Home Blog Page 1312

पाच टक्के आरक्षणासह संरक्षणासाठी मुस्लिम समाज आग्रही – राहुल डंबाळे

मुस्लिम आरक्षण व संरक्षण हक्क समितीची स्थापना

पुणे (दि.१५ डिसेंबर २०२३) महाराष्ट्र सरकारने २०१४ मध्ये मुस्लिम समुदायाला दिलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा देण्यात यावे व यासाठी आवश्यक तो कायदा करावा, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या विविध पक्ष संघटनेच्या प्रतिनिधींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकात केली आहे, अशी माहिती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनोरिटीच्या वतीने मुस्लिम आरक्षणांच्या संदर्भामध्ये काम करीत असलेल्या विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींची पिंपरी येथे शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुल डंबाळे, मौलाना नय्यर नूरी, अजीज शेख, हाजी युसुफ कुरेशी, शहाबुद्दीन शेख, हाजी दस्तगीर मणियार, हाजी गुलाम रसूल सय्यद, शहाजी पटेल अत्तार, शाकीर शेख, जैद शेख, युनूस पानडीवाले, नियाज देसाई, सालर शेख, जाफर मुल्ला, इम्रान विजापुरे, असद पटेल, नसीर शेख, जुबेर खान, जुबेर मेमन, ॲड. फारुख शेख, ॲड. मोहित पिरंगुठे यांच्यासह शहरातील मुस्लिम समाजाचे विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व प्रतिष्ठीत नागरिक सहभागी झाले होते.
या बैठकीत मुस्लिम आरक्षण व संरक्षणासाठी सर्व पातळीवरील पाठपुरावा करण्यासाठी सर्वपक्षीय “मुस्लिम आरक्षण व संरक्षण हक्क समितीची“ स्थापना करण्यात आली आहे. यावेळी व्यापक चर्चा व सर्व शक्यतांची पडताळणी करून मुस्लिम समुदायाला मागील सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा मिळण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही. केवळ विद्यमान राज्य सरकारने आरक्षणांबाबत कायदा करणे गरजेचे आहे. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी व मुस्लिम आरक्षण व संरक्षण हक्क समिती, पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मुस्लिम आरक्षणांसाठी अनुकुल असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे सुमारे शंभर आमदारांची नागपूर आधिवेशन कालावधीत दि. १९-२१ डिसेंबर दरम्यान नागपूर येथे समक्ष भेट घेवून निवेदन देणार आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी आधिवेशन कालावधीतच मुस्लिम आरक्षण कायदा मंजूर करावा अशी विनंती करण्यात येणार आहे. मुस्लिमांसाठी ॲट्रोसिटीसारखा मजबूत कायदा हवा. मुस्लिम समुदायावर देशभरात विशेषत: महाराष्ट्र राज्यात देखील धार्मिक अत्याचाराच्या घटना, हल्ले वाढलेले आहेत. या हल्ल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. सक्षम कायदा नसल्यामुळे धर्मांध व दंगलखोर वृत्तीच्या लोकांवर कोणताही धाक राहिलेला नसून ते सातत्याने समाजाला डिवचण्याचे व त्यांच्यावर हल्ले करण्याचे दुष्कर्म करीत आहेत. ‘हेट स्पिच’ संदर्भामध्ये सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी चिंता व्यक्त केली असून, अशा प्रकारची चिथावणीखोर व्यक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. न्यायालयांच्या आदेशांची अंमलबाजवणी होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याने या संदर्भात स्वत: पुढाकार घेत मुस्लिम समाजाच्या अन्याय, आत्याचारास प्रतिबंध करणारा कडक कायदा ॲट्रोसिटी ॲक्टच्या धर्तीवर करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यासह इतर शंभर आमदारांकडे करण्यात येणार आहे, असेही डंबाळे यांनी सांगितले.

पिंपरी महापालिका आयुक्त आमदारांचे घरगडी – तुषार कामठे

महापालिकेत कोट्यवधींचा टीडीआर घोटाळा, घोटाळ्याची सखोल चौकशी करा, अन्यथा जन आंदोलनाचा महाविकास आघाडीचा इशारा

पुणे (दि. १५ डिसेंबर २०२३) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा टीडीआर घोटाळा झाला असल्याचा गौप्यस्फोट विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केला. टीडीआर प्रकरणांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून पुणे – बेंगळुरू महामार्गा लगत वाकड परिसरातील मोक्याची दोन हेक्टर जागा केवळ २०० रुपये कोटींना महापालिकेने विकासकाला दिली. आजच्या बाजार मूल्याचा विचार केला तर यामध्ये सुमारे दीड हजार कोटींहून अधिक रकमेचा टीडीआर घोटाळा झाला आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह हे शहरातील तिन्ही आमदारांच्या घरचे घरगडी आहेत का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पत्रकार परिषदेत केला.
महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेना माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत – धर, गणेश भोंडवे, अनंत कोऱ्हाळे तसेच संतोष सौंदणकर आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तीन आमदार आहेत. परंतु या घोटाळ्यावर त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला नाही. ते गप्प का आहेत, त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून आमदार या घोटाळ्यात सहभागी आहेत का असा प्रश्न जनता विचारत आहे. महापालिकेने २२ क्रमांकाचे आरक्षण बाहेरच्या विकासकाकडून विकसित करण्यापेक्षा महापालिकेने आपल्या ताब्यातील जागेचा विकास स्वतः करावा. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. पालिकेने अनेक आरक्षणे ठेकेदारांना विकासासाठी दिली आहेत. महापालिकेचे आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. गेल्या दोन वर्षापासून महापालिकेची निवडणूक खोळंबली असल्यामुळे प्रशासकीय राज सुरू आहे. आयुक्तांचा भ्रष्टाचाराचा सुसाट कार्यक्रम सुरू आहे. सरकारने याची चौकशी चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, वेळ पडल्यास अटक करावी. महापालिकेचे जे आर्थिक नुकसान होत आहे याकडे लक्ष दिले नाही तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या वतीने आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा चाबुकस्वार यांनी दिला.
ॲड. सचिन भोसले म्हणाले, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे घोटाळे होत आहेत. हा घोटाळा आत्ताच कसा होतो हे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. यापूर्वीही पिंपरी चिंचवड शहरांमध्ये टीडीआर घोटाळा झाल्याचे आपण पाहिले आहे सरकारने घोटाळ्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी. पालकमंत्री, आमदार या घोटाळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारने कारवाई केली नाही तर जनआंदोलन करू, गरज पडल्यास न्यायालयात जाऊ, असे ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले.
डॉ.कैलास कदम म्हणाले, भाजपच्या मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात स्थायी समिती अध्यक्षाला लाच घेताना रंगेहात पकडले होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. भाजपचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्यामध्ये शहरातील तिन्ही आमदारांचा सहभाग आहे. नुकत्याच झालेल्या तळवडेतील दुर्घटनेमध्ये निष्पाप महिलांना प्राण गमवावे लागले. तळवडे परिसराची दुरवस्था पाहता नियोजन शून्य कारभारामुळे आग शमविण्यासाठी अग्निशमन दलाला कसरत करावी लागली, हे समोर आले. जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. गेल्या सात वर्षात जे घोटाळे झाले आहेत त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. दोषी अधिकार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली.

इमरान हाश्मी ठरला बॉलिवुड चा सिक्वेल हीरो

इमरान हाश्मीचा सिक्वेल स्ट्रीक टायगर 3 ते जन्नत 3 आणि आवारापन 2 !

बॉलीवूडचा ओजी अभिनेता इमरान हाश्मी हा त्याच्या आकर्षक अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनयाची चुणूक आणि उत्तम कामगिरीसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता सध्या सिक्वेल हिरो ठरतो आहे. एका यशस्वी सिक्वेलमधून दुसऱ्याकडे भागाकडे जाताना त्याचा अभिनय भाव खाऊन जातो.

 मर्डर 2, जन्नत 2, राझ 2 आणि राज 3 च्या सिनेमॅटिक अनुभवांनंतर इमरानने आता अलीकडे रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर टायगर 3 मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. टायगर 3 च्या दमदार यशाने इमरान सिक्वेल चा सुपरहिरो बनला आहे. त्याने आजवर अनेक हिट फ्रँचायझी केल्या आणि तो एक उत्तम अभिनेता आहे हे दाखवून दिलं. 

 टायगर 3 ची क्रेझ असताना इमरान बद्दल च्या अनेक चर्चाइंडस्ट्रीत होत आहेत. जन्नत 3 आणि आवारापन 2 आता येणार का ? आणि यात इमरान भूमिका साकारणार का ? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. प्रेक्षक या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

 टायगर 3 च्या यशाचा आनंद लुटत असताना आणि जन्नत 3 आणि आवारापन 2 च्या चर्चा ना उधाण आलं आहे आणि इमरानने हे सिद्ध केले की तो केवळ एक बॉलीवूड स्टार नाही तर यशस्वी सिनेमॅटिक अनुभव देणारा अभिनेता देखील आहे.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचारांसाठी सादर केले क्रांतिकारी HIFU तंत्रज्ञान

मुंबई,कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पर्याय म्हणून हाय-इन्टेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड (HIFU) हे क्रांतिकारी तंत्रज्ञान सादर केल्याची घोषणा केली आहे. HIFU या अत्याधुनिक उपचारामध्ये प्रोस्टेट कॅन्सर पेशींना टार्गेट करून त्या नष्ट करण्यासाठी हाय-फ्रिक्वेन्सी साउंड वेव्ज वापरल्या जातात. शरीरावर कमीत कमी चिरा देऊन केल्या जाणाऱ्या या तंत्रामध्ये फोकल अबलेशनचा वापर केला जातो, कॅन्सर रुग्णांच्या देखभालीमध्ये ही खूप मोठी भरारी आहे. जराही चूक न होता, संपूर्ण देखभाल करत प्रोस्टेट कॅन्सर नेमका जिथे झाला आहे त्या जागी उपचार करण्याचा टार्गेटेड दृष्टिकोन यामध्ये अवलंबिला जातो.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमुंबईचे रोबोटिक सर्जरीचे हेड आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ युवराज टी बी यांनी सांगितले, कॅन्सरवरील पारंपरिक उपचारांना नॉनइन्व्हेसिव्ह पर्याय असलेले HIFU हे लोकलाईज्ड प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी आदर्श आहेफोकल अबलेशनमध्ये जिथे कॅन्सरची जखम किंवा ट्युमर आहे फक्त त्याच जागी लक्ष केंद्रित आणि टार्गेट करूनअति तापमानाचा वापर करून कॅन्सर पेशी नष्ट केल्या जातातप्रोस्टेट ग्रंथींच्या इतर भागांमध्ये सर्वसामान्य पेशींना कोणतेही नुकसान होणे टाळले जातेरेडिएशनसारख्या आधीच्या उपचारांनंतर बचाव उपचार करू पाहणाऱ्या रुग्णांसाठी देखील HIFU लाभदायक ठरू शकते.”

प्रोस्टेट कॅन्सर हा भारतामध्ये पुरुषांना होणाऱ्या, सर्वात जास्त प्रमाण असलेल्या पहिल्या दहा कॅन्सरपैकी एक आहे. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचारांमध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने HIFU आणणे हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आरोग्य देखभाल क्षेत्रातील दिग्गजांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलने प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये अत्याधुनिक प्रगती घडवून आणण्यासाठी सातत्याने गुंतवणूक केली आहे. नावीन्यपूर्णतेप्रती या वचनबद्धतेमुळे प्रोस्टेट कॅन्सरचे निदान करण्यात आलेल्या रुग्णांना सर्वात जास्त प्रभावी आणि शरीरावर कमीत कमी चिरा, जखमा करून करता येतील असे उपचार मिळतील.

HIFU मुळे रुग्णांना अनेक वेगवेगळे लाभ मिळतात. हे उपचार शरीरावर कमीत कमी चिरा देऊन करता येत असल्याने पारंपरिक सर्जिकल प्रक्रियांमध्ये संभवणारी गुंतागुंत होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो. HIFU सर्वसाधारण ऍनेस्थेशिया देऊन करता येते, त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्ण आरामात राहू शकतो. हे तंत्रज्ञान अतिशय अचूक असल्यामुळे आजूबाजूच्या टिश्यूना काहीही नुकसान होत नाही, दीर्घकाळपर्यंत टिकून राहतील असे साईड इफेक्ट्स होण्याचे प्रमाण कमी होते आणि रुग्णाची जीवन गुणवत्ता टिकवून ठेवली जाते.

कमीत कमी वेदना आणि असुविधा सहन करून रुग्णांना हे उपचार करून घेता येतात, तसेच उपचारांनंतर आपली दैनंदिन कामे करू लागणे हे कमीत कमी दिवसात सुरु करता येते. प्रोस्टेट कॅन्सरवरील इतर उपचारांमध्ये होणारे, असंयम आणि नपुंसकत्व असे साईड इफेक्ट्स होण्याचा धोका HIFU मध्ये कमी असतो. 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमुंबईचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, शरीराचे नुकसान कमीत कमी होईल आणि उपचारांचा प्रभाव जास्तीत जास्त होईल अशा प्रकारे अतिशय अचूक उपचारांच्या साहाय्याने आमच्या रुग्णांना कॅन्सरच्या विरोधात लढण्यात मदत करावी हे आमचे लक्ष्य आहेया संदर्भात HIFU अतिशय उपयुक्त आहेयामुळे आम्ही कॅन्सरवरील उपचारांचा आणखी एक पर्याय उपलब्ध करवून दिला आहेइतकेच नव्हे तरआमच्या रुग्णांना उपचारांमधून मिळणारा चांगला आणि सहज अनुभव देखील वाढला आहेआमच्या रुग्णांना सर्वात जास्त प्रगत  प्रभावी उपचार पुरवण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आघाडीवर आहे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.”

कॉलेज रायव्हल्स येतेय पुण्यात,एका थरारक गेमिंग एक्स्ट्रागान्झासाठी तयार व्हा!

पुणे, 15 डिसेंबर 2023 : एस्पोर्ट्स उद्योगातील अग्रगण्य कंपनी असलेल्या अॅम्पवर्स डीएमआय आता संपूर्ण भारत दौर्‍याच्या पुढे चालू ठेवत आता बहुप्रतीक्षित ‘कॉलेज रायव्हल्स’ स्पर्धा पुण्यात आणण्याच्या तयारीत आहे. गेमिंग समुदायाच्या मनामनात आधीच घर केलेला हा कार्यक्रम आता आपल्या नाविन्यपूर्ण गेमिंग ट्रकसह पुण्याच्या प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूमधील विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांकडून प्रचंड उत्साह, सोशल मीडियावर स्पर्धेची स्थिर उपस्थिती, त्याच्या वेगाने वाढणाऱ्या लोकप्रियतेचा पुरावा आहे.

‘कॉलेज रायव्हल्स’ स्पर्धा भारतातील शैक्षणिक संस्थांमधील भरभराट होत असलेल्या गेमिंग समुदायाशी सक्रियपणे संपर्क साधून एस्पोर्ट्स प्रतिभेचे पालनपोषण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर भर देते. एस्पोर्ट्स खेळाडूंची खरी गेमिंग क्षमता अनलॉक करणार्‍या उत्साहवर्धक अनुभुतीची हमी देणारी एक अत्यंत अपेक्षित स्पर्धा शहरात येऊ घातली आहे. या विलक्षण प्रवासात सहभागी होण्यासाठी ‘कॉलेज रायव्हल्स’मध्ये शहराच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी आणि गेमर्सचे स्वागत आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूसारख्या शहरांसह ८५००+ किलोमीटरचा प्रवास करून, ‘कॉलेज रायव्हल्स’चा मोबाईल गेमिंग ट्रक आता पुण्यात दाखल झाला आहे. येथे, ते खेळाडूंच्या निवडीवर देखरेख करेल आणि गेमिंगचा अभूतपूर्व अनुभव देईल. यात सहभागी होणारे प्रखर एस्पोर्ट्सच्या जगात, प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात आणि इन्फ्ल्युअर्सशी संवाद साधत, डायनॅमिक लाइव्ह डीजे परफॉर्मन्सचा आनंद घेत आणि करमणुकीच्या जगात तल्लीन होतील.

बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BGMI), काउंटर-स्ट्राइक, फिफा २०२३, रोड टू व्हेलोर : एम्पायर्स, व्हेलोरंट आणि टेकन७ अशा सहा वेगवेगळ्या श्रेणीत गेम्ससाठी संपूर्ण भारतातील विद्यार्थी नोंदणी करत आहेत. आजपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही चॅनेलद्वारे ६३ हजारांहून अधिक नोंदणी झाली आहे. कॉलेज रायव्हल्स तरुणांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वीपणे यशस्वी झाले आहेत. पुण्यात होणारी कॉलेज रायव्हल्स ही स्पर्धा म्हणजे स्पर्धात्मक गेमिंग आणि महाविद्यालयांमध्ये एकता वाढवण्याच्या अॅम्पवर्स डीएमआयच्या ध्येयातील नवीन अध्यायाचे प्रतीक आहे.विद्यार्थीच्या. पुढे, विद्यार्थ्यांना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP), सिंहगड इन्स्टिट्यूट, अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे इंटरएक्टिव्ह गेम्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, यापुढे संगीताचा आनंद लुटता येईल. 

अॅम्पवर्सचे भारतातील प्रमुख अश्विन हरयानी म्हणाले की“पुण्यामध्ये कॉलेज रायव्हल्सचे लाँचिंग ही भारतातील महाविद्यालयांमधील गेमिंग समुदायाला सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये आम्ही जो उत्साह पाहिला तो खरोखरच प्रेरणादायी आहे आणि आता, आम्ही पुण्यात पाऊल ठेवत असताना, आम्ही गेमिंगचा उत्साह आणखी वाढवण्यास तयार आहोत. आम्ही स्पर्धात्मक गेमिंगच्या क्षेत्रात एक रोमांचक प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहोत.”

एसआरएच्या सदनिका विकण्याची मुदत मर्यादा कमी केली -गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंचा झोपडी बढावो कार्यक्रम ?

0

नागपूर, दि. 15- झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास दहा वर्षे कालावधीपर्यंत मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तथापि ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री योगेश सागर, राम कदम, रवींद्र वायकर, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ. भारती लव्हेकर यांनी सहभाग घेतला.

एसआरएच्या प्रकल्पांसंदर्भात उपस्थित विविध मुद्यावर उत्तर देताना मंत्री श्री. सावे म्हणाले की, एसआरएच्या इमारती दर्जेदार असाव्यात यासाठी त्या विक्रीकरिता उपलब्ध इमारतींसारख्याच असाव्यात अशी अट घालण्यात येईल.  जो विकासक प्रकल्प पूर्ण करणार नसेल अथवा भाडे देत नसेल, त्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. एसआरएच्या सदनिकांमध्ये राहणाऱ्या अनधिकृत व्यक्तींविरूद्ध कारवाई करण्यासंदर्भात मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या 86,429 सदनिकांच्या सर्वेक्षणामध्ये 10,983 सदनिकांमध्ये अनधिकृत रहिवासी आढळून आले आहेत. तर, उच्च न्यायालयातील याचिकेपूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये 2581 अनधिकृत रहिवासी आढळून आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये निष्कासनाची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती, ही श्री.सावे यांनी दिली.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा १२६ वा दत्त जयंती सोहळा रविवारपासून 

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन ; लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राच्या सामुदायिक पठणाने होणार उत्सवाला प्रारंभ

पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रम दिनांक १७ ते २६ डिसेंबर दरम्यान मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे उपस्थित होते. उत्सवाची सुरुवात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण दत्तभक्त करणार आहेत. कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि प.पू. नाना महाराज तराणेकर प्रणीत अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदोर तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन दत्तमंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे रविवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी हे सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. तर, अध्यक्षस्थानी अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदोरचे प.पू. बाबा महाराज तराणेकर असणार आहेत. रविवारी सायंकाळी ५ वाजता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. लोकसभेच्या १६ व्या अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रा महाजन, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी भालेराव यांना प्रदान करण्यात येणार आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती, रुपये २५ हजार रोख, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. याशिवाय प.पू. बाबामहाराज तराणेकर यांचा मानपत्र व आचार्य पगडी देऊन विशेष गौरव केला जाईल. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल डॉ.पराग काळकर यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच रविवारी, सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत तर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी पं. गजानन वाईकर लिखित गुरुचरित्र प्रकाशन श्री दत्त कलामंच येथे सायंकाळी ६.३० वाजता होईल. यावेळी वासुदेव निवासाचे प्रधान विश्वस्त  डॉ.शरद जोशी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे उपस्थित राहणार आहेत. शनिवार, दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री दत्त कलामंच येथे विद्यार्थी अर्थसहाय्य प्रदान कार्यक्रम होणार आहे. यावेळी गरजू विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत देण्यात येणार असून धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, डी.वाय.पाटील ग्रुप कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत लघुरुद्र होणार असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने व संगीता रासने हे यजमान असणार आहेत. यावेळी १०१ महिला पारंपरिक वेशात रुद्रपठण करणार आहेत, तर केशव शंखनाद पथकातर्फे शंखनाद देखील होईल. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता श्री दत्त कलामंच येथे गुरुदत्त दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडेल. यावेळी ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार व माजी उपमहापौर दीपक मानकर उपस्थित राहणार आहेत. उत्सवांतर्गत मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे दिनांक १७ ते २६ डिसेंबर दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत भजन आणि सायंकाळी ५ ते १० यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय आंतरशालेय, महाविदयालयीन ५ वा जाधवर विज्ञान महोत्सव 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय : जानेवारी २०२४ मध्ये आयोजन
पुणे : प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘पाचव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी न-हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवामधील स्पर्धा शालेय (इयत्ता ८ वी ते १० वी) , कनिष्ठ (इयत्ता ११ वी व १२ वी), वरिष्ठ महाविद्यालय  (पदविका शिक्षण) आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटात होणार आहे. सायन्स सोसायटी आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत पॉल्युशन कंट्रोल, फ्री एनर्जी जनरेशन, वेस्ट टू वेल्थ, झिरो गारबेज सिस्टिम, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, डिझास्टर मॅनेजमेंट, पर्यावरणाच्या समस्या व उपाय, टेक्नॉलॉजी इन बायो मेडिकल एरिया, रोबोटिक्स, इनोव्हेशन स्किल इन हेल्थ, विशेष व्यक्तींसाठी तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी इन इंडस्ट्री अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहेत. 
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिवल’ या  राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी हा एक अभिनव व आदर्श उपक्रम असणार आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळणार आहे. विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख ४ जानेवारी असून गटाप्रमाणे अनुक्रमे ७७९८१०११२२, ९३२५३०८११३, ७९७२४८३५७५, ९०६७९०९०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
* संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती
भारताबाहेरील इतर देशांमध्ये संशोधन करुन पेटंट मिळविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये संशोधन व पेटंटचे प्रमाण कमी असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटने अभिनव योजना सुरु केली आहे. इन्स्टिटयूटमधील संशोधन करणा-या विद्यार्थ्याला विनातारण १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची गोडी निर्माण होत अधिकाधिक संशोधनास युवावर्ग प्रवृत्त होईल, असे अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी सांगितले.

बँक खाते हॅक करून १६ हजार १८० कोटी रुपयांचा व्यवहार:वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २६० पेक्षा जास्त बँक खाती उघडून गंडा: एस.आय.टी.ला ३ महिन्यात तपास पूर्ण करण्याचे आदेश

0

नागपूरदि. १५ : ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये असलेल्या पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या एका कंपनीचे बँक खाते हॅक करून १६ हजार १८० कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २६० पेक्षा जास्त बँक खाती उघडून करण्यात आला आहे. यासाठी ९७ बनावट नोटराईज्ड करारनामे करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण डिजिटल हवाला प्लॅटफॉर्मसारखे असल्याने या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (स्पेशल इनव्हेंस्टीगेटिंग टीम) स्थापन करून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाची व्याप्ती राष्ट्रीय स्तरावर असल्याने याबाबत बँक खात्यांचा संपूर्ण  तपास करण्यासाठी गरज पडल्यास केंद्रीय तपास संस्था, विविध राज्यांची मदत घेण्यात येईल. यामध्ये कुठल्याही बँकेचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यास बँकेवर कारवाई करण्यात येईल. बँकांनी ग्राहकांची ओळख पडताळून पाहणे संदर्भातील (के.वाय.सी.) नियम सक्तीने पाळले पाहिजे. व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला एस.आय.टी. ला पहिल्या टप्प्यात तीन महिने कालावधी देण्यात येईल. तसेच सबंधित सर्व खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात येतील.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, अशा गुन्ह्यांवर नियत्रंण आणणे, अशा प्रकरणात तपास सुकर करण्यासाठी राज्याच्या सायबर सेलची क्षमतावृध्दी करण्यासाठी महाराष्ट्र सायबर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातून जलद प्रतिसाद यंत्रणा उभारण्यात येणार आहे. वांद्रे (पश्चिम) येथील सायबर पोलीस स्टेशनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून उद्घाटनाची कार्यवाही करण्यात येईल.  प्रत्येकांची  वैयक्तिक माहिती सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकार ‘डेटा प्रोटेक्शन’ कायदा आणत आहे. त्यामध्ये ‘डेटा लिकेज’ होण्याबाबतची सर्व शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. हा सर्वंकष असा कायदा आहे. आधार कार्डची माहिती अद्ययावत आणि पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने आधार पडताळणी मोहीम सुरू केली आहे. डेटा लिकेजबाबत राज्यातही गरज असल्यास तपासून अशी यंत्रणा उभारण्यात येईल.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य रवींद्र वायकर, योगेश सागर, कॅप्टन सेल्वन, आशिष शेलार, आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला.

डॉ.अरविंद लाभशेटवार यांना पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार  जाहीर 

पुणे :
पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.अरविंद लाभशेटवार यांना जाहीर झाला असून पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीच्या १६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल शेरेटन ग्रँड येथे होणाऱ्या १६ व्या  वार्षिक परिषदेत हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर तसेच डॉ.संतोष होनावार,डॉ.संतोष अगरवाल यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. डॉ.अरविंद लाभशेटवार हे गेली ४५ वर्षे नेत्रशल्य चिकित्सा क्षेत्रात कार्यरत आहेत. बी.जे. मेडिकल कॉलेज (ससून हॉस्पिटल)चे  अधिष्ठाता म्हणून तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ (नांदेड) मध्ये  वेगवेगळ्या पदांवर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ३५ हजारहुन अधिक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या आहेत. त्यात मोतीबिंदू तसेच  बुबळ नेत्ररोपण शस्त्रक्रियांचा समावेश आहे. 
पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मंदार परांजपे,सचिव डॉ. सागर वर्धमाने,खजिनदार डॉ.पंकज बेंडाळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. डॉ.अरविंद लाभशेटवार यांनी पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्षपदाची जबाबदारीही यापूर्वी सांभाळली असून अनेक राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यात ‘असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल असेम्ब्ली कम्युनिटी ऑफ्थल्मॉलॉजि’ च्या  प्रोफेसर ईश्वरचंद्र मेमोरियल बेस्ट टीचर इन ऑफ्थल्मॉलॉजी अवॉर्ड चा समावेश आहे . 

राष्ट्रीय मोटो क्रॉस स्पर्धेत महाराष्ट्र प्रथमपुण्याच्या २३ वर्षीय ऋग्वेद बारगुजे ची कामगिरी :  सलग दुसऱ्यांदा पटकाविले विजेतेपद

पुणे : तब्बल वीस वर्षानंतर सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय मोटो क्रॉस स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकाविले आहे. मैसूर येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये पुण्याच्या २३ वर्षीय ऋग्वेद बारगुजे याला सलग दुसऱ्यांदा बेस्ट रायडर व राष्ट्रीय चॅम्पियनशिप हा किताब देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी ऋग्वेदचे वडील आणि आंतरराष्ट्रीय मोटो क्रॉस विजेते ज्ञानेश्वर बारगुजे यांनी मार्गदर्शन केले. गॉडस्पीड चे शाम कोठारी, प्रायोजक एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपर क्रॉस चॅम्पियनशिप, मुख्य प्रायोजक संरक्षक टीव्हीएस रेसिंग आणि एम एक्स स्टोअर एफएक्सआर यांचे सहकार्य ऋग्वेदला मिळाले.

या राष्ट्रीय स्पर्धेसाठी टीव्हीएस कारखान्यात सराव करताना ऋग्वेदचा उजव्या हाताचा अंगठा निखळला होता. परंतु वेदनाशामक औषध घेऊन त्याने ही शर्यत जिंकली.

स्पर्धेमध्ये एकूण सहा फेऱ्या झाल्या. कोइंबतूर, वडोदरा, नाशिक, बेंगलोर, मंगळूर, मैसूर या ठिकाणी या फेऱ्या झाल्या. या सर्व फेऱ्यांमध्ये ऋग्वेद अव्वल ठरला.

मागील वर्षी कोइंबतूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ऋग्वेद अव्वल ठरला होता. त्यानंतर यावर्षीही त्यांनी सर्वोत्तम रायडरचा मान मिळवला.

ऋग्वेद बारगुजेने २०१२ पासून रेसिंग ला सुरुवात केली. तो पहिल्याच शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला, हे बक्षीस त्याचा आत्मविश्वास उंचावणारे आणि पुढील दिशा निश्चित करणारे ठरले. यानंतर ऋग्वेदने सरावावर भर दिला. तो श्रीलंका ज्युनिअर चॅम्पियनशिप आणि इंडियन ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सहभागी झाला, यात त्याने बाजी मारली. येथेच त्याच्या कारकिर्दीने वेग पकडला. २०१६ मध्ये ऋग्वेद एस एक्स टू प्रकारात एमआरएफ प्रायव्हेट फॉरेन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला. यात ही त्याने विजेतेपद पटकावले. यानंतर २०१७ मध्ये त्यांनी एस एक्स वन डर्ट ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला, यातही तो करंडक पटकावून मायदेशी परतला. २०१८ मध्ये त्याच्या प्रगतीचा आलेख चढता असताना त्याच्या कारकीर्दीला अपघातामुळे ब्रेक लागला यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे रेसिंग पासून तो दोन वर्षे बाजूला पडला. अखेर २०२२ मध्ये त्याने एमआरएफ एसएक्स वन इंडियन नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये बाजी मारली. त्याच्या या यशामुळे तब्बल २१ वर्षानंतर या शर्यतीत महाराष्ट्राला जेतेपद मिळाले होते.

वैशाली हॉटेल फसवणूक प्रकरण : बँक अधिकाऱ्यांसह आरोपी पतीचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे, प्रतिनिधी: हॉटेल वैशालीचे मूळ मालक जगन्नाथ शेट्टी यांची मुलगी आणि वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांच्या नावे  बनावट सह्या, कोरे धनादेश आणि कागदपत्रांच्या आधारे तब्बल पाच कोटी रुपयांचे कर्ज काढून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी पतीसह बँक अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने  फेटाळून लावला आहे. फिर्यादी यांच्यावतीने ॲड. निखिल मालाणी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने या तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांच्या न्यायालयात या जामिन अर्जाची सुनावणी झाली. त्यामुळे आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

वैशाली हॉटेलच्या मालकिन निकिता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती विश्वजीत विनायक जाधव (वय ४१) यांच्यासह कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ७ डिसेंबर २०२२ रोजी फर्ग्युसन रस्त्यावरील निकिता यांच्या नावावर असणाऱ्या “निकीता हॉस्पिटॅलिटी एलएलपी” या फर्मच्या ऑफीसमध्ये बसुन त्यांचे पती विश्वजीत जाधव यांनी कोटक महिंद्रा बँकेतील अधिकारी राजेश चौधरी, डीएसए रवि परदेशी यांच्या मदतीने संगनमत करुन परस्पर त्यांच्या नावावर ५ कोटीचे कर्ज घेतले. यासाठी त्यांच्या को-या चेकचा वापर करुन स्वतः च्या नावावर ट्रान्स्फर  करुन अपहार केला होता. या कर्ज प्रक्रियेसाठी फिर्यादी मालकीचा फ्लॅट परवानगीशिवाय तारण ठेऊन त्या बदल्यात कर्ज देखील घेतले.

न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळताना निरीक्षण नोंदवले की,  निकिता यांनी कोटक महिंद्रा बँकेतुन कर्जासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांची प्रत्यक्षात पाहणी केली. कर्जाच्या अर्जावर त्यांची सही नसुन अर्धवट माहिती भरल्याचे समोर आले. या कर्ज प्रकरणामध्ये कोटक महिंद्रा बँकेचे कोणीही अधिकारी अथवा बँकेने नेमलेल्या एजंटनी त्यांची चौकशी केली नाही. या  कर्जप्रकरणातील कागदपत्रावर त्यांची स्वाक्षरी नव्हती. कोणत्याही प्रकारची पडताळणी करण्यात आली नाही. मुलाखत देखील घेतली नाही अगर शहानिशा केली नाही. कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. हे कर्ज प्रकरणाच्या अर्जावर ‘निकीता हॉस्पिटॅलिटी एलएलपी’चा बनावट शिक्का मारण्यात आल्याचे निदर्शनास आले. बँक मॅनेजरने त्याच्या अर्जात उल्लेख केलेला की मी निकिता यांना कर्ज प्रकरणावेळी एकदाही भेटलो नाही, त्यांच्याच पतीने सर्व गोष्टींची पूर्तता केली. त्यामुळे या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे कर्जदाराची मुलाखत न घेताच कर्ज कशे दिले गेले? यावर प्रश्न उभे राहते. विश्वजितच्या इतर गुन्ह्यातील आरोपी वकील इरफान शेख यांनी मोदिबाग को-ऑप हौसिंग सोसायटीचा ना-हरकत दाखला घेताना निकिता यांच्या बनावट सह्या केल्या तसेच लोन अर्जावर ह्या सह्या निकिताच्याच आहेत हे भासविण्यासाठी ऍक्सिस बँकेचे एक बनावट पत्र देखील आरोपींनी कोटक महिंद्रा बँकेत सादर केले. मात्र या ऍक्सिस बँकेच्या पत्रावर कोणत्याही शाखेचा किंवा शाखा व्यवस्थापकाचे नाव अथवा शिक्का नमूद नव्हता.

कर्ज घेतल्याची रकमेचा एसएमस निकिताच्या मोबाईल नंबरवर आलाच नाही कारण आरोपीने कर्ज घेतेवेळी वेगळाच मोबाईल नंबर बँकेत नोंदवला होता. तसेच विश्वजीत यांनी त्यांच्या ॲक्सीस बँकेच्या प्रभात रोड शाखेवर आरटीजीएसद्वारे निकिता यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या सहीने वळती करुन घेतले. यावरून आरोपींचा उद्देश हा फसवणूक करण्याचा होता हे दिसून येते. कर्ज घेतलेले पाच कोटी रुपये हे विश्वजित याने बँकेत फिक्स डिपॉजिट करून ठेवलेले होते त्यामुळे आरोपींकडून निकिता यांचे पैसे व मालमत्ता हडपण्याचा उद्देश होता हे सिद्ध होते. फिर्यादी यांना माहिती न देता आरोपीने बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांचा फ्लॅट तारण ठेवत कर्ज मंजूर करून घेतले त्यामुळे अधिक चौकशी कामी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

सदर प्रकरणी ए. पी.आय. स्वप्नील नेवसे, आर्थिक गुन्हे शाखा, सरकारी वकील ॲड. प्रेमकुमार अगरवाल तर मूळ फिर्यादी यांचे वतीने ॲड. निखिल अनिल मालाणी व ॲड. उज्वला पवार यांनी काम पाहिले.

हिरे हायस्कूल मध्ये पुण्यातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स लायब्ररी

आदर्श मित्र मंडळचे उदय जगताप यांची संकल्पना आदर्श मित्र मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड यांच्या संयुक्त विद्यमाने लायब्ररी
पुणे : महाराष्ट्रातील व पुण्यातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बुक लायब्ररी आणि इ लायब्ररी कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल मध्ये तयार करण्यात आली आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लायब्ररीचे उद्घाटन शाळेतील विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आदर्श मित्र मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड यांच्या संयुक्त विद्यमाने ही लायब्ररी तयार करण्यात आली आहे.

या लायब्ररीच्या उद्धाटनप्रसंदी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचे सचिव अजय पाटील, हिरे हायस्कूलचे मुख्यधापक अजित माने, रोटरी क्लब ऑफ  वेस्ट एंडच्या सुनिता चांदवणकर,उदय कुलकर्णी, रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर, आदर्श मित्र मंडळचे अध्यक्ष उदय जगताप उपस्थित होते.

उदय जगताप म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होत आहे. याची माहिती शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही होणे गरजेचे आहे.जगातील चालू घडामोडी विद्यार्थ्यांना माहीत असायला हव्यात. यासाठी या लायब्ररीची सुरुवात करण्यात आली.
तंत्रज्ञानामुळे अनेक बदल घडत आहेत, अनेक क्षेत्रात त्याचा चांगला प्रभाव देखील पडत आहे. याबद्दल माहिती असणे ही काळाची गरज आहे. या लायब्ररीमध्ये एआय अभ्यासक डॉ. अमेय पांगारकर, एआय तज्ञ डॉ. भूषण केळकर यांचे मार्गदर्शन असणार आहे.

गौतम अदानी भाजपचे जावई त्यांना मुंबई गिळायची:खासदार संजय राऊतांचा आरोप

नवी दिल्ली- खासदार संजय राऊत यांनी गौतम अदानी हे भाजपचे उद्योगपती जावई आहेत. आणि भाजपच्या या जावयाला मुंबई गिळायची आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला. असे असले तरी त्यांना तसे करु देणार नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्या शनिवारी 16 डिसेंबर रोजी धारावी बचाव मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

धारावी विकास प्रकल्पावरुन संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. धारावीच्या बचावासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा मोर्चा फक्त धारावीसाठी नाही तर मुंबईकरांसाठी असल्याचेही ते म्हणाले. मुंबईवर आणि इतर सगळ्यांवर ताबा मिळवण्यासाठी भाजपचे काम सुरु आहे. देशाच्या उद्योगपती जावयांना मुंबई गिळायची आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. धारावी बचाव मोर्चा होणारच आहे. या मोर्चात मुंबईकर उपस्थित राहतील असा विश्वास देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने जागावाटप झाले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उत्तम समन्वय असल्याची माहितीही त्यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही बोलणे शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग देशासाठी महत्वाचा असल्याचेही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात 40 प्लस जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष डमरू वाजवत बसले
राज्याचे दोन उपमुख्यमंत्री कशा करता दिल्लीत येत आहेत माहीत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत. बहुतेक संसदेची सुरक्षा पाहायला येत असतील. बेरोजगारी महागाईचा मुद्दा आहे. कांदा इथेनॉल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहेत. राज्यातील सरकार अस्थिर असल्याचा दावाही त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांचे सरकार घटनाबाह्य असून न्यायालयात तारखा पडून घेतल्या जात असल्याचे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर डमरू वाजवत बसले आहेत. एक फुल दोन हाफ सरकार… दिल्लीत येऊन काय करणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदार अपात्रतेच्या निर्णयाची मुदत 30 डिसेंबरऐवजी वाढवून देण्याची मागणी विधिमंडळाने न्यायालयात केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. विधानसभा अध्यक्ष डमरू वाजवत बसले असल्याचे ते म्हणाले.

आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ:सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिलासा

0

नवी दिल्ली-शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्ररकणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात राहुल नार्वेकर यांनी याचिकेत तीन आठवडे वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने केवळ 10 दिवसांचा वेळ दिला. त्यामुळे आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अधिवेशन सुरु असतानाही सुनावणी सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निकाल द्यावा लागणार होता. तसे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात दोन लाख पानांचे कागदपत्रे तयार असून सहा निकाल लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या 34 याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे विविध सहा निकाल लागणार असल्याचे समजते आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही 20 डिसेंबर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच या संदर्भात विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा कालावधी मागितला गेला होता. त्याला आता 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

सध्या विधानसभेत शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी सुरु आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत निकालाचे लेखन अशक्य होते. मात्र निकालाचे लेखन करण्यासाठी अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे. एक हजारांहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे वाचन करण्याचे आवाहन विधीमंडळासमोर आहे. नागपूरवरून मुंबईत कागदपत्रे नेण्यासाठी देखील वेळ लागणार आहे. त्यामुळे सहा निकाल लावण्यासाठी अधिकच्या वेळेची मागणी करण्यात आली होती.

विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांची वेळ मागितली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विधीमंडळाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यात सातत्याने सकाळ आणि संध्याकाळी जवळपास दररोज सात तास सुनावणी घेऊन साक्ष पूर्ण करण्यात आल्या आहेत. आता पुढील कार्यवाही पूर्ण करून हे प्रकरण निकालासाठी बंद करण्याचे मी प्रस्तावित केले आहे. त्या अनुषंगाने सर्वांच्या सहकार्याने 20 तारखेपर्यंत हे कार्य पूर्ण करायचा माझा प्रयत्न असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. मात्र, नार्वेकरांना केवळ 10 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.