पुणे – महापालिकेकडून समान पाणी योजनेअंतर्गत पाण्याचे ऑडीट करण्यासाठी शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत ( बुधवारी, दि. 15) आणि ( गुरूवारी दि. 16) शहारातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर पाणी बंद असलेल्या भागातील पुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशीराने होणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुधवारी पाणी बंद असलेला भाग सणस पंपिग स्टेशन :- नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली नं. बी 10 ते बी-14
गुरूवारी पाणी बंद असलेला भाग चतुश्रृंगी टाकी परिसर – बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी ऍम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी,
एसएनडीटी टाकी परिसरा – शिवाजीनगर, भोसलेनगर, “चोले रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, पोलीस लाईन, गोखलेनगर, भांडारकर रोड आणि परिसर
ठाणे, दि. 13 – खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली असून लवकरच ती सुरू होईल. त्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील हुशार मुलांसाठी विविध योजना, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्य करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या (बीबीएनजी) वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित परिवर्तन 2023 या उद्योग परिषदेत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, विवेक देशपांडे, मधुरा कुंभेजकर, अरविंद नांदापूरकर, अरविंद कोऱ्हाळकर, शिल्पा इनामदार, महेश देशपांडे, महेश जोशी, अभिनेते प्रशांत दामले, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे आदी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ब्राह्मण समाजातील उद्योजकांचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्यम कौस्तुभ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ब्राह्मण समाजाला एकेकाळी नोकरी हाच पर्याय होता. अलिकडच्या काळात मात्र आता सर्व क्षेत्रात ब्राह्मण समाज अग्रेसर दिसून येतो आहे. उद्योग क्षेत्रात ब्राह्मण समाजातील तरुणांची गरुड झेप पहावयास मिळत आहे. ब्राह्मण समाजात यशस्वी उद्योजक पहायला मिळतात. जगातील प्रमुख 7 कंपन्यांपैकी 4 प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ब्राह्मण आहेत. सिलिकॉन व्हॅलीत समाजाचे तरुण काम करत आहेत. या माध्यमातून मोठे काम होत आहे. आज विविध समाजातील संघटना या समाजाच्या पाठिशी उभे राहून उद्योजकता, शिक्षण, व्यवसायिकता या विविध क्षेत्रात काम करत आहेत. कुठलेही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करत आहेत. ब्राह्मण समाजातील संघटना देखील नि:स्वार्थ वृत्तीने काम करताना दिसतात. बीबीएनजी सारख्या संस्था समाजासाठी वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करतात, याचे समाधान वाटते. समाजाला ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक होते ते ते देण्याचे काम ब्राह्मण समाजातील मान्यवरांनी केले आहे.
ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत. सन 2030 सालापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ. आजच्या जगात व्यावसायिकता, उद्योगशिलता, नव्या उद्योगाला समजून घेणे व त्या क्षेत्रात पुढे जाणे आवश्यक आहे. दूरसंचार क्रांतीमुळे तरुण पिढीला मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या काळात अशी संधी उपलब्ध आहे की, छोट्या गावातील तरुण स्टार्टअप सुरू करून मोठा उद्योग उभारु शकतो. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा वारसा नसलेला युवक देखील एक यशस्वी उद्योजक बनू शकतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे परिवर्तन घडत आहे. हे बदलते मूल्य समजून घेण्यात तरुणाई काम करत आहे. जगात उद्योग आणि विविध क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध हे सांगणारे व या संधी कशा प्राप्त कराव्यात याबद्दल मार्गदर्शनाचे काम बीबीएनजी सारख्या संस्था करत आहेत. अनेक लोकांनी या संधीचा लाभ घेऊन आपलं विश्व तयार केले आहे. ज्या वेगाने देश पुढे चालला आहे. त्या वेगात ब्राह्मण समाजाने यापूर्वी देखील योगदान दिले आहे, यापुढेही ते करतील व देशाला पुढे नेण्याचे काम समाजातील तरुण करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
समाजासाठी संस्थेच्या कार्यामध्ये काहीही मदत लागली, तर मी आपल्या पाठिशी उभा आहे. विशेषतः तरुणांच्या रोजगार, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काम करु. मागील काळात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे 605 कोर्सेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्धे शुल्क भरण्याचा निर्णय घेतली. हुशार विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने जगातील उत्तम विद्यापीठामध्ये शिकता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे, दि.१३ : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने डेक्कन वाहतुक विभागाअंतर्गत चैत्राली को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड ते क्षितीज बंगला पर्यत (जकातदार पथ) दोन्ही बाजूस अंदाजे २५० ते ३०० मीटर नो-पार्किंग करण्याचे तसेच चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत पाषाण- सूस पुलावर सुरक्षित वाहतुक सुरु रहावी तसेच अपघात टाळण्याच्यादृष्टीने वाहतुकीत बदल करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
चतु:श्रुंगी वाहतूक विभागांतर्गत पाषाण कडून सूस कडे जाणाऱ्या रस्त्यावर सूस पुलाच्या अलिकडे उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे. त्याऐवजी नागरिकांनी पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या सोसायटीतील नागरिकांनी सूस पूल पार करुन २०० मीटर अंतरावर उजवीकडे वळून ननावरे भुयारी मार्गाने इच्छित स्थळी जावे. पाषाण मार्ग साताराकडे पुणे-बेंगलोर महामार्गालगत जाण्यासाठी वाहन चालकांनी साई चौक पाषाण येथून डावीकडे वळून सुतारवाड पाषाण मार्गे इच्छित स्थळी जावे. हिंजवडी, सूस तसेच मुंबईकडे जाण्यासाठी सूस पूल पार करुन २०० मीटर अंतरावर उजवीकडे वळून सेवा मार्गाने मुंबईकडे तसेच सुसकडे इच्छितस्थळी जावे.
याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २५ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकती विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
पुणे, दि.१३: शासकीय मान्यता प्राप्त अनुदानित व कायमस्वरूपी विनाअनुदानित दिव्यांग विशेष शाळा, कर्मशाळामधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या, प्रशिक्षणार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथे १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात येणार आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थी, प्रशिक्षणार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना खेळात संधी मिळावी यासाठी २०२२-२३ वर्षाच्या या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील राज्यातील ३६ जिल्ह्यातील २ हजार २१५ दिव्यांग विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दिव्यांगांच्या प्रवर्गानुसार विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये अंध, कर्णबधिर, मतिमंद, अस्थीव्यंग, बहुविकलांग प्रवर्गातील ८ ते १२ वयोगट, १२ ते १६ वयोगट, १७ ते २१ वयोगट, व २२ ते २५ या वयोगटात स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेत विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, दिव्यांगांच्या विषयी कायदे, महत्वाच्या तरतूदी, राज्यात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण अभियान, सुधारित शाळा संहिता, योजना आदीबाबत परिसंवाददेखील आयोजित करण्यात येणार आहे. आज राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थी पुण्यात दाखल झालेले आहेत.
या स्पर्धांचे नियोजन करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
*दिव्यांग कल्याण आयुक्तांनी स्पर्धेच्या तयारीचा घेतला आढावा * दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत आढावा घेतला. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे उपायुक्त संजय कदम, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, समर्थ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते. 000
पुणे दि. १३- जिल्ह्यातील २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल यांनी या मतदारसंघातील महात्मा फुले पेठ येथील कै. केशवराव जेधे मनपा शाळा क्र. १६, भवानी पेठ येथील सावित्री बाई फुले प्रशाला आणि शुक्रवार पेठ येथील आदर्श विद्यालय या मतदान केंद्रांना भेट देऊन केंद्रांची तपासणी केली.
श्री.सेमवाल यांनी संबंधित अधिकारी तसेच पदनिर्देशित मतदान केंद्राचे मुख्याध्यापक यांना मतदान सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक सुविधा आणि रचना याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे पर्यवेक्षकीय अधिकारी दिनेश शिंदे व स्वाती देवकर उपस्थित होते.
पुणे, ता. १३ : महाराष्ट्राचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात काही विषयांवर स्थानिक नागरिकांकडून डॉ. गोऱ्हे यांच्याकडे तक्रार स्वरूपात आलेल्या माहितीवर आज त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. याद्वारे तुळजाभवानी मंदिरात महिलांच्या हस्ते पूजा करण्याबाबत स्थानिक भोपे पुजारी कुटुंबातील महिलांची भावना लक्षात घेऊन याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनात त्यांनी मंदिरात सध्या प्रचलित असलेल्या नियमात आणि प्रथांमध्ये अनेक सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
तसेच पुढील विषयांवर प्रकाश टाकला आहे : १) मंदिर गाभारा प्रवेश व दर्शन नियम सर्वांना समान असावेत. महिलांना गाभारा प्रवेश पूर्वीप्रमाणेच चालू ठेवावा. कोविड काळात बदललेले नियम पुन्ःस्थापित करावे. स्थानिक पुजारी भोपे कुटुंबियांच्या महिला प्रतिनिधींना या मंदिरात पूजा करण्याबाबत त्यांनी केलेल्या मागणीनुसार परवानगी देण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय होण्याची आवश्यकता आहे. २) देऊळनियमानुसार पुजारी घराण्यातील पुरुष व स्त्री पुजाऱ्यांना पुजेचे समान अधिकार असावेत. ३) जिल्हाधिकारी स्तरावर मंदिर व गाभारा प्रवेशाचे नियम बदल करु नयेत.तसेच नियमांवली व पुजांचे प्रघात, वेळा यात पारदर्शकता तसेच सर्व भाविकांना समान नियम असावेत. गाभारा प्रवेशाबाबत,पुजाविधी यात स्त्री भाविकांना डावलले जाता कामा नये. ४) पंढरपूर देवस्थान विकास आराखड्याच्या धर्तीवर सर्व भाविक, पुजारी मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्व विभाग, वास्तुविशारद ,माध्यम प्रतिनिधी, पोलीस, जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांनी एकत्रितपणे तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा तयार करून तो वित्तीय तरतुदी साठी शासनास पाठवावा. ५) पूर्वापार चालत आलेल्या सर्व परंपरा व पुजा,नित्योपचार,त्यांचे हक्क यामध्ये भाविक, अभ्यासक यांना विश्वासात घेतल्याशिवाय बदल करण्यात येऊ नये. ६) तुळजापूर येथील भक्त निवासासाठी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निधी आणि त्याच्या खर्चाबाबत सद्यस्थिती याची माहिती मिळण्याबाबत संबंधितांना सूचित करावे. ७) मंदिरात धार्मिक ज्ञान व रूढीपरंपरेची माहिती असलेला व्यक्तीची धार्मिक व्यवस्थापकपदी निवड करावी. ८) उपविभागीय अधिकारी दर्जाचा प्रशासकीय व्यवस्थापक या पदावरती तात्काळ नियुक्ती करावी. ९) सन २०१५ ते आजपर्यंतचा भोपे पुजारी यांच्या देविच्या दैनंदिन सेवेचा स्थगित असलेला मावेजा (मोबदला) चालू करावा.
याबाबत सचिव, विधी व न्याय विभाग जिल्हाधिकारी धाराशिव – ऊस्मानाबाद तथा मंदिर समीती अध्यक्ष यांना शासन स्तरावरून आदेशित करण्याबाबत म्हटले आहे.
पुणे-कसबा विधान सभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली असून महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे असे विधानसभा निवडणुक प्रमुख आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या वेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, कसबा मतदार संघातील उमेदवार हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, आर. पी. आय.(आठवले) पुणे शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण, रा. स. प. चे बालाजी पवार, शिवसंग्राम संघटनेचे भारत लगद. लोकजनशक्ती पक्षाचे संजय आल्हाट, पतीत पावन चे स्वप्नील नाईक, संदीप खर्डेकर उपस्थित होते.
सध्या पदयात्रेच्या माध्यमातून प्रचारावर भर देण्यात येत आहे असे नमूद करून त्यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यात जाहिर सभा आणि मेळावे यावर भर दिला जाणार आहे. केंद्रिय मंत्री नितिन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहिर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत सुनियोजित प्रचार चालू असून सर्व कार्यकर्ते एकदीलाने पूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत असे त्यांनी सांगितले. याउलट महाविकास आघाडी पूर्ण गोंधललेली दिसत असून त्यांच्या नेत्यांमध्येच विसंवाद दिसत आहे. त्यांच्यातील सर्व स्तरावरच्या नेत्यांचे मतभेद रोज चव्हाट्यावर येत आहेत अशी टीका माधुरी मिसाळ यांनी केली. पुणे शहरात केलेली विकास कामे घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोचणार आहोत. कसबा मतदार संघ हा मध्य पुण्याचा भाग असून रहदारी, जुन्या वाड्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे हेमंत रासने यांनी सांगितले.
उल्लंघन झाल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द होण्याची कारवाई
पुणे, दिनांक १३ : पुणे जिल्ह्यातील २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मतदानाच्या दिवशी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या २ मार्च २०२३ रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदार संघ क्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री बदं ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड’ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी निर्देशित कालावधीत व मतदार संघात सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या कालावधीत निवडणूक निर्वाचण कार्यक्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करु शकतील. परंतु या कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या बंद कालावधीत मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यासह संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून येत्या ३ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. टेक्सास स्टुडिओज प्रस्तुत, प्रकाश सिंघी निर्मित हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटतर्फे प्रदर्शित होणार आहे.
‘स्पप्नं बघितली तरंच खरी होतात’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरमध्ये सगळे कलाकार एका हूक स्टेपमध्ये दिसत आहेत. साताऱ्यामध्ये राहणाऱ्या एक सामान्य मुलाची ही कथा आहे, जो हिरो बनायचे स्वप्न बघतोय. त्याचे हे स्वप्न पुर्ण होते का, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
पुणे- आपल्याकडे समाजातील प्रत्येक घटक हा परमेश्वराच्या साधनेत सदैव मग्न असतो. वारीमध्ये अबाल वृद्धांसह तरुणांचा लक्षणीय सहभाग असतो. त्यामुळे परमेश्वराप्रतीच्या साधनेत सरवतोपरी मदत करण्याचे आश्वासन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. कोथरूड मतदारसंघातील किष्किंधानगर येथील राजा शिवराय मित्र मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ आणि स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्या माध्यमातून २४ भजनी मंडळांना विणा प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष डॉ संदीप बुटाला, स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्या मनिषा बुटाला ,ह. भ. प. गणेश महाराज भगत, बजरंग शिंदे, स्वातीताई मोहोळ, चंद्रकांत धुमाळ, गणेश सावळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार पाटील म्हणाले की, आपल्या समाजातील प्रत्येक घटक हा अध्यात्माशी जोडला गेलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने परमेश्वराच्या साधनेत मग्न असतो. आषाढ महिना सुरु होताच सर्व वारकऱ्यांना ओढ लागते, ती पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनाची. त्यासाठी श्री क्षेत्र अळंदी आणि श्री क्षेत्र देहू यांसह माऊली आणि तुकोबारायांची पालखी निघते. अबाल-वृद्ध या वारीत मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले असतात. विशेष करुन तरुणांचा सहभाग यात लक्षणीय असतो. ते पुढे म्हणाले की, परमेश्वराची साधनेसाठी प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. गेल्या तीन वर्षात विविध वारकरी भजनी मंडळांना लोकसहभागातून भजनाचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहेच. भविष्यातही वारकरी बांधवांना त्यांच्या भजन साधनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही यावेळी दिली.
यावेळी पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, ते म्हणाले, की किष्किंदानगर मधील पोलीस स्टेशन हे पहिल्या मजल्यावरुन स्थलांतरित करावे, आणि सदर जागेत स्थानिक नागरिकांसाठी कार्यक्रमाचे व्यासपीठ म्हणून विकसीत करावे, अशी मागणी केली. त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मान्यता देत, लवकरच याचा पाठपुरावा करुन काम मार्गी लावण्याचे आश्वस्त केले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह.भ.प. गणेश महाराज भगत यांचा निरुपण कार्यक्रम झाला. या निरुपण सेवेत नामदार पाटील यांनी भाग घेत विठ्ठलाचे नामस्मरण केले.
मुंबई, दि. 13 : उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी या लाटांबाबत पूर्व सूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे आणि आणि प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत आयआयटी मुंबईचे प्रा.परमेश्वर उडमाले यांनी मांडले
पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023 मध्ये उष्णतेच्या लाटांबाबत पूर्वसूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे या चर्चासत्रात प्रा. परमेश्वर उडमाले बोलत होते. यावेळी ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील प्रतिनिधींनी आपले या विषयाच्या अनुषंगाने सादरीकरण केले.
प्रा.परमेश्वर उडमाले म्हणाले की, विविधांगी स्वरूपात उष्ण लाटांचे प्रदेश आहेत, त्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यामध्ये अशा प्रदेशांची माहिती जमा करणे आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक आणि भौतिक अशा स्वरूपाच्या सगळ्या जगण्यावरती याचा परिणाम होत असतो. संवेदनशील भागात नियोजन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी आपल्या राज्यात उष्णतेच्या लाटांसाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच कशाप्रकारे आगामी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. जनजागृतीसाठी माहिती–शिक्षण-संवाद यातून लोकांना उष्णतेच्या कालावधीत होणारी हानी कशाप्रकारे कमी करता येईल, याची माहिती यावेळी दिली.
हवामान संकेतानुसार पिके घ्यावीत
जागतिक हवामान बदलामुळे वाढणाऱ्या उष्म लहरींचा परिणाम कृषी क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून हवामान संकेतानुसार पिके घ्यावीत. पीक विमा घ्यावा, कमी पाण्यातील विविध पीक लागवड करावी, अशा उपाययोजना यावेळी सूचविण्यात आल्या.
अन्न सुरक्षा ही महत्त्वाची बाब असून, बदलत्या हवामानानुसार राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांचे पिकांची लागवड करताना पालन करावे असे सांगून डॉ. विनय सेहगल यांनी शेतीचे वाढत्या उष्म लहरींमुळे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना सांगितल्या.
वाढत्या उष्णलहरींमुळे पाणी व ऊर्जाचे नियोजन कसे करावे याबाबत सीडीआरआय चे महासंचालक अमित प्रोथी यांनी माहिती दिली.
मुंबई, दि. 13 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, रस्ते या पायाभूत सुविधेवर विशेष भर देण्यात येत आहे. मार्च २०२४ पर्यंत मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकीटचे करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी ६५०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबईतून कनेक्टिव्हीटी उत्तम असल्याने आंतरराष्ट्रीय नागरिक, उद्योजक मोठ्या संख्येने येत आहेत, यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचा संकल्प केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दादर येथे टीव्ही ९ च्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार सदा सरवणकर, टीव्ही 9 चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास, संपादक उमेश कुमावत उपस्थित उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, राज्य शासन सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. गेल्या सात महिन्यात जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोरोना काळात बंद पडलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू केले. या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण केले. हा महामार्ग शिर्डीपर्यंत सुरू झाला असून येत्या वर्षाअखेर मुंबईपर्यतचा महामार्ग पूर्ण होईल. यामुळे नागपूर ते मुंबई अंतर 6 ते 7 तासांवर येणार आहे. शेवटचा टप्पा येत्या वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या समृद्धी महामार्गावर 18 ठिकाणी नवीन नोड तयार करण्यात आले असून विविध ठिकाणी उद्योग, लॉजिस्टीक पार्क, फूड पार्क तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे मूल्यवर्धन होईल. पर्यटनाला चालना मिळणार असल्याने लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. महामार्गांवर 33 लाख वृक्ष लागवड करणार असून यामुळे पर्यावरण समतोल राखला जाईल. सुमारे २५० ते ५०० मेगावॅट सोलर वीज तयार करण्याचे उद्दिष्ट असून हा ग्रीन महामार्ग आहे. सर्व प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखून करण्यात येत आहेत.
ट्रान्स हार्बर लिंकमुळे केवळ १५ मिनिटांत रायगड
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मुंबईच्या सुशोभीकरणावर, कोळीवाड्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत असून शिवडी न्हावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबईतून रायगडला केवळ 15 मिनिटांत पोहोचणार आहोत. याठिकाणी ग्रोथ सेंटर, लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप, टेक्नो हब, फार्मा हब बनविणार आहे. याठिकाणचे फ्लेमिंगो इथेच राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
पुणे-मुंबई आठ लेनचा जगातील सर्वात रूंद बोगदा करणार
मुंबईहून पुण्याला घाटातून जाताना वाहतूक समस्या दूर करण्यासाठी जगातील सर्वात रूंद आठ लेनचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल, प्रदूषण कमी होईल, इंधन आणि वेळ वाचणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाची व्याप्ती वाढविणार असून आता नागपूर-मुंबईसह गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, जालना असा महामार्ग जोडणार आहे. तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-सिंधुदुर्ग हा मार्गही हाती घेण्यात येणार आहे. शिवाय नागपूर-गोवा शक्तीपीठ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांचा माल त्वरित मोठ्या बाजारपेठामध्ये पोहोचणार असून माल खराब होण्याची शक्यता कमी होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वर्सोवा-विरार सी-लिंक
मुंबईतल्या व्यक्तीला विरारला पोहोचायला दोन तास लागतात. मात्र वर्सोवा-विरार सी-लिंक पॉईंटमुळे हे अंतर कमी होणार आहे. मुंबईतली व्यक्ती केवळ ४५ मिनिटात विरारला पोहोचणार आहे. हा विकास केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता पालघरसह ग्रामीण भागापर्यंत विकास पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय मेट्रो २ अ, ७ अ सुरू झाल्याने वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. मेट्रो ३ सुरू झाल्यास वेळ, इंधनाची बचत होईल. ३३७ किमी मेट्रोचे जाळे तयार झाल्याने ६० ते ७० लाख कारचा वापर कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून १४७ प्रकारच्या तपासण्या
राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असून मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १०० ठिकाणी सुरू केला आहे. शिवाय २५० आणखी दवाखाने सुरु करणार असून ग्रामीण भागातही प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना सुरू केला आहे. यामाध्यमातून १४७ विविध प्रकारच्या तपासण्या मोफत होणार आहेत. ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ योजनेंतर्गत राज्यातील चार कोटी 39 लाख मातांची तपासणी करून रोगनिदान केले. दुसऱ्या टप्प्यात 0 ते 18 वयोगटातील 3 कोटी मुलांची तपासणी सुरू केली. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन सुरू केले असून प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी उपचार देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
१८ ते २० सिंचन प्रकल्पांना मान्यता
कृषी, पाणी टंचाई यावर शाश्वत उपाय शोधण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकरी आत्महत्या रोखणे, पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणे यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. १८ ते २० सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामुळे अडीच ते पाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करून प्रभावीपणे राबवित आहोत. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी नदी जोड प्रकल्प हाती घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.
दाओस येथील आर्थिक फोरममध्ये दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. उद्योगस्नेही धोरण ठेवल्याने अनेक नवीन उद्योग राज्यात येत आहेत. महाराष्ट्रात कौशल्य असलेले मनुष्यबळ, कनेक्टिव्हीटी असल्याने मोठ्या प्रमाणात थेट गुंतवणूक होत आहे. उद्योगांनी राज्यात यावे यासाठी त्यांना जलद गतीने परवानग्या देण्यात येत आहे. सर्व सवलती देण्यात येत असून एक खिडकी योजनेतून सर्व प्रकारच्या परवानग्या देत आहोत. उद्योगांना पोषक वातावरण देण्यात येत असून यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ऊस उत्पादक शेतकरी, सहकार, चित्रपट उद्योग यासाठी सवलती देऊन राज्य शासन सहकार्य करीत आहे. मुंबईतील रखडलेले प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येत आहे. जनहिताच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सडेतोड उत्तरे दिली.
पुणे-पुण्यात गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील गुगल कार्यालयाला फोन करुन एकाने ही धमकी दिली. तर, मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्तांना एकाने फोन करुन मिरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी दिली आहे.
हैदराबाद येथून एक जण ताब्यात
राज्यात एकाच दिवशी धमकीचे दोन कॉल आल्याने पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे. पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास हैदराबाद येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर, मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्तांना फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव यशवंत माने, असे सांगितले आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पोलिसांना रात्री 2 वाजता फोन
मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्तांना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव यशवंत माने सांगितले आहे. मीरा-भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे. बॉम्बस्फोट रोखायचे असेल तर तातडीने पोलिसांना तेथे पाठवा, अशी धमकी या व्यक्तीने दिली.
सहायक पोलिस आयुक्तांनी अधिक माहिती विचारली असता त्याने शिवीगाळ करून फोन कट केल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक आयुक्तांनी तातडीने मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर मीरा-भाईंदर पोलिसांना तातडीने अलर्ट करण्यात आले. पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सहायक पोलिस आयुक्तांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी पोलिस करत आहेत.
कोरेगाव पार्क परिसरात खळबळ
पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणारा एक फोनही काल रात्री करण्यात आला होता. त्यामुळे गुगलचे ऑफिस असणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली. फोन येताच बॉम्ब शोधक पथकाने गुगलच्या कार्यालयाची संपूर्ण तपासणी केली. तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
दारूच्या नशेत केला फोन
ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता त्याला आता पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, 45 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत हा फोन केला होता. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात राहतो. दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद आहेत. याच गोष्टीचा राग मनात धरून भावाला त्रास व्हावा, या उद्देशाने थेट गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली होती. पोलिस अधिक तपास करत आहेत.
कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करून सत्तेचा माज उतरवा !: नाना पटोले
मविआचे उमेदवार नाना काटेंच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये संयुक्त प्रचार सभा.
चिंचवड दि. १३ फेब्रुवारी भारतीय जनता पक्षाचे मंत्री, नेते हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. भाजपाकडून केला जात असलेला हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागलेत तर भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे, हा सत्तेचा माज कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उतरवून भाजपाला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. कसबा पेठ व चिंचवडच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा चिंचवड येथे पार पडली. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार व शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असा खोटा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतच महाराष्ट्राची बदनामी केली. कोरोना काळात भाजपाचे सरकार झोपले होते तर महाविकास आघाडीच्या सरकारनेच लोकांना आधार दिला, मदत पोहचवली. राज्यपाल, भाजपाचे मंत्री यांच्या माध्यमातून आपले महापुरुष व महाराष्ट्राची सातत्याने बदनामी केली. राहुलजी गांधी यांच्या बदनामीसाठी तर भाजपा व त्यांचा आयटी सेल कोट्यवधी रुपये खर्च करते पण राहुलजी त्याला घाबरले नाहीत. भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार परवा म्हणाले की, राहुल गांधी व नरेंद्र मोदींमध्ये खूप फरक आहे, त्यांची तुलना होऊ शकत नाही. त्यांचा समाचार घेत पटोले म्हणाले की, मुनगंटीवार खरे तेच बोलले. राहुलजी व मोदी यांची तुलना करताच येत नाही कारण राहुल गांधी देश जोडण्याचे काम करत आहेत तर नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करत आहेत, शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे काम करत आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर ३ हजार ५०० किमीची पदयात्रा काढली, जनतेच्या समस्या ऐकल्या, त्यांना धीर दिला, हिम्मत दिली. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून फक्त देशाची संपत्ती एक-एक करून विकून देश चालवत आहेत. संविधान व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहेत. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटत आहेत, छोटे व्यापारी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहेत. म्हणून राहुलजी गांधी व नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊच शकत नाही, असा टोला लगावला. केंद्रातील भाजपाचे सरकार सामान्य जनतेच्या घामाचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून जमा करते व उद्योगपती मित्रांचे कर्ज फेडते. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकतो, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देतो, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो अशी आश्वासने देऊन नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि नंतर तो निवडणुकीतला जुमला होता असे म्हणून जनतेच्या फसवणूक केली. पिंपरी चिंचवडच्या विकासात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान मोठे आहे. आघाडी सरकार असताना या भागात विकासाची कामे केली. मविआ सरकारनेही हा विकास पुढे सुरु ठेवला होता पण तथाकथीत महाशक्तीच्या मदतीने मविआचे सरकार पाडले, बेईमानी करून सरकार पाडले. आता तुम्हाला संधी आली आहे ती भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात उभे राहण्याची. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतांची तलवार दिली आहे तिचा आता वापर करा आणि मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर व नाना काटे यांना बहुमताने विजयी करा व भाजपाला महाविकास आघाडीची शक्ती दाखवून द्या, असेही नाना पटोले म्हणाले.
पाणीपुरवठा, पार्किंग, जुन्या वाड्यांचे प्रश्न,अरुंद रस्ते व वाहतूक कोंडी प्रश्न जैसेथे च का ?
पुणे-शहराच्या मध्यभागी असणारा आपला कसबा विधानसभा मतदारसंघ आता सर्वप्रकारच्या नागरी प्रश्नांचे आगर बनला असून, त्यामुळेच भाजपाला विचारावेसे वाटते की कुठे नेऊन ठेवले आपल्या कसब्याला? केंद्रात, राज्यात व पुण्यातही भाजपा सत्तेवर असतानाही कसब्याचे प्रश्न का सोडविले नाहीत? अरुंद रस्ते व वाहतूक कोंडी, कमी दाबाने पाणीपुरवठा, पार्किंग, जुन्या वाड्यांचे प्रश्न, मध्यवर्ती बाजारपेठेचे प्रश्न, भाजीमंडई व मिनिमार्केटचे प्रश्न असे असंख्य प्रश्न असतानाही आणि आमदार व सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे असतानाही त्यांच्या निष्क्रीयतेमुळेच कसबा मतदारसंघातील नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. महाविकास आघाडीतर्फे मात्र हे प्रश्न सोडविणे हाच माझा अजेंडा असेल, असे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले, पदयात्रा संपल्यानंतर ते बोलत होते.
आज सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी नारायण पेठेतील मुरलीधर भोजनालय येथून पदयात्रेस सुरुवात झाली. कॉंग्रेसचे गोपाळ तिवारी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पदयात्रेस सुरुवात झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रारंभी गोपाळ तिवारी यांनी पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ देऊन धंगेकर यांचा सत्कार केला. यावेळी ब्राम्हण समाजाचे अनेक स्त्री- पुरुष सहभागी होते. तिन्ही पक्षाचे झेंडे, धंगेकरांचे कटआउट्स यासह पदयात्रा निघाली. पदयात्रेच्या प्रारंभी धंगेकरांच्या पदयात्रेची माहिती सांगणारी रिक्षा व पाठोपाठ शेकडो कार्यकर्ते अशी ही पदयात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात होते. या पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, कमलताई व्यवहारे, दीप्ती चवधरी, लता राजगुरू, वैशाली मराठे, नीता परदेशी, संगीता तिवारी, अंजली सोलापुरे, गौरव बोऱ्हाडे, साहिल राऊत, ऋषिकेश मिरकर, नाना करपे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश नलावडे, रोहन पायगुडे, अजिंक्य पाटकर, स्वप्नील थोरवे, संजय मते, राहुल पायगुडे, अरुण गवळे, संतोष बनकर, दीपक पोकळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल येनपुरे, परेश खांडके, धनंजय देशमुख, संदीप गायकवाड, निरंजन दाभेकर, नितीन परदेशी, राजेंद्र शिंदे, सतीश वाघमारे आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. नारायण पेठ व शनिवार पेठ येथून सर्व प्रमुख रस्त्यांवरून जाताना अनेक स्थानिक नागरिक पुढे येऊन धंगेकरांशी हस्तांदोलन करत होते. ‘यावेळी बदल निश्चित करणार’ असे सांगत ते धंगेकरांना पाठींबा देत होते.
नारायण पेठेतील कबीर बागेत घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुठेश्वर मंडळाने त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त स्वानंदी भजनी मंडळाच्या भगिनींनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी मंडळाचे गणेश भोकरे यांनी ‘धंगेकर हे सर्वसामान्यांचे कार्यकर्ते आहेत आणि विकासाची त्यांना दृष्टी व धमक आहे’ असे सांगितले.
पुढे आनंद तरुण मंडळाचे स्वप्नील थोरवे यांनी शिंदेशाही पगडी, शाल व श्रीफळ देऊन धंगेकरांचा सत्कार केला. तेव्हा उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर हसबनीस बखळ सार्वजनिक मंडळातर्फे धंगेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर भारत मित्र मंडळातर्फे फटाक्यांच्या आतषबाजी करून स्वागत झाले. त्यावेळी बाळासाहेब दाभेकर यांनी त्यांचा भव्य सत्कार करून ते या पदयात्रेत सहभागी झाले. सदाशिव पेठ नवरात्र महोत्सवतर्फे त्यांना फेटा बांधून त्यांचा सत्कार एकला गेला. चौकाचौकात त्यांचे जोरदार स्वागत होत होते. नागरिक स्वतःहून पदयात्रेत सहभागी होत होते. अखेरीस चार तासानंतर ही पदयात्रा खजिना विहिर येथे संपली.
रविवार दि.१२ फेब्रुवारी संध्याकाळी ४:०० वाजता प्रभाग क्र.१८ मधील श्रीनाथ मंडळ खडकमाळ आळी येथून या पदयात्रेस प्रारंभ झाला. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत होता. लाउड स्पीकरवरील घोषणा त्यात भर घालत होत्या. तिन्ही पक्षांचे झेंडे धंगेकर यांचे बॅनर्स व पोस्टर्स यामुळे वातावरण निवडणूकमय झाले होते. या पदयात्रेत कॉंग्रेसचे कमल व्यवहारे, संजय बालगुडे, विनय ढेरे, आयुब पठाण, उमेश काची, हेरॉल्ड मॅसी, अश्फाक शेख, हेमंत राजभोज, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, हेमंत येवलेकर, हर्शल भोसले, गणेश माकम, गणेश नलावडे, शिल्पा भोसले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे चंदन साळुंखे, संदीप गायकवाड, रुपेश पवार, अनिकेत थोरात, सागर गंजकर, पंकज भरीदे, मनोज परदेशी, संतोष गायकवाड, चंद्रकांत रणदिवे, अनिल खेंगडे, नितीन दलभंजन आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण सहभागी झाल्यानंतर कार्यकर्त्यांना अधिकच जोश आला. ‘धंगेकर झिंदाबाद’च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. मामलेदार कचेरीची मागील बाजू, पांगघंटी चौक, धनगर आळी मार्गे वालवार आळी येथे पदयात्रेची सांगता झाली.