Home Blog Page 1329

डीईएस पुणे विद्यापीठा’त ‘भारतीय ज्ञान प्रणाली’वर आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे, दिनांक 13 – ‘डीईएस पुणे विद्यापीठा’त (डीईसपीयू)’भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर 14 व 15 डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षण विभागाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कुलगुरु डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

खांडेकर म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान प्रणालीवर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशासंबंधी आस्था व प्रेम निर्माण करणे, आपल्या देशाच्या गरजा भागविण्यासाठी संशोधनाची दिशा निर्माण करणे आणि परंपरा व इतिहास याचा अभिमान जागृत करणे. या विषयांच्या संदर्भात जगभरात सामाईक अभ्यासक्रमाची निर्मिती करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

खांडेकर पुढे म्हणाले, गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात भारताने जगाला सुसंस्कृत करण्याचेच काम केले आहे. जगाला सुख, समृद्धी व शांती देण्यासाठी भारत स्वतः सुख, समृद्ध व शांती उपभोगत असलेला होणे आवश्यक आहे. त्यासाठी भौतिक प्रगतीबरोबर भारतीय जनतेची पारमार्थिक प्रगती झाली पाहिजे. या उद्देशाने जगभरातील शिक्षण संस्थांशी शिक्षण व संशोधन विषयांत सहकार्य मिळविणे, वैश्विक स्तरावर आपल्या शिक्षणाची गुणवत्ता प्रस्थापित करणे यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल.

भारताची सांस्कृतिक, वैचारिक, धार्मिक, दार्शनिक विविधता विद्यमान उच्च शिक्षण व्यवस्थेत प्रभावित करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून अंमलबजावणीचे काय टप्पे असू शकतील याचे निर्देश शिक्षण मंत्रालयाला देण्यासाठी चर्चा करून योजना सादर केली जाणार आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय ज्ञान प्रणाली शाखेचे राष्ट्रीय संयोजक प्रोफेसर गंटी मूर्ती, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, पद्मश्री कपिल तिवारी, साधु भद्रेशदासजी, पद्मश्री गिरीश प्रभुणे, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, देशातील 22 विद्यापीठांचे कुलगुरू, आयआयटीतील 12 प्राध्यापक आणि देश विदेशातील भारतीय ज्ञान परंपरेवर मौलिक मूलभूत संशोधन कार्य करणाऱ्या अध्यापकांचा परिषदेत सहभाग असणार आहे.

स्वरमय वातावरणात ‘सवाई गंधर्व ‘ चा प्रारंभ

पूर्वार्धात कलापिनी यांच्या गायनाने भरले रंग

पुणे, दि. १३ डिसेंबर २०२३ : उतरत्या मध्यान्ही स्वरमय वातावरणात बुधवारी ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ झाला.

परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरवात केली. मोजक्या स्वरावलींतून रागरूप मांडून त्यांनी दाद मिळवली. त्यांना तबला – कार्तिक स्वामी, निखिल तुकाराम दैठणकर सनई सहवादन, सूरपेटी – गणेश दैठणकर, तानपुरा – केतकी दैठणकर आणि मयुरी दैठणकर यांनी साथसंगत केली. ‘वैष्णव जन तो’ या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली.

यानंतर पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक संजय गरूड यांनी गायनाची सुरुवात राग भीमपलास मधील ‘अब तो बडी देर’ या रचनेतून केली. रागवाचक आलापीतून भीमपलासचा स्वरविस्तार त्यांनी उत्तम मांडला. त्याला जोडून द्रुत त्रितालात ‘बीरज मे धूम मचाए शाम’ ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी रंगवली. ‘माझे माहेर पंढरी’ या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी भक्तिरसपूर्ण भाव निर्माण केले. त्यांना संवादिनी शांतीभूषण देशपांडे, तबला रोहन पंढरपूरकर, तानपुरा – प्रसाद कुलकर्णी व ऋत्विक हिर्लेकर, पखवाज माऊली फाटक, सारंगी फारुख लतिफ खान तर गायनसाथ दिनेश माझिरे यांनी केली.

‘सवाई’ च्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पं. कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचे दर्शन घडवले. समयानुकूल अशा राग पूरियाधनाश्री मध्ये कलापिनी यांनी विलंबित एकतालात ख्यालाची मांडणी साधली. दोन्ही रचना पं. कुमार गंधर्व यांच्या होत्या. ‘आजरा दिन डूबा’ या बंदिशीतून सायंकालीन वातावरण मूर्तिमंत उभे राहिले. ‘ मृगनयनी तेरो यार री’ ही रचना अतिशय ढंगदारपणे त्यांनी पेश केली. त्यानंतर राग हमीर मध्ये त्रितालात त्यांनी आक्रमक तानांचे पॅटर्न घेत हा उत्तरांप्रधान राग मोजक्या वेळात ‘कैसे घर जाऊ लंगरवा’ या रचनेतून खुलवला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पं. कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली ‘सुनता है गुरु ग्यानी’ ही निर्गुणी रचना प्रस्तुत करत रसिकांना कुमारजींची आठवण करून दिली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी अनुरूप साथसंगत केली. तानपुरा साथ वत्सल कपाळे आणि वैदेही अवधानी यांनी केली.

हिंदुस्थान पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यास निघालेल्या सराईत गुन्हेगारांना पकडले.

पुणे- गुन्हा घडल्यावर पोलीस येतात असा अनुभव असतोच पण कधी तरी गुन्हा होण्यापूर्वी गुन्हा करू पाहणाऱ्या आरोपींना अगोदरच बेड्या ही पडतात . अशाच एका घटनेत पुणे पोलिसांनी हिंदुस्थान पेट्रोलपंप वर दरोडा टाकण्यास निघालेल्या टोळीस दरोडा टाकण्यापूर्वीच पकडून बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि. १२/१२/२०२३ रोजी गुन्हे शाखा, युनिट-५, कडुन युनिट कार्यक्षेत्रात युनिट-५ प्रभारी पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांचेसह अधिकारी व अंमलदार असे हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना युनिट-५ कडील पथकाला बातमी मिळाली की, भोसले व्हिलेज सोसायटीचे कमानीचे पाठीमागे मोकळ्या जागेत ०५ संशईत इसम जमलेले असुन त्याचेजवळ घातक हत्यार असुन ते जवळच असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंप वरील कॅश लुटणार आहे. अशी बातमी मिळाली.
सदर बातमीप्रमाणे बातमीच्या ठिकाणी युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला, त्यादरम्यान नमुद इसमांपैकी काही इसमांना पोलीसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले व ३ इसमांना ताब्यात घेतले. त्यांची नावे १) अमन संजय दिवेकर वय २२ वर्षे रा. लेन नंबर ४, जयहिंदनगर, अप्पर इंदिरानगर, पुणे २) विशाल संजय लोखंडे वय २४ वर्षे रा. कांबळे वस्ती, अप्पर इंदिरानगर, पुणे व ३) विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यातुन एकुण ६५,९४०/- रुपये कि.चा मुद्देमाल त्यामध्ये दोन कोयते, लाल मिरची पावडर, नायलॉनची दोरी असे घातक शस्त्रे व साधने जप्त करण्यात आलेली आहे. त्याचेकडे सदरबाबत विचारणा करता, वर नमुद तीन इसम व पळुन गेलेले त्यांचे इतर ३ साथीदारासह विठ्ठल पेट्रोलपंपावर दिवसभरात गोळा झालेली कॅश कॅशीयर रुममध्ये जमा झालेली कॅश आम्ही पाच जण मिळुन कॅशीयरला कोयत्याचा धाक दाखवुन ती कॅश लुटण्याकरीता जाणार होतो, वगैरे सांगितले. तसेच त्यांचेकडे केलेल्या सखोल तपासात व त्यांचे ताब्यात मिळालेल्या दोन मोबाईल फोन हे कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत रात्रीचे वेळी इसमांना कोयत्याचा धाक दाखवुन जबरदस्तीने चोरी केल्याचे व त्यांनी हडपसर पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाची जबरदस्तीने कॅश लुटली असल्याचे निष्पन्न झाले. म्हणुन त्यांचेविरुध्द हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १८९२/२०२३, भा.दं. वि. कलम ३९९,४०२ व भा.ह.का. कलम ४(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलीस करीत आहे.
नमुद आरोपीतांकडुन कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरी केलेले कोंढवा, हडपसर वानवडी स्वारगेट, बिबवेवाडी भारती विद्यापीठ या पोलीस स्टेशनकडील एकुण १८ गुन्हे उघडकीस आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अमंलदार, रमेश साबळे, राजस शेख, आश्रुबा मोराळे, प्रताप गायकवाड, शहाजी काळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, विनोद शिवले, पृथ्वीराज पांडुळे, दाऊद सय्यद, अकबर शेख, अमित कांबळे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, राहुल ढमढेरे, शशिकांत नाळे, पल्लवी मोरे, स्वाती गावडे व संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेडया

पुणे-तडीपार असताना मंगळवार पेठेत सर्रास फिरणाऱ्या एका गुंडाला समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी पोलीस अमंलदार समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, समर्थ पोलीस स्टेशनकडील तडीपार गुन्हेगार दिपक सुभेदार परदेशी वय २३ वर्ष, रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ पुणे. हा के. ई. एम्. हॉस्पिटल समोरील बाजुस एस.व्ही. युनियन गेट शेजारी, सोमवार पेठ पुणे येथे बसलेला आहे. लागलीच सदरची माहीती त्यांनी वरिष्ठांना कळवून त्याला स्टाफच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यास परवानगी बाबत विचारणा केली असता, त्याने पुणे जिल्हयात येण्याकरिता कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समजले. त्यामुळे सदर गुन्हेगाराने पोलीस उपायुक्त साो परिमंडळ १ यांचा आदेश क्रमांक १४/२०२३ नुसार पोलीस आयुक्तालय पुणे शहर व संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार केलेले असताना देखील त्याने आदेशाचा भंग केला म्हणून सदर गुन्हेगार दिपक परदेशी यांस अटक करुन समर्थ पोलीस स्टेशन येथे गु. र. नं २६७/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हेगारावर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर प्रविण पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, संदीप गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे अशोक धुमाळ, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, . सूरज बंडगर, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) प्रमोद वाघमारे, यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक सौरभ थोरवे, सुनिल रणदिवे, सहा. पोलीस फौज. दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, संताष डमाळे, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास वाघेरे, रहीम शेख, अमोल शिंदे, शरद घोरपडे यांनी केलेली आहे.

कात्रजच्या घरफोड्याला पकडले


पुणे-भारती विद्यापीठ पोलीसांनी कात्रजच्या एका घर फोद्याला पकडले आहे,अरबाज खलील शेख, वय १९ वर्षे, रा. भारत नगर, कात्रज असे त्याचे नाव आहे . यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि,”दि.१९/११/२०२३ रोजी ते दि.०८/१२/२०२३ रोजी फिर्यादी यांचे मांगडेवाडी कात्रज पुणे येथील राहते घर कुलुप लावुन बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे घराचे खिडकीचे ग्रिल कशाचे तरी सहाय्याने तोडुन त्यावाटे आत घरात प्रवेश करून ताब्या पितळेची भांडी व इतर साहित्य चोरी केले म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७९२/२०२३, भादंवि कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन गाडे यांना सदरचा गुन्हा हा इसम अरबाज खलील शेख, वय १९ वर्षे, रा. भारत नगर, कात्रज, पुणे याने केला आहे अशी बातमी मिळाली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर आरोपीताचा शोध घेवुन त्यास अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी केले ताब्या पितळेची भांडी जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अवधतु जमदाडे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना –  मंत्री अतुल सावे

0

मुंबई, दि.१३ : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देणारी महत्वाकांक्षी अशी  ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’  राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  त्यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ही महात्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून ६०० प्रमाणे २१ हजार ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ६० हजार रुपये, इतर महसुली विभागातील शहरे व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी ४३ हजार तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपयांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

या योजनेसाठी प्रतिवर्षी १०० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असा विश्वास या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.

देवदिवाळीनिमित्त १० हजार पणत्यांनी उजळले लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर 

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दीपोत्सवाचे आयोजन ; पुणेकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे 
पुणे :  सप्तरंगी दिव्यांनी सजलेले मंदिर… विविधरंगी फुलांची रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर उजळून निघाला. मंदिर परिसरात तेलाच्या १० हजार दिव्यांची आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या या दीपोत्सवाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. 
बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त तेलाच्या १० हजार सप्तरंगी फिरत्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच आकर्षक पुष्परचना साकारुन पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव करण्यात आला. दीपोत्सवाचे उद्घाटन रामराज्य सहकारी बँकेच्या चेअरमन नंदा नारायण लोणकर, पिसोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहल गणपत दगडे  यांच्या हस्ते झाले. 


यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख सुनील रुकारी, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुभाष सरपाले व सहका-यांनी ही सजावट केली.
युवराज गाडवे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही देव दिवाळीनिमित्त मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. तसेच कळसावर संपूर्णपणे रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. कळसावर ओम, श्री व स्वस्तिक च्या शुभचिन्हांची सजावट देखील पणत्यांच्या माध्यमातून करण्यात आली. मंदिरात अनेक प्रकारच्या समई व दिवे पाहण्यासोबतच दत्तमंदिरातील दीपोत्सवाचे मोबाईलमध्ये दृश्य कैद करण्याकरीता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

‘कारगिल’च्या लढ्यातील शौर्याबद्दल १९ व्या वर्षी परमवीरचक्रमिळालेल्या योगेंद्रसिंह यादव यांना ऐकण्याची पुणेकरांना संधी

परमवीरचक्र विजेते योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्तेरविवारी (दि. १७) ‘व्हायरल माणुसकी’चे प्रकाशन
पुणे : कारगिल युद्धात टायगर हिलच्या लढाईत दाखवलेल्या शौर्याबद्दल वयाच्या १९ व्या वर्षी देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र मिळालेल्या भारतीय सेनादलातील अधिकारी ग्रेनेडियर योगेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते ‘व्हायरल माणुसकी’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. हा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी (दि. १७ डिसेंबर) सकाळी १० वाजता लेडी रमाबाई सभागृह, सर परशुरामभाऊ (एसपी) महाविद्यालय, टिळक रस्ता, पुणे येथे होणार आहे. वैभव सुनंदा पंडित वाघ लिखित न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित ‘व्हायरल माणुसकी’ या पुस्तकातून ‘निगेटिव्ह काळातील पॉझिटिव्ह स्टोरी’ शब्दबद्ध करण्यात आलेली आहे.
१९९९ च्या कारगिल युद्धात लढवय्या योगेंद्रसिंग यादव यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांना परमवीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. टायगर हिल आणि तोलोलिंगमध्ये प्राण पणाला लावत केलेल्या शौर्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. लढाऊ व्यक्तीला ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. तेव्हा अधिकाधिक पुणेकरांनी या प्रकाशन सोहळ्यास, योगेंद्रसिंह यादव यांच्या सन्मानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ओबीसी विभागासाठी प्रथमच ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद – मंत्री अतुल सावे

0

नागपूर, दि. १३ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ३३७७ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंगळवारी मंजुरी मिळाली. अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

या मंजुरीनंतर ओबीसी विभागाचे २०२३-२४ च्या योजनांसाठी तरतूद ७८७३ कोटी इतकी झाली आहे. ओबीसी विभाग स्थापन झाल्यानंतर  एका वर्षांसाठी झालेली ही विक्रमी तरतूद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३०८१ कोटी अधिक आहेत.

या निधीतून मोदी आवास योजनेसाठी १ हजार कोटींची तरतूद आहे. महाज्योतीसाठी २६९ कोटी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी १५८ कोटी, धनगर समाजाच्या योजनांसाठी ५६ कोटी, अमृत संस्थेसाठी १५ कोटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ११९२ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राज्य मागासवर्ग आयोग ३६० कोटी, ओबीसी व व्हीजेएनटी महामंडळासाठी २० कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे.

यामुळे ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना शैक्षणिक व सामूहिक विकास कामांसाठी हातभार लागेल, असा विश्वास मंत्री श्री. सावे यांनी व्यक्त केला.

संसदेवर स्मोक अटॅक:चारही आरोपींची सोशल मीडियावर झाली होती ओळख, मग आखला संसदेत घुसण्याचा कट..दिल्या कोणत्या घोषणा पहा

0

संसदेत राडा करणारे दोन जण आणि संसदेबाहेर घोषणा देणारे दोन (एका महिलेसह) असे मिळून चार जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. संसदेत राडा करणाऱ्या दोन तरुणांची नावं सागर शर्मा आणि डी. मनोरंजन (३५) अशी आहेत. तर संसदेबाहेर नीलम (४२) आणि अमोल शिंदे (२५) या दोघांना पोलिसांनी पकडलं. संसदेबाहेर नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनी “तानाशाही नहीं चलेगी (हुकुमशाही चालणार नाही), मणिपूरवासियांना न्याय द्या. महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही. भारत माता की जय, हुकुमशाही बंद करा. जय भीम, जय भारत, वंदे मातरम.” अशा घोषणा दिल्या होत्या.

संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आजही सभागृहाचे कामकाज सुरू होते. शून्य तासात पाच मिनिटे बाकी होती. तेवढ्यात मागून आवाज झाला. हा आवाज सामान्य नव्हता. प्रत्यक्षात एका तरुणाने प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली होती. दरम्यान, आणखी एक तरुणही उडी मारून खाली आला. काही वेळातच आरोपी एका बाकावरून दुसऱ्या बाकावर उडी मारत पुढे जाऊ लागला. पकडण्यापूर्वी त्याने बुटातून काहीतरी काढून फवारणी सुरू केली. काही वेळातच संसदेच्या सभागृहात प्रचंड धूर पसरला.

यावेळी संसदेबाहेरही एक घटना घडली. संसदेबाहेर एका तरुण आणि महिलेने गॅस फवारला आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे संसदेबाहेरही एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात एकूण 6 जणांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर 2 आरोपींचा शोध सुरू आहे.

कोण आहेत आरोपी?

पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. लोकसभेत धाडस दाखविलेल्या तरुणांची नावे सागर आणि मनोरंजन अशी आहेत. तर ज्या आरोपींना सभागृहाबाहेरून अटक करण्यात आली त्यांची नीलम आणि अमोल शिंदे अशी नावे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या बाहेर आणि आत गोंधळ घालणारे चार आरोपी एकमेकांना ओळखतात. या आरोपींचा एकच उद्देश होता. हे चौघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्यांनी संसदेवर हल्ला करण्याचा कट आखला.

प्रेक्षक गॅलरीतून आरोपीने मारली सभागृहात उडी

लोकसभेत धूर फवारणारा सागर शर्मा म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर प्रेक्षक गॅलरीत आला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून चेंबरमध्ये उडी मारली. खुर्चीवर असलेले भाजपचे सदस्य राजेंद्र अग्रवाल यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले. संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्यानंतर खासदार प्रताप सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी आरोपींना सुरक्षा दलांच्या ताब्यात देण्यापूर्वी खासदारांनी त्यांना बेदम मारहाण केली.

अध्यक्षांनी दिले प्रवेश पास रद्द करण्याचे आदेश

या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी खासदार आणि खासदारांच्या स्वीय सहायकांचे संसद भवनातील प्रवेश पास रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांच्या खासदारांची बैठकही बोलावली आहे. जेडीयूचे खासदार रामप्रीत मंडल यांनी सांगितले की, तरुणांनी शूजमध्ये गॅसचे कॅन लपवले होते आणि लोकसभेच्या चेंबरमध्ये पिवळ्या रंगाचा गॅस फवारला होता.

लातूरचा तरुण संसदेत का घुसला?:पोलिस भरतीची तयारी करणारा अमोल शिंदे दिल्लीला का गेला? लातूर पोलिसांनी सुरू केला तपास

0

देशाच्या लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आज लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने धूडगूस घालण्याचा प्रयत्न केला. या तरुणासोबत हरियाणाची एक महिलाही होती. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. या घटनेमुळे अवघ्या देशात हल्लकल्लोळ माजला. या घटनेनंतर लातूर पोलिसांनी आरोपी तरुणाच्या गावात जावून चौकशी केली असता त्यांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, संसदेत धुडगूस घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लातूरच्या तरुणाचे नाव अमोल धनराज शिंदे असे आहे. दिल्ली पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना या तरुणाची माहिती काढण्याची सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अमोल शिंदे याच्या लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावात धाव घेतली.

लातूर पोलिसांनी अमोल शिंदेच्या झरी गावात जावून त्याच्या आई – वडिलांची चौकशी केली. त्यांनी आपला मुलगा 15 दिवसांपूर्वी कोणत्या तरी कामानिमित्ताने दिल्लीला गेल्याची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल शिंदेच्या घरची माहिती अत्यंत बेताची आहे. त्याचे आई – वडील मजूर आहेत. ते मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. ते काबाडकष्ट करून अमोलला शिकवतात.

पोलिसांनी घेतली घराची झडती

अमोल शिंदे गत काही दिवसांपासून काय करत होता? याची चौकशी करण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला. त्यांनी यासंबंधी झरी गावच्या नागरिकांची चौकशी केली. अमोलच्या नातलगांशीही त्यांनी संवाद साधला. पण त्यांना अमोलविषयी फारशी माहिती मिळाली नाही. पण त्यांना अमोलला आपल्या गावात राहणे फारसे आवडत नव्हते, असे समजले. पोलिसांनी अमोलच्या शैक्षणिक दस्तावेजांचीही पडताळणी केली. तसेच त्याच्या घराचीही झडती घेतली.

अमोल दिल्लीला का गेला?

संशयित तरुणाच्या आई-वडिलांनी अमोल गत अनेक दिवसांपासून पोलिस भरतीची तयारी करत असल्याची माहितीही पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. अमोल शिंदे पोलिस भरतीची तयारी करत होता. यासाठी तो कुटुंबीय व गावापासून दूर राहत होता. 15 दिवसांपूर्वीच तो आई – वडिलांना सांगून दिल्लीला गेला होता. तो दिल्लीला का गेला? तिथे त्याचे नेमके काय काम होते? त्याच्यासोबत कोण – कोण होते? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

मुलाला फाशी द्या, वडिलांची मागणी

दुसरीकडे, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या म्हैसूर येथील एका तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलाला फाशी देण्याची मागणी केली आहे. माझ्या मुलाने बीईचे शिक्षण झाले आहे. एच डी देवेगौडा यांच्यामुळे माझ्या मुलाला बीईला प्रवेश मिळाला होता. तो नेहमी दिल्लीला जायचा. आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझ्या मुलाने असे का केले, हे मला माहिती नाही. असे कृत्य करणारा माझा मुलगा असूच शकत नाही. त्याने चूक केली असेल तर त्याला फाशी द्या, असे ते म्हणालेत.

संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेच्या सभागृहात मारल्या उड्या, पिवळा गॅस सोडला

0

नवी दिल्ली-

संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक खाली उडी मारल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यावेळी भाजप खासदार खगेन मुर्मू लोकसभेत आपले म्हणणे मांडत होते. तरुणांनी त्यांच्या शूजमध्ये काही स्प्रेसारखे लपवले होते.

त्यांनी सभागृहाच्या बाकांवर उड्या मारायला सुरुवात केली आणि यादरम्यान सभागृहात पिवळा गॅस पसरू लागला. संपूर्ण सभागृहात गोंधळाचे वातावरण होते. यानंतर खासदारांनी त्यांना पकडले. काँग्रेसचे खासदार गुरजीत सिंह औजला यांनी सांगितले की, मी त्यांना आधी पकडले. काहींनी त्याला मारहाणही केली. यानंतर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. हे पाहून अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले.

यापूर्वी 13 डिसेंबर 2001 रोजी 5 दहशतवाद्यांनी जुन्या संसद भवनावर हल्ला केला होता. यामध्ये दिल्ली पोलिसांच्या 5 कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला होता.

खगेन मुर्मू म्हणाले, ‘मी भाषण देत होतो. तेवढ्यात उजवीकडून आवाज आला आणि मला कळलं की कोणीतरी येत आहे. समोरून खासदार आणि सुरक्षा रक्षक ‘त्यांना पकडा, पकडा’ असे ओरडू लागले. त्यांनी हातात काहीतरी धरले होते, ज्यातून धूर निघत होता. सभागृह धुराने भरले होते. तरुण थेट स्पीकरच्या दिशेने जात होते. हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा देत होते. त्यावेळी राजेंद्र अग्रवाल स्पीकरच्या खुर्चीवर बसले होते.

सभागृहात दोन आणि सभागृहाच्या बाहेर 2 असे 4 लोक होते
कारवाईदरम्यान दाखल झालेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही तरुण खासदारांच्या व्हिजिटर पासवर सभागृहात आले होते. त्याचवेळी एका पुरुष आणि महिलेने सभागृहाबाहेर पिवळा गॅस सोडला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडून बाहेर काढले. यावेळी हे लोक घोषणाबाजी करताना दिसले.

ही घटना दुपारी एक वाजता घडली. यानंतर दुपारी 2 वाजता पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले. ते येताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की- नुकतीच घडलेली घटना सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. त्याचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनाही तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक तपासणीत तो सामान्य धूर असल्याचे आढळले. सविस्तर तपासणीच्या निकालांबद्दल सर्वांना माहिती दिली जाईल.

द्रमुकचे खासदार टीआर बालू याप्रकरणी प्रश्न विचारत असताना स्पीकर म्हणाले की, दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सापडलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदनाच्या बाहेर असलेल्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

यानंतर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला होता. आज पुन्हा त्याच दिवशी हल्ला झाला आहे. यावरून सुरक्षेत त्रुटी असल्याचे सिद्ध होते का?

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून दिल्ली पोलीस सतर्क होते. अमेरिकेत राहणाऱ्या पन्नू याने एक व्हिडिओ जारी केला होता आणि म्हटले होते – आम्ही संसदेवरील हल्ल्याच्या वर्षपूर्तीला म्हणजेच 13 डिसेंबरला किंवा त्यापूर्वी संसदेचा पाया हादरवू. पन्नूने संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूचे पोस्टर जारी केले होते.

पन्नूचा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने म्हटले होते – कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. संसदेचे अधिवेशन सुरू असताना कोणीही गडबड करू नये म्हणून आम्ही हाय अलर्टवर असतो.

  • काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले, व्हिजिटर गॅलरीतून अचानक दोन लोकांनी लोकसभेत उडी मारली. दोघांचे वय सुमारे 20 आहे. हे लोक डबे घेऊन जात होते. या डब्यांमधून पिवळ्या रंगाचा वायू बाहेर पडत होता. दोघांपैकी एक जण धावत जाऊन स्पीकरच्या खुर्चीसमोर पोहोचला. ते काही नारे देत होते. हा वायू विषारी असण्याची भीती आहे. 13 डिसेंबर 2001 नंतर संसदेच्या सुरक्षेतील कुचराईचे हे पुन्हा मोठे प्रकरण आहे.
  • अधीर रंजन चौधरी म्हणाले- दोन जणांनी गॅलरीतून उड्या मारल्या. त्यांनी काहीतरी फेकले, त्यातून गॅस बाहेर पडत होता. त्यांना खासदारांनी पकडले आणि नंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी बाहेर काढले. संसदेवरील हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण होत असताना सुरक्षेतील ही त्रुटी समोर आली आहे.
  • TMC खासदार सुदीप बंदोपाध्याय म्हणाले- हा एक भयंकर अनुभव होता. अचानक दोन जणांनी संसदेत उड्या मारल्या. त्यांचा हेतू काय होता हे कोणालाच माहीत नाही. ते स्फोट घडवू शकले असते, कुणाला गोळी मारू शकले असते. आम्ही सर्वांनी ताबडतोब सदन सोडले, पण सुरक्षेची त्रुटी होती. ते धूर बाहेर सोडणारे उपकरण घेऊन कसे प्रवेश करू शकतात?
  • शिवसेना (उद्धव गट) खासदार अरविंद सावंत म्हणाले की- लोकसभेच्या गॅलरीतून अचानक दोन जणांनी उड्या मारल्या. त्यानंतर दोघेही बेंचवरून उड्या मारू लागले. एकाने शूज काढले. खासदारांनी त्याला धरले. त्यानंतर अचानक पिवळ्या रंगाचा वायू बाहेर येऊ लागला. कदाचित त्याच्या शूजमधून गॅस निघत असावा.
  • लोकसभेचे खासदार दानिश अली- लोकांनी व्हिजिटर गॅलरीतून उड्या मारल्याने सभागृहात गोंधळ झाला. यानंतर दोघांनाही सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडले.

वाड्यांच्या जागेवर झोपडपट्टी दर्शवून घोटाळे केलेल्यांचा होणार पर्दाफाश ..

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या वाड्यांना झोपडपट्टी असल्याचा अभिप्राय देऊन तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर त्याची दखल महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतली आहे. यासंदर्भात कुमार यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला पत्र दिले असून अशा सर्व प्रकरणांना स्थगिती द्यावी, अशी सूचना केली आहे. तसेच महापालिकेच्या स्तरावर या प्रकाराची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त महेश पाटील आणि दक्षता विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गिरोला यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर उपअभियंत्यांवर कारवाई केली जाणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक जुने वाडे असून एकात्मिक बांधकाम नियमावलीतील तरतुदींमुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. या दरम्यान, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने शहरातील एखाद्या भागात झोपडपट्टीसदृश भाग असल्यास आणि महापालिकेच्या संबंधित विभागाने त्याबाबत अभिप्राय दिल्यास अशा ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविता येईल, असे पत्राद्वारे शासनाला कळविले होते. त्यानंतर महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि उपअभियंत्यांनी तसा अभिप्राय दिला होता. मध्यवर्ती भागातील ७० वाड्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत रुपांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी यासंदर्भात आयुक्त कुमार यांच्याकडे तक्रार नोंदविली होती.या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जुन्या वाड्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत देण्यात आलेल्या परवनग्या स्थगिती करून तेथील बांधकाम थांबवावे आणि त्याचा अहवाला महापालिकेला सादर करावा, अशी सूचना केली आहे. तसेच महापालिकेच्या स्तरावर त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

बालाजीनगरच्या खुशबू हॉटेलजवळ मसाज उपचाराच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

पुणे –बालाजीनगर परिसरात खुशबू हॉटेल जवळ सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र नावाखाली वेश्या व्यवसायकरीता मुलींना प्राप्त करून घेत त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात उमेश मलाप्पा तराळ (राहणार -बालाजीनगर, पुणे )या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पुणे शहर गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस हवालदार अजय नारायण राणे यांनी आरोपी विरोधात सहकारनगर पोलिस ठाणे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5 व भादवी 370 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजय नारायण राणे हे सामाजिक गुन्हे शाखेत नेमणुकीस आहे. सामाजिक सुरक्षा विभागास माहिती मिळाली होती की ,उमेश तराळ हा पीडित मुलींना वेश्याव्यवसाय करीता प्राप्त करून घेत ,त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत आहे.आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवीत असताना तो मिळवून आल्याने पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संदीप देशमाने पुढील तपास करत आहे.

संतोष चोरडिया यांचे हृदय विकाराने निधन:

पुणे-सलाम पुणे चे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध हास्यकलाकार , एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांचे बुधवारी सकाळी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा अजिंक्य, कन्या अपूर्वा असा परिवार आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे .सलाम पुणे च्या व्यासपीठावरून त्यांनी अनेकांना नृत्याची आणि आपली कला सादर करण्याची संधी दिली .चोरडिया यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून सातत्याने एड्स ग्रस्त आणि कृष्ठरोग्यांमध्ये आनंद पेरण्याचे काम केले. कलेला समाजसेवेची जोड देत त्यांची वाटचाल सुरू होती.नाट्य परिषद, साहित्य परिषद यावर ते कार्यरत होते .

रंगभूमी , दूरचित्रवाणी आणि चित्रपट अश्या तिनही माध्यमात ते गेली 38 वर्षे कार्यरत होते. झी टीव्ही वरील ‘हास्यसम्राट’ आणि सह्याद्री वाहिनीवरील ‘एम 2 जी 2’ या कार्यक्रमात वर्षा उसगावकर यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे ते घराघरात पोहोचले.. ‘दुसरी गोष्ट’ , ‘कँपँचिनो ‘, ‘ दगडाबाईची चाळ ‘ , ‘प्रेमा ‘, ‘सरगम’ अशा अनेक मराठी गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘जीना इसी का नाम है’ आणि ‘फुल २ धमाल’ या कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरण त्यांच्या चौफेर कलावृतीची साक्ष देणारे होते.

भारतासह परदेशात त्यांनी आपल्या कलाकर्तृत्वाचा झेंडा आपण रोवला. लंडन ,इस्राइल, ओमान येथील रसिकांना ‘हसवा हसवी’ या एकपात्री प्रयोगाने खळखळून हसविणारा विनोदवीर म्हणून ते सुपरिचीत होते.

त्यानी 15 हजारांहून अधिक वैविध्यपूर्ण रंगमंचीय कार्यक्रमांचा टप्पा ओलांडला होता. कला क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कलेच्या क्षेत्रात स्वतःची वैशिष्टयपूर्ण शैली निर्माण केली. कायमच केवळ आणि केवळ रसिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आपला ध्यास म्हणजे मनोरंजनाव्दारे समाजसेवा करण्याचा वसा त्यांनी घेतला होता. त्यामुळेच अनाथ, अपंग, दृष्टीहीन, वृध्द , मूकबधिर आणि कर्करोग ,एचआयव्ही अश्या विविध व्याधींनी ग्रस्त असलेले रूग्ण यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक संस्था आणि रुग्णालयांमध्ये विना मोबदला आपली हास्यसेवा रुजू केली. तसेच भारतीय सैनिक आणि पोलीसांच्या तणावपूर्ण जीवनात हलक्या फुलक्या क्षणांची बरसात केली. ‘सरहद ‘ यांच्या तर्फे थेट कारगिलला जाऊन सिमेवर तैनात भारतीय सैनिकांचेही आपण मनोरंजन केले. गेली 40 वर्षे ते थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधून रसिकांचे मनोरंजन करत होते. तसेच त्यांचे सामाजिक काम देखील मोठे होते.