Home Blog Page 1307

चोरी केलेल्या दुचाकीवरून घरफोड्या :कात्रजच्या २ तरुणांना अटक

पुणे- दुचाकीगाडी चोरी करुन तिचे वरुन घरफोडी करणा-या कात्रज च्या २ अट्टल सराईत गुन्हेगाराना पुनेपोलीसांनी चतुर्भुज केले आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३३५/२०२३ भा.द. विकलम ३७९ मधील फिर्यादी यांची अॅक्टीवा गाडी हि राहते घराचे पार्किंगमध्ये लॉककरुन पार्ककरुन ठेवली असता सदरची अॅक्टीवा गाडी कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे संमती शिवाय चोरुन नेली आहे. म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील चोरीस गेले वाहनाचा व अज्ञात चोरटयाचा हददीमध्ये शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड, अनिस शेख व रमेश चव्हाण यांना त्यांचे बातमीदारमार्फत बातमी मिळाली कि, सदर गुन्हयातील चोरी गेलेले वाहन व आरोपी हे वाहनासह स्वारगेट कॅनॉलजवळ चहाचे गाडयावर थांबले आहेत अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली असल्याबाबत प्रतापसिंह शेळके पोलीस उपनिरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे यांना माहिती दिल्याने त्यांनी लागलीच खात्रीकरुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके व तपास पथकातील पोलीस अंमलदार याचेसह बातमीचे ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर गुन्हयातील चोरीस गेलेली अॅक्टीवा गाडी हि दिसुन आली व त्यावर दोन इसम बसलेले दिसुन आल्याने त्यांना वरील स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यांना नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव १) पियुष गणेश भरम वय २२ वर्षे रा. आंबेगाव पठार पुणे २) विवेक उत्तम मोरे वय २४ वर्षे रा. पवार नगर गुजर वाडी कात्रज पुणे असे असल्याचे सांगितले. तसेच तपासा दरम्यान आरोपीनी सांगितले कि सदर गाडी चोरी करुन शिंदेवाडी येथील वाघजाई मंदीरातील दान पेटीतील पैसे चोरी केले असल्याचे सांगितल्याने सदरबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं ७३१/२०२३ भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील आरोपीतांकडुन तपासादरम्यान दाखल गुन्हयातील चोरी केलेली अॅक्टीवा व रोख रक्कम असा मिळुन एकुण १३,७६०/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, . प्रविणकुमार पाटील, . पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, दिपक खंदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, यांनी एकत्र मिळुन केली

टीडीआर, जीएसटी, आयकरासह सवलतींचा वर्षाव केला, अदानी देशाचा जावई आहे का?

विदर्भासाठी ठोस निर्णय जाहीर केल्याशिवाय विदर्भातून सरकारला जाऊ देणार नाही.- नाना पटोले

मराठावाडा,विदर्भासाठी वांझोट्या चर्चा नको, बॅकलॉग कुठे आणि कसा भरला त्याचे उत्तर द्या.

विदर्भातील विकासाठी जिल्हा, तालुकानिहाय नियोजन काय आहे.

मुख्यमंत्र्यांचे भाषण पावसाळी अधिवेशनातीलच, नवे काहीच नाही.

नागपूर, दि. १८
नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नागपूर करारानुसार होत असते ते किमान दोन महिने चालले पाहिजे पण केवळ दीड आठवड्याचे अधिवेशन घेऊन सरकार विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसत आहे. मराठवाडा विदर्भाच्या प्रश्नांवर वांझोट्या चर्चा नको. विदर्भाचा बॅकलॉग राहिलाच नाही असे अर्थमंत्री म्हणत असतील तर तो बॅकलॉक कसा भरला याचे सविस्तर उत्तर द्या. मराठवाडा व विदर्भासाठी ठोस निर्णय जाहीर केल्याशिवाय सरकारला विदर्भातून जाऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

विरोधी पक्षांच्या २९३ च्या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेत बोलत होते. यावेळी महायुती सरकारवर तोफ डागत ते पुढे म्हणाले की, विदर्भातील शेतकरी, बेरोजगार, बारा बलुतेदार अशा सर्व समाज घटकांचे प्रश्न मांडले पाहिजेत पण सरकार यावर काही बोलत नाही. विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत पण त्यासाठी काही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण पावसाळी अधिवेशनातीलच होते त्यात नवे काहीच नव्हते. दररोज १४ शेतकरी आत्महत्या होत आहेत, अवकाळीची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही, राज्यात पाणीबाणी परिस्थिती ओढवू शकते अशी भयानक परिस्थिती आहे त्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. आजच्या उत्तराने शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही. जनतेने मुख्यमंत्र्यांच्या घोषणाचे स्वागत केले नाही. शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे. मविआ सरकारने धानाला ७०० रुपये बोनस दिला होता आजचा बोनस पाहता ते केवळ ४२५ रुपये मिळणार आहेत.

नागपूरमधील मिहान प्रकल्प ओस पडला आहे. सत्तेत आलो की कार्गो आणू, मिहान प्रकल्पात उद्योग आणू अशा घोषणा केल्या मग आता कार्गो, मिहान कुठे गेले, रामदेव बाबाला जमीन दिली पण प्रकल्प सुरु झाला नाही. उद्योजक कुठे आहेत, अनेक प्रकल्प निघून गेले. बुटीबोरीही प्रकल्पही ओसाड पडत चालला आहे. विदर्भाच्या विकासाकडे सरकारचे लक्ष नाही. गडचिरोली जिल्हा खणीज व वन संपदेचा जिल्हा आहे. या खजिन संपत्तीची लुट सुरु आहे. सुरजागडमधील लोह खनिज लुटून दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत. या प्रकल्पासाठी पोलीसांची मोठी सुरक्षा दिली आहे. शंभर किमीचा रस्ता या प्रकल्पामुळे खराब झाला आहे. भिलाईपेक्षा मोठा पकल्प सुरजगडमध्ये होऊ शकतो ,गडचिरोली आर्थिक हब होऊ शकते. सोन्याच्या खाणी आहेत, लोखंड मुबलक प्रमाणात आहे पण सरकार एका उद्योजगाला सवलती देत आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त आहे, त्यात आता गाळ साचला आहे, खोलीकरणाची गरज आहे, त्यासाठी निधी उपलब्ध केला पाहिजे. या तलावांचे खोलीकरण केले तर शेतकऱ्यांना पाणी मिळेल, मच्छिमारांना फायदा होऊ शकतो. गोसेखुर्द प्रकल्पामध्ये नादनदीचे घाण पाणी सोडले जाते. नागनदीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात ते जातात कुठे. या नदीतील घाण पाणी बंद केले तर गोसेखुर्दमध्ये केरळच्या बॅक वाटरसारखे पर्यटन वाढेल. चांगल्या प्रतीचे धान उत्पादन होईल. नागपुरात दिक्षाभूमी तसेच ताजुद्दीन बाबा दर्ग्यावर लाखो विदेशी पर्यटकही येतात. वर्धा जिल्ह्यात सेवाग्रामला जगभरातून लोक येतात, तिथेही विकास नाही, सोईसुविधा नाहीत.

धारावी प्रकल्पातून तिजोरी लुटण्याचे काम सरु आहे. फडणवीस सरकारनेच धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे काम दुबईच्या कंपनीला दिले होते, त्यावेळी रेल्वेची जमीन मिळाली नाही म्हणून दिरंगाई झाली. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार आले आणि दुबईच्या कंपनीचा करार रदद् केला व अदानीला हा प्रकल्प दिला. धारावी प्रकल्पासाठी सरकारने अदानीवर टीडीआरची उधळपट्टी केली आहे. कर सवलती मोठ्या प्रमाणात दिल्या आहेत, अदानीला एवढ्या सवलती देता तो काय सरकारचा जावई आहे का. अदानीवर सवलतींचा वर्षात करता मग गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी असे निर्णय का घेत नाही असा सवाल पटोले यांनी विचारला आहे.
००००००

तांदूळ उद्योग संघटनांनी तांदळाच्या किरकोळ किंमती कमी करण्यात आल्याची तातडीने खात्री करून घेण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

0

फेखोरीचा कोणताही प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचा इशारा

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023

बिगर-बासमती तांदळाच्या देशांतर्गत दरांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्ली येथे आघाडीच्या तांदूळ प्रक्रिया उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली.

यंदाच्या खरीप मोसमात तांदळाचे हाती आलेले चांगले पीक, भारतीय अन्न महामंडळाकडे (एफसीआय) असलेला आणि येऊ घातलेला तांदळाचा मुबलक साठा तसेच तांदूळ निर्यातीसाठी विविध नियमन व्यवस्था असूनही देशांतर्गत तांदळाचे दर वाढत आहेत या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. देशांतर्गत बाजारांमध्ये तांदळाच्या किमती योग्य पातळीपर्यंत कमी होतील याची खात्री तांदूळ उद्योगाने करून घेण्याची गरज व्यक्त करत, नफेखोरीच्या प्रयत्नावर  कडक कारवाईच्या  सूचना देण्यात आल्या.गेल्या दोन वर्षांपासून तांदळाचा वार्षिक महागाई दर 12%च्या आसपास राहिला आहे आणि दर वर्षागणिक तो वाढताना दिसत आहे ही चिंतेची बाब असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

तांदळाच्या कमी केलेल्या दराचा फायदा पुरवठा साखळीत सर्वात शेवटी असलेल्या ग्राहकाला त्वरित मिळायला हवा या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. प्रमुख तांदूळ उद्योग संघटनांनी त्यांच्या सदस्य संस्थांसह हा विषय हाती घ्यावा आणि तांदळाचे किरकोळ दर त्वरित कमी होतील याची सुनिश्चिती करून घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.घाऊक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांना तांदूळ विक्रीमध्ये होत असलेल्या नफ्यात तीव्र वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच, किमान किरकोळ किंमत आणि वास्तविक किरकोळ किंमत यामध्ये मोठी तफावत आढळल्यास ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने या किंमती कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

देशात चांगल्या दर्जाच्या तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून ओएमएसएस अर्थात खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत हा तांदूळ 29 रुपये प्रती किलोच्या राखीव दराने देऊ करण्यात  येत आहे अशी माहिती एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाने दिली आहे. तांदूळ उत्पादक/ व्यापाऱ्यांना एफसीआयकडील साठ्यातून ओएमएसएस अंतर्गत तांदळाची उचल करता येईल  आणि हा तांदूळ वाजवी नफ्यासह ग्राहकांना विकत येईल अशी सूचना देखील या बैठकीत मांडण्यात आली.

केंद्रीय अन्न आणि वितरण विभाग देशातील तांदळाच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवून वेळोवेळी दरांचा आढावा घेत असते आणि रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग असणाऱ्या तांदळाच्या किफायतशीरतेची सुनिश्चिती करण्यासाठी गरज पडेल तेथे हस्तक्षेप करत असते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये, भारतीय ग्राहकांना तांदूळ खरेदीसाठी कमी खर्च येईल अशी अपेक्षा आहे.

देशात कोविड -19 च्या रुग्णसंख्येत वाढ आणि केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी

0

राज्यांमधल्या कोविड विषयक परिस्थितीबाबत दक्ष राहून सातत्याने लक्ष ठेवण्याचा सल्ला

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023

देशातली काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशात कोविडच्या रुग्ण संख्येत नुकतीच झालेली वाढ आणि  कोविड-19 च्या जेएन.1 या नव्या स्वरूपाच्या विषाणूने ग्रस्त पहिला रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य सचिव, सुधांश पंत यांनी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिले असून, देशभरात कोविडच्या परिस्थितीबाबत दक्ष राहून सतत देखरेख ठेवण्यावर या पत्रात भर दिला आहे.

“केंद्र आणि राज्य सरकारांमधील सातत्यपूर्ण आणि सहकार्य ठेवून केलेल्या कृतींमुळे, आपल्याला कोविडचा प्रादुर्भाव सातत्याने कमी ठेवण्यात यश मिळाले आहे.” असं असलं तरी, कोविड-19 विषाणूचा प्रसार  अद्याप सुरूच असून, या विषाणूचे वर्तन भारतीय हवामानाची परिस्थिती आणि इतर नेहमीच्या रोग-जनुकांच्या प्रसाराशी जुळवून घेणारे ठरले आहे, हे लक्षात घेऊन, सार्वजनिक आरोग्यातील आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आपल्याला कोविड प्रतिबंधक गती कायम ठेवणे महत्वाचे आहे.” असे त्यांनी या पत्रात अधोरेखित केले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी कोविड नियंत्रण आणि व्यवस्थापनविषयक महत्त्वाची धोरणे अधोरेखित केली, ती खालीलप्रमाणे : –

  1. आगामी सण उत्सवांचा काळ लक्षात घेता, राज्यांनी पुरेशा सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था सज्ज  ठेवाव्यात, तसेच श्वसनसंस्थेशी निगडीत स्वच्छता सूचनांचे पालन करावे जेणेकरून, या आजाराचे संक्रमण टाळता येऊ शकेल.
  2. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सामायिक केल्याप्रमाणे कोविड-19 साठी देखरेख ठेवण्याच्या सुधारित धोरणाची तपशीलवार आणि प्रभावी अंमलबजावणी तसेच  मार्गदर्शक तत्त्वांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे. (हे धोरण, https://www.mohfw.gov.in/pdf/OperationalGuidelinesforRevisedSurveillanceStrategyincontextofCOVID-19.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध).
  3. रुग्णसंख्येचा वाढता कल लवकर ओळखण्यासाठी, राज्यांना एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्म पोर्टलसह, फ्लू सारखे आजार किंवा  गंभीर स्वरूपाच्या श्वसन रोगावर (एसएआरआय-सारी) लक्ष ठेवण्यास आणि त्याचा वेळोवेळी अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  4. कोविड-19 चाचणीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पुरेशा प्रमाणात चाचण्या सुनिश्चित करण्याचा आणि आरटी-पीसीआर आणि त्यातील शिफारस करण्यात आलेला अॅंटी जेन चाचण्यांचा वाटा कायम ठेवण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.
  5. आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह  रुग्णांच्या रक्ताचे नमुने, भारतीय सार्स सीओव्ही-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.  जेणेकरून देशात नवीन स्वरूपाचा विषाणू आल्यास, त्याचा वेळेवर शोध घेता येईल.
  6. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, सर्व सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांची तयारी आणि प्रतिसाद क्षमता यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या रंगीत तालमीत त्यांचा  सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे.
  7. श्वसनविषयक सार्वजनिक नियमांचे पालन करण्यासह कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सामुदायिक  जागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांनी सातत्याने पाठिंबा द्यावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

तुळजा भवानी देवीचा सोन्याचा मुकुट आणि दागिने चोरी प्रकरणी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

नागपूर दि.१८: नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधान परिषदेत . महादेव जानकर यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्याश्री तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाले आहेत. यामधील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याबाबत औचित्याचा मुद्दा श्री जानकर यांनी उपस्थित केला.
यावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्परतेने शासनाचे याविषयाकडे लक्ष वेधले. तसेच सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी तक्रार देवून ही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे शासनास निर्देश दिले.

यावर मंत्री महोदय श्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कारवाई करण्यात येईल असे सभागृहाला आश्वासन दिले.

मुंबई आणि नोएडा येथे डीआरआयच्या सुनियोजित कारवाईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या प्रमुख सदस्याला अटक

0

मुंबई, 18 डिसेंबर 2023

देशात अंमली पदार्थ तस्करीचा छडा लावण्यात उल्लेखनीय यश मिळाले असून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी ग्रेटर नोएडा येथून कार्यरत अंमली पदार्थ तस्करी टोळीचा  प्रमुख सदस्य असलेल्या नायजेरियन नागरिकाला अटक केली.

डीआरआय ने यापूर्वी 14.10.2023 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून 2.485 किलो कोकेन जप्त केले होते आणि या टोळीसाठी भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी अधिक सखोल तपासादरम्यान, तस्करी करणाऱ्या या टोळीच्या  प्रमुख सदस्याची माहिती मिळाली , जो ग्रेटर नोएडामधून या टोळीला  वित्तपुरवठा करून ती चालवत  होता. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि पाळत ठेवल्यानंतर अधिकाऱ्यांना आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले.

त्यानंतर मुंबई आणि नोएडा येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या डीआरआयच्या पथकाने सापळा रचून तस्करी करणाऱ्या या टोळीच्या प्रमुख सदस्याला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोठ्या संख्येने सिमकार्ड, मोबाईल फोन आणि विविध देशातून जारी केलेले अनेक पासपोर्ट सापडले. त्यानंतर, त्याला अटक करण्यात आली आणि ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. 13.12.2023 रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

या कारवाईतून  अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाचे  रक्षण करण्यासाठी संपूर्ण टोळीचा  प्रभावीपणे पर्दाफाश  करण्याप्रति अंमलबजावणी संस्था  म्हणून डीआरआयचे अतूट समर्पण आणि व्यावसायिक वृत्ती  दिसून येते.

वास्तुनिर्मितीत पर्यावरण रक्षणाला महत्त्व द्यावे – सुरज पवार

एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये ‘संकल्पना स्वररंग’ परिसंवाद

पुणे (दि. १८ डिसेंबर २०२३) -विकसित तंत्रज्ञानाचा वापर वास्तु निर्मिती शास्त्रातही मुक्तहस्ते होत आहे. परंतु वातावरणातील बदलांचा परिणाम नैसर्गिक साधन संपत्ती वर होत असून वास्तु निर्मिती करताना पर्यावरण रक्षणाला वास्तू रचनाकारांनी महत्त्व दिले पाहिजे, असे मार्गदर्शन वास्तु विशारद सुरज पवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरच्या (आयआयए) पिंपरी चिंचवड शाखेने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या सहकार्याने वास्तु विशारद सुरज पवार यांचा परिसंवाद ‘संकल्पना स्वररंग’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, आय. आय. ए. चे अध्यक्ष पारस नेत्रेगावकर, आयआयएचे उपाध्यक्ष वास्तु विशारद ॠषिकेश देवरे, सचिव उमेश नामदे, सहसचिव अजिंक्य निफाडकर आदी उपस्थित होते.
सुरज पवार यांनी नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून हवामान पुरक अशा वास्तु रचना केल्या आहेत. त्यांनी हाताने तयार केलेल्या प्रतिकृतींचा उपयोग केला असून ही नवी संकल्पना युवा वास्तु रचनाकारांसाठी फार प्रेरणादायी ठरेल, असे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
सूत्रसंचालन रक्षंदा पलांडे, आभार ऋषिकेश देवरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिरीष मोरे सहाय्यक प्राध्यापक ॠतुषा लड्डा, निकिता गायकवाड, आयआयएचे सदस्य मदुरा बुटाला, माणिक बुचडे, महेश ठाकूर, संदीप हिंगे, कृष्णा पाटील यांनी केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

एच. ए. स्कूल पिंपरी च्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कलादालनाचे उद्घाटन

शाळेचा दैदीप्यमान इतिहास सांगणारी चित्रफीत सादर

पुणे (दि.१८ डिसेंबर २०२३)भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीचे भूमिपूजन करण्यात आले होते. येथे काम करीत असलेल्या कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण मिळावे. या उद्देशाने २० जुलै १९५८ साली पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स वसाहतीमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली. या शाळेचे या वर्षी हीरक महोत्सवी आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रविवारी शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक सौरभ फुगे यांच्या हस्ते ‘ हीरक महोत्सवी कलादालनाचे’ आणि आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. शाळा समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे आणि मुख्याध्यापक सुनील शिवले यांच्या संकल्पनेतून हे कला दालन उभारण्यात आले आहे. यावेळी उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष शशांक परमाणे, उपाध्यक्ष गणेश गांवकर, सचिव आशिष म्हसे, समन्वयक मोहन बाबर, अशोक थोरात, संयोजक दत्तात्रय भोसले, शिक्षक रमेश गाढवे, आशा माने, जगदीश पवार, श्वेता नाईक आदी उपस्थित होते. हे कलादालन उभारण्यात दत्तात्रय भोसले यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले असून मंगल साठे, सुषमा निरगुडकर, प्रताप पवार, केशव गेंगजे यांनी परिश्रम घेतले आहेत. यामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांनी शाळेला भेट दिली होती त्या वेळचे फोटो, तसेच अनेक मान्यवरांनी शाळेच्या विविध उपक्रमात भेट दिली त्या वेळच्या फोटोंसह, या शैक्षणिक वर्षापर्यंतच्या शाळेच्या विविध उपक्रमांचे फोटो विद्यार्थी व पालकांना पाहण्यास मिळणार आहेत. या ठिकाणी जगदीश पवार यांनी तयार केलेली शाळेच्या प्रगतीचा आलेख सांगणारी चित्रफीत देखील दाखविण्यात येणार आहे. सर्व पालकांनी व शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या दैदिप्यमान इतिहास दर्शवणाऱ्या कलादालनास भेट द्यावी असे आवाहन मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी केले आहे. तसेच हीरक महोत्सवी वर्षानिमित्त शाळेच्या आवारात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सादर केलेल्या विविध पंधरा खेळांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. आयोजन शिक्षिका मनीषा कदम, रमेश गाढवे आणि मार्गदर्शन मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर यांनी केले.

महाराष्ट्रातल्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार – केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांची लोकसभेत माहिती

0

नवी दिल्ली/मुंबई, 18 डिसेंबर 2023

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशभरात आता पर्यंत प्रशाद योजनेंतर्गत 46 परियोजना  आणि स्वदेश दर्शन  अंतर्गत एकूण 76 परियोजना स्वीकृत करण्यात आल्या आहेत , ज्यात धार्मिक स्थळांचा समावेश आहे. याशिवाय या दोन योजनांतर्गत विकास करण्यासाठी नवीन स्थळे निश्चीत केली आहेत. महाराष्ट्रात विकासासाठी निश्चित केलेल्या परीयोजनाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  1. प्रशाद योजनेत नाशिक जिल्ह्यातल्या त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्राच 52.92 कोटींचा निधी खर्च करून  विकास करण्यात येणार आहे.
  2. स्वदेश दर्शन योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरेश्‍वर, तरकर्ली, विजयदुर्ग  येथील चौपाटी आणि खाडी किनार्यांचा  19.06 कोटींचा निधी खर्च्कारून विकास करण्यात येणार आहे. तर  नागपूर जिल्ह्यातल्या वाकी – अडासा – धापेवाडा – परादसिंघा – तेलंखंडी- गिराड यांचा 53.96 कितींचा निधी खर्चून विकास करण्यात येणार आहे. याशिवाय प्रशाद योजनेंतर्गत  नवीन परीयोजनेत औरंगाबाद येथील  श्री गुरूसनेश्वर शिवालय, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर येथील श्रीक्षेत्र राजूर,  जालना येथील  गणपति मंदिर यांचा  तर स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत सिंधू दुर्गचा विकास करण्यात येणार आहे अशी माहिती  केंद्रीय पर्यटन मंत्री श्री जी. किशन रेड्डी यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल लोकसभेत हि माहिती दिली. या संबधीचा प्रश्न श्री. हेमंत पाटील यांनी विचारला होता .

पर्यटन मंत्रालयाच्या वतीने  ‘तीर्थस्थान जीर्णोद्धार आणि  आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियानात (प्रशाद) तथा ‘स्वदेश दर्शन’ (एसडी) योजने  अंतर्गत देशभरातील  धार्मिक स्थळासह पर्यटन  क्षेत्राचा जीर्णोद्धार करण्यासाठी  राज्य सरकारे आणि केंद्राशाशित प्रदेशांना आर्थिक सहाय देण्यात येते.

 बिबवेवाडी ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटांची क्षमता शंभरवरून एकशे वीस करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी

0

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

नवी दिल्ली, 18: कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार असल्याची  माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे.

नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या ‘ईएसआयसी’च्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटांची क्षमता शंभरवरून एकशे वीस करण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली आहे. तसेच, अंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. कायमचे अपंगत्व आल्यास मिळणारे लाभ, तसेच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना मिळणारे लाभ वाढविण्याविषयीही बैठकीत मंजूरी देण्यात आली.

महाराष्ट्र राज्यासोबतच, गुजरातमध्ये सतरा ठिकाणी नवीन दवाखान्यांची उभारणीही केली जाणार आहे, तर, ओडिशातील राऊरकेलामधील रुग्णालयात खाटांची संख्या 75 वरून दीडशे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ महाराष्ट्राकडून दोन लाख मेट्रिकटन कांदा खरेदी करणार

0

नवी दिल्ली, दि. १८ : एनसीसीएफ (NCCF) आणि ‘नाफेड’च्या (NAFED) माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय, केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती, ‘एनसीसीएफ’ च्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी नाशिकमध्ये दिली.

देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचे श्रीमती चंद्रा यांनी सांगितले. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ‘एनसीसीएफ’ आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. ‘एनसीसीएफ’ने दोन लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये नाफेड आणि ‘एनसीसीएफ’कडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचेही  श्रीमती चंद्रा यांनी सांगितले.

‘एनसीसीएफ’च्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ मोबाइल व्हॅनद्वारे २५ रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू केली आहे.  कांदा, गव्हाचे पीठ, डाळींपाठोपाठ ‘एनसीसीएफ’तर्फे मूगडाळ आणि तांदूळदेखील अत्यल्प दरात  विक्री करणार असल्याची माहिती श्रीमती चंद्रा यांनी यावेळी दिली.

औद्योगिक ग्राहकांच्या तत्पर ग्राहक सेवेसाठी महावितरण कटिबद्ध – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

चाकण एमआयडीसीमध्ये महावितरणचे दोन स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित

पुणेदि. १८ डिसेंबर २०२३: राज्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी महावितरण कटिबद्ध आहे. या ग्राहकांसाठी पुणे परिमंडल अंतर्गत एमआयडीसी विद्युत सुधारणा योजनेअंतर्गत विविध एमआयडीसीमध्ये ४४ कोटी ७० लाख रुपये खर्चाचे विद्युत विषयक कामे सध्या सुरु आहेत. यातील चाकण एमआयडीसीमधील दोन स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित झाल्यामुळे प्रामुख्याने औद्योगिकसह घरगुती व वाणिज्यिक ३ हजार ८५० ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे अशी माहिती पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.

विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील किंग्फा २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन व ह्युंदाई २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन सोमवारी (दि. १८) कार्यान्वित करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. दिलीप बटवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. पवार यांनी सांगितले की, कार्यान्वित झालेल्या दोन स्विचिंग स्टेशनमुळे अतिभारित होत असलेल्या २२ केव्ही क्षमतेच्या नऊ वीजवाहिन्यांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने उच्च व लघुदाबाच्या १३५० औद्योगिक ग्राहकांसह परिसरातील सुमारे २ हजार ५०० घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी दर्जेदार सेवा देण्यासाठी विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख तर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रामटेकडी, आकुर्डी, भोसरी, तळवडे व हिंजवडी एमआयडीसीमध्ये एकूण २९ कोटी २१ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यातील विविध कामांना सुरवात करण्यात आली आहे.

यासोबतच चाकण एमआयडीसीमध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून (आरडीएसएस) तीन नवीन उपकेंद्र व २ स्विचिंग स्टेशन्ससह ९४ कोटी ३० लाख रुपये खर्चाचे विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेतून म्हाडा, भांबोली, वाकी येथे ३३/२२ केव्हीचे नवीन उपकेंद्र, कुरूळी व चाकण येथे २२/२२ चे स्विचिंग स्टेशन तसेच ६५ किलोमीटर भूमिगत व उपरी वीजवाहिन्यांचे विभाजन, ४० रिंग मेन युनिट, ८३ नवीन वितरण रोहित्रे, ९० वितरण रोहित्रांची क्षमतावाढ, ८५ किलोमीटर उच्चदाब वीजवाहिन्यांचे अपग्रेडेशन आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत अशी माहिती मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.

यावेळी कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र येडके, अमित कुलकर्णी, धनंजय आहेर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेश भगत, उपकार्यकारी अभियंता श्री. विजय गारगोटे, सहायक अभियंता श्री. विक्रांत वरूडे व श्री. संजय बेडदुर्गे आदींची उपस्थिती होती.

खाटीक समाजाच्या विकासासाठी महामंडळ स्थापित करा • चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

नागपूर-राज्यभरातील खाटीक बांधवांच्या आर्थिक प्रगतीसाठी सरकारने डॉ. संतुजी लाड खाटिक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी विधान परिषद सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली.

संतुजी लाड खाटीक आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्याची दखल सरकारने घ्यावी अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे खाटीक समाजाची बाजू मांडली. ते म्हणाले 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात खाटीक बांधवांची प्रत्येक गावात लोकसंख्या मोठी आहे. त्यांचा समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात करण्यात आला आहे. मात्र त्यांना अनुसूचित जातीमधील बराचशा योजनांचा व शासनाच्या सवलती व शासनाचे शैक्षणिक धोरणाचा लाभ मिळत नाही, अशी तक्रार खाटीक समाजाकडून नेहमीच केली जाते. सरकारच्या योजनांचा लाभ व समाजाच्या आर्थिक विकासासाठी डॉ. संतुजी लाड आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. या मागणीसाठी खाटीक समाजाकडून मोर्चे व आंदोलने करण्यात आली आहेत. आपली मागणी उचलून धरत त्यांनी राज्यभरातील बड्या नेत्यांना वारंवार निवेदन दिली आहे. यामुळे खाटीक समाजाच्या विकासासाठी समाज बांधवांच्या मागणीनुसार डॉक्टर संतुजी लाड आर्थिक विकास महामंडळ गठित करण्याची विनंती त्यांनी सभागृहात केली. याची विधानपरिषद उपाध्यक्षांनी तातडीने दखल घेत सरकारला सूचना केल्या.

पुणे पोलिसच लावणार..ढोल ताशा आणि बँड पथकाची जुगलबंदी -तरंग:२०२३

पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा
पुणे-दिनांक १८/१२/२०२३
– कलावंताच्या भेटीगाठी सह ..ढोल ताशा आणि बँड पथकाची जुगलबंदी , ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमांचा समावेश असलेल्या संस्कृती, कला अविष्कार आणि पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलीस दलाच्या विविध विभागांच्या कार्याची झलक यांचा संगम घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘तरंग २०२३ ‘ या अनोख्या मेळाव्याचे पुणे पोलिसांनी आयोजन केले आहे. अर्थात पुण्याची खाऊ गल्ली हि येथे असणार आहे. पोलीस आणि पुणेकर यांच्यातीलविश्वासाचे नाते अधिक घटत व्हावे या उद्देशाने पुणे पोलीस या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे संकल्पनेतुन पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपुर्ण माहिती जनमाणसातील सर्व सामान्य नागरीकांना अवगत व्हावी. तसेच पोलीस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांनी तरंग-२०२३ या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळयाचे दिनांक २२/१२/२०२३ ते दिनांक २४/१२/२०२३ रोजी या कालावधीत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी सकाळी ११/०० ते रात्रौ २२/०० वा. पर्यंत आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रम सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे पोलीस घटकांचे प्रदर्शन त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो / व्हिडीओच्या माध्यमांतुन माहिती सांगण्यात येणार आहे. त्यामध्ये पोलीस दलातील भरोसा सेल, दामिनी पथक हे महिलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन यशस्वी कार्यरत आहेत. त्याप्रमाणे डायल ११२, राज्य राखील बल, दळणवळण संदेश वाहन यंत्रणा, डॉग शो, जलद प्रतिसाद पथक, राज्य गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली व इतर घटकांची परिपुर्ण माहिती त्यांचे कामकाज याबद्दलची माहिती प्रदर्शनात असणार आहे.
सांस्कृतिक कलेचा वारसा असणारे पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (Artison Gallery) या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकार मातीची भांडी कलाकृती, पर्यावरणपुरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांडयाचे प्रदर्शन, तसेच फुलेझाडे, रोपवाटीका यांचे पदर्शन असणार आहे.
नविन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञात प्रदर्शन, मुलांसाठी खेळप्रकार, व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच, बॅड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन ‘किड्स झोन’ चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात येणार आहे.
समाजातील सर्व घटकांचे या कालावधीत मनोरंजन व्हावे आणि पोलीस व जनता यांचेत सुसंवाद व्हावा या दृष्टीकोनातुन वाद्यवृंद (ऑकेस्ट्रा ) आणि मराठी सिनसृष्टीतील हास्य कलाकार इतर सेलीबेट्री यांचे विविध कार्यक्रमांचा समाविष्ट करण्यात आला आहे.
या सर्व मनोरंजना बरोबरच खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात असणार आहे. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपडयाचे प्रदर्शन या विविध वस्तुंचे प्रदर्शन सदर मेळाव्याकरीता पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकारी, निमसरकारी अधिकारी, स्थानिक कलाकार आणि कल्पक व दर्जेदार कारागीर उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरीकांनी तरंग मेळावा २०२३ या सोहळया मध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन, कुशल कारागिर यांनी बनविलेल्या विविध वस्तु, खाद्य पदार्थ यांचा आस्वाद घेता येईल.तरी पुणे शहरातील नागरीकांनी तरंग मेळाव्याचा लाभ घ्यावा असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वासाठी तरंग मेळावा २०२३ या सोहळ्यासाठी मोफत प्रवेश असणार आहे.

जल जीवन मिशन अंतर्गतची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. १८ : ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या नियोजन अधिकारी सुनेत्रा पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत सर्वात जास्त योजना पुणे जिल्ह्यात सूरू आहेत. प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. कामाच्या प्रगतीबाबत प्रत्येक आठवड्यात आढावा घ्यावा.

वनविभागाची जागा, गायरान, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वैयक्तिक मालकी जागा व इतर जागा अडचणीबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून जागा हस्तांतरीत करून घ्याव्यात, कामांची गती वाढवावी. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करुन घ्यावी. वैयक्तिक मालकी असलेल्या जागेचे दानपत्र करून घ्यावे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून प्रलंबित जोडण्यासाठी आवश्यक अर्ज भरून द्यावेत. कामे सुरू होऊन नंतर बंद पडली आहेत अशी कामे तातडीने पुन्हा सुरू करावीत, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, पुणे जिल्ह्यात १ हजार २३० योजना सूरू आहेत. जल जीवन मोहिमेअंतर्गत सुरु असलेली सर्वच कामे वेळेत पूर्ण करण्याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. कामाबाबत काही अडचण असल्यास वरिष्ठांना अवगत करावे. पाईपलाईनची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत तालुकानिहाय जल जीवन मिशन अंतर्गत कामांची सरासरी भौतिक प्रगतीची रँकिंग, १०० टक्के काम पूर्ण झाल्याचा आणि पाणीपुरवठा सुरू झाला याबाबतचा गोषवारा, प्रलंबित कामे, कंत्राटदाराचा प्रतिसाद, कार्यात्मक घरगुती नळ जोडणीचा कार्य गोषवारा, वीज जोडणी समस्या, रस्त्याच्या कडेला पाईप टाकण्याच्या समस्या, सौर यंत्रणा कार्य गोषवारा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडील कामाची भौतिक प्रगतीची स्थिती, कार्यात्मक घरगुती टॅप कनेक्शन ऑनलाईन नोंदणी, तृतीय पक्ष तपासणी संस्था व इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर यांच्या कामाची स्थिती इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.

कार्यकारी अभियंता श्री. खताळ यांनी जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामाबाबत सादरीकरणानद्वारे माहिती दिली. प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.