पुणे लोकसभा मतदारसंघाची तातडीने पोटनिवडणूक घ्यावी असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले .आहे मात्र आता तरी निवडणूक आयोग न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार काय , न्यायालयाचे ऐकणार काय ?अशी साशंकता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना वाटते आहे ,ते म्हणाले ,'”पुणे लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांचे निधन झाले तेव्हा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीस १५ महिन्यांचा अवधी शिल्लक होता. लोकप्रतिनिधींचे निधन झाल्यानंतर पुढील सार्वत्रिक निवडणुकीस जर ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ शिल्लक असेल तर तातडीने त्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी ही बाब संविधानात समुद आहे. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याने राज्यात भाजपला पोषक वातावरण नाही ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आणि पोषक वातावरण नसल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.आशिया खंडातील सर्वांत जलदगतीने विकसित होणारे शहर म्हणून आपल्या पुण्याची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या स्वार्थासाठी पुण्याला त्यांच्या हक्काच्या प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवून मोठे पाप केले आहे. याची शिक्षा त्यांना निश्चितच येत्या निवडणुकीत मिळणार आहे.माननीय उच्च न्यायालयाने तातडीने पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले याचे आम्ही स्वागत करतो मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाची कार्यपद्धती बघता या आदेशाची अंमलबजावणी खरोखर होणार की हा मोठा प्रश्न आहे.” अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोग आणि भाजपला हायकोर्टाची चपराक-मोहन जोशी
पुणे – लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने आयोग आणि निवडणूक टाळणाऱ्या भाजपला सणसणीत चपराक बसली आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. लगेचच पोटनिवडणूक घेणे अपेक्षित होते. परंतु, कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपचा दारुण पराभव केला, त्याची धास्ती घेऊन सत्ताधारी भाजपने अनेक क्लृप्त्या लढवत लोकसभेची पोटनिवडणूक टाळली. अखेर न्यायालयानेच चपराक दिली आहे, भाजपने गेली १० वर्षे निवडणूक आयोग आणि अन्य स्वायत्त संस्थांचा हुकूमशाही पद्धतीने मनमानी वापर केला. पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक टाळणे हे त्याचेच द्योतक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
कसबा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर १० दिवसांतच विधानसभेची पोटनिवडणूक घोषित करण्यात आली. मात्र, बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक टाळण्यात आली, हा घटनाक्रम पाहता, भाजपने पराभवाच्या भितीने निवडणूक टाळली असे म्हणता येईल. पुणे हे महत्वाचे शहर आहे. लोकप्रतिनिधींविना हे शहर ठेवून येथील मतदारांवरही अन्याय झालेला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
महापालिकेच्या निवडणुकाही लांबवण्यामागे भाजपच्या नेत्यांचाच हात आहे. निवडणुकांनंतर महापालिकाही आपल्या हातून निसटेल, अशी धास्ती भाजपला वाटते, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.
महिलांनी न घाबरता सायबर ट्रोलिंगला सामोरे जावे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर,दि.13 : सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो. या माध्यमातून सायबर क्राईममध्ये वाढ होवू लागली आहे, याचे बळी पुरूषांसोबत महिला जास्त प्रमाणात पडत आहेत. सोशल मीडियावर महिलांचे खच्चीकरण करण्यासाठी ट्रोलिंगची पद्धत आली आहे, मात्र महिलांनी कोणत्याही प्रकारच्या ट्रोलिंगला न घाबरता सामोरे जावून प्रतिकार करण्याचे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
विधिमंडळामध्ये राज्य महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या वतीने आयोजित दोन्ही सभागृहातील महिला सदस्यांना सायबर सुरक्षित करणारा ‘मिशन ई-सुरक्षा’ कार्यक्रमात डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सचिव माया पाटोळे यांच्यासह दोन्ही सभागृहातील महिला सदस्या उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या छळांचे प्रमाण वाढत आहे. पुरूषांच्या वाईट नजरा, कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचा लैंगिक छळ याबाबत आलेल्या कायद्याचा महिलांनी वापर करावा. महिला लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील सायबर क्राईमबाबत आवाज उठविणे आवश्यक असून सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये काम कसे चालते याची माहिती घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला तक्रार समित्या असून याचा आढावा कोणी घ्यावा, याबाबत स्पष्टता नसल्याने बैठका होत नाहीत, यावरही आवाज उठविला जावा. महिलांच्या छळवणूक, तक्रारीचा प्रत्येक विभागाचा अहवाल महिला व बालविकास विभागाकडे येत असल्याने या विभागाचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. या विभागासाठी असणारा निधी, पदांची शासनाने दखल घ्यावी.
संसदेप्रमाणे महिलांनी प्रत्येक गावातील अडचणी सोडविण्यासाठी 33 टक्के महिला आणि 33 टक्के अधिकाऱ्यांनी मिळून बैठका घेवून महिलांच्या समस्या, अडचणी सोडविणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात पोलीस महानिरीक्षक, महिला आमदार, महिला आयोग सदस्य यांचीही बैठक घेवून महिलांच्या समस्या सोडविताना येणाऱ्या अडचणीविषयी चर्चा करून सोडवणूक करण्याचे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.
ग्रामीण आणि शहरी भागातील सायबर क्राईमबाबत महिलांच्या तक्रारी येतात, मात्र पुरावा मिळत नसल्याने आरोपी सापडत नाही, अशावेळी सायबर तज्ज्ञांची मदत घेवून अशा तक्रारींचा निपटारा करणे शक्य होणार आहे. महिलांनी अश्लिल संदेश, घाणेरडे बोलणे याबाबत 112 नंबरवर तक्रार करता येते, अशावेळी पोलिसांची मदत घेणे हिताचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाचा प्रचाराचे प्रभावी माध्यम…पण जपून करा-कु. आदिती तटकरे
सध्या प्रचार, प्रसाराची माध्यमे बदलली आहेत. आपले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यम आली आहेत. सोशल मीडिया प्रचार, प्रसिद्धीसाठी प्रभावी माध्यम असून याचा महिलांनी जपून वापर करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी केले. सोशल मीडियाचे खाते हॅक होणे, अश्लिल कमेंट, योग्य की अयोग्य याबाबत सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. याबाबत शासन योग्य दखल घेणार आहे. महिलांनी डीप फेक व्हिडीओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याबाबत सायबर तज्ज्ञाकडून जाणून घेवून सावधानता बाळगणे आवश्यक आहे. महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात श्रीमती चाकणकर यांनी महिला आयोग महिलांची सुरक्षा, अडचणी, समस्या कशा पद्धतीने सोडविते याबाबतची माहिती दिली. महिलांच्या सायबर क्राईमच्या तक्रारी वाढत असून याला आळा घालण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत आवश्यक आहे. सायबरमध्ये गुन्हेगारी वाढत असून त्याच्या सुरक्षेबाबत राज्यभर महिलांसाठी कार्यक्रम घेणार आहे. मानवी तस्करीचा विळखा दूर करण्यासाठीही महिला आयोग काम करणार असल्याचेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.
सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी सायबर गुन्हेगारीबाबत विस्तृत माहिती दिली. मोबाईल हा आपला डिटेक्टिव्ह असून सर्व हालचाली तो टिपत असतो. सर्व सोशल मीडियाला तुमची वैयक्तिक माहिती मोबाईलद्वारे होत असते. एकही व्यक्ती सायबर क्राईमपासून वाचू शकत नाही, यासाठी तंत्रज्ञाचा वापर योग्य आणि काळजीपूर्वक करण्याचे आवाहन श्री. गादिया यांनी केले.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे-पोलीस आयुक्त रितेश कुमार
पुणे, दि. १३ : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.
पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त श्री. कुमार म्हणाले, घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीत अपघात किंवा इतर प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवितास, शारीरिक, मानसिक धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा. वारंवार स्कूल बसेसची तपासणी करावी.
बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम होत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले.
यावेळी श्री. मगर म्हणाले, विद्यार्थी शाळेचा महत्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी शाळेने घ्यावी. वाहतूक संदर्भात शाळेचे ऑडिट करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांनी, वाहतूकदारांनी संवेदशीलतेने चुका होऊ देवू नये. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदांनी आपल्या क्षेत्रातील शासकीय, खासगी शाळात शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची खात्री करावी. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी पूर्वीपासूनच सतर्क असणे आवश्यक आहे. विनापरवानगी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास परिवहन विभाग तसेच पोलीसांच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
श्री. आदे म्हणाले, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा शाळेबरोबर सामंजस्य करार करणे शाळांची जबाबदारी आहे. या वाहनांचे वैध योग्यता प्रमाणपत्र असणे व वाहनाच्या रचनेत स्कूल बस नियमावलीनुसार आवश्यक त्या सुधारणा केलेल्या असणे आवश्यक आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने याकडे विशेष लक्ष द्यावे. शाळेसोबत करार नसलेल्या खासगी प्रवासी वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही हे पाहणे शाळेची तसेच शालेय परिवहन समितीची जबाबदारी आहे.
दर तीन महिन्याला बैठका आयोजित करुन या विषयाबाबत संवेदनशीलता, जागरुकता निर्माण करावी. किती विद्यार्थी स्कुल बसने अथवा खासगी बसने शाळेत येतात त्याची यादी शाळेने करावी. अवैध वाहतूक आढळल्यास पालकांच्या निदर्शनास आणून देणे ही शाळेची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. भोर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात स्कूल बस विद्यार्थी वाहतूक समितीचे काम सुलभपणे आणि प्रभावी पद्धतीने होण्यासाठी https://schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. रिक्षामध्ये लहान विद्यार्थी खुप बसविले जातात. शाळा प्रशासनाने आणि पालकांनी त्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १० हजार २७० हजार स्कूल बस असून ५ हजार ९२१ शाळांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व शाळांनी त्यावर नोंदणी करावी यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा.
शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ जानेवारी ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान २ हजार २१४ स्कूल बस तसेच १ हजार ४७८ इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये ५७१ स्कूल बस व ३७९ इतर वाहने दोषी आढळली व ४७ वाहने अटकावून ठेवण्यात आली. या कारवाईत नियमांच्या उल्लघनाबद्दल १ कोटी १ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.
युरोपियन देशात उच्च शिक्षणाची संधी!!!
पीसीईटी – एज्युकेरॉन इंटरनॅशनल मध्ये शैक्षणिक करार
पिंपरी, पुणे (दि. १३ डिसेंबर २०२३) भारतीय विद्यार्थी, प्राध्यापकांना उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एज्युकेरॉन इंटरनॅशनलच्या माध्यमातून या संधींचा फायदा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) शैक्षणिक समुहातील विद्यालये, पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयू) विद्यार्थी, प्राध्यापकांना होईल असा विश्वास एज्युकेरॉन इंटरनॅशनलचे संचालक वैष्णव केरॉन यांनी व्यक्त केला.
जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि एज्युकेरॉन इंटरनॅशनल यांच्या मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार बुधवारी (दि. १३ डिसेंबर) पीसीईटीच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी एज्युकेरॉनच्या विद्या स्वामी, राजश्री वैष्णव, गौरव वेदा, विलास जैन, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, समन्वयक डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, प्राचार्य डॉ. गणेश राव, प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. रोशनी राऊत, डॉ. केतन देसले आदी उपस्थित होते.
पीसीईटीच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या आणि उच्च शिक्षण परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एका छताखाली अनेक सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना युरोपियन शिक्षण संस्था, औद्योगिक कंपन्या, आस्थापना, रोजगार संधी, संशोधन, कार्यशाळा, शिष्यवृत्ती यांची माहिती व्दिपक्षीय संयुक्त शैक्षणिक प्रकल्प अशा अनेक योजनांचा फायदा घेता येईल, असे डॉ. मणीमाला पुरी यांनी सांगितले.
एज्युकेरॉन इंटरनॅशनल ही सहा वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. जागतिक स्तरावर १६० देशांमधील शैक्षणिक, बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्या बरोबर काम करत आहेत. संशोधन आणि विकास, प्रगत तंत्रज्ञान यामध्ये कार्य करणारी एज्युकेरॉन इंटरनॅशनल ही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नॉर्वे, तुर्की, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबर संयुक्त शैक्षणिक प्रकल्प सुरू केले आहेत. विद्यार्थी, प्राध्यापकांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांना उत्तेजन देऊन विशेष सहाय्य केले जाते. तसेच परदेशी भाषा शिक्षण, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली जाते, असे वैष्णव केरॉन यांनी सांगितले.
कार्यक्रमास विविध विविध शाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. आभार डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी मानले.
प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांची समिती
प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती
गडचिरोलीत दोनशे खाटांचे नवीन स्त्री-रुग्णालय
नागपूर, दि. १३ : गडचिरोली आणि बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रसूतीदरम्यान झालेल्या महिलांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीचा चौकशी अहवाल १५ दिवसात मागवून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
यासंदर्भात सदस्य सर्वश्री सुभाष धोटे, योगेश सागर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते.
ते म्हणाले की, गडचिरोली येथील घटनेप्रकरणी गठित करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या विभागीय चौकशी समितीच्या अहवालानुसार महिलेचा मृत्यू जंतुसंसर्गमुळे झाल्याचे दिसून येते. यात डॉक्टर व कर्मचारी दोषी आढळल्याचे चौकशी अहवालात दिसून येत नाही.
बुलढाणा येथील विद्या नीलेश गावंडे या महिलेस ११ ऑगस्ट रोजी स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तातडीने तपासण्या करून उपचार करण्यात आले. माता ही तपासणी दरम्यान डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आली. तिच्या प्लेटलेट कमी होत असल्याने आणि बाळाचा गर्भाशयात मृत्यू झाल्याचे दिसून आल्याने व मातेची स्थिती गंभीर असल्याने तिला त्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे संदर्भित करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मातेची स्थिती गंभीर झाल्याने त्याच दिवशी रात्री वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तथापि, प्रवासादरम्यान तिचा मृत्यू झाला. उपसंचालक आणि वैद्यकीय अधिष्ठाता, अकोला यांच्या अहवालानुसार मातेस योग्य ते उपचार दिल्याचे आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी उत्तरात स्पष्ट केले.
गडचिरोलीत200खाटांचे स्त्री रुग्णालय
गडचिरोली हा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासी समाजातील महिलांच्या आरोग्य सुविधेसाठी गडचिरोलीत २०० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरू करण्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात केली.
आयसीयूबाबत जिल्हानिहाय बैठक घेणार
जिल्हा रुग्णालयातील आयसीयूबाबत जिल्हानिहाय बैठक घेण्यात येईल. या बैठकीत रुग्णालयातील यंत्रसामग्रीचा आढावा घेतला जाईल, असे आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी शासनाने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करावा, असे निर्देश दिले. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सदस्य सर्वश्री नाना पटोले, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, प्रा. वर्षा गायकवाड यांनी चर्चेत सहभाग घेत उप प्रश्न उपस्थित केले.
भागवत हा ज्ञानमय व धर्ममय ग्रंथ -करवीर पीठाचे प.पू.शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांचे मत
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळाच्या वतीने ह.भ.प स्व. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : भक्ती मुळे मन शुद्ध होईल आणि मन शुद्ध झाले की ज्ञान उत्तमरीत्या आत्मसात करता येईल. भागवत ग्रंथ हा केवळ भक्ती ग्रंथ नसून ज्ञानमय आणि धर्ममय ग्रंथ आहे, असे मत करवीर पीठाचे प.पू.शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळाच्या वतीने लाल महाल येथे ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांचे गौरवार्थ “पुणे कीर्तन महोत्सव २०२३”चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ह.भ.प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार डोंबिवलीचे ह.भ.प. आनंदबुवा जोशी यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, मंगलमूर्ती औरंगाबादकर, अरुणकुमार बाभुळगांवकर आदी उपस्थित होते. पुणेरी पगडी,उपरणे, पोषाख, स्मृतिचिन्ह व रुपये पाच हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शंकराचार्य विद्या नृसिंह भारती म्हणाले, एकदा परमात्म्याचे ज्ञान झाले की मोक्षाचा मार्ग देखील गवसेल. आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी भागवताचा अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळी या ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास आपण करू त्यावेळी भागवत ग्रंथाचा खरा अर्थ आपल्याला समजेल.
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, सन २०२४ मध्ये अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचे औचित्य साधून पुण्यात कीर्तनाचे माध्यमातून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग पंधरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील विविध कीर्तनकारांनी महोत्सवात आपली सेवा दिली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नृसिंह वाडीचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. शरदबुवा घाग यांनी कीर्तन केले. होनराज मावळे याने तबल्याची व स्वानंद नेने यांनी ऑर्गनची साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा इनामदार ने केले. महोत्सवात जयश्री देशपांडे, कृष्णांत नाईक, प्रसाद धरणगावकर यांनी विशेष सहयोग दिला.
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी
मुंबई, दि. १२ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी दिनांक ०८ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत एस.एस.बी.(SSB) कोर्स क्र. ५६ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील एस.एस.बी.-५६ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेऊन यावे.
कंम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा हॉट्सअप क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन – मंत्री हसन मुश्रीफ
नागपूर दि. 13 : राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या-त्या महिन्यात थेट पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील दिव्यांग, वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सतेज पाटील, शशिकांत शिंदे, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला होता.
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा एक हजार रुपयावरुन पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे. सध्या 1500 रुपये इतके मिळणारे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
आता पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल. आर्थिक निकषांची मर्यादा वाढविण्यात येईल. दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मधील १९६ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतचे आदेश निर्गमित – मंत्री शंभूराज देसाई
नागपूर, दि. 13 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 मधील लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 21 उमेदवार वगळून उर्वरित 196 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रश्न सदस्य सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, शशिकांत शिंदे आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 मधील सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी एक, सहाय्यक अभियंता श्रेणी दोन या पदावर शिफारस केलेल्या ईडब्लूएस प्रवर्गातील 21 उमेदवारांना वगळून उर्वरित 196 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत जलसंपदा विभागाने 17 नोव्हेंबर 2023 व सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी आदेश निर्गमित केले आहे. याप्रकरणी याचिका न्यायप्रविष्ठ असल्याने ईडब्ल्यूएस प्रवर्गातून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्तीबाबत प्रतीक्षा करणे उचित होईल असे विधी व न्याय विभागाने अभिप्राय दिले आहेत. 21 ईडब्ल्यूएस उमेदवारांच्या नोकरीला बाधा येणार नाही, याची काळजी सरकार घेणार आहे, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई – मंत्री उदय सामंत
नागपूर दि. 13 : कार्यारंभ आदेश मिळूनही मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू न करणारे मे.रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंत्राटदराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. कंत्राटदाराची सुरक्षा रक्कम व अनामत रक्कम जप्त करणेबाबत व दंड वसूल करण्याबाबतची कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईतील रस्त्याची कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केला होता.
बृहन्मुंबई महानगरपालिका अखत्यारीतील सुमारे 397 कि.मी.लांबीच्या 910 रस्त्यांची सिमेंट काँक्रीटद्वारे सुधारणा करण्यासाठी एकूण पाच कंत्राटदारांना जानेवारी, 2023 मध्ये कार्यादेश देण्यात आले होते. त्यामध्ये शहर विभागातील एका कंत्राटदारास 72 कि.मी.लांबीचे 212 रस्ते, पूर्व उपनगरातील एका कंत्राटदारास 71 कि.मी.लांबीचे 188 रस्ते व पश्चिम उपनगरातील तीन कंत्राटदारांना २५४ किमी लांबीचे 510 रस्त्यांच्या कामांचा समावेश होता. त्यापैकी शहर विभागातील कंत्राटदार मे. रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा. लि. यांनी मे 2023 अखेर पर्यंत (पावसाळ्यापूर्वी ) केवळ सात रस्त्याची कामे नाममात्र सुरू करून कोणतेही काम पूर्ण केले नाही. त्यामुळे मे.रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंत्राटदारास देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली. याचर्चेत सदस्य सर्वश्री अनिल परब, भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.
पुणे महापालिका विश्वविक्रम करणार
पाच हजार पालक आपल्या पाल्यांना गोष्टी सांगणार ; वर्ल्ड बुक कॅपिटलचा श्री गणेशा होणार
पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( नॅशनल बुक ट्रस्ट) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पाच हजार पालक आपल्या पाल्यांना आज गुरुवारी सकाळी आठ वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गोष्टी सांगणार आहेत. पुणे महापालिकेतर्फे आयोजित होणाऱ्या या उपक्रमाची नोंद गिनेस बुक रेकॉर्डस् मध्ये केली जाणार आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात ‘ वर्ल्ड बुक कॅपिटल ‘ होण्याची क्षमता आहे. या विश्वविक्रमाच्या निमित्ताने युनेस्कोचे निकष पूर्ण करण्याचा महापालिकेकडून प्रयत्न होणार असून, पुण्याला वर्ल्ड बुक कॅपिटल बनवण्यासाठी श्री गणेशा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमधून लहान मुलांना कथा किंवा गोष्टी सांगण्याचे फायदे नमूद केले आहे. याद्वारे मुलांना आपल्या संस्कृती आणि इतिहासबद्दल माहिती मिळून ती लक्षात राहते. याचे शैक्षणिक फायदे सुद्धा आहे. याला अनुसरूनच पालकांकडून आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा उपक्रम पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी पुणे महापालिकेकडून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा आढावा महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे आदी उपस्थित होते. या विश्वविक्रमासाठी सुमारे दहा हजार खुर्च्या समोरासमोर मांडण्यात आल्या आहेत. या उपक्रमात पुणे महापालिकेच्या शाळा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसह अनेक शिक्षण संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी सुमारे पाच हजार पालक आपल्या पाल्यांना विविध गोष्टी, कथा सांगणार आहेत. यापूर्वीचा, पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी किंवा कथा सांगण्याचा विश्वविक्रम चीनच्या नावे असून, तो तोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणजे नक्की काय ?
वर्ल्ड बुक कॅपिटल हा युनेस्कोचा एक उपक्रम असून, तो २३ एप्रिलपासून सुरू होतो. शहरामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण पाया असतो. या अंतर्गत शहाराला एका वर्षासाठी पुस्तकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी वर्ल्ड बुक कॅपिटलचा दर्जा देण्यात देतो. युनेस्को वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून नियुक्त केलेली शहरे ही सर्व वयोगटातील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनेस्कोची मूल्ये सामायिक करण्याच्या उद्देशाने उपक्रम राबवतात.
शांतता..पुणेकर वाचत आहेत या उपक्रमातही पुणे महापालिका सहभागी होणार आहे. महापालिकेच्या शाळा, क्षेत्रिय कार्यालये, रुग्णालये आदी ठिकाणी उस्फुर्तपणे दुपारी १२ ते १ या वेळेत पुस्तकांचे वाचन करण्यात येणार आहे. सर्व पुणेकरांनी या उपक्रमात सहभागी होऊन, आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करावे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
डीईएस पुणे विद्यापीठा’त ‘भारतीय ज्ञान प्रणाली’वर आंतरराष्ट्रीय परिषद
पुणे, दिनांक 13 – ‘डीईएस पुणे विद्यापीठा’त (डीईसपीयू)’भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर 14 व 15 डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षण विभागाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कुलगुरु डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
खांडेकर म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान प्रणालीवर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशासंबंधी आस्था व प्रेम निर्माण करणे, आपल्या देशाच्या गरजा भागविण्यासाठी संशोधनाची दिशा निर्माण करणे आणि परंपरा व इतिहास याचा अभिमान जागृत करणे. या विषयांच्या संदर्भात जगभरात सामाईक अभ्यासक्रमाची निर्मिती करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
खांडेकर पुढे म्हणाले, गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात भारताने जगाला सुसंस्कृत करण्याचेच काम केले आहे. जगाला सुख, समृद्धी व शांती देण्यासाठी भारत स्वतः सुख, समृद्ध व शांती उपभोगत असलेला होणे आवश्यक आहे. त्यासाठी भौतिक प्रगतीबरोबर भारतीय जनतेची पारमार्थिक प्रगती झाली पाहिजे. या उद्देशाने जगभरातील शिक्षण संस्थांशी शिक्षण व संशोधन विषयांत सहकार्य मिळविणे, वैश्विक स्तरावर आपल्या शिक्षणाची गुणवत्ता प्रस्थापित करणे यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल.
भारताची सांस्कृतिक, वैचारिक, धार्मिक, दार्शनिक विविधता विद्यमान उच्च शिक्षण व्यवस्थेत प्रभावित करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून अंमलबजावणीचे काय टप्पे असू शकतील याचे निर्देश शिक्षण मंत्रालयाला देण्यासाठी चर्चा करून योजना सादर केली जाणार आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय ज्ञान प्रणाली शाखेचे राष्ट्रीय संयोजक प्रोफेसर गंटी मूर्ती, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, पद्मश्री कपिल तिवारी, साधु भद्रेशदासजी, पद्मश्री गिरीश प्रभुणे, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, देशातील 22 विद्यापीठांचे कुलगुरू, आयआयटीतील 12 प्राध्यापक आणि देश विदेशातील भारतीय ज्ञान परंपरेवर मौलिक मूलभूत संशोधन कार्य करणाऱ्या अध्यापकांचा परिषदेत सहभाग असणार आहे.
स्वरमय वातावरणात ‘सवाई गंधर्व ‘ चा प्रारंभ
पूर्वार्धात कलापिनी यांच्या गायनाने भरले रंग
पुणे, दि. १३ डिसेंबर २०२३ : उतरत्या मध्यान्ही स्वरमय वातावरणात बुधवारी ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ झाला.
परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरवात केली. मोजक्या स्वरावलींतून रागरूप मांडून त्यांनी दाद मिळवली. त्यांना तबला – कार्तिक स्वामी, निखिल तुकाराम दैठणकर सनई सहवादन, सूरपेटी – गणेश दैठणकर, तानपुरा – केतकी दैठणकर आणि मयुरी दैठणकर यांनी साथसंगत केली. ‘वैष्णव जन तो’ या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली.
यानंतर पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक संजय गरूड यांनी गायनाची सुरुवात राग भीमपलास मधील ‘अब तो बडी देर’ या रचनेतून केली. रागवाचक आलापीतून भीमपलासचा स्वरविस्तार त्यांनी उत्तम मांडला. त्याला जोडून द्रुत त्रितालात ‘बीरज मे धूम मचाए शाम’ ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी रंगवली. ‘माझे माहेर पंढरी’ या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी भक्तिरसपूर्ण भाव निर्माण केले. त्यांना संवादिनी शांतीभूषण देशपांडे, तबला रोहन पंढरपूरकर, तानपुरा – प्रसाद कुलकर्णी व ऋत्विक हिर्लेकर, पखवाज माऊली फाटक, सारंगी फारुख लतिफ खान तर गायनसाथ दिनेश माझिरे यांनी केली.
‘सवाई’ च्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पं. कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचे दर्शन घडवले. समयानुकूल अशा राग पूरियाधनाश्री मध्ये कलापिनी यांनी विलंबित एकतालात ख्यालाची मांडणी साधली. दोन्ही रचना पं. कुमार गंधर्व यांच्या होत्या. ‘आजरा दिन डूबा’ या बंदिशीतून सायंकालीन वातावरण मूर्तिमंत उभे राहिले. ‘ मृगनयनी तेरो यार री’ ही रचना अतिशय ढंगदारपणे त्यांनी पेश केली. त्यानंतर राग हमीर मध्ये त्रितालात त्यांनी आक्रमक तानांचे पॅटर्न घेत हा उत्तरांप्रधान राग मोजक्या वेळात ‘कैसे घर जाऊ लंगरवा’ या रचनेतून खुलवला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पं. कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली ‘सुनता है गुरु ग्यानी’ ही निर्गुणी रचना प्रस्तुत करत रसिकांना कुमारजींची आठवण करून दिली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी अनुरूप साथसंगत केली. तानपुरा साथ वत्सल कपाळे आणि वैदेही अवधानी यांनी केली.
हिंदुस्थान पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यास निघालेल्या सराईत गुन्हेगारांना पकडले.
पुणे- गुन्हा घडल्यावर पोलीस येतात असा अनुभव असतोच पण कधी तरी गुन्हा होण्यापूर्वी गुन्हा करू पाहणाऱ्या आरोपींना अगोदरच बेड्या ही पडतात . अशाच एका घटनेत पुणे पोलिसांनी हिंदुस्थान पेट्रोलपंप वर दरोडा टाकण्यास निघालेल्या टोळीस दरोडा टाकण्यापूर्वीच पकडून बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि. १२/१२/२०२३ रोजी गुन्हे शाखा, युनिट-५, कडुन युनिट कार्यक्षेत्रात युनिट-५ प्रभारी पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांचेसह अधिकारी व अंमलदार असे हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना युनिट-५ कडील पथकाला बातमी मिळाली की, भोसले व्हिलेज सोसायटीचे कमानीचे पाठीमागे मोकळ्या जागेत ०५ संशईत इसम जमलेले असुन त्याचेजवळ घातक हत्यार असुन ते जवळच असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंप वरील कॅश लुटणार आहे. अशी बातमी मिळाली.
सदर बातमीप्रमाणे बातमीच्या ठिकाणी युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला, त्यादरम्यान नमुद इसमांपैकी काही इसमांना पोलीसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले व ३ इसमांना ताब्यात घेतले. त्यांची नावे १) अमन संजय दिवेकर वय २२ वर्षे रा. लेन नंबर ४, जयहिंदनगर, अप्पर इंदिरानगर, पुणे २) विशाल संजय लोखंडे वय २४ वर्षे रा. कांबळे वस्ती, अप्पर इंदिरानगर, पुणे व ३) विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यातुन एकुण ६५,९४०/- रुपये कि.चा मुद्देमाल त्यामध्ये दोन कोयते, लाल मिरची पावडर, नायलॉनची दोरी असे घातक शस्त्रे व साधने जप्त करण्यात आलेली आहे. त्याचेकडे सदरबाबत विचारणा करता, वर नमुद तीन इसम व पळुन गेलेले त्यांचे इतर ३ साथीदारासह विठ्ठल पेट्रोलपंपावर दिवसभरात गोळा झालेली कॅश कॅशीयर रुममध्ये जमा झालेली कॅश आम्ही पाच जण मिळुन कॅशीयरला कोयत्याचा धाक दाखवुन ती कॅश लुटण्याकरीता जाणार होतो, वगैरे सांगितले. तसेच त्यांचेकडे केलेल्या सखोल तपासात व त्यांचे ताब्यात मिळालेल्या दोन मोबाईल फोन हे कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत रात्रीचे वेळी इसमांना कोयत्याचा धाक दाखवुन जबरदस्तीने चोरी केल्याचे व त्यांनी हडपसर पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाची जबरदस्तीने कॅश लुटली असल्याचे निष्पन्न झाले. म्हणुन त्यांचेविरुध्द हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १८९२/२०२३, भा.दं. वि. कलम ३९९,४०२ व भा.ह.का. कलम ४(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलीस करीत आहे.
नमुद आरोपीतांकडुन कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरी केलेले कोंढवा, हडपसर वानवडी स्वारगेट, बिबवेवाडी भारती विद्यापीठ या पोलीस स्टेशनकडील एकुण १८ गुन्हे उघडकीस आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अमंलदार, रमेश साबळे, राजस शेख, आश्रुबा मोराळे, प्रताप गायकवाड, शहाजी काळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, चेतन चव्हाण, विनोद शिवले, पृथ्वीराज पांडुळे, दाऊद सय्यद, अकबर शेख, अमित कांबळे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, राहुल ढमढेरे, शशिकांत नाळे, पल्लवी मोरे, स्वाती गावडे व संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.
