Home Blog Page 1313

रामराज्याप्रमाणेच आपल्या या मोदीराज्यात लिहिली जातेय… नव्या कायद्यांची नवी परिभाषा.. चित्रा वाघ

0

पुणे- नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील भव्य राममंदिराचं उद्धाटन होणार आहे. पण तत्पूर्वीच स्रियांप्रतीच्या रामाच्या न्यायिक भूमिकेतून रामराज्याप्रमाणेच आपल्या या मोदीराज्यात लिहिली जातेय… नव्या कायद्यांची नवी परिभाषा..असे भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी म्हटले आहे. महिला ,मुलीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देखील होणाऱ्या कायदे बदलांचे देखील त्यांनी स्वागत करत सरकारचे जोरदार अभिनंदन केले आहे .

चित्रा वाघ यांनी नेमके काय म्हटले आहे ते वाचा आणि ऐका त्यांच्याच शब्दात

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील भव्य राममंदिराचं उद्धाटन होणार आहे. पण तत्पूर्वीच स्रियांप्रतीच्या रामाच्या न्यायिक भूमिकेतून रामराज्याप्रमाणेच आपल्या या मोदीराज्यात लिहिली जातेय… नव्या कायद्यांची नवी परिभाषा..

हा नवा भारत खऱ्या अर्थाने सुदृढ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी १५० वर्ष जुन्या कायद्यांमध्ये योग्य तो बदल करून समाजाच्या सुलभ कायदेव्यवस्था व सुरक्षिततेसाठी नवे आणि अधिक कठोर कायदे बनवले जात आहेत.

देशाच्या सर्वांगीण विकासाच्या व सुदृढ लोकशाही व्यवस्थेच्या प्रक्रियेचा भाग असल्याचा सार्थ अभिमान वाटतोय..
कारण समाजात स्रियांच्या अन्याय- अत्याचारा विरोधात त्यांना निःपक्षपाती, स्वच्छ, स्पष्ट आणि तितकाच जलद न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करत त्या कायद्यांची नवी परिभाषा मांडली आहे.

या नव्या कायद्यांनुसार महिलांविरोधातील अन्याय- अत्याचाराच्या घटनेत आता गुन्हेगाराला कसलीच माफी नसेल ना असेल कायद्याची पळवाट…

समाजातील पाशवी प्रवृत्तींना कायमचाच चाप बसावा यासाठी बदललेल्या कायद्यानुसार आता…

  • गॅंगरेप (सामूहिक बलात्कार) च्या गुन्ह्यांत २० वर्षांची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा
  • ⁠१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या प्रकरणांमध्ये जन्मठेप किंवा फाशीचीच शिक्षा
  • ⁠खोटी आश्वासने देऊन किंवा ओळख लपवून लैंगिक संबंध ठेवल्यास हा देखील आता गुन्हाच असेल.

स्रियांबाबत धाडसी आणि संवेदनशील अशा केंद्र सरकारच्या- आमच्या मोदी सरकारच्या आपल्या मोदी सरकारच्या या निर्णयाचे खूप खूप अभिनंदन आणि समस्त महाराष्ट्रातील मातृशक्तीकडून आभार

चित्रा किशोर वाघ*
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष

मुंबईत २६ डिसेंबरपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन

0

मुंबई, दि. 21 : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन  व विक्री 26 डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. 26 डिसेंबर ते 8 जानेवारी अशा दोन आठवड्यांच्या कालावधीत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचतगटांना सक्षम करणाऱ्या सरस प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या दीड दशकात सुमारे 8 हजार बचत गटांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. याशिवाय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो.

या प्रदर्शनात भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बूट,ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी, कार्पेट आणि पडदे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, शिवाय ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील. मुंबईकर आणि संपूर्ण देशाने ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

सरस प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील तांबडा-पंढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थही उपलब्ध असतील. याशिवाय राज्याच्या विविध भागातील मसाले आणि हातसडीचे तांदूळ प्रदर्शनात असतील. अधिकाधिक नागरिकांनी सरस प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले आहे.m

बिल्डर्स असोसिएशनतर्फे जेपी श्रॉफ यांना ‘निर्माणरत्न २०२३’ प्रदान

व्यावसायिक प्रगतीला सामाजिक कार्याची जोड द्यावी-अजित गुलाबचंद
पुणे : “बांधकाम क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा, कलात्मकतेचा अंतर्भाव होत असून, बांधकामाची गुणवत्ता वाढली आहे. घरांच्या वाढत्या मागणीमुळे व्यावसायिक प्रगती वेगाने होत आहे. ही प्रगती साधतानाच सामाजिक जबाबदारीचेही भान जपायला हवे. सामाजिक कार्याची आणि सकारात्मक विचारांची जोड मिळाली, तर चांगल्या शहरांचे व समाजाचे निर्माण होईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे आयोजित ‘बीएआय-शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२३’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात अजित गुलाबचंद बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘बीएआय’ पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष सुनील मुंदडा, ‘बीएआय’ महाराष्ट्रचे अध्यक्ष सचिन देशमुख, डब्ल्यूबीएससीचे अध्यक्ष हरप्रीत सिंग आनंद, बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष डी. एस. चौधरी, उपाध्यक्ष व डब्ल्यूबीएससीचे संयोजक सुनील मते, मानद सचिव अजय गुजर, खजिनदार राजाराम हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाचा ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड’ श्रॉफ उद्योग समूहाचे जयप्रकाश प्रवीणचंद्र उर्फ जेपी श्रॉफ यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख अकरा हजार रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ‘बीएआय’च्या इंजिनीअरिंग डायरीचे प्रकाशन करण्यात आले.

बांधकाम क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये एस्कॉन प्रोजेक्ट्सला निवासी श्रेणीत, रोहन बिल्डर्स हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि बी. जी. शिर्के यांना निवासी सोसायटी श्रेणी, रत्नरूप प्रोजेक्ट यांना व्यावसायिक इमारतीत दोन पुरस्कार, रतिलाल भगवानदास कन्स्ट्रक्शन आणि सुरज बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना औद्योगिक श्रेणी, टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड आणि अजवानी यांना इन्फ्रास्ट्रक्चर श्रेणी, बी. जी. शिर्के आणि शुभम एपिक प्रायव्हेट लिमिटेड यांना सरकारी प्रकल्प, मिलेनियम इंजिनियर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यांना वर्क अप टु बेअर शेल श्रेणीत दोन पुरस्कार, सुगम कन्स्ट्रक्शन यांना लँडस्केप (हॉर्टिकल्चर) या श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह, शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

जेपी श्रॉफ म्हणाले, “बीएआयच्या वतीने गुलाबचंद यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतो आहे. नव्वदीच्या दशकात बांधकाम क्षेत्रात एक छोटा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम सुरु केले. आज याचे उद्योग समूहात रूपांतर झाले आहे. माझ्या वाटचालीत घरच्यांचा सहभाग मोलाचा आहे. वर्ल्ड स्कीलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या निमित्ताने मला तरुणांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.”

सचिन देशमुख म्हणाले, “बीएआय पुणे सेंटरचा आदर्श महाराष्ट्रातील इतर सेंटरने घ्यायला हवा. यातून बांधकाम विभागातील नावीन्यता सर्वांसमोर सिद्ध करता येते. काळ बदलतो, तसेच बांधकामातील सुधारणाही वाढत आहेत. बांधकामाचा दर्जा आज उंचीवर पोहोचला आहे. आज बांधकाम क्षेत्रातील उणीव भरून निघताना दिसत आहे.”

सुनील मुंदडा म्हणाले, “देशात बीएआयचे कार्य एकूण २२२ सेंटरमधून सुरु आहे. पुणे सेंटर अधिक मजबूत आणि वेगाने प्रगती करत आहे. बांधकाम विभागातील वाढत्या दर्जामुळे ‘रेरा’ अंतर्गत प्रकल्प सहजरित्या पूर्ण होत आहेत. शासनाचे प्रकल्पही उच्च दर्जाचे होताहेत, ही चांगली गोष्ट आहे.”

डी. एस. चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्वागत-प्रास्ताविक हरप्रीत सिंग आनंद यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रशांत देशमुख आणि संजय आपटे यांनी केले आणि आभार अजय गुजर यांनी मानले.

कोपा मॉलमध्ये शानदार ‘विंटरशायर’ कार्यक्रमात पुण्यातील पहिल्या ख्रिसमस कार्निवलची जादू अनुभवा

·         ३१ डिसेंबरपर्यंत कुटुंबासोबत ख्रिसमस सोहळ्याचा आनंद घ्या.

·         मुलांसाठी जिंजरब्रेड हाऊस, अपसाईड-डाउन फोटो झोन, स्नोमॅन बिल्डिंग, पेपा पिग ऍक्टिव्हिटीज आणि इतर अनेक मजेदार खेळांची रेलचेल.

·         शॉट आणि हॅमलेज प्लेसारख्या नवीन ब्रँड्समुळे सणाचा आनंद द्विगुणित होईल.

·         कोपा मॉलमध्ये आपल्या फरी मित्रांसोबत पेट-फ्रेंडली ऍक्टिव्हिटीजचा आनंद घ्या.

पुणे, महाराष्ट्र – २१ डिसेंबर २०२३:  पुण्यातील प्रीमियर लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशन, कोपा या कोरेगाव पार्कमधील मॉलने आयोजित केला आहे पुण्यातील पहिला ख्रिसमस कार्निवल, यामध्ये ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुले आणि कुटुंबातील सर्वजण मिळून जादुई आनंद मिळवू शकतील.

कोपा ‘विंटरशायर’ चे सर्वात मोठे आकर्षण आहे २८ फीट उंच शानदार ख्रिसमस ट्री. क्रॉसवर्ड, किटस्टर्स आणि पिझ्झा एक्स्प्रेसच्या सहयोगाने आयोजित करण्यात येणार असलेल्या मजेदार ख्रिसमस ऍक्टिव्हिटीजच्या वातावरणनिर्मितीची सुरुवात या ख्रिसमस ट्रीने होते. क्रॉसवर्डने मुलांसाठी ख्रिसमस लायब्ररी ठेवली आहे, यामध्ये गोष्टी सांगणे, स्नोमॅन बिल्डिंग, पेपा पिग ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. किटस्टर्सने ख्रिसमस डूडलिंग, वूडन ऑर्नामेंट मेकिंग, मग मारबलिंग आणि बॉटल लाईट पेंटिंगचे आयोजन केले आहे. पिझ्झा एक्स्प्रेसने स्पेशल किड्स ख्रिसमस मेन्यू तयार केला आहे, चॉकलेट ट्रीट्स व डोबॉल्समुळे मुले खुश होणार हे नक्की. ऑगमेंटेड रियालिटी किंवा व्हिडिओ बूथ्समार्फत मुले सांताक्लॉजसोबत फोटो देखील घेऊ शकतील. अनोख्या जगात घेऊन जाणारा हा अनुभव अतिशय रोमांचक ठरेल.

कोपा ‘विंटरशायर’ चे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे जिंजरब्रेड हाऊस, ज्यामध्ये मुले या ऋतूचा उत्साह व गोडी यांचा स्वाद चाखू शकतील. अतिशय मजेशीर सेटिंग्ससह, मुले रॉकिंग चेयर्सवर बसून फायरप्लेसजवळ आरामात बसून स्वादिष्ट कूकीजचा आनंद घेऊ शकतील.

सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कोपामध्ये आले आहेत नवीन ब्रँड्स आणि खानपानाची नवी ठिकाणे. पुण्यातील पहिले शॉट हे गेमिंग आणि एंटरटेनमेंट झोन, मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे हॅमलेज प्ले भरपूर इंटरॅक्टिव्ह व एंगेजिंग ऍक्टिव्हिटीज घेऊन आले आहे. नुकतेच कोपामध्ये ब्रुक्स ब्रदर्स, चिलीज, कायमा आणि हेड्स अप फॉर टेल्स हे नवे ब्रँड दाखल झाले आहेत. याखेरीज ट्रू रिलिजन, मायकेल कोर्स आणि टीरा ब्युटी हे ग्लोबल ब्रँड देखील या महिन्यात येतील. यंदाच्या सुट्ट्यांमध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मॉल सज्ज आहे.

एकमेव पेट-फ्रेंडली मॉल असणे ही कोपा मॉलसाठी अभिमानास्पद बाब आहे. विंटरशायरमध्ये ग्राहक आणि त्यांचे फरी दोस्त देखील सहभागी होऊ शकतील. सांता नसेल तर ख्रिसमस कसा साजरा होईल? याठिकाणी तुम्ही सांताला भेटून तुमची पत्रे त्याच्या मेलबॉक्समध्ये टाकू शकाल.

नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २१ : देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसाठी सन २०२३ -२४ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले होते, मात्र  नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या योजनेसाठी अर्ज  करण्यास ४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम(IIM), आयआयआयटी (IIIT), एन‌आयटी(NIT),आयआयएससी (IISc), आयआयएसइआर (IISER) इन्स्टीट्यूट ऑफ नॅशनल इंपार्टन्स व इतर कॉलेज या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित  विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे रुपये १० हजार दोन टप्प्यात देण्यात येणार आहेत.

या योजनेविषयी अधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर  जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन कागदपत्रासह ४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य,३ चर्च पथ पुणे येथे करावा. पदवी, पदव्युतर पदवी,  पदव्युतर पदविका पूर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे.  राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्याना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

नववर्षात महापालिकेची टॉयलेट सेवा ॲपच्या माध्यमातून स्वच्छ शौचालय स्पर्धा-खेमनार

पुणे- महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत टॉयलेट सेवा ॲपच्या माध्यमातून स्वच्छ शौचालय स्पर्धा भरविण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार आणि उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.टॉयलेट सेवा ॲपच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असताना त्यांनी हि माहिती पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी स्वच्छ पुणे चे ब्रांड अॅम्बेसिडर संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी,तसेच अॅप चे अमोल भिंगे यावेळी उपस्थित होते .

खेमनार म्हणाले कि,’ पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयीसुविधांबाबत अधिक प्रमाणात जनजागृती होणेकरीता अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधणे, वापरानंतर या शौचालयास Feedback देणे किंवा तकारी नोंदविणे इ.सुविधा उपलब्ध असलेले Toilet Seva app तयार केले असून या App द्वारे टॉयलेट्स search करणे, टॉयलेट add करणे, ओव्हरऑल रेटिंग नुसार results sort करणे, टॉयलेटमध्ये असणाऱ्या सुविधा पहाणे किंवा त्यानुसार search results चे filtering करणे उदाहरणार्थ वॉशबेसिन, पाणी, liquid soap किंवा sanitizer, डस्टबिन, lights, महिलांसाठीच्या सनिटरी नॅपकिन्स, टॉयलेट कुठे लोकेटेड आहे हे तपासणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स, community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही माहिती शहरातील नागरिक, तसेच प्रवास करणाऱ्यांना उपयोगी पडणार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांविषयी नागरिकाना आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत देणे आणि आपल्या तक्रारी नमूद सरपणे सोयीचे होणार आहे. दिनांक २२/०६/२०२३ रोजी महापालिका आयुक्त यांचे हस्ते या Toilet Seva app घे लॉचिंग करण्यात आली होती व ते नागरीकांना वापरासाठी खुले करण्यात आले होते.

तसेच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत Clean Tollet Challenge २०२३ च्या अनुषंगाने आवश्यक कामकाज करणेविषयी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सुरक्षित स्वच्छतेसाठी वेगवान बदल करणेकरिता Clean Toilet Challenge प्रक्षेपित करण्यात आले आहे. या अंतर्गत पाच आठवड्यांचा (१९ नोव्हेंबर २०२३ ते २५ डिसेंबर २०२३) संपूर्ण शहरभर सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचे मोठ्या प्रमाणावर सामूहिक स्वच्छता व देखभाल दुरुस्ती अभियान राबविण्यात येणार आहे. शौचालयांचे वापरकर्त्यांना अपेक्षित सेवा सुविधा देणे व उत्कृष्ठ शौचालयांना सर्वज्ञात करणे असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

सध्या सुरु असणारया Clean Toilet Challenge २०२३ च्या अनुषंगाने Toilet Seva App च्या माध्यमातून शौचालय प्रतवारी करून शहर पातळीवर स्वच्छ शौचालाय स्पर्धा राबविल्यास शौचालय व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होऊन नागरिकांना योग्य सोयीसुविधा देण्यात येतील. याकरिता स्वच्छ शौचालय स्पर्धा संपूर्ण शहरभर राबविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून उकृष्ट पाच शौचालयांपैकी एका शौचालयाची निवड अंतिम फेरीकरिता केली जाणार आहे. शहर पातळीवर १५ शौचालयामधून तीन उत्कृष्ट शौचालय निवडले जातील. सदर स्पर्धेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ते ३० जून २०२४ असा असणार आहे. एकूण १०० गुणांकरिता Toilet Seva App Rating/ मानाकन- 30गुण, Toilet Seva App वापर ३० गुण व प्रत्यक्ष निरीक्षण (FACES Parameters (मापदंड)- ४० गुण हे स्पर्धेचे निकष असतील,

स्पर्धेचे परीक्षण करण्याकरीत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी एक अश्या एकूण १५ समिती मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती कार्यरत असतील. केंद्रित स्तरावर अपेक्स कमिटीचे सदस्य पत्रकार स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, सफाई कर्मचारी आयोग प्रतिनिधी इत्यादी सदस्य असणार आहेत व विकेद्रित स्तरावर मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक प्रतिनिधी, निवृत अधिकारी इत्यादी सदस्य असणार आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष राहतील व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती चे अध्यक्ष उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन असणार आहेत. परीक्षणाबाबत सदस्यांमध्ये मतभिन्नता अढळल्यास अंतिम निर्णय अध्यक्षांचा असेल.

या स्पर्धेची व Toilet Seva App च्या दुसऱ्या पर्वाची सुरवात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित माहे डिसेंबर २०२३ मध्ये मा. स्वच्छता बॅन्ड अॅम्बेसिडर डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येईल व स्पर्धेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ असा असणार आहे. माहे जुलै २०२४ मध्ये परीक्षण पूर्ण करण्यात येईल. या स्पर्धेविषयी पुणे महानगरपालिका सोशल मिडिया व प्रिंट मिडिया द्वारे जनजागृती करण्यात येईल.

रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे चमकदार यश

पुणे-बी.एम.सी. सॉफ्टवेअर इंडिया आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या मदतीने पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी)  बी. टी. सहानी नवीन हिंद हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी युरोपातील एस्टोनिया येथे झालेल्या रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन पोडियम पोझिशन्स जिंकत उल्लेखनीय यश मिळविले.
या स्पर्धेत ४० देशांतून पाच हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये या पुण्याच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील (स्टेम)उत्तम शिक्षण आणि नावीन्यपूर्ण तायात उत्तम कामगिरीकरणाऱ्या रोबोटेक्सइंडिया, याना-नफा संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये वाढवून परिवर्तन करण्याची आपली कटिबद्धता विविध उपक्रमांतून कायमराखली आहे. टॅलिन, एस्टोनिया येथे नुकतीच संपन्न झालेल्या रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय अंजिक्यपद (रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२३) स्पर्धेत महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे या कटिबद्धतेचेच प्रतीक आहे.
या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची झलक दाखविणाऱ्या दोन प्रकल्पांना विजतेपद मिळाले. आरती चव्हाण आणि अंबिका ठाकूर या आठवीतील विद्यार्थिनींनी जलप्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी बनवलेली स्मार्ट रिव्हरक्लिनिंगबोट अर्थात नदीतील कचरा गोळा करणारी स्मार्ट बोट यशाची मानकरी ठरली, तर नवव्या इयत्तेतील दिपाली साळवे आणि बिपिन तिवारी यांच्या अॅग्रिकोसड्रोन या प्रकल्पाने शेतकऱ्यांसाठी एक क्रांतीकारी उपाय योजना सादर केली आहे. या ड्रोनच्या साह्याने पावसाच्या ढगातील खनिजे शोधून शेतकऱ्यांना परिपूर्ण खतांची निवड करण्यात मदत करणे शक्य झाले आहे.
बी. टी. सहानी स्कूल मधील शंभरहून अधिक संघांनी रोबोटेक्स इंडियाने यंदा आयोजित केलेल्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धांमध्ये भाग घेतला. विशेष म्हणजे, त्यातील चार संघांनी राष्ट्रीय स्तरावर पोडियम पोझिशन्स मिळवून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोबोटेक्स अजिंक्य पद स्पर्धेत ही यश मिळविले. या जागतिक स्पर्धेचे हे यंदाचे २४ वे वर्ष असून, ती जगभरातील सर्वांत मोठ्या रोबोटिक्स महोत्सवां पैकी एक आहे.
पुणे महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते आज बी. टी. सहानी नवीन हिंद विद्यालयाच्या या विजेत्या संघांना गौरविण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, “बी. एम. सी. सॉफ्टवेअरने, सामाजिक जबाबदारी उपक्रमाद्वारे, आठ विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटचालीत मदत करण्यात महत्त्व पूर्ण भूमिका बजावली आहे. या कंपनीने दिलेल्या निधीमुळे या विद्यार्थ्यांना पासपोर्ट, व्हिसा आणि विमान तिकीट या सारख्या अत्यावश्यक बाबी सुलभ झाल्या आणि या जागतिक स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सहभाग ही सुनिश्चित झाला.
“आम्ही अशा युगाचे साक्षीदार आहोत जिथे भारत, एक देश म्हणून, तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची नवी व्याख्या निश्चित करत आहे.या वाटचालीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला नव्या दिशा शोधण्यासाठी मदत करण्याची आमची भूमिका आहे.या अनुषंगाने रोबोटेक्स इंडिया सोबतच्या आमची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे.देशभरातील विद्यार्थ्यांना वर्तमानात आणि भविष्यातही भरभराटीची संधीउपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे बी. एम. सी.सॉफ्टवेअरचे भारतातील प्रमुख साकार आनंद म्हणाले.
“बी एम सी आणि रोबोटेक्स इंडिया लिंग समानतेला चालना देण्यासाठी आणि वंचित समुदायांनाही डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा भारताच्या भावी कार्यशक्तीला आकार देण्याच्या प्रयत्नांचा हा आधारस्तंभ आहे. स्टेम प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आम्ही मुलां मधील सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहोत.यामुळे ही मुले केवळ सक्षम बनत नाहीत तर येणाऱ्या पिढ्यांसाठी परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता ही निर्माण होते,” असे बी. एम. सी. सॉफ्टवेअर मधील कॉर्पोरेट सिटीझनशिप आणि डी ई आयचे ग्लोबल हेड वेंडीरेंटश्लेर म्हणाले.
रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल म्हणाल्या, “रोबोटेक्स इंडियामध्ये, आम्ही देशभरातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. या मार्गातील अडथळे दूर करून, त्यांना विजया पर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी बी. एम. सी. सोबतची ही भागीदारी आणि आम्ही एकत्र सुरू केलेले उपक्रम नाविन्यपूर्णता आणि विविधतेचा स्वीकार करून विविध पार्श्वभूमीवरील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि जागतिक अशा दोन्ही स्तरावर त्यांची अत्युकृष्ट क्षमता दाखविण्यासाठी एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या आमच्या दृढ समर्पणाचा दाखला आहे. राष्ट्रीय स्तरावर’ शिक्षण आणि रोजगारातील तफावत दूर करण्यासाठी ही याची मदत होते.
वीज आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधनसामुग्री, सहजपणे उपलब्ध नसतानाही दुर्बल सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या बी.टी. सहानी शाळेतील एकहजार हूनअधिक विद्यार्थ्यांना २०२१ पासून रोबोटेक्स इंडियाच्या परिवर्तनात्मक कार्यक्रमांद्वारे भविष्यातील तंत्रज्ञान कौशल्यांची ओळख करून देण्यात आली आहे.
बी एम सी सॉफ्टवेअर इंडिया आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या सहकार्यामुळे बी. टी. सहानी शाळेत पहिली “स्टेमरोबोटिक्सलॅब” ची स्थापना झाली आहे. ही अत्याधु निक प्रयोगशाळा एक हजार विद्यार्थ्यांना कोडींग, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आय ओ टी मधील आवश्यक कौशल्ये प्रदान करण्यासाठी सुसज्ज आहे, ज्यामुळे भविष्यातील रोजगाराच्या संधींचा फायदा घेण्यासाठी भक्कम पाया तयार झालेला असेल.
स्टेम शिक्षणासाठी बी एम सी सॉफ्टवेअरची बांधिलकी पुण्याच्या पलीकडे विस्तारली असून, विविध ठिकाणच्या सरकारी शाळांमधील सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, स्टेमलॅब आणि’ रोबो बनवणाऱ्या मुली’ या अनोख्या उपक्रमांचा फायदा होत आहे. पुणे महानगरपालिका आणि रोबोटेक्स इंडिया यांच्यातील संयुक्त उपक्रमाचा उद्देश पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना २०२४ पर्यंत रोबोटिक्स, कोडिंग, ए आय आणि भविष्यातील इतर कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हा आहे. पुढील तीन वर्षांत महानगरपालिकेच्या २०० शाळांमध्ये स्टेमरोबोटिक्स लॅबची स्थापना करण्याचे उद्दिष्ट आहे. स्टेम शिक्षणात प्रगती करणे, डिजिटल विषमता कमी करणे आणि तंत्रज्ञानावर आधारित भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांसह विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे या आपल्याध्येयांसाठी रोबोटिक्स इंडिया कटिबद्ध आहे. 
रोबोटेक्स इंडियाबद्दल:रोबोटेक्स इंडियाने शहरी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील दहालाख विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रशिक्षण दिले आहे. भविष्यासाठी विद्यार्थी घडविण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील नावीन्यपूर्णतेत प्रभावी कौशल्य मिळविण्याकरिता जागतिक दर्जाची गुणवत्ता एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी शिक्षण आणि कौशल्ययातील तफावत दूर करणे, समाजातील डिजिटल विषमता दूर करणे आणि भविष्यकालीन पिढी घडविताना रोजगार निर्मिती करण्याकरिता प्रयत्न करत आहे.
 बी. एम. सी. बद्दल: बी एम सी फोर्ब्सग्लोबल ५० मधील ८६ टक्के आणि जगभरातील ग्राहक व भागीदारांबरोबर त्यांचे भविष्य घडविण्यासाठी कार्य करते. नावीन्यपूर्णतेच्या इतिहासासह, ऑटोमेशनमधील आघाडीची कंपनी आणि ऑपरेशन्स आणि सेवा व्यवस्थापनासाठी उपाययोजना पुरविणारी ही एक आघाडीची कंपनी आहे. संस्थांना एक स्वायत्त डिजिटल उद्योग बनण्यासाठी भविष्यातील संधींचा लाभ घेण्याकरिता पुरेसा वेळ आणि स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.

वयोवृद्ध सासुला घराबाहेर काढल्यामुळे न्यायालयाचा सुनेला दनका 1 लाख रुपये दंड ठोठावीला

पुणे, दि.२१.१२.२०२३:- कौटुंबिक वादातून वयोवृद्ध सासू XYZ वय ८५ वर्ष व XYZ वय वर्ष ६० यांना XYZ व नात XYZ यांनी संगनमताने कोरेगाव पार्क येथील राहत्या घरातून सासूला व नवऱ्याला हाकलून दिले. वयोवृद्ध सासू ह्या आजारी असल्यामुळे त्यांचे शरीर कोणत्याही प्रकारचे काम करू शकत नाही. गैरअर्जदार ह्या कोरेगाव पार्क येथील तीन मजली बंगलो मध्ये एकट्याच राहत असून त्या ठिकाणी ते ‘इंफॉरेन’ या नावाने व्यवसाय चालवत आहेत. तसेच त्यांची मुलगी म्हणजेच अर्जदार यांची नात XYZ हे इंग्लंड (यू.के.) या देशांमधील मॅकिन्से या कंपनी मध्ये वार्षिक उत्पन्न ₹५० लाख रुपये कमवत आहे. तरीदेखील सुनेने आणि नातीने मिळून अर्जदार यांना सांभाळण्याची जबाबदारी न घेता घरातून हाकलून दिले आहे.
जबरदस्तीने बेदखल केल्यानंतर, श्रीमती XYZ यांनी पोलिस आणि इतर प्राधिकरणांकडे मदत मागितली, परंतु त्यांना कुठलीही दाद मिळाली नाही. त्यानंतर, तिने घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत अर्ज दाखल केला. सासूने सदरील घरगुती हिंसाचार संदर्भात कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत मे. बिराजदार साहेब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर पुणे, यांच्याकडे दाद मागितली असता मे.न्यायालयाने सुनेला व नातीला नोटीस देऊन सदरील प्रकरणांमध्ये खुलासा मागितला व दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी मे.न्यायालयाने सासूला तिच्या राहत्या घरापासून बाहेर काढता येणार नाही असा आदेश पारित केला परंतु सुनेने सदरील आदेशाला न जुमानता व वयोवृद्ध सासूला घराच्या बाहेर ठेवून मे.कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला. सदरील झालेल्या अवमाना संदर्भात सासूने पुन्हा मे. कोर्टामध्ये दाद मागितली असता मे. बिराजदार साहेब कोर्टाने सुनेला फटकारले व सुनेला पंधरा दिवसाच्या आत १०००००/रुपये दंड मेहरबान कोर्टात जमा करण्याचे व प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला रक्कम रुपये २५०००/- देण्याचा आदेश दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी पारित करण्यात आला तसेच न्यायालयाने येरवडा पोलीस ठाण्याला श्रीमती XYZ याना संरक्षण देण्याचे व पंधरा दिवसांत घरात प्रवेश देण्याचे आदेश पारित केले आहे.
सदरील प्रकरणांमध्ये सासूच्या बाजूने विधीतज्ञ म्हणून अ‍ॅड तोसिफ शेख, अ‍ॅड आशा जाधव, अ‍ॅड स्वप्निल गिरमे,अ‍ॅड क्रांती सहाने ,अ‍ॅड महेश गवळी,अ‍ॅड सुरज जाधव,अ‍ॅड आदिल दातरंगे,अ‍ॅड नुपूर अरगडे,अ‍ॅड जोत्सना पडघमकर यांनी काम पाहिले.

जम्मू काश्मिरात दहशतवादी हल्ला:पुँछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला, गोळीबार सुरू

0

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. यादरम्यान गोळीबारही होत आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. वृत्तानुसार, ज्या भागात हल्ला झाला त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.19-20 डिसेंबरच्या मध्यरात्री पुँछमधील सुरनकोट जिल्ह्यातील पोलीस छावणीत स्फोट झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी (20 जानेवारी) या घटनेची माहिती दिली. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, पोलीस छावणीत उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

जम्मू-काश्मिरातील मागील पाच दहशतवादी घटना…

पहिली: 17 नोव्हेंबर रोजी 2 चकमकी, 6 दहशतवादी मारले गेले

17 नोव्हेंबर रोजी राजौरी आणि कुलगाममध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 6 दहशतवादी मारले गेले. पहिली चकमक 16 नोव्हेंबरला कुलगाममध्ये सुरू झाली आणि 17 नोव्हेंबरपर्यंत चालली. यामध्ये 5 दहशतवादी मारले गेले. नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगमध्ये या सर्वांचा सहभाग होता. दुसरी चकमक राजौरी येथे झाली, ज्यामध्ये 1 दहशतवादी मारला गेला.

दुसरी: ऑक्टोबरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या

श्रीनगरमधील ऑक्टोबर इदगाह परिसरात एका दहशतवाद्याने पोलीस निरीक्षकावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्या पोटात, मानेवर आणि डोळ्यांना गोळ्या लागल्या. मसरूर अली वानी असे या निरीक्षकाचे नाव आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मसरूर वानी स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना हा हल्ला झाला.

तिसरी: सप्टेंबरमध्ये 3 अधिकारी, 2 सैनिक शहीद झाले

13 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत 3 अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले होते. शहीद झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये लष्करातील एक कर्नल, एक मेजर आणि पोलिस डीएसपी यांचा समावेश आहे. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. यादरम्यान दोन दहशतवादीही मारले गेले. येथे शोध सुरू असताना लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला.

चौथी : 9 ऑगस्ट रोजी 6 दहशतवादी पकडले गेले

15 ऑगस्टपूर्वी सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना अटक केली होती. पहिले प्रकरण 9 ऑगस्टच्या रात्रीचे आहे, जिथे कोकरनागच्या अथलन गडोले येथे तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. या चकमकीत लष्कराच्या जवानासह तीन जण जखमी झाले. दुसरे प्रकरण उरीचे आहे, जिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लष्कराच्या 3 दहशतवाद्यांना पकडले.

पाचवी : 6 ऑगस्ट रोजी तीन दहशतवादी मारले गेले

6 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दहशतवादी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्याच दिवशी संध्याकाळी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेला आणखी एक दहशतवादी मारला गेला.

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने पश्चिम भारतात पार केला १५ दशलक्ष ग्राहकांचा टप्पा

मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने आज भारताच्या उत्साही आणि वैविध्यपूर्ण अशा पश्चिम भागात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड पार केल्याची घोषणा  केली. सातत्याने नवीन मापदंड प्रस्थापित करताना HMSI ने १५ दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडून एक उल्लेखनीय कामगिरी केली असून या प्रदेशातील दुचाकी ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह आणि पसंतीची निवड म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे.

गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिमेकडील बाजारपेठेतील पहिले १० दशलक्ष ग्राहक मिळविण्यासाठी HMSI ला १७ वर्षांहून अधिक काळ लागला, तरीही त्यांनी केवळ ६ वर्षांपेक्षा कमी कालावधीत नंतरचे ५ दशलक्ष ग्राहक मिळवले. विशेष बाब म्हणजे टचपॉइंट्सची वाढलेली संख्या, रेड विंग आणि बिगविंग या दोन्ही उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार, विश्वसनीय ग्राहक सेवा आणि वर्धित ग्राहक कनेक्ट यामुळे ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास झपाट्याने वाढला आहे.

या महत्वपूर्ण कामगिरी बाबत बोलताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री.योगेश माथूर म्हणाले, “डीलरशिप, सेवा केंद्र आणि प्रभावी उत्पादन लाइनअप यांच्या विस्तृत नेटवर्कमुळे गेल्या काही वर्षांत एचएमएसआयने पश्चिम भारतात मजबूत स्थान निर्माण केले आहे.  कंपनीच्या मोटारसायकली आणि स्कूटर्सच्या विविध श्रेणींनी या प्रदेशातील चोखंदळ ग्राहकांच्या विविध गरजा आणि प्राधान्यक्रम पूर्ण केला आहे. पश्चिम भारतातील १५ दशलक्ष ग्राहकांचा टप्पा पार करणे ही एक अचंबित करणारी कामगिरी आहे. लोकांनी होंडा ब्रँडवर दाखवलेला विश्वास आणि प्रेम पाहून आम्हाला आनंद झाला आहे.”

दर्जेदार उत्पादने आणि सेवा देऊन ग्राहकांना आनंदित करताना:

ग्राहकांच्या वाढत्या वैयक्तिक दळणवळणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, HMSI या राज्यांमध्ये ४९% अशा मजबूत बाजारपेठीय हिस्स्यासह स्कूटरीकरणात आघाडीवर आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा ही या  प्रदेशात पहिल्या क्रमांकावरील विकली जाणारी गाडी आहे. कंपनीचा पश्चिम विभागातील दुचाकी बाजारपेठेत (स्कूटर आणि मोटारसायकल या दोन्हींसह) एकूण बाजारपेठीय हिस्सा ३६.४% आहे. तसेच, ग्राहक आता तंत्रज्ञान प्रवीण बनत आहेत आणि वाहनांच्या बुकिंग आणि खरेदीसाठी ऑनलाइन चौकशी करत असल्यामुळे HMSI ने ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रयत्न वाढवले ​​आहेत आणि त्याच वेळी त्याच्या डीलरशिपवर मिळणारा अनुभवही उंचावला आहे.

पश्चिम भारतात होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया:

११०० हून अधिक टचपॉइंट्सच्या विस्तृत नेटवर्कसह गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या पश्चिम राज्यांमध्ये HMSI चे मजबूत स्थान आहे. ग्राहकांना राइडिंगचा आनंद देणार्‍या होंडाच्या विविध श्रेणीतील स्कूटर आहेत ज्यात अ‍ॅक्टिव्हा प्लस स्पेशल एडिशन, अ‍ॅक्टिव्हा 125, डीओ प्लस  Repsol Edition आणि डीओ 125 आणि शाईन 100, सीडी 110 ड्रीम डिलक्स, लिवो, शाईन 125, SP125 प्लस स्पोर्ट्स एडिशन, युनिकॉर्न, SP160, Hornet 2.0+Repsol Edition आणि CB200X सारख्या मोटरसायकल असून त्या रेडविंग आउटलेटवर उपलब्ध आहेत.

या जोडीलाच, होंडाच्या प्रिमियम मोटरसायकल महत्वाच्या मेट्रोजमध्ये मुख्यत्वे बिगविंग टॉपलाइन (300cc-1800cc) आणि इतर मागणी केंद्रांमध्ये बिगविंग (300cc 500cc मध्यम आकाराच्या मोटरसायकल) द्वारे उपलब्ध आहेत. कंपनीच्या बिगविंग उत्पादन श्रेणीमध्ये CB300F, CB350, H’ness CB350, CB350RS, CB300R, CB650R, CBR650R, XL750 Transalp, CBR 1000RR-R फायरब्लेड, आफ्रिका ट्विन आणि गोल्ड विंग टूर समाविष्ट आहे.

अली दारूवाला यांचा ‘ वन इंडिया ‘ पुरस्काराने गौरव

पुणे :भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारूवाला यांचा  ‘ वन इंडिया ‘ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. संघ प्रचारक आणि भाजप नेते सुनील देवधर यांनी स्थापन केलेल्या ‘ माय होम इंडिया ‘ संस्थेतर्फे  आयोजित कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांनी अली दारूवाला यांना हा पुरस्कार प्रदान केला.मुंबई येथील वीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास,एकात्मता आणि राष्ट्रबांधणीसंबंधीच्या योजना प्रभावीपणे अल्पसंख्य समुदायात पोहोचविण्यात दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला.यावेळी सुनील देवधर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित होते. 
‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे राष्ट्रहिताची असून देशाला जगात पुढे नेणारी आहेत. या कार्यात आपण योगदान देत राहू.मुख्य राष्ट्रीय प्रवाहात अल्पसंख्य समुदाय येण्याने राष्ट्रीय एकात्मता बळकट होणार आहे’ , असे अली दारुवाला यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.अली  दारूवाला हे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन(नवी दिल्ली)चे प्रवक्ते  तसेच भारतीय जनता पक्षाचेही  प्रवक्ते आहेत.अलीकडेच त्यांची राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग(नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज) चे राष्ट्रीय सल्लागार म्हणूनदेखील नियुक्ती झाली आहे.

मोदींसाठी विमानतळ टर्मिनलचे उदघाटन थांबले हा प्रकार संतापजनक-माजी आमदार मोहन जोशी

१जानेवारीला उदघाटन व्हावे,अन्यथा तीव्र आंदोलन

पुणे -प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल कार्यान्वित होणे गरजेचे आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटनासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. हा प्रकार पुणेकरांसाठी संतापजनक आहे, १जानेवारीपूर्वी उदघाटन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

विमान प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने पुणे विमानतळावर अनेक गैरसोयी वाढू लागल्या. विमानाचे लॅन्डिंग करण्यातही अडथळे येत आहेत. विमान प्रवाशांची संख्या वर्षाकाठी ७०लाख होती, ती ९०लाखांपर्यंत जावून पोहोचलेली आहे. ती लवकरच १कोटीचा आकडा ओलांडेल, अशी शक्यता आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे गैरसोयी वाढल्या. विमानतळावरची शांतता संपून, गजबजाट झाला. विमानांच्या लॅन्डिंगला अडथळे येऊ लागले. यावर उपाययोजना म्हणून ५२५ कोटी रुपये खर्चून नवे टर्मिनल उभारण्यात आले. ऑगस्ट २०२३ पूर्वीच नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले, चाचण्याही झाल्या. टर्मिनल ताबडतोब कार्यान्वित व्हावे यासाठी विमान प्रवाशांनी सोशल मिडियाद्वारे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर पोर्ट ॲथॉरिटीचे लक्ष वेधले. त्याला दाद देण्यात आली नाही, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.

नव्या टर्मिनलचे उदघाटन २०२३ सालातील सप्टेंबर महिन्यात होईल, असे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जाहीर केले. सप्टेंबर महिना उलटला, मग ऑक्टोबर महिन्याचा वायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यालयाला पत्रही लिहीले. मात्र, पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतून पडलेल्या मोदींनी उदघाटनासाठी वेळ दिला नाही. नवे टर्मिनल चालू व्हावे यासाठी प्रवासी आतुर झाले आहेत. विमानतळाची प्रवासी क्षमता वाढणार आहे, विमानांची संख्या वाढणार आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांना कामाचे श्रेय घेऊन मिरवायचे आहे. याकरिता भाजपच्या नेत्यांकडून वेळकाढूपणा चालू आहेत. हे डावपेच निंदनीय आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

आर्य समाज पिंपरी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे – महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार ते रविवार विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सल्लागार मुरलीधर सुंदरानी, सचिव हरेश तीलोकचंदानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


पिंपरी कॅम्प येथील आर्य समाजच्या पटांगणात शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी सात वाजता, तसेच रविवारी सकाळी आठ वाजता कर्नाल, हरियाणा येथील प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि पुण्यातील ज्येष्ठ प्रवचनकार आचार्य सोनेरावजी यांचे प्रवचन, भजन होणार आहे. त्यांना तबला वादक रमाकांत राऊत साथ देणार आहेत. सायंकाळी सहा वाजता होमहवन, शनिवारी (दि.२३) दुपारी चार वाजता बालकांच्या हस्ते होम हवन होणार आहे. रविवारी (दि.२४) सकाळी दहा वाजता ५१ बहुकुंडीय यज्ञ होणार आहे. पिंपरी आर्य समाजचे पुरोहित धर्माचार्य पंडित विवेक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली होम हवन होणार आहे. तसेच हुतात्मा स्वामी श्रद्धानंद यांच्या ९७ व्या बलिदान दिवस निमित्त पिंपरीतील आर्य वीर दलाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
विदुषी अंजली आर्या यांचा परिचय : या वैदिक सिद्धांताच्या प्रचारासाठी जगभर प्रवचन कीर्तन करून मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी हरियाणा राज्यातील कर्नाल येथून उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांची संगीत क्षेत्रातील आवड आणि वाणीवरील प्रभुत्व पाहून त्यांचे आजोबांनी त्यांना आर्य समाजाचे कार्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी मार्गदर्शन केले. समाजाचे रामचरित्रातून प्रबोधन करणे, पाखंड, अंधविश्वास विषयी जागृती करणे या कार्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.
प्रा. आचार्य सोनरावजी यांचा परिचय : प्रा. आचार्य सोनेरावजी हे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी तरुण वयात हरिश्चंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत व वेदशास्त्र अभ्यासासाठी पंजाब मधील गुरुकुलात प्रवेश घेतला होता. नंतर अमृतसर, चंदिगड आणि मेरठ या तीनही विद्यापीठातून एम. ए. संस्कृत परीक्षा सुवर्णपदकांसह प्राप्त केल्या. लातूरच्या महाविद्यालयात संस्कृत प्राध्यापक म्हणून काही काळ सेवा केली. त्यानंतर आर्य समाजाचे प्रचारक म्हणून ते आफ्रिकेत गेले, नंतर इंग्लंड, अमेरिका येथेही प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी आफ्रिका, युरोप, अमेरिका खंडातील अनेक देशात आर्य समाजाचे वेद, उपनिषदांचे महत्त्व पटवून देणारे प्रवचन करून समाज प्रबोधन केले आहे. आता ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असून वेद, उपनिषधांचा सखोल अभ्यास आहे.

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या हीरक महोत्सवाचे शुक्रवारी उद्धाटन

पुणे – पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलची स्थापना २० जुलै १९५८ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली होती. शाळा यावर्षी हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२२) शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ७:३० वाजता कला, विज्ञान, शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक जयदेव अक्कलकोटे आणि सकाळी १० वाजता, पारितोषिक वितरण समारंभ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती शाळा समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शशांक परमाणे, मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता कामगार नेते व माजी विद्यार्थी डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते होणार आहे. इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.२३) सकाळी दहा वाजता उद्योजक व माजी विद्यार्थी श्रीकांत बडवे यांच्या हस्ते होणार आहे.
महोत्सवाची सांगता रविवारी (दि.२४) आनंद मेळावा आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘ही आवडते मज मनापासून शाळा’ हे नाटक आणि ऑर्केस्ट्राने होणार आहे.
१९६९ ते २०२२ पर्यंतच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना केली आहे. संघटनेने या वर्षी शाळेच्या इमारतीची डागडुजी, वर्गखोल्या रंगकाम, स्वच्छ्ता व पर्यावरण जागृतीसाठी पवना धरण परिसर व तिकोना किल्ला मावळ येथे प्लास्टिक मुक्त स्वच्छता अभियान, वृक्षारोपण केले आहे. तसेच शाळेला यावर्षी स्मार्ट बोर्ड दिले आहेत. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत शाळा ई स्कूल करण्याचा संकल्प आहे. यासाठी माजी विद्यार्थ्यांनी यथाशक्ती योगदान द्यावे असे आवाहन उपाध्यक्ष गणेश गांवकर, सचिव आशिष म्हसे, समन्वयक मोहन बाबर, अशोक थोरात यांनी केले आहे. हीरक महोत्सव कार्यक्रमांच्या आयोजनात उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल साबळे, आर्या मोटे, कार्याध्यक्ष रमेश गाढवे, उप कार्याध्यक्ष श्वेता नाईक, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष समाधान गेजगे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी

पुणे दि.२१: केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा सुरू असून या यात्रेच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात उपल्बध करुन देण्यात आलेली आरोग्य तपासणीची सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे.

या दोन्ही शहराच्या विविध भागात एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून सकाळ व दुपारच्या सत्रात प्रत्येकी एका ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यात आरोग्य तपासणी, क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमबाबत जनजागृती, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी आदी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रक्तदाब, मधुमेहासह इतर सामान्य आरोग्य तपासणीची सुविधादेखील करण्यात आली आहे. गरजू व्यक्तींसाठी जागेवरच आरोग्य तपासणीची सुविधा विशेष ठरली आहे.

यासोबत आधार अद्ययावत करणे, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला गॅस योजनेसाठी नोंद आदी विविध कक्ष स्थापित करण्यात येतात. या कक्षाद्वारे नागरिकांना माहिती देण्यासोबत योजनांचा लाभही देण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान वितरीत करण्यात येणारे योजनांची माहिती देणारे कॅलेंडर आणि पुस्तिकाही नागरिक उत्सुकतेने पाहताना दिसतात. ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि प्रोत्साहनपर पुरस्कार हेदेखील नागरिकांसाठी विशेष आकर्षण आहे. शहरातील प्रत्येक भागात या यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याने नागरिकांना योजनांचा लाभ घेणे शक्य होत आहे.

यात्रेच्या नियोजनासाठी महापालिकेतर्फे आरोग्य आणि इतर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांद्वारे सुनियोजित पद्धतीने यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ होत आहे. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानंतर संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजना नागरिकांच्या दारी पोहोचत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पुणे शहरात २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंहगड रोड येथील नवश्या मारुती मंदिर आणि दुपारी २ वाजता दांडेकर पूल परिसर, तर २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भारती विद्यापीठाचे मागील प्रवेशद्वार आणि दुपारी २ वाजता गाडीतळ येरवडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सद्गुरू उद्यान निगडी येथे, दुपारी २ वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृह माळी आळी पिंपरी येथे, तर २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शास्त्रीनगर पिंपरी येथे आणि दुपारी २ वाजता बालाजी मंगल कार्यालय रहाटणी येथे यात्रेचे आयोजन होईल.

नागरिकांना यात्रेला भेट द्यावी, असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी चिंचवड महापालिकाआयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.