Home Blog Page 1421

सरकारच्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे २ लाख कुटुंबियांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला -रॅपिडो

...तर शेकडो- हजारो नागरिकांना वाहतुकीचा वाजवी पर्याय आणि मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती

पुणे- १९ जानेवारी २०२३ पासून राज्य सरकारने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे २ लाख रॅपिडो कॅप्टन्स व त्यांच्या कुटुंबीयांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून ,महाराष्ट्र राज्य सरकारने १९ जानेवारी २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान द्यायचे असल्यास भारतीय राज्यघटना अनुच्छेद २२६ अंतर्गत माननीय मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य आम्हाला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये १२ जानेवारी २०२३ रोजी स्थापन केलेल्या समितीने बाइक टॅक्सी धोरण तयार होईपर्यंत अग्रीगेटर सेवांसाठी बिगर-वाहतूक वाहनांचा वापर करण्यास मनाई केली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीला ३१ मार्च २०२३ पर्यंत निर्णय घेण्याची सूचना केली आहे.जर सरकारने प्रगतीशील धोरणानुसार निर्णय घेतला तर ...तर शेकडो- हजारो नागरिकांना वाहतुकीचा वाजवी पर्याय आणि मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल असे रॅपिडो ने म्हटले आहे.

रॅपिडो ने पुढे असे म्हटले आहे कि,’ सर्वोच्च न्यायालयाने आज (७ फेब्रुवारी २०२३) रॅपिडोवरील सुनावणीत आम्हाला (रॅपिडो) महाराष्ट्र राज्य सरकारने १९ जानेवारी २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान द्यायचे असल्यास भारतीय राज्यघटना अनुच्छेद २२६ अंतर्गत माननीय मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

रॅपिडोने आपल्यासमोर असलेल्या कायदेशीर पर्यायांचे मूल्यमापन करणे सुरू ठेवले असून राज्यातील सद्य परिस्थिती आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत वितरणाला चालना देण्याची गरज लक्षात घेता रॅपिडोने राज्य सरकारला या संधीचा उपयोग करून या विषयावर सर्वांगीण दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले आहे. सद्य आणि संभाव्य सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्यासाठी रॅपिडो सध्या अस्तित्वात असलेली मालमत्ता वापरण्यास सुसज्ज आहे. यामुळे १९ जानेवारी २०२३ पासून राज्य सरकारने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे ग्रस्त असलेले २ लाख रॅपिडो कॅप्टन्स व त्यांच्या कुटुंबीयांच्या रोजीरोटीचे रक्षण होईल तसेच समाजातील मोठ्या वर्गासाठी रोजगार निर्मिती होईल. महत्त्वाचे म्हणजे, राज्य सरकारच्या प्रगतीशील धोरणामुळे राज्यातील शेकडो- हजारो नागरिकांना वाहतुकीचा वाजवी पर्याय उपलब्ध होईल.

डॉ. रिता मदनलाल शेटीया यांना अर्थशास्रातील पीएचडी पदवी प्रदान

धनकवडी – येथील डॉ. रिता मदनलाल शेटीया यांना पुणे, गुलटेकडी येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची अर्थशास्र् या विषयातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड ऑफ इंडिया अमंग द ब्रिक्स कन्ट्रीज (२००६ – २०१७) ‘ हा त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. ज्योती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील अर्थशास्र् विभाग प्रमुख डॉ. प्रवीण जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

डॉ. निलेश लिंबोरे , सकाळ इंडिया फाउंडेशन, सी. ए. सुरेश रानडे, आर. बी. आय. च्या सेवानिवृत्त अधिकारी सुहासिनी ताई बिवलकर, निवेदिता माझिरे, डॉ. योगेश कुमार, पदमश्री लीला पुनावाला आणि फिरोझ पूनावाला यांचे सहकार्य लाभले.

वेळोवेळी प्रेरणा, मार्गदर्शन, साहाय्य, सहकार्य आणि खंबीरपणे डॉ. रिता यांच्या पाठीशी उभी राहिली त्यांची आई एच. सी. डॉ. सविता मदनलाल शेटीया आणि त्यांचे स्व. वडील मदनलाल शेटीया यांचे आशीर्वाद या सगळ्यांच्या मार्गदर्शनानेच हा टप्पा मी पार करू शकले. या सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद ! डॉ. रिता यांनी त्यांची हि पीएचडी पदवी त्यांच्या आई – वडिलांना समर्पित केली.

महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने गाठली फायनल; पहिल्यांदा चॅम्पियन होण्याची संधी

उपांत्य सामन्यात हिमाचल प्रदेशवर मात

१२ गुणांनी महाराष्ट्राचा विजय

महाराष्ट्र-हरियाणा फायनल रंगणार

जबलपूर:फार्मात असलेल्या रेडर हरजित, यशिका पुजारी, मनीषा आणि समृद्धी यांनी अप्रतिम खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या फायनल चे तिकीट मिळवून दिले. युवा कर्णधार निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने अंतिम फेरीचा पल्ला गाठला. गत रौप्य पदक विजेत्या महाराष्ट्र महिला संघाने बुधवारी उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेशवर १२ गुणांनी विजयाची नोंद केली. महाराष्ट्र संघाने ४४-३१ अशा फरकाने सेमी फायनल मध्ये एकतर्फी विजय संपादन केला.
या लक्षवेधी कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला दुसऱ्यांदा फायनल मध्ये प्रवेश निश्चित करता आला. मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांचे मार्गदर्शन आणि निकिताच्या कुशल नेतृत्व यातून महाराष्ट्र संघ आता चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी महाराष्ट्राला अंतिम सामन्यात हरियाणा विरुद्ध विजय संपादन करावा लागणार आहे. गुरुवारी हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्यात फायनल रंगणार आहे. सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ फायनल मध्ये समोरासमोर येत आहेत.
राष्ट्रीय खेळाडू हरजीत, यशिका आणि मनीषा यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत महाराष्ट्र संघाला मोठा विजय मिळवून दिला. आक्रमक खेळीतून महाराष्ट्र संघाने पहिल्या हाफ मध्येच आघाडी घेत विजयाचे संकेत दिले. यादरम्यान निकिता, समृद्धी आणि हरजीत यांनी अचूक पकडीतून हिमाचल प्रदेशचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला.


हरियाणाला पराभवाची परतफेड करत चॅम्पियन होणार महाराष्ट्र
महाराष्ट्र महिला संघाला आता किताब जिंकण्याची मोठी संधी आहे. याच सोनेरी यशापासून महाराष्ट्राचा संघ अवघ्या एका पावलावर आहे. आता महाराष्ट्र संघ फायनल मध्ये हरियाणाला नमवून चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी महिला गटाच्या फायनल मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा संघ समोरासमोर असतील. गत सत्रामध्ये हरियाणा संघाने फायनल मध्ये महाराष्ट्राचा पराभव केला होता.
संघाला सोनेरी यश मिळवून देणार: निकिता
महाराष्ट्र संघातील प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करत संघाची किताब जिंकण्याची आशा कायम ठेवली आहे. या दरम्यान रेडर हरजित, यशिका, मनीषा यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे आम्हाला फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवता आला. आता महाराष्ट्र संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे, अशा शब्दात कर्णधार निकिताने आपला निर्धार व्यक्त केला.
डावपेच फत्ते करत गाठली फायनल: प्रशिक्षक गिता साखरे
पहिल्यांदाच चॅम्पियन होण्यासाठी उत्सुक असलेल्या महाराष्ट्र संघाने आखून दिलेले सर्व डावपेच फत्ते केले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीचा पल्ला गाठता आला. उपांत्य सामन्यातील धडाकेबाज विजयाने महाराष्ट्र महिला खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे संघ आता निश्चितपणे किताबाचा बहुमान मिळेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने गाठली सेमीफायनल; यजमान मध्य प्रदेश संघावर १७ गुणांनी विजय

कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे पदक निश्चित; आता सोनेरी यशाकडे वाटचाल

जबलपूर:
फार्मात असलेल्या सुपरस्टार रेडर अजित चौहान, पृथ्वीराज आणि साहिल पाटीलने गत कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाचा पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स सेमी फायनल मधील प्रवेश निश्चित केला. वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र संघाने गटातील शेवटच्या सामन्यात यजमान मध्य प्रदेश संघाला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने ५०-३७ असा तेरा गुणांच्या आघाडीने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह महाराष्ट्र संघाचे स्पर्धेतील पदक निश्चित झाले आहे. मात्र महाराष्ट्र संघ आता सोनेरी यशाचा पल्ला गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. आता महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात सेमी फायनल रंगणार आहे.
महाराष्ट्र पुरुष संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवला. यादरम्यान महाराष्ट्राकडून अजित, पृथ्वीराज आणि साहिल यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे दमदार सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्र संघाने पहिल्या हात मध्येच १३ गुणांची लीड घेतली होती. आपली हीच मोहीम कायम ठेवत महाराष्ट्र संघाने मध्यंतरानंतरही सर्वोत्तम खेळी केली. यातून महाराष्ट्र संघाला धडाकेबाज विजयाची नोंद करता आली.
विजयाच्या प्रयत्नात असलेल्या यजमान मध्य प्रदेश संघाला दादासो पुजारी आणि अनुज गावडे यांनी रोखले. या दोघांनी अचूक पकडी करून यजमानांचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला.

यजमान संघ घरच्या मैदानावर अपयशी
यजमान मध्य प्रदेश संघाचा घरच्या मैदानावर कबड्डीत पदकाचा बहुमान मिळवण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. घरच्या मैदानावरील सुमार कामगिरीमुळे यजमान संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. बलाढ्य महाराष्ट्राच्या सर्वोत्तम खेळीमुळे शेवटपर्यंत मध्यप्रदेश संघाची मोठी दमछाक झाली.

महाराष्ट्र गाठणार फायनल;आज हरियाणा विरुद्ध लढत
गत सत्रातील कांस्यपदक विजेता महाराष्ट्र संघ आता यंदाच्या स्पर्धेत चॅम्पियन होण्यासाठी उत्सुक आहे. सोनेरी यशाचा हाच पडला गाठण्यासाठी महाराष्ट्राचा संघ आज बुधवारी संध्याकाळी मैदानावर उतरणार आहे. यादरम्यान महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात उपांत्य सामना रंगणार आहे. यातील विजयाने महाराष्ट्राला फायनल गाठण्याची संधी आहे.

दणदणीत विजयाने किताबाचा दावा मजबूत: दादासो आव्हाड ( प्रशिक्षक )
महाराष्ट्र संघाने दणदणीत विजय संपादन करून उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यातील महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली.. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्र संघ किताबाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आता उपांत्य सामना जिंकून फायनल गाठण्यासाठी महाराष्ट्र संघाने कंबर कसली आहे. आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आलेले डावपेच यशस्वी करत आहोत. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राला यंदा किताबाचा बहुमान मिळवता येईल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक दादासो आव्हाड यांनी व्यक्त केला.

तळजाईच्या जंगलात बिल्डरची आत्महत्या

पुणे- तळजाईच्या जंगलात एका बिल्डर असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कौस्तुभ सुरेश देशमुख (वय ३३, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काैस्तुभ बांधकाम व्यावसायिक होते. सोमवारी (६ फेब्रुवारी) ते सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडले. तळजाई टेकडीच्या परिसरातील जंगलात मनोरा आहे. मनोऱ्याच्या परिसरातील एका झाडाला कौस्तुभ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पंधरा मिनिटांत घरी येतो, असे सांगून कौस्तुभ घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्री साडेआठपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने मोबाइलवर संपर्क साधला. कौस्तुभ यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, कुटुंबीयांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.सहकारनगर पोलिसांंचे पथक तळजाई परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी मनोऱ्याजवळ एक दुचाकी आढळून आली. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून मालकाचा पत्ता शोधला. तेव्हा घरातून बेपत्ता झालेल्या कौस्तुभ यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. कौस्तुभ यांच्यामागे आई-वडील, पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा आहे. नऱ्हे भागात एका गृहप्रकल्पाचे बांधकाम कौस्तुभ यांच्याकडून करण्यात येत होते.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको, पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्या-उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई-बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आज उद्धव ठाकरे यांनी केली.तसेच, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्यावी, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीरोजी संपुष्टात आला आहे.आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका स्पष्ट केली आणि शिंदे गटावर पुन्हा जोरदार हल्ला चढवला.

उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणा आहे. मी दुसऱ्या शिवसेनेला मानतच नाही. राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्षाचे भवितव्य ठरत असेल तर उद्या कुणीही पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना खरेदी करू शकतो. थेट पक्षावर दावा ठोकू शकतो. यामुळे लोकशाहीचा बाजार होऊ शकतो. निवडणूक आयोगाने असा बाजार होण्यापासून लोकशाहीला वाचवणे गरजेचे आहे.उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने मागणी केली त्याप्रमाणे आम्ही लाखो सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. केवळ गद्दारांनी दावा केला म्हणून पक्ष गोठवू नये. किमान आता तरी घटनेनुसार पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत पक्षप्रमुख हे पद मीच तयार केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून मी या पदावर काम करत आहे. आता जे सोडून गेलेत, त्यांनीच माझी या पदावर निवड केली आहे.

तसेच, शिवसेनेच मुख्य नेता हे पदच नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दावा हा घटनाबाह्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्या पैशांच्या जोरावर अशा पद्धतीने कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. पैशांच्या जोरावर मुख्यमंत्री बनणे चुकीचे आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.

शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेतून फुटल्यानंतर शिंदे गटाने एक तर वेगळा पक्ष बनवायला हवा होता किंवा ईडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी भाजपमध्ये विलीन व्हायला हवे होते. मात्र, शिंदे गटाने यापैकी काहीही केले नाही. नियमानुसार त्यांनी शिवसेनेच्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे आमदार नक्कीच अपात्र ठरतील. तसेच, शिंदे गटाला आता भाजपमध्येही जागा नाही. त्यांची आपापसातच धुसफूस सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटाची स्थिती मध्येच लटकल्यासारखी झाली आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना कुणाची? यावर दिल्लीतील दोन दरबारांत सध्या सुनावणी सुरू आहे. दिल्लीत तसे अनेक दरबार आहेत. मात्र, शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोग या दोन दरबारांत सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार आहे. तर, निवडणूक आयोगापुढील सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मात्र, आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की, आधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ द्यावा. निवडणूक आयोगाने आमच्याविरोधात निकाल दिला आणि नंतर सर्वोच्च न्यायालायने गद्दारांना अपात्र ठरवले तर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल येऊ द्यावा. त्यानंतरच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निकाल द्यावा

उद्धव ठाकरे म्हणाले, एखाद्या पक्षाची घटना म्हणजे साधारण गोष्ट नसते. घटनेला अनन्य साधारण महत्त्व असते. त्यानुसारच पक्ष चालत असतो. शिवसेनेची घटना कित्येक वर्षांपासूनची आहे. शिंदे गटाकडे घटनाच नाही. शिवसेनेच्या घटनेनुसारच शिंदे गटाचे लोक निवडून आले आहेत. त्यानुसारच त्यांना तिकिटांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ते अपात्र ठरले तर शिवसेना पक्ष त्यांच्याकडे कसा काय जाऊ शकतो? यामुळेच निवडणूक आयोगाने आधी अपात्रतेबाबतचा निर्णय येऊ द्यावा, त्यानंतरच धनुष्यबाण कुणाचा? यावर निर्णय द्यावा.

आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसब्याच्या रणांगणात

पुणे-आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांनी कसबा पेठ विधानसभा मधून उमेदवारी अर्ज भरला.उमेदवारीचा अर्ज भरता वेळेस राज्य संघटक विजय कुंभार, मुकुंद किर्दत, अभिजित मोरे, एकनाथ ढोले, सौ. विजया किरण कद्रे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किरण कद्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम आदमी चे अरविंद केजरीवाल यांनी जे काम जनसामान्यांसाठी काम केले आहे तसेच काम कसबा मतदार संघात केले जाईल असे सांगितले”.विजय कुंभार “देशाचे मालक ही जनताच आहे, हेच आमच्या आमदारांच्या कामातून दिसेल. आम्ही पूर्ण ताकतिने प्रचार करणार आहोत, विजय आमचाच निश्चित आहे.आम आदमी पार्टीने ने उच्च शिक्षित, जनसामान्यात वावरणाऱ्या, कसबा विधासभेत ३० वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आर्धी लढाई जिंकली आहे.”

पथारी व्यावसायिकांवरील कारवाई दंडेलशाहीची, थकबाकी भरण्यासाठी अभय योजना राबवा-आबा बागुल

पुणे-पथारी व्यावसायिकांवर होत असलेली कारवाई ही दंडेलशाही प्रकारात बसणारी असून नागरिकांच्या पोट भरण्यासाठी व्यवसाय करण्याच्या मुलभूत हक्कावर गदा आणणारी आहे असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केल आहे , त्याच बरोबर शहरातील पथारी व्यावसायिकांना भाडेपोटी असलेली थकबाकी भरण्यासाठी मिळकतकराच्या धर्तीवर अभय योजना राबवा अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. शहरातील पथारी व्यावसायिकांना दिलासा मिळण्यासाठी अभय योजनेच्या धर्तीवर योजना तयार करावी तोपर्यंत सद्यस्थितीत सुरू असलेली कारवाई थांबवावी अशी मागणीही आबा बागुल यांनी केली आहे.

या संद्रभात आबा बागुल यांनी म्हटले कि,’ सद्यस्थितीत शहरातील पथारी व्यावसायिकांकडे भाडेपोटी असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार कारवाई सुरु आहे. थकबाकी तात्काळ भरा ;अन्यथा स्टॉलला सील असा कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारल्याने शहरातील सुमारे एक लाखाहून अधिक कुटुंबांवर ‘संक्रांत’ आली आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. वास्तविक कोरोना काळात .उदरनिर्वाहाचे साधन बंद असल्याने या पथारी व्यावसायिकांचे मोठे हाल झाले. त्यातून स्टॉलचे भाडे त्यांना भरता आले नाही मात्र आता भाडेपोटी थकबाकी आणि त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी प्रशासनाने पथारी व्यावसायिकांच्या स्टॉलला सील लावण्याची कारवाई सुरु केली आहे,ती अयोग्य आहे. आता कुठे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना थकबाकी आणि त्यावर व्याज वसूल करण्यासाठी पथारी व्यावसायिकांवर होत असलेली कारवाई दंडेलशाही या सदरात मोडणारी आहे. वास्तविक मिळकतधारकांकडील कोट्यवधींची थकबाकी वसूल करताना, ज्या पद्धतीने शास्तीमध्ये सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर पथारी व्यावसायिकांना दिलासा देण्यात यावा यासाठी महानगरपालिकेची अभय योजना या व्यावसायिकांसाठी राबवावी व त्यांना थकीत भाडे हप्त्याने भरण्यासाठी मुदत द्यावी. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माजी उपहापौर आबा बागुल यांनी आयुक्तांकडे केली आहे.

काल डांबरीकरण अन आज रस्ता खोदाई:महापालिकेच्या कारभाराचे तीन तेरा…

पुणे: टिळक रस्त्यावर हिराबाग चौकातच काल डांबरीकरण केलेलाच रस्ता 24 तास पाणीपुरवठा यंत्रणेसाठी आज खोदण्यात आल्याचा प्रकार राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहराध्यक्ष नितीन कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस अभिजीत बारवकर, माहिती अधिकार सेलचे प्रमुख दिनेश खराडे यांनी निदर्शनास आणून देऊन याबद्दल अधिकाऱ्यांचा उपरोधिक सत्कार करण्याचा आज येथे प्रयत्न केला.

याप्रकरणी कदम यांनी सांगितले की ,पुणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर जी 20 परिषदेच्या माध्यमातून डांबरीकरण करण्याचे काम करण्यात आलेले आहे. तसेच पुणे महानगरपालिकेकडून अंदाजपत्रकीय तरतुदी मधून देखील शहरातील प्रमुख रस्ते व नव्याने होणारे डीपी रस्ते यांचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम चालू असते.

पुणे महानगरपालिकेकडून समान पाणीपुरवठा योजनेचे काम शहराच्या जुन्या हद्दीत चालू असून त्याचा कृती आराखडा मान्य झालेला आहे. सदर आराखडा पाणीपुरवठा, पथ, ड्रेनेज विभागाकडील तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडील अभियंते यांच्याकडे असणे अपेक्षित असून प्रत्येक अधिकाऱ्याने आपापल्या कार्यक्षेत्रांतर्गत विकास कामे करताना अथवा निविदा प्रसिद्ध करताना समान पाणीपुरवठा योजनेच्या कामातून कुठे कुठे खोदाई करण्यात येणार आहे, कुठे कुठे खोदाई झालेली आहे याची तंतोतंत माहिती ठेवणे अपेक्षित आहे. परंतु अशाप्रकारे जबाबदारीने महानगरपालिकेकडील अभियंत्यांकडून काम होत नसल्याने पुणेकरांच्या कररुपी पैसा वाया जात असल्याचे उत्तम उदाहरण पथविभागाचे प्रमुख कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिले पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेला टिळक रस्ता हिराबाग चौक येथे काल डांबरीकरण करण्यात आले असून आज सकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदयचे काम समान पाणीपुरवठा योजनेचे चालू करण्यात आले यामुळे पुणेकरांच्या कररुपी पैशाचा नाहक चुराडा प्रशासनामुळे होत आहे या सर्व असे प्रकार शहरात अनेक ठिकाणी चालू असून पुणे महानगरपालिका रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी कोट्यावधींचे टेंडर करते सब सर्व विभागांचे नियोजन व समन्वय करून शहरात कामे केल्यास खुदाई व डांबरीकरणांमध्ये कोठेवधी रुपये वाचून शहरातील अनेक विकास कामांना गती मिळेल ही बाब आम्ही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून त्यांचा सत्कार केलाय .

सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते कला शाखेतील योगदानासाठी प्रा. जी. एस. माजगांवकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पु. ल. देशपांडे कला अकादमी येथेही येणाऱ्या काळात कला प्रदर्शन भरविले जाणार— सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 7: राज्यातील कलाकराना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी येणाऱ्या काळात पु. ल. देशपांडे कला अकादमी येथेही कला प्रदर्शन भरविले जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या 131 व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी द बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, नरेंद्र विचारे, विक्रांत मांजरेकर तसेच जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रा. जी. एस. माजगांवकर, रामदास फुटाणे, चंद्रजीत यादव, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हस्ते कला शाखेतील योगदानासाठी प्रा. जी. एस. माजगांवकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, एकाद्या कलाकाराला आपली कला जहांगीर आर्ट गॅलरी येथे सादर करण्याची संधी मिळावी असे नेहमीच वाटत असते, परंतु या आर्ट गॅलरीमध्ये कला सादर करताना अनेकदा काही वर्षे थांबावे लागते. अशा वेळी कलाकाराचे मनोबल वाढण्यासाठी आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल. पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे कलाप्रदर्शन भरल्यानंतर त्याची स्क्रीनिंग जहांगीर आर्ट गॅलरी येथे करण्यात येईल.

एकाद्या कलाकारासाठी कलेमध्ये आशय, भावना, भाव निर्माण करणे गरजेचे असते. आज महाराष्ट्रातील अनेक कलाकार कला, साहित्य, चित्रकला, संस्कृती यामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. महाराष्ट्रातील या कलाकारानं हक्काचे व्यासपीठ सांस्कृतिक कार्य विभाग उबलब्ध करुन देण्यात येणार आहे जेणेकरुन आपले कलाकार आपली कला सादर करताना, सादरीकरण करताना कुठेही कमी पडणार नाही असेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

बॉम्बे आर्ट सोसायटी गेल्या तीन शतकापासून कलेची सेवा करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोसायटीचे वांद्रे येथील कार्यालयाचे उद्घाटन करताना सांगितले होते, पण मला असे वाटते आर्ट सोसायटी दोन सहस्त्रचंद्रकांत काम करत असून सोसायटीने हे काम असेच सुरु ठेवावे अशी अपेक्षा श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सहजता, कल्पकता आणि सूचकता या गोष्टी कलाकारांनी अवगत करणे महत्त्वाचे

सत्कार स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन करताना माजगावकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले चित्र आज स्वीकारले गेले नाही म्हणून खर्चून न जाता पुढे जात राहणं आवश्यक आहे. काही कळत नाही हे जेव्हा कळते तेव्हाच आपल्याला सगळे कळण्यास सुरुवात होते आणि तेव्हा आपण पुढे जात आहोत असे आपण समजले पाहिजे. आकार, सौंदर्य, प्राविण्य,कलात्मक दृष्टिकोन यामुळेच आपलं कलेमधलं कलामूल्य वाढत असतं. सहजता, कल्पकता आणि सूचकता या तीन गोष्टी कलाकारांनी आपल्यामध्ये अवगत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आजच्या कार्यक्रमादरम्यान एकूण ४८ पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. आजपासून जहांगीर आर्ट गॅलरी येथे 131 वे अखिल भारतीय कला प्रदर्शन भरविण्यात आलेजआहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या चारही दालनांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून भारतभरातून आलेलया चित्राकृती, शिल्पाकृती, मुद्राचित्रे, छायाचित्रे अशा विविध कलाप्रकारांमधील कलाकृती असणार आहेत.
महाराष्ट्रात 134 वर्षे जुनी बॉम्बे आर्ट सोसायटी असून ही सोसायटी सातत्याने कलाविषयक उपक्रम राबवते याचा आनंद आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने वांद्रे येथे दिलेल्या जमिनीवर बॉम्बे आर्ट सोसायटीने बनविलेल्या भव्यसंकुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये केले होते.

राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश’उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील


मुंबई, दि.७ राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.
अमरावती जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली.


राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनाने यापुर्वीच घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून या विद्यापीठाच्या कामाला गती यावी, यासाठी समिती गठीत करण्यात येईल.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

यावेळी माजी राज्यमंत्री आमदार बच्चूभाऊ कडू ,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

१८,१९ फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये होणार पहिले बालनाट्य संमेलन! सुबोध भावे, सई लोकूर यांची संमेलनासाठी खास उपस्थिती!!

मुंबई-‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य संमेलनाला लाभले आहे. सदर संमेलनासाठी बेळगाव मधील २५ ते ३० शाळांमधील प्रत्येकी १५ मुले, याप्रमाणे एकूण ३०० मुलांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाला लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे, लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित, संमेलनाध्यक्षा माननीय मीना नाईक यांसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याचे बालरंगभूमी अभियान, मुंबईच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी कळविले आहे.

खूप पूर्वी बेळगावमध्ये असलेल्या दमदार नाट्य संस्कृतीला नव्याने तजेला आणण्यासाठी ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ संस्था प्रयत्नशील आहे. शनिवार १८ फेब्रुवारी रोजी दुपारी नाट्यदिंडीने संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. उद्घाटन समारंभ संपन्न झाला की बेळगावच्या कलाकारांचा सहभाग असलेली दोन बालनाट्य शिबिरार्थींसाठी सादर करण्यात येतील. रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत बालरंगभूमी अभियानसाठी काम करणारे, मुंबई – पुण्यातील तज्ञ सदर तीनशे मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा घेतील. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेतून येणाऱ्या शिक्षक आणि पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रासाठी महाराष्ट्रातून राज्य नाट्य स्पर्धेला बक्षीस मिळवलेल्या तीन नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. संमेलन बेळगाव येथे घेण्यामागे आयोजकांचा बेळगावच्या मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये सभाधिटपणा यावा, हा उद्देश आहे. रविवारी संध्याकाळी संमेलनाची सांगता होणार आहे. बेळगाव सारख्या ठिकाणी मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, आणि ती तिथं टिकावी या साठी इथल्या अनेक संस्था प्रयत्न करीत असतात. मराठी कला संस्कृतीचं जतन व्हावं याकरिता विविध कार्यक्रमांचे संमेलनांचे अयोज़न केले जाते.

‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असून, संस्थेने आत्तापर्यंत बाल रंगभूमीच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. बालनाट्याचे विषय, सादरीकरण, इतर तांत्रिक बाबी कशा असाव्यात याच्याबद्दल संस्था आग्रही असून, संस्थेच्या सभासदांनी यासंदर्भात वेगवेगळ्या गावात जाऊन मोफत कार्यशाळा घेतली आहे. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या बाल राज्य नाट्य स्पर्धेमधील विषय आणि त्याची मांडणी कशी असावी, यासंदर्भातली एक कार्यशाळा शासनाच्या मदतीने संस्थेने घेतली आहे. मुंबई, महाराष्ट्रासह बेळगाव, कारवारमध्ये अनेक वर्ष ही संस्था सांस्कृतिक, नाट्य चळवळीचे’ विपुल कार्य करीत आहे. १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगाव ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करून ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ने एक डौलदार पाऊल पुढे टाकले आहे.

हे संमेलन या तीनशे मुलांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था संमेलन स्थळी करण्यात आलेली आहे. संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा माननीय मीना नाईक, ज्यांना नुकताच मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे, त्या स्वतः दोन्ही दिवस संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. बेळगावच्या प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बेळगावमधील नाटकातून केली आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वांचे लाडके आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बेळगावचे आणखीन एक प्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्लॅलम मध्ये जान्हवीला ब्रॉंझपदक

खारगांव –महाराष्ट्राला नवख्या असणाऱ्या स्लॅलम (कयाकिंग) या क्रीडा प्रकारात अमरावतीच्या जान्हवी राईकवारने मंगळवारी ब्रॉंझपदकाची कमाई केली. या स्पर्धा प्रकाराचा खेलो इंडिया स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आला असून, महाराष्ट्रानेही अगदी ऐनवेळी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला. मुळ अमरावतीची असली, तरी भोपाळ येथे सराव करणाऱ्या जान्हवीने याच सरावाचा आपल्याला फायदा झाल्याचे सांगितले. पदार्पणातच पदकाला गवसणी घातल्याने आनंद झाला आहे. आता या खेळात अधिक प्रगती करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे तिने सांगितले. 


“महाराष्ट्राने सहा महिन्याच्या अल्पशा तयारीनंतर पहिल्याच स्पर्धेत ब्रॉंझपदकापर्यंत मजल मारली. महाराष्ट्राकडे गुणवत्ता भरपूर आहे. पण, या खेळासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आणि सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे”, अशी प्रतिक्रिया जान्हवीच्या प्रशिक्षक पूजा पडोळे यांनी व्यक्त केली. 
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पात्रात सरावासाठी चांगली जागा असूनही केवळ सुविधे अभावी आपल्याला बाहेर जावे लागत आहे. जान्हवी याचे उत्तम उदाहरण आहे. सहा महिन्यापूर्वी तिने सरावाला सुरुवात केली. स्पर्धापूर्व तयारीसाठी एक महिना जान्हवीला भोपाळमध्ये जावे लागले. स्पर्धाही भोपाळमध्येच असल्यामुळे येथिल सरावाचा फायदा झाला, असेही प्रशिक्षक पूजा म्हणाल्या. कॅनॉइंग आणि कयाकिंग हा खेळ साहसी असून सर्वाधिक प्रमाणात पर्वतराजीत जास्त खेळला जातो. पण, आता महाराष्ट्रातही हा खेळ खेळला जाऊ शकतो. मर्यादित सुविधेतही महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचे येथे कौतुक झाले. या सुविधांमध्ये वाढ झाल्यास आणि चांगले प्रशिक्षण मिळाल्यास आपले खेळाडू भविष्यात नक्कीच पदकाचा रंग बदलू शकतील, असा विश्वासही पूजा यांनी व्यक्त केला.

खुल्या बाजारातून उभारलेल्या महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची ६ मार्चला परतफेड

मुंबई, दि. ७ : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.62 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची 6 मार्च 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. या कर्जात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना कर्जाची परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी कळविले आहे.

या कर्जाची अदत्त शिल्लक रकमेची दिनांक 5 मार्च 2023 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दिनांक 6 मार्च 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. “परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 6 मार्च 2023 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.62 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस “प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील असे वित्तीय सुधारणा विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा

मुंबई, दि. ७ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठविण्यास २ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील’, अशी सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी रा. पाटील यांनी दिली आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पाठविता येणार होत्या. मात्र, या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली असून आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक २ मार्च २०२३ असा आहे.

२ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये गतवर्षीच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारांसाठी पुस्तके सादर करता येतील, अशी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित नियमाची अंमलबजावणी सन २०२२ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेपासून करण्यात येत आहे. या योजनेची सन २०२२ च्या पुरस्कार स्पर्धेसाठीची सुधारित नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयात उपलब्ध आहेत, असेही सचिव श्रीमती पाटील यांनी म्हटले आहे.