पुणे-बी.एम.सी. सॉफ्टवेअर इंडिया आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या मदतीने पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) बी. टी. सहानी नवीन हिंद हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी युरोपातील एस्टोनिया येथे झालेल्या रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन पोडियम पोझिशन्स जिंकत उल्लेखनीय यश मिळविले.
या स्पर्धेत ४० देशांतून पाच हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये या पुण्याच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील (स्टेम)उत्तम शिक्षण आणि नावीन्यपूर्ण तायात उत्तम कामगिरीकरणाऱ्या रोबोटेक्सइंडिया, याना-नफा संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये वाढवून परिवर्तन करण्याची आपली कटिबद्धता विविध उपक्रमांतून कायमराखली आहे. टॅलिन, एस्टोनिया येथे नुकतीच संपन्न झालेल्या रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय अंजिक्यपद (रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२३) स्पर्धेत महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे या कटिबद्धतेचेच प्रतीक आहे.
या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची झलक दाखविणाऱ्या दोन प्रकल्पांना विजतेपद मिळाले. आरती चव्हाण आणि अंबिका ठाकूर या आठवीतील विद्यार्थिनींनी जलप्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी बनवलेली स्मार्ट रिव्हरक्लिनिंगबोट अर्थात नदीतील कचरा गोळा करणारी स्मार्ट बोट यशाची मानकरी ठरली, तर नवव्या इयत्तेतील दिपाली साळवे आणि बिपिन तिवारी यांच्या अॅग्रिकोसड्रोन या प्रकल्पाने शेतकऱ्यांसाठी एक क्रांतीकारी उपाय योजना सादर केली आहे. या ड्रोनच्या साह्याने पावसाच्या ढगातील खनिजे शोधून शेतकऱ्यांना परिपूर्ण खतांची निवड करण्यात मदत करणे शक्य झाले आहे.
बी. टी. सहानी स्कूल मधील शंभरहून अधिक संघांनी रोबोटेक्स इंडियाने यंदा आयोजित केलेल्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धांमध्ये भाग घेतला. विशेष म्हणजे, त्यातील चार संघांनी राष्ट्रीय स्तरावर पोडियम पोझिशन्स मिळवून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोबोटेक्स अजिंक्य पद स्पर्धेत ही यश मिळविले. या जागतिक स्पर्धेचे हे यंदाचे २४ वे वर्ष असून, ती जगभरातील सर्वांत मोठ्या रोबोटिक्स महोत्सवां पैकी एक आहे.
पुणे महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते आज बी. टी. सहानी नवीन हिंद विद्यालयाच्या या विजेत्या संघांना गौरविण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, “बी. एम. सी. सॉफ्टवेअरने, सामाजिक जबाबदारी उपक्रमाद्वारे, आठ विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटचालीत मदत करण्यात महत्त्व पूर्ण भूमिका बजावली आहे. या कंपनीने दिलेल्या निधीमुळे या विद्यार्थ्यांना पासपोर्ट, व्हिसा आणि विमान तिकीट या सारख्या अत्यावश्यक बाबी सुलभ झाल्या आणि या जागतिक स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सहभाग ही सुनिश्चित झाला.
“आम्ही अशा युगाचे साक्षीदार आहोत जिथे भारत, एक देश म्हणून, तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची नवी व्याख्या निश्चित करत आहे.या वाटचालीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला नव्या दिशा शोधण्यासाठी मदत करण्याची आमची भूमिका आहे.या अनुषंगाने रोबोटेक्स इंडिया सोबतच्या आमची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे.देशभरातील विद्यार्थ्यांना वर्तमानात आणि भविष्यातही भरभराटीची संधीउपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे बी. एम. सी.सॉफ्टवेअरचे भारतातील प्रमुख साकार आनंद म्हणाले.
“बी एम सी आणि रोबोटेक्स इंडिया लिंग समानतेला चालना देण्यासाठी आणि वंचित समुदायांनाही डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा भारताच्या भावी कार्यशक्तीला आकार देण्याच्या प्रयत्नांचा हा आधारस्तंभ आहे. स्टेम प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आम्ही मुलां मधील सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहोत.यामुळे ही मुले केवळ सक्षम बनत नाहीत तर येणाऱ्या पिढ्यांसाठी परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता ही निर्माण होते,” असे बी. एम. सी. सॉफ्टवेअर मधील कॉर्पोरेट सिटीझनशिप आणि डी ई आयचे ग्लोबल हेड वेंडीरेंटश्लेर म्हणाले.
रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल म्हणाल्या, “रोबोटेक्स इंडियामध्ये, आम्ही देशभरातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. या मार्गातील अडथळे दूर करून, त्यांना विजया पर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी बी. एम. सी. सोबतची ही भागीदारी आणि आम्ही एकत्र सुरू केलेले उपक्रम नाविन्यपूर्णता आणि विविधतेचा स्वीकार करून विविध पार्श्वभूमीवरील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि जागतिक अशा दोन्ही स्तरावर त्यांची अत्युकृष्ट क्षमता दाखविण्यासाठी एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या आमच्या दृढ समर्पणाचा दाखला आहे. राष्ट्रीय स्तरावर’ शिक्षण आणि रोजगारातील तफावत दूर करण्यासाठी ही याची मदत होते.
वीज आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधनसामुग्री, सहजपणे उपलब्ध नसतानाही दुर्बल सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या बी.टी. सहानी शाळेतील एकहजार हूनअधिक विद्यार्थ्यांना २०२१ पासून रोबोटेक्स इंडियाच्या परिवर्तनात्मक कार्यक्रमांद्वारे भविष्यातील तंत्रज्ञान कौशल्यांची ओळख करून देण्यात आली आहे.
बी एम सी सॉफ्टवेअर इंडिया आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या सहकार्यामुळे बी. टी. सहानी शाळेत पहिली “स्टेमरोबोटिक्सलॅब” ची स्थापना झाली आहे. ही अत्याधु निक प्रयोगशाळा एक हजार विद्यार्थ्यांना कोडींग, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आय ओ टी मधील आवश्यक कौशल्ये प्रदान करण्यासाठी सुसज्ज आहे, ज्यामुळे भविष्यातील रोजगाराच्या संधींचा फायदा घेण्यासाठी भक्कम पाया तयार झालेला असेल.
स्टेम शिक्षणासाठी बी एम सी सॉफ्टवेअरची बांधिलकी पुण्याच्या पलीकडे विस्तारली असून, विविध ठिकाणच्या सरकारी शाळांमधील सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, स्टेमलॅब आणि’ रोबो बनवणाऱ्या मुली’ या अनोख्या उपक्रमांचा फायदा होत आहे. पुणे महानगरपालिका आणि रोबोटेक्स इंडिया यांच्यातील संयुक्त उपक्रमाचा उद्देश पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना २०२४ पर्यंत रोबोटिक्स, कोडिंग, ए आय आणि भविष्यातील इतर कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हा आहे. पुढील तीन वर्षांत महानगरपालिकेच्या २०० शाळांमध्ये स्टेमरोबोटिक्स लॅबची स्थापना करण्याचे उद्दिष्ट आहे. स्टेम शिक्षणात प्रगती करणे, डिजिटल विषमता कमी करणे आणि तंत्रज्ञानावर आधारित भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांसह विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे या आपल्याध्येयांसाठी रोबोटिक्स इंडिया कटिबद्ध आहे.
रोबोटेक्स इंडियाबद्दल:रोबोटेक्स इंडियाने शहरी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील दहालाख विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रशिक्षण दिले आहे. भविष्यासाठी विद्यार्थी घडविण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील नावीन्यपूर्णतेत प्रभावी कौशल्य मिळविण्याकरिता जागतिक दर्जाची गुणवत्ता एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी शिक्षण आणि कौशल्ययातील तफावत दूर करणे, समाजातील डिजिटल विषमता दूर करणे आणि भविष्यकालीन पिढी घडविताना रोजगार निर्मिती करण्याकरिता प्रयत्न करत आहे.
बी. एम. सी. बद्दल: बी एम सी फोर्ब्सग्लोबल ५० मधील ८६ टक्के आणि जगभरातील ग्राहक व भागीदारांबरोबर त्यांचे भविष्य घडविण्यासाठी कार्य करते. नावीन्यपूर्णतेच्या इतिहासासह, ऑटोमेशनमधील आघाडीची कंपनी आणि ऑपरेशन्स आणि सेवा व्यवस्थापनासाठी उपाययोजना पुरविणारी ही एक आघाडीची कंपनी आहे. संस्थांना एक स्वायत्त डिजिटल उद्योग बनण्यासाठी भविष्यातील संधींचा लाभ घेण्याकरिता पुरेसा वेळ आणि स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.
रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे चमकदार यश
वयोवृद्ध सासुला घराबाहेर काढल्यामुळे न्यायालयाचा सुनेला दनका 1 लाख रुपये दंड ठोठावीला
पुणे, दि.२१.१२.२०२३:- कौटुंबिक वादातून वयोवृद्ध सासू XYZ वय ८५ वर्ष व XYZ वय वर्ष ६० यांना XYZ व नात XYZ यांनी संगनमताने कोरेगाव पार्क येथील राहत्या घरातून सासूला व नवऱ्याला हाकलून दिले. वयोवृद्ध सासू ह्या आजारी असल्यामुळे त्यांचे शरीर कोणत्याही प्रकारचे काम करू शकत नाही. गैरअर्जदार ह्या कोरेगाव पार्क येथील तीन मजली बंगलो मध्ये एकट्याच राहत असून त्या ठिकाणी ते ‘इंफॉरेन’ या नावाने व्यवसाय चालवत आहेत. तसेच त्यांची मुलगी म्हणजेच अर्जदार यांची नात XYZ हे इंग्लंड (यू.के.) या देशांमधील मॅकिन्से या कंपनी मध्ये वार्षिक उत्पन्न ₹५० लाख रुपये कमवत आहे. तरीदेखील सुनेने आणि नातीने मिळून अर्जदार यांना सांभाळण्याची जबाबदारी न घेता घरातून हाकलून दिले आहे.
जबरदस्तीने बेदखल केल्यानंतर, श्रीमती XYZ यांनी पोलिस आणि इतर प्राधिकरणांकडे मदत मागितली, परंतु त्यांना कुठलीही दाद मिळाली नाही. त्यानंतर, तिने घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत अर्ज दाखल केला. सासूने सदरील घरगुती हिंसाचार संदर्भात कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत मे. बिराजदार साहेब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर पुणे, यांच्याकडे दाद मागितली असता मे.न्यायालयाने सुनेला व नातीला नोटीस देऊन सदरील प्रकरणांमध्ये खुलासा मागितला व दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी मे.न्यायालयाने सासूला तिच्या राहत्या घरापासून बाहेर काढता येणार नाही असा आदेश पारित केला परंतु सुनेने सदरील आदेशाला न जुमानता व वयोवृद्ध सासूला घराच्या बाहेर ठेवून मे.कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला. सदरील झालेल्या अवमाना संदर्भात सासूने पुन्हा मे. कोर्टामध्ये दाद मागितली असता मे. बिराजदार साहेब कोर्टाने सुनेला फटकारले व सुनेला पंधरा दिवसाच्या आत १०००००/रुपये दंड मेहरबान कोर्टात जमा करण्याचे व प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला रक्कम रुपये २५०००/- देण्याचा आदेश दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी पारित करण्यात आला तसेच न्यायालयाने येरवडा पोलीस ठाण्याला श्रीमती XYZ याना संरक्षण देण्याचे व पंधरा दिवसांत घरात प्रवेश देण्याचे आदेश पारित केले आहे.
सदरील प्रकरणांमध्ये सासूच्या बाजूने विधीतज्ञ म्हणून अॅड तोसिफ शेख, अॅड आशा जाधव, अॅड स्वप्निल गिरमे,अॅड क्रांती सहाने ,अॅड महेश गवळी,अॅड सुरज जाधव,अॅड आदिल दातरंगे,अॅड नुपूर अरगडे,अॅड जोत्सना पडघमकर यांनी काम पाहिले.
जम्मू काश्मिरात दहशतवादी हल्ला:पुँछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला, गोळीबार सुरू
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. यादरम्यान गोळीबारही होत आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. वृत्तानुसार, ज्या भागात हल्ला झाला त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.19-20 डिसेंबरच्या मध्यरात्री पुँछमधील सुरनकोट जिल्ह्यातील पोलीस छावणीत स्फोट झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी (20 जानेवारी) या घटनेची माहिती दिली. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, पोलीस छावणीत उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
जम्मू-काश्मिरातील मागील पाच दहशतवादी घटना…
पहिली: 17 नोव्हेंबर रोजी 2 चकमकी, 6 दहशतवादी मारले गेले
17 नोव्हेंबर रोजी राजौरी आणि कुलगाममध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 6 दहशतवादी मारले गेले. पहिली चकमक 16 नोव्हेंबरला कुलगाममध्ये सुरू झाली आणि 17 नोव्हेंबरपर्यंत चालली. यामध्ये 5 दहशतवादी मारले गेले. नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगमध्ये या सर्वांचा सहभाग होता. दुसरी चकमक राजौरी येथे झाली, ज्यामध्ये 1 दहशतवादी मारला गेला.
दुसरी: ऑक्टोबरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या
श्रीनगरमधील ऑक्टोबर इदगाह परिसरात एका दहशतवाद्याने पोलीस निरीक्षकावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्या पोटात, मानेवर आणि डोळ्यांना गोळ्या लागल्या. मसरूर अली वानी असे या निरीक्षकाचे नाव आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मसरूर वानी स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना हा हल्ला झाला.
तिसरी: सप्टेंबरमध्ये 3 अधिकारी, 2 सैनिक शहीद झाले
13 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत 3 अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले होते. शहीद झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये लष्करातील एक कर्नल, एक मेजर आणि पोलिस डीएसपी यांचा समावेश आहे. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. यादरम्यान दोन दहशतवादीही मारले गेले. येथे शोध सुरू असताना लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला.
चौथी : 9 ऑगस्ट रोजी 6 दहशतवादी पकडले गेले
15 ऑगस्टपूर्वी सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना अटक केली होती. पहिले प्रकरण 9 ऑगस्टच्या रात्रीचे आहे, जिथे कोकरनागच्या अथलन गडोले येथे तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. या चकमकीत लष्कराच्या जवानासह तीन जण जखमी झाले. दुसरे प्रकरण उरीचे आहे, जिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लष्कराच्या 3 दहशतवाद्यांना पकडले.
पाचवी : 6 ऑगस्ट रोजी तीन दहशतवादी मारले गेले
6 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दहशतवादी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्याच दिवशी संध्याकाळी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेला आणखी एक दहशतवादी मारला गेला.
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने पश्चिम भारतात पार केला १५ दशलक्ष ग्राहकांचा टप्पा
मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने आज भारताच्या उत्साही आणि वैविध्यपूर्ण अशा पश्चिम भागात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड पार केल्याची घोषणा केली. सातत्याने नवीन मापदंड प्रस्थापित करताना HMSI ने १५ दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडून एक उल्लेखनीय कामगिरी केली असून या प्रदेशातील दुचाकी ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह आणि पसंतीची निवड म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे.
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिमेकडील बाजारपेठेतील पहिले १० दशलक्ष ग्राहक मिळविण्यासाठी HMSI ला १७ वर्षांहून अधिक काळ लागला, तरीही त्यांनी केवळ ६ वर्षांपेक्षा कमी कालावधीत नंतरचे ५ दशलक्ष ग्राहक मिळवले. विशेष बाब म्हणजे टचपॉइंट्सची वाढलेली संख्या, रेड विंग आणि बिगविंग या दोन्ही उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार, विश्वसनीय ग्राहक सेवा आणि वर्धित ग्राहक कनेक्ट यामुळे ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास झपाट्याने वाढला आहे.
या महत्वपूर्ण कामगिरी बाबत बोलताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री.योगेश माथूर म्हणाले, “डीलरशिप, सेवा केंद्र आणि प्रभावी उत्पादन लाइनअप यांच्या विस्तृत नेटवर्कमुळे गेल्या काही वर्षांत एचएमएसआयने पश्चिम भारतात मजबूत स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या मोटारसायकली आणि स्कूटर्सच्या विविध श्रेणींनी या प्रदेशातील चोखंदळ ग्राहकांच्या विविध गरजा आणि प्राधान्यक्रम पूर्ण केला आहे. पश्चिम भारतातील १५ दशलक्ष ग्राहकांचा टप्पा पार करणे ही एक अचंबित करणारी कामगिरी आहे. लोकांनी होंडा ब्रँडवर दाखवलेला विश्वास आणि प्रेम पाहून आम्हाला आनंद झाला आहे.”
दर्जेदार उत्पादने आणि सेवा देऊन ग्राहकांना आनंदित करताना:
ग्राहकांच्या वाढत्या वैयक्तिक दळणवळणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, HMSI या राज्यांमध्ये ४९% अशा मजबूत बाजारपेठीय हिस्स्यासह स्कूटरीकरणात आघाडीवर आहे. होंडा अॅक्टिव्हा ही या प्रदेशात पहिल्या क्रमांकावरील विकली जाणारी गाडी आहे. कंपनीचा पश्चिम विभागातील दुचाकी बाजारपेठेत (स्कूटर आणि मोटारसायकल या दोन्हींसह) एकूण बाजारपेठीय हिस्सा ३६.४% आहे. तसेच, ग्राहक आता तंत्रज्ञान प्रवीण बनत आहेत आणि वाहनांच्या बुकिंग आणि खरेदीसाठी ऑनलाइन चौकशी करत असल्यामुळे HMSI ने ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रयत्न वाढवले आहेत आणि त्याच वेळी त्याच्या डीलरशिपवर मिळणारा अनुभवही उंचावला आहे.
पश्चिम भारतात होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया:
११०० हून अधिक टचपॉइंट्सच्या विस्तृत नेटवर्कसह गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या पश्चिम राज्यांमध्ये HMSI चे मजबूत स्थान आहे. ग्राहकांना राइडिंगचा आनंद देणार्या होंडाच्या विविध श्रेणीतील स्कूटर आहेत ज्यात अॅक्टिव्हा प्लस स्पेशल एडिशन, अॅक्टिव्हा 125, डीओ प्लस Repsol Edition आणि डीओ 125 आणि शाईन 100, सीडी 110 ड्रीम डिलक्स, लिवो, शाईन 125, SP125 प्लस स्पोर्ट्स एडिशन, युनिकॉर्न, SP160, Hornet 2.0+Repsol Edition आणि CB200X सारख्या मोटरसायकल असून त्या रेडविंग आउटलेटवर उपलब्ध आहेत.
या जोडीलाच, होंडाच्या प्रिमियम मोटरसायकल महत्वाच्या मेट्रोजमध्ये मुख्यत्वे बिगविंग टॉपलाइन (300cc-1800cc) आणि इतर मागणी केंद्रांमध्ये बिगविंग (300cc 500cc मध्यम आकाराच्या मोटरसायकल) द्वारे उपलब्ध आहेत. कंपनीच्या बिगविंग उत्पादन श्रेणीमध्ये CB300F, CB350, H’ness CB350, CB350RS, CB300R, CB650R, CBR650R, XL750 Transalp, CBR 1000RR-R फायरब्लेड, आफ्रिका ट्विन आणि गोल्ड विंग टूर समाविष्ट आहे.
अली दारूवाला यांचा ‘ वन इंडिया ‘ पुरस्काराने गौरव
पुणे :भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारूवाला यांचा ‘ वन इंडिया ‘ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. संघ प्रचारक आणि भाजप नेते सुनील देवधर यांनी स्थापन केलेल्या ‘ माय होम इंडिया ‘ संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांनी अली दारूवाला यांना हा पुरस्कार प्रदान केला.मुंबई येथील वीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास,एकात्मता आणि राष्ट्रबांधणीसंबंधीच्या योजना प्रभावीपणे अल्पसंख्य समुदायात पोहोचविण्यात दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला.यावेळी सुनील देवधर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित होते.
‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे राष्ट्रहिताची असून देशाला जगात पुढे नेणारी आहेत. या कार्यात आपण योगदान देत राहू.मुख्य राष्ट्रीय प्रवाहात अल्पसंख्य समुदाय येण्याने राष्ट्रीय एकात्मता बळकट होणार आहे’ , असे अली दारुवाला यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.अली दारूवाला हे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन(नवी दिल्ली)चे प्रवक्ते तसेच भारतीय जनता पक्षाचेही प्रवक्ते आहेत.अलीकडेच त्यांची राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग(नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज) चे राष्ट्रीय सल्लागार म्हणूनदेखील नियुक्ती झाली आहे.
मोदींसाठी विमानतळ टर्मिनलचे उदघाटन थांबले हा प्रकार संतापजनक-माजी आमदार मोहन जोशी
१जानेवारीला उदघाटन व्हावे,अन्यथा तीव्र आंदोलन
पुणे -प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल कार्यान्वित होणे गरजेचे आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटनासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. हा प्रकार पुणेकरांसाठी संतापजनक आहे, १जानेवारीपूर्वी उदघाटन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
विमान प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने पुणे विमानतळावर अनेक गैरसोयी वाढू लागल्या. विमानाचे लॅन्डिंग करण्यातही अडथळे येत आहेत. विमान प्रवाशांची संख्या वर्षाकाठी ७०लाख होती, ती ९०लाखांपर्यंत जावून पोहोचलेली आहे. ती लवकरच १कोटीचा आकडा ओलांडेल, अशी शक्यता आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे गैरसोयी वाढल्या. विमानतळावरची शांतता संपून, गजबजाट झाला. विमानांच्या लॅन्डिंगला अडथळे येऊ लागले. यावर उपाययोजना म्हणून ५२५ कोटी रुपये खर्चून नवे टर्मिनल उभारण्यात आले. ऑगस्ट २०२३ पूर्वीच नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले, चाचण्याही झाल्या. टर्मिनल ताबडतोब कार्यान्वित व्हावे यासाठी विमान प्रवाशांनी सोशल मिडियाद्वारे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर पोर्ट ॲथॉरिटीचे लक्ष वेधले. त्याला दाद देण्यात आली नाही, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.
नव्या टर्मिनलचे उदघाटन २०२३ सालातील सप्टेंबर महिन्यात होईल, असे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जाहीर केले. सप्टेंबर महिना उलटला, मग ऑक्टोबर महिन्याचा वायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यालयाला पत्रही लिहीले. मात्र, पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतून पडलेल्या मोदींनी उदघाटनासाठी वेळ दिला नाही. नवे टर्मिनल चालू व्हावे यासाठी प्रवासी आतुर झाले आहेत. विमानतळाची प्रवासी क्षमता वाढणार आहे, विमानांची संख्या वाढणार आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांना कामाचे श्रेय घेऊन मिरवायचे आहे. याकरिता भाजपच्या नेत्यांकडून वेळकाढूपणा चालू आहेत. हे डावपेच निंदनीय आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
आर्य समाज पिंपरी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे – महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार ते रविवार विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सल्लागार मुरलीधर सुंदरानी, सचिव हरेश तीलोकचंदानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

पिंपरी कॅम्प येथील आर्य समाजच्या पटांगणात शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी सात वाजता, तसेच रविवारी सकाळी आठ वाजता कर्नाल, हरियाणा येथील प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि पुण्यातील ज्येष्ठ प्रवचनकार आचार्य सोनेरावजी यांचे प्रवचन, भजन होणार आहे. त्यांना तबला वादक रमाकांत राऊत साथ देणार आहेत. सायंकाळी सहा वाजता होमहवन, शनिवारी (दि.२३) दुपारी चार वाजता बालकांच्या हस्ते होम हवन होणार आहे. रविवारी (दि.२४) सकाळी दहा वाजता ५१ बहुकुंडीय यज्ञ होणार आहे. पिंपरी आर्य समाजचे पुरोहित धर्माचार्य पंडित विवेक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली होम हवन होणार आहे. तसेच हुतात्मा स्वामी श्रद्धानंद यांच्या ९७ व्या बलिदान दिवस निमित्त पिंपरीतील आर्य वीर दलाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
विदुषी अंजली आर्या यांचा परिचय : या वैदिक सिद्धांताच्या प्रचारासाठी जगभर प्रवचन कीर्तन करून मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी हरियाणा राज्यातील कर्नाल येथून उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांची संगीत क्षेत्रातील आवड आणि वाणीवरील प्रभुत्व पाहून त्यांचे आजोबांनी त्यांना आर्य समाजाचे कार्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी मार्गदर्शन केले. समाजाचे रामचरित्रातून प्रबोधन करणे, पाखंड, अंधविश्वास विषयी जागृती करणे या कार्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.
प्रा. आचार्य सोनरावजी यांचा परिचय : प्रा. आचार्य सोनेरावजी हे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी तरुण वयात हरिश्चंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत व वेदशास्त्र अभ्यासासाठी पंजाब मधील गुरुकुलात प्रवेश घेतला होता. नंतर अमृतसर, चंदिगड आणि मेरठ या तीनही विद्यापीठातून एम. ए. संस्कृत परीक्षा सुवर्णपदकांसह प्राप्त केल्या. लातूरच्या महाविद्यालयात संस्कृत प्राध्यापक म्हणून काही काळ सेवा केली. त्यानंतर आर्य समाजाचे प्रचारक म्हणून ते आफ्रिकेत गेले, नंतर इंग्लंड, अमेरिका येथेही प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी आफ्रिका, युरोप, अमेरिका खंडातील अनेक देशात आर्य समाजाचे वेद, उपनिषदांचे महत्त्व पटवून देणारे प्रवचन करून समाज प्रबोधन केले आहे. आता ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असून वेद, उपनिषधांचा सखोल अभ्यास आहे.
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या हीरक महोत्सवाचे शुक्रवारी उद्धाटन
पुणे – पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलची स्थापना २० जुलै १९५८ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली होती. शाळा यावर्षी हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२२) शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ७:३० वाजता कला, विज्ञान, शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक जयदेव अक्कलकोटे आणि सकाळी १० वाजता, पारितोषिक वितरण समारंभ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती शाळा समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शशांक परमाणे, मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता कामगार नेते व माजी विद्यार्थी डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते होणार आहे. इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.२३) सकाळी दहा वाजता उद्योजक व माजी विद्यार्थी श्रीकांत बडवे यांच्या हस्ते होणार आहे.
महोत्सवाची सांगता रविवारी (दि.२४) आनंद मेळावा आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘ही आवडते मज मनापासून शाळा’ हे नाटक आणि ऑर्केस्ट्राने होणार आहे.
१९६९ ते २०२२ पर्यंतच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना केली आहे. संघटनेने या वर्षी शाळेच्या इमारतीची डागडुजी, वर्गखोल्या रंगकाम, स्वच्छ्ता व पर्यावरण जागृतीसाठी पवना धरण परिसर व तिकोना किल्ला मावळ येथे प्लास्टिक मुक्त स्वच्छता अभियान, वृक्षारोपण केले आहे. तसेच शाळेला यावर्षी स्मार्ट बोर्ड दिले आहेत. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत शाळा ई स्कूल करण्याचा संकल्प आहे. यासाठी माजी विद्यार्थ्यांनी यथाशक्ती योगदान द्यावे असे आवाहन उपाध्यक्ष गणेश गांवकर, सचिव आशिष म्हसे, समन्वयक मोहन बाबर, अशोक थोरात यांनी केले आहे. हीरक महोत्सव कार्यक्रमांच्या आयोजनात उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल साबळे, आर्या मोटे, कार्याध्यक्ष रमेश गाढवे, उप कार्याध्यक्ष श्वेता नाईक, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष समाधान गेजगे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी
पुणे दि.२१: केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा सुरू असून या यात्रेच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात उपल्बध करुन देण्यात आलेली आरोग्य तपासणीची सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे.
या दोन्ही शहराच्या विविध भागात एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून सकाळ व दुपारच्या सत्रात प्रत्येकी एका ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यात आरोग्य तपासणी, क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमबाबत जनजागृती, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी आदी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रक्तदाब, मधुमेहासह इतर सामान्य आरोग्य तपासणीची सुविधादेखील करण्यात आली आहे. गरजू व्यक्तींसाठी जागेवरच आरोग्य तपासणीची सुविधा विशेष ठरली आहे.
यासोबत आधार अद्ययावत करणे, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला गॅस योजनेसाठी नोंद आदी विविध कक्ष स्थापित करण्यात येतात. या कक्षाद्वारे नागरिकांना माहिती देण्यासोबत योजनांचा लाभही देण्यात येत आहे.
यात्रेदरम्यान वितरीत करण्यात येणारे योजनांची माहिती देणारे कॅलेंडर आणि पुस्तिकाही नागरिक उत्सुकतेने पाहताना दिसतात. ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि प्रोत्साहनपर पुरस्कार हेदेखील नागरिकांसाठी विशेष आकर्षण आहे. शहरातील प्रत्येक भागात या यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याने नागरिकांना योजनांचा लाभ घेणे शक्य होत आहे.
यात्रेच्या नियोजनासाठी महापालिकेतर्फे आरोग्य आणि इतर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांद्वारे सुनियोजित पद्धतीने यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ होत आहे. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानंतर संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजना नागरिकांच्या दारी पोहोचत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पुणे शहरात २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंहगड रोड येथील नवश्या मारुती मंदिर आणि दुपारी २ वाजता दांडेकर पूल परिसर, तर २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भारती विद्यापीठाचे मागील प्रवेशद्वार आणि दुपारी २ वाजता गाडीतळ येरवडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सद्गुरू उद्यान निगडी येथे, दुपारी २ वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृह माळी आळी पिंपरी येथे, तर २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शास्त्रीनगर पिंपरी येथे आणि दुपारी २ वाजता बालाजी मंगल कार्यालय रहाटणी येथे यात्रेचे आयोजन होईल.
नागरिकांना यात्रेला भेट द्यावी, असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी चिंचवड महापालिकाआयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
यांना केवळ गुजरात ला सर्वाधिक मोठं करायचंय ? जितेंद्र आव्हाड
पुणे- हिंदू -मुस्लीम , सवर्ण – बहुजन आणि बहुजानात देखील मराठा -कुणबी अशा विविध धर्म ,जाती पातीत देशाचे विघटन होण्याचा प्रयत्न जोमाने होत असताना अशा प्रयत्नाना हाणून पडून देश एक संघ ठेवायचा असेल तर धर्म , जाती पतीच्या भिंती ओलंडून मानवतेच्या मार्गाने एकजूट राहून देश मजबूत राहू शकतो असे असताना आता प्रांत वाद देखील सुरु झाल्याने चिंतेचे विषय समोर येऊ लागले आहेत .महाराष्ट्रातील उद्योग, केंद सरकारची कार्यालये गुजरात सरकारने पळव्ल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील गावांवर डोळा आहे. गावे महाराष्ट्रात असताना त्याच्या नोंदी गुजरातमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. गुजरातच्या या घुसखोरीबाबत आ. विनोद निकोले यांनी लक्षवेधी मांडली.त्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई विमानतळावरील एका फलकाचा फोटो काढून ट्वीट केले आहे .इतर राज्यांचे उद्योग पळविल्यावर #GujratMeansGrowth हे बोलणं फार सोपं आहे.. असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई विमानतळावरील हा फ्लेक्स.महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सगळे उद्योगधंदे गुजरातला पळवून नेल्यावर #GujratMeansGrowth हे बोलणं फार सोपं आहे..! यांचा विकास हा असाच नेहमी दुसऱ्यांच्या हक्कावर गदा आणूनच झाला आहे. pic.twitter.com/lMCodIunHy
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 21, 2023
महाराष्ट्रातील उद्योग, केंद सरकारची कार्यालये गुजरात सरकारने पळव्ल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील गावांवर डोळा आहे. गावे महाराष्ट्रात असताना त्याच्या नोंदी गुजरातमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. गुजरातच्या या घुसखोरीबाबत आ. विनोद निकोले यांनी लक्षवेधी मांडली. तेवढ्यावर न थांबता त्यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणा तसेच सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.
कर्नाटकातील मराठी भाषक 865 मराठी गावे महाराष्ट्राला अजूनही परत मिळवता आलेली नाहीत. त्यातच महाराष्ट्रातील काही गावांनी गुजरात, तेलंगणामध्ये जाण्याचा ठराव केला आहे. ही परिस्थिती एकीकडे असताना पालघर जिल्ह्यावर गुजरातकडून अन्याय सुरू आहे. पालघरला मंजूर झालेले कोस्टल गार्ड गुजरातने पळवून नेले. गेल्या सहा महिन्यांपासून गुजरातची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील गावांवर वळली आहे. पालघर जिल्ह्यातील दोन मराठी गावे बळकावण्याच्या हालचाली गुजरातने चालवल्या आहेत. सीमावर्ती तलासरी तालुक्यातील वेवजी आणि झाई या गावात असलेला सीमादर्शक दगड सुमारे 150 मीटर महाराष्ट्राच्या बाजूला आतमध्ये सरकवून गुजरातने आपली हद्द वाढवली. त्यामुळे नवा संघर्ष उद्भवला आहे.
मराठा समाज हा मागास आहे की नाही याचा अहवाल गोखले इन्स्टिट्युट, फडणवीस सांगणार तसाच देणार हे सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट-अजय शिंदे
पुणे- मराठा समाज हा मागास आहे की नाही याबाबतचा अहवाल गोखले इन्स्टिट्युट फडणवीस सांगणार तसाच देणार हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट वाटत नाही काय ? असा सवाल मनसे चे नेते अजय शिंदे यांच्या कडून करण्यात आला आहे , सरकार हवे तसाच अहवाल घेणार नाही कशा वरून…? असा स्पष्ट सवाल त्यांनी केला आहे . या संदर्भात अजय शिंदे यांनी असे म्हटले आहे कि,’
सर्व्हेण्ट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज या संस्थेची शाखा म्हणजे गोखले इन्स्टिट्युट या गोखले इन्स्टिट्यूटकडून मराठ्यांच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाच्या नागपूरमध्ये झालेल्या तातडीच्या बैठकीत काल परवाच घेण्यात आला. हा निर्णय उपमुख्यमंत्री यांच्या दबावाखाली घेण्यात आल्याची चर्चा आहे,आणि असा आरोप आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लोरकर यांनी यापूर्वीच केला आहे.
विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाला मंगळवारी मुख्यमंत्री उत्तर देणार होते. त्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष न्या. सुनील शुक्रे यांनी आयोगाची तातडीची बैठक नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात घेतली व आपल्या पहिल्याच बैठकीत हे सर्वेक्षण गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्याचा निर्णय घेतला ,तसेच त्यासाठी लागणारी प्रश्नावलीही तयार करण्यात आली. हे सर्वेक्षण कुटुंबनिहाय होणार आहे. या कामासाठी गोखले इन्स्टिट्यूटतर्फे नवीन सॉफ्टवेअर विकसित केले जाणार आहे (केले जाणार आहे केले नाही). यासाठी एक उपसमिती स्थापन करण्यात आली असून त्याला आयोगाने परवानगी दिली आहे. या सर्व प्रक्रियेवर आयोगाचे नियंत्रण असेल वगैरे
राज्य सरकारची मराठा आरक्षण बाबत झालेली गोची आणि सरकार करत असलेली चाल ढकल बघता सरकार च्या मराठा आरक्षणा बाबतच्या भूमिके संधर्भात संशयाचे वातावरण जनतेत आहे हे स्पष्ट आहे, खर तर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी या आंदोलनाच्या सुरवातीस “सरकार आरक्षण देणार नाही ” हे वास्तव सांगितल होतेच .
अशा परिस्थितीत आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षण गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता, असा आरोप केला होता . हे बघता सरकारला मराठा समाज हा मागास आहे की नाही या बाबतचा अनकुल अथवा प्रतिकूल असा अहवाल अशी संस्था च देऊ शकते जीची मान सरकारच्या हातात आहे.
गोखले इन्स्टिट्युट ची शिखर संस्था असणारी भारत सेवक समाज या संस्थेमध्ये प्रचंड भ्रष्ट कारभार सुरू आहे.आणि या बाबतच्या अनेक तक्रारी सरकार दरबारी आहेत . मनसे ने देखील याबाबत सरकारी खात्या कडे तक्रारी केल्या आहेत त्या मुळे प्रमुख पदाधिकारी कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत अशा परिस्थितीत सरकार म्हणेल तोच अहवाल देण्या साठी संस्थेवर दबाव असणार हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे . प्रतिकूल किंवा अनुकूल कोणा साठी हा प्रश्न आहेच अशा परिस्थितीत सदर काम गोखले इन्स्टिट्युट लाच मिळावे या साठी उपमुख्यमंत्री फडणवीस प्रयत्न करीत असतील तर संशयाचे ढग अधिक गडद होतात.
कारण प्रश्न निर्माण होतो सदर संस्था खरे वास्तव मांडणार की उपमुख्यमंत्री सांगतील ते मांडणार ?
“अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोमवारी प्रदान करणार
पुणे – भारताचे पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी हे प्रखर राष्ट्रप्रमी तसेच संवेदनशील मनाचे कवीही होते. भारत वर्षाचे राजकारणी कमी अन सुसंस्कृतिक दूत म्हणून अधिक अशी त्यांच्या व्यक्तीमत्वाची जगभरात अन जनमानसात ओळख आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे त्यांचे पुण्याशी एक वेगळे नातं होते. अशा अटलजींच्या स्मृती चिंरतन ठेवण्याच्या उद्देशाने संस्कृती प्रतिष्ठान दरवर्षी समाजातील मान्यवरांना अटल संस्कृती पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान करते, यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका डी. प्रभा अत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांना देण्यात येणार आहे, अशी महिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, यंदाचे वर्ष हे अटलजींचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधून स्व. अटलजींच्या जयंतीदिनी म्हणजे २५ डिसेंबरला हा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, बालगंर्धव रंगमंदीरात सायं. ५ वाजता होणा-या समारंभारत प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील उपस्थित रहाणार आहेत. अटलजींनी अनेक सभा पुण्यात गाजवल्या आहेत. पण त्याच बरोबर अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाचेही कार्यक्रम याच पुण्यात त्यांच्या हस्ते झाले आहेत. त्यांनी प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेतही केलेली भाषणे आजही पुणेकरांच्या स्मरणात आहेत, याशिवाय गदिमा व सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, सुवर्ण महोत्सव याच सांस्कृतिक राजधानीत स्व. अटलजींच्या विशेष उपस्थित साजरा झाला. मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्व. अटलजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने स्व. अटलजींच्या स्मृती जागवणारा त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित कार्यक्रम “आओ फिरसे दिया जलाएँ” पुरस्कार वितरणानंतर सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची असून कार्यक्रमाचे संहिता ज्येष्ठ पत्रकार व्यासंगी विजय कुवळेकर यांनी लिहिली आहे. दृकश्श्राव्य, संगीत, नृत्याविष्कार असा हा कार्यक्रम पुरस्कार वितरण समारंभानंतर हा कार्यक्रम होणार आहे.
स्व. अटलजींच्या निधनानंतर संस्कृती प्रतिष्ठानने त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन गौरवण्यास सुरुवात केली. पुरस्कारचे हे पाचवे वर्ष असून पहिला पुरस्कार विद्यावाचस्पती डॉ, शंकरजी अभ्यंकर यांना देण्यात आला. त्यानंतर डॉ. शां. ब. मुजुमदार, जेष्ठशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथजी माशेलकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्काराचे किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी हे मानकरी आहेत. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, मानपत्र, स्मृती चिन्हं, शाल आणि श्रीफळ असे आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलजींच्या जीवन प्रवास आणि कवितांवर आधारित संवाद पुणे निर्मित हा कार्यक्रम आओ फिरसे दिया जलाएँ सादर करण्यात येणार आहे, यात दृकश्राव्य कार्यक्राबरोबरच हिंदी नाट्य चित्रपट अभिनेते मनोज जोशी हे अटलबींच्या निवडक कवितांचे वाचन करतील. पार्श्वगायिका बेला शेंडे आणि अभय जोधपूरकर हे स्वरबद्ध गाणी सादर करतील तर सुखदा खांडकेकर आणि नुपूर दैठणकर या नृत्याविष्कार सादर करतील, या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी करणार आहेत, कार्यक्रमाचे संयोजन व नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले आहे.
तसेच या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कलांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे. शिल्पकला, चित्रकला, रंगावली, कैलीग्राफी, फोटोग्राफी अशा विविध कलेच्या संगमेतून अटलजींचे स्मरण” अटलपर्व ” या भव्य प्रदर्शनीतून होणार आहे, याचे उद्घाटन प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंगसांडभोर यांच्या उपस्थित होणार आहे, दिनांक २५ डिसेंबर सकाळी ११ वाजता हे उद्घाटन होणार आहे. अशी महिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार
नवी दिल्ली, दि. २०: नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अकादमीचे सचिव के.श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रवींद्र सभागृहात वर्ष २०२३ साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २४ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.
कृष्णात खोत यांच्या लेखनकार्याविषयी
मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.
कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्री. खोत यांनी मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलत्या खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.
‘रिंगाण’ या कादंबरीविषयी
‘रिंगाण’ या कादंबरीला मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार २०२३ साठी पुरस्कार जाहीर झाला. प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे. तो धागा पुढे नेत ही कादंबरी माणसांचे जग ओलांडून मुक्या जनावरांच्या भावविश्वातही घेऊन जाते. गाव सोडताना वांझ म्हणून मागे सोडून दिलेल्या म्हशींचे काय होते? माणसांच्या सहवासात वाढलेल्या जनावरांवर एकाएकी जंगलात राहण्याची वेळ येते तेव्हा आलेल्या प्रसंगाशी त्या कशा जुळवून घेतात? जनावरांशी नातं तोडून नव्या गावाची वाट धरणाऱ्या देवाप्पाला पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कशी झुंज द्यावी लागते, ती देता देता आतून तुटून तो कसा उद्ध्वस्त होत जातो…. या विस्थापितांच्या दु:खांची तीव्रता या कादंबरीतून वाचकांपर्यत पोहोचवली आहे. केवळ तेवढ्यापुरती ही कादंबरी मर्यादित राहत नाही, तर माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.
परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी
श्री.अभिराम भडकमकर, डॉ. संतोष खेडलेकर आणि श्रीमती अनुराधा पाटील या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य अकादमी पुरस्काराचे वितरण १२ मार्च २०२४ रोजी कमानी ऑडिटोरियम येथील आयोजित कार्यक्रमात होणार असल्याची माहिती सचिव के. श्रीनिवासराव यांनी दिली.
मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि.२० :राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याकरिता नोंदणी पोर्टल दि.४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा़ असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दि. १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहेत
या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. ४ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
केंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी 27 ते 30 डिसेंबर दरम्यान भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा
पुणे–केंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी दिनांक (Pune) 27 ते 30 डिसेंबर दरम्यान भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दिनांक 27 डिसेंबरला शिवनेरीपासून भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. दिनांक 30 डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातून हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे. राष्ट्रवादी (Pune) काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाची सांगता सभा होणार आहे.
या सभेला महाविकास आघाडीमधील अनेक नेते मंडळीदेखील उपस्थित राहणार आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
देशातील सर्व घटकांतील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्या नागरिकांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यावर खासदारांचे निलंबन केले जाते, हे दुर्दैव आहे, असेही कोल्हे म्हणाले.
