पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ३४ वा स्नेहमेळावा उद्या रविवारी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) आयोजिला आहे. माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत शिवाजी हौसिंग सोसायटी येथील समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन वसतिगृहात हा मेळावा होत असून, यंदा मेळाव्याचे प्रायोजकत्व कोकण आणि मुंबई विभागातील माजी विद्यार्थ्यांकडे आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी मंडळाचे कार्यवाह सुनील चोरे व मेळावा समन्वयक संजीव पाध्ये यांनी दिली.
ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रसाद रायकर हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी, तर अमोल शहाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात ज्येष्ठ कार्यकर्ता, देणगीदार व कर्मचारी यांचा सन्मान, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान, कार्यपरिचय यासह गप्पा-गोष्टी, विचार विनिमय व जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. अधिकाधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मेळाव्यात सहभागी होण्याचे, तसेच अधिक माहितीसाठी संजीव पाध्ये (९७६३३३९८१०), गणेश काळे (९८२२७७८३२६), मनीषा गोसावी (९९२३४६२४४९), गणेश ननावरे (८३८०८५१७३०) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या गरीब व हुशार विद्यार्थ्यांची अल्पदरात भोजन व निवासाची सोय व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने गेली ६८ वर्षे विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे ही संस्था काम करते. येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा संस्थेत योगदान द्यावे, संस्थेशी संलग्नित राहून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, या निमित्ताने असे मेळावे उपयुक्त ठरतात, असे मंडळाच्या वतीने नमूद करण्यात आले.
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी मेळावा
ही तर स्टंटबाजी ! धंगेकरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा फडणवीसांचा आरोप
पुणे- कसबा प्रचारादरम्यान भाजपाने पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात आज(शनिवार) ते सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदीरासमोर सपत्नीक उपोषणाला बसले आहेत. धंगेकरांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे उपोषण करून पॉलिटिकल स्टंट असल्याचं आणि आचारसंहितेचा भंग असल्याचेही फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्पष्टपणे दिसून येत आहे की, आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही हे माहिती असताना अशा प्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पायाखालून जेव्हा वाळू निघून जाते त्यावेळी असे स्टंट केले जातात. हे आचार संहितेचे उल्लंघन आहे.”कसबा मतदार संघात मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा आरोप काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. हा कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे, हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. असे खोटे आरोप भाजपच्या उमेदवारावर करुन फक्त सहानुभूती निर्माण करण्याचं काम ते करत असल्याचंही मुळीक म्हणाले आहेत.
“भाजपाने पोलिसांना बरोबर घेऊन पैसे वाटले”आरोप करत रविंद्र धंगेकरांचे उपोषण कारवाईच्या आश्वासनानंतर स्थगित
निवडणूक हरण्याच्या भीतीपोटी भाजप लोकशाहीचा गळा घोटत आहे-रवींद्र धंगेकर
पुणे -कसब्याची प्रचाराची मुदत संपली असताना भाजपाच्या नेत्यांनी मतदारसंघात रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करत होते. भाजपाचे वरिष्ठ नेते, पालकमंत्र्यासह अनेक मंत्री पोलिसांच्या उपस्थित प्रचार व पैस्यांचे वाटप केले. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या होत आहे. हा सगळा प्रकार निवडणूक आयोग, पोलिसांसमोर होत आहे. मात्र तरीही त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील दिली नाही. पोलिसांकडून माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटीदेखील होत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, अशा संतप्त भावना व्यक्त करीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी सपत्नीक कसबा गणपती मंदिरासमोर धरणे धरले. रविंद्र धंगेकर यांनी केलेल्या मागणीची चौकशी करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गील यांनी आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी दुपारी आपले धरणे मागे घेतले.
कसबा पोटनिवणूकीचा 24 फेबुवारी हा शेवटचा दिवस होता. निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना मतदारसंघातील प्रत्येक कानाकोपर्यातून मतदारांचा त्यांना पाठींबा आहे. त्यामुळे भाजपाला आपला पराभव दिसून येत असल्याने प्रचाराची वेळ निघून गेल्यानंतर भाजप नेत्यांनी पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. या विरोधात सकाळी 10 वाजता कसबा गणपती मंदिरासमोर सपत्नीक धरणे धरले होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार रमेश बागवे, अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, पुजा आनंद, बाळासाहेब आमराळे, रमेश अय्यर, विक्रम खन्ना, सौरभ आमराळे, विजय खळदकर, राजेंद्र भुतडा, अमर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रुपाली ठोंबरे, गणेश नलावडे, अशोक राठी, राजेंद्र आलमखाने, प्रसाद गावडे, प्रदीप गायकवाड, सारिका पारिख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, प्रशांत बधे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, विशाल धनवडे, संतोष भूतकर, मुकूंद चव्हाण, जितेंद्र निजामपूरकर, महेश पवार यांच्या सह पदाधिकारी, कायकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या 30 वर्षापासून माझ्या कार्यकर्त्यांना संभाळत असून कार्यकर्ते माझं घर आहे. त्यांना जर कोणी त्रास देत असतील तर ते मी सहन करणार नाही. मला चौकात गोळी मारा पण माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, अशा संतप्त भावना यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, मी नियम पाळतो आहे, पण समोरच्या पक्षाकडून नियम डावलून पैसे वाटले जात आहे. मी लोकशाहीसाठी आंदोलन करतो आहे असेही यावेळी ते म्हणाले.
प्रचार संपला तरीदेखील भाजपा नेते मंडळी, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घरोघरी प्रचार केला जात होता. तसेच भाजपाचे पदाधिकारी कसबा मतदार संघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करीत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना मतदार संघ सोडून बाहेर जाण्याचे सांगत पोलिस माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, असा आरोप यावेळी रविंद्र धंगेकर यांनी केला. पोलिस राजकीय एजंट म्हणून पैसे वाटप करतात, हे अनेकदा पुराव्यासहीत उघड केले आहे. पोलिसासमवेत ते भाजपा कार्यकर्त्यांचा बिनधास्तपणे वावर होत असल्याने भाजपाकडून सर्व यंत्रणाचा वापर होत असून हा लोकशाहीचा खून होत असल्याची संतप्त भावनादेखील यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केली.
प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, रविंद्र धंगेकर यांना कसब्यातून सर्वत्र मतदारांचा मोठा पाठिंबा दिसून येत आहे. त्यांच्या कामामुळे मतदारांकडून त्यांना पसंती आहे, त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपाच्या उमेदवारांचा पराभव दिसत असल्याने निवडणूक आयोगासह, पोलिस यंत्रणेचा वापर त्यांच्याकडून होत आहे. पोलिसांच्या यंत्रणेत सुरक्षितपणे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार भाजपाकडून होत आहे. मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करुन कमीत कमी मतदान होण्यासाठी त्यांच्याकडून संपुर्ण प्रयत्न होत आहे. यासंदर्भात आम्ही चित्रफीतीचे पुरावेदेखील दिले आहेत. मात्र पोलिस प्रशासन व निवडणूक आयोगाकडून कोणती कारवाई केली जात नाही. मतदार संघातील भाजपाचे झेंडे, पोस्टर काढले नाहीत, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मतदार संघात पैशांचे महापूर भाजपाकडून होत आहे. पुणे शहरात युपी-बिहार सारखे वातावरण भाजपाने केले आहे. आम्ही संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. या निवडणूकीतून जतना भाजपाला नक्कीच धडा शिकवतील. आमच्या दिलेल्या तक्रारची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही उपोषण मागे घेतले असेही यावेळी जोशी यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, कसब्यात मतदारांना पैसे वाटून लोकशाहीचा गळा घोटण्यात येत असून यात पोलिसांचा देखील समावेश आहे. पैसे वाटण्याची व्हिडियो क्लिप पुरावे म्हणून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. पैसे वाटण्याचे प्रकार त्वरित थांबवावे व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
माजी राज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले, भाजपाला कोणतीही नितीमत्ता राहिली नाही. आपला पराभव दिसत असल्याने जीवे मारण्याची धमकी, दडपशाही त्यांच्याकडून होत आहे. प्रचार संपला तरीदेखील पोलिस व अधिकाऱ्यांच्या मदतीने पैसे वाटण्याचा प्रकार भाजपाकडून सुरु आहे. लोकशाही मार्गाने निवडणूक लढण्यासाठी पुढे येण्याची हिंमत नसल्याने लोकशाहीचा खून त्यांच्याकडून होत आहे. भाजपा गैर मार्गाने निवडणूकीला सामोरे जात आहे. मात्र जनता तुमचा पराभव करुन तुमची जागा दाखवून देणार आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांना नाहक अटक करून दहशत निर्माण केली जात आहे. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. भाजप आपल्या सर्व शक्तीचा दुरुपयोग करत आहेत. त्यामुळे, नागरिक भाजपाला मतदानातून धडा शिकवणार आहे.
अभय छाजेड म्हणाले, कसब्यात वाहतुकीपासून, डे्रनेजलाईन अनेक समस्यांना नागरिक वैतागले आहे. भाजपाची सत्ता असून देखील ते प्रश्न सोडवू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना पैश्याचे अमिश दाखविण्याची वेळ आली आहे. रविंद्र धंगेकर हे त्यांच्या कामातून घराघरांमध्ये पोहचले आहेत, त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळणार असल्याने भाजपाने सर्व नियमांचे उल्लंघन करुन प्रचारयंत्रणा व पैश्यांचे वाटप, दमदाटी, धमक्या देण्याचे काम सुरु आहे. कसब्यात गैरप्रकार करणार्या सर्व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यासह त्यांच्या सामिल असणार्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील यावेळी त्यांनी केली.
संगीता तिवारी म्हणाल्या, कसब्यात हिंदू-मुस्लिम एैक्य, सलोखा आहे. मात्र भाजपाला निवडूकीत पराभव दिसल्याने त्यांच्यात भांडण लावण्यासाठी शहराला धोका पोहचिविणारे काम भाजपा करत आहे. सर्व जाती, धर्माचे लोक रविंद्र धंगेकर यांच्या पाठीमागे असल्याने भाजप गोंधळले आहेत.
रुपाली पाटील म्हणाल्या, हिंदू-मूस्लिममध्ये तेढ लावण्याचे काम भाजपाकडून होत आहे. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आपल्या सत्तेचा गैरवापर करीत आहे. पोलिस यंत्रणाच भाजपाने आपल्या धावणीला बांधली असल्याने मतदार भयभयीत झाला आहे. भाजपाचे उमेदवारांनी पाच वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना जनतेचा पैसा लुटला आहे. हाच पैसा त्यांनी आपला पराभव दिसल्याने बाहेर काढला आहे. त्यांना साथ देणार्या पोलिसांची, मंत्र्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
भाजपा गैरमार्गाने प्रचार यंत्रणा राबवित असल्याने सर्वत्र टिकेची झोड उमटत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत मतदानातून आपली ताकद दाखूवन देणार असल्याचे सांगितले.
बांधकाम व्यवसायिकाची14 काेटी 50 लाख रुपयांची फसवणुक
पुणे-पाषाण येथील एक जमीन विकसनाकरिता देण्यात आली असता, विकसनचा करार माेडून एका बांधकाम व्यवसायिकाची तब्बल 14 काेटी 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक विजय जगदीशचंद्र अगरवाल (वय 65,रा.पुणे) यांनी चतुश्रृंगी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दाेन जणांवर पाेलीसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती शनिवारी दिली आहे.
अशाेक शिवनारायण थेपडे (वय 74) व अमित अशाेक थेपडे (वय 47, दाेघे रा.भाेसलेनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. सदरचा प्रकार 2006 पासून आतापर्यंत घडलेला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय अगरवाल यांनी स्वत: विकसित करण्यासाठी पाषाण येथील एक जमीन 8 ऑगस्ट 2006 राेजी घेतली हाेती.
आराेपी अशाेक थेपडे व अमित थेपडे यांचे मे.गॅलक्सी कन्स्ट्रक्शन अँड काॅन्ट्रॅक्टर प्रा.लि. यांना विकसनासाठी त्यांनी सदर जमीन दिली हाेती. तेथे विकसन करुन 55 टक्के तक्रारदार यांना व 45 टक्के आराेपी यांचे कंपनीला देण्याचे निश्चित झाले हाेते. सदर बांधकामाचा ताबा 15 महिन्यात देण्याचे ठरले असताना, ताे न देता तक्रारदार यांनी मुदतवाढ दिली असता, आराेपींनी त्यानंतर सुध्दा ताबा दिला नाही.
तक्रारदार यांनी 2016 मध्ये आराेपी यांना नाेटीस पाठवून सर्व हक्क व पाॅवर ऑफ एटर्नी संपुष्टात आलेली असतानाही, आराेपींनी सदर हक्क स्वत:कडे आहे असे खाेटे व बनावट कागदपत्रे तयार करुन ते खरे असल्याचे भासवले. त्याआधारे त्यांनी सेवा विकास बँक व धरमपेठ महिला मल्टी स्टेट काे-ऑप साेसायटीकडून 30 काेटी 75 लाख रुपये घेतले.तक्रारदार यांच्या हिशश्याचे 2500 स्के फुटचे दुकान व 10 हजार 500 स्के फुटचे ऑफीस ज्याची किंमत 14 काेटी 50 लाख रुपये असून सदर मिळकतीचा गैरवापर करुन त्यांची फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास चतुश्रृंगी पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस टुले करत आहे.
धनकवडीत स्पेशल 26 सारखा प्रकार, १० जणांवर गुन्हा दाखल
पुणे-धनकवडी परिसरात दहा जणांनी अँटी करप्शनचे अधिकारी व न्यूज रिपोर्टर असल्याचे सांगत छापेमारी केली. यावेळी त्यांनी 14 हजार रुपये राेख व 70 हजार रुपयांचे साेन्याचे दागिने असा 84 हजारांचा मुद्देमाल चाेरुन नेला आहे. याप्रकरणी सहकारनगर पाेलिस ठाण्यात दहा आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी शनिवारी दिली आहे.याबाबत 40 वर्षीय एका महिलेने आराेपी विराेधात सहकारनगर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सीमा शशिकांत शिंदे (वय-30), अर्चना नायडू व चार महिला व तीन पुरुष अशा एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 फेब्रुवारी राेजी रात्री साडेनऊ ते पावणेबाराच्या सुमारास घडला आहे.
कसे घडले स्पेशल 26?
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल केलेल्या महिलेच्या घरी 18 फेब्रुवारी राेजी रात्री अचानक काही अनाेळखी महिला व पुरुष घरी आले. त्यांनी आम्ही अँटी करप्शनचे पाेलिस अधिकारी असून साेबत न्यूज रिपाेर्टर असल्याचे सांगितले.त्यानंतर ‘तुम्ही इथे वेश्या व्यवसाय चालवता, तुमच्या विराेधात केस करताे’ अशी धमकी देऊन त्यांना व त्यांचा मुलांना व भाचीला हाताने मारहाण करण्यात आली. ही केस ताबडताेब मिटविण्यासाठी तक्रारदार महिलेकडून 14 हजार रुपये राेख व 70 हजार रुपयांचे साेन्याचे दागिने असा माैल्यवान ,ऐवज घेऊन फरार झाले.हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून असल्याचे तक्रारदार महिलेस वाटले. त्यामुळे त्यांनी पाेलिसांकडे तक्रार केली नाही. परंतु हा प्रकार घडत असताना ओळखीच्या असणाऱ्या आरोपी सिमा शिंदे या साेसायटीच्या बाहेर उभ्या असल्याचे तक्रारदार महिलेच्या मुलाने पाहिले हाेते. त्यावरुन तिने हा छापा घातला असावा अशी शंका आल्याने त्यांनी याबाबत पाेलिसांकडे चाैकशी केली.पाेलिसांनी सिमा शिंदे हिला ताब्यात घेऊन तपासणी केल्यानंतर तिने सहकाऱ्यांचे मदतीने बनावट छापा टाकून लुटमार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सहकारनगर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एस शेडे पुढील तपास करत आहे.
उद्धव ठाकरे केजरीवाल भेटीवर भाजपा मुंबईच्या ट्विटर हँडलवरून टीका
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बेचे ‘ मुंबई ‘ केले हे उद्धव ठाकरे विसरले वाटतं..?
आता कुठे गेले मराठी प्रेम ?
मुंबई–
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बेचे ‘ मुंबई ‘ केले. याचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला आहे. आता कुठे गेले मराठी प्रेम ? असा सवाल करत शुक्रवारी मातोश्रीवर झालेल्या उद्धव ठाकरे – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भेटीवरभाजपा मुंबईच्या ट्विटर हँडलवरून टीका करण्यात आली आहे.
स्व.बाळासाहेब ठाकरेंनी बॉम्बे चे मुंबई केले हे @OfficeofUT विसरले वाटतं…!
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) February 25, 2023
आता कुठे गेले मराठी प्रेम ?? pic.twitter.com/AUz2sGJmE1
अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केला. नेहमी बेगडी मराठी प्रेम दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. उद्धव ठाकरे मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले. आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाहीत अशीही टीका यानिमित्ताने होत आहे.
शहरच नव्हे तर तालुका, जिल्हाही छत्रपती संभाजीनगर होणार:नामांतराची प्रक्रिया सोमवारी पूर्ण होईल-देवेंद्र फडणवीस
मुंबई-केवळ औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले नाही, तर तालुका, जिल्ह्याचेही नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. त्याबाबत केवळ औपचारिकता बाकी आहे. सोमवारपर्यंत याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नामांतर औरंगाबाद शहराचे आहे की, संपूर्ण जिल्ह्याचे? असा सवाल करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रश्नावर आज पत्रकार परिषदेत उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा, शहर, तालुक्याच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राला पाठवला होता. त्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार काल नोटीफीकेशन काढले आहे.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, शहरासोबतच पालिका, नगरपालिका, तालुका, जिल्ह्याचेही नामांतर करण्यात येईल. जिल्ह्याच्या नामांतराबाबत महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी केला जाईल. तर, महापालिका, नगरपालिकेच्या नामांतरासंदर्भात नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात येईल. आज व उद्या सुट्टी असल्यामुळे या विभागांनी आतापर्यंत शासन निर्णय जारी केला नसेल. मात्र, सोमवारी याबाबतची प्रक्रिया शक्यतो पूर्ण होईल.
तसेच, औरंगाबाद व उस्मानाबादचे शहर, तालुका, जिल्हा, महापालिका, नगरपालिका या सर्वांचेच नाव बदलले आहे. याबाबत कुणीही संदिग्धता बाळगू नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले
औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.

औरंगाबाद” या शहराचे नाव बदलून ते “छत्रपती संभाजीनगर” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, ” औरंगाबाद “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते “ छत्रपती संभाजीनगर “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांचे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याकडून कौतुक
मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या कामांसोबत इतर कला गुणांमधे प्रवीण आहेत हे खरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी काढले.
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाच्या बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त चंद्रकांत थोरात, भूषण पाटील, शैलेश आढाव, दुष्यंत भामरे, शशिकांत केकरे, दयानंद अवशंक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने थ्रो बॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, गोळाफेक, कॅरमसह संगीत खुर्ची आणि अंताक्षरी यासारखे खेळ आयोजित केले होते. या खेळांमधील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
यावेळी गुणवंत पाल्यांचे सत्कार देखील करण्यात आले. राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांच्या प्रेरणेने, सचिव डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि आयुक्त श्री. काळे यांच्या संकल्पनेतून हे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्राचे आभार
मुंबई दि 24 – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ व उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! असे नामकरण करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असेही मुख्यमंत्री म्हणतात.
आठ महिन्यांपूर्वी युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यानंतर मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळातदेखील ठराव संमत झाला होता असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की हे ऐतिहासिक पाऊल असून राज्यातील जनता केंद्र सरकारची आभारी आहे.
कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात
कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ
पुणे, दि.२४: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली असून नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी ६ वाजेपासून प्रतिबंध आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.
विणकर, हातमाग व्यावसायिकांसाठी केंद्र सरकार सकारात्मक -प्रा. डॉ.मेधा कुलकर्णी
इंडियन सिल्क गॅलरीच्या पुढाकारातून पुणेकरांसाठी ५ मार्चपर्यंत हॅन्डलूम प्रदर्शन खुले
पुणे : “विणकर, हातमाग व्यावसायिक यांच्यासाठी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, लघु व मध्यम उद्योग आणि खाडी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. देशभरातील विणकरांची कलाकुसर प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडली आहे. त्यांच्या कलेला दाद देण्यासाठी पुणेकरांनी प्रतिसाद द्यावा,” असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.
‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्याना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे पुण्यात आयोजित भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक (नि.) श्रीनिवास राव, हर्षल हॉलचे शाम कासट आदी उपस्थित होते.
हातमाग विकास आयुक्तालय, इंडिया हॅन्डलूम, हॅन्डलूम मार्क यांच्या सहकार्याने एकाच छताखाली हे प्रदर्शन होत आहे. महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ५० पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे. प्रसंगी कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉलमध्ये ५ मार्च २०२३ पर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “देशाच्या विविध भागात असलेली विशेषता हातमाग, कॉटन, सिल्क, लिनन या कपड्यांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर कलाकुसर, नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे उपलब्ध आहेत. महिलांसाठी ही एक अनोखी पर्वणी आहे. पुणेकर खूप हौशी असून, या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा वाटते.”
श्रीनिवास राव म्हणाले, “गुढी पाडवा आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन होत आहे. महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे हे प्रदर्शन आहे. कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यावर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे. रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते. ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल्स व अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत.”
पश्चिम बंगालच्या बुटीक साड्या, प्रिंटेड, चंदेरी, पैठणी, माहेश्वरी, बनारसी, गढवाल, कलमकरी, कांचीपुरम, करवथी अशा विविध राज्यांची ओळख असलेल्या असंख्य साड्या येथे पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश अशा विविध भागांतून साड्या, ड्रेस मटेरियल व अन्य साहित्याचे स्टॉल लागले आहेत, असे राव यांनी नमूद केले.
मराठी भाषा गौरवदिनी ३५ पुस्तकांचे होणार प्रकाशन
मुंबई, दि. २४ : वर्षभरात सिद्ध झालेल्या नव्या ३५ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी दि. २७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुस्तक प्रकाशन हे मुख्य उद्दिष्ट असून साहित्य, संस्कृती, कला, इतिहास या विषयांवरील वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, वाङमयीन संशोधनात्मक असे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ स्वरूपाचे महत्त्वपूर्ण ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने आतापर्यंत ६४७ ग्रंथ प्रकाशित केले असून, मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे.
यावर्षीदेखील अत्यंत मौलिक अशा या ३५ ग्रंथांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय दुर्मिळ झालेला ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन (भाग पहिला) दर्शन प्रवेश व साहित्य खंड व ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ (भाग दुसरा) अध्यात्म खंड व शास्त्रीयादि विषय हा दोन खंडातील ग्रंथ ८८ नंतर मंडळाकडून पुर्नप्रकाशित करण्यात येत आहे. संत साहित्याच्या अभ्यासातील दीपस्तंभ ठरलेल्या प्रस्तुत ग्रंथाने संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचे अपूर्व दर्शन घडविले आहे.
याबरोबरच श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङमय चार खंडात प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने हाती घेतला असून या प्रकल्पाचे संपादन डॉ. विश्वास पाटील यांनी केले आहे. सदर प्रकल्पातील ‘श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय खंड १ गीता सत्त्वबोध: कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग व श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङमय खंड पातंजल योग दर्शन व ब्रह्मसूत्र शांकरभाष्य विवेचन (चार अध्याय)’ हे दोन खंड मंडळाकडून प्रकाशित करण्यात येत आहेत. या ग्रंथांच्या निमित्ताने श्री बाळकोबा भावे यांची ग्रंथसंपदा एकत्रित स्वरुपात वाचकांसमोर येत आहे.
आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचे आणि त्यांच्या कवितांचे अंतरंग समीक्षकाच्या निकोप दृष्टीने उलगडून दाखविण्याचे काम थोर समीक्षक व. दि. कुलकर्णी लिखित ‘केशवसुतांचे अंतरंग’ या पुस्तकात केले असून हा ग्रंथ मंडळाच्यावतीने वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. निसर्ग आणि पर्यावरणविषयक पारिभाषिक संज्ञा-संकल्पनांचे संकलन आणि विश्लेषण करणारा ‘पर्यावरणाच्या परिघात निसर्ग-पर्यावरणाच्या संज्ञा-संकल्पनांचा परिचय आणि विश्लेषण हा ग्रंथ वर्षा गजेंद्रगडकर यांनी लिहिला असून तो मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित होत आहे. महानुभावांच्या साहित्यातील गुप्त लिप्यांमध्ये लिहिलेले ग्रंथ मराठी भाषेच्या इतिहासातील मौलिक ठेवा आहेत.
महानुभावांच्या तीन सांकेतिक लिप्यांच्या समृद्ध वारशाचा परिचय मराठीजनांना करुन देणारा प्रकल्प मंडळाने राबविला असून या प्रकल्पांतर्गत विनायक त्र्यंबक पाटील यांनी लिप्यंतर केलेल्या ‘महानुभाव सांकेतिक वज्र लिपी (पोथींसह लिप्यंतर) व महानुभाव सांकेतिक कवीश्वरी लिपी (पोथीसह लिप्यंतर) या दोन ग्रंथांचा समावेश मंडळाकडून प्रकाशित होत असलेल्या सदर ३५ ग्रंथामध्ये आहे. यासोबतच होळकरशाहीचा समग्र इतिहास अकरा खंडातून प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने हाती घेतला असून या प्रकल्पातील पहिले पाच खंड यापूर्वीच मंडळाकडून प्रकाशित करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे संपादन डॉ. देवीदास पोटे यांनी केले असून सदर प्रकल्पातील पुढील खंड सहा ते खंड दहा हे पाच खंड मंडळाकडून प्रकाशित होत आहेत. होळकर राजघराण्याच्या हकीकतीसंबंधीचा इ.स. १६९३ ते इ.स. १८८६ पर्यंतचा इतिहास असलेला ‘होळकरांची कैफियत (खंड ६) हा ग्रंथ. तसेच होळकर रियासतीच्या संपन्न आणि बहुआयामी सांस्कृतिक परंपरेचा सर्वांगीण वेध घेणारा ‘होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास’ (खंड ७) हा ग्रंथ, तसेच मध्य भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या अहिल्याबाई होळकर यांची गौरवगाथा विविध मान्यवरांच्या लेखणीतून मांडणारा, अखिल मानवजातीला सतत प्रेरणा देणारा ‘अहिल्याबाई होळकर गौरवगाथा लोकमातेची’ (खंड ८) हा ग्रंथ होळकरशाहीतील सुभेदार मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर व यशवंतराव होळकर या तीन प्रमुख राज्यकत्यांच्या चरित्र आणि कर्तृत्वाचा वेध घेणाच्या काव्याचा होळकर रियासत काव्यायान (खंड ९) हा संकलनात्मक ग्रंथ, इंदूरच्या होळकर राज्याचे संस्थापक व मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असलेले शूरवीर मल्हाररावांचे सुभेदार थोरले मल्हारराव होळकर’ (खंड १०) हे चरित्रपर पुस्तक असे पाच खंड मंडळाकडून प्रकाशित होत असून इतिहासाच्या अभ्यासकांना व वाचकांना ते उपयुक्त आणि प्रेरणादायी आहेत.
गौतमीमाहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास’ हा त्रिखंडात्मक प्रकल्प मंडळाच्यावतीने राबविण्यात आला असून सदर प्रकल्पातील डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी संपादित केलेला गौतमीमाहात्म्य’ हा पहिला भाग मंडळ प्रकाशित करीत आहे. ‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ श्री. इब्राहिम अफगाण यांनी लिहिला असून हा ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे. ललित लेखनकलेत समाविष्ट असलेले, संशोधन झालेले आणि प्राचीन ते आधुनिक दृष्टीकोनांचा, साधनांचा अंतर्भाव असलेली समस्त साधने मराठीतील लेखक तसेच अभ्यासकांना एका ग्रंथाद्वारे उपलब्ध करण्याची गरज या ग्रंथाद्वारे पूर्णत्वास जात आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात प्रकाशित झालेले व सध्या अतिशय दुर्मिळ असलेले ‘दुर्मिळ चरित्रे खंड १ संपतराव गायकवाड’, ‘केशवराव देशपांडे, रामचंद्रराव माने पाटील, दुर्मिळ चरित्रे खंड २’ विश्वनाथ नारायण मंडलिक भाग-१ व दुर्मिळ चरित्रे खंड २ विश्वनाथ नारायण मंडलिक भाग-२ हे प्रा. राजेंद्र मगर यांनी संपादित केलेले ग्रंथ याबरोबरच श्री. यमाजी मालकर यांनी संपादित केलेले ‘दानशूर महाराजा सयाजीराव’ व ‘महाराणी जमनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र’ हे ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित होत आहेत.
डॉ. वसु भारद्वाज यांनी संपादित केलेले पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि विचारदर्शन खंड १’, ‘तत्त्वज्ञान आणि नीती खंड २, व ‘नीतीतत्त्वज्ञान राजकीय आणि सामाजिक खंड ३’, हे तीन खंड प्रकाशित करण्यात येत असून या तीनच्या माध्यमातून केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक तत्वज्ञानाचा परामर्श घेतला गेला आहे. या त्रिखंडात्मक ग्रंथाच्या निमित्ताने अभ्यासकासाठी एक मोठा संदर्भवन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार या चरित्रमालेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे चरित्र मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. तसेच ‘कृषी संवादक महात्मा फुले’ हे पुस्तकही मंडळाकडून पुर्नमुद्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान म्हणजे आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे जीवनचरित्र श्री. आसराम कसबे यांनी लिहिले असून मंडळाच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ योजनेअंतर्गत ते प्रकाशित होत आहे. याबरोबर इब्राहीम अफगाण लिखित हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारे, त्यांचे कार्य व योगदान मांडणारे ‘महाराष्ट्राचे शिल्पकार हुतात्मा वीर माई कोतवाल हे चरित्रपर पुस्तक मंडळ प्रकाशित करीत आहे. या चरित्रपर पुस्तकांच्या माध्यमातून काळाच्या पडद्याआड दडलेल्या प्रेरणादायी इतिहासाचे सुवर्णपान वाचकांपर्यंत पोहोचत आहे.
याबरोबरच यावर्षीचा विंदा जीवनगौरव पुरस्कार ज्यांना प्रदान केला जाणार आहे असे ज्येष्ठ लेखक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी लिहिलेले लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची जीवनगाथा गाणारे ‘महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव हे चरित्रपर पुस्तक मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. याबरोबरच मंडळाच्यावतीने यापूर्वी प्रकाशित झालेला गणित तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारा ‘गणिती तत्त्वज्ञानाचा परिचय’ हा ग्रंथ, विज्ञान आणि काव्य यांचे संकल्पन मांडणारा, काव्याचे स्वरुप, महत्त्व व कार्य काय आहे, याची चर्चा करणारा ‘काव्ये आणि विज्ञाने’ हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून मंडळ प्रकाशित करीत आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची व कार्याची ओळख करून देणारा ‘यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व’ हा त्यांच्यावरील स्मृतिग्रंथ पुनर्मुद्रित करण्यात आला आहे.
संगीत विषयाची मौलिक माहिती देणारा ‘संगीत आणि कल्पकता’ हा ग्रंथ, देकार्तची ज्ञानमीमांसा व तत्त्वज्ञानाच्या स्वरुपातील विचार मांडणारा ‘देकार्तची चितने’ हा ग्रंथ पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. याबरोबरच ‘लैंगिक नीती आणि समाज’ व सातारचे प्रतिसरकार स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती या पुनर्मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन देखील मराठी भाषा गौरव दिनी मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कमल किशोर कदम डी.लिट पदवीने सन्मानित
मुंबई, दि. २४ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत विद्यापीठ परिसर येथे पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डी.लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती तसेच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

डी.लिट. पदवी मिळाल्याबद्दल नितीन गडकरी व कमलकिशोर कदम यांचे अभिनंदन करताना यंदापासून लागू होत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठांना गतकाळातील नालंदा, तक्षशिला विद्यापीठांप्रमाणे पुनश्च प्रतिष्ठा प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
स्नातकांनी आपल्या देशातील भाषा, संस्कृती व परंपरा यांच्या सोबतच इतर देशांच्या भाषा व संस्कृतीचे अध्ययन करावे तसेच तंत्रशिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणासोबत परीक्षा व मूल्यमापन पद्धतीमध्ये देखील बदल व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
हरित विद्यापीठ, स्वच्छ विद्यापीठ, जलसंधारण, वृक्षारोपण आदी उपक्रमांच्या माध्यमातून स्वारातीम देत असलेल्या योगदानाबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना देशाला ज्ञानाधिष्ठित जागतिक महासत्ता बनविण्याची सर्वाधिक मोठी जबाबदारी विद्यापीठांवर असल्याचे राज्यपालांनी सांगितले. पेटंट मिळविण्याच्या दृष्टीने केलेल्या संशोधनामुळे स्वारातीम हे देशातील महत्त्वाचे विद्यापीठ ठरले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ केवळ पदव्या प्रदान करणारी संस्था नसून समाज व राष्ट्र निर्मितीकरिता जबाबदार नागरिक निर्माण करणारी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन शिक्षणाचा लाभ शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना होऊ शकतो असे सांगताना त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पुरस्कार केला.
“गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल” – नितीन गडकरी
नवसृजन, उद्यमशीलता यांच्या माध्यमातून ज्ञानाचे रूपांतरण आर्थिक संपदेमध्ये झाले पाहिजे,असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. ज्ञानासोबत विनम्रता व शालीनता आली पाहिजे हे सांगताना त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन व उद्योगपती रतन टाटा यांच्या विनम्र स्वभावाचे उदाहरण दिले. उत्तम समाज निर्मितीसाठी नीतिमूल्ये आवश्यक आहे असे सांगताना स्नातकांनी प्रतिकूल विचारांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जलसुरक्षेसाठी जलसंवर्धन तसेच समुद्रात जाणारे पाणी अडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘अन्नदाता शेतकरी’ हा ऊर्जादाता झाला पाहिजे असे सांगून गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल असे त्यांनी सांगितले. युवकांनी रोजगारामागे न लागता संपदा निर्माण करणारे उद्योजक व्हावे, असे त्यांनी सांगितले.
तीन स्तरांवर मानव सक्षमीकरणाचा विचार झाला – डॉ. अनिल काकोडकर
विद्यार्थ्यांच्या वैचारिक कक्षा रुंदावणे, सामाजिक व आर्थिक समस्यापूर्ती करणे तसेच समाजातील विषमता दूर करणे अशा तीन स्तरांवर मानव सक्षमीकरणाचा विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. देशाची गणना पुढारलेल्या देशांमध्ये व्हावी, यासाठी दरडोई उत्पन्न वाढवावे लागेल व त्यासाठी उद्योजकतेला चालना तसेच ग्रामीण भागात शेतीबरोबर नवीन संधी निर्माण कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.
अरविंद केजरीवाल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई-आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ‘आप’ मुंबईतर्फे त्यांचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंची त्यांनी मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.अरविंद केजरीवाल म्हणाले, उद्धव ठाकरेंना भेटण्याची माझी खूप दिवसांची इच्छा होती. कोरोनाची लाट थोपावताना आम्हाला एकमेकांचे मार्गदर्शन झाले.

अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ह्यांचा मुंबई दौरा सुरू असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना चहा-पाण्यासाठी आमंत्रण आले होते, हे आमंत्रण स्वीकारत केजरीवाल यांनी त्यांची आज भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांत चर्चाही झाली मात्र, काय चर्चा झाली याची ठोस माहिती समजू शकली नाही.अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या आगमनामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबई दौऱ्यावर एका कार्यक्रमासाठी आले होते. कलिना सांताक्रूझ येथील जनरल एव्हीएशन टर्मिनल येथे आम आदमी पार्टी मुंबईच्या वतीने त्यांच्या आगमनानिमित्त भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी पार्टी मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी अरविंद केजरीवाल व भगवंत मान यांचे स्वागत केले.

या प्रसंगी त्यांच्या सोबत आम आदमी पार्टी मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हस, उपाध्यक्ष संदीप कटके, द्विजेंद्र तिवारी, पायस व्हर्गिस, आम आदमी पार्टी मुंबईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांच्या आगमनामुळे आम आदमी पार्टी मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
बुधवारी कोथरुड, एसएनडीटी, डेक्कन परिसरातील पाणी पुरवठा बंद
पुणे : शहरातील एसएनडीटी भागातील पाण्याच्या टाक्यांना, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील पाणीपुरवठा येत्या बुधवारी (ता.1) बंद राहणार आहे.पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा प्रकल्पाअंतर्गत शहराच्या विविध भागातील पाण्याच्या टाक्यांना, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यानुसार, एसएनडीटी भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले आहे.त्यानुसार, बुधवारी (ता.1) रोजी व दुसऱ्या दिवशी संबंधित परिसरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.
