Home Blog Page 1309

आता मुंबई प्रदुषणमुक्त व खड्डेमुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

स्वच्छता मोहीमेत मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी

मुंबई दि. १७: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ व हरित करण्याचा ध्यास घेत आता मुंबई खड्डेमुक्तही असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) अंतर्गत, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या‍ चार परिमंडळातील चार प्रशासकीय विभागामध्ये (वॉर्ड)  स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले.यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, खासदार राहुल शेवाळे, आमदार राम कदम, आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्ति आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.

एन विभागातील अमृत नगर सर्कल येथून सकाळीच या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला. स्वच्छता करण्यासाठीचे ग्लोव्हज हातात घालून मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. अमृतनगर सर्कल येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर एन विभागातील कामराज नगर व घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालय परिसरात मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. एम पश्चिम विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, टिळक नगर, भैरवनाथ मंदीर मार्ग, एफ उत्‍तर विभागातील भैरवनाथ मंदीर मार्ग, येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ घेण्यात आली.

विविध अत्याधुनिक संयंत्राच्या सहाय्याने स्व‍च्छता

अतिरिक्त मनुष्यबळासह विविध संयंत्राच्या सहाय्याने वॉर्डतील कानाकोपऱ्यांची स्व‍च्छता करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह मुंबईकर नागरिकांनी देखील या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग  घेतला.

प्रदुषण आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छता मोहीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई शहरांतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी ही स्वच्छता मोहीम प्रामुख्याने हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता अभियानासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही मोहीम नक्कीच उपयुक्त ठरेल. याचा सकारात्मक परिणाम निश्चितच जाणवेल. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून या मोहिमेत लोकसहभाग वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्यादृष्टीने मुंबई आपल्याला स्वच्छ, सुंदर व हरित ठेवलीच पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविणार

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘आपला दवाखाना’ ची संख्या वाढविण्यात येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत असून त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन स्वच्छता मोहीमेच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राजावाडी रुग्णालयाची क्षमता वाढविण्याचा मानस

राजावाडी रुग्णालय मुंबईकरांठी महत्त्वाचे आहे. या रुग्णालयाची क्षमता १००० बेडपर्यंत वाढविण्याचा मानस असून अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. हॉस्पिटलमधील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ संकल्पना लागू करा

रुग्णालयात असताना नागरिकांना औषधे बाहेरुन आणावी लागू नयेत यासाठी ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ संकल्पना लागू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

स्वच्छता अभियान बनले लोकचळवळ

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सुरू असलेली स्वच्छतेची ही चळवळ फक्त महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न राहता ही लोकचळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकराचा सहभाग यात आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’

मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची कौतुकाची थाप सफाई कर्मचाऱ्यांना देत त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम घेणार

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वच्छता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे  परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकांनाही यामुळे परिसर स्वच्छ राखण्याची सवय अंगवळणी पडते.  लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे, ही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम घेण्यात येणार असून स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे.

यामध्ये रस्ते,नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे श्री. शिंदे म्हणाले. मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण  वापरत नाही , तर  रिसायकलींग केलेले पाणी वापरतो. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो. रस्ते,  गटर,  नाल्या सार्वजनिक शौचालये  स्वच्छ होत आहे. झोपडपट्टी सुधार योजनेचा  देखील यात समावेश केला असुन आतमधील  तुटलेले, फुटलेले रस्ते,  फुटपाथ, खराब शौचालये  तातडीने दुरुस्त करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत.

या मोहिमेत लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था–संघटना मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या.

मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेटचाआनंद-टिळकनगर येथील मैदानावर खेळाडूंशी संवाद साधत स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. टिळकनगर मैदान येथे मुले क्रिकेट खेळत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनाही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. बॅटिंग करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

ठाण्यात मुलीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हेगाराला बेड्या ठोका – अतुल लोंढे.

0

ठाणे प्रकरणातील गुन्हेगार बड्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्याने दबाव आहे का?

महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या.

MSRDC सेवानिवृत्त अधिका-यांचे पुनर्वसन केंद्र आहे का ?

नागपूर-
ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली आहे. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम व सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते मग एवढे कार्यक्षम नेते गृहमंत्री पदावर असतानाही ठाण्यासारख्या शहरात मुलीला चिरडण्याचा गंभीर प्रकार होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीवर व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. गृहविभाग काय करत आहे ? आणि ठाणे प्रकरणातील गुन्हेगाराला अटक कधी होणार? याचे उत्तर महाराष्ट्राला द्या, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

ठाण्यातील घटनेवर प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भाजपाने एक नवीन प्रशासकीय पॅटर्न आणला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा महत्वाच्या पदावर नियुक्त्या दिला जात आहेत यातून या अधिकाऱ्यांची मुलेही निर्ढावत असल्याचे दिसत आहे. ठाण्यात एका मुलीला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला त्यातील आरोपीचे नाव अश्वजित गायकवाड असून भारतीय जनता युवा मोर्चाचा तो नेता आहे तसेच MSRDC चे वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांचा तो मुलगा आहे. त्या मुलीशी अश्वजितचे प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळत आहे. वडिल प्रशासनात उच्च अधिकारी असल्यानेच अश्विजित गायकवाडला अटक होत नाही का असा प्रश्न लोंढे यांनी विचारला आहे.

भाजपाशी संबंधित लोकांमध्ये महिला अत्याचार तसेच बलात्कारांसारख्ये गंभीर गुन्हे करण्याची हिम्मत येते कोठून? आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत, असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे का? कायदा आपले काही बिघडवू शकत नाही? ‘भाजपा है तो सब मुमकीन है’. अशी भावना त्यांच्यात वाढीस लागल्याचे दिसत आहे. मग ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ चे नारे कशाला देता? महिला सुरक्षेचा ढोल कशाला पिटता ? ठाणे प्रकरणातील गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला बेड्या ठोका व पीडित मुलीला न्याय द्या, असे अतुल लोंढे म्हणाले.

पॅरा खेलो इंडिया स्पर्धा:महाराष्ट्राला पदार्पणातल्या स्पर्धेत पाचवे स्थान

0
  • अखेरच्या दिवशी टेबल टेनिसमध्ये दोन सुवर्ण
  • नेमबाजीत महाराष्ट्राला उपविजेतेपद

नवी दिल्ली – केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि साई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने १२ सुवर्ण, ७ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह पाचवे स्थान मिळविले.

स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदकांची कमाई करून दिली. महिला विभागात पृथ्वी बर्वेला रौप्यपदकाची मानकरी ठरली. नेमबाजीत महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले.

स्पर्धेत हरियाना ४० सुवर्ण, ३९ रौप्य आणि २६ कांस्य अशा १०५ पदकांसह आघाडीवर राहिले. उत्तर प्रदेशने (२५, २३ १४) अशा ६२, तमिळनाडूने (२०,८, १४) ४२, तर गुजरातने (१५, २२, २०) ५७ पदकांसह अनुक्रमे दुसरे,तिसरे आणि चौथे स्थान पटकावले.
टेबल टेनिसमध्ये दत्तप्रसाद, विश्वला सुवर्ण
टेबल टेनिस प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तरप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. पृथ्वी बर्वेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या क्लास ९ प्रकारात दत्तप्रसदाने हरियानाच्या रविंदर यादवचे तगडे आव्हान ११-३, ११-८, ९-११, १२-१० असे परतवून लावले. क्लास १० प्रकारात विश्वने तेलंगणाच्या हितेश दलवाणीचा कडव्या संघर्षानंतर पाच गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत ११-७, ६-११, १३-११, १६-१८, ११-८ असा पराभव केला. दोन गेमची बरोबरी झाल्यावर निर्णायक पाचव्या गेमला विश्वने कमालीच्या एकाग्रतेने खेळ करताना एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले.
महिलांच्या क्लास ९-१० प्रकारात पृथ्वीला तमिळनाडूच्या बेबी सहानाचा प्रतिकार करता आला नाही. बेबीने सरळ तीन गेममध्ये ११-३, ११-६ आणि ११-३ असा विजय मिळविला.

नेमबाजीत महाराष्ट्र उपविजेते
नेमबाजी क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने पदार्पणातच उपविजेतेपदाचा मान मिळविला. स्वरुप उन्हाळकर आणि वैभवराजे रणदिवे यांच्या महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा होता. कोल्हापूरच्या स्वरुपने पुरुषांच्या १० मीटर एअकर रायफल एसएच १ प्रकारात सुवर्ण, तर वैभवने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात एसएच १ प्रकारातच कांस्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्याया यशाबद्दल प्रशिक्षक अनुराधा खुडे यांनी समाधान व्यक्त केले.

कामगिरी कौतुकास्पद
प्रत्यके खेळाडूने घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळू शकले, असे खुडे म्हणाल्या. स्वरुपने आपला आंतरराष्ट्रीय अनुभव पणाला लावला. वैभवनेही अचूक कामगिरी करताना कांस्यपदकाला गवसणी घातली. पदार्पणाच्या स्पर्धेत नेमबाजांनी केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही खुडे म्हणाल्या.

महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक – दिवसे
पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी उपलब्ध वेळेत जबरदस्त सराव करून महाराष्ट्राला स्पर्धेत पाचवे स्थान मिळवून दिले. खेळाडूंची कामगिरी निश्चित कौतुकास्पद असून, भविष्यात हे खेळाडू देखिल आदर्श म्हणून उभे राहतील यात शंका नाही. ॲथलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजी, टेबल टेनिस आणि पॉवर लिफ्टिंग प्रकारात सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन, अशा शब्दात राज्याचे क्रीडा संचालक सुहास दिवसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

खेळाडूंचा अभिमान वाटतो – संजय बनसोडे
पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत यश मिळविणाऱ्या आणि सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूचा अभिमान वाटतो. त्यांच्या कामगिरीने महाराष्ट्राचा गौरव उंचावला आहे. भविष्यात या कामगिरीत निश्चित प्रगती होईल. या वेळी महाराष्ट्राने सहभाग घेतलेल्या सर्व क्रीडा प्रकारात किमान एक तरी पदक मिळविले आहे. सर्व खेळाडूंचे अभिनंदन अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

होस्टेल,पेईंगगेस्ट मिळकतींना सवलती देण्याऐवजी दुप्पट कर म्हणजे सामान्यांचा आर्थिक छळवाद :आप कडून उग्र आंदोलनाचा इशारा

पुणे- होस्टेल मध्ये राहणारे,किंवा पेईंगगेस्ट म्हणून राहणारे श्रीमंत नसतात ,अनेक विद्यार्थी आणि नौकरदार जे पुण्यात घर घेऊ शकत नाहीत , लॉजेस मध्ये राहू शकत नाहीत असे सामान्य लोक वसतिगृहंचा आसरा घेतात , पेईंगगेस्ट म्हणून राहतात , अशा मिळकतींना दुप्पट मिळकत कर लावण्याची महापालिका प्रशासनाने घोषणा केली आहे. असा दुप्पट कर लावला तर तो मालक तेथे राहणाऱ्या सामान्य वर्गाच्या मासिक भाड्यात वाढ करूनच वसूल करणार आहे, अशा सामान्य माणसाच्या सोयीसुविधांना सवलती देण्याऐवजी दुप्पट कर लावून वसुलीचा इरादा करणे म्हणजे सामान्यांचा आर्थिक छळवाद आरंभणे होईल असा आरोप करत महापालिकेने आपला इरादा त्वरित बदलावा अन्यथा आप ला उग्र आंदोलन हातही घ्यावे लागेल असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे कि,’पुण्यात शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी मिळकतीत वसतिगृह, कॉट बेसिस, पेईंगगेस्ट सुविधा पुरविणाऱ्यांकडून व्यावसायिक दराने मिळकतकर आकारण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा धोरणात्मक प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे.
हा प्रस्ताव म्हणजे पुण्यात शिक्षण, परीक्षा आणि नोकरी साठी येणाऱ्या लाखो बॅचलर मुलामुलींना मोठा आर्थिक फटका ठरेल. पुणे शिक्षणाचे माहेरघर असून सरकारी परीक्षा तयारीसाठी, शिकण्यासाठी लाखो मुले मुली वर्षभर तर काही तात्पुरत्या काळासाठी कॉट बेसिस, पेईंग गेस्ट, भाडेकरू अश्या स्वरूपात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती अनुरूप घर घेतात. मुलींच्या बाबतीत सुरक्षेचा प्रश्न म्हणूनही मुली एकत्र राहतात. खानावळ खर्च वाचवण्यासाठीसुद्धा पेईंग गेस्ट म्हणून राहतात. तर अनेक जण रोजगार कमविण्यासाठी शहरात एकटे राहतात. यात मजुरांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.
हे सर्वजण मुख्यत्वे अर्थिक दृष्ट्या मध्यम व कनिष्ठ वर्गातील असतात. त्या घराना बिगर निवासी, व्यवसायिक आकारणी केल्यास घरमालक भाडेवाढ करतील व तो बोजा विद्यार्थ्यावर पडेल. बऱ्याचदा कॉलेज ला सुट्ट्या असताना भाडे मिळत नाही. ही सर्व वस्तुस्थिती पाहता या मिळकती बिगर निवासी ठरवून त्यांना व्यवसायिक ठरवणे अयोग्य आहे असे आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

मनपा मध्ये लोकप्रतिनिधी नसताना असा निर्णय प्रशासनाने घेवू नये. तसेच मोठे थकबाकीदार, सवलतीचा फायदा घेणारे मोठे व्यावसायिक, नोंद न झालेले मिळकतदार, सर्व्हिस अपार्टमेंट देणारे हॉटेल व्यवसायिक, मोठी व्यवसायिक वसतिगृह याबाबत कार्यवाही न करता छोट्या मिळकतदारास वेठीस धरू नये अशी मागणी सुदर्शन जगदाळे, अध्यक्ष आप पुणे यांनी केली आहे.

१८ वर्षाच्या WANTED आरोपीवर घरफोड्यांचे गुन्हे दाखल १७ ..

पुणे- महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोड्या करणा-या १८ वर्षीय आरोपीस गुन्हे शाखा युनिट-६ ने अटक केली आहे या आरोपीने एकूण १७ गुन्हे केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि,’हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.१८४२/२०२३ भा.दं. वि. कलम ४५४,४५७,३८० या गुन्हयाचा तपास युनिट-६, मार्फत चालू असताना पो.ना. ७३१७ नितिन मुंढे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हंसराज रणजितसिंग टाक याने केलेला असून तो कॅनॉल रोड, हडपसर, पुणे येथे येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर रजनीश निर्मल, यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने हंजराज ऊर्फ हंसु रणजितसिंग टाक वय १८ वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर, पुणे यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याने केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली. रिमांड मुदतीत त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगून मुद्देमाल काढून देत असले बाबत निवेदन केल्याने त्याचे निवेदना प्रमाणे गेलो असता आरोपीने सोन्याचे दागिनेंची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून एकुण ०६,१०,५००/- रु. किं. चे १११ ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये खालील पो. स्टे कडील गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) हडपसर पोस्टे १८४२/२०२३ भादवि ३८०,४५४,४५७
२) लोणी काळभोर पो.स्टे ५९९/२३ भादंवि ४५४ ३८०
३) लोणी काळभोर पो.स्टे ७३१/२०२३ भादवि ४५४, ४५७,३८०
४) कोंढवा पो.स्टे १२५७/२०२३ भादवि ४५७,३८०
५) कोंढवा पो.स्टे गु.र.नं. १२०५/२०२३ भादवि ४५४,३८०
६) लोणीकंद पो.स्टे ४५९/२०२३ भादवि ४५४ ३८०
७) लोणीकंद पो.स्टे ६५१/२०२३ भादंवि ४५४ ३८०
आरोपीकडे तपास करता तो महाराष्ट्रातील खालील पो.स्टे. चे गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.
१) कोतवाली पो.स्टे. अहमदनगर गु.र.नं. ११७९/२०२३ भा.द.वि.क.३९५,३८०,४५७
२) एम.आय.डी.सी.पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं.७३०/२०२३ भा.द.वि.क. ३९५,३९२,३४ आर्म अॅक्ट ३,४(२५)
३) एम.आय.डी.सी.पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७२२/२०२३ भा.द.वि.क.३८०,४५७ ४) एम.आय.डी.सी.पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७२९/२०२३ भा.द.वि.३५३
५) एम.आय.डी.सी.पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७३२/२०२३ भा.द.वि.क.३७९
६) जेलरोड पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं.३८७/२०२३ भा.द.वि.क.३७९

(७) जेलरोड पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं.३८९/२०२३भा.द.वि.क.३७९
८) फौजदारी चावडी पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ६०५/२०२३ भा.द.वि.क.३७९
९) वळसंग पो.स्टे. सोलापुर ग्रामीण गु.र.नं. ४३९/२०२३ भा.द.वि.क ४५७,३८०
१०) हडपसर पो.स्टे गु.र.नं.१३४५/२०२३ भा.द.वि.क.३९५,३९७,५०४, ५०६ आर्म ऍक्ट ३(२५)
नमूद गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर रजनीश निर्मल, यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शेळके, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

दक्षिण पुण्यात गुन्हेगारीचे साम्राज्य ? आपचा सवाल

आपच्या कार्यकर्त्यावर जीव घेणा हल्ला

पुणे- आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दक्षिण पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधून चिंता व्यक्त करत पुण्याचे दक्षिण प्रवेश द्वार गुन्हेगारीचे द्वार बनू देऊ नका असे आवाहन केले आहे. अवैध धंद्यांच्या समवेत बाल गुन्हेगारीने हा परिसर व्यापला असताना आता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना हि गुन्हेगारीची झळ पोहोचू लागली आहे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यावर वारंवार हल्ले होत असून रविवार सायंकाळी 7:15 वाजता सच्चाईमातानगर ,कात्रज पुष्पादेवी दुगड शाळे शेजारी जागडे पिठाची गिरण शेजारी आप कार्यकर्ते प्रा. ताठे व त्यांच्या कुटुंबीयांवर दहा ते बारा जणांनी जीव घेणा हल्ला केला. त्यात ते व त्यांचे दोनं बंधू हे जबर जखमी झाले होते. तरी त्यांनी जखमी अवस्थेत असताना भारती विद्यापीठ परिसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. मारणारे आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. या अगोदर पण येथील राहिवाश्यांना धमकी तसेच मारण्याचे प्रकार घडले असून भीतीपोटी नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.असे किर्दत यांनी म्हटले आहे .

ते पुढे म्हणाले,’सदर हल्ल्यात त्यांना तसेच त्यांच्या मोठ्या भावाला गंभीर दुखापत झाली असून परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व नागरिकांनी आपली घरे दार बंद करून घेतली होती. तरी गुन्ह्याची फिर्याद भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन धनकवडी येथे देण्यात आली आहे व आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरी आप पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ताठे यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन परिसरातील नागरिकांशी चर्चा केली तसेच पक्ष्याच्या वतीने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना सदरील ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थापण टिकवण्यासाठी तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले आणि परिसरातील बंद असलेली पोलीस चौकी लवकरात लवकर चालू करावी याचे निवेदन परिसरातील जवळपास १०० नागरिकआणि आप पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे , प्रवक्ते मुकुंद किर्दत, निलेश वांजळे, दत्तात्रय कदम, ॲड प्रदीप माने ,ॲड.महादेव कापरे, प्रशांत कांबळे ,सूरेखाताई भोसले, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, सुनीता काळे,योगेश देशमुख, अविनाश पवार , तगदसिंहजी, विशाल डोंबळे, नौशाद अंसारी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे केले उद्घाटन

0

सुरतमधील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी म्हणजे, शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकास कार्यातील महत्त्वपूर्ण झेप: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले.  यावेळी पंतप्रधानांनी नवीन टर्मिनल इमारतीची फिरून प्रत्यक्ष पाहणी देखील केली.

या संदर्भात पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“सुरतमधील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी म्हणजे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकास कार्यातील महत्त्वपूर्ण झेप आहे. या अत्याधुनिक सुविधांमुळे प्रवासाचा आनंद अनुभवतानाच यामुळे  आर्थिक विकास, पर्यटन आणि दळणवळणालाही चालना मिळणार आहे.”

यावेळी पंतप्रधानांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

पार्श्वभूमी

ही नवीन टर्मिनल इमारत गर्दीच्या वेळी 1200 देशांतर्गत प्रवासी आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वर्दळ हाताळण्यासाठी सुसज्ज आहे. या इमारतीची महत्त्वाच्या गर्दीच्या वेळेची क्षमता 3000 प्रवाशांपर्यंत वाढवून वार्षिक हाताळणी क्षमता 55 लाख प्रवाशांपर्यंत नेण्याची तरतूद आहे. ही नवी टर्मिनल बिल्डिंग, सुरत शहराचे प्रवेशद्वार असल्याने, इथली स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन ही इमारत निर्माण करण्यात आली आहे. इमारतीच्या आतील आणि बाहेरील  बाजूला दोन्ही ठिकाणी येथील संस्कृती प्रतिबिंब व्हावी जेणेकरून अभ्यागतांमध्ये या स्थानाविषयी कुतुहलाची भावना निर्माण होईल याकडे लक्ष पुरवण्यात   आले आहे. सुरत शहराच्या रांदेर भागातील जुन्या वास्तूंप्रमाणे पारंपरिक आणि समृध्द  लाकडी कलाकुसर केलेल्या दर्शनी भागापासूनच  नवी सुधारित विमानतळ वास्तू प्रवाशांना संपन्न अनुभव देण्यासाठी सिद्ध करण्यात आली आहे. ‘गृह-चार (GRIHA IV)’ अटींची पूर्तता करणारी नवी विमानतळ वास्तू विविध शाश्वत संतुलित वैशिष्ट्यांनी युक्त आहे. यामध्ये दुहेरी उष्णतारोधक छत, ऊर्जाबचत मंडप, कमीत कमी उष्णता शोषणारी दुहेरी चकचकीत आवरणाची एकके, पर्जन्यजलसंधारण, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे संयंत्र आणि सौर ऊर्जा निर्मिती- अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

छापा काटा:सिनेरिव्ह्यू

निर्माता : सुशीलकुमार अग्रवाल

अभिनेता:मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, तेजस्विनी लोणारी, रीना मधुकर, ऋतुराज फडके, पंकज विष्णु
दिग्दर्शक : संदीप नवरे
लेखन : संदीप नवरे, प्रकाश भागवत
संकलक : मीनल म्हादनाक
छायाचित्रण : गौरव पोंक्षे
प्रकार/शैली: (विनोदी – कौटुंबिक नाट्य )Comedy, Drama
कालावधी:2 Hrs 24 Min

क्रिटिक रेटिंग
३.५/५

मकरंद अनासपुरे म्हणजे पोटभरून हसण्याची १०० टक्की खात्री. त्याच्या कायद्याच बोला, गाढवाचं लग्न, जाऊ तिथं खाऊ, गल्लींत गोंधळ, दिल्लीत मुजरा, गुलदस्ता, दे धक्का, सगळं करून भागलं अशी उलाढाल आपण पाहून मनमुराद हसलो आहोत. अशीच खसखर पिकवणारा त्याचा छापा काटा हा नवाकोरा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. ‘मेलोड्रामा’नं खच्चून भरलेलं कथानक असलेल्या हा धम्माल विनोदी चित्रपट मकरंदच्या टिपिकल पठडीतला असल्याने निखळ मनोरंजन अपेक्षित असलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी ‘छापा काटा’ हा अलीकडच्या मराठी सिनेमांहून काहीसा वेगळा म्हणता येईल. टिपिकल टाळी घेणारी वाक्यं, मिश्किल आणि खुसखुशीत संवाद, तगड्या कलाकारांची जुगलबंदी, मोनोलॉग आणि उत्कंठावर्धक क्लायमॅक्सनंतर होणारं ‘हॅपी एंडिंग’… असा रंगारंग माहोल लेखक – दिग्दर्शक संदीप मनोहर नवरे यांनी पडद्यावर रंगवला आहे. चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखा उठावदार झाल्या असून त्यातील कलाकारांनी आपापली पात्र तन्मयतेनं साकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. पात्रांच्या वर्तनानं पेच निर्माण होतात आणि केवळ वास्तविक दर्शन एवढाच हेतू न ठेवल्यामुळे हा सिनेमा निर्माण झालेल्या पेचांवर आपल्या परीनं उपायही सुचवतो. प्रसंगी पटकथेत तणाव निर्माण करत आणि मेलोड्रामा घडवत लेखक त्यामध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.

सिनेमाचा नायक नामदेव उर्फ नाम्या (मकरंद अनासपुरे) लग्नाचं वय उलटून गेलेला अविवाहित आहे. त्याला तीन लहान बहिणी. वडिलांच्या पश्चात मोठ्या भावाचं कर्तव्य बजावत त्यानं दोन बहिणींच लग्न लावून दिलं आहे. आता घरातील शेंडेफळ असलेल्या अर्चनाचं (रीना मधुकर) लग्न व्हायचं बाकी आहे. तिच्या लग्नासाठीच नाम्या ‘नाटक’ रंगवतो. त्याचं झालंय असं की, प्रेमविवाह करू पाहणाऱ्या अर्चनाच्या होणाऱ्या सासऱ्यांना त्यांची सून ही श्रीमंतांच्या घरची हवी आहे. पण, आपला नाम्या मात्र विविध विमा, स्किम, योजना विकणारा एजंट. गोडीगुलाबीनं तो एकेकाला आपल्या विम्याच्या जाळ्यात ओढत असतो आणि घर चालवत असतो. पाहुण्यांना आपण गर्भश्रीमंत आहोत असं दाखवण्यासाठी नाम्या खोटं नाटक उभं करतो.

दुसरीकडे सिनेमाच्या समांतर ट्रॅकवर आणखी एक ‘नाटक’ सुरू असतं. या नाटकातही नाम्या मध्यवर्ती भूमिकेतच असतो. नाम्या आणि शनायाचं (तेजस्विनी लोणारी) ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ होतं. कारण, शनायाला तिच्या आजोबांची (मोहन जोशी) कोट्यवधी रुपयांची संपत्ती हवी असते. संपत्ती मिळवण्यासाठी तीसुद्धा नाम्यासोबत एक ‘नाटक’ उभं करते. आता सिनेमात एकाच वेळी दोन वेगवेगळी कथानकं असलेली समांतर दुहेरी-नाट्य सुरू असतात. आत हे ‘नाटक’ खरंच सुफळ-संपूर्ण होतं का? याचं उत्तर तुम्हाला सिनेमा बघूनच मिळेल. एकीकडे नाम्याचं गर्भश्रीमंत असल्याचं नाट्य आणि दुसरीकडे शनयाचं संपत्ती बळकावण्याचं नाट्य. दोन्हीकडे बरीच रंजक वळणं येतात. पडद्यावरील कलाकारांची जुगलबंदी लक्ष वेधून घेते. मामाच्या भूमिकेत असलेले विजय पाटकर त्यांच्या शैलीत प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी झाले आहेत.

कथानकातील गोंधळ, घोटाळे आणि लपवाछपवीचा खेळ हे सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. लेखक-दिग्दर्शकानं सिनेमातील प्रत्येक पात्र फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच कलाकारांना आवश्यक तो मोकळेपणाही दिल्याचं जाणवतं. अनेक प्रसंग मजेशीर झाले असल्याने पडद्यावर हे ‘नाट्य’ पाहण्यात मजा येते. विनोदाचं अचूक टायमिंग आणि सेन्स असलेल्या कलाकारांमुळे संपूर्ण सिनेमा मेरी-गो-राऊंडप्रमाणे म्हणजे जत्रेतल्या आकाशपाळण्यासारखा फिरतो. बघण्याच्या टिपिकल कार्यक्रमापासून ते लग्न होण्यापर्यंतच्या घटनांची साखळी दृश्यं प्रेक्षकांना अनुभवता येतात. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका चांगली निभावली आहे. हा सिनेमा मकरंदच्या टिपिकल विनोदी मराठी सिनेमांच्या बाजासारखा आहे. सिनेमा तांत्रिक पातळीवर साधा-सरळ असून या सिनेमाचं शीर्षक ‘छापा काटा’ असं असण्याचं गुपित नाम्याच्या खिशात लपलेलं आहे. पोटभरून हसायला लावणारे हे नाणे हवेत उडवून तुम्ही हा ‘सिनेमा’ पाहायचा की नाही? हे ठरवू शकता.

  • SHARAD LONKAR

अण्णा हजारे 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून ते झोपलेले – भास्कर जाधव

मुंबई-लोकायुक्त विधेयक विधान परिषदेत मंजूर झाले आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. ठाकरे सरकारने लोकायुक्त कायदा करणार असल्याचे सांगितले होते. पण, कायदा केला नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी केली आहे. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत अण्णांना आता ठाकरे दिसले का? असा सवाल उपस्थित केला आहे.दरम्यान भास्कर जाधव पुढे बोलताना म्हणाले की, अण्णा कधी जागे झाले? 2014 साली भाजपाचे सरकार आल्यापासून अण्णा झोपले होते. अण्णांना आता ठाकरे दिसले का? सत्तेवर आता ठाकरे आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी अण्णा हजारेंना विचारला आहे.

या मुद्द्यावरून भास्कर जाधवांनी अण्णा हजारे यांच्यावर पलटवार केला आहे. अण्णा कधी जागे झाले? 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून अण्णा झोपले होते. अण्णांना आता ठाकरे दिसले का? सत्तेवर आता ठाकरे आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी अण्णा हजारे यांना विचारला आहे. आता लोकायुक्त कायदा विधानपरिषदेत मंजूर झाला आहे. हा क्रांतीकारण निर्णय आहे. फक्त नागरिकांना जागे करणे गरजेचे आहे. वेळ पडली तर 88 व्या वर्षी हा कायदा समजवण्यासाठी महाराष्ट्रात फिरेन. भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण केला पाहिजे, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारने लोकायुक्त कायदा करणार असल्याचे सांगितले होते. पण, हा कायदा केला नाही. ठाकरे सरकारला हा कायदा नको होता. देवेंद्र फडणवीसांनी कायदा करण्यास वेळ घेतला. मात्र, कायदा केला, असेही अण्णा हजारे म्हणाले होते. त्यावर भास्कर जाधव यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. फडणवीस प्रत्येक समाजाला खोटे आश्वासन देत आहेत. धनगर समाज, लिंगायत समाज आणि मराठा समाज यांना किती वेळ म्हटलं आमची सत्ता येऊ द्या आम्ही तुम्हाला एका कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. देवेंद्र फडणवीस यांनी असे वक्तव्य अनेकदा केले. पण आजपर्यंत दिले का.? 2014 च्या निवडणुकीत आमचे सरकार आले तर विदर्भ वेगळा करू. त्याशिवाय मी लग्न करणार नाही असे म्हणाले होते. लग्न केलं का त्यांनी की ते बिचारे अजून अविवाहित आहेत. असा टोला भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शेकडो भक्तांचा घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून दत्तचरणी मंत्रघोष

दत्तजयंती उत्सवानिमित्त कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे आयोजन

पुणे : सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. श्रीपाद वल्लभ दिगंबरा…. नर्मदे हर हर… च्या निनादात तसेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. त्याचवेळी दत्तचरणी प्रत्येक भाविक मनोभावे नतमस्तक होत होता.
दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील श्री दत्त कलामंच उत्सव मंडपात करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, इंदौर येथील योगाभ्यानंद माधवनाथ महाराज संस्थानचे विश्वस्त संजय नामजोशी, त्रिपदी परिवार पुणे शाखेचे हरि मुस्तिकर, नागपूर शाखेचे राजीव हिंगवे व मुंबई शाखेचे आण्णा वडनेरकर आदी उपस्थित होते.

तसेच अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे व्यासपीठावर उपस्थित होते. दत्तमंदिर उत्सवाचे यंदा १२६ वे वर्ष असून दत्तजयंती उत्सवाचा प्रारंभ स्तोत्र पठणाने झाला. घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या, समाजातील कष्ट दूर होऊन सुख संपन्नात मिळविण्याकरिता केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामुहिकपणे भाविक एकत्र येतात, हे कौतुकास्पद आहे. श्री दत्त गुरु सगळ्यांना मार्ग दाखवितात. आता देशभरात निवडणूका येत आहेत, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे चांगले असेल तेच होवो, अशी प्रार्थना देखील त्यांनी दत्त महाराजांच्या चरणी केली.

प.पू.बाबा महाराज तराणेकर म्हणाले, मनोजैविक व्याधींकरीता उपचार करणे, हे लोकमंगल स्तोत्राच्या पाठातून सहज शक्य आहे. याचा परिणाम पर्यावरण, माणूस, समाजमनावर होतो. सगळ्या दत्तक्षेत्रांमध्ये या स्तोत्राचे पठण होते. समाज मनाचे आरोग्य आजच्या काळात महत्वाचे आहे. मनाचे आरोग्य स्थिर ठेवण्याकरिता हे स्तोत्र आवश्यक आहे. अनेक भाविक मनोभावे दत्त महाराजांकडे प्रार्थना करतात. आज लोकांचे दु:ख, कष्ट, विवंचना दूर करणारे हे स्तोत्र म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने दत्तमहाराजांना नमन केले आहे.

युवराज गाडवे म्हणाले, घोरात्कष्टात हे लोकमंगल वर्धक स्तोत्र अत्यंत लोकप्रिय असून अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत याचा अंतर्भाव आढळतो. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासक एकत्र यावे आणि सामुहिक उपासना व्हावी, याकरीता स्तोत्र पठण करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड.रजनी उकरंडे यांनी आभार मानले.

उत्सवांतर्गत मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे दिनांक १७ ते २६ डिसेंबर दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत भजन आणि सायंकाळी ५ ते १० यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

नागपुरातील एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट:9 जणांचा मृत्यू

0

नागपुर-एका मोठ्या एक्सप्लोझिव कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर कंपनीतील कामगाव त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच, कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही.नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहेत.या वर्षी ऑगस्टमध्येही या कंपनीला आग लागली होती. त्यावेळी कचऱ्यात स्फोट झाला त्यात दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला.या घटनेला पाच महिनेही उलटले नव्हते इतक्यात रविवारी मोठा स्फोट झाला.

सोलर ग्रुपद्वारे चालवले जाणारी इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड ही कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र उत्पादकांपैकी एक आहे. सध्या येथे भारतीय लष्कर आणि नौदलासाठी विविध शस्त्रे तयार केली जातात. तसेच या कंपनीच्या माध्यमातून भारताबाहेर तीसहून अधिक देशांमध्ये शस्त्रे निर्यात केली जातात.

रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात हा स्फोट झाला. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरच्या बाजारगाव गावात सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट झाला आहे.

या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, एक इमारत उध्वस्त झाल्याची माहिती आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. तर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी आमदार अनिल देशमुख दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

सरकारकडून मदत जाहीर
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिले आहे.

देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे चांगलं असेल ते घडावं; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना

घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून शेकडो भक्तांचा श्री दत्तचरणी मंत्रघोष

पुणे दि.१७: विधिमंडळातील भाषण ऐकून नेहमीच प्रभावित व्हायचे मात्र कष्ट दूर करणे, त्याचबरोबर सुखद संपन्नता मिळणं, मनाला स्वास्थ्य मिळणं या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने आत्ताच्या काळामध्ये एवढे भाविक एकत्र येतात आणि स्तोत्र म्हणतात हे पाहून मन प्रभावित झाले आहे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे काही चांगलं असेल ते घडावं अशी श्री दत्तगुरूंच्या चरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रार्थना केली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्त मंदिरा समोरील उत्सव मंडपात दत्तजयंती उत्सवाचे शुभारंभा निमित्ताने करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त डॉ. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. घोरात्कष्टात मंत्र पठणातून सर्वांचे मंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आज या कार्यक्रमानिमित्ताने प पू तराणेकर गुरुजींशी परिचय झाला असला तरी इंदोरशी आमच्या घराण्याचे पूर्वीपासूनचे एक नात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. डॉ. गोऱ्हे यांचे आजोबा शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होते ते माधवनाथ महाराजांचे खूप मोठे भक्त होते. त्यामुळे घरामध्ये आजतागायत गेली शंभर वर्ष तरी सातत्याने दर गुरुवारी दत्ताची आरती आणि उपासना होत असते. अगदी अधिवेशन असले तरी त्याचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. दत्तगुरु महाराजच आपल्याला सगळा मार्ग दाखवतात त्यांच्यावर आपला विश्वास आहे, ठाम खात्री आहे आणि त्यामुळे जे आम्हाला विरोध करतात त्यांना पण दत्तगुरु कधी ना कधी चांगली सद्बुद्धी देतील अशी खात्री देखील डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

दत्त मंदिर विश्वस्त मंडळाने शासनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यापूर्ण करण्याबद्दल सहकार्य केले जाईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा!२२ जानेवारीच्या उत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी करावी

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

पुणे-भारतीय जनता पक्षाचे पद म्हणजे एक जबाबदारी आणि अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने त्या जबाबदारी आणि अपेक्षांचे योग्यप्रकारे निर्वाहन करावे; असा कानमंत्र नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच आगामी २२ जानेवारी हा सर्वांसाठी आनंदोत्सवचा दिवस आहे. त्यामुळे या आनंदोत्सवची सर्व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय जनता पक्ष कोथरुड मंडल कार्यकारीणी नुकतीच जाहीर झाली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप आणि कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, खडकवासला मंडल अध्यक्ष गणेश वर्पे, भाजपा नेते सुशील मेंगडे, कोथरुड मंडल समन्वयक गिरीश भेलके, निवडणूक प्रमुख नवनाथ जाधव, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार, प्रा. अनुराधा एडके, श्रीधर मोहोळ, सचिन पवार, उत्तर मंडलाच्या शरद भोते, सचिन दळवी, उमाताई गाडगीळ, विवेक मेथा, मोरेश्वर बालवडकर, काळुराम गायकवाड, कोथरुड मंडल महिला मोर्चा प्रभारी आणि मंडल सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, दक्षिणच्या महिला मोर्चा अध्यक्ष कांचन कुंबरे, उत्तरच्या अस्मिता करंदीकर, दक्षिणचे युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, उत्तरचे रोहन कोकाटे यांच्या सह नगरसेवक, शहर आणि मंडचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ही केवळ राजकीय संघटना नाही, तर सामाजिक संघटना म्हणून काम करते. त्यामुळे पक्षाचे पद हे केवळ पद नसून जबाबदारी आणि अपेक्षा आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. तसेच संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही पक्षाची रास्त अपेक्षा असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील ही जबाबदारी आणि अपेक्षा योग्य पद्धतीने पार पाडाव्यात. त्यासाठी आवश्यक सर्वती ताकद पक्षाकडून दिली जाईल.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पक्षाचे संघटन वाढीसाठी आणि बूथ सक्षमीकरणासाठी सुपर वॉरियर्स ही संकल्पना राबविली आहे. माझ्याकडे ही या अनुषंगाने बूथची जबाबदारी असून, मी देखील यात सक्रीय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील बूथ सशक्तीकरणावर भर दिला पाहिजे असे आवाहन केले.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीचे काम पूर्ण होऊन २२ जानेवारी रोजी रामचंद्रांची प्रतिष्ठापना होणार आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. या आनंदोत्सवसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. त्यासाठी सर्वांनी जय्यत तयारी करावी अशी सूचना केली.

प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताना येणारी जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असते. मला खात्री आहे; नवनियुक्त पदाधिकारी निश्चितपणे पूर्ण क्षमतेने, निष्ठेने पक्ष बांधणी आणि वाढीसाठी कार्यरत असतील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संदीप बुटाला यांनी केले. कोथरुड मंडल उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुराधा एडके यांनी केले.

पिंपरी चिंचवड येथे होणार सामाजिक सलोखा आरक्षण परिषद …

सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे (दि.१७ डिसेंबर २०२३) महाराष्ट्रात विविध समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी विविध समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलने, उपोषण करीत आहेत. तसेच सरकार दरबारी निवेदने देऊन आरक्षणाची मागणी करत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री वेळ मारून नेण्यासाठी सरकारच्या वतीने आश्वासने देत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरक्षण प्रश्नाने गंभीर वळण घेतले आहे. त्यामुळे जाती जातीत दुरावा आणि संभ्रम निर्माण होत आहे. महागाई, पाऊस पाणी, बेरोजगारी या समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिक तणावात आणि त्रस्त आहेत. समतेचा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणाऱ्या महाराष्ट्रात या परिस्थितीत सामाजिक सलोखा निर्माण करणे आवश्यक आहे. सर्व समाजास न्याय मिळावा कुणावरही अन्याय होऊ नये सर्वांच्या मागण्या, अडचणी समजून घ्याव्यात. सर्व जाती जातीमध्ये, धर्मांमध्ये सलोखा, सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे. यासाठी पिंपरी चिंचवड शहरात
सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेचे लवकरच आयोजन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शनिवारी (दि.१६) झालेल्या बैठकीत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. यावेळी मानव कांबळे, प्रकाश जाधव, सतिश काळे, प्रताप गुरव, आनंदा कुदळे, देवेंद्र तायडे, मारुती भापकर, के. डी. वाघमारे, गुलामभाई शेख, विशाल जाधव, विश्वनाथ जगताप, प्रदीप पवार, पांडूरंग परचंडराव, प्रकाश बाबर, बी. बी. शिंदे, रावसाहेब गंगाधरे, किरण खोत, शितल घरत, सुनीता शिंदे, अशोक सातपुते, चंद्रशेखर कणसे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, संदीप मुटकुळे, ब्रम्हानंद जाधव, राहुल मदने, संतोष कदम, सुरेश भिसे, रजनीकांत क्षिरसागर आदी उपस्थित होते.
नियोजित सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेत एससी, एसटी, ओबीसी, मराठा, मुस्लिम, धनगर, समाजाचे वक्ते आप आपल्या समाजाच्या आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करणार आहेत.

सिरवी समाजाच्या वतीने श्रीराम पूजा मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा

पुणे (दि.१७ डिसेंबर २०२३) आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील सिरवी समाजाच्या वतीने आई माता मंदिर परिसरातून श्रीराम पूजा मंगल कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत रथावर आरूढ झालेले बाल श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. झांज, ढोल ताशे वाजवत आबालवृद्धांनी दिलेल्या ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिला भाविक पारंपरिक वेषात आणि श्रीरामाची प्रतिमा हातात घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते.
अयोध्येत ४९५ वर्षांनी २२ जानेवारी २०२४ ला श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशासह महाराष्ट्रात श्रीराम पूजा मंगल अक्षता कलश दर्शनासाठी आला आहे. मंगल अक्षता कलशातील अक्षतांचे वाटप १ ते १५ जानेवारी दरम्यान घरोघरी करण्यात येणार असून २२ जानेवारी २०२४ ला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिनी सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या देव्हाऱ्यातील देवांवर अक्षता वाहून पूजा करून श्रीरामाचा नाम जप करावा असे आवाहन सिरवी समाज आईमाता मंदिर प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहनलाल अगलेचा यांनी केले आले.
मंगल अक्षता कलशाचे आईमाता मंदिरात आगमन झाल्यानंतर विधीवत पूजन करून महाआरती करण्यात आली.शोभायात्रेचे नियोजन आणि कलशाचे पूजन सिरवी समाज आईमाता मंदिर प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहनलाल अगलेचा, सचिव रामलालजी लचेटा, माजी अध्यक्ष तेजाराम लचेटा, युवा अध्यक्ष प्रकाश सोलंकी, महिला अध्यक्ष धापूबाई काग, महिला सचिव अनिता जगदीश, लीला परमार यांनी केले होते.