Home Blog Page 1306

२४ डिसेंबरला मराठा आरक्षण नाहीच! फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

नागपूर-मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाच अहवाल एक महिन्यांत येईल. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे आणि त्यांचा अधिकार देखील आहे. या मागणीसाठी काहीही भावनांच्या भरात अतिशय लोकांचे पाऊल उचलून आत्महत्या देखील केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत म्हटले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणावर झालेल्या चर्चेला उत्तर दिले. विधानसभेत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. या चर्चेत 74 आमदारांनी 17 तास 17 मिनिटे चर्चा झाली.

विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले की, पहिल्या दिवसापासूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी समाज्याच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे. जय जवान जय किसान ही घोषणा हा समाज जगला आहे. हाच समाज आता आर्थिक शैक्षणिक मागास झाला आहे. त्यामुळे या समाजाला आपली प्रगती करायची आहे. अनेकांनी टोकाची पाऊले उचलत आत्महत्या केली असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या विकासाला या समाजाचा हातभार लागला आहे. मात्र, काही दिवसांत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही बाब आहे. या आंदोलनाचा फायदा कोणी घेतला नाही पाहिजे असे आवाहन करताना चर्चेतून मार्ग काढू शकतो असेही त्यांनी म्हटले. सर्वानी शांतता राखली पाहिजे. सर्व जाती पाती एकसमान आहे. सरकारसाठी हे एकसमान आहे. प्रत्येक घटकाला समान वाटा मिळाला पाहिजे. आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे आदेश दिलेले आहेत. आयोगाच्या पु्ण्यातील कार्यालयाला वाढीव जागा देण्यात आलेली आहे. आयोगाच्या सर्वेक्षणावर मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येणार आहेत. सरकारी यंत्रणेलाही आयोगाला सहाय्य करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. एखादा समाज मागास असेल तर त्यांचं मागासलेपण सिद्ध करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

”राज्य मागासवर्ग आयोग महिन्याभरात अहवाल सादर करणार आहे. त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यानंतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल. फेब्रुवारीमध्ये विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून आवश्यकतेनुसार मराठा आरक्षण दिलं जाईल. यातून इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची खात्री सरकार देत आहे.”

”आरक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. ते आपलं आराध्य दैवत आहे. इतर समाजावर अन्याय होईल, असा आरोप होतोय. तरीही मी शपथ घेतली आहे. कारण जो समाज अडचणीत आहेत, त्यांच्यामागे उभं राहण्याचं आपलं काम आहे. जेव्हा मी शपथ घेतो ती पूर्ण करतो, हे मागच्या दीड वर्षात आपण पाहिलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांना नम्र आवाहन आवाहन की, त्यांनी सरकारच्या भूमिकेकडे लक्ष द्यावं. सरकार म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. आवश्यक त्या सगळ्या प्रक्रिया सरकार करीत आहे.” असं आश्वासन शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

विरोधकांचा सभात्याग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी सभा त्याग केला. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर ठोस भाष्य केले नसल्याचे त्यांनी म्हटले. काही मुद्यांवर स्पष्टता येणे आवश्यक होते. मात्र, विरोधकांना बोलण्याची संधी दिली नसल्याचे विरोधकांनी म्हटले. विधानसभा अध्यक्षांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. 

निगडीतील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी

पुणे (दि.१९ डिसेंबर २०२३) निगडीतील खंडोबा मंदिरात श्री खंडोबा प्रतिष्ठानच्या मार्तंड भैरव षडरोत्सवानिमित्त (देव दीपावली) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता सोमवारी चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाने हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत झाली.
षडरोत्सवानिमित्त दररोज पहाटे काकड आरती, भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी चंपाषष्ठी निमित्त पहाटे श्री खंडोबा आणि महादेवाच्या पिंडीला महाअभिषेक करण्यात आला, दुपारी विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ दापोडी यांचा भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर जागरण गोंधळ तर सायंकाळी महाआरती करण्यात आली. आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सकाळ पासून पंचकृषितील भाविक भक्तांनी मंदिरात येऊन खंडेरायाचे व आयोध्या येथून आलेल्या श्रीराम पूजा मंगल अक्षता व कलशाचे ही दर्शन घेतले अशी माहिती अध्यक्ष तानाजी काळभोर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे अध्यक्ष तानाजी काळभोर, उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर, खजिनदार जंगली महाराज काळभोर, कार्याध्यक्ष शंकरआप्पा काळभोर, सचिव भाऊसाहेब काळभोर, विश्वस्त दीपक काळभोर, ॲड. राजेंद्र काळभोर, दिलीप काळभोर, राजेंद्र ल.काळभोर, चेतन काळभोर, राजू अ. काळभोर यांनी केले. पोलिस अधिकारी रणजित सावंत, तेजस्विनी कदम, राजेंद्र बहिरट, राजेंद्र बोरसे तसेच देहु देवस्थानचे विश्वस्त सुनिल महाराज मोरे, राजेंद्र महाराज मोरे, अमोल महाराज मोरे, उद्योजक जयदीप खापरे, रोहीदास गाडे, निखिल दरेकर, विजय तारक, माजी नगरसेविका सुमन पवळे, शर्मिला बाबर, कमल घोलप, अश्विनी बोबडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, पंकज भालेकर, हिरामण येळवंडे आदी उपस्थित होते. महाप्रसादाचे नियोजन भानुदास काळभोर, शंकर पा. काळभोर, दत्तात्रय पा. काळभोर, संभाजी काळभोर, अजय काळभोर, सुशांत मोहिते, विशाल मडके, इंद्रसिंग राजपूत, बबन जीवना, वैभव कुऱ्हाडे, विश्वास थोरात, सतिश झेंडे, योगेश काळभोर, अमोल काळभोर, हनुमंत रेवी, स्वातीताई इंजे, संस्कृती सुधीर ढगे, मार्तंड रेवी, प्रेमा रेवी, संदिप केंदळे यांनी केले.

हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर:सत्ताधाऱ्यांना संसदीय लोकशाहीचे यत्किंचितही गांभीर्य नाही;141खासदारांच्या निलंबनावर पवार संतप्त

१४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज ४९ खासदारांना निलंबित केलं गेलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.

कोणत्या तारखेला किती खासदार निलंबित झाले

तारीखलोकसभाराज्यसभा
14 डिसेंबर131
18 डिसेंबर4533
19 डिसेंबर49कुणीही नाही
एकूण10734

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या खासदारांचे निलंबन

सोमवारी म्हणजेच 18 डिसेंबर रोजी एकूण 78 खासदार (लोकसभा-33, राज्यसभा-45) निलंबित करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात इतक्या खासदारांचे निलंबन झाले आहे. यापूर्वी 1989 मध्ये राजीव सरकारमध्ये 63 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. गेल्या आठवड्यातही 14 खासदारांना निलंबित करण्यात आले होते.

नवी दिल्ली- एवढ्या मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन करणे म्हणजे सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करणे असून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला संसदीय लोकशाहीचे यत्किचिंतही गांभीर्य नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष , ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

संसदेतील कथित घुसखोरीच्या मुद्यावरून लोकसभेत गदारोळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यासह एकूण 49 खासदारांवर अशी कारवाई करण्यात आली. शरद पवार यांनी या निलबन सत्रावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

राष्ट्रवादीचे वेलमध्ये न जाण्याचे धोरण

शरद पवार म्हणाले की, सरकारने माहिती मागणाऱ्या सदस्यांवर कारवाई केली. मग त्या सुप्रिया सुळे असो की अमोल कोल्हे असो. सुप्रिया सुळे यांना 5 वेळा उत्तम संसदपटू म्हणून पारितोषिकि मिळाले. सभागृहात आमच्या पक्षाने नेहमीच वेलमध्ये न जाण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचे आम्ही तंतोतंत पालन करतो. मी स्वतः 56 वर्षांपासून राजकारणात आहे. मी सुद्धा एकदाही वेलमध्ये गेलो नाही. हे धोरण आम्ही कटाक्षाने पाळतो.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, काही लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून पास घेऊन सदनात प्रवेश केला. प्रेक्षक गॅलरीतून उडी टाकली. विशिष्ट प्रकारचा गॅस फोडायचा प्रयत्न केला. संसदेच्या बाहेरही तसाच प्रयत्न केला. ही अतिशय गंभीर बाब होती.

सरळ सरळ सत्तेचा गैरवापर

500 पेक्षा जास्त खासदार तिथे बसतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. याची माहिती आम्हाला द्या, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केल्यानंतर, ती माहिती देण्याची तयारी सत्ताधारी पक्षाची नाही. अशी कारवाई करणे हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे, असे शरद पवार म्हणाले.

सत्ताधाऱ्यांना यत्किंचितही गांभीर्य नाही

गृहमंत्र्यांनी सभागृहात येवून ते लोक कोण होते? त्यांचा हेतू काय होता? त्यांच्यावर काय कारवाई करणार याची माहिती द्यावी, ही मागणी केली. पण सरकारने त्यांच्यावरच कारवाई केली? ही यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्यावर कारवाई नाही, पण जे घडले त्याची माहिती मागतात म्हणून खासदारांवर ही कारवाई करण्यात आली. याचा अर्थ संसदीय लोकशाहीसंदर्भातील प्रतिष्ठा आणि रक्षण याबाबत सत्ताधाऱ्यांना यत्किंचितही गांभीर्य नाही याचे हे उदाहरण आहे, असेही शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले आहे.

लोकसभेत गदारोळ! सुप्रिया सुळे, शशी थरूर यांच्यासह 49 खासदार निलंबित

संसदेचं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. मंगळवारी लोकसभेतील ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात सुप्रिया सुळे , शशी थरुर यांचाही समावेश आहे. दोन्ही सभागृहात मिळून आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन झाले आहे.केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेतून खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. यात सुप्रिया सुळे, शशी थरुर, मोहम्मद फैजल, कार्ती चिदंबरम्, सुदीप बंडोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशन काळापुरते त्यांचे निलंबन असणार आहे.लोकसभेतून आज फारुख अब्दुल्ला, शशी थरूर, कार्ती चिदंबरम्, डिंपल यादव, एस टी हसन, दानिश अली आणि मनिष तिवारी यांच्यासह ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले. लोकसभेत गोंधळ घातल्याबद्दल विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली गेली. यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

बोलल्याप्रमाणे 24 तारखेच्या आत मराठा आरक्षण द्या,फसवण्याचा प्रयत्न करू नका ; जरांगेंचा इशारा

आंतरवाली सराटी-मी खरच सांगतो पूर्वीचा मराठा राहिला नाही. चालू असलेल्या अधिवेशनाची मूदत वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या, सरकारने आमचा अंत पाहू नये, अन्यथा सरकारला आमचे आंदोलन झेपवणार नाही. मग सरकारला देखील चांगलेच महागात पडेल, त्यांना असे वाटेल की, त्यावेळी निर्णय घेतला असता तर बरं झाले असते. आमचे आंदोलन त्यांना कधीही परवडणारं नाही. आमचे गनिमी कावे त्यांना आत्ताच सांगणार नाही. सरकारने विनाकारण आमचा अंत पाहू नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

सरकारने ध्यानावर येऊन भावना समजाव्या

जरांगे पुढे म्हणाले की, सरकारने ध्यानावर येऊन मराठा समाजाच्या भावना समजून घ्या, ही समाजाची खदखद आहे. ही संयमाची भावना सरकारने समजून घ्या, जर समाजाची खदखद बाहेर पडली तर कोणालाही परवडणारे नाही. आता समाजापेक्षा जातीपेक्षा कोणालाच मोठं समाज समजत नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठं मानायचं नाही, असे समाजाने ठरवले आहे. त्यामुळे सरकारने ही भावना समजून घ्यावी, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. विनाकारण मराठ्यांना त्रास दिला तर समाज आता ऐकणार नाही. हे देखील सरकारने समजून घ्यावे.

..तर परिणामी आमचा नाईलाज राहणार नाही

जरांगे म्हणाले की, भुजबळांचे ऐकून सरकारने आमच्या मराठा समाजाला अडचणीत आणू नये. एका व्यक्तीच्या ऐकून तुम्ही आमचे नुकसान करु पाहत असाल तर त्याला आमचा नाईलाज राहिल. मग मात्र आम्ही मागे हटणार नाही, अजिबात नाही म्हणजे नाही, असे म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. तर सरकारला देखील सावध होण्याचा इशारा दिला. आधी मराठ्यांना आरक्षण द्या, त्यानंतर टक्केवारी वाढवायची की नाही तो निर्णय घ्या, असेही ते म्हणाले.

भुजबळ मराठा-ओबीसीत वाद लावतो

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा तोंडसूख घेतले. भुजबळ मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. भुजबळ त्यांची राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप त्यांनी केला. वंजारी, आणि धनगर समाजाला मराठ्यांविरोधात भडकविण्याचा प्रयत्न भुजबळ करत असल्याची टीका त्यांनी केली.

जरांगे म्हणाले की, किती दिवस सरकार मराठ्यांना झुलवत ठेवणार आहे. त्यामुळे समाजाला दिशा ठरवावी लागणार आहे. आई ओबीसी असले तर ती जात मुलांना लावा. मराठवाडा-विदर्भातील मराठे एकच असल्याचे ते म्हणाले. आरक्षण न दिल्यास 24 डिसेंबर रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, यावर मी ठाम आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत गतिमानता पंधरवड्याचे ३० डिसेंबरपर्यंत आयोजन

पुणे, दि. १९: उद्योग संचालनालयाच्यावतीने ३० डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत गतिमानता पंधरवडा घोषित केला असून याबाबत जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

या पंधरवडा मोहिमेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत अधिकाधिक अर्ज प्राप्त करणे, ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर अर्ज भरणे, योजनेबाबत प्रत्येक तालुक्यात या योजनेची प्रचार व प्रसिद्धी करणे आदी कामे करण्यात येणार आहे. योजनेचे अर्ज नि: शुल्क भरण्यात येणार आहेत.

लाभार्थ्यांचे अर्ज त्यांच्या कागदपत्रासहीत स्विकारण्यात येणार असून त्याअर्जाची तात्काळ छाननी करुन बँकेकडे पाठविण्यात येणार आहेत. तसेच ती प्रकरणे प्राधान्याने मंजूर करुन घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रयत्नही केले जाणार आहेत. यामध्ये बँकेकडून उपयोगिता प्रमाणपत्रे जमा करणे, प्रलंबित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रकरणे मार्गी लावणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद व तहसिल कार्यालय या ठिकाणी संबंधित अधिकारी, उद्योग निरीक्षक हे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नागरिकांच्या शंका व अडचणीचे निराकरणही करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी दिली आहे.

रेशनकार्ड अपडेटसाठी साहेबाला लाच द्यावी लागते ..सांगून पैसे उकळणाऱ्याला रंगेहाथ पकडले.

पुणे : रेशन कार्ड पूर्ववत करणेसाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील असे सांगून 2800 रुपये लाच स्वीकारताना एका खाजगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शंकर शिवाजी क्षिरसागर (वय 32 रा. पुणे) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुणे एसीबीने ही कारवाई सोमवारी (दि.18) जुनी जिल्हा परिषदेसमोरील फुटपाथवर केली.याबाबत 67 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात 5 डिसेंबर रोजी तक्रार दिली आहे. तक्रारदार हे त्यांच्या नावावर असलेली शिधापत्रिका पूर्ववत करणेसाठी व अन्न धान्य पुरवठा चालू करणेकरिता जुनी जिल्हा परिषद कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांना भेटले होते. त्यावेळी कार्यालयात असलेला खासगी इसम शंकर क्षीरसागर याने तकरारदार यांना साहेबांचे काम मी करतो व तुमचे रेशनकार्ड काढून देतो असे सांगितले. यासाठी क्षिरसागर याने तक्रारदार यांचेकडे सुरवातीला 4 हजार 500 रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली.

एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता शंकर क्षिरसागर याने तक्रारदार यांचे शिधापत्रिकेचे काम करून देण्यासाठी
साहेबांना पैसे द्यावे लागतील असे सांगून साडेचार हजार रुपये लाच मागून तडजोड़ी अंती 2 हजार 800 रुपये
लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या जिल्हा परिषदेसमोरील फुटपाथवर सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना शंकर क्षिरसागर याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव ,पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर , महिला पोलीस नाईक वनिता गोरे,पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, चालक कदम यांच्या पथकाने केली.

मावळ तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे विकास योजनांची माहिती

पुणे, दि. १९: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ३२ गावात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यात्रेत महिला, विद्यार्थी, खेळाडू आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २२ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार आहे. मावळ तालुक्यात यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये २१ हजार नागरिकांनी सहभाग घेतला आहे. तसेच ६ हजार ६२४ नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला. यात्रेत ३ हजार २९० महिला, १ हजार ११२ विद्यार्थी, १०४ खेळाडू आणि १०२ स्थानिक कलाकार कलाकारांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.

तालुक्यात ३९५ ठिकाणी आरोग्य शिबाराचे आयोजन करुन क्षयरोगासाठी ७८ आणि सिकलसेल समस्येबाबत ६३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. १५ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आयुष्मान योजना कार्ड वितरीत करण्यात आले. विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेद्वारे १५ शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधला. १५ संगणकीकृत अभिलेख्यावर कार्यवाही करण्यात आली आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत नमुना – ‘८ अ’ चे उतारे वितरण करण्यात येत आहेत.

तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आकर्षक एलडी चित्ररथाद्वारे प्रसिद्धी करण्यात येत असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होऊन माहिती घेत आहेत. यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती पुस्तिका, घडीपत्रिकेचे वाटपही करण्यात येत आहे. आपल्या गावाताच योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

यात्रा २० डिसेंबर रोजी थुगांव व मळवंडी ढोरे, २१ डिसेंबर रोजी येलघोल व डोणे, २२ डिसेंबर रोजी आढले बु व आढले खु आणि २३ डिसेंबर रोजी ओव्हाळे व दिवड गावात येणार असून नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी केले आहे.

‘सॅम बहादूर’ चित्रपट: राष्ट्रीय नेत्यांच्या विकृतीकरणाचा निंद्य प्रयत्न.. चित्रपटावर बंदी’ची मागणी… काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी


पुणे दि १९ –असंख्य चित्रपट,वेबसेरीज आणि माध्यमातून मोदी सरकारचा उदोउदो करणारे धोरण गेल्या ८ वर्षात अंमलात येत असताना दुसरीकडे नेहरू ,गांधी यांच्यावर टीका करणारे धोरण अवलंबले जात आहे या पार्श्वभूमीवर आता निर्माता – दिग्दर्शक रॅानी स्क्रुवाला व मेधना गुजराल यांनी प्रदर्शीत केलेला “सॅम बहादुर” हा हिंदी चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधान, बँकांचे राष्ट्रीयकरण व पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या देशाच्या कणखर नेत्या, श्रीमती इंदीराजी गांघी यांचे चारीत्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत असून तो अत्यंत निंदनीय आहे .या चित्रपटावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारीयांनी केली आहे.
ते म्हणाले,’ सदर चित्रपटात, श्रीमती इंदीराजींच्या निर्णय क्षमते विषयी व चारित्र्या विषयी शंका ऊपस्थित करणारे, गैरसमज वाढवणारे अवास्तव व अनावश्यक प्रसंग दाखवले आहेत.
सदरच्या कथित व अवास्तवदर्शी चित्रपटातुन ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ ऊभारणाऱ्या काँग्रेस नेत्यां विषयी, पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयश्री विषयी, तथ्यहीन प्रसंग दर्शवुन, जाणीव पुर्वक गैरसमज दाखवल्याचे आढळून येते.
वास्तवतेला तिलांजली देत व असत्याचा आधार घेत, काल्पनिक चरीत्रे निर्माण करून नेहरू_गांधी कुटुंबियां प्रती, द्वेषाने पछाडलेल्या हिन मानसिकतेचे दर्शन ‘सॅम बहादुर’ चित्रपटातुन होते आहे.
पहीले पंतप्रधान पंडीत नेहरू व श्रीमती इंदीराजी गांधी यांना सतत कमकुवत, निर्णय क्षमताहिन व चारित्र्यहिन दाखवण्याचा केलेला प्रयत्न, निंदनीय असुन काँग्रेसच्या आकसा पोटीच्, राजकीय महाशक्तींच्या पाठबळावर या चित्रपटाची निर्मिती झाली असल्याचा आरोप ही काँग्रेस ने केला.
याचा तिव्र निषेध व्यक्त करीत जनतेने अशा चित्रपटावर बहीष्कार टाकावा तसेच यावर बंदी आणण्याची मागणी देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

नागपूर, दि. 19 : मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. या इमारतींना निधी उपलब्ध करून देणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

ऑपेरा हाऊस येथील मेहता महल या इमारतीबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान सदस्य रवींद्र वायकर, योगेश सागर, अजय चौधरी, मिहीर कोटेचा, अमित देशमुख, वर्षा गायकवाड यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

याविषयी माहिती देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, मुंबईत इमारतीच्या अवस्थेनुसार सी -१, सी -२, सी – ३ अशा श्रेणी करण्यात आल्या आहेत.  सी – १ श्रेणी ही धोकादायक इमारतींची आहे. या श्रेणीत मुंबई शहरात २१० इमारती आहेत. मोडकळीस आलेल्या  इमारतींच्याबाबत एक तांत्रिक सल्लागार समिती आहे. ही समिती  उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात येईल. मुंबईत सी -१ या श्रेणीत इमारती कशाप्रकारे घेण्यात आल्या, याचीही तपासणी करण्यात येईल.

या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तांत्रिक सल्लागार समितीत सुधारणा करणे व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याच्या सूचना केल्या.

अयोध्या ही सर्वांची पुण्यभूमी आणि मातृभूमी- कवी डॉ. कुमार विश्वास 

; पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे आयोजित ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाच्या तिस-या दिवशी कार्यक्रमाचा ह्रदय वातावरणात समारोप 

पुणे : आपण मूळ अमूक गावातील आहोत, असे प्रत्येकजण सांगतो. मात्र, आपली उत्पत्ती ही मनू राजा च्या कुळातून झाली आहे. मनू हे अयोध्येचे प्रथम सूर्यवंशी राजे होते. त्यामुळे अयोध्या ही आपल्या सर्वांची पुण्यभूमी आणि मातृभूमी आहे. तपस्वी, त्यागी, वैरागी असे प्रभू श्रीरामांचे अयोध्येतील कुटुंब होते. त्यामुळे या परिवारातील प्रत्येकाच्या कार्याचा उद्देश समजून घेत त्यांचा आदर्श आपण घ्यायला हवा, असे सांगत कवी प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी प्रभू श्रीराम, अयोध्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या कार्याचे वर्णन आपल्या अमोघ वाणीतून केले. 

पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ जवळील एसएसपीएमएस च्या मैदानात करण्यात आले होते. त्याच्या समारोपाच्या तिस-या दिवशी डॉ. कुमार विश्वास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यातून ५ हजार हून अधिक समाज बांधव उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिया वर रामचंद्र की जय च्या जयघोषात भगवे ध्वज आसमंतात फडकत होते. तर, रामजी की निकली सवारी… सालासर हनुमान…सिया जी बहिनिया हमार हो, राम लगी हे पहुनवा…यांसह विविध गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनावर अधिराज्य गाजविले. तीन दिवसीय कार्यक्रमातून श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न अग्रवाल समाजातर्फे करण्यात आला आहे. कविता तिवारी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. 

डॉ. कुमार विश्वास म्हणाले, श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघन यांसह त्यांच्या माता कौसल्या, सुमित्रा, कैकयी आणि सूना यांचे कार्य आदर्शवत होते. आज आपल्यासमोर परिवाराची चुकीची व्याख्या ठेवून आक्रमण होत आहे. राम जिथे राहतील तिथे अयोध्या असेल, असा विचार या परिवाराचा होता. रामरुपी आदर्शाच्या अमृताचा प्रसाद पृथ्वीवर सर्वत्र वाटला जावा, याकरिता माता कैकयी ने अनेक अटी शर्ती ठेवल्या. त्याबद्दल, सर्वांनी उलटसुलट बोललेले ऐकून घेत आपल्या कार्यातून जणू हे वेगळे विषच प्यायले होते. मात्र, हे पृथ्वीच्या कल्याणासाठी प्यायलेले हे विष म्हणजे कैकयी मध्ये शिवतत्व निर्माण झाले, असेच म्हणावे लागेल. 

ते पुढे म्हणाले, आठ चक्र आणि नऊ दरवाजांची ईश्वरापुरी म्हणजे अयोध्या असे अयोध्येचे वेदांमध्ये वर्णन आहे. वाल्मिकी रामायणात प्रत्यक्ष इतिहास मांडला असून इतर कथांमध्ये भक्ती, रस यांचा उल्लेख आढळतो. प्रत्यक्षात आपला देश हा दोन संस्कृतींवर आधारलेला आहे. ती म्हणजे ऋषी आणि कृषी संस्कृती. 

प्रभू श्रीरामांचा जन्म हा ऋषींनी दिलेल्या फळाच्या प्रसादाद्वारे तर, माता सीतेचा जन्म हा राजा जनक शेतात नांगर चालविताना सापडलेल्या कुंभातून झाला आहे. त्यामुळे आपला देश प्रभू राम आणि माता सीता यांच्याशी निगडीत असलेल्या ऋषी आणि कृषी संस्कृतीवर आधारलेला दिसतो. सूर्य, पृथ्वी आणि वायू म्हणजेच प्रभू श्रीराम, माता सीता व हनुमान अशांच्या गुणांशी संबंधित आहे. त्यामुळे आपण सर्व भारतीय मूळ अयोध्यावासी आहोत. 

१.७२ लाख वीजग्राहकांकडून २ कोटी ६ लाख रुपयांची वार्षिक बचत

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राची राज्यात आघाडी

पुणेदि. १९ डिसेंबर २०२३: महावितरणच्या वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ७२ हजार ४५० पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. या वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिल्याने त्यांची तब्बल २ कोटी ६ लाख ९४ हजार रुपयांची वार्षिक बचत होत आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यातील ४ लाख ३५ हजार ९०२ वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे. यातील सर्वाधिक ३९.६ टक्के ग्राहक पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. तर पुणे परिमंडलातील १ लाख १५ हजार ४३५ ग्राहक राज्यात सर्वाधिक संख्येने या योजनेत सहभागी झाले आहेत.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे.

आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ‘गो-ग्रीन’ योजना पर्यावरण रक्षणासाठी देखील महत्वाची आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल ॲप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरल्याचा पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ‘गो-ग्रीन’ योजनेत सर्व लघुदाब ग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे जिल्ह्यात १ लाख २३ हजार ३९६ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांची १ कोटी ४८ लाख ७ हजार ५२० रुपयांची वार्षिक बचत होत आहे. तर या योजनेत सहभागी सातारा जिल्ह्यातील ११ हजार ५२५ ग्राहकांचे १३ लाख ८३ हजार रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार १९७ ग्राहकांचे १४ लाख ६३ हजार ६४० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १५ हजार ४५७ ग्राहकांचे १८ लाख ५४ हजार ८४० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ९ हजार ८७५ ग्राहकांच्या ११ लाख ८५ हजार रुपयांची वीजबिलात वार्षिक बचत होत आहे.

वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

मोजमाप पुस्तिका गहाळ प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. 19 : धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य नरेंद्र दराडे यांनी सहभाग घेतला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि चालढकल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) केली जाईल.

मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. १९ : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो.  न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

00000

‘शिवरायांचा छावा’ अवतरणार

तेजपुंज रुप ज्याचे, अचाट शौर्य असे उरी..

कलांवर ही असे प्रभुत्त्व, केवळ देशाभिमान ध्यानीमनी..

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं  अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे ‘शिवरायांचा छावा’ साकारणार कोण..? या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. तत्पूर्वी ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. 

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. कला-प्रतीक रेडीज, वेशभूषा-हितेंद्र कापोपारा, रंगभूषा-केशभूषा-शैलेश केसकर, साहसदृश्ये-बब्बू खन्ना, नृत्य दिग्दर्शक-विष्णु देवा, किरण बोरकर, ध्वनिमुद्रन/साउंड डिझाईन-निखिल लांजेकर आणि कार्यकारी निर्माता प्रखर मोदी अशी इतर श्रेयनामावली आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे.

१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम

एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार.

मुंबई –रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवीमुंबई , मुंबई येथे होणार आहे. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे.  ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. १५ जानेवारी पासून प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे व त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.

व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना १०० व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे.

स्पर्धेची रोख पारितोषिके

एकांकिका स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २,००,०००/- (खास स्पर्धेसाठी लिखाण केलेल्या एकांकिकेस) अथवा सर्वोत्कृष्ट १,००,०००/-, उत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्तम रू. ५०,०००/-, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके  रू. २५,०००/-

बालनाट्य स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्कृष्ट रू. ५०,०००/-, उत्तम रू. २५,०००/-, तर  तीन उत्तेजनार्थ रू. १०,०००/-

नाट्य अभिवाचन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-,  उत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्तम रू. १०,०००/-, दोन  उत्तेजनार्थ रू. ५,०००/-

नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-,  उत्कृष्ट रू. १५,०००/-,  उत्तम रू. १०,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. ५,०००/-

एकपात्री / नाट्यछटा स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्कृष्ट रू. १०,०००/-,  उत्तम रू. ५,०००/-,  दोन उत्तेजनार्थ रू. २,५००/-

लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु. १५,०००/-, रु. १०,०००/- , रु. ५०००/- व स्मृतीचिन्ह. बालनाट्य स्पर्धेसाठी रु. ७५००/-, रु. ५०००/-, २५००/- देण्यात येणार आहेत.

तसेच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस देखील भरघोस अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलावंत , तंत्रज्ञ यांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रू. १०००/- तर बालनाट्यासाठी रू. ५००/- व इतर सर्व स्पर्धांसाठी रू. १००/- राहील.

या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विविध स्पर्धांची माहिती, नियामवली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक ३१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख व सहयोगी प्रमुख यांच्या संपर्क क्रमांक वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व  जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी संस्थां, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.