Home Blog Page 136

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिकांसाठी भरती मेळावा

पुणे, दि.11 – मराठवाडा पर्यावरण बटालियन अंतर्गत १३६ इन्फंट्री बटालियन टीए इको, महार (एमओईएफ आणि सीसी) व महाराष्ट्र राज्य वन विभागातील माजी सैनिक तसेच माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा भरती मेळावा दि. १६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत क्षेत्रीय भर्ती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) छावणी येथे होणार आहे.
भरतीसाठी पात्र उमेदवारांनी दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता आवश्यक कागदपत्रांसह शारीरिक फिटनेस चाचणीसाठी उपस्थित राहावे.
या भरती प्रक्रियेत सोल्जर जीडी – ४३ (निवासस्थान महाराष्ट्र राज्य), क्लर्क – ०६, हेअर ड्रेसर – ०९, मेस कीपर/स्टुअर्ड/हाऊस कीपर – ०१ (संपूर्ण भारत) अशी पदे भरण्यात येणार आहेत.
माजी सैनिकांसाठी किमान वयोमर्यादा नाही; मात्र सेवानिवृत्ती अथवा डिस्चार्ज झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत अर्ज केलेला असावा. तसेच एमओईएफ, सीसी व महाराष्ट्र राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचाऱ्यांसाठीही (अकाली सेवानिवृत्तांसह) हीच अट लागू राहणार आहे.
उमेदवारांनी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO), डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड व अलीकडील पासपोर्ट आकाराच्या आठ छायाचित्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
माजी सैनिक (OR) यांना ५० वर्षे वयापर्यंत सेवा करण्याची संधी उपलब्ध असल्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुणे तथा उपसंचालक (सैनिकीकरण) सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य लेफ्टनंट कर्नल सतेश दैवानराव हंगे (नि.) यांनी केले आहे.

सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा आता २३ मार्च रोजी

पुणे, दि. ११ : सैनिक कल्याण विभाग तसेच विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमधील लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदांसाठी आयोजित करण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

टी.सी.एस. आयओएन मार्फत होणारी ही परीक्षा पूर्वी दिनांक १४ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी पोलीस भरती परीक्षा असल्याने सदर परीक्षा आता दिनांक २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत घेण्यात येणार आहे.

उमेदवारांनी संबंधित दिवशी परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे तथा उपसंचालक (सैनिकीकरण), सैनिक कल्याण विभाग, लेफ्टनंट कर्नल सतेश देवानराव हंगे (नि.) यांनी केले आहे

आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

0

· विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा

मुंबई, दि. 11 : आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, खासगी विमा कंपन्या व खासगी रुग्णालये यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. रुग्ण हा केंद्रबिंदू मानून खासगी विमा कंपन्या व रुग्णालयाने सेवा द्यावी असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व खासगी रुग्णालयाकडून आकारली जाणारी वाजवी बिले. याबाबत आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने याबाबत निश्चित कार्यपध्दती निर्धारीत करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीस रिलायन्स, टाटा, एसबीआय, स्टार हेल्थ, एचडीएफसी, एआयजी, यासह राज्यातील प्रमुख विमा कंपन्या तसेच व्होकार्ड, लीलावती, जसलोक, रिलायन्स यासह राज्यातील प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विमा कंपनी आणि रुग्णालय व्यावसायिक पद्धतीने काम करत असली तरी रुग्ण हा केंद्रबिंदू असला पाहिजे. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विमा कंपन्या, खासगी रुग्णालये, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण व आरोग्य विभागाचे प्रतिनिधी एका व्यासपिठावर येऊन रुग्ण कल्याणासाठी निश्चित कार्यपध्दती निर्धारित करण्याबाबत चर्चा झाली.

आरोग्यविमा घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असुन त्यांना समाधानकारक सेवा देणे हे रुग्णालये व विमा कंपन्यांची जबाबदारी आहे. याबाबत चुकीचे निदर्शनास आल्यास शासन त्याबाबत योग्य ती कार्यवाही करेल. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरात अद्यावत वैद्यकीय सेवा, तज्ञ डॉक्टर्स, व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे, मेडिकल टुरिझम व्यवसायाला मोठा वाव आहे. चांगली सेवा देऊन आपली विश्वासार्हता वाढवावी असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले

राज्यातील सर्व रुग्णालयांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ( आयआरडीए ) च्या पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी, असे निर्देश देतानाच क्लेम मंजुरीसाठी निश्चित कालमर्यादा ठरविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. हॉस्पिटल आणि विमा कंपन्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे अनेकदा रुग्णांना मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत आणि क्लेम प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ व्हावी यासाठी शासन आवश्यक ते निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या सुमारे सात ते आठ हजार रुग्णालये विमा सेवा देत असून काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये बॉम्बे नसिंग ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मोठ्या रुग्णालयांनी उपचारांचे दर स्पष्ट करणारे दरपत्रक लावणे बंधनकारक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. एकाच आजारासाठी विविध रुग्णालयांमध्ये वेगवेगळे दर आकारले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल तयार करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच विमा कंपन्या आणि रुग्णालयासाठी कॉमन ‘एम्पॅनलमेंट यंत्रणा उभारण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी मंजूर व नाकारलेले क्लेम आणि प्राप्त तक्रारी याबाबतची माहिती नियमितपणे आरोग्य विभागाकडे सादर करण्यास सांगण्यात आले. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ( IRDA ) यांचेकडुन महाराष्ट्रातील तक्रारी प्राप्त करुन त्यावर अभ्यास व उपाययोजना करण्यात येणार असुन याबाबत कार्यवाही करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

वैद्यकीय व्यवसायातील विश्वासार्हता वाढविणे ही शासनाची प्राथमिकता असून कोणत्याही रुग्णाला उपचार किंवा विमा क्लेम मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाइत तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील जनगणनेसाठी कर्मचाऱ्यांनी तयार राहावे; लोकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश

पुणे, दि. ११ – देशातील १६ वी जनगणना असलेल्या जनगणना २०२७ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी आवश्यक तयारी पूर्ण करून जनजागृती आणि समन्वय साधावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिले.

१६ मे ते १५ जून या कालावधीत होणाऱ्या घरयादी व घरगणनेच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच पुणे जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जनगणना ही संविधानिक व कायदेशीर प्रक्रिया असून ती संविधानातील अनुच्छेद २४६ (केंद्रसूची) आणि जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत राबविण्यात येते. जनगणना २०२७ ही १८७२ पासूनची देशातील १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. या प्रक्रियेत प्रगणक आणि पर्यवेक्षक हे महत्त्वाचे आधारस्तंभ असून त्यांच्या माध्यमातून घराघरांतून अचूक माहिती संकलित केली जाणार आहे. जनगणनेतून मिळणारी माहिती शासनाच्या नियोजन प्रक्रियेसाठी, विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, संसाधनांचे योग्य वाटप तसेच मतदारसंघांचे परिसीमन यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येकाने जनगणना कार्यात सक्रिय सहभाग देऊन अचूक माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जनगणना २०२७ ही दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना (२०२६) केली जाईल. या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा, मालमत्ता आदी बाबींची माहिती संकलित करून पुढील लोकसंख्या गणनेसाठी आधारभूत चौकट तयार केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना (२०२७) करण्यात येणार असून ठराविक संदर्भ दिनांक व वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती नोंदविण्यात येईल.

यावेळी जनगणना प्रक्रियेत मोठा तांत्रिक बदल करण्यात आला असून “सेन्सस २०२७–एचएलओ” या मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच प्रथमच स्व-गणना (सेल्फ एन्युमरेशन) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी स्व-गणना करून माहिती सादर केल्यास ती अंतिम करण्यापूर्वी प्रगणकांकडून पडताळणी केली जाणार आहे.

जनगणना प्रक्रियेबाबत सर्व विभागांनी समन्वय ठेवून आवश्यक मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी नियोजन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिले.

प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा महापालिकेवर हंडा मोर्चा

महिलांनी माठ फोडून नोंदवला निषेध

पुणे : हडपसर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात महिलांनी माठ फोडून तीव्र निषेध नोंदवला, तर घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४१ तसेच परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या टाक्यांमध्ये नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या समस्येबाबत शिवसेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे पाहता या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला. मोर्चादरम्यान शिवसैनिक आणि नागरिकांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. “टाक्या उभारल्या चौकात, पाणी नाही नळात”, अशा घोषणांद्वारे महिलांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका केली.

आंदोलनादरम्यान पाणीटंचाईची तीव्रता प्रशासनाला दाखवून देण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टँकर उभा करून पाण्याच्या टाक्या कशा रिकाम्या राहतात याचे प्रतीकात्मक चित्र सादर करण्यात आले. यावेळी महिलांनी माठ फोडून निषेध व्यक्त करत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध नोंदवला. आंदोलनामुळे काही काळ परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि घोषणांनी महानगरपालिकेचा परिसर दणाणून गेला.

यावेळी बोलताना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले की, हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४१ मध्ये महानगरपालिकेने नऊ ते दहा मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारल्या असून या टाक्यांमध्ये हजारो लिटर पाण्याची साठवणूक क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात या टाक्यांमध्ये अत्यंत अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने युद्धपातळीवर कामकाज करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा येत्या पंधरा दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त किशोर राम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य,स्वातीताई टकले, माजी सरपंच राकेश झांबरे, माजी सरपंच मच्छिंद्र दगडे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले,सुभाष घुले, मिलिंद अहिरे, अभिमन्यू दादा भानगिरे, सचिन नाना तरवडे, प्रवीण हिलगे, पंकज कोंद्रे, अभिजीत बोराटे, दत्ता खवळे, शितल गाडे, आशाताई यादव, सुहास पडवळ, राहुल लबडे, आकाश रेणुसे, आकाश टकले, कविता पवार, मनोज जाधव, राणी पाटील, स्मिता साबळे, सचिन भानगिरे, प्रसाद सर, शिंदे मामा, दीपक मरळ, शंतनू सरकार, तुषार मरळ, आशा कांबळे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कंत्राटी कामगारांना न्याय मागण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना”

मुंबई, दि. ११ मार्च २०२६ : विधानपरिषदेत लक्षवेधी क्र. ६ अंतर्गत असंघटित क्षेत्रातील गिग वर्कर्स आणि कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा झाली. या संदर्भात सदस्य अभिजीत वंजारी यांनी असंघटित क्षेत्रातील कामगार, गिग वर्कर्स आणि कंत्राटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. या चर्चेदरम्यान पिठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कामगार मंत्री यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत विचार करण्यास कायदेशीर अडचण नाही. अशा महामंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या करारांची तपासणी, त्यांचे पडताळणी (व्हेरिफिकेशन) आणि त्यांच्यासाठी विविध समाजकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबविता येऊ शकतात. यापूर्वीही या संदर्भात तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांना सूचना दिल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यावर कार्यवाही झाली नाही. कंत्राटी कामगारांना न्याय मागण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची अत्यंत गरज असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि गिग वर्कर्स यांच्या कंत्राटी अटी अनेकदा अन्यायकारक असतात. अनेक वेळा कामगारांना करारातील अटींचा पूर्ण अर्थ समजत नाही किंवा दबावाखाली ते करार करतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. कंत्राटी कामगारांना कंत्राटामध्ये दोष जाणवला तर ते त्याबद्दल कामगार आयुक्तांकडे दावा दाखल करू शकतात आणि त्याची दखल कामगार आयुक्त यांना घ्यावी लागेल.

यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, गिग वर्कर्स आणि संबंधित विषयांवर केंद्र सरकारने सर्व संघटना, युनियन आणि स्टेकहोल्डर्सना आपली मते मांडण्याची संधी दिली होती. तरीही ज्या काही सूचना आहेत त्या कामगार विभागामार्फत केंद्र सरकारच्या कामगार विभागाकडे पाठविण्यात येतील असे सांगितले.

पोलिसांनीच बुजविला नाला: कारवाई कोण, कुणावर करणार? पण पूर तर येणार …

विरोधी पक्ष नेते निलेश निकम यांचे आयुक्तांना साकडे

पुणे- चतु:श्रृंगी टेकडीवरून पाषाण रोडच्या दिशेने येणारा आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या जागेतून बाणेर रोडच्या मुख्य नाल्याला मिळणारा नैसर्गिक प्रवाह हा नाला बुजवून रोखण्यात आल्याने पावसाळ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा एकदा अस्त्यावस्त पसरून ,नागरी वस्त्यांना धोका निर्माण करू शकणार आहे. मुख्य बाब म्हणजे ज्यांनी नदी नाल्याचे रक्षण करायचे त्यांनीच हा नाला बुजविल्याने तो बुजविण्यासाठी राबलेल्या शासकीय रक्षकावरच फौजदारी कारवाई करावी असे पत्र महापालिकेतील विरोधीपक्ष नेते निलेश निकम यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहे.

या पत्रात निलेश निकम यांनी असे म्हटले आहे कि,’

या संदर्भात धक्कादायक वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे:
१. प्रशासनाची दुटप्पी भूमिका:
सप्टेंबर २०२५ मध्ये जेव्हा टेकडीवरील पाणी अभिमानश्री सोसायटी, निलगिरी लेन आणि इंदिरा वसाहत येथील घरांत शिरले होते, तेव्हा महानगरपालिकेच्या ड्रेनेज व बांधकाम विभागाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर २५ सप्टेंबर २०२५ रोजी हा नाला पूर्णपणे साफ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला होता. याचा अर्थ हा नाला अस्तित्वात असल्याचे आणि तो शहराच्या निचरा व्यवस्थेसाठी (Strom Water System) महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने मान्य केले होते.
२. सद्यस्थितीतील अतिक्रमण: सद्यस्थितीत त्याच ठिकाणी, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत नैसर्गिक नाला पूर्णपणे बुजवून त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे. विकास आराखड्यात (DP) स्पष्टपणे दर्शवलेला नाला अशा प्रकारे बुजवणे हा केवळ नियमांचा भंग नसून पर्यावरणाशी केलेला खेळ आहे.
३. आगामी पावसाळ्याचा धोका: गेल्या वर्षी नाला साफ केल्यामुळे दिलासा मिळाला होता, मात्र आता तो पुन्हा बुजवला गेल्याने आगामी पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे वसाहतींमध्ये पाणी शिरून जीवित व आर्थिक हानी होण्याची दाट शक्यता आहे.या संभाव्य दुर्घटनेला आता सर्वस्वी प्रशासन आणि हे अतिक्रमण करणारे घटक जबाबदार राहतील.
नाला बुजवून आणि त्यावर अतिक्रमण करून सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे.
सप्टेंबर २०२५ मध्ये ज्या स्थितीत नाला साफ करून प्रवाह मोकळा केला होता, त्याच स्थितीत नाला पूर्ववत (Restore) करण्यात यावा.विकास आराखड्यातील (DP) नाल्याचे अस्तित्व मिटवणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास, आम्ही बाधित नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडू आणि या बेकायदेशीर कृत्याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी

 शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या  खास विनोदी अंदाजासाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने हे दोघे सरपंच आणि उपसरपंचांच्या भूमिकेत आमने-सामने येणार आहेत. आगामी‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात या दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या दोघांच्या संवादांमधील चुरस, एकमेकांवरची टोलेबाजी आणि गावातील राजकारणातून निर्माण होणारे प्रसंग कथेला वेगळीच रंगत देणार आहेत. येत्या १७ एप्रिलला ‘सालबर्डी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेविषयी बोलताना शशांक शेंडे म्हणाले, ‘सालबर्डी’ची कथा रहस्यमय आहे. स्थानिक पातळीवरचे  राजकारण आणि एकमेकांसोबत असलेल्या नातेसंबंधांची झलक यामध्ये पहाता येईल.  ही  भूमिका करताना ओंकार सोबत झालेले ट्युनिंग आणि आम्ही साकारलेली भूमिका पडद्द्यावर पहाणं रंजक असणार आहे. ओंकार भोजने म्हणाला, ‘उपसरपंच मुकिंदा थोरात ही भूमिका खूप रंगतदार आहे. शशांक सरांसारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांना ही जुगलबंदी नक्कीच आवडेल.’

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.

‘सालबर्डी’ चित्रपटात शशांक शेंडे, ओंकार भोजने यांच्यासोबत पूजा सावंत, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

भारतीय घरातील स्मार्ट आणि ‘ऑल-इन-वन’ स्वयंपाकाच्या एका नव्या युगाची सुरुवात

पुणे- फिलिप्स होम अप्लायन्सेसने फिलिप्स वनशेफ सादर करण्याची घोषणा आज केली. स्वयंपाकासाठी हे एक नावीन्यपूर्ण, सर्वसमावेशक स्मार्ट उपकरण असून, रोजचा स्वयंपाक सोपा करण्यासोबतच भारतीय घरांसाठी पाककलेचे नवनवीन पर्याय करून पाहण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे.

रणवीर ब्रार यांनी मुंबईतआयोजित केलेल्या ‘शेफ्स टेस्टिंग टेबल’ या कार्यक्रमात याचे उद्घाटन झाले. पदार्थांची चव पाहून, इंटरॅक्टिव्ह फूड स्टेशन्सच्या माध्यमातून भारतातील विविध खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेण्यासाठी पाहुण्यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, ब्रार यांनी वर्सुनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. गुलबहार तौरानी यांच्यासोबत भारतीय पदार्थांच्या चवीशी कुठेही तडजोड न करता  स्वयंपाकघरातील आधुनिक तंत्रज्ञान क्लिष्ट पाककृती कशा सहज- करू शकते, हे दाखवून दिले.

हे लॉन्च म्हणजे आधुनिक भारतीय स्वयंपाकघराची पुनर्कल्पना करण्याच्या दिशेने फिलिप्सने टाकलेले नवीन पाऊल आहे. ‘वनशेफ’मध्ये 33 स्मार्ट कुकिंग फंक्शन्स एकाच उपकरणात कार्यरत आहेत. प्रगत ‘अँबीहीट™’ तंत्रज्ञान वापरण्यात आलेले हे उपकरण, योग्य तापमान आणि एकसमान उष्णतेचा वापर करून विविध पदार्थ तसेच स्वयंपाकाच्या टप्प्यांनुसार स्वतःला जुळवून घेते. यामुळे रोजच्या साध्या जेवणापासून ते सणासुदीच्या खास पदार्थांपर्यंत, विविध प्रकारच्या पाककृतींमध्ये एकसारखी चव आणि उत्तम स्वाद मिळतो.

लाँचप्रसंगी गुलबहार तौरानी म्हणालेभारतीय घरांमध्ये प्रत्यक्षात स्वयंपाक कसा केला जातो हे समजून घेणे आणि त्यांच्या रोजच्या सवयीच्या गोष्टींमध्ये सहज सामावले जाणारे उपकरण डिझाइन करणेयावर आमचे नेहमीच लक्ष राहिले आहे. भारतीय स्वयंपाक अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अनेकदा वेळखाऊ असतो. म्हणूनच चवीशी तडजोड न करता प्रक्रिया सुलभ करणारे उपाय अधिकाधिक महत्त्वाचे ठरतात. वनशेफच्या माध्यमातूनआम्ही स्वयंपाकाची अनेक तंत्रे एकाच इंटेलिजेंट प्लॅटफॉर्मवर आणू इच्छितोजो रोजच्या स्वयंपाकाला अधिक सहज आणि चविष्ट बनवतो. व्यावहारिक आणि उद्देशपूर्ण अशा दोन्ही नावीन्यपूर्णतेद्वारे आधुनिक भारतीय स्वयंपाकघराची पुनर्कल्पना करण्याच्या आमच्या व्यापक वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.”

भारतीय पाककला अत्यंत वैविध्यपूर्ण आणि बहुआयामी आहेआणि चवीशी कोणतीही तडजोड न करतापाककला अधिक सुलभ बनवण्यात हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हेच संतुलन साधण्याच्या उद्देशाने वन शेफची रचना करण्यात आली आहे. यामुळे गृहिणी अधिक सहजतेने आणि आत्मविश्वासाने विविध प्रकारच्या पाककृती करण्याचा प्रयत्न करू शकतील,” असे शेफ रणवीर ब्रार म्हणाले.

वनशेफच्या माध्यमातून, फिलिप्सने एअर फ्रायिंग, स्टर फ्रायिंग, स्टीमिंग आणि बॉइलिंग यांसारखी स्वयंपाकाची अनेक तंत्रे एकाच कॉम्पॅक्ट उपकरणात एकत्र आणत ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दृष्टिकोनामुळे स्वयंपाकघरातील कामाची प्रक्रिया सोपी होते आणि गृहिणी अनेक उपकरणे न हाताळता विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकतात. भारतीय घरांचा विचार करून डिझाइन केलेले, वनशेफचे सहज वापरता येणारे कंट्रोल्स आणि गाइडेड कुकिंग प्रोग्राम्स ग्राहकांना शेफ-प्रेरित पाककृती सहजपणे तयार करण्यास मदत करतात.

या कार्यक्रमात ‘घरगुती स्वयंपाक आणि स्वयंपाकघरातील नवनिर्मितीचे भविष्य’ या विषयावर एका चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रणवीर ब्रार, गुलबहार तौराणी, दिग्दर्शिका फराह खान आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ राजीव मखनी यांचा सहभाग होता. ‘स्मार्ट उपकरणां’मुळे आधुनिक कुटुंबांना दैनंदिन स्वयंपाकाचा अनुभव किती वेगळा आणि आनंददायी वाटतो, यावर प्रकाश टाकला.

किंमत आणि उपलब्धता

फिलिप्स वनशेफ हे 19 मार्चपासून क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारखी प्रमुख किरकोळ विक्री दुकाने आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल.

मॉडेलसर्वोत्तम किंमत (रुपयांमध्ये)उपलब्धता
वनशेफRs.  19,995/-19 मार्चपासून

महिला शेतकरी अधिकार कायद्याच्या अभ्यासासाठी कृतीगट तयार करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शेतीपूरक व्यवसायांसाठी महिलांना विशेष अनुदान देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

विधान भवनात जागतिक महिला दिनानिमित्त “महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण” कार्यक्रम

मुंबई, दि.११ मार्च २०२६ : महिला शेतकरी हक्क कायद्याबाबत ११ मे २०१२ रोजी राज्यसभेत खासगी विधेयक सादर करण्यात आले, या महिला शेतकरी अधिकार विधेयकावर अभ्यास करण्यासाठी कृतीगट स्थापन करण्याची गरज असल्याचे विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ आणि जागतिक महिला दिनानिमित्त विधानभवनात ‘महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, डॉ. सौम्या स्वामिनाथन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या प्रमुख मोनिका राजळे, आमदार ज्योती गायकवाड, मंजुळा गावित आणि डॉ. नित्या राव यांनी यावेळी आपले विचार मांडले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिला शेतकऱ्यांच्या नावावर जमीन व मालमत्ता नोंदणीला प्रोत्साहन देणे तसेच महिला शेतकरी हक्कांसाठी कायदेशीर संरक्षणाची गरज डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. याखेरीज महिला शेतकरी कोष निर्माण करण्यात यावा. आपत्तीच्या काळात संकटग्रस्त महिला शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी महिलांच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढत असल्याने शेतीची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर महिलांवर येत आहे. अनेक कुटुंबांमध्ये महिला कुटुंबप्रमुख म्हणून शेती सांभाळत आहेत. मात्र प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांचे नाव सातबाऱ्यावर नसल्याने त्यांना शासकीय योजना, कर्ज आणि इतर सुविधांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत प्रमाणपत्र देण्याचा विषय आपण अनेक वर्षांपासून मांडत आहोत, परंतु त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

महिलांना संपत्ती आणि शेतीवरील हक्क मिळण्यासाठी विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. तसेच महिलांच्या नावाने जमीन व मालमत्ता नोंदणीला प्रोत्साहन देणे आणि शेतकरी महिलांच्या श्रमाचे मूल्य मान्य करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. शेती, पशुपालन आणि वनशेतीसारख्या क्षेत्रांमध्ये महिलांचे मोठे योगदान असून त्यांना तंत्रज्ञान, कर्जसुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास त्यांचे सक्षमीकरण अधिक प्रभावी होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, कृषी योजनांमध्ये किमान ३० टक्के लाभ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. नमो ड्रोन योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून कुक्कुटपालन आणि इतर शेतीपूरक व्यवसायांसाठी महिलांना विशेष अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात बोलताना डॉ. नित्या राव यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ग्रामीण भागात सुमारे ८० टक्के महिला शेतीशी संबंधित काम करत असल्या तरी केवळ सुमारे १५ टक्के महिलांच्या नावावरच सातबारा आहे. त्यामुळे अनेक महिलांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळत नाही. महिलांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळणे आणि कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच राष्ट्रीय किसान नीती २००७ नुसार शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिल्यास त्यांना पाणी, कर्ज आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळू शकतो. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र श्रेणी निश्चित करून कृषी विकास कोष तयार करणेही आवश्यक असल्याचे डॉ. नित्या राव यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिला शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महिला शेतकऱ्यांसाठी ‘वूमन फार्मर आयडी’ देण्याबाबत विचार होण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला.

एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. ११ मार्च २०२६.

केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईत होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. घरगुती गॅस सिलेंडर ६० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ केली आहे. दरवाढीसोबतच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवला आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॅाटेल बंद होत आहेत. ही दरवाढ अन्यायकारक असून तात्काळ मागे घ्यावी तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे गॅस व इंधन पुरवठ्याचे कोणतेही नियोजन नाही, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत, हॉटेल व्यवसाय, खाणावळी बंद करण्याची वेळ आली आहे. गॅसचा तुटवडा नाही हा सरकारचा दावा चुकीचा असून सर्वसामान्य जनता व हॉटेल व्यावसायीक यांना गॅस उपलब्ध होत नाही. आधीच महागाई त्यात गॅसचा तुटवडा यामुळे राज्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, सेल, विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात उद्या १२ मार्च रोजी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

गॅस तुटवड्याचे संकट,भाजपने सोडले पुणेकरांना वाऱ्यावर-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : शहरामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल्स बंद पडत आहेत, हजारोंचा रोजगार धोक्यात आला आहे, अशा स्थितीत सत्ताधारी भाजपने पुणेकरांना दिलासा देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

महापालिकेतील पदाधिकारी आणि कमिट्यांच्या निवडणुका लढविण्यात भाजपचे नेते मश्गूल झाले आहेत. पुण्याचे मंत्री उदासीन आहेत. वास्तविक त्यांनी पुण्यात बैठका घेऊन गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत वस्तुस्थिती तातडीने सांगायला हवी होती. पुणेकरांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत, त्या दूर करण्याऐवजी पुण्यातील सर्व मंत्री प्रश्नापासून दूर पळ काढत आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शिक्षणा साठी विद्यार्थी पुण्यात वास्तव्यास आहेत . गॅस सिलेंडरच्या टंचाईने छोटी हॉटेल्स , स्नॅक्स सेंटर , खानावळी बंद पडण्याची भिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने गावाकडे परतावे लागेल. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी भाजपची आहे. ही जबाबदारीसुद्धा भाजपचे लहान मोठ नेते टाळत आहेत . हे चित्र संतापजनक आहे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे .

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडावी आणि या हॉटेल व्यवसायाला एकदम दणका बसू नये, अशा पद्धतीचे नियोजन व्हावे, अशा मागणीचे निवेदन मोहन जोशी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना आज (बुधवारी) दिले.

देशभरात व्यावसायिक गॅस थांबवला; घरगुती गॅसला प्राधान्य, काळजी करू नका – मुरलीधर मोहोळ

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात माध्यमांसमोर गॅस सिलेंडर वितरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ म्हणाले, देशभरात व्यावसायिक क्षेत्राचा गॅस थांबवला आहे. व घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात आलं आहे. काळजी करण्याचे कारण नाही. घरगुती गॅस कमी पडणार नाही. केंद्राने तशी काळजी घेतली आहे, त्याला काही कालावधी जावा लागणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका भारतियांना बसत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडर गॅस (दि. ५ मार्च) गुरुवारपासून कंपन्यांनी वितरणास व बुकिंगसाठी बंदी घातली आहे. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय हॉटेल व्यवसायातील कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असून पुणे-मुंबईतील हॉटेल व्यवसायांना लवकरच टाळे लावण्याची वेळ येईल, अशी भीती हॉटेल-रेस्टॉरंट अॅण्ड हॉटेलिंग असोशिएशन यांनी केली आहे. कोरोनामध्येही एवढी वाईट अवस्था नव्हती झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी देखील रांगा दिसून आल्या आहेत. पुर्वी घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. तो आता ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. एका ग्राहकाला एकच सिलिंडर मिळणार आहे. यामुळे घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावाधाव सुरू असून बुकिंग करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गॅस वितरक कंपन्यांकडून ग्राहकांची गैरसोय होत आहे. तर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असलं तरी देखील प्रत्यक्षात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना वितरण कार्यालयांमध्ये जावे लागत आहे.
या
दरम्यान घरगुती गॅसच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या असतानाच आता घरगुती सिलिंडरसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा गॅसची बुकिंग करताना तांत्रिक अडचणी येत आहे, तर बुकिंग केल्यानंतर सिलिंडर मिळण्यास ४ ते ७ दिवसांचा विलंब होत आहे. तसेच घरगुती गॅस बुकिंगसाठी रांगा लागत आहेत. यामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना ३१ मे अखेर मुलभूत ओळखपत्रे उपलब्ध करुन द्यावेत-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ११: जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना त्यांचे मुलभूत अधिकार व शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याकरिता विविध ओळखपत्रे, प्रमाणपत्रे मोहिमस्तरावर ३१ मे २०२६ अखेर उपलब्ध करुन द्यावे, याकरिता सर्व संबंधित विभाग, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मिळून शिबीराचे आयोजन करावे, शिबीरामध्ये अधिकाधिक नागरिक उपस्थित राहतील, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ देण्याबाबत गठीत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, शासकीय तसेच अशासकीय सदस्य, तहसीलदार श्वेता पवार, पिंपरी-चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख, इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे सहायक संचालक तथा समितीचे सचिव प्रदीप संकपाळ तर तहसीलदार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, समाजातील शेवट्या घटकातील नागरिक विविध योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, त्यांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना आधार कार्ड, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेयर, अधिवास दाखला, जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अन्य आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याकरिता विशेष शिबीरे आयोजित करावीत. या शिबीराच्या ठिकाणी संबंधित विभागाचे सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, तसेच याठिकाणी प्रमाणपत्राचे सर्वप्रकारचे नमुने उपलब्ध करुन द्यावे. शासन निर्णय, परिपत्रकांतील तरतूदीनुसार सर्व नागरिकांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध करुन द्यावीत.

नागरिकांना विविध योजनांचा लाभ देतांना ओळखपत्रे व प्रमाणपत्राची आवश्यकता लागते. ही बाब विचारात घेता ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्यास कागदपत्राअभावी एकही नागरिक वंचित राहणार नाही तसेच या बैठकीत समिती सदस्यांनी केलेल्या सूचनाही विचारात घेवून त्यानुसार कार्यवाही करावी, असेही श्री. डुडी म्हणाले.

यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीच्या अनुषंगाने सूचना करुन जिल्ह्यात शिबीराचे आयोजन, नागरिकांना ओळख व प्रमाणपत्रे मिळण्याच्या कामी सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला:विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत माहिती

मुंबई-युद्धाच्या झळा अवघ्या जगाला बसत आहे. महाराष्ट्रात तर गॅस तुटवड्याची परिस्थिती दिवसागणिक हाताबाहेर जात आहे. त्यातच राज्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारी एक गाडीच चोरीला गेल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या पटलावर या घटनेचा उलगडा केल्यानंतर ही घटना समोर आली. मंत्रालयातील कॅन्टिनही बंद पडल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारकडे स्थिती स्पष्ट करण्यासाठी निवेदन करण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारकडून या प्रकरणी आज एखादे निवेदन येण्याची शक्यता आहे.

विजय वडेट्टीवार सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच म्हणाले, काल रात्री सभागृह एक ते दीड वाजेपर्यंत चालले. काल आमदारांना कॅन्टिन बंद होती. त्यांना तिथे त्यांना काहीही जेवणास मिळाले नाही. आज मंत्रालयात अशी स्थिती आहे की, कॅन्टिनसुद्धा बंद झाली. महाराष्ट्रातील हॉटेल्सही बंद झालेत. महिलांमध्ये या गॅस तुटवड्यामुळे अस्वस्थता आहे. सरकारने दरवाढ केली. पण मुंबई, नागपुरातील 30 टक्के हॉटेल्स बंद झालेत. पुढच्या 2 दिवसांत पुन्हा सगळे हॉटेल्स बंद होतील. हॉटेल्स बंद होऊ द्या. पण घरगुती गॅसच्या पुरवठ्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, या गॅस तुटवड्यामुळे उद्या घरची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसा करावा अशी चिंता निर्माण झाली आहे. सध्या ओटीपी दिल्यानंतर 15 दिवसांनंतर गॅस सिलिंडर मिळत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्रावर होणार परिणाम यावर सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. यातून पुढे काय परिणाम होणार आहे हे सर्वांना माहिती आहे. हे युद्ध वाढले तर त्याचे परिणाम उद्या दिसतील. पण सध्या परिस्थिती गंभीर आहे. कोल्हापूर व विदर्भातील काही शहरांसह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. गॅसच मिळत नाही.
एचपी कंपनीची गाडीच चोरीला

वडेट्टीवार म्हणाले, काल एचपीसीच्या गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला गेली. 18 लाख रुपये किंमतीची सिलिंडर होती. मुंबईतही पुरवठा बंद आहे. एवढी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आले पाहिजे. महाराष्ट्राला जनतेला सांगितले पाहिजे की, आता काय परिस्थिती आहे? या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत? आता आपल्याकडे उपलब्ध किती आहे? तुटवडा कसा निर्माण होणार आहे? काही बचत करायची असेल तर कशी करावी? यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला स्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. गॅस, पेट्रोलियम हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय असला तरी राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याची जबाबदारी महाराष्ट्र शासन घेत असते आणि घेईल. त्यामुळे दिलेल्या माहितीची नोंद घेऊन शासनाने उचित उपाययोजना करावी, असे ते म्हणाले. त्यावर वडेट्टीवार यांनी पुन्हा सरकारच्या निवेदनाची मागणी केली. पण अध्यक्षांनी प्रथम सरकारला उपाययोजना ठरवू द्या, त्यानंतर ते निवेदन करतील, असे स्पष्ट केले.