Home Blog Page 1419

सिम्बॉयसिस विद्यापीठाचा तिसरा पदवीदान समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाने काम करावे- राज्यपाल

पुणे, दि.९ : प्रत्येक क्षेत्रात सराव आणि अभ्यासाने माणूस परिपूर्ण बनत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता आत्मविश्वासाने काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

किवळे येथील सिम्बॉयसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाच्या तिसऱ्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस.बी. मुजुमदार, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सचे अध्यक्ष राजेश खत्री, विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार आणि प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिउरकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, शासन कौशल्य विकासासाठी अनेक योजना राबवत आहे आणि त्यासाठी सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालय स्थापित करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत स्वावलंबी बनेल.

केवळ महत्वाकांक्षा बाळगून यशस्वी होता येत नाही तर श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने परिश्रम करण्याची गरज असते. हे गुणच स्नातकांना यशाच्या शिखरावर पोहोचवतील. विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यापीठाचा लौकीक उंचावेल असे काम विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आजची पिढी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून कुलपती डॉ.मुजूमदार म्हणाले, तरुणांना पुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्य आवश्यक आहे हे ओळखून सिम्बॉयसिस संस्थेने पहिले कौशल्य विकास विद्यापीठ सुरु केले. या विद्यापीठातून बाहेर पडणारा विद्यार्थी आत्मविश्वास सोबत घेवून यशस्वी उद्योजक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजेश खत्री यांनी फियाट- सिम्बॉयसिस या उपक्रमातील अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मुलींचे अभिनंदन केले. फियाट इंडिया आणि सिम्बॉयसिस विद्यापीठ यांच्यातील हा संयुक्त प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींना उत्पादन क्षेत्रात प्रशिक्षण घेण्याची संधी देतो, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठातील कौशल्ये आत्मसात करून यशस्वीपणे करियर सुरु करणाऱ्या स्वप्नील मखरे आणि स्वाती पांचाळ या विद्यार्थ्यांना कुशल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समारंभाला विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठी-मंत्री सुधीर मुनगंटीवार

ओंकारेश्वराच्या दर्शनाने महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पुणे दि. ९ : विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला आहे, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठीआहे. हेमंत रासने यांचा लढा सत्य आणि विकासासाठी आहे.जनतेच्या सेवेच्या संकल्पनेतून काम करणार्‍या भाजपला विजयी करा असे प्रतिपादन येथे राज्याचे वनमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांनी केले.

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ओमकारेश्‍वर मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आला झाला. त्यानंतर शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ या परिसरात पदयात्रा काढण्यात आली.

निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ, शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष भरत लगड, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, चिटणीस धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, प्रदेश प्रवक्ता कुणाल टिळक, गौरव बापट, शहर भाजप सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, माजी नगरसेवक गायत्री खडके, अजय खेडेकर, योगेश समेळ, आरती कोंढरे, कसबा भाजपचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस छगन बुलाखे, राणी सोनावणे, राजेंद्र काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले कि,’१९७८ सालापासून एखाद-दुसरा अपवाद वगळला तर कसबा मतदारसंघातील मतदारांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे.सत्य, धर्म, देश, विकासासाठी काम करणार्‍या विचारांचा विजय झाला आहे.
विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला आहे, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठी आहे.हेमंत रासने यांचा लढा सत्य आणि विकासासाठी आहे.केंद्र आणि राज्यात भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार आहे.कसब्यातील मतदारांना आवाहन आहे जनतेच्या सेवेच्या संकल्पनेतून काम करणार्‍या भाजपला विजयी करा.

पुणे देशातील सर्वोत्तम शहर करण्याचे स्वप्न साकार करू -रासने
हेमंत रासने यावेळी म्हणाले,’आजपासून आमचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा शुभारंभ आम्ही करत आहोत.हा शुभारंभ विक्रमी विजयाकडे घेऊन जाणारा आहे.कसबा विधानसभा निवडणुकीत विजय १०० टक्के निश्‍चितआम्हाला कधीच कोणाची भीती वाटत नाही.जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते त्याबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही घर आणि घर पिंजून काढणार आहोत.आम्ही केलेल्या विकासाचा अजेंडा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशात, राज्यात आणि शहरात विकास करीत आहोत.पुढील ५० वर्षांतील पुणे शहर हे देशातील सर्वोत्तम शहर करण्याचे देवेंद्रजींचे स्वप्न आहे. या स्वप्नाला पुणेकरांची साथ आहे आणि आम्ही ते पूर्ण करू हा मला विश्‍वास आहे

शेतकऱ्यांसाठी महावितरणने सव्वादोन महिन्यांत २८ हजारांवर नादुरुस्त रोहीत्र बदलले

उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्या आदेशानुसार आजवरची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे नादुरुस्त झालेले वितरण रोहीत्र तात्काळ बदलून देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची महावितरणने चोख अंमलबजावणी करीत गेल्या सव्वादोन महिन्यांमध्ये राज्यभरात तब्बल २८ हजार ४३० नादुरुस्त रोहीत्र बदलण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सद्यस्थितीत गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेले ३३९ रोहित्र देखील तात्काळ बदलण्यात येत आहेत. नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ बदलून मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी यंदा राज्य शासनाकडून मोठे पाठबळ मिळाले आहे.

रब्बीच्या हंगामात शेतपिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र ताबडतोब बदलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले. त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी विविध बैठकींद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्र तात्काळ बदलण्याची सक्त सूचना केली. तसेच रोहीत्र दुरुस्तीच्या प्रक्रियेला व ऑईलच्या उपलब्धतेला वेग दिला. यासह महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी राज्यभर दौरे करून आढावा घेत सर्व परिमंडलामध्ये नादुरुस्त रोहीत्र बदलण्याच्या कार्यवाहीला आणखी वेग दिला. याची फलनिष्पती म्हणून यंदा महावितरणने आजवरची ऐतिहासिक कामगिरी केली आहे व गेल्या डिसेंबरमध्ये १७ हजार ७८५, जानेवारीमध्ये ८ हजार ४०४ व ८ फेब्रुवारीपर्यंत २ हजार २४१ असे एकूण २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्र केवळ दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत बदलले आहेत.

राज्यात कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे महावितरणचे एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहीत्र आहेत. विशेष म्हणजे नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या मोहिमेमुळे गेल्या सव्वा दोन महिन्यांमध्ये नादुरुस्त रोहित्रांचे प्रतिदिवस प्रमाण केवळ ३२० ते ३२५ वर आले आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे राज्यात दररोज सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहित्र बदलणे शिल्लक राहत असल्याची स्थिती होती. सद्यस्थितीत महावितरणकडे ऑईलसह सुस्थितीतील ४ हजार ३१२ रोहित्र उपलब्ध आहेत. तर राज्यात विविध ठिकाणी १९३४ कंत्रांटदार एजन्सीकडे आणखी ११ हजार ६५६ रोहित्रांची दुरुस्ती वेगाने सुरु आहे.

गेल्या सव्वादोन महिन्यांमध्ये नादुरुस्त झालेले २८ हजार ४३० रोहित्र बदलण्यात आले त्यामध्ये औरंगाबाद परिमंडल- १८७४, लातूर- ३५४८, नांदेड- २८९३, अकोला- ३४३९, अमरावती- १८७३, नागपूर- २०३, गोंदिया- ६२१, चंद्रपूर- ४६०, बारामती- ४०८६, कोल्हापूर- १४१४, पुणे- ५८६, जळगाव- २४०३, नाशिक- ४७१९, कल्याण- ९८, कोकण-१७५ आणि भांडूप परिमंडलातील ३८ रोहित्रांचा समावेश आहे.

नादुरुस्त झालेले रोहीत्र बदलण्यासाठी नवीन रोहित्राची वाहतूक व बदलण्याची कार्यवाही याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरणची आहे. त्यामुळे शेतकरी बांधव किंवा संबंधित वीजग्राहकांना त्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च करण्याची गरज नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती शेतकरी बांधवांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरु असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

आजपर्यंत भाजपाने नागरिकांची फसवूणकच केली- आमदार संग्राम थोपटे

श्री तांबडी जोगेश्वरी देवीची ओटी भरुन प्रचाराचा शुभारंभ !

पुणे :  आजपर्यंत भाजपाने नागरिकांची फसवूणकच केली आहे. आता त्यांच्या फसवणूकीला नागरिक बळी पडणार नाही असे प्रतिपादन कॉंग्रेस पक्षाचे आमदार व निरीक्षिक संग्राम थोपटे यांनी येथे केले.महाविकास आघाडीचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, समविचारी पक्ष-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र हेमराज धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी देवीला खण, नारळाची ओटी भरुन गुरुवारी करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे निरीक्षक व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रशांत जगताप, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे  आणि गजानन थरकुडे,  माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी राज्य मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार रमेश बागवे, माजी आमदार महादेव बाबर, माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, काँग्रेसचे डॉ.रोहित टिळक, माजी महापौर कमल व्यवहारे व रजनी त्रिभुवन,  माजी उपमहापौर आबा बागुल व दीपक मानकर,  लता राजगुरू, रफीक शेख, पल्लवी जावळे, दत्ता सागरे,  संजय बालगुडे, विरेंद्र किराड, प्रशांत बधे, प्रवीण करपे, गणेश नलवडे, संदीप गायकवाड, बाळासाहेब मारणे, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व  कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी थोपटे म्हणाले की, महाविकास आघाडीचा मोठा पाठींबा व नागरिकांचा प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना आहे. त्यामुळे आमची विजयाची घौडदौड सुरु झाली आहे. नागरिकांचे मत विकास करणार्‍या महाविकास आघाडीलाच असणार असल्यामुळे धंगेकर यांचा विजय निश्चित आहे.महाविकास आघाडीचा विजय निश्तिच आहे. नागरिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या नाकर्तेपणाला नागरिक कंटाळले आहेत. 

कसब्यामध्ये परिवर्तनाचे वारे

नागरिकांना आता मतदारसंघाचा विकास हवा आहे. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने बरोबर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित होणार आहे. कसब्यामध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असून निकालाच्या दिवशी याची प्रचीती येईल असे, रविंद्र धंगेकर म्हणाले. कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावणारी ही पदयात्रा केसरीवाडा येथे पूर्ण झाली.

 धंगेकर यांच्या प्रचाराला गुरुवारी ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. यावेळी ग्रामदेवता  जोगेश्वरी देवीला खण-नारळाची ओटी भरुन रविंद्र धंगेकर यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी जमलेल्या महिलांनी धंगेकर यांचे औक्षण केले. “विजय कोणाचा महाविकास आघाडीचा”,” कसब्यात आवाज कोणाचा महाविकास आघाडीचा”, “आला रे आला पंजा आला” या घोषणा दिल्या गेल्या . फटाक्याची आतषबाजी…बँडपथकाच्या निनाद अशा वातावरणात तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून सुरु झालेल्या फेरीमध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद  दिला.पुढे मेहुणपुरा येथील सोसायट्यामध्ये महिलांनी रविंद्र धंगेकर यांचे औक्षण केले. अप्पा बळवंत चौक,  मेहुणपुरा रस्ता, अहिल्याबाई चौक, शिंदेपार चौकासह ठिकठिकाणी रविंद्र धंगेकर यांचे स्वागत व महिलांनी औक्षण व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले.  प्रत्येकाच्या हातात  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच समविचारी संघटनेचे व सर्व आघाडीचे ध्वज हाती होते.

अहिल्याबाई होळकर चौक, गणेश मंडळ,  श्री मारुती शनी मंदिर,  शनिवारपेठ मेहूनपुरा गणेश मंडळा च्या श्रीचें दर्शन घेतले. तसेच मंडळीने स्वागत केले. प्रचार फेरी श्री तांबडी जोगेश्वरी पासून अप्पा बळवंत चौक मार्गे मेहुणपुरा- शनिवार पेठ,  अहिल्याबाई होळकर चौक, रामशास्त्री प्रभुणे चौक, शिंदेपार चौक, रमणबाग चौक ते केसरीवाडा येथे फेरीचा समारोप झाला. प्रसंगी मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यहा के हम सिकंदर…कोल्हापूरच्या पूजाला रौप्य पदक; महाराष्ट्राला रोड रेस मध्ये चॅम्पियनशिप

संघाने जिंकले १ सुवर्ण,२ रौप्य पदके

पूजाच्या नावे सहा पदकांची नोंद

जबलपूर :कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजा दानोळेने आपले वर्चस्व आबाधित ठेवत पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये पदकाचा षटकार नोंदवला. तिने गुरुवारी जबलपूर येथे आयोजित रोडच्या ६० किमी अंतराच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी धडक मारली. पूजाने ही रेस २ तास १३ मिनिट ४८.९४१ सेकंदात हे अंतर पूर्ण केले. त्यामुळे तिला या इव्हेंटमध्ये रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. तिने गोल्डन हॅट्रिकसह दोन रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली. पूजाच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला सायकल रोड रेस मध्ये चॅम्पियनशिप देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र महिला संघाने रोड रेस सायकलिंग स्पर्धेचा समारोप रौप्य पदक जिंकून साजरा केला. या स्पर्धेत महाराष्ट्राला एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा बहुमान मिळवता आला

महाराष्ट्र संघाचे डझनभर पदके
आंतरराष्ट्रीय पूजाच्या नेतृत्वात महाराष्ट्र सायकलींग संघाने यंदाच्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये डझनभर पदकांची कमाई केली. यामध्ये एकट्या पूजाने अर्ध्या डझन पदकांचे योगदान दिले. महाराष्ट्र संघाने सायकलिंग स्पर्धेत ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्य पदकाची कमाई केली आहे.

मेहनतीमुळे मिळाला मोठा बहुमान: प्रशिक्षक दिपाली पाटील
राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी प्रचंड मेहनत केली. जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर खेळाडूंनी पदकांचा पल्ला गाठला. त्यामुळे निश्चितपणे त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. चॅम्पियनशिप चा बहुमान मिळवून या खेळाडूने महाराष्ट्राच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी केली आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दिपाली निकम यांनी खेळाडूंचे खास कौतुक केले.

महाराष्ट्राचे घवघवीत यश: चंद्रकांत कांबळे
दिल्ली मधील आंतरराष्ट्रीय सायकलिंग ट्रॅक आणि मध्य प्रदेशातील रोड रेस गाजवत महाराष्ट्राच्या युवा सायकलिस्टने यंदाच्या खेलो इंडिया युथ गेम मध्ये घवघवीत सोनेरी यश संपादन केले. डझनभर पदके जिंकून महाराष्ट्र संघ चॅम्पियनशिप चा मानकरी ठरला, ही राज्यासाठी गौरवशाली बाब ठरली आहे. यादरम्यान संघातील प्रत्येक खेळाडूने प्रचंड मेहनतीच्या बळावर महाराष्ट्राला हा मोठा बहुमान मिळवून दिला. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कौतुकाचे मानकरी आहेत, अशा शब्दात महाराष्ट्र संघाचे मुख्य पथक प्रमुख सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी संघावर कौतुकाचा वर्ष केला.

चॅम्पियनशिपने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा: दिवसे
मेहनत आणि प्रचंड जिद्द यातून महाराष्ट्राच्या युवा सायकलिस्टने यंदा सर्वोत्तम कामगिरी केली. सायकलिंग मधील सर्वसाधारण विजेतेपद मिळवून या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे हे सर्व पदक विजेते खेळाडू निश्चितपणे कौतुकास पात्र ठरत आहेत. याच दर्जेदार कामगिरीमुळे जागतिक स्तरावर हे खेळाडू निश्चितपणे महाराष्ट्राला मोठी ओळख मिळवून देतील, असा विश्वास क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र सायकलिंग संघाचे खास कौतुकही केले.

दाभेकर यांच्या माघारीमागील रात्रीच्या घडामोडी..सांगितल्या अंकुश काकडेंनी…

पुणे- कालपर्यंत ,’ कार्यकर्त्याच्या निष्ठेला किंमत आहे कि नाही ? असा सवाल करणाऱ्या कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज उमेदवारी मागे घेतल्यावर राष्ट्रवादीच्या अंकुश काकडे यांनी समाज माध्यमांवरून ‘दाभेकर यांच्या माघारी मागील रात्रीच्या घडामोडी‘ माध्यम प्रतिनिधींशी शेअर केल्या आहेत.ज्यात काही फोटो आणि..हकीकत त्यांनी कथन केली आहे…ते वाचा त्यांच्याच शब्दात…

श्री बाळासाहेब दाभेकर उमेदवारी अर्ज मागे घेण्यामधील अनेक नाट्यपूर्ण घडामोडी : कसबा विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार श्री बाळासाहेब दाभेकर यांनी निवडणूक अर्ज भरला होता. सदरचा अर्ज त्यांनी मागे घ्यावा यासाठी अनेक काँग्रेस नेते विनंती करीत होते. आज सकाळी 11 वाजता शिवसेनेचे श्री विशाल धनवडे, राष्ट्रवादी चे श्री अंकुश काकडे, श्री श्रीकांत शिरोळे यांनी दाभेकरांची भेट घेऊन त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली, ते आपल्या उमेदवारीवर ठाम होते. दुपारी 4 वाजता या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे प्रभारी आमदार श्री संग्राम थोपटे, श्री अरविंद शिंदे, श्री अभय छाजेड, सौ कमल व्यवहारे, श्री अजित दरेकर यांनी बाळासाहेब यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली, त्यावेळी राष्ट्रवादीचे श्री अंकुश काकडे यांना देखील तेथे बोलून घेण्यात आले, यावेळी बाळासाहेबांना सर्वांनी विनंती केली की आपण माघार घ्यावी, पक्ष आपल्यावरील अन्याय निश्चित दूर करेल, परंतु बाळासाहेबांनी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले. रात्री 11 वाजता आमदार श्री संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते श्री अंकुश काकडे यांनी बाळासाहेबांच्या कार्यालयात त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, आणि तेथूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्याशी श्री थोपटे, श्री धाबेकर आणि श्री काकडे यांनी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली, आणि त्यानंतर नाना पटोले यांच्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला, याच दरम्यान ही बैठक होत असतानाच भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघातील प्रभारी आमदार श्रीमती माधुरी मिसाळ आणि सभागृह नेते श्री गणेश बिडकर दाभेकरांना भेटायला आले होते, त्यांना श्री दाभेकर यांनी स्पष्ट सांगितले की मी काँग्रेसचा आहे. मी काँग्रेस पासून दूर जाऊ शकत नाही त्यानंतर या सर्वांच्या समवेत झालेल्या हास्य विनोदात मिसाळ आणि बिडकर यांना प्रेमाचा निरोप देण्यात आला.(अर्थात हे दोघे दाभेकरांना अर्ज मागे घेण्यासाठी सांगण्यासाठी आले होते की आणखी काय होते हे मात्र समजू शकले नाही)

दुष्काळग्रस्त भागातील अर्चना महादेवची मोठ्या पडद्यावर उतुंग भरारी  

घोडा आणि मसुटा चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत

एकांकिका, नाटक, लघुपट अशा प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण खूप कमी कलाकारांच्या नशिबी तो क्षण येतो. नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यांतून आलेल्या अर्चना महादेव या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या वाट्याला मात्र हे भाग्य आले आहे. खडतर परिस्थितीवर मात करीत तिने जिद्दीने हे यश खेचून आणलं आहे. तिची मुख्य भूमिका असलेले आणि अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेले ‘घोडा’ आणि ‘मसुटा’ हे दोन चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळप्रवण भागात असलेल्या जामगाव या खेड्याची ओळख महादाजी शिंदे यांच्या वाड्यामुळे आहे. याच गावची अर्चना महादेव…. बालपणीच पितृछत्र हरवलेल्या अर्चनाचा सांभाळ आईने शिवणकाम करत केला. आईच्या कष्टाचे चीज करणाऱ्या अर्चनाने आजवर अनेक एकांकिका, नाटके आणि लघुपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. तसेच तिने पडद्यामागे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन विभागातही आपल्या कामाचा अमिट ठसा उमटवला आहे. 

आजवरचा संघर्षमय प्रवास आणि आगामी दोन चित्रपटातील मुख्य भूमिकेत झळकण्याबद्दल बोलताना अर्चना महादेव म्हणाली, आपल्याला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची असेल तर आपण गूगल वर शोधतो. पण एखादी भूमिका करायची असेल तर अभिनय करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीच्या लोकांचा अभ्यास हा त्यांच्यासोबतच राहून करावा लागतो.साहजिकच त्यासाठी निरीक्षण ही फार महत्वाच असत. दोन्ही फ़िल्म मधील माझ्या भूमिका या फार वेगळ्या आहेत. मात्र, जन्म गावचा असल्यामुळे खऱ्या जीवनात वाट्याला आलेला संघर्ष या भूमिका करताना खुप महत्वाचा ठरला.

अर्चना महादेवची मुख्य भूमिका असलेल्या  ‘घोडा’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘बेस्ट ज्यूरी अवॉर्ड’  तर ‘मसुटा’ या चित्रपटाला  विविध महोत्सव, पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळाली आहे.

(शरद लोणकर )

गृहमंत्री फडणवीसांची पोलीस दलावर पकड नाही; गुन्हेगारांची हिम्मत वाढली- नाना पटोले

मुंबई , दि. 9 फेब्रुवारी
काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. पटोले पुढे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारच खुलेआम दादागिरी करत आहेत, हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते, गोळीबार केला जातो पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींची सुरक्षा काढून घेतल्या आहेत. लोकप्रतिनिधींना लोकांमध्ये जावे लागते, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, विविध कार्यक्रमासाठी त्यांना जनतेमध्ये फिरावे लगते, पण असे हल्ले होत असतील तर लोकप्रतिनीधींनी काम कसे करायचे ? पोलीस दल व इतर सरकारी यंत्रणा काय फक्त विरोधी पक्षांच्या नेते व लोकप्रतिनीधींवर कारवाई करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत आहे का ? एका महिला लोकप्रतिनिधीवर हल्ला झाला तरी राज्याच्या गृहमंत्र्याची एका वाक्याची प्रतिक्रियाही आली नाही हे असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे.

आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा गावात हल्ला करण्यात आला. दोन दिवसाआधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौ-यात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. असे प्रकार वाढत असून गुन्हेगारांवर या सरकारचा वचकच राहिलेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली असून केवळ सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा पुरविली जात आहे. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे, त्याचे जंगलराज करू नका. आ. प्रज्ञा सातव यांच्या पाठीशी प्रदेश काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींवर पुन्हा हल्ला होणार नाहीत यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावी व आमदार डॉ प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील मास्टरमाईंड ला तातडीने अटक करून अद्दल घडवा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या निष्ठेला किंमत आहे कि नाही ? समजूत काढायला आलेल्या पदाधिकाऱ्यांना दाभेकरांचा सवाल

अखेरीस बंड शमलं… दाभेकरांची उमेदवारी मागे ….

पुणे- सत्ता आणि निव्वळ सत्ता हे समीकरण न ठेवता ४०/४० वर्षे पक्षात राहून कसलीही अपेक्षा न बाळगता काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेला पक्षात काही किंमत आहे कि नाही ? असा सवाल कॉंग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी काल उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मनधरणीसाठी आलेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केला आणि साऱ्यांना अवाक केले ,, आणि आज मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज घेऊन अनेकांना धक्का दिला.

महाविकास आघाडीतर्फे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक रवींद्र धगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता .दाभेकर यांच्यामुळे महाविकास आघाडीतील काही मते त्यांना जाऊन अधिकृत उमेदवारास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे दाभेकर यांना महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा द्यावा आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे. मात्र, बाळासाहेब दाभेकर यांनी आपण सक्षम उमेदवार असताना आपणास नेत्यांनी जाणीवपूर्वक डावलण्यात आले त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण अपक्ष निवडणूक लढत असल्याचे संबंधित शिष्टमंडळास सांगितले होते.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आदेशानुसार पुणे शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांच्या मनधरणीसाठी त्यांच्या कार्यालयात भेट देऊन काल बुधवारी सविस्तर चर्चा केली. निरीक्षक आमदार संग्राम थोपटे, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती धनंजय वाडकर,प्रदेश कमिटी प्रतींनिधी अभय छाजेड,प्रदेश कमिटी प्रतिनिधी कमल व्यवहारे,माजी नगरसेवक अजित दरेकर,माजी नगरसेवक रफिक शेख,,मेहबूब नादफ यांनी बाळासाहेब दाभेकर यांची भेट घेतली.महाविकास आघाडीचे मित्र पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे,माजी उपमहापौर दीपक मानकर,माजी स्थायी समितीअध्यक्ष बाळासाहेब बोडके,शिवसेनेचे विशाल धनवडे,तसेच बाळासाहेब दाभेकर यांचे निकटवर्तीय राजाभाऊ पंडित,महेश वाघ प्रमोद घाडगे,अनिल पायगुडे,संजय उभे विशाल गुंड नितिन परदेशी,निरंजन दाभेकर कालच्या चर्चेच्या वेळी उपस्थित होते.

आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर दाभेकर यांनी पत्रकार परिषद बोलाविली आहे, पण आता माघार घेतल्यावर काय बोलणार ? असा प्रश्न उपस्थित होत होता .

जादुटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती वाढवावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या सूचना

नागपूर: जादुटोणा विरोधी कायदाबाबत जनसामान्यांना विविध माध्यमातून माहिती देण्यात यावी तसेच अधिक जनजागृती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात यावे,  अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी विभागीय समितीच्या आढावा बैठकीत आयुक्त बिदरी बोलत होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.बी.वटी, पोलिस निरीक्षक सी.एस. कापसे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त बिदरी यांनी याप्रसंगी जादूटोणा विषयक गैरसमजुतीतून नागपूर विभागात कोणाचे शोषण  किंवा छळ झाले आहे का याबाबत विचारणा करून माहिती घेतली.  तसेच जादुटोणा विरोधी कायद्याचा प्रसार करण्यासाठी नेमलेल्या समितीत विभागीय समन्वयक म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्तीचे प्रस्ताव लवकरात लकवर पाठविण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला समाज कल्याण, पोलिस, आदिवासी कल्याण, शालेय शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे;नदी प्रदुषण रोखण्यासह स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि त्याबाबतची मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानाचा कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वनभवन येथे आयोजित चला जाणूया नदीला अभियानाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) सुनीता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवन संरक्षक राहुल पाटील, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, महाराष्ट्र जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. या अभियानास गती देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागांचे सचिव, विद्यापीठांचे कुलगुरु यांना सूचना देण्यात येतील.

यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी विविध सूचना केल्या. या अभियानात समाविष्ट जलप्रहरींनी नदीचे महत्त्व शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना समजावे यासाठी ५ वी ते १० वीच्या पुस्तकात एखादी धडा, कविता समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत. वन विभागामार्फत चित्ररथ उपलब्ध करू त्याद्वारे सांस्कृतिक विभागाकडून नदी किनाऱ्याच्या गावांमध्ये जनजागृती करता येईल. या विषयावरील एखादा माहितीपट तयार करावा. नदीच्या प्रदूषणासंदर्भात प्रदूषण मंडळ आणि काही तज्ज्ञ यांची समिती करून नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात.

साहित्य संमेलन प्रमाणे नदी सम्मेलन आयोजित करता येईल. यामध्ये सर्व विभागांचे अधिकारी, जैव विविधता मंडळाचे अधिकारी, या क्षेत्रातील सामाजिक संस्था आदींना सहभागी करता येईल. त्या अगोदर व्हिडिओ स्पर्धा, निबंध स्पर्धा घ्याव्या. एक वेब पोर्टल करुन त्यावर नदीसंबंधाने ज्ञानवर्धक आणि या विषयाचे गांभीर्य दर्शविणारी माहिती असावी. विद्यापीठ स्तरावर एनएसएस, एनसीसी, शालेय स्तरावर इको क्लब आदींच्या माध्यमातून महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी अभियानाबाबत कार्यकारी अभियंता विजय पाटील, जल बिरादरीचे नरेंद्र चुग यांनी सादरीकरण केले. यावेळी राज्यात १०८ नद्यांचा या अभियानात समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ४० नद्यांची पाहणी करुन आतापर्यत १५ नद्यांची नदी परिक्रमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारी, जलबिरादरीचे सदस्य, अभियानातील नदिप्रहरी आदी उपस्थित होते.

डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. यानुसार अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन जाऊन भरावेत. नियम व अटी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: (By hand) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिसूचनेच्या परिशिष्ट पाच (V) मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरावे लागेल.

पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी, पत्रव्यवहार जर असेल तर, केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती/नोंदणी क्रमांक/मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही फसव्या फोन कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी यांनी कळविले आहे.

पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बानगुडे उपाध्यक्षपदी परदेशी

पुणे :पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नंदकुमार उर्फ विजय  वासुदेव बानगुडे आणि उपाध्यक्षपदी राहुल विलास परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक संजय राउत, निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे आणि बँकेचे व्यवस्थापक प्रशांत गायकवाड यांच्या उपस्थितीत ही निवड बिनविरोध झाली. पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ  पॅनेलने  या निवडणुकीत पूर्ण यश मिळवले होते. माजी उपमहापौर आबा बागुल यांचे ही मार्गदर्शन लाभले होते. याप्रसंगी दीपक मानकर यांचे स्वागत नवनिर्वाचित संचालक रमेश भंडारी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.  दीपक मानकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

‘आजचा कर्जदार उद्याचा ठेवीदार कसा होईल यासाठी या नव्या टीम ने काम करावे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य द्यावा’ असे याप्रसंगी दीपक मानकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक, बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

 नंदकुमार उर्फ विजय वासुदेव बानगुडे (वय 56 वर्षे) हे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करीत असून ते पुणे नवरात्रौ सांस्कृतिक महोत्सव आणि शिवदर्शन गणेशोत्सव मित्रमंडळ या दोन्हींचे कोषाध्यक्ष आहेत. पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे आयोजित विनामुल्य काशी यात्रेच्या आयोजनात त्यांचा मोठा सहभाग असतो. तसेच अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. 

उपाध्यक्षपदी निवड झालेले राहुल विलास परदेशी (वय 46 वर्षे) हे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करीत असून हडपसर परिसरातील अनेक सार्वजनिक, सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. 

वडगाव शेरीतील टीपी स्कीमला महापालिकेची मान्यता

पुणे – वडगाव शेरी परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी जागा मालक जागा देत नसल्याने व त्याचा परिणाम या परिसरावर होत असल्याने अखेर या ठिकाणी नगररचना परियोजना (टीपी स्कीम) करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रस्तावास आज आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीमध्ये मंजुरी दिली.

या गावामधील रस्ते विकसित करून टीपी स्कीम राबविणे आवश्यक असल्याने वडगावशेरीतील सर्वे क्रमांक १७ /१ /३ब , १०/४ , ११/ १ /२ / ३ या ठिकाणी रस्ते ताब्यात येण्यासाठी टीपी स्कीम करावी अशी मागणी माजी नगरसेविका शीतल शिंदे यांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी शहर सुधारणा समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला त्याला शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पुणे महापालिका हद्दीत वडगावशेरी या गावाचा समावेश १९९७ मध्ये झाला आणि विकास आराखडा २००५ मध्ये जाहीर झाला. २००७ मध्ये यास अंतिम मान्यता मिळाली. पण गेल्या १५ वर्षात वडगाव शेरीचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. उलट वडगाव शेरी वगळता या भागातील इतर परिसरात मोठे रस्ते झाल्याने विकास झाला आहे. २००७ पासून वडगावशेरीतील जागा मालक रस्त्यासाठी आवश्‍यक असलेले भूसंपादन करू देण्यास तयार होत नाहीत. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात, शुक्रवारपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत

पुणे- आज निवडणूक कार्यालयात उमेदवाऱ्यांच्या अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी एकूण २९ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २१ अर्ज मंजूर झाले आहेत. 13 अपक्षांसह 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी माघारीची मुदत शुक्रवारपर्यंत आहे.

अर्ज वैध झालेल्या उमेदवारांची नावे:-

रवींद्र धंगेकर – महाविकास आघाडी हेमंत रासने – भाजप
अविनाश मोहिते – संभाजी ब्रिगेड पार्टी
किरण कद्रे – आम आदमी पार्टी
तुकाराम डफळ – सैनिक समाज पार्टी
बलजितसिंग कोचर – प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी
मिलिंद कांबळे – अखिल भारतीय सेना
रवींद्र वेदपाठक – राष्ट्रीय मराठा पार्टी


अपक्ष उमेदवार:
अजित इंगळे
अनिल हतागले
अभिजीत बिचुकले
अमोल तुजारे
आनंद दवे
खिसाल जाफरी
चंद्रकांत मोटे
बाळासाहेब दाभेकर
रियाज सय्यद
सलीम सय्यद
सुरेशकुमार ओसवाल
संतोष चौधरी
हुसेन शेख

अर्ज अवैध (बाद) झालेल्या उमेदवारी अर्जांची माहिती –

  1. गणेश मुधकर बिडकर(भाजपचे मुख्य उमेदवार पात्र झाल्याने बदली उमेदवार अपात्र)
  2. महेश दशरथ म्हस्के (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर केले नाही)
  3. बढाई गणेश सिताराम(अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
  4. बाळासाहेब राघोबा दाभेकर (इंडियन नॅशनल कँग्रेस – एबी फॉर्म नाही)
  5. विशाल माधव नगरारे (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
  6. इम्तियाज महमद हानिफ तांबोळी (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
  7. सचिन दत्तात्रय धनकुडे (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
  8. इम्रान अन्वर शेख (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
  9. अपर्णा विकास साठे (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या ४० उमेदवारांपैकी ३३ उमेदवारांची उमेदवारी वैध ठरली आहे. आम आदमी पार्टीचे (आप) मनोहर पाटील यांच्यासह सात उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.पाटील यांनी उमेदवारी अर्ज अपूर्ण भरला; तसेच एबी अर्जापैकी बी अर्ज अपूर्ण भरल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांचा अर्ज वैध ठरला असून बदली उमेदवार (डमी) शंकर जगताप यांची उमेदवारी अवैध ठरली आहे. (मुख्य उमेदवार पात्र असल्याने बदली उमेदवारी अवैध) राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल (नाना) काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेले राहुल कलाटे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. इतर राजकीय पक्षांपैकी बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम यांसह इतर २६ अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी माघारीची मुदत शुक्रवारपर्यंत आहे.चिंचवड पोटनिवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी वैध, अवैध उमेदवारी अर्जांची घोषणा या वेळी केली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण, निवडणूक पोलीस निरीक्षक अनिल यादव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या छाननी प्रक्रियेवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चिंचवड पोटनिवडणूक उमेदवारी अर्जांचा आढावा

एकूण उमेदवार ४०

वैध उमेदवार ३३

अवैध उमेदवार ७

राष्ट्रीयकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या २

नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार ५

अपक्ष उमेदवार २६