Home Blog Page 1402

अमित शहांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

पुणे-गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी आहेत. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर अमित शहांनी त्यांची भेट घत तब्येतीची विचारपूस केली.कसबा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकृती ठीक नसतानाही गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची चर्चा होती. अमित शहांच्या भेटीनंतर गिरीश बापट यांची प्रकृती आता उत्तम असल्याचे त्यांचा मुलगा गौरव बापट यांनी सांगितले.पुणे दौऱ्यावर आल्यानंतर अमित शाहांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. “आपण लवकर बरे व्हा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या” असेही बापट यांना म्हणाले. यावेळी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.

गिरीश बापट यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळेस डायलिसिस करण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. याचा अर्थ त्यांना प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल केले असा होत नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यांची प्रकृती उत्तम आहे हळूहळू सुधारणा होत आहे फक्त थोडा आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे गौरव बापट यांनी सांगितले

सभागृहात बापट साहेब संसदीय मंत्री असताना कुठलेही बिल पास करताना काय काय गमतीजमती होत असत, सभागृहात असताना आम्ही कसे एकत्र दिवस काढले अशा चर्चा अमित शहा आणि बापट यांच्यात झाल्याची माहिती गौरव बापट यांनी दिली. या भेटीत कसबा पोटनिवडणूकीच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाहीअसेही ते म्हणाले

शासकीय कार्यक्रमांचे पासेस देण्यात दुजाभाव :वशिलेबाजी

पुणे- पुण्यातील शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळा आणि पुण्यातील शिवसृष्टीचा सोहळा या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहणाय्साठी दिल्या जाणाऱ्या पासेस बाबत शासकीय अधिकारी आणि काही व्यक्ती ,संस्था यांनी दुजाभाव आणि गटबाजी केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान यातील शिवनेरी वरील बाब लक्षात येताच संभाजीराजे छत्रपती यांनी संबधितांना खडेबोल सुनावले आहेत .

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीदिनी शिवनेरीवर आयोजित शासकीय कार्यक्रमात जाण्यासाठी VIP पासेस बंधनकारक का करण्यात आले? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.तसेच, शिवप्रेमींसोबत दुजाभाव करू नका. सर्वांना शिवरायांच्या दर्शनाचा अधिकार आहे, असे खडेबोलही त्यांनी राज्य सरकारला सुनावले.

आज शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा सुरू असताना शिवप्रेमींना बाहेरच अडवले गेले. त्याचवेळी संभाजीराजे छत्रपती शिवनेरीवर येत असताना शिवप्रेमींनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर जोपर्यंत या शिवप्रेमींना आत जाऊ दिले जात नाही, तोपर्यंत आपणही शिवनेरीवर जाणार नाही, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. त्यामुळे काही काळ शिवनेरीच्या पायथ्याशी गदारोळ झाला.

ज्यांना वशिला, त्यांनाच पास

शिवनेरीवर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, आज शिवरायांच्या दर्शनासाठी राज्याच्या ठिकठिकाणाहून नागरिक आले आहेत. रात्री 12 वाजेपासून ते शिवनेरीवर आहेत. अशात VIP पास दाखवून शिवनेरीवर प्रवेश कसा काय दिला जात आहे? ज्यांना वशिला त्यांनाच VIP पास दिला जात आहे. मग सामान्य शिवप्रेमींनी काय करायचे?

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार प्रवीण दरेकर, अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी येऊन दर्शन घेणे रोमांचक अनुभव आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. आज घराघरात शिवजयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकीक कार्याची आठवण प्रत्येकाच्या मनात सतत रहाते. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करतो. त्यांच्या विचारानुसार राज्य शासन सर्वसामान्य, गोरगरीब आदी सर्व घटकांसाठी काम करीत आहे.

  • शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान*
    महाराजांचा आदर्श केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळे महाराजांनी बाणेदारपणे औरंगजेबाला उत्तर दिले त्या आग्राच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. राज्य शासन पर्यटन विभागामार्फत शिवनेरीच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करीत आहे. शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान आहे.

शक्ती आणि युक्तीच्या आधारे स्वराज्याची निर्मिती
शक्ती आणि युक्ती ही दोन शस्त्रे महाराजांच्या रणनितीचा भाग होती. त्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, प्रजेचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न केले. रयतेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. रयतेच्या रक्षणासाठी, हितासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही. दूरदृष्टीने गडकोट बांधले. ते कुशल प्रशासक, संघटक होते. त्यांनी शेती, सिंचन, शिक्षण, भाषा, महसूली, शासन, प्रशासनाच्या अनेक योजना आखल्या. समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतली. त्यांच्या पराक्रमापुढे परकियांच्या माना झुकल्या. पेशावर ते तंजावरपर्यंत छत्रपतींचा भगवा डौलाने फडकला, असा गौरवोद्गार श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत पूर्ण होईल
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले, परिसराचा विकास आराखडा वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. वढू, तुळापूरचाही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल. शिवनेरी येथे शिवप्रभुंचे दर्शन घ्यायला कोणालाही अडथळा, बंदी नसेल शिवजन्मोत्सवाचे अधिक चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवरायांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बृहद कार्यक्रम- उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवराय होते म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, मानाने जगतो. शासनाने सर्व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दरवर्षी ३ टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. किल्ल्याच्या वेगळ्या निधीव्यतिरिक्त हा निधी असल्याने संवर्धनासाठी निधीची कमतरता नसेल. शिवजन्मस्थानाच्या दर्शनाबाबत योग्य नियोजन करण्यात येईल.

शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासंदर्भात बृहद असा कार्यक्रम सरकारने हाती घेतला असून १ वर्ष सातत्याने महाराजांचा विचार, स्मारके आणि महाराजांचे तेज जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सरकार करेल. रायगड येथे उत्खननात वेगवेगळ्या गोष्टी सापडत असून नवा इतिहास समोर येत आहेत. अशाच प्रकारचे काम शिवनेरी येथेही होईल. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या राजा वढू, तुळापूर साठी ३९७ कोटी रुपयांचा आराखडा केला असून तेथेही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

यावेळी जुन्नर येथील छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाड्याच्या पथकाने मर्दानी खेळांचे चित्तथरारक सादरीकरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिवनेरी भूषण पुरस्कार ह.भ.प. नामदेव महाराज घोलप यांना मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. आयर्नमन म्हणून पुरस्कार मिळवलेल्या मंगेश चंद्रचूड कोल्हे तसेच खेळाडू संदेश नामदेव भोईर यांनाही शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मिलिंद मधुकर क्षीरसागर यांना देण्यात आला. यावेळी ‘शिवचरित्रातून काय शिकावे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबल यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

पालकमंत्री यांच्याकडून शिवाजी महाराजांना वंदन
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवानिमित्त बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन शिवरायांना वंदन केले.

शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्लू टिक गेलं:निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अधिकृत वेबसाईटही बंद

0

फेसबुक ने मात्र अद्याप ब्लू टिक काढलेले नाही .यु ट्यूब ने वेरीफाईड टिक काढली

मुंबई-केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेचे अधिकृत ट्विटर हँडलचे ‘ब्लू टिक’ गेले आहे. दुसरीकडे शिवसेनेची अधिकृत वेबसाईटही बंद पडल्याचे पहायला मिळत आहे.शिवसेना नाव व चिन्ह गेल्याने अधिकृत सोशल मिडीया अकाऊंटवर मोठे बदल करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गट येत्या काळात वेबसाईटच्या नावाबाबत बदल करणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस ,अमित शाह , नरेंद्र मोदी यांनी आपापली आपल्या नावाने सोशल मिडीया अकाऊंट चालविलेले आहेत त्याप्रमाणेच आता उद्धव आणि आदित्य ला या माध्यमांचा नव्याने वापर करणे सुरु करावे लागणार आहे.

आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पक्षनावावरील दावा संपला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे केले. शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरील नाव बदलल्याने ट्विटरच्या नियमांनुसार ठाकरे गटाला ब्लू टिकसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.ट्विटरच्या नियमांनुसार कोणतेही हँडल अधिकृत आहे की नाही हे तपासले जाते व त्यानंतर त्याला ब्लू टिक देण्यात येते. एकदा ब्लू टिक मिळाल्यानंतर काही बदल खातेदाराला कधीही करता येतात. त्याचा ब्लू टिकवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, अधिकृत झालेल्या आणि ब्लू टिक मिळालेल्या खात्याचे हँडल नेम बदलले तर ट्विटर संबंधित खात्याचे ब्लू टिक काढते. त्यामुळे पुन्हा ब्लू टिक हवे मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो

आझम कॅम्पस  ते लाल महाल मार्गावर शिवाजी महाराजांना अभिवादन,९ हजार विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग 

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.  रविवार, दि. १९ फेब्रुवारी  २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठा ‘चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला.  एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख , एस.ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख , असीफ शेख,शाहीद शेख, बबलू सय्यद,तसेच विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट अॅण्ड लायब्ररी, अवामी महाझ या संस्थांनी सहभाग घेतला. पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी  यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी  शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली . एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले,

मिरवणुकीचे हे २२ वे वर्ष होते. आझम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग होता.  पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्युट, जूना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, संत नरपतगीरी चौक, नाना चावडी चौक, अरुणा चौक, अल्पना टॉकीज, डुल्या मारूती चौक, तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके चौक मार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता झाली.  मिरवणूकीत आझम कॅम्पस परिवारातील विद्यार्थी, शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशांचे पथक, शोभीवंत बैलगाडीत शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा, तुतारी, नगारे देखील सहभागी झाले.’शिवाजीमहाराज :सर्व धर्मियांचे राजे’,’छत्रपती शिवाजी महाराज :हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक’ असे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.

शिवसेना – धनुष्यबाणासाठी 2 हजार कोटींचा सौदा-संजय राऊत

मुंबई

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आरोप प्रत्यारोप होत असताना संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हिसकवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे संजय राऊत म्हणाले. काल (18 फेब्रुवारी) उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ बाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधन केल्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने शिवसेना आणि शिवसेनेचे चिन्ह आमच्याकडून हिसकावून घेण्यात आले तो न्याय नाही, सत्य नाही, असे मी ट्विट करून देशाला कळवले आहे. हा व्यवहाराचा व्यवसाय झाला आहे. तो विकत घेतला गेला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 2 हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हिसकावण्यासाठी 2000 कोटी रुपये खर्च झाले, ही माझी प्राथमिक माहिती आहे. हा निवाडा विकत घेतला आहे.

6 महिन्यांत झाले व्यवहार

संजय राऊत म्हणाले, सहा महिन्यांत 2 हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. बेईमान लोकांचा एक गट आमदार खरेदीसाठी 50 कोटी, खासदार खरेदी करण्यासाठी 100 कोटी, नगरसेवक खरेदी करण्यासाठी 1 कोटी आणि शाखाप्रमुख घेण्यासाठी 50 लाख खर्च करू शकतो. पक्षाचे नाव आणि लक्ष्य मिळविण्यासाठी तो किती बोली लावू शकतो, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. माझा अंदाज आहे की आतापर्यंत 2000 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मी या दाव्यावर ठाम आहे.

तब्बल ९१ स्वराज्यरथांसह पुण्यात अवतरली शिवशाही

शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ९१ स्वराज्यरथ… महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… ५१ रणशिंगांची ललकारी… नादब्रह्म ढोलताशा पथकाचा रणगजर… सनई-चौघडयांचे मंगलमय सूर… हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.


निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती तर्फे लालमहाल पासून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. मिरवणुकीचे उद्घाटन शिवरायांचे वंशज आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊशहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत झाले. मिरवणुकीचे यंदा ११ वे वर्ष आहे. 
सोहळ्यामध्ये अटकेपार झेंडा फडकवणारे पानिपत वीर मानाजी पायगुडे यांच्या पुतळ्याचे तसेच सरनौबत येसाजी कंक यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणा-या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर केली. नादब्रह्म ढोलताशा पथकाच्या जल्लोषपुर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, गोपी पवार, संजूभाऊ पासलकर, समीर जाधवराव, प्रवीणभैय्या गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर , मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

* मिरवणुकीत तब्बल ९१ स्वराज्यरथ व स्वराज्यघराण्यांचा सहभाग
मिरवणुकीत मानाचा मुख्य रथ जिजाऊ मॉंसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, सरदार करंजावणे देशमुख, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुयार्जी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दयार्सारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव,, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे,  स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे,शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे,पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, सरदार फडतरे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले. 

गुंडगिरी व दडपशाहीला मतदार थारा देणार नाहीत-  सतेज पाटील

पुणे–

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मिळत असलेल्या वाढत्या पाठींब्यामुळे भाजप नेत्यांची धावपळ सुरू आहे. राज्यासह केंद्रातील मंत्री मतदारसंघात तळ ठोकून आहेत. पंचवीस वर्षापासून एकहाती सत्ता असलेला मतदार संघ हातातून जात असल्याचे पाहुन आता ते गुन्हेगारांचा आधार घेत आहेत, असा आरोप राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी केला. कसब्यातील सुजान आणि सुशिक्षित मतदार भाजपच्या दडपशाहीला व गुंडगिरीला थारा देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले, कसबा मतदार संघात १९९५ पासून भाजपचे आमदार निवडून येत आहेत. या काळात भाजपने मतदार संघातील कामेच केली नाहीत. आता ते मतदार संघातील कामे करण्यासाठी निवडून देण्याची भाषा करत आहेत. ज्यांनी आजवर कामे केली नाहीत, ते आता काय कामे करणार, हे मतदारांनी ओळखल्याने जनतेच्या हाकेला धावून जाणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जनतेचा मोठा पाठींबा मिळत आहे. धंगेकरांचा वाढता पाठिंबा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मतदार आमिषाला बळी पडत नाही पाहून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना घेऊन मंत्री फिरत आहेत त्यासोबत  मोकातील आरोपी असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. कसब्यातील मतदार सुज्ञ आहे. तो अशा गोष्टी सहन करणार नाही आणि धंगेकर यांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगले वातावरण आहे. ही निवडणूक आगामी महापालिका निवडणुकीसाठी निर्णायक राहील. काँग्रेसचे मित्र पक्ष देखील ताकदीने धंगेकरांच्या मागे उभे आहेत. सिलेंडर चे दर कमी करा, अशी मागणी महिला करत आहेत. विविध वस्तूंच्या महागाईचे प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम भाजपला भोगावा लागणार आहे. मतदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास गमावला आहे. त्यामुळे सहानुभुती नसल्याने आजारी असतानाही खासदार गिरीष बापट यांना प्रचारात उतरवण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयामुळे उद्भव ठाकरे यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती वाढली आहे. एखादा पक्षच दुसरीकडे देणे हे येथील लोकांना सहन होणारे नाही. आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. शिवसैनिक चवताळून उठला आहे. याचा फायदा महाविकास आघडीला होईल, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, जनता दल सेक्युलर, लोकराज्य जनता पार्टी, वर्ल्ड ह्यूमन राईट,  छावा संघटनेने महाविकास आघडीचे उमेदवार धंगेकर यांना पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या मेळाव्यात

रवींद्र धंगेकरांना पाठींबा

महाराष्ट्रात गेल्या ६-७ महिन्यात सत्तेच्या संदर्भात जी खालची पातळी गाठली गेली त्यामुळे राजकीय स्तर घसरल्याचे सर्वांना जाणवले आहे. अशावेळी सुशिक्षित समाजातील नागरिकांनी पुढे येऊन प्रामाणिक व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या उमेदवारास निवडून देण्याची गरज आहे. कसब्याचा चेहरा-मोहरा ते बदलू शकतील आणि त्यामुळेच कसबा मतदार संघातील जनता १०० टक्के त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास सर्वांना आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉक्टर सेलतर्फे रवींद्र धंगेकर यांना पाठींबा देत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथे झालेल्या राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या डॉक्टरांच्या मेळाव्यात एकमताने ठरवण्यात आले. या मेळाव्यात सुमारे १०० हून अधिक स्त्री-पुरुष डॉक्टर्स उपस्थित होते. कसबा विधानसभा मतदार संघातील डॉक्टरांकडे येणारे अनेक पेशंट्स गेल्या २५ वर्षात भाजपाने कसब्याचा विकास केला नाही, मुलभूत नागरी सुविधांचा विकास केला नाही. अशा तक्रारी करताना दिसतात.  कसब्यातील जुण्या वाड्यांचा प्रश्न बिकट असून अनुषंगिक बदल करून नवे कायदे करून वाड्यांच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न भाजपाने सोडविला नाही. हाच सूर अनेक पेशंटच्या बोलण्यात दिसून येत असतो असे अनेक डॉक्टर वक्त्यांनी नमूद करून म्हटले की, या सर्व पेशंटना कसब्यात बदल हवा आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या सुसंस्कृत उमेदवाराच्या विरुद्ध केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राच्या मंत्री मंडळातील मंत्री एकत्र ताकद लावत आहेत. यावरूनच धंगेकरांची लोकप्रियता दिसून येत असून त्यांना आम्ही निश्चित मत देणार असे पेशंट सांगतात असे अनेक डॉक्टरांनी आपल्या भाषणात सांगितले.

प्रारंभी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे शहर अध्यक्ष डॉ. शशिकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी आपल्या भाषणात सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे रवींद्र धंगेकर यांना पाठींबा देत असल्याचे सांगितले. याप्रसंगी उमेदवार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या सर्व डॉक्टरांची भेट घेतली. या मेळाव्यात डॉ.परशुराम सूर्यवंशी, डॉ.सुनील होनराव, डॉ.शशिकांत कदम, डॉ.सुनील जगताप, डॉ.हेमंत तुसे, डॉ.राजेश साठे, यांची भाषणे झाली. डॉ.नितीन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

भारतीय विद्या भवनच्या’शिवार्पणम’ ला चांगला प्रतिसाद

भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः
महाशिवरात्रीचे औचित्य साधून‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ शिवार्पणम ‘  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणांना चांगला प्रतिसाद मिळाला.नृत्यगुरू अनुजा बाठे यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम शिवांजली डान्स अॅकॅडमीने सादर केला.शनिवार , १८ फेब्रवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.
उडुपी येथील साई अन्नपूर्णी सुधाकर यांनी  भरतनाट्यम सादर केले. उडुपी,मुंबई,ठाणे येथील कलाकार सहभागी झाले. अनुश्री कृष्णन,तन्वी बापट,अथर्व कुलकर्णी यांनी भरतनाट्यम सादर केले.सृष्टी हिरवे,युक्ता जोशी,नम्रता पाटील,केया शाह यांनी कथक सादर केले. आर्यही देशमुख,शुभवी जोशी,पुष्कला शास्त्री या अनुजा बाठे यांच्या शिष्यानी  भरतनाट्यमच्या विशेष रचना  सादर केल्या. नृत्य प्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवर गुरु या कार्यक्रमाला उपस्थित होते.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५० वा कार्यक्रम होता . हा कार्यक्रम विनामूल्य होता. 
नृत्यपुष्पांजली , शिवपंचाक्षर स्तोत्र, शिव कौतुकम्

आद्य नृत्यप्रेरणा मानल्या गेलेल्या नटराज रुपी शिवशंकराला नमन करून सुरुवातीला नृत्य पुष्पांजली सादर करण्यात आली. या पुष्पांजलीला विशेष दाद मिळाली.सृष्टी हिरवे यांनी ‘ महादेव शिव शंभो ‘ ही रचना सादर केली.अनुश्री कृष्णन यांनी ‘शिवपंचाक्षर स्तोत्र ‘ सादर केले. आणि वाहवा मिळवली.युक्ता जोशी यांनी शिवतांडव स्तोत्र अत्यंत प्रभावीपणे सादर केले.उडुपीवरून आलेल्या साई अन्नपूर्णी सुधाकर हिने जालंधर कथा सादर केली.नम्रता पाटील, केया शाह ( मुंबई ) यांनी शिव ध्रुपद सादर केले. या कार्यक्रमातील अर्धनारीश्वर स्तोत्र सादरीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तन्वी बापट यांनी शिव पदम आणि अथर्व कुलकर्णी या युवा भरतनाटयम कलाकाराने पारंपारिक शिव कोटुकम् प्रभावीपणे  सादर केले.

महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड व मुखवटा     

पुणे : सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजा लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात साकारण्यात आली. तब्बल १०१  किलो चक्का वापरून शंकराची पिंड व मुखवटा तयार करण्यात आला होता.

बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली. शिल्पकार सचिन जोशी यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष  अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उपउत्सवप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे,  अक्षय हलवाई  आदी उपस्थित होते.

शिल्पकार सचिन जोशी  यांसह मंदिरातील सेवेकरी  उमेश धर्माधिकारी, युवराज पवार, वैभव निलाखे, प्रभावती नांगरे, दैवशाली होनराव, शोभा गादेकर, कल्लाप्पा घेरडे यांनी चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास तीन तासात साकारली. रमेश राजहंस गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी  म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. भगवान शंकराचा केलेला मुखवटा हे विशेष आकर्षण होते.

कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार  म्हणाले, सुकामेवा, द्राक्षे, नारळ यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे. या चक्क्याचे श्रीखंड करुन हा प्रसाद मंदिरात येणा-या भाविकांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन

पुणे, दि.१८: राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी सारंग कोडेलकर, पर्यटन सहसंचालक सुप्रिया करमरकर-दातार, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आदी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी सुरुवातीला जुन्नरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ‘शिवजन्मभूमी जुन्नर’ या सेल्फी पॉईंटचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिवकालीन लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिवकालिन गाव’चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये तत्कालीन गवताची घरे, लोहारकाम, कैकाडी, कुंभारकाम आदी व्यवसाय, आदिवासी तरपा नृत्य, वासुदेव, गोंधळी परंपरा, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या गावामध्ये बनविण्यात आलेली शिवकालीन बाजारपेठ आकर्षण उपस्थितांचे आकर्षण बनून राहिली. यामध्ये मंत्री लोढा यांनी बांबूची टोपली खरेदी केली. यावेळी तसेच http://www.hindaviswarajya.info/ या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी आदिवासी तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत फेर धरला.

यानंतर मंत्री श्री.लोढा यांनी शरद बुट्टे पाटील क्रीडांगण येथे बचत गट प्रदर्शन, महाशिवआरती कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणी भेट दिली.

आता उद्धव ठाकरेंच्या आमदारांची कोंडी करणार एकनाथ शिंदेंचा व्हीप

व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

मुंबई-उद्धव ठाकरे यांच्या मागे लागलेले लचांड काही केल्या कमी होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ठाकरे गटातील आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हीप लागू होणार आहे, तो जर त्यांनी पाळला नाही तर त्यांची आमदारकी जावू शकते, असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

शिवसेनेचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना पाळावा लागणार आहे. व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. यामुळे आता होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदित्य ठाकरेंनाही भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हीप लागू होणार आहे.

उद्धव ठाकरे गटाकडे 4 खासदार आहेत. त्यापैकी काही आमदार आणि खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. 14 आमदारांना अपात्र करा, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. जर व्हीपची अमंलबजावणी केली नाही, तर निलंबनाची कारवाई होणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोरोनात दोन वर्षे आराम केला. तो यापुढेही करावा, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

उत्तर भारतातील पहिला अणूऊर्जा प्रकल्प, राजधानी दिल्लीपासून 150 किमी अंतरावर

0

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली- उत्तर भारतातील पहिला अणूऊर्जा प्रकल्प हरियाणामध्ये, राजधानी दिल्लीपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर, उत्तर दिशेला असलेल्या गोरखपूर शहरात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.  या संदर्भात आज माहिती देतांना ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील एक महत्वाची कामगिरी म्हणजे, देशाच्या इतर भागातही अणूऊर्जेचे प्रकल्प उभारले जात आहेत. पूर्वी हे प्रकल्प केवळ देशाच्या दक्षिण भागातच म्हणजे तामिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा पश्चिमेत महाराष्ट्रात होत असत, मात्र आता ते इतर भागातही होणार आहेत.

भारताच्या आण्विक ऊर्जा क्षमता वाढवण्याची क्षमता वाढवण्याच्या आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमानुसारच हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. या दृष्टीने, गेल्या आठ वर्षात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. 10 अणूभट्टया स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने सामूहिक मंजुऱ्या दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सरकारच्या अणूऊर्जा विभागालाही अणुउर्जा प्रकल्प उभारण्यासाठी स्त्रोतांकरिता   सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत संयुक्त प्रकल्प उभारण्याबद्दल मंजूरी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देशाची भविष्यातील ऊर्जाविषयक गरज भागवण्याची क्षमता असून, हे भविष्यातील एक उत्तम आणि आशादायी क्षेत्र आहे, असे ते पुढे म्हणाले.

गोरखपूर हरियाणा अणू विद्युत प्रकल्पाची (GHAVP) क्षमता, प्रत्येकी 700 मेगावॉटचे दोन युनिट्स इतकी असणार आहे. त्यासाठी भारतीय बनावटीचे, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (PHWR) बनवण्याचे काम हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात गोरखपूर गावात सुरू आहे. आतापर्यंत यासाठीच्या एकूण 20,594 कोटी रुपये ह्या मंजूर निधीपैकी 4,906 कोटी रुपये निधी खर्च (आजवरची एकूण वित्तीय प्रगती 23.8% इतकी) करण्यात आला आहे.

‘शिवसेना आमच्या ठाकरेंची :नाही गद्दारांच्या बापाची’निवडणूक आयोगाच्या …..

पुण्यात जोरदार निदर्शेने, महापालिका निवडणुका लांबविण्याच्या कृत्यामागेही आयोगाचा हाथ असल्याचा संशय

पुणे – सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देखील रात्रीत निवडणूक आयोगाच्या मार्फत मिंधे सरकारने शिवसेनेचे धनुष्यबाणावर घाला घातला. मिंधे सरकारने धनुष्य जरी चोरून नेले असले तरी सच्चा शिवसैनिक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्री बरोबर एकनिष्ठ आहे. भविष्यात मिंधे सरकारला त्यांची जागा दाखवल्या शिवाय सच्चा शिवसैनिक गप्प बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रीय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने काल (दि. १७) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळळी असून, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या निशेधार्थ पुणे शहर शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक येथे निदर्षने करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, महिला शहर संघटिका पल्लवी जावळे, राजेंद्र शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी सनी गवते, राम थरकुडे, युवा शहर अधिकारी निकिता मारतकर ,युवराज पारीख, छाया भोसले, नंदू येवले, गजानन पंडित, परेश खंडके, तानाजी लोहकरे, मकरंद पेठकर, तेजस मर्चंट, विलास सोनवणे, राजेश मोरे, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, युवराज शिंगाडे, करूणा घाडगे, वैजयंती फाटे, दिपाली राऊत, गायत्री गरुड, किरण शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरुद्ध लागू शकतो या भीतीपोटीच मिंधे सरकारने निवडणूक आयोगाला हाताशी धरून धनुष्यबाणावर घाला घातला आहे. कालच्या निर्णयानंतर प्रत्येक शिवसैनिक पटून उठला असून तो मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. चिन्ह चोरणारे ४० चोर आणि भाजप यांना जमिनीत गाडल्या शिवाय सामान्य शिवसैनिक गप्प बसणार नाही. याची सुरूवात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी पासून करणार आहे. या पोटनिवडणुकीत मिंधे सरकार आणि भाजपला चारीमुंड्या चित केल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.

थरकुडे म्हणाले, चिन्ह गेले म्हणून गळून जाणारे आम्ही लेचेपेचे शिवसैनिक नाही. आम्ही हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. आगामी काळात या मिंधे सरकार आणि भाजपला त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

यावेळी ‘शिवसेना आमच्या ठाकरेंची : नाही गद्दारांच्या बापाची’, ‘उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘चिन्ह आणि नाव चोरणार्‍या गद्दारांचा धिक्कार असो’, ‘५० खोके एकदम ओके, ५० खोके माजले बोके’ अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत


पुणे दि. १८-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रशेखर बावनकुळे होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री.शाह यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री पंकजा मुंडे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सीआरपीएफचे सहायक कमांडट सुबोध कुमार आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ऑक्सफर्ड विमानतळ येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुकत् शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आगमन झाले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यांचे स्वागत केले.