Home Blog Page 1327

स्वराजच्या क्रांतीकारी कापणी तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद

पितमपूर, १४ डिसेंबर २०२३ – भारतातील पहिल्या, देशांतर्गत बनवण्यात आलेल्या कापणी यंत्राचा वारसा पुढे नेण्यासाठी स्वराज ट्रॅक्टर्स या महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या विभागाने भारतीय शेतकऱ्यांसाठी स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टरची आधुनिक आवृत्ती लाँच केली आहे. खरीप हंगामात लाँच करण्यात आलेल्या या कापणी यंत्रामुळे भात आणि सोयाबीनच्या कापणीवर चांगला परिणाम दिसून येत आहे. या कापणी यंत्राच्या यशस्वी पर्दापणानंतर कंपनीला आगामी रबी हंगामात चांगली मागणी मिळेल असा अंदाज आहे.

स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टर, स्वराजच्या मोहाली येथील आर अँड डी केंद्रात कित्येक वर्षांच्या तंत्रज्ञान विकासानंतर तयार करण्यात आला असून त्याला महिंद्रा अँड महिंद्राच्या फिनलँड, युरोप येथील हार्वेस्टर आर अँड डी केंद्राची मदत मिळाली आहे. कंपनीने कापणी यंत्रांना मिळत असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन पितमपूर येथे कापणी यंत्राच्या उत्पादनासाठी खास प्लँट उभारला आहे. या प्लँटमध्ये सुट्या भागांच्या उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रणा, आधुनिक पेंट शॉप, खास जुळणी लाइन्स व चाचणीच्या सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 

या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध होत असलेली विविध वैशिष्ट्ये यात समाविष्ट करण्यात आली असून त्याचबरोबर टिकाऊपणा, दर्जेदार सेवा वेगवेगळ्या पिकांच्या गरजेनुसार इतर सुविधांसह स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टर कापणीसाठी सर्वसमावेशक उत्पादन बनले आहे. इंटेलिजंट हार्वेस्टिंग सिस्टीमच्या माध्यमातून यात दर्जेदार क्षमतांचा समावेश करण्यात आला आहे. कापणी झालेल्या एकरांची प्रत्यक्ष माहिती, लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग, प्रवास झालेले अंतर आणि वापरले गेलेले इंधन इत्यादी माहितीही त्यातून मिळते. स्वराजच्या इंटेलिजंट हार्वेस्टिंग सिस्टीममुळे ग्राहकाला अधिक चांगले निर्णय घेता येतात, कामकाजातील कार्यक्षमता तसेच नफा वाढवता येतो.

ताकद आणि टिकाऊपणाचा या ब्रँडचा वारसा पुढे नेण्यासाठी नव्या स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टरमध्ये कंपनीअंतर्गत विकसित आणि उत्पादित केलेले इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता देते तसेच ते पर्यावरणपूरक बीएसआयव्ही उत्सर्जन मापदंडानुसार बनवण्यात आले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या फार्म मशिनरी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख कैरास वखारिया म्हणाले, ‘स्वराजने भारतात कापणी तंत्रज्ञान रूजवण्यात मोलाची कामगिरी केली आहे आणि त्याच वारसाचा आधार घेत नवीन 8200 स्मार्ट हार्वेस्टर तंत्रज्ञानाचा नवा मापदंड प्रस्थापित करत बनवण्यात आले आहे. यातील बुद्धीमान कापणी यंत्रणेबरोबरच कंपनीची सेवा आणि सपोर्ट टीम कापणी यंत्राच्या कामगिरीवर २४x७ देखरेख करत असल्यामुळे ग्राहकाची मोठी मदत होते.’

कंपनीची ग्राहकसेवा नेहमीच्या सेवेपलीकडे जाणारी असून त्यात अलर्ट्स, वैयक्तिक गरजेनुसार सहकार्य, रिलेशनशीप व्यवस्थापक आणि अपवर आधारित व्हिडिओ कॉलिंग या सेवांचा समावेश आहे. यामुळे ग्राहकाला तत्काळ सेवा मिळते. स्वराज 8200 स्मार्ट हार्वेस्टर स्वराजच्या पॅन भारतातील ट्रॅक्टर वितरक नेटवर्कद्वारे उपलब्ध करण्यात आला आहे.

पुण्यधाम आश्रमाचा उदात्त उपक्रम –१२ जोडप्यांचे सामूहिक विवाह थाटात संपन्न

पुणे-पुण्यधाम आश्रमाचा वार्षिक कार्यक्रम, विश्व जागृती मिशन ट्रस्ट, पुणे यांचा उदात्त उपक्रम, ‘सामूहिक विवाह’,  ९ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. यात सहभागी होण्याची संधी मिळालेल्या, महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले, १२ जोडप्यांसाठे हा खरोखरच एक हृदयस्पर्शी अनुभव होता. पुण्यधाम आश्रमाने आपल्या समाजातील अत्यंत गरजू वर्गासाठी आयोजित केलेल्या एका विशेष सामूहिक विवाह सोहळ्यात, कोणताही खर्च किंवा हुंडा न घेता विवाह संपन्न झाले. असा अनोखा सोहळा आयोजित करण्याचे हे ८वे वर्ष असून आजपर्यंत १३२ कुटुंबातील जोडप्यांनी मोठ्या जल्लोषात असे लग्न केले आहे.

कार्यक्रमस्थळी २००० हून अधिक लोकांचा उत्साह, उर्जा आणि अपेक्षा अभूतपूर्व होती, त्यासोबतच पुण्यधाममध्ये सर्वत्र लग्नसंस्थेची धांदल, शहनाईचा नाद, फुलांची सजावट आणि उत्सवाचे वातावरण पहायला मिळाले.

सोनेरी-लाल साड्या, सुंदर दागिने तसेच  ‘शेरवानी, फेटे आणि मोजरी’ घातलेल्या नववधू तेजस्वी दिसत होत्या. वराच्या मिरवणुकीत सर्व सहभागी नाचत होते आणि वधूचे कुटुंब वरांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी, वरांनी सुंदर सजवलेल्या मंडपात प्रवेश  केल्यानंतर, विद्वान पंडितांनी लग्नाच्या विधींना सुरुवात केली. हा विवाह सोहळा पारंपारिक महाराष्ट्रीय पद्धतीने पार पडला, त्यानंतर आदरणीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सप्तपदी आणि कन्यादान समारंभ पार पडला.

“प्रत्येक वर्षी पुण्यधाम आश्रम अशा मुलींचे सामूहिक विवाह आयोजित करतो ज्यांचे कुटुंब लग्नाचा खर्च उचलू शकत नाही. मुलींना त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह सुंदर विवाह सोहळा करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिला जाते. ही अनोखी संस्था हुंडा प्रथेला प्रतिबंध करून लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे”, असे संस्थेच्डे अध्यक्ष मा कृष्णा कश्यप, म्हणाले, ज्यांनी ‘मानवतेच्या माध्यमातून देवाची सेवा’ हे आपले जीवन ध्येय बनवले आहे!

पुण्याचे माजी महापौर- प्रशांतदादा जगताप, माजी आमदार महादेव बाबर, कोंढवयाचे पोलीस निरीक्षक, नगरसेविका- नंदाताई लोणकर, नगर सेविका संगिताताई ठोसर, नगरसेवक- गफुर पठाण आणि इतर अनेक मान्यवरांच्या कृपाळू उपस्थितीने हा दिवस आणखीनच खास बनला.

सर्व पारंपारिक विधींनंतर अध्यक्ष मा कृष्णा कश्यप, अध्यक्ष सदानंद शेट्टी, विश्वस्त आणि विशेष पाहुण्यांनी तरुण जोडप्यांना भेटवस्तू देऊन आशीर्वाद दिला. नवविवाहित जोडप्यांना त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करण्यास मदत करण्यासाठी, घरगुती वस्तू, डिनर सेट, कुकर, ब्लँकेट, साड्या आणि सलवार-कमीज सेट अशा नवीन वस्तू दिल्या गेल्या. “नवविवाहित जोडप्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि आशा आहे की त्यांना जीवनात खरा आनंद आणि एकत्रता मिळेल”,

असे मा कश्यप म्हणाली.

काही वर्षांपूर्वी इथेच लग्न झालेल्या जोडप्यांना हा खास सोहळा साजरा करण्यासाठी एकत्र आलेले पाहणे खूप आनंददायी होते. सर्व पाहुण्यांना एक भव्य महाराष्ट्रीयन जेवण देण्यात आले, ज्याचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला.

या अत्यंत उदात्त उपक्रमाचे संपूर्ण श्रेय मा कृष्णा कश्यप यांना जाते, ज्यांनी या भव्य सोहळ्याचे बारकाईने नियोजन केले होते, आणि ते उत्तम प्रकारे पार पडले. त्यांच्या  समर्पित पाठिंब्याशिवाय, उपस्थिती आणि प्रेरणेशिवाय पुण्यधाम आश्रमाचा कोणताही उपक्रम शक्य नाही.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिमेचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (ईव्हीएम मशीन) वापर होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्याक्षिक मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, २१४ कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे, २१३ हडपसर विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी विवेक जाधव, सहायक नगर रचनाकार तथा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे पथक प्रमुख प्रतीक डोळे आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या पथकाकडून यंत्राविषयी माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रात जनजागृती व प्रात्याक्षिके चांगल्याप्रकारे करावीत. नागरिकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कसे काम करते हे समजावून सांगण्यासोबत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र नव्हे आपल्या मताचे बुलेटप्रूफ कवच आहे, हे यंत्र कोणत्याही हस्तक्षेपापासून अलिप्त, विनापरवाना अनधिकृत वापर ओळखण्याच्या तंत्रज्ञानाने आणि सांकेतिक लिपीबद्धतेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याबाबत माहिती द्यावी.

ईव्हीएम स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती स्वतःच ओळखण्याच्या क्षमतेने सुसज्ज व रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून माहितीच्या आदानप्रदानाबाबतीत अक्षम आहेत याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. नागरिकांचे नोदवहीत अभिप्राय घेवून त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन करावे, असेही त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राअंतर्गत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, मॉल इत्यादी ठिकाणी २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी ईव्हीएम यंत्राच्या प्रात्याक्षिकाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी यावेळी केले.

चक्क उद्धव ठाकरेंना अदानी विरोधातातील मोर्चासाठी मागितलेली परवानगी धारावी पोलिसांनी नाकारली

0

मुंबई -शिवसे नापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानी उद्योग समूहाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला आहे. ठाकरे गटाकडून या मोर्चासाठी तयारी देखील केली जातेय. ठाकरे गटाकडून 16 डिसेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाने धारावी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, धारावी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाची मागणी पोलिसांनी नाकारली. मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवा, असं ठाकरे गटाला धारावी पोलिसांनी सांगितले. धारावी पोलिसांच्या या सूचनेनंतर ठाकरे गटाने मुंबई पोलीस आयुक्तांकडे मोर्चासाठी अर्ज केला आहे.

धारावी पोलिसांनी मोर्चाला परवानगी देण्याबाबत स्पष्टपणे असमर्थता दर्शवली आहे. धारावी पोलिसांच्या या भूमिकेनंतर आता ठाकरे गटाची कोंडी होताना दिसत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. धारावी पोलीस ठाण्याचे उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला पोलीस आयुक्तांकडे अर्ज करा, असा सल्ला दिलाय. त्यानंतर ठाकरे गटाने पोलीस आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती ठाकरे गटाच्या मागणीवर काय भूमिका घेतात, मोर्चाला परवानगी देतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

धारावीतील झोपडपट्टी भागाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना बिल्डिंगमध्ये त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. धारावीच्या या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी उद्योग समूहास मिळाली आहे. या योजनेअंतर्गतच्या कामकाजात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. या प्रकल्पातून स्थानिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. त्यामुळे ठाकरे गटाकडून धारावीत मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सविस्तर भूमिका मांडली होती. “अनेक ठिकाणी पुनर्विकास करताना तिथल्या नागरिकांना 400 ते 500 चौरस फुटांची घरे दिली जातात. पण धारावीच्या नागरिकांना केवळ 300 चौरस फूट देऊ, असं सांगितलं जात आहे. धारावीधारकांना 400 ते 500 चौरस फुटांची घरे मिळायला हवीत. योग्य पद्धतीने सर्वेक्षण करावं, धारावीकरांना धाक दाखवून, दडपशाही किंवा दमदाटीच्या जोरावर सर्वेक्षण केलं तर शिवसेना हा कट हाणून पाडेल”, अशा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

0

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नागपूर, दि. १४: राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. शासनाला प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केले.

यासंदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी समन्वय संघटनांच्या विविध मागण्यांसदर्भात बैठक घेण्यात घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात यापूर्वी शासनाने नेमलेल्या सुबोधकुमार समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकारी,कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केल्या होत्या, त्यावर महत्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनाने महत्वाचे पाच निर्णय घेतले आहेत त्याची माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की,  दिनांक ३१ मे २००५ पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सुमारे २६ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासोबतच ८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणे, सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढविणे, निवृत्तीवेतन,अंशराशीकरण पुनर्रस्थापना कालावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील सेवाप्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्यात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनाला सादर केला आहे. यामध्ये समितीने सुचविलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे. हा अभ्यास करण्याचे निर्देश वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे. हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करुन, आपले मत मुख्य सचिव यांच्यामार्फत शासनास सादर करतील. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल.

संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक असून संघटनेने सुरु केलेला संप त्वरीत मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्मंत्र्यांनी यावेळी केले आहे.

कात्रजमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर काेयत्याने सपासप वार:भारती विद्यापीठ पोलिसांनी संकेत रेणुसेला पकडले अन्य फरार

पुणे-

जुन्या वादाच्या कारणातून एका तरुणाचा पाठलाग करुन त्याला शिवीगाळ करत पाच जणांच्या टाेळक्याने तरुणावर काेयत्याने सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत तुषार सुरेश जाधव (वय-26,रा.आंबेगाव,पुणे) असे यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संकेत रेणुसे, ओंकार पवार, प्रथमेश येणपुरे व दाेन अनाेळखी तरुणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. याप्रकरणी आराेपी विराेधात तुषार जाधव याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आराेपी संकेत रेणुसे याला पोलिांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तुषार जाधव हे त्यांना भेटलेले आॅर्डरचे फटाके देण्यासाठी त्यांचा भाऊ मयुर जाधव याचेसह जैनमंदिर, कात्रज,पुणे येथे दुचाकीवर जात हाेता. त्यावेळी आराेपी संकेत रेणुसे याने तक्रारदार याचा भाऊ निखील जाधव याचे साेबत सन 2019 मध्ये झालेल्या किरकाेळ कारणावरुनच्या भांडणाचा राग मनात धरुन तक्रारदार जाधव यास शिवीगाळ केली. त्यानंतर आराेपी व त्याचे साेबतचे मुलांनी तक्रारदार व त्यांचा भाऊ मयूर यांचेवर काेयत्याने सपासप वार करुन दाेघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करत आहे.

मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली?:वकील असीम सरोदे यांची अमोल शिंदेला कायदेशीर मदत करण्याची घोषणा

0

पुणे-संसदेत घुसखोरी करून पिवळा धूर सोडणाऱ्या लातूरच्या अमोल शिंदे नामक तरुणाले विधिज्ञ असीम सरोदे यांनी कायदेशीर मदत पुरवण्याची घोषणा केली आहे. अमोलचा उद्देश कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता. त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा अधोरेखित करायचा होता. त्यामुळे त्याचे गुन्हेगारीकरण न करता देशातील बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी 2 तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली होती. त्यांनी कनिष्ठ सभागृहात पिवळ्या धूराची नळकांडी फोडून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी स्मोक बॉम्ब फोडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. यात लातूरच्या अमोल शिंदे नामक तरुणाचा समावेश होता. त्याने बेरोजगारीच्या मुद्यावर आपल्या सहकाऱ्यांसह लोकसभेत घुसून प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे यांनी त्याला कायदेशीर मदत पुरवण्याची घोषणा केली आहे.

त्याचे गुन्हेगारीकरण करू नका

असीम सरोदे आपरल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले की, अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला होता. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे, असे असीम सरोदे यांनी म्हटले.

अमोल शिंदे याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते. त्यामुळे मला Dhananjay RamKrishna Shinde यांनी लिहिलेले खालील विचार पटले. लातूरच्या 25 वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय. तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे. त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली? असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

एवढे दिवस रोजगार मिळाला नसल्यामुळे तो काय करणार? वाचला तर येईल अन्यथा तिकडेच मरेल-अमोल शिंदेच्या आई-वडिलांनी व्यक्त केली व्यथा

0

माझ्या मुलाने डाका घातला नाही किंवा कोणतीही चोरी किंवा लबाडी केली नाही. पहिला क्रमांक येऊनही त्याची पोलिस भरतीत निवड झाली नाही. एवढे दिवस रोजगार मिळाला नसल्यामुळे तो काय करणार? त्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे. आता वाचला तर गावाकडे येईल अन्यथा तिकडेच मरेल, अशा शब्दांत संसदेबाहेर धुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या अमोल शिंदेच्या आई-वडिलांनी आपल्या लेकाची व्यथा मांडली आहे.

संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्या फोडल्याप्रकरणी पोलिसांनी लातूरच्या अमोल शिंदे नामक तरुणाला अटक केली आहे. या घटनेमुळे अवघ्या देशात हल्लकल्लोळ माजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी अमोल शिंदेच्या आई वडिलांचा एक व्हिडिओ ट्विट केला. त्याद्वारे त्यांनी अमोल शिंदे व त्याच्या आई-वडीलांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

खाली वाचा जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, देशाच्या संसदेत जो प्रकार घडला त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्या कृतीचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही आणि मी स्वत: ते करत नाही, हे सर्वप्रथम इथे नमूद करू इच्छितो. त्यासोबतच ज्या तरूणाने हे कृत्य केलं तो अमोल शिंदे, महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याने या प्रकरणाची दुसरी बाजूही जाणून घ्यायला हवी.

मी इथे शेअर केलेला व्हिडिओ अमोलच्या आई-वडिलांचा आहे. आपला मुलगा शिकलेला आहे आणि अनेक वर्ष नोकरीसाठी धडपडतोय, असं ते सांगतायत. खेळात चांगली कामगिरी करूनही पोलिसात भरती होता आलं नाही आणि काही लोकं लाखभर रूपये भरून भरती होतायत. राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या वास्तवाकडे दुर्लक्ष कसं करणार?

आज अमोलने जो गुन्हा केलाय,त्यासाठी व्यवस्था त्याला शिक्षा देईल.मात्र,ज्या व्यवस्थेने त्याला हे करायला भाग पाडलं त्याला कोण आणि कशी शिक्षा करणार?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित केला आहे.

उद्योजकतेला नवकल्पनांची जोड असावी- प्रा.डाॅ.मंगेश कराड; ‘एमआयटी एडीटी’चा ७५+ कंपन्यांशी सामंजस्य करार

पुणेः  सध्याच्या शिक्षण पद्धतीत आपण मागणीपेक्षा पुरवठा जास्त करत आहोत. त्यामुळेच बाजारात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. परंतू आता नवीन शिक्षणपद्धती स्विकारून संशोधन, नवकल्पनांची जोड असणाऱ्या उद्योजकतेचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव तर मिळेलच सोबतच त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल व देशाच्या  प्रगतीला हातभार लागेल, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी व्यक्त केले.


ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ७५ हून अधिक नामवंत कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींसह प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ. मोहित दुबे, डाॅ. विरेंद्र शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डाॅ.कराड पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात(एनईपी) विद्यार्थ्यांमधील संशोधन व उद्योजकतेवर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. एनईपीची देशभरात घोषणा होण्यापूर्वीच एमआयटी एडीटी विद्यापीठाने संशोधन व उद्योजकतेवर भर देणाऱ्या अभ्यासक्रमांची अंमलबजावनी केलेली आहे. क्रेया व विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधन गुणांना प्रोत्साहन देण्याचे काम विद्यापीठामार्फेत करण्यात येते.  विद्यापीठाने यापूर्वीच टाटा मोटर्स, अँपल सारख्या कंपन्यांसोबत करार केलेले आहेत. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून आज ७५ हून कंपन्यांशी सामंजस्य करार करत आहोत. ज्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
यावेळी, प्रा.डाॅ.सुनीता कराड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, सध्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना सोबतच सुशिक्षित बरोजगारांच्या संख्येतही भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे, पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. त्याच्याच एक प्रयत्न म्हणून आम्ही देशभरातील नामवंत कंपन्यांना सामंज्यस्यासाठी साद घातली, ज्याला ७५ हून अधिक कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे, विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. एमआयटी एडीटीने यापूर्वीही अनेक उद्योजक घडविले असून आज केलेल्या करारामुळे त्यामध्ये निश्चितच मोठी भर पडेल.
दीपप्रज्वलन व विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.शेटे यांनी तर आभार डाॅ.सुधाकर सानप यांनी मानले.

निवडणूक आयोग न्यायालयाचे ऐकणार काय ? प्रशांत जगतापांनी साशंकता ?

पुणे लोकसभा मतदारसंघाची तातडीने पोटनिवडणूक घ्यावी असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले .आहे मात्र आता तरी निवडणूक आयोग न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार काय , न्यायालयाचे ऐकणार काय ?अशी साशंकता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना वाटते आहे ,ते म्हणाले ,'”पुणे लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांचे निधन झाले तेव्हा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीस १५ महिन्यांचा अवधी शिल्लक होता. लोकप्रतिनिधींचे निधन झाल्यानंतर पुढील सार्वत्रिक निवडणुकीस जर ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ शिल्लक असेल तर तातडीने त्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी ही बाब संविधानात समुद आहे. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याने राज्यात भाजपला पोषक वातावरण नाही ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आणि पोषक वातावरण नसल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.आशिया खंडातील सर्वांत जलदगतीने विकसित होणारे शहर म्हणून आपल्या पुण्याची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या स्वार्थासाठी पुण्याला त्यांच्या हक्काच्या प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवून मोठे पाप केले आहे. याची शिक्षा त्यांना निश्चितच येत्या निवडणुकीत मिळणार आहे.माननीय उच्च न्यायालयाने तातडीने पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले याचे आम्ही स्वागत करतो मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाची कार्यपद्धती बघता या आदेशाची अंमलबजावणी खरोखर होणार की हा मोठा प्रश्न आहे.” अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोग आणि भाजपला हायकोर्टाची चपराक-मोहन जोशी

पुणे – लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने आयोग आणि निवडणूक टाळणाऱ्या भाजपला सणसणीत चपराक बसली आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. लगेचच पोटनिवडणूक घेणे अपेक्षित होते. परंतु, कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपचा दारुण पराभव केला, त्याची धास्ती घेऊन सत्ताधारी भाजपने अनेक क्लृप्त्या लढवत लोकसभेची पोटनिवडणूक टाळली. अखेर न्यायालयानेच चपराक दिली आहे, भाजपने गेली १० वर्षे निवडणूक आयोग आणि अन्य स्वायत्त संस्थांचा हुकूमशाही पद्धतीने मनमानी वापर केला. पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक टाळणे हे त्याचेच द्योतक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

कसबा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर १० दिवसांतच विधानसभेची पोटनिवडणूक घोषित करण्यात आली. मात्र, बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक टाळण्यात आली, हा घटनाक्रम पाहता, भाजपने पराभवाच्या भितीने निवडणूक टाळली असे म्हणता येईल. पुणे हे महत्वाचे शहर आहे. लोकप्रतिनिधींविना हे शहर ठेवून येथील मतदारांवरही अन्याय झालेला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

महापालिकेच्या निवडणुकाही लांबवण्यामागे भाजपच्या नेत्यांचाच हात आहे. निवडणुकांनंतर महापालिकाही आपल्या हातून निसटेल, अशी धास्ती भाजपला वाटते, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.

महिलांनी न घाबरता सायबर ट्रोलिंगला सामोरे जावे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

नागपूर,दि.13 : सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो. या माध्यमातून सायबर क्राईममध्ये वाढ होवू लागली आहे, याचे बळी पुरूषांसोबत महिला जास्त प्रमाणात पडत आहेत. सोशल मीडियावर महिलांचे खच्चीकरण करण्यासाठी ट्रोलिंगची पद्धत आली आहे, मात्र महिलांनी कोणत्याही प्रकारच्या ट्रोलिंगला न घाबरता सामोरे जावून प्रतिकार करण्याचे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

विधिमंडळामध्ये राज्य महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या वतीने आयोजित दोन्ही सभागृहातील महिला सदस्यांना सायबर सुरक्षित करणारा ‘मिशन ई-सुरक्षा’ कार्यक्रमात डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सचिव माया पाटोळे यांच्यासह दोन्ही सभागृहातील महिला सदस्या उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या छळांचे प्रमाण वाढत आहे. पुरूषांच्या वाईट नजरा, कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचा लैंगिक छळ याबाबत आलेल्या कायद्याचा महिलांनी वापर करावा. महिला लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील सायबर क्राईमबाबत आवाज उठविणे आवश्यक असून सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये काम कसे चालते याची माहिती घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला तक्रार समित्या असून याचा आढावा कोणी घ्यावा, याबाबत स्पष्टता नसल्याने बैठका होत नाहीत, यावरही आवाज उठविला जावा. महिलांच्या छळवणूक, तक्रारीचा प्रत्येक विभागाचा अहवाल महिला व बालविकास विभागाकडे येत असल्याने या विभागाचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. या विभागासाठी असणारा निधी, पदांची शासनाने दखल घ्यावी.

संसदेप्रमाणे महिलांनी प्रत्येक गावातील अडचणी सोडविण्यासाठी 33 टक्के महिला आणि 33 टक्के अधिकाऱ्यांनी मिळून बैठका घेवून महिलांच्या समस्या, अडचणी सोडविणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात पोलीस महानिरीक्षक, महिला आमदार, महिला आयोग सदस्य यांचीही बैठक घेवून महिलांच्या समस्या सोडविताना येणाऱ्या अडचणीविषयी चर्चा करून सोडवणूक करण्याचे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.

ग्रामीण आणि शहरी भागातील सायबर क्राईमबाबत महिलांच्या तक्रारी येतात, मात्र पुरावा मिळत नसल्याने आरोपी सापडत नाही, अशावेळी सायबर तज्ज्ञांची मदत घेवून अशा तक्रारींचा निपटारा करणे शक्य होणार आहे. महिलांनी अश्लिल संदेश, घाणेरडे बोलणे याबाबत 112 नंबरवर तक्रार करता येते, अशावेळी पोलिसांची मदत घेणे हिताचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियाचा प्रचाराचे प्रभावी माध्यम…पण जपून करा-कु. आदिती तटकरे

सध्या प्रचार, प्रसाराची माध्यमे बदलली आहेत. आपले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यम आली आहेत. सोशल मीडिया प्रचार, प्रसिद्धीसाठी प्रभावी माध्यम असून याचा महिलांनी जपून वापर करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी केले. सोशल मीडियाचे खाते हॅक होणे, अश्लिल कमेंट, योग्य की अयोग्य याबाबत सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. याबाबत शासन योग्य दखल घेणार आहे. महिलांनी डीप फेक व्हिडीओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याबाबत सायबर तज्ज्ञाकडून जाणून घेवून सावधानता बाळगणे आवश्यक आहे. महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

प्रास्ताविकात श्रीमती चाकणकर यांनी महिला आयोग महिलांची सुरक्षा, अडचणी, समस्या कशा पद्धतीने सोडविते याबाबतची माहिती दिली. महिलांच्या सायबर क्राईमच्या तक्रारी वाढत असून याला आळा घालण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत आवश्यक आहे. सायबरमध्ये गुन्हेगारी वाढत असून त्याच्या सुरक्षेबाबत राज्यभर महिलांसाठी कार्यक्रम घेणार आहे. मानवी तस्करीचा विळखा दूर करण्यासाठीही महिला आयोग काम करणार असल्याचेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी सायबर गुन्हेगारीबाबत विस्तृत माहिती दिली. मोबाईल हा आपला डिटेक्टिव्ह असून सर्व हालचाली तो टिपत असतो. सर्व सोशल मीडियाला तुमची वैयक्तिक माहिती मोबाईलद्वारे होत असते. एकही व्यक्ती सायबर क्राईमपासून वाचू शकत नाही, यासाठी तंत्रज्ञाचा वापर योग्य आणि काळजीपूर्वक करण्याचे आवाहन श्री. गादिया यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे-पोलीस आयुक्त रितेश कुमार

पुणे, दि. १३ : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.

पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त श्री. कुमार म्हणाले, घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीत अपघात किंवा इतर प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवितास, शारीरिक, मानसिक धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा. वारंवार स्कूल बसेसची तपासणी करावी.

बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम होत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. मगर म्हणाले, विद्यार्थी शाळेचा महत्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी शाळेने घ्यावी. वाहतूक संदर्भात शाळेचे ऑडिट करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांनी, वाहतूकदारांनी संवेदशीलतेने चुका होऊ देवू नये. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदांनी आपल्या क्षेत्रातील शासकीय, खासगी शाळात शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची खात्री करावी. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी पूर्वीपासूनच सतर्क असणे आवश्यक आहे. विनापरवानगी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास परिवहन विभाग तसेच पोलीसांच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

श्री. आदे म्हणाले, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचा शाळेबरोबर सामंजस्य करार करणे शाळांची जबाबदारी आहे. या वाहनांचे वैध योग्यता प्रमाणपत्र असणे व वाहनाच्या रचनेत स्कूल बस नियमावलीनुसार आवश्यक त्या सुधारणा केलेल्या असणे आवश्यक आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने याकडे विशेष लक्ष द्यावे. शाळेसोबत करार नसलेल्या खासगी प्रवासी वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही हे पाहणे शाळेची तसेच शालेय परिवहन समितीची जबाबदारी आहे.

दर तीन महिन्याला बैठका आयोजित करुन या विषयाबाबत संवेदनशीलता, जागरुकता निर्माण करावी. किती विद्यार्थी स्कुल बसने अथवा खासगी बसने शाळेत येतात त्याची यादी शाळेने करावी. अवैध वाहतूक आढळल्यास पालकांच्या निदर्शनास आणून देणे ही शाळेची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

श्री. भोर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात स्कूल बस विद्यार्थी वाहतूक समितीचे काम सुलभपणे आणि प्रभावी पद्धतीने होण्यासाठी https://schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. रिक्षामध्ये लहान विद्यार्थी खुप बसविले जातात. शाळा प्रशासनाने आणि पालकांनी त्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १० हजार २७० हजार स्कूल बस असून ५ हजार ९२१ शाळांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व शाळांनी त्यावर नोंदणी करावी यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा.

शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ जानेवारी ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान २ हजार २१४ स्कूल बस तसेच १ हजार ४७८ इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये ५७१ स्कूल बस व ३७९ इतर वाहने दोषी आढळली व ४७ वाहने अटकावून ठेवण्यात आली. या कारवाईत नियमांच्या उल्लघनाबद्दल १ कोटी १ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

युरोपियन देशात उच्च शिक्षणाची संधी!!!

पीसीईटी – एज्युकेरॉन इंटरनॅशनल मध्ये शैक्षणिक करार

पिंपरी, पुणे (दि. १३ डिसेंबर २०२३) भारतीय विद्यार्थी, प्राध्यापकांना उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एज्युकेरॉन इंटरनॅशनलच्या माध्यमातून या संधींचा फायदा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) शैक्षणिक समुहातील विद्यालये, पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयू) विद्यार्थी, प्राध्यापकांना होईल असा विश्वास एज्युकेरॉन इंटरनॅशनलचे संचालक वैष्णव केरॉन यांनी व्यक्त केला.
जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि एज्युकेरॉन इंटरनॅशनल यांच्या मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार बुधवारी (दि. १३ डिसेंबर) पीसीईटीच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी एज्युकेरॉनच्या विद्या स्वामी, राजश्री वैष्णव, गौरव वेदा, विलास जैन, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, समन्वयक डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, प्राचार्य डॉ. गणेश राव, प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. रोशनी राऊत, डॉ. केतन देसले आदी उपस्थित होते.
पीसीईटीच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या आणि उच्च शिक्षण परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एका छताखाली अनेक सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना युरोपियन शिक्षण संस्था, औद्योगिक कंपन्या, आस्थापना, रोजगार संधी, संशोधन, कार्यशाळा, शिष्यवृत्ती यांची माहिती व्दिपक्षीय संयुक्त शैक्षणिक प्रकल्प अशा अनेक योजनांचा फायदा घेता येईल, असे डॉ. मणीमाला पुरी यांनी सांगितले.
एज्युकेरॉन इंटरनॅशनल ही सहा वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. जागतिक स्तरावर १६० देशांमधील शैक्षणिक, बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्या बरोबर काम करत आहेत. संशोधन आणि विकास, प्रगत तंत्रज्ञान यामध्ये कार्य करणारी एज्युकेरॉन इंटरनॅशनल ही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नॉर्वे, तुर्की, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबर संयुक्त शैक्षणिक प्रकल्प सुरू केले आहेत. विद्यार्थी, प्राध्यापकांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांना उत्तेजन देऊन विशेष सहाय्य केले जाते. तसेच परदेशी भाषा शिक्षण, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली जाते, असे वैष्णव केरॉन यांनी सांगितले.
कार्यक्रमास विविध विविध शाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. आभार डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी मानले.

प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांची समिती

0

प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती

गडचिरोलीत दोनशे खाटांचे नवीन स्त्री-रुग्णालय

नागपूर, दि. १३ : गडचिरोली आणि बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रसूतीदरम्यान झालेल्या महिलांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीचा चौकशी अहवाल १५ दिवसात मागवून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

यासंदर्भात सदस्य सर्वश्री सुभाष धोटे, योगेश सागर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

ते म्हणाले की, गडचिरोली येथील घटनेप्रकरणी गठित करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या विभागीय चौकशी समितीच्या अहवालानुसार महिलेचा मृत्यू जंतुसंसर्गमुळे झाल्याचे दिसून येते. यात डॉक्टर व कर्मचारी दोषी आढळल्याचे चौकशी अहवालात दिसून येत नाही.

बुलढाणा येथील विद्या नीलेश गावंडे  या महिलेस ११ ऑगस्ट रोजी स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तातडीने तपासण्या करून उपचार करण्यात आले. माता ही तपासणी दरम्यान डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आली. तिच्या प्लेटलेट कमी होत असल्याने आणि बाळाचा गर्भाशयात मृत्यू झाल्याचे दिसून आल्याने व मातेची स्थिती गंभीर असल्याने तिला त्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे संदर्भित करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मातेची स्थिती गंभीर झाल्याने त्याच दिवशी रात्री वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तथापि, प्रवासादरम्यान तिचा मृत्यू झाला.  उपसंचालक आणि वैद्यकीय अधिष्ठाता, अकोला यांच्या अहवालानुसार मातेस योग्य ते उपचार दिल्याचे आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी उत्तरात स्पष्ट केले.

गडचिरोलीत200खाटांचे स्त्री रुग्णालय

गडचिरोली हा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासी समाजातील महिलांच्या आरोग्य सुविधेसाठी गडचिरोलीत २०० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरू करण्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात केली.

आयसीयूबाबत जिल्हानिहाय बैठक घेणार

जिल्हा रुग्णालयातील आयसीयूबाबत  जिल्हानिहाय बैठक घेण्यात येईल. या बैठकीत रुग्णालयातील यंत्रसामग्रीचा आढावा घेतला जाईल, असे आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी शासनाने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करावा, असे निर्देश दिले. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सदस्य सर्वश्री नाना पटोले, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, प्रा. वर्षा गायकवाड यांनी चर्चेत सहभाग घेत उप प्रश्न उपस्थित केले.