Home Blog Page 137

देशभरात व्यावसायिक गॅस थांबवला; घरगुती गॅसला प्राधान्य, काळजी करू नका – मुरलीधर मोहोळ

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात माध्यमांसमोर गॅस सिलेंडर वितरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ म्हणाले, देशभरात व्यावसायिक क्षेत्राचा गॅस थांबवला आहे. व घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात आलं आहे. काळजी करण्याचे कारण नाही. घरगुती गॅस कमी पडणार नाही. केंद्राने तशी काळजी घेतली आहे, त्याला काही कालावधी जावा लागणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका भारतियांना बसत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडर गॅस (दि. ५ मार्च) गुरुवारपासून कंपन्यांनी वितरणास व बुकिंगसाठी बंदी घातली आहे. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय हॉटेल व्यवसायातील कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असून पुणे-मुंबईतील हॉटेल व्यवसायांना लवकरच टाळे लावण्याची वेळ येईल, अशी भीती हॉटेल-रेस्टॉरंट अॅण्ड हॉटेलिंग असोशिएशन यांनी केली आहे. कोरोनामध्येही एवढी वाईट अवस्था नव्हती झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी देखील रांगा दिसून आल्या आहेत. पुर्वी घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. तो आता ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. एका ग्राहकाला एकच सिलिंडर मिळणार आहे. यामुळे घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावाधाव सुरू असून बुकिंग करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गॅस वितरक कंपन्यांकडून ग्राहकांची गैरसोय होत आहे. तर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असलं तरी देखील प्रत्यक्षात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना वितरण कार्यालयांमध्ये जावे लागत आहे.
या
दरम्यान घरगुती गॅसच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या असतानाच आता घरगुती सिलिंडरसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा गॅसची बुकिंग करताना तांत्रिक अडचणी येत आहे, तर बुकिंग केल्यानंतर सिलिंडर मिळण्यास ४ ते ७ दिवसांचा विलंब होत आहे. तसेच घरगुती गॅस बुकिंगसाठी रांगा लागत आहेत. यामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना ३१ मे अखेर मुलभूत ओळखपत्रे उपलब्ध करुन द्यावेत-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ११: जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना त्यांचे मुलभूत अधिकार व शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याकरिता विविध ओळखपत्रे, प्रमाणपत्रे मोहिमस्तरावर ३१ मे २०२६ अखेर उपलब्ध करुन द्यावे, याकरिता सर्व संबंधित विभाग, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मिळून शिबीराचे आयोजन करावे, शिबीरामध्ये अधिकाधिक नागरिक उपस्थित राहतील, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ देण्याबाबत गठीत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, शासकीय तसेच अशासकीय सदस्य, तहसीलदार श्वेता पवार, पिंपरी-चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख, इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे सहायक संचालक तथा समितीचे सचिव प्रदीप संकपाळ तर तहसीलदार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, समाजातील शेवट्या घटकातील नागरिक विविध योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, त्यांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना आधार कार्ड, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेयर, अधिवास दाखला, जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अन्य आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याकरिता विशेष शिबीरे आयोजित करावीत. या शिबीराच्या ठिकाणी संबंधित विभागाचे सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, तसेच याठिकाणी प्रमाणपत्राचे सर्वप्रकारचे नमुने उपलब्ध करुन द्यावे. शासन निर्णय, परिपत्रकांतील तरतूदीनुसार सर्व नागरिकांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध करुन द्यावीत.

नागरिकांना विविध योजनांचा लाभ देतांना ओळखपत्रे व प्रमाणपत्राची आवश्यकता लागते. ही बाब विचारात घेता ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्यास कागदपत्राअभावी एकही नागरिक वंचित राहणार नाही तसेच या बैठकीत समिती सदस्यांनी केलेल्या सूचनाही विचारात घेवून त्यानुसार कार्यवाही करावी, असेही श्री. डुडी म्हणाले.

यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीच्या अनुषंगाने सूचना करुन जिल्ह्यात शिबीराचे आयोजन, नागरिकांना ओळख व प्रमाणपत्रे मिळण्याच्या कामी सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला:विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत माहिती

मुंबई-युद्धाच्या झळा अवघ्या जगाला बसत आहे. महाराष्ट्रात तर गॅस तुटवड्याची परिस्थिती दिवसागणिक हाताबाहेर जात आहे. त्यातच राज्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारी एक गाडीच चोरीला गेल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या पटलावर या घटनेचा उलगडा केल्यानंतर ही घटना समोर आली. मंत्रालयातील कॅन्टिनही बंद पडल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारकडे स्थिती स्पष्ट करण्यासाठी निवेदन करण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारकडून या प्रकरणी आज एखादे निवेदन येण्याची शक्यता आहे.

विजय वडेट्टीवार सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच म्हणाले, काल रात्री सभागृह एक ते दीड वाजेपर्यंत चालले. काल आमदारांना कॅन्टिन बंद होती. त्यांना तिथे त्यांना काहीही जेवणास मिळाले नाही. आज मंत्रालयात अशी स्थिती आहे की, कॅन्टिनसुद्धा बंद झाली. महाराष्ट्रातील हॉटेल्सही बंद झालेत. महिलांमध्ये या गॅस तुटवड्यामुळे अस्वस्थता आहे. सरकारने दरवाढ केली. पण मुंबई, नागपुरातील 30 टक्के हॉटेल्स बंद झालेत. पुढच्या 2 दिवसांत पुन्हा सगळे हॉटेल्स बंद होतील. हॉटेल्स बंद होऊ द्या. पण घरगुती गॅसच्या पुरवठ्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, या गॅस तुटवड्यामुळे उद्या घरची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसा करावा अशी चिंता निर्माण झाली आहे. सध्या ओटीपी दिल्यानंतर 15 दिवसांनंतर गॅस सिलिंडर मिळत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्रावर होणार परिणाम यावर सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. यातून पुढे काय परिणाम होणार आहे हे सर्वांना माहिती आहे. हे युद्ध वाढले तर त्याचे परिणाम उद्या दिसतील. पण सध्या परिस्थिती गंभीर आहे. कोल्हापूर व विदर्भातील काही शहरांसह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. गॅसच मिळत नाही.
एचपी कंपनीची गाडीच चोरीला

वडेट्टीवार म्हणाले, काल एचपीसीच्या गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला गेली. 18 लाख रुपये किंमतीची सिलिंडर होती. मुंबईतही पुरवठा बंद आहे. एवढी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आले पाहिजे. महाराष्ट्राला जनतेला सांगितले पाहिजे की, आता काय परिस्थिती आहे? या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत? आता आपल्याकडे उपलब्ध किती आहे? तुटवडा कसा निर्माण होणार आहे? काही बचत करायची असेल तर कशी करावी? यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला स्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. गॅस, पेट्रोलियम हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय असला तरी राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याची जबाबदारी महाराष्ट्र शासन घेत असते आणि घेईल. त्यामुळे दिलेल्या माहितीची नोंद घेऊन शासनाने उचित उपाययोजना करावी, असे ते म्हणाले. त्यावर वडेट्टीवार यांनी पुन्हा सरकारच्या निवेदनाची मागणी केली. पण अध्यक्षांनी प्रथम सरकारला उपाययोजना ठरवू द्या, त्यानंतर ते निवेदन करतील, असे स्पष्ट केले.

भारतात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली-१३ वर्षे कोमात असलेल्या युवकाचे माता पिता , कुटुंब उपचार , देखभाल करता करता आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचले आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी या 31 वर्षीय व्यक्तीला इच्छामृत्यूची परवानगी दिली . गाझियाबादचे रहिवासी हरीश राणा 13 वर्षांपासून कोमात आहेत. हरीश लाइफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने एम्सला (AIIMS) हरीश राणा यांना उपशामक काळजीमध्ये (पेलिएटिव्ह केअर) दाखल करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून जीवनरक्षक उपचार टप्प्याटप्प्याने काढता येतील.न्यायालयाने म्हटले की, ही प्रक्रिया अशा प्रकारे केली पाहिजे की रुग्णाची प्रतिष्ठा कायम राहील.
दिल्लीत जन्मलेले हरीश राणा चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेत होते. २०१३ मध्ये ते वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले. यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला लकवा मारला आणि ते कोमात गेले. ते काही बोलू शकत नाहीत किंवा काहीही अनुभवू शकत नाहीत.

डॉक्टरांनी सांगितले आहे की मुलाच्या मेंदूच्या नसा पूर्णपणे सुकल्या आहेत. त्याच्या उपचारासाठी त्यांना दिल्लीतील द्वारका येथील आपले घर विकावे लागले. आता ते गाझियाबादमधील दोन खोल्यांच्या एका फ्लॅटमध्ये राहतात. अशोक राणा ताज केटरिंगमध्ये नोकरी करत होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर आता त्यांना दरमहा ३६०० रुपये पेन्शन मिळते.

शनिवार आणि रविवारी ते गाझियाबादमधील एका क्रिकेट मैदानावर सँडविच आणि बर्गर विकतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारे घराचा खर्च आणि मुलाचा उपचार होऊ शकेल. ते म्हणतात की आता त्यांच्याकडे मुलाच्या उपचारासाठी पैसे नाहीत, त्यामुळे ते कोर्टाकडून इच्छामृत्यूची मागणी करत आहेत.

हरीशची आई निर्मला राणा यांचेही हेच म्हणणे आहे की, त्यांनी त्याच्या बरे होण्याची आशा गमावली आहे. त्यांच्यानंतर मुलाला पाहणारे कोणी नाही. हरीशचा एका महिन्याचा वैद्यकीय खर्च कमीतकमी 25-30 हजार रुपये आहे. निर्मला म्हणतात की, त्यांच्या मुलासोबत जे घडत आहे, ते देवाने कोणासोबतही करू नये.

डॉक्टरांनी हरीशला क्वाड्रिप्लेजिया या आजाराने ग्रस्त असल्याचे घोषित केले. यात रुग्ण पूर्णपणे फीडिंग ट्यूब म्हणजे खाण्यापिण्याच्या नळीवर आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर अवलंबून असतो. यात बरे होण्याची कोणतीही शक्यता नसते.

आई-वडील हरीशची इच्छामृत्यूची मागणी करत आहेत, कारण सुमारे 13 वर्षांपासून अंथरुणावर पडून असल्यामुळे हरीशच्या शरीरावर बेडसोर्स म्हणजे खोल जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती सतत खालावत चालली आहे.

ही स्थिती हरीशसाठी खूप वेदनादायक आहे. कुटुंबासाठी त्याला असे पाहणे मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण झाले आहे. व्हेंटिलेटर, औषधे, नर्सिंग आणि देखभालीवर अनेक वर्षांपासून इतका खर्च झाला आहे की, कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचले आहे.
2005 मध्ये कॉमन कॉज नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने (NGO) निष्क्रिय इच्छामरणाच्या अधिकाराची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर 9 मार्च 2018 रोजी CJI दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली.

भारताने बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवले

भारताने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून क्रॉस-बॉर्डर पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेल पाठवणे सुरू केले आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPC) चे अध्यक्ष मोहम्मद रेजानुर रहमान यांनी सांगितले की, मंगळवारपर्यंत सुमारे 5,000 टन डिझेलचा पहिला साठा बांगलादेशात पोहोचला आहे.बांगलादेश सध्या इंधनाच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहे. याचे मुख्य कारण अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यात आलेला व्यत्यय आहे. बांगलादेश आपल्या गरजेच्या सुमारे 95% इंधन मध्य पूर्वेतून आयात करतो.

‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’ सारख्या मार्गांवर तणावामुळे पुरवठा थांबला आहे. यामुळे बांगलादेशातील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक शहरांमध्ये सरकारला तेलाची रेशनिंग करावी लागली आहे, जिथे बाईकसाठी 10 लिटर आणि कारसाठी 40 लिटरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.हे डिझेल ‘भारत-बांगलादेश फ्रेंडशिप पाइपलाइन’द्वारे पाठवले जात आहे. याचे उद्घाटन मार्च 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी केले होते. नुमालीगढ रिफायनरीपासून सुरू होऊन ही पाइपलाइन उत्तर बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील पार्बतीपूर डेपोपर्यंत जाते.

बीपीसीच्या अधिकाऱ्यांनुसार, सोमवारी दुपारी 3:20 वाजता पंपिंग सुरू झाली. दर तासाला सुमारे 113 टन तेल पाठवले जात आहे, जे पूर्णपणे पोहोचायला सुमारे 44 तास लागतील.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वार्षिक करारानुसार, भारत दरवर्षी पाइपलाइनद्वारे 1.80 लाख टन डिझेलचा पुरवठा करेल. बीपीसीचे अध्यक्ष रेजानुर रहमान यांनी सांगितले, “5,000 टनची ही खेप याच कराराचा भाग आहे.

पुढील सहा महिन्यांत आम्हाला 90,000 टन डिझेल मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आपल्या देशात इंधनाची उपलब्धता स्थिर होईल.” पाइपलाइनद्वारे पुरवठा झाल्यामुळे रेल्वे टँकरच्या तुलनेत वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर भारत आणि बांगलादेशचे ऊर्जा संबंध बिघडले होते. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने भारतासोबतच्या अनेक करारांचा आढावा घेतला होता.अदानीच्या झारखंडमधील ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवठ्यावरूनही वाद झाला होता. तथापि, आता ढाका येथील राजकीय बदलांनंतर भारताने डिझेल पाठवणे हे या गोष्टीचे संकेत आहे की दोन्ही देशांमधील ऊर्जा संबंध पुन्हा रुळावर येत आहेत.शेख हसीना बाहेर पडल्यानंतर अंतरिम सरकारने भारतासोबत झालेल्या वीज आणि वायू करारांना ‘अटींनुसार प्रतिकूल’ म्हटले होते. थकबाकी न भरल्यामुळे अदानी पॉवरने पुरवठा अर्धा केला होता, जो मार्च 2025 मध्ये देयके सुरू झाल्यानंतर पूर्ववत करण्यात आला.

व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे दावे दिशाभूल करणारे, शासनाकडून महत्त्वाचे आवाहन

आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. राज्यात घरगुती एलपीजी (LPG), व्यावसायिक गॅस आणि सीएनजीचा (CNG) तुटवडा निर्माण झाला असून, सिलेंडरसाठी ग्राहकांना आता अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत, मात्र राज्य सरकारने या अफवांचे खंडन करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. केंद्र सरकारने सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना ‘घरगुती एलपीजी’ पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यासंदर्भातील प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.
या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि दरात अचानक १५० ते २०० रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल मालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक ठिकाणी गॅस साठा संपत आल्याने हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल असोसिएशनने सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

एरवी बुकिंगनंतर २४ तासांत मिळणारा सिलेंडर आता ३ ते ५ दिवसांनंतर मिळत असल्याची माहिती आहे. पुरवठ्यातील तुटवड्यामुळे गॅस वितरकांवरही मोठा ताण आला असून, ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. “पुरवठा साखळीवर ताण असला तरी सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुण्याला क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीकर नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न: महापौर मंजुषा दीपक नागपुरे

  • पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

पुणे: खेळात आवश्यक असणारी प्रतिभा केवळ शहरांमध्येच असते असे नाही तर गावात, आदिवासी पाड्यातही असते. त्या दृष्टीनेच त्यांनाही वाव देण्यासाठी क्रीडाधोरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. महापौर चषक या स्पर्धेतही शहरातील प्रत्येक वस्तीतील प्रतिभावान खेळाडूला संधी मिळाली पाहिजे. महापौर चषक क्रीडा स्पर्धा हा केवळ दरवर्षी घ्यायचा उपक्रम नाही तर क्रीडानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला जागतिक पातळीकर नेण्यासाठीचे पाऊल आहे, असे मत पुण्याच्या लोकप्रिय महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका आयोजित पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंजूषा नागपुरे बोलत होत्या. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर आणि क्रिकेटर केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर आणि शांताराम जाधव, उपमहापौर परशुराम वाडेकर, शहर सुधारणा समिती अध्यक्ष स्मिता वस्ते,क्रीडा समिती अध्यक्ष नारायण गलांडे, नाव समिती अध्यक्ष पल्लवी जावळे, स्थानिक नगरसेवक धीरज घाटे, महेश आवळे, लताताई गौडा, राष्ट्रवादीचे पक्ष नेते सोपानकाका चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवक आणि पालिका आयुक्त नवलकिशोर राम व क्रीडा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशासाठी नवे शैक्षणिक धोरण स्वीकारले. त्यातही खेळांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याची भूमिका ठेवलेली आहे. याच्यातून क्रीडा क्षेत्राला आणखी वेग येणार आहे. पुण्यातील खेळाडूंनी जगभरात आपले नाव उंचावावे, अशी अपेक्षाही महापौर नागपुरे यांनी व्यक्त केली.नागपुरे म्हणाल्या,पुण्यात बॅडमिंटनसारख्या खेळाचा शोध लागला. गोपाळराव फडके यांच्यासारख्यांनी दूर परदेशात स्वखर्चाने जात खो खो सारखा खेत पोचवला, शिवरामपंत दामलेंसारख्यांनी महाराष्ट्रीय मंडळ स्थापन करून तरुणांमध्ये शारीरिक सामर्थ्य, आरोग्य आणि राष्ट्राभिमान रुजवण्याचे उ‌द्दिष्ट ठेवले. बुवा साळवींनी सातासमुद्रापार कबड्डी नेण्यात मोठे योगदान दिले. मामासाहेब मोहळांनी कुस्तीला वैभव प्राप्त करून देत, महाराष्ट्र केसरीसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू केली. या प्रत्येकाच्या प्रयत्नात तरुणांच्यातील उर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरली जावी, हा उद्देश होता.त्यांनी घालून दिलेली परंपरा आपण महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून आणखी सशक्त करूया, असेही नागपुरे म्हणाल्या.कार्यक्रमात केदार जाधव व मुरलीकांत पेटकर यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित खेळाडूंचा महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, एएमआर समूहाचे अध्यक्ष ए. महेश कुमार रेड्डी आणि ओबी हॉस्पिटॅलिटीजचे शेफ-ओनर हेमंत ओबेरॉय यांना सन्माननीय डी.लिट (विद्यानीधी) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी ही घोषणा केली. येत्या शनिवारी, १४ मार्च रोजी विद्यापीठाच्या ४४ व्या पदवीप्रदान सोहळ्यात त्यांना ही पदवी प्रदान केली जाईल.

डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून गोव्याचा कायापालट केला आहे. त्यांनी ‘स्वयंपूर्ण गोंय’ या मोहिमेद्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले.

‘स्वयंपूर्ण मित्र’ योजनेतून त्यांनी सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला. तसेच, ‘म्हजे घर’ योजनेमुळे गोवेकरांना स्वतःचा निवारा मिळाला आहे.

गोव्याचा निसर्ग जपून त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला औद्योगिक विकास इतर राज्यांसाठी आदर्श ठरला आहे.एएमआर समूहाचे अध्यक्ष ए. महेश रेड्डी यांची निवड त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी करण्यात आली आहे. त्यांनी गरजूंना मदतीचा हात देत दातृत्वाचा आदर्श निर्माण केला.

औद्योगिक क्षेत्राद्वारे राष्ट्रनिर्मितीचे काम आणि करुणा तसेच आध्यात्मिक मूल्यांवर आधारित दातृत्वाचा कृतीशील दृष्टिकोन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. कोविड संकटात त्यांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीला लक्षणीय योगदान दिले, ज्यामुळे रुग्णांच्या उपचारांना मदत झाली.

त्यांच्या पुढाकाराने तेलंगणातील ताडीचेर्ला आणि आसपासच्या गावांमध्ये आरोग्य आणि शिक्षणाचे अनेक कल्याणकारी उपक्रम राबवले जात आहेत.

ओबी हॉस्पिटॅलिटीजचे शेफ-ओनर हेमंत ओबेरॉय यांना भारतीय पाककलेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिल्याबद्दल सन्माननीय डी.लिट पदवीने गौरवण्यात येणार आहे. ते देशातील सर्वात लोकप्रिय शेफपैकी एक म्हणून ओळखले जातात.

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

पुणे, दि. १० : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी अधिकृत संकेतस्थळावर वाहनांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी अर्जदाराकडे अनुज्ञप्ती, बॅज, वाहन परवाना, रेशनकार्ड, आधारकार्ड व पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. पात्र चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी आल्यास चालकांना मदत करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मार्गदर्शनासाठी ०२०-२६०५८०८० हा विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी पुणे जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक-मालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे. उष्णता, अति उष्णता, उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

उष्णतेचा आरोग्यावर परिणाम

सामान्य लक्षणे
सामान्य मानवी शरीराचे तापमान ३६.४ °C ते ३७.२ °C (९७.५°F ते ९८.९°F) दरम्यान असते. सामान्यतः उष्णतेशी संबंधित (सौम्य ते गंभीर) आजारांमध्ये अंगावर पुरळ (अंगाला टोचणारी उष्णता), सूज (उष्णतेमुळे हात, पाय आणि घोट्याला सूज येणे), पेटके (उष्णतेमुळे स्नायूंमध्ये पेटके), उष्माघात, गोंधळल्यासारखे वागणे, काहीही न सुचणे, उष्णतेमुळे थकवा यांचा समावेश होतो. उष्णतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, श्वसन, किडनी रोगांसारख्या जुनाट आजारांवरील ताण देखील वाढू शकतो.

अति उष्णतेमुळे शरीरावर परिणाम करणारी लक्षणे: चक्कर येणे किंवा मूर्च्छा येणे, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या, अति तहान लागणे, अतिशय गडद पिवळ्या लघवीसह लघवीचे प्रमाण कमी होणे, जलद श्वासोच्छवास आणि हृदयाचे वाढलेले ठोके

उष्माघाताची लक्षणे
डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे यासह प्रौढ व्यक्तिंमध्ये दिशाभूल, गोंधळासह बदललेली मानसिक संवेदना आणि चिडचिड, अॅटॅक्सिया, फेफरे किंवा कोमामध्ये जाणे, गरम, लाल आणि कोरडी त्वचा, शरीराचे तापमान 40°C किंवा १०४°F, धडधडणारी डोकेदुखी ही उष्माघाताची लक्षणे आढळतात. तर मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, अति चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे, शुष्क त्वचा आणि अश्रू न येणे / खोल गेलेले डोळे, सुस्ती/बदललेल्या संवेदना, चिंता, चक्कर येणे, मूर्च्छा येणे आणि डोके हलके होणे, जखडणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव, स्रायू कमकुवत होणे किंवा पेटके येणे, मळमळ आणि उलटी, जलद हृदयाचे ठोके / श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे आढळतात.

उपाय
उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करत असताना या गोष्टींचा अवलंब करावा
संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास ही काळजी घ्या

व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवावे. व्यक्तीचे कपडे सैल करावेत. त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजावे. तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे आणि वैद्यकीय सल्ला घ्या.

उष्माघाताचा त्रास झाल्यास करावयाचे प्रथमोपचार
त्रास झालेल्या मुला-मुलीला लगेच घरात,सावलीत आणावे. संवेदनशील राहून त्यांचे कपडे सैल,ढिले करावेत. नळाच्या पाण्याने ओल्या केलेल्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात. उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे, जेणेकरून ते गुदमरून जाणार नाहीत. हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा. पायांखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून त्यांना आडवे पडायला सांगावे. मूल जागे असल्यास वारंवार साफ आणि थंड पाण्याचे घोट पाजावेत. मूल बेशुद्ध असल्यास त्यांना खायला ,प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नये.

उष्माघातापासून बचाव

काय करावे ?

अतिउष्णतेच्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. त्यासाठी तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे. तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.भरपूर ताजे व हलके अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे. पातळ, सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हात बाहेर जाताना डोके झाकावे. टोपी/कपडा/छत्रीचा वापर करावा. भरपूर पाणी, ओ. आर. एस. पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे. थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर, इतर स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारख्या उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात. सूर्यप्रकाशात उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावी.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या https://mausam.imd.gov.in/ संकेतस्थळावर हवामानाची अद्ययावत माहिती मिळवावी. शक्य तितके चांगल्या हवेशीर आणि थंड ठिकाणी, घरामध्ये, सावलीत राहावे. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटांना अडथळा निर्माण करावा. शक्यतो तुमच्या घराच्या ऊन येणाऱ्या बाजूच्या खिडक्या आणि पडदे दिवसा बंद ठेवा, रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडाव्यात. घराबाहेर जात असल्यास, तुमची बाहेरील कामे दिवसाच्या थंड वेळेपर्यंत म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी मर्यादित करा. दिवसाच्या थंड वेळेमध्ये बाहेरच्या कामांचे वेळापत्रक किंवा नियोजन करावे.

उष्णतेचा त्रास आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा अति धोका असतो, अशा जोखमीच्या लोकांकडे अतिरीक्त लक्ष दिले पाहिजे. यामध्ये लहान मुले आणि बालके, घराबाहेर काम करणारे लोक, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब, गर्भवती महिला, ज्या लोकांना मानसिक आजार आहे अशा व्यक्तिंचा समावेश होतो.

थंड हवामानापासून उष्ण हवामानापर्यंतच्या भागात प्रवास करणाऱ्यांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा. उष्ण वातावरणात एक्सपोजर/शारीरिक क्रिया हळूहळू वाढल्याने (१०-१५ दिवसांपेक्षा जास्त) अनुकूलता प्राप्त होते.

काय करू नये?

रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नये. उन्हात अधिक वेळ राहू नये. तिखट मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नये. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. ताप आल्यास थंड पाण्याची पट्टी ठेवावी. कूलर किंवा एअर कंडिशनर्समधून थेट उन्हात बाहेर पडू नये. उन्हात विशेषतः दुपारी 12:00 ते 03:00 दरम्यान बाहेर पडणे टाळावे. दुपारच्या वेळी बाहेर पडताना अति परिश्रमाची कामे टाळावीत. अनवाणी बाहेर जाऊ नये. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेली पेये टाळावीत, कारण यामुळे शरीरातील द्रवपदार्थ जास्त प्रमाणात कमी होतात किंवा पोटात पेटके येऊ शकतात. पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नये. वाहनातील तापमान धोकादायक ठरु शकते. शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेले आदि व्यक्ती आपल्या नजरेस आल्यास १०८/१०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक: उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाताना पिण्याचे पाणी, ज्यूस सोबत ठेवा आणि शरीर हायड्रेटेड राहील याबाबत दक्षता घ्या. पातळ, सैल सुती कपडे परिधान करा. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी छत्री,टोपी आदींनी आपले डोके झाका.अनवाणी बाहेर जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या. अधिक माहितीसाठी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.

स्त्रोत:-सार्वजनिक आरोग्य विभाग

शबरी महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी 15 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १० – शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत एन.एस.टी.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राज्य शासन पुरस्कृत स्वयंरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.
शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड व लातूर या जिल्ह्यांतील आदिवासी लाभार्थ्यांसाठी महिला सबलीकरण योजना, स्वयंसहायता बचत गट, कृषी व संलग्न व्यवसाय, हॉटेल-ढाबा व्यवसाय, ऑटो वर्कशॉप, स्पेअर पार्ट्स, वाहन व्यवसाय, ऑटो रिक्षा, मालवाहू रिक्षा तसेच लघुउद्योग आदी योजनांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यांतील आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www.mahashabari.in⁠ या संकेतस्थळावर १५ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., शाखा कार्यालय जुन्नर येथील शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे.

‘माझे पुणे, माझे बजेट’ उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन

पुणे : पुणे महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या वार्षिक अंदाजपत्रकाचे काम सुरू असून, त्यामध्ये पुणेकरांनाही सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने ‘माझे पुणे, माझे बजेट’ हा विशेष उपक्रम सुरू केला असून, त्यामध्ये जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभाग घेत आपल्या परिसरातील आवश्यक विकासकामांच्या सूचना महापालिका प्रशासनाकडे नोंदविण्याचे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे.
पुण्याच्या विकासात पुणेकरांचा थेट सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नागरिकांच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला. ‘नागरिकांच्या सहभागातून शहराची प्रगती’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, उद्याने, सार्वजनिक सुविधा आदी संदर्भातील महत्त्वाच्या कामांची माहिती महापालिका प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू असून, त्यामध्ये पुणेकरांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब उमटण्यासाठी हा नागरिक सहभाग उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील विकासकामांसाठी सूचना देऊन शहराच्या नियोजन प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सूचना नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना अर्ज भरता येणार असून, त्याद्वारे आपल्या परिसरातील आवश्यक कामांची माहिती थेट महानगरपालिकेकडे सादर करता येईल.
महानगरपालिकेच्या पीएमसी केअर या अधिकृत सिटिझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन, शहराच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘खंजिरीचे बोल’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (Film City) यांच्या अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पहिल्या फीचर फिल्म ‘खंजिरीचे बोल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडताच चित्रपटाच्या शूटिंगलाही अधिकृत सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच कोल्हापूर येथे सुरू होणार आहे.

एकेकाळी समाज प्रबोधन, ग्रामविकास, राष्ट्रभक्ती आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम मानले जात होते. संतांच्या कीर्तनातून समाजाला सकारात्मक दिशा मिळत असे. मात्र आधुनिक काळात ही परंपरा हळूहळू मागे पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारा, कार्यपद्धती आणि समाजासाठी केलेले कार्य व्यापक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि समाजप्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रासह देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन करत असून लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण हिमांशु दुबे यांचे असून संगीत कौशल इनामदार यांनी दिले आहे. तर चित्रपटाचे कला दिग्दर्शक संतोष फुटाणे आहेत.

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्म सिटी) निर्मित, इन असोसिएशन विथ कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शन च्या सहयोगाने हा चित्रपट निर्मित करण्यात येत आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली असून, हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा, कीर्तन परंपरेचा आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेल्या विचारांचा प्रभावी पट या चित्रपटातून उलगडला जाणार आहे.

यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्रीअॅड. आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून मानवी मूल्ये, राष्ट्रभक्ती, महान व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘खंजिरीचे बोल’ हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असून त्यांच्या ग्रामसेवा, परोपकार आणि भक्तीमार्गाच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोठे माध्यम ठरेल. अनंत महादेवन यांचे दिग्दर्शन आणि प्रसाद ओक यांचा प्रभावी अभिनय यामुळे हा विषय अधिक ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असा मला विश्वास आहे. या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.

‘कम अर्ली-गो अर्ली’महिला कर्मचाऱ्यांसाठी सवलत–उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विधान परिषदेत घोषणा

महिलांना सन्मान, योग्य संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करावा
-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन

मुंबई, दि. 10 :- मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान परिषदेत केली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याची ग्वाही देत राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत प्रस्तावावर झालेल्या विशेष चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्या म्हणाल्या, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर “कम अर्ली-गो अर्ली” या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9.15 ते 9.45 या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील, तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची, म्हणजेच सुमारे 30 मिनिटांची सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सभागृहात झालेल्या चर्चेत अनेक सदस्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. शासन या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती पावले उचलेल, असे त्यांनी आश्वासन दिले. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्गत जुलै 2015 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत 14 मोहिमा राबवून 42 हजार 594 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच ऑपरेशन शोध मोहिमेतून 5 हजार 66 महिला आणि 2 हजार 771 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘मिसिंग सेल’ कार्यरत असून महिलांच्या समस्यांसाठी 51 ‘भरोसा सेल’ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचे सांगताना त्यांनी ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’, ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजनांचा उल्लेख केला. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम राबविण्यात येत असून बचत गटांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाबाबत आणि पायाभूत सुविधांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राज्यातील 17 हजार 254 अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असल्याचे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्याची माहिती दिली.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली असून प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्यासही परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात चौथे महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावे यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत असून बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गाव निर्माण करणे आणि मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, बचत गटांचे बळकटीकरण, महिला शेतकरी व कामगारांसाठी विशेष उपाययोजना तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी यावर राज्य सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि महाराणी ताराबाई यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक सक्षमीकरणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे:महापलिकेच्या मुख्यसभेसमोर अहवाल ठेवा:निलेश निकम

पुणे- PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे याबाबतचा अहवाल तातडीने महापालिकेच्या मुख्य सभेसमोर आणावा अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज महापालिका आयुक्त यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात निकम यांनी म्हटले आहे कि , सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात PMPML प्रशासनाने, विशेषतः CMD यांनी संचालक मंडळाची पूर्वमान्यता न घेता अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याचे आणि आर्थिक अनियमितता केल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत.
या संदर्भात खालील मुद्यांवर तातडीने चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करावा.
१. बस खरेदी आणि कंत्राट प्रक्रियेतील अनियमितता
नियमबाह्य वर्क ऑर्डरः ४ ठेकेदारांकडून ८४ रुपये प्रति किमी दराने ४०० CNG बसेस घेण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रिया किंवा संचालक मंडळाची मान्यता न घेता त्याच ठेकेदारांना प्रत्येकी २० जादा बसेसची वर्क ऑर्डर कोणत्या आधारावर देण्यात आली?
आचारसंहितेचा भंगः डिसेंबर-जानेवारी २०२५-२६ मध्ये महापालिका निवडणूक आचारसंहिता लागू असताना, ९१ रुपये प्रति किमी या वाढीव दराने ५०० बसेस घेण्याची घाई का करण्यात आली? यामुळे होणाऱ्या कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार धरून संबंधित कंत्राट रद्द करावे,
निविदा प्रक्रिया पारदर्शकता: PMRDA, PMC आणि PCMC च्या निधीतून खरेदी होणाऱ्या १००० बसेसच्या
खरेदी प्रक्रियेचा (L1 ते L4 दर, पोर्टलवरील दर आणि खरेदी प्रक्रिया) संपूर्ण ‘A to Z’ अहवाल सादर करावा.
२. तांत्रिक आणि सुरक्षा त्रुटी
RTO पासिंग आणि सुरक्षाः
नवीन बसेसमध्ये ‘पॅनिक बटन’ आणि ITMS (Intelligent Transport Management System) नसल्याने RTO पासिंग रखडले आहे. जनतेच्या पैशातून घेतलेल्या या बसेस अशा अर्धवट स्थितीत का आहेत? या निष्काळजीपणाला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

३. बेकायदेशीर पदोन्नती आणि नोकरभरती
प्रमोशन घोटाळाः
सेवाज्येष्ठता यादी आणि मंजूर सेवा नियमांना बगल देऊन, पात्र कर्मचाऱ्यांना संधी न देता CMD आणि प्रशासनातील ठराविक अधिकाऱ्यानी ‘अंतर्गत पदोन्नती (Internal Promotion) राबवली आहे आर्थिक व्यवहार करून नियमबाह्य दिलेले प्रमोशन्स त्वरित रद्द करून याची सखोल चौकशी व्हावी.
४. स्टोअर विभाग आणि साहित्य खरेदी
MRP पेक्षा जास्त दराने खरेदी: PMPML स्टोअरमध्ये सुटे भाग (Spare Parts) MRP पेक्षा जास्त दराने आणि निकृष्ट दर्जाचे खरेदी केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे बसेसचे ब्रेकडाऊन आणि अपघात वाढत आहेत. मागील वर्षाच्या सर्व खरेदी फाईल्सची समितीमार्फत तपासणी व्हावी.
५. कर्मचारी कल्याण आणि देणी
सेवानिवृत्त सेवकांवर अन्यायः १/४/२०१७ ते ३१/१२/२०२२ दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा फरक आणि वाढीव ग्रॅच्युइटी का देण्यात आली नाही? १/१/२०२३ नंतरच्या सेवकांना लाभदेणे आणि जुन्या सेवकांना वंचित ठेवणे हा दुजाभाव थांबवून त्यांना तातडीने देणी अदा करावीत. वैद्यकीय सुविधाः कर्मचाऱ्यांच्या पगारातून २% रक्कम कपात केली जात असतानाही त्यांना वैद्यकीय सुविधा आणि हॉस्पिटल बिल का मिळत नाहीत? यातील टक्केवारी प्रकरणाची चौकशी व्हावी.
६. लेखा अधिकारी आणि बस स्टॉप उत्पन्न
लेखा अधिकाऱ्यांनी या नियमबाह्य खर्चावर आक्षेप का नोंदवला नाही? त्यांच्या नियुक्तीची आणि पगाराची कायदेशीरता तपासावी. तसेच शहरातील सर्व बस स्टॉप आणि BRT स्टॉपपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील सादर करावा.
वरील सर्व मुद्दे पुणेकरांच्या हक्काच्या पैशाशी आणि सार्वजनिक सेवेशी निगडित आहेत. तरी, या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि याचा सविस्तर अहवाल आगामी ‘मुख्य सभे समोर ‘ (General Body) सादर करावा. जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.