतेप्रती वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करणे कायम सुरु ठेवावे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

संचालक मंडळाच्या नव्या अध्यक्ष म्हणून श्रीमती इरंती यांची नियुक्ती हा शेफलर इंडियासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनी वैविध्य आणि समावेश यांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे व ही नियुक्ती त्याचेच द्योतक आहे.

श्रीमती सुमिताश्री इरंती यांनी सांगितले, बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी एक खूप मोठा सन्मान आहे. संचालक मंडळाचा विश्वास आणि समर्थन याबद्दल मी त्यांची आभारी आहे. बोर्डाचे प्रतिभावंत सदस्य आणि शेफलर इंडियाची व्यवस्थापन टीम यांच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी खूप मोठा आनंद असेल.”

संचालक मंडळाच्या नव्या अध्यक्ष म्हणून श्रीमती इरंती यांचा नवा दृष्टिकोन व त्यांचे नेतृत्व यासाठी शेफलर इंडिया उत्सुक आहे.

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू

मुंबई, दि. 7 : बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवाचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे आज शुभारंभ झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह पर्यटकांच्या सुविधा मार्गी लागणार असल्याचे बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

मंत्री श्री. भुसे यांनी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोटीतून बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. ही सुविधा कमीत कमी दरात असून वेळेचीही बचत होणार आहे. पूर्वी बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या प्रवासासाठी दीड तास लागत होता. तो आता कमी होऊन 55 मिनिटांपर्यंत आला आहे. या उपक्रमासाठी बंदरे विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्यता दिली आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली मदतही महत्त्वाची ठरली आहे. पुढील कालावधीत गेटवे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लबजवळ नवीन जेट्टी निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवासी बोटीसाठी सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागाच्या पाठिशी असून अशा प्रकल्पांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या  वाहतूक समस्येतून मुक्तता मिळणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. भविष्यात प्रवाशांना आणखी व्यवस्था उभारण्याकरिता ठाणे जवळील ‘रॉक क्रिक’ चा काही भाग तोडल्यास पालघर, वसई, ठाणे, बेलापूर अशी प्रवासी जल वाहतूक उपलब्ध होईल. अशा वेगवेगळ्या योजनांना विभागाच्या वतीने गती देण्यात येत आहे, मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

थोडक्यात वॉटर टॅक्सी विषयी

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हे रस्तामार्गे अंतर ४० कि.मी असून त्या करिता अंदाजे १ तास ४५ मिनिटे इतका अवधी लागतो. परंतु बेलापूर ते गेटवे हे जलमार्ग अंतर २४ कि.मी असून त्याकरिता फक्त एक तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

जेट्टीचे काम हे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत करण्यात आले असून या कामासाठी 8.37 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत 50:50 या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वाहनतळ व इतर सुविधांसाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून 4.35 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या ठिकाणी 75 चार चाकी आणि 85 दुचाकी वाहनाकरिता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मेसर्स नयनतारा शिपिंग प्रा. लि यांचेकडून नयन XI या बोटीद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार दरम्यान बेलापूर – गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे. सकाळी ८.३० वाजता बेलापूर-गेटवे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया -बेलापूर अशा दोन फेऱ्या होणार आहेत. जलवाहतुकीचा प्रवास सर्वसामान्य लोकांकरिता सुलभ, सोईचे व लवकर होण्यासाठी या कंपनीमार्फत सद्यस्थितीत सामान्य बैठकीसाठी रु २५०/- व बिझनेस क्लास करिता रु. ३५०/- इतके तिकीट दर आकारण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सीचे ऑनलाईन बुकीग My Boat Ride या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

1 जानेवारी 2022 पासून नव्याने सुरु झालेल्या जलमार्गावरील फेरी आणि रो-रो बोटीद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच पाळीव प्राणी, वाहन, माल इत्यादीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवासी करात पुढील 3 वर्षासाठी म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत सूट देण्यात आली आहे.

बागवेंची नाराजी दूर करण्यास २ माजी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी,पण ….

पुणे- गेल्या वेळी पक्ष सोडून भाजपात गेलेल्या एका माजी नगरसेवकाच्या पुनर्प्रवेशावरून पुण्यातील कॉंग्रेस पक्षात असलेली गटबाजी समोर आल्यानंतर काल रात्रीपर्यंत दोन माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षातील कुरघोड्या थांबविण्यासाठी पूर्व भागातील एका हॉटेलात बैठका घेतल्या . माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करत कॉंग्रेसमधील शहरातील बडे नेते मानले जाणारे बागवे पिता पुत्रांना ‘त्या’ माजी नगरसेवकाला तूर्तास कुठलाही पदभार देण्यास स्थगिती निर्देश दिल्याचे सांगून त्यांची समजूत काढल्याचे वृत्त आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत बागवे यांचा अगदी अल्पशा मतांनी पराभव झाला होता ,यावेळी कॉंग्रस मधून संबधित नगरसेवकाने भाजपात जाऊन त्यांच्या विरोधात प्रचार केला होता . पक्षाकडून स्थायी समितीचे अध्यक्षपद घेऊन पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना परस्पर प्रवेश कसा दिला जातो यावर हरकत घेत बागवे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली , आणि त्यांच्या पुत्राचा भाजप प्रवेशासाठी काहींनी मार्ग सुकर करण्याचे काम केले . या संदर्भातले वृत्त पसरले आणि काल बागवे पिता पुत्र दोघेही कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अनुपस्थित होते .त्यानंतर जोरदार हालचाली झाल्या आणि २ माजी मुख्यमंत्र्यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन बागवे पिता पुत्रांची नाराजी दूर केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान शहर कॉंग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले कि,’बागवे यांची नाराजी दूर करण्यात आली असून कसब्यात विजयासाठी ते आज उद्या काम सुरु करतील.

प्रत्यक्षात वरवर नाराजी वर पडदा पडल्याचे सांगण्यात येत असले तरी हा तिढा मात्र आतून आहे तसाच असल्याचे दिसते आहे.मात्र किमान कसब्याची निवडणूक पार पडेपर्यंत हि नाराजी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आल्याचे मानले जाते आहे.

काँग्रेसचा अंतर्गत कलह वाढला,बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह वाढला असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड थोपटून मैदानात उतरलेत. नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी

पुणे-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, अशी नाना काटे यांची ओळख आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या नगरसेवक आहेत.

कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांच्याशी आता मविआचे उमेदवार नाना काटे यांची लढत होईल. अश्विनी जगताप या भाजपच्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत.

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठाची सकारात्मक भूमिका

पुणे दि.६-गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर उपस्थित होते.

या बैठकीत पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार करण्यासंदर्भातील‌ प्रस्ताव समोर आला होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणानेही (पुम्टा) मान्यता दिली होती.

सदर कामाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला. यासाठी श्री. पाटील यांनी विद्यापीठ प्रशासन, महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा असे निर्देश या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

तसेच, उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत सदर मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याला विद्यापीठ प्रशासनानेही अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

धंगेकर सोने-चांदीचे कारागीर,संपत्ती 10 कोटींची

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची स्थावर जंगम मालमत्ता ५ कोटी ८८ लाख ९७ हजार १०७ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ८० हजार ६० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ४ कोटी ३५ लाख ३६ हजार ८९२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ३ लाख ५० हजार रुपये इतकी आणि १५ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १० कोटी २४ लाख ३३ हजार ९९९ इतकी आहे.अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. ते स्वतः सोने-चांदीचे कारागिरीचा व्यवसाय करत आहेत. तर त्यांच्या पत्नी या शेती तसेच बांधकाम व्यवसाय करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची विशेष करून दौंड तालुक्यातील पिंपळगाव आणि हवेली तालुक्यातील नांदोशी येथे जवळपास दहा एकर शेतजमीन तर पुणे शहरातील कोथरूड येथे पाच गुंठे जागा आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर अशी दोघांच्या नावे १० एकरहून अधिक जमीन आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे प्रत्येकी एक फ्लॅट देखील आहे.

रवींद्र धंगेकर यांनी आपले वार्षिक उत्पन्न ३ लाख ३६ हजार ९४० रुपये रुपये तर पत्नी प्रतिभा ३ लाख ९८ हजार ४०० रुपये इतके दाखवले आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांच्याकडे एक होंडा ऍक्टिव्हा, एक रॉयल एनफिल्ड अशी एक दुचाकी वाहन आहे.