Home Blog Page 1418

कोथरुडमधील सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर विकास आराखडा मंजूर-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोडला मंजुरी मिळाली आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यामुळे हा रस्ता लवकरच तयार होऊन कोथरूडकरांची वाहतूककोंडीच्या त्रासातून मुक्तता होणार आहे.

कोथरूड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, त्यासाठी विविध पर्याय महापालिकेच्या माध्यमातून समोर आले होते‌. त्यातील सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोड मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, सदर रस्त्याच्या कामात अनेक अडथळे होते. या मार्गावरील बहुतांश जागा ही किर्लोस्कर कमिन्सच्या मालकीची असल्याने, जमीन अधिग्रहणाचा मोठा प्रश्न होता.

हा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष प्रयत्न सुरू होते.अखेर या प्रयत्नांना यश आले असून, सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिरच्या विकास आराखड्यास मंजूरी मिळाली आहे. सदर रस्ता किर्लोस्कर कमिन्सच्या मदतीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊन २० मीटर होणार आहे. त्यासाठी १५ कोटी खर्च अपेक्षित आहे. जुलै २०२३ पर्यंत सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे नियोजन आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

राज्यातील ग्रामीण जनतेसाठी राळेगणसिद्धीतून‘ग्राम राजस्वअभियानाचा शुभारंभ होणार-मंत्री गिरीश महाजन

0

मुंबई, दि. 10 : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिनी मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व योजनांची प्रभावी व लोकाभिमुख अंमलबजावणी होण्यासाठी ग्राम राजस्व अभियानाचा उपयोग होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यात दि. 26 जानेवारी 2023 पासून दि.25 जानेवारी 2024 पर्यंत हे ग्राम राजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीतील विविध विभाग ग्राम राजस्व अभियानात विविध उपक्रम राबविणार आहेत. अंत्योदय हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा उपयोग लाभार्थींना व्हावा, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.

याअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायती आता डिजिटल ग्रामपंचायती म्हणून विकसित करून यामार्फत नागरिकांना बीपीएल दाखला, जन्म नोंद दाखला, निराधार दाखला, नमूना 8 चा उतारा आदी दाखले देण्यात येतील. ग्रामपंचायत हद्दीमध्ये वारस नोंदी व मिळकत नोंदीसंदर्भात विशेष मोहीमा राबविण्यात येतील. ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या हरकती आणि सूचनांवर सरपंच, सदस्य यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात येईल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सर्व करांची 100 टक्के वसुली व्हावी, यासाठी शिबीरे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती श्री.महाजन यांनी दिली.

ग्राम राजस्व अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी बालकांची 100 टक्के आरोग्य तपासणी करणे तसेच लसीकरण करण्यात येईल. गावातील बालकांची श्रेणीवर्धन करून गाव कुपोषण मुक्त करण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात येतील.

त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत नागरिकांना तातडीच्या सेवा उपलब्ध करून देणे, मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांच्यासाठी आरोग्यविषयक सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. प्राथमिक शिक्षक विभागामार्फत प्राथमिक शाळांची 100 टक्के पटनोंदणी बरोबर शाळाबाह्य मुलांची नोंदणी केली जाईल. सोबतच सर्व प्राथमिक मुलांचे लसीकरण करण्यात येईल. माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शालेय शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येईल, अशीही माहिती मंत्री श्री.महाजन यांनी दिली.

ग्राम राजस्व अभियानांतर्गत प्रत्येक गाव शिवारात पाण्याचा ताळेबंद करून पाणी वापराचे नियोजन केले जाणार आहे. घन कचरा, सांडपाणी, ओला-सुका कचरा, प्लास्टीक कचरा आदीच्या विलगिकरणासाठी मोहीम राबविल्या जातील. जनावरांचे आरोग्य व वैरणाच्या नियोजनासाठी शिबिरे आयोजित केले जातील. दिव्यांग व्यक्तींना विविध लाभ मिळण्यासाठी शिबीरे आयोजित केले जातील आणि एस.सी. व नवबौद्ध घटक वंचित राहू नये, यासाठी योजनांचे प्रस्ताव ग्रामस्तरावर तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच गावातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांवर रेन वॉटर हार्वेस्टींगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंधाऱ्याची क्षमता वाढविणे, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्व इमारतींची देखभाल दुरूस्ती करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

अदानींचा ‘आपटबार’ आणि भारतीय अर्थव्यवस्था !

गेल्या आठवड्याभरात भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत  असलेल्या गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाला सुरुंग लागला. एकेकाळी जगात श्रीमंत असणारी ही व्यक्ती आता भारतातही श्रीमंत व्यक्तींमध्ये गणली जात नाही. या साऱ्या प्रकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार किंवा कसे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.संसदेचे कामकाज यापोटी बंद पाडले जात आहे. या सर्व घडामोडींचा हा धांडोळा.

न्यूयॉर्क येथील हिंडनबर्ग या शॉर्ट सेल करणाऱ्या कंपनीने अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा  आरोप केला. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा गैरव्यवहार असाही त्याचा उल्लेख केला.  त्यांनी दोन वर्षे संशोधन तसेच अदानी समूहाच्या माजी अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन, अनेक कागदपत्रे अभ्यासून तसेच अदानी समूहाच्या वेबसाईटच्या माध्यमातून माहिती गोळा करून हा अहवाल चव्हाट्यावर आणला. याचा परिणाम होऊन जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजारांवर अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांची दाणादाण उडाली आणि त्यांचे बाजार मूल्य काही दिवसात ९३ बिलियन डॉलर पेक्षा जास्त कमी झाले. गेल्या सलग नऊ सत्रांमध्ये या समूहाचे शेअर्स सातत्याने खाली घसरत आहेत. परिणामतः अदानी हे आता जागतिक पातळीवर तर सोडाच परंतु भारतातील श्रीमंत व्यक्तीमध्येही गणले जात नाहीत. इतकी प्रचंड धूप त्यांच्या मालमत्तेची झालेली आहे. गौतम अदानी यांच्याबरोबरच देशातील व परदेशातील अनेक बँका, वित्त संस्था, गुंतवणूकदार वर्ग जोडला असल्याने त्यांच्याही मालमत्तेची धूळधाण झाली आहे. खरे तर जगभरातील विकसित शेअर बाजारांमध्ये अशा  घटना अजिबात नवीन नाहीत.अनेक वेळा असे उद्योग करणाऱ्या कंपन्यांना घबाड मिळालेले आहे आणि काही वेळा ही मंडळी तोंडावर आपटलेली आहेत.

या घटनेनंतर भारतीय उद्योगपती, राज्यकर्ते व प्रशासन यांच्यातील संबंधांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करण्यात राहीले आहे. याला क्रॉनी कॅपिटॅलिझिम म्हणजे सहचर पुंजीवाद असेही म्हणले जाते.  एखाद्या उद्योगाचे अल्पावधीतील यश हे राजकीय व प्रशासकीय नेते यांच्या आतबट्ट्याच्या व्यवहाराने लाभलेले असते व सत्तारूढ पक्षही अशा उद्योगांना लाभकारक ठरेल अशा रीतीने धोरण आखते. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याचा लाभ होतं तो उद्योग सरकारलाही त्यातील काही वाटा देतो किंवा लाभ देतो. त्यामुळेच अदानी सारख्या घटना घडतात.  दरम्यान एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की अदानी उद्योग समूहाने हिंडेनबर्ग  कंपनीच्या आरोपांना दिलेले उत्तर हे ठाम किंवा ठोस स्वरूपाचे नव्हते. त्यांच्या भोंगळ उत्तरामुळेच गुंतवणूकदारांच्या विश्वासाला जास्त तडा गेला. अदानी उद्योग समूहाची एकूण भांडवलाची रचना ही गुंतागुंतीची आहे.त्याचप्रमाणे त्यांच्या नोंदणीकृत नऊ कंपन्यांचे शेअर बाजारातील भाव खरोखर अति भव्य होते हे नाकारता येणार नाही. सलग नऊ सत्रांमध्ये एवढी घसरण होऊनही या शेअरच्या किमती सर्वसामान्यांच्या हाताबाहेरच्याच आहेत हे नक्की.  अदानी समूहाच्या परदेशात अनेक बनावट कंपन्या असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलेला आहे.एखाद्या उद्योग समूहावर किंवा कोणत्याही नोंदणीकृत कंपनीच्या विरुद्ध आर्थिक गैरव्यवहार, पैशाची अफरातफर किंवा हिशोबामध्ये हेराफेरी केल्याचे आरोप केले तर देशातील सेबी,किंवा गुन्हे अन्वेषण सारख्या नियामक संस्था याबाबत स्वतंत्र यंत्रणा नेमून त्याची चौकशी निश्चित करण्याचे त्यांना अधिकार आहेत. संसदेमध्ये याबाबत विरोधी पक्ष दररोज गोंधळ घालत आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांची मागणी आहे. परंतु बाजार स्थिर स्थावर झाल्यानंतर या संस्था किंवा केंद्र सरकार ही चौकशी सुरू करेल असे वाटते. या यंत्रणांच्या वतीने अदानी समूहाचे फॉरेन्सिक ऑडिट झाले तर दूध का दूध व पानी  का पानी होईल. अदानी समूहाने गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण व्हावा म्हणून घेतलेली कर्जे वेळेअभावीच परत देण्याची घोषणा केली आहे. त्याचा नेमका काय परिणाम होतो हे अभ्यासावे लागेल.

अदानी समूहाच्या शेअरची जी काही घसरण किंवा दाणादाण झाली त्याचा अर्थव्यवस्थेवर फारसा काही परिणाम होईल अशी स्थिती नक्की नाही. परंतु सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या शेअर बाजार वरील विश्वासाला धक्का बसला आहे. तसेच देशातील राष्ट्रीयकृत बँका, वित्तसंस्था, आयुर्विमा महामंडळ यांनी या समूहाला दिलेली कर्जे त्यावरचे तारण किंवा त्यांच्या समभागात गेलेली गुंतवणूक ही सुरक्षित आहे किंवा कसे याबाबत सेबी पुढाकार घेऊन चौकशी करत आहे. यामध्ये बँका किंवा एलआयसी मध्ये सर्वसामान्यांचे पैसे आहेत हे जरी नक्की असले तरी त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत येईल, त्याचे दिवाळी वाजेल अशी शक्यता  नाही. शेअर बाजारात सट्टा करणाऱ्यांना यामुळे चांगला धडा बसेल हे नक्की. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनीही अत्यंत सावधगिरीने सर्व कंपन्यांमध्ये अभ्यास करून गुंतवणूक करावी हेही पथ्य पाळले गेले पाहिजे. पैशाच्या मोहापायी हे सारे घडते आहे.एक प्रकारे मोदी सरकारची प्रतिष्ठाही पणाला लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सत्तारूढ पक्षाने अत्यंत योग्य व वाजवी भूमिका घेण्याची निश्चित गरज आहे. अदानी समूह म्हणजे देशाची अर्थव्यवस्था नव्हे. त्यांचा आपटबार उडाला म्हणून गोंधळून जाण्याचे कारण नाही. वेळ पडली तर संसदेची संयुक्त समिती नेमून यातील सत्य जनतेसमोर आणणे हे आवश्यक आहे. मोदी सरकारने नजीकच्या काळात काही सकारात्मक भूमिका घेतली तर देशातील सर्वसामान्य नागरिक, मतदार यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.  यानिमित्ताने उडालेली राजकीय धुळवड ही कोणाचे रंग खरवडले जातात आणि प्रत्यक्षात  काय घडले आहे हे सर्वसामान्यांसमोर येणे ही काळाची गरज आहे. तुर्तास एवढेच.

लेखक-नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणे स्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)*

अमेरिकेतील गांधीवादी अभ्यासक डॉ.मायकेल सनलाईटनर यांची गांधी भवन ला भेट 

‘फॅसिझम नको असेल तर   कॉर्पोरेटायझेशन नियंत्रित  ठेवा ‘:डॉ.मायकेल सनलाईटनर
पुणे :’भारतासह जगभर कॉर्पोरेट जगताच्या हितासाठी फॅसिझम बोकाळला आहे,लोकशाही व्यवस्था नष्ट करण्याचे काम चालू आहे. भावनात्मक मारा,राष्ट्रवादाची ठेकेदारी ,सैन्याचे उदात्तीकरण,ऐतिहासिक सत्याचे विकृतीकरण आणि सतत कोणता तरी शत्रूची भीती दाखवून द्वेष निर्माण करणे, ही फॅसिझमची  लक्षणे असून ती सहज ओळखू येतात. फॅसिझम(हुकूमशाही) नको असेल तर महाकाय कॉर्पोरेट कंपन्यांच्या वस्तू,सेवा घेणे कमी करून त्यांची पैशाची ताकद कमी करणे हा एकमेव उपाय आहे,’ असे प्रतिपादन अमेरिकेतील गांधीवादी अभ्यासक डॉ.मायकेल सनलाईटनर यांनी केले. 

अमेरिकेतील  ‘पोर्टलॅंड कम्युनिटी कॉलेज चे विश्वस्त, ‘गांधी अँड किंग :सोल फोर्स अँड सोशल चेंज’  या पुस्तकाचे लेखक आणि गांधीवादी अभ्यासक  डॉ.मायकेल सनलाईटनर यांच्याशी संवादाचा कार्यक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (कोथरूड) येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी  डॉ.मायकेल सनलाईटनर बोलत होते. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी  डॉ.मायकेल यांचा शाल,स्मृतिचिन्ह  देऊन सत्कार केला.डॉ.मायकेल यांनी गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी, लेखिका डॉ. अंजली सोमण, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव संदीप बर्वे, प्रा. नीलम पंडित, प्रकाश बुरटे, भारत जोडो यात्री प्रकाश ढोबळे उपस्थित होते. 
 डॉ.मायकेल सनलाईटनर म्हणाले,’लोकशाही तत्व आणि गांधी तत्व मारून टाकण्याचे काम भारतात सुरु आहे.त्यामुळे माझ्यासारखे अनेक जण अस्वस्थ आहेत.लष्करी प्रकारची हुकूमशाही,लोकशाहीच्या आवरणातील हुकूमशाही आणि कॉर्पोरेट हुकूमशाही असे हुकूमशाहीची प्रकार जगभर दिसतात.भारतात लोकशाहीच्या आवरणात हुकूमशाही येताना दिसत आहे. त्यासाठी राष्ट्रवादाचा मुखवटा  घेतला जातो.जे राष्ट्रीय विचारांचे नाहीत,तेच त्याची प्रमाणपत्रे इतरांना मागत सुटतात.मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना अनुकूल अर्थव्यवस्था तयार केली जाते. त्यांच्यासाठी विकासाचे मोठ मोठे प्रकल्प उभारले जातात. त्यालाच विकास म्हणावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यात समाजाचे हित पाहिले जात नाही’. 
     देव,देश,धर्म ,जात अशा मुद्द्यांवर सतत भावनात्मक मारा केला जातो. राष्ट्रवादाची ठेकेदारी केली जाते.सैन्याचे सतत उदात्तीकरण केले जाते. संरक्षण साहित्यावर अफाट खर्च केला जातो. ऐतिहासिक सत्याचे विकृतीकरण करून सत्य मारून टाकले जाते. सतत कोणत्या  तरी शत्रूची भीती दाखवून द्वेष निर्माण करणे,मॉब लिंचिंग सारख्या गोष्टी घडवून आणणे अशा गोष्टी होतात. ही फॅसिझमची  लक्षणे असून ती सहज ओळखू येतात. फॅसिझम ( हुकूमशाही ) नको असेल तर महाकाय कॉर्पोरेट कंपन्यांच्या वस्तू , सेवा घेणे कमी करून त्यांची पैशाची ताकद कमी करणे हा एकमेव उपाय आहे. मी वैयक्तिक पातळीवर त्यासाठी प्रयत्न करीत आहे. एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोकसंख्या जरी निर्भीड झाली तरी हुकूमशाहीचा धोका टाळता येतो,असेही डॉ मायकेल यांनी सांगितले.     
डॉ.मायकेल सनलाईटनर :गांधी विचाराचे अभ्यासक,लेखक 
  अमेरिकेतील  ‘पोर्टलॅंड कम्युनिटी कॉलेज चे विश्वस्त, ‘गांधी अँड किंग :सोल फोर्स अँड सोशल चेंज’  या पुस्तकाचे लेखक आणि गांधीवादी अभ्यासक    डॉ.मायकेल सनलाईटनर हे सत्तरच्या दशकापासून भारतात येत आहेत. गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला प्रबंध पुर्ण केला. विनोबा भावे, खान अब्दूल गफारखान, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, प्यारेलाल नायर, नारायणभाई देसाई या गांधीवादी नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आहेत.गांधीविचारांचा आजचा संदर्भ, स्वदेशी, स्वराज, मोक्ष, अहिंसा आणि सत्याग्रह, लोकशाही, विनोबा भावे, अमेरिकन राजकारण, दहशतवाद या आणि इतर सामाजिक – राजकीय विषयांवर त्यांची व्याख्याने होत असतात. २०२० साली दांडी यात्रेच्या अमृतमहोत्सवी यात्रेत प्रा. सनलाईटनर यांनी सहभाग घेतला होता.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

0

मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार पूनम महाजन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आम आदमी पार्टीची कसबा पोटनिवडणूकीतून माघार

पुणे- कसबा विधानसभा निवडणुकीतून आमआदमी पार्टीचे उमेदवार किरण कद्रे यांनी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार माघार घेतली आहे.आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांच्या कडून याबाबतचे निवेदन प्रसिद्धीसाठी पाठविल्याचे स्थानिक प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले .

प्रीती मेनन यांनी या निवेदनात असे म्हटले आहे कि,’ आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे. महाराष्ट्रातील खोक्या – बोक्याच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळलेली आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची संगीत खुर्ची राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे. कोणताही प्रस्थापित पक्ष कोणत्याही इतर प्रस्थापित पक्षासोबत सत्ता स्थापन करू शकतो. कोणतीही वैचारिक भूमिका नाही, हे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. आमदारांनी राजकीय पक्ष बदलण्यासाठी अथवा सत्तेत भागीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याच्या चर्चा जनसामान्यांमध्ये दररोज घडत आहेत. लोक या प्रकाराला कंटाळले आहेत.दिल्लीतील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उत्तम व भ्रष्टाचार रहित प्रशासकीय सेवा यांचे विकासाचे मॉडेल लोकांना मनापासून आवडले आहे. पंजाबमध्ये देखील याच मॉडेलच्या धर्तीवर आम आदमी पक्षाच्या सरकारचं काम सुरू आहे.या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रातील जनतेमध्ये लवकरच येतील आणि याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून होईल. सद्या आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत.

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील यावर विशेष लक्ष द्या-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, दि.९: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ आणि २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पोलीस उपायुक्त आर. राजा, संदीप सिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्रॉंगरूमची तयारी, सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी केंद्राची व्यवस्था, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, ईव्हीएमसाठी मतपत्रिका मुद्रण, पोस्टल मतदान आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

ते म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील यावर विशेष लक्ष द्यावे. ईव्हीएम यंत्र निर्धारित स्थळी नेताना जीपीएस प्रणाली असलेल्या वाहनांचा उपयोग करावा आणि या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करावे. दोन्ही मतदारसंघात निर्धारित वेळापत्रकानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करावे.

यापूर्वीच्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्र परिसरात मतदार जागृतीचे उपक्रम राबवावे. मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे. मतमोजणी केंद्रावरील आवश्यक सुविधांचे आतापासूनच नियोजन करावे. दिव्यांग मतदारांसाठी अधिक संख्येने व्हीलचेअरची व्यवस्था आणि त्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी.

कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार

  • राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील

पुणे, दि.9 : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सुधारित प्रारुप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यानुसार 27 फेब्रुवारी 2023 रोजी सुधारित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.

प्राधिकरणाने राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रकिया सुरू केली असून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 245 बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यापूर्वी प्रारुप मतदार याद्या तयार करण्यासाठी 1 सप्टेंबर 2022 हा अर्हता दिनांक निश्चित केला होता. तथापि, शासनाच्या 7 फेब्रुवारी 2023 रोजीच्या अधिसूचनेनुसार नव्याने निवडून आलेल्या प्राथमिक सहकारी पतसंस्था, बहुद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सदस्यांना अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक असल्याने पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यामध्ये या नवीन सदस्यांना समाविष्ट करुन सुधारित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

1 सप्टेंबर 2022 या अर्हता दिनांकानंतर राज्यातील 9 हजार 525 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सहभागी होता यावे यासाठी 30 एप्रिल 2023 अथवा त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत प्राधिकरणास आदेश दिले आहेत. पूर्वीच्या अंतिम यादीत समावेश असलेले परंतु या कालावधीत निवडणूक न लढवलेले आणि पराभूत झालेले सदस्य अपात्र झालेले आहेत.

सुधारित मतदार यादी कार्यक्रमानुसार 10 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत 1 सप्टेंबर 2022 नंतर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची नावे समाविष्ट करुन व प्रतिनिधीत्व संपुष्टात आलेल्या सदस्यांची नावे वगळून अंतिम मतदार यादीत सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार सुधारीत प्रारुप मतदार यादी 27 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीमध्ये 27 फेब्रुवारी ते 8 मार्च 2023 या कालावधीत आक्षेप/ हरकती घेता येतील. प्राप्त झालेल्या हरकतींवर 17 मार्च 2023 पर्यंत निर्णय घेऊन 20 मार्च 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

20 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीमध्येही नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश नसल्यास त्यांना बाजार समितीच्या निवडणूकीकरीता नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल, असेही आयुक्तांनी कळवले आहे.

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया सुरू

*प्रवेशिका अर्ज www.mumbaifilmcity.org संकेतस्थळावर उपलब्ध
निवडप्रक्रियेत जास्तीत जास्त निर्मितीसंस्थांनी सहभागी होण्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन

मुंबई- फ्रान्स येथे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ ते २४ मे २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या चित्रपट बाजारात ( फिल्म मार्केट) राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत निवड प्रक्रिया करून तीन मराठी चित्रपटांना पाठविण्यात येणार आहे. यासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मिती संस्थांनी निवडप्रक्रियेसाठी दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रवेशिका अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

निर्मिती संस्थांना प्रवेशिका अर्ज महामंडळाच्या www.mumbaifilmcity.org संकेतस्थळावर उपलब्ध असून निर्मितीसंस्थांनी प्रवेशिका अर्ज विहित कागदपत्रासह महामंडळाच्या जनसंपर्क विभागात सादर करता येतील अथवा cfffm२०२३@gmail.com या मेलवरही पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मदत कक्षाची स्थापना

मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन २०१६ पासून राज्य शासनाच्या वतीने महामंडळामार्फत निवडप्रक्रियाकरून मराठी चित्रपट कांस चित्रपट बाजारात सहभागी होत असतात. यंदाही या महोत्सवात निवडप्रक्रिया करून मराठी चित्रपटाना सहभागाची संधी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी चित्रपटांनी या निवडप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क विभागात मदत कक्षाची ( हेल्प डेस्क) स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत निर्मितीसंस्थांना प्रवेशिका अर्ज भरताना आणि संकुल चित्रपट महोत्सवाबाबत आवश्यक माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे.

वेदांत माधवनचा सुवर्ण चौकार,भक्ती वाडकरचे सोनेरी यश

मुलांच्या रिलेमध्येही महाराष्ट्राला विजेतेपद

भोपाळ, :
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणा मधील पदकांची लयलूट कायम राखली. त्याचे श्रेय आज सुवर्ण चौकार पूर्ण करणारा वेदांत माधवन, बॅग स्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी भक्ती वाडकर, रौप्य पदक जिंकणारी पलक जोशी, कांस्यपदक जिंकणारे शुभंकर पत्की, प्रतीक्षा डांगी यांना द्यावे लागेल. यांच्या या यशावर शिखर चढवताना मुलांच्या संघाने रिले शर्यतीत महाराष्ट्राचा दबदबा कायम राखला.

वेदांत याने आज दोन सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई केली. शंभर मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत सोनेरी कामगिरी करताना त्याने ५२.९७ सेकंद अशी वेळ नोंदवली. त्याने या शर्यतीत सुरुवातीपासूनच साधारणपणे वीस ते पंचवीस मीटरची आघाडी घेतली होती. त्याला चारशे मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत मात्र सोनेरी यशाने हुलकावणी दिली. ही शर्यत त्याने चार मिनिटे ०९.६१ सेकंदात पार करीत रौप्य पदक पटकाविले.‌ गुजरातच्या देवांश परमार याने हे अंतर चार मिनिटे ०३.९९ सेकंदात पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.

मुलांच्या पन्नास मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत शुभंकर पत्की याने कांस्यपदक पटकाविले. पुण्याच्या या खेळाडूने हे अंतर २७.९६ सेकंदात पूर्ण केले. तो भूपेंद्र आचरेकर तसेच दुबई येथे प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.‌ या शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दास याला चौथा क्रमांक मिळाला. शुभंकर याला शंभर मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत पदकाने हुलकावणी दिली. त्याला या शर्यतीत चौथे स्थान मिळाले.

ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की व वेदांत माधवन यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने चार बाय शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले त्यावेळी त्यांनी हे अंतर तीन मिनिटे ५९.५७ सेकंदात पूर्ण केले. या शर्यतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पहिल्यापासूनच आघाडी घेत शेवटपर्यंत टिकवली.

मुलींच्या पन्नास मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या भक्ती वाडकर हिने सुवर्णपदक जिंकताना ३१.१४ सेकंद वेळ नोंदविली तर तिचीच सहकारी प्रतीक्षा डांगी हिने हे अंतर ३१.४० सेकंदात पार करीत कांस्यपदक पटकाविले. या शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋजुता राजाज्ञ हिला सहावे स्थान मिळाले. भक्ती ही मूळची कोल्हापूरची खेळाडू असून ती सध्या पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी श्री. बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ठाण्याची खेळाडू प्रतीक्षा ही वाशी येथील फादर ॲग्नेल अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.

शंभर मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राच्या पलक जोशी हिने रौप्य पदक पटकावले. तिने ही शर्यत एक मिनिट ०.३७ सेकंदात पार केली. पलक ही मुंबई येथील खेळाडू आहे. महाराष्ट्राच्या अनन्या नायक हिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

जलतरणपटूंची कामगिरी अभिमानास्पद-महाजन
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी आपले वर्चस्व कायम राखले त्यांची कामगिरी आमच्यासाठी खरोखरीच अभिमानास्पद आहे. त्यांच्या कामगिरीमुळे राज्यातील युवा खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल असे महाराष्ट्राचे क्रीडामंत्री श्री. गिरीश महाजन यांनी सांगितले.‌

खेळाडू व प्रशिक्षकांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ- डॉ. दिवसे
“आमच्या खेळाडूंनी खेलो इंडिया मध्ये जे काही यश मिळविले आहे, त्याचे बरेचसे श्रेय या खेळाडूंनी आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धेच्या तयारीसाठी जे अपार कष्ट घेतले आहेत. त्याचेच हे द्योतक आहे. या खेळाडूंच्या तयारीसाठी आमच्या क्रीडा संचालनालया मधील सर्व संबंधित अधिकारी व अन्य वर्गानेही मदत केली आहे, ते देखील कौतुकास पात्र आहेत”, अशा शब्दात राज्याचे क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी साजरा केला वाढदिवस

ठाणे, दि. ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खाऊ व पुस्तके वाटप करण्यात आली.

स्वयम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयम् अॅपचे अनावरण, स्वयम् च्या ‘झेप’ या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयम् अॅपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. यावेळी दिव्यांगांसाठी भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी स्वयम् च्या संस्थापक डॉ. निता देवळालकर उपस्थित होत्या.

नागरिकांच्या शुभेच्छांचा केला स्वीकार

मुख्यमंत्र्यांनी आनंद आश्रमात धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार मुख्यमंत्र्यांनी केला. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले.

लाल महालातून झाला ब्रिगेड च्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ

पुणे- आज कसबा विधानसभा मतदार संघातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार अविनाश मोहिते यांनी लाल महालात जाऊन जिजाऊंना अभिवादन करून, कसबा गणपतीचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उत्तम कामठे, प्रकाश जाधव, संदीप कारेकर, महादेव मातेरे, स्मिता म्हस्कर, सुरेखा जूसगर, संध्या शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी चिंचवड मतदार संघातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार प्रवीण कदम यांचाही प्रचाराचा नारळ फोडला.

नेहरु युवा केंद्रामार्फत मतदार जनजागृती

पुणे, दि. ९: आज नेहरू युवा केंद्र पुणे यांच्यावतीने व्यापक मतदान जनजागृती अभियानास शेठ ताराचंद रुग्णालय परिसरातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. याप्रसंगी वरप्रभ शिरगावकर यांनी चार्ली चॅप्लिनच्या वेषामध्ये मतदार जनजागृती केली.

निवडणूक विभागामार्फत कसबा पेठ तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी कलापथके, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे समूह, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक यांचा सहभाग घेण्यात येत आहे. सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात तसेच विविध सोसायट्यांमधून छोट्या- छोट्या कार्यक्रमाद्वारे, पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे.

नेहरु युवा केंद्राच्यावतीने आज ताराचंद रुग्णालयात मतदार जनजागृती करण्यात आली. रुग्णालयाच्या परिसरातील डॉक्टर, रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांचे लक्ष मदानाचा संदशे देणाऱ्या ‘चार्ली’ले वेधून घेतले. नागरिकांनी त्यांच्या कलेलाही दाद दिली.

भारतीय तत्त्वांच्या आधारावरच नवे जग उभारले जाईल-पद्मविभूषण डॉ. करण सिंह

९ व्या जागतिक ज्ञान-विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषदेचे उद्घाटन.

पुणे,९ फेब्रुवारीः वसुधैव कुुटुंबूकम्, एकम सत विप्रा बहुधा वदन्ति आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे नवीन समाज आणि नवीन जग निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे भारतीय तत्त्व आहेत. त्यामुळे  संपूर्ण  मानव जातीचे कल्याण होणार आहे. असे विचार पद्माविभूषण डॉ. करण सिंह यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारत तर्फे श्री काशी विश्वनाथ कॉरिडॉर, वाराणशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ९व्या जागतिक ज्ञान-विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी नवी दिल्लीच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार, स्वामी योगी अमरनाथ, बिहारचे माजी मंत्री प्रमोद कुमार, डॉ. योगेंद्र मिश्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विश्वनाथ  कराड हे होते. तसेच, परमपूज्य श्री. श्रीकृष्ण कर्वे गुरूजी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी शिक्षण समुहाच्या सचिव प्रा. स्वाती कराड-चाटे व प्रकुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
डॉ. करणसिंग म्हणाले, ज्ञान योग, भक्ती योग, कर्मयोग आणि राजयोग या तत्त्वाचे पालन केल्यास संपूर्ण मानव जातीचा उद्धार होईल. विश्वातील सर्वच धर्मांमध्ये कुठे ना कुठे तरी मानवहिताचा विचार आलेला आहे. राजयोग ही अध्यात्मिक शक्तींची गुरूकिल्ली आहे.  त्याच्या सहाय्याने मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करीत असताना सर्व भारतीय ऋषीमुनी आणि तत्त्वज्ञांनी एक नवा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे नवे जग निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
इंद्रेश कुमार म्हणाले, जागतिक शांततेचे स्वप्न साकार करायचे असेल तर भारतीय तत्त्वे जाणून घेऊन वसुधैव कुटुंबकम् या तत्त्वाचे कटाक्षाने पालन केले पाहिजे. प्रत्येक धर्मात काही ना काही तरी चांगले दडलेले आहे. त्या चांगुलपणाचा सर्वांनाच फायदा होऊन वाईट विचारांचा र्हास होईल.
प्रा.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विज्ञान आणि आद्यात्माच्या समन्वयानेच जगात शांतता नांदू शकते. या कॉरिडॉरचे आता नॉलेज कॉरिडॉर  मध्ये रूपांतर झाले पाहिजे. धार्मिक  ग्रंथ हे जीवन ग्रंथ आहेत. आपल्याला अंतिम सत्याचा शोध सुरू करावा लागेल. आपली भारत माताच आता संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग  दाखवेल.
योगी अमरनाथ म्हणाले, जिथे ज्ञान आहे तिथे विद्वत्ता आहे. प्राचीन काळापासून शतकानुशतके संशोधन करून मिळविलेले ज्ञान आता जगासमोर मांडण्याची वेळ आली आहे. विज्ञान त्याच्या आधारे नवीन शोध लावत आहे. मंथनातून जे ज्ञान बाहेर पडेल त्यातून मानवाचे कल्याणच होणार आहे. म्हणूनच आध्यात्मिक विचारांची कास धरण्याची गरज आहे.
डॉ. योगेंद्र मिश्रा म्हणाले, पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे जागतिक शांततेचे कार्य सुरू आहे. प्रत्येक माणुस सुखाच्या शोधात आहे.  मानव जातीच्या  कल्याणाकरीता संपूर्ण जग भारताच्या पाठीशी आहे. जीवनात चांगल्या गोष्टींपुढे नतमस्तक होऊन वाईट विचारांना थारा न देता, वेळेचा सदुपयोग करावा.

डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले. 

प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.

पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची सरमिसळ

पुणे दि.९- जिल्ह्यातील २१५-कसबा विधानसभा मतदारसंघ आणि २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस.सत्यनारायण आणि २१५-कसबा विधानसभा मतदारसंघाचे पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी सुभाष भागडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

एकूण १ हजार ५८६ बॅलेट युनिट, १ हजार ५३९ कंट्रोल युनिट आणि १ हजार ५४२ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. यापैकी ३३८ बॅलेट युनिट, ३३८ कंट्रोल युनिट आणि ३५१ व्हीव्हीपॅट कसबा पेठ मतदारसंघासाठी आणि ६३८ बॅलेट युनिट, ६३८ कंट्रोल युनिट आणि ६६३ व्हीव्हीपॅट यंत्र चिंचवड मतदारसंघासाठी वितरित करण्यात येतील.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.