मुंबई उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अवमान करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, खा. राहुल गांधी यांच्या निषेधार्थ कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भारतमाता सिनेमा ते लालबाग पोलीस स्टेशनपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी खा. कल्याण बॅनर्जी, राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतची तक्रार काळाचौकी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली.
किमान सभापतींच्या घटनात्मक पदाचा तरी मान राखला जावा. देश हे कायम लक्षात ठेवेल जेव्हा देशाचे उपराष्ट्रपती आणि घटनात्मक संस्थेची अशी खिल्ली उडवली जात होती, तेव्हा राहुल गांधी उभा राहून त्याचा व्हिडिओ करीत होते. भारत तोडणाऱ्यांना पाठिशी घालून भारताला जोडण्याचे नाटक करणाऱ्यांचा मुख्य अजेंडा संघटित करण्याचा नसून तोडणे हा आहे. देशाचे नागरिक २०२४ मध्ये या घमेंडखोरांचा अहंकार नक्कीच संपवतील अशीही टीका यावेळी करण्यात आली. यावेळी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, भायखळा विधानसभा मंडल अध्यक्ष नितीन बनकर, भाजप मुंबई उपाध्यक्ष राजेश हटले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशातील नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरी शोधणे आणि योग्य नोकरी मिळणे, करियरविषयक मार्गदर्शक सल्ला, व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रमांविषयी माहिती इत्यादी करियरशी संबंधित विविध सेवा डिजिटल मंचाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता याव्या म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय करियर सेवा (एनसीएस) पोर्टल [www.ncs.gov.in] सुरु केले आहे. योग्य व्यक्तीला योग्य पदावरील नोकरी मिळावी या हेतूने एनसीएस पोर्टल नोकरीच्या शोधात असणारे आणि नोकऱ्या देणारे यांना एका मंचावर घेऊन येते, देशातील आकांक्षित युवकांना नोकरीच्या सन्माननीय संधी उपलब्ध करून देते आणि करियर विकासासाठी मदत उपलब्ध करून देते.
एनसीएस पोर्टलची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
नोकरी शोधणाऱ्यांना करियरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 1100 हून अधिक मान्यताप्राप्त करियर सल्लागार
3600 हून अधिक प्रकारच्या नोकऱ्यांबाबत करियरची माहिती देणारा माहितीकोष
डिजिटल आणि इतर सॉफ्ट स्किल्स साठी ऑनलाइन रोजगार पात्रता सुधारण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणाची सुविधा
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची माहिती सामायिक करण्यासाठी 28 राज्यांच्या (एनसीएसचा थेट वापर करणाऱ्या 7 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह) रोजगार पोर्टल्सचे एकत्रीकरण
रिक्त पदांच्या सामायीकीकरणा साठी विविध खासगी रोजगार पोर्टल्सशी एकत्रीकरण
नियोक्त्यांचे ऑटो रजिस्टरिंग करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे उद्यम पोर्टल, ईपीएफओ आणि ईएसआयसी यांच्यासह एकत्रीकरण
दिनांक 18.12.2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार, एनसीएस पोर्टलवर 10.45 लाखांहून अधिक रिक्त पदे उपलब्ध आहेत. गेल्या तीन वर्षांत नोंदणी झालेले नियोक्ते आणि रिक्त पदे यांचे वर्षनिहाय तपशील खाली दिले आहेत:
Year
Employers registered on the NCS Portal
Vacancies Mobilised on the NCS Portal
2020-2021
78,367
12,61,066
2021-2022
52,863
13,46,765
2022-2023
8,19,827
34,81,944
केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे.
राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करावे
नागरिकांनो घाबरू नका,काळजी घ्या
राज्यात ६३ हजार विलगीकरण, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध
ठाणे, दि.२१ :- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स च्या सद्य:स्थितीबाबतचीही माहिती यावेळी घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क् वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नागरिकांना केले.
सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घेणे जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाही. माहिती प्रसारीत करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे. यंत्रसामुग्री, औषध साठा, इतर साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध् आहे. त्यामुळे जनतेने घाबरु नये. काळजी घ्यावी काळजी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ, आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्ययंत्रणेच्या सज्जतेबाबत माहिती दिली. आरोग्य यंत्रणेच्या सर्व यंत्रसामुग्री, इतर सर्व यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याची खात्री करण्यासाठी दि. १५ ते १७ डिसेंबर 2023 या कालावधीत ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण (मुंब२७, पुणे-८, ठाणे-८,कोल्हापूर-१ रायगड-१) आढळून आले आहेत, असे श्री. म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले. 000000
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त ठरेल-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे, दि. २१ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला. निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी नियमानुसार आणि चोखपणे बजवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी पुणे विभागातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांच्यासह पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे काम अत्यंत महत्वाचे असून आचारसंहितेचे पालन करण्याची मोठी जबाबदारी या कालावधीत पार पाडावी लागते. यासाठी निवडणूक आयोगाचे कायदे आणि मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक आहेत. त्यांनी जारी केलेल्या नियम पुस्तीका आणि परिपत्रकांचे काळजीपूर्वक वाचन करुन नियमांची निटपणे अंमलबजावणी करावी. आयोगाच्या निर्देशांची सातत्याने माहिती घेवून त्यांचा अभ्यास करावा. निवडणूकीच्या कामात कोणतीही चूक अपेक्षित नाही. निवडणूकीच्या कामात दस्तऐवजीकरण खूप महत्वाचे असून त्याचे काम प्राधान्याने आणि गांभिर्याने करावे.
भारत निवडणूक आयोगाच्या हस्तपुस्तीकांमध्ये ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ या बाबींचा उल्लेख केला आहे. त्यापैकी काय करू नये याची जाणिवपूवर्क वारंवार उजळणी करावी. यापुर्वी चुकीच्या घटना घडल्या आहेत त्याची पुनरावर्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. राजकीय पक्षांची प्रत्येक आठवड्याला बैठक घ्यावी. मतदार यादीतील १०० वर्षाच्या पुढच्या प्रत्येक मतदाराची पडताळणी करावी. निवडणूक विषयक दस्तऐवजांचे निटपणे संकलन आणि जतन करण्यात यावे.
निवडणूकीदरम्यान चुकीच्या पद्धतीने मतदान होणार नाही याकडे लक्ष असणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात खुप मोठ्या प्रमाणात नव मतदारांची नोंदणी झाली आहे. पोस्ट कार्यालयाकडून पोस्टाने मतदान ओळखपत्र पाठविण्यात येते. पाठवलेले मतदान ओळखपत्र मतदारांना भेटणे आवश्यक असून ते परत येता कामा नये. ५ जानेवारी २०२४ ला मतदान यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यापूर्वी मतदार यादीची पडताळणी करावी. निवडणूकीच्या सर्व पीपीटी मानक स्वरूपात आहेत, त्याचा अभ्यास करावा.
येत्या २९ फेब्रवारी पर्यंत जिल्ह्यात ईव्हीएम प्रात्याक्षिक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. जनजागृतीच्या प्रत्येक ठिकाणी प्रात्याक्षिकाचे फलक लावावेत आणि नागरिकांना यात सहभागी करून घ्यावे. या प्रशिक्षणाचा सर्व अधिकाऱ्यांनी चांगला फायदा करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रशिक्षणात उमेदवारांची निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्रता, नामांकन फार्म भरणे, उमेदवारांचे शिक्षणाची अर्हता, वैधानिक पात्रता, अपात्रता, अर्जाची छाननी, उमेदवारांचे शपथपत्र, उमेदवारांची गुन्हेगार पार्श्वभूमी असतांना नियमानुसार घ्यावयाची काळजी, अर्ज मागे घेणे, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन, खर्च व्यवस्थापन, मतदान केंद्र व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, अतिसंवेदनशिल मतदान केंद्राचे निकष, मतदान साहित्य व्यवस्थापन, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी यांची कर्तव्य आदी विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
पुणे, दि.२१: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते.
पुणे पुस्तक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे देशातील वेगवेगळ्या शहरात वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पुणे येथे आयोजित पुस्तक महोत्सवालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यामध्ये शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देऊन उत्सुकतेने पुस्तकांची खरेदी करीत आहेत. ही आजच्या पिढीसाठी चांगली बाब आहे. येथे पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली असून २४ डिसेंबरपर्यंत आणखीन पुस्तकांची विक्रमी विक्री होईल, अशा शब्दात या भव्य आयोजनाबद्दल श्री. पाटील यांनी कौतुक केले.
या पुस्तक महोत्सवामुळे चार विश्वविक्रम मोडण्यात आले आहे हे पुस्तक महोत्सवाचे वैशिष्ट आहे. दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये पुस्तक प्रकाशन, पुस्तकावर चर्चा, पुस्तक वाचनाविषयी मार्गदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यमहोत्सव असे भरगच्च कार्यक्रम होत आहेत.
यावेळी श्री. पाटील यांनी विविध प्रकाशनाच्या दालनांना भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली. त्यांनी श्री.पांडे यांच्याकडून त्यांनी महोत्सवात झालेल्या विश्वविक्रमांची माहिती घेतली.
पुण्यातील ‘युरोकूल’मध्ये पर्यायी ‘रिझूम थेरपी’ यंत्र दाखल; प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी यांची माहिती पुणे : प्रोस्टेट ग्रंथीच्या पारंपारिक शस्त्रक्रियेला फाटा देत शस्त्रक्रिया विना प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करण्याची सुविधा भारतात पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे. अवघ्या १० मिनिटात कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथावर उपचार करणारे ‘रिझूम थेरपी’ तंत्रज्ञान पुण्यातील बाणेरस्थित युरोकुल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे. हे तंत्रज्ञान भारतात तेही पुण्यात पहिल्यांदाच आणले आहे, याचा आनंद वाटतो, असे ‘युरोकुल’चे संस्थापक व युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
‘रिझूम थेरपी’ यंत्राद्वारे पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर डॉ. संजय कुलकर्णी यांनी रुग्णांसह पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बाणेर येथील युरोकुल रुग्णालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला देशातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, युरॉलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी, बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, रेडिओलॉजिस्ट डॉ. साकेत पटवर्धन, युरोकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय चौधरी, प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रमोद भावे यांच्यासह रुग्ण व यंत्र पुरवणाऱ्या टीमची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “प्रोस्टेट ग्रंथींवरील पारंपरिक शस्त्रक्रियेला ‘ट्रांसूरेथ्रल रिसेक्शन ऑफ द प्रोस्ट्रेट’ (टीयूआरपी – TURP) म्हणून ओळखले जाते. यामध्ये रुग्णाला साधारण दोन ते तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते. ही शस्त्रक्रिया तब्बल तासभर चालते. रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. शिवाय, संभोगानंतर रुग्णांची वीर्यस्खलन करण्याची क्षमता गमावून जाते. यावर उपाय म्हणून युरोकुलने क्रांतिकारक तंत्रज्ञान भारतात आणले आहे.”
“या ‘रिझूम थेरपी’ तंत्रज्ञानाद्वारे विना शस्त्रक्रिया प्रोस्टेट ग्रंथींचा वाढलेला भाग पाण्याच्या वाफेच्या साहाय्याने विरघळून टाकता येतो. ही थेरपी सामान्यत: बाह्यरुग्ण प्रक्रिया म्हणून केली जाते. या यंत्रामुळे प्रोस्टेट ग्रंथीवरील उपचार अवघ्या १० मिनिटात होणार असून, रुग्ण त्याच दिवशी दोन ते तीन तासांत घरी जाऊ शकणार आहे. एक लहान कॅथेटर ५-७ दिवस ठेवला जाईल. या प्रक्रियेनंतर रुग्णांना होणाऱ्या त्रासापासून त्वरित आराम मिळू लागतो आणि जास्तीत जास्त फायदा तीन महिन्यात दिसू लागतो. या तंत्रज्ञानाच्या यशाचा दर ८० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त आहे. प्रोस्टेटच्या समस्यांमुळे लघवी रोखून धरलेल्या रुग्णांवर उपचार कारण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. एवढेच नाही तर प्रोस्टेट ग्रंथीच्या सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘रिझूम’ तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. याचा सर्वाधिक फायदा तरुण रुग्णांना होणार आहे.” असे डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.
पुणे-एका हॉटेलसाठी क्रेडीटवर मटन विक्रेत्या व्यापार्याकडून तब्बल 2 कोटी 91 लाखांचे मटन खरेदी करून त्यातील 2 कोटी 30 लाख 19 हजार 675 रूपये देऊन उर्वरीत रक्कम 61 लाख 62 हजार 140 रूपयांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात कोंढव्यातील बागवान हॉटेलच्या मालकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बागवान हॉटेलचे मालक अफजल युसूफ बागवान (65, रा. कौसरबाग) आणि अहतेशाम अयाज बागवान (35) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मटन विक्रेता शादाफनिजाम पटेल (43, रा. जान मोहम्मद स्ट्रीट, कॅम्प, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार 2019 ते 2023 दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान हॉटेलचे मालक बागवान यांनी तक्रारदार पटेल यांच्याकडून एकूण 2 कोटी 91 लाख रूपयांचे मटन, चाप, खिमा, गुरदा ईत्यादी मटन घेतले. त्यापैकी बागवान यांनी केवळ 2 कोटी 30 लाख 19 हजार रूपये परत केले नाही. त्यांनी उर्वरीत 61 लाख 62 हजार न देता बागवान यांनी त्या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास लष्कर पोलिस करत आहे.
नवी दिल्लीतील कमानी सभागृह येथे 12 मार्च 2024 रोजी पुरस्कार वितरण सोहळा
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2023
साहित्य अकादमीने 24 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1 साहित्यिक अभ्यासाला मिळाले आहेत.
24 भारतीय भाषांमधील प्रतिष्ठित परीक्षक सदस्यांनी शिफारस केलेल्या पुरस्कारांना साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाने 20 डिसेंबर 2023 रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.
मराठी भाषेतील कादंबरीसाठी कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला तर कोंकणी भाषेतील लघुकथेसाठी प्रकाश एस. पर्येकर यांच्या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला आहे.
पुस्तकांची निवड संबंधित भाषांमधील तीन सदस्यांच्या परीक्षकांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली होती. कार्यपद्धतीनुसार, कार्यकारी मंडळाने परीक्षकांनी एकमताने केलेली निवड किंवा बहुमताच्या आधारावर केलेल्या निवडीच्या आधारे पुरस्कार घोषित केले. पुरस्काराच्या आधीच्या पाच वर्षांत (म्हणजे 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान) प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकांशी संबंधित हे पुरस्कार आहेत.
प्रत्येकी 1,00,000/- रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून 12 मार्च 2024 रोजी कमानी सभागृह, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली- 110 001 येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.
एका ऐतिहासिक निर्णयात, लोकसभेने आज वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक 2023 मंजूर केले आणि वसाहतवादी युगातील प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायदा, 1867 रद्द केला. हे विधेयक पावसाळी अधिवेशनात राज्यसभेने आधीच मंजूर केले आहे.
नवीन कायदा – वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक, 2023 मध्ये कोणत्याही प्रत्यक्ष हस्तक्षेपाशिवाय ऑनलाइन प्रणालीद्वारे नियतकालिकांचे शीर्षक वितरण आणि नोंदणी प्रक्रिया सोपी आणि एकाच वेळी करण्याची तरतूद आहे. यामुळे प्रेस रजिस्ट्रार जनरलला प्रक्रियेचा जलदतेने मागोवा घेता येईल, ज्यामुळे प्रकाशकांना, विशेषत: छोट्या आणि मध्यम प्रकाशकांना आपले प्रकाशन सुरू करण्यात फारशी अडचण येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रकाशकांना यापुढे जिल्हा दंडाधिकारी किंवा स्थानिक प्राधिकरणांकडे घोषणापत्र दाखल करण्याची आणि त्याचे प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नाही.
लोकसभेत विधेयक सादर करताना, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “गुलामगिरीची मानसिकता दूर करण्यासाठी आणि नवभारतासाठी नवीन कायदे आणण्याच्या दिशेने हे विधेयक म्हणजे, मोदी सरकारने उचललेले हे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे या विधेयकातून प्रतिबिंबित होते”. तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एका विश्वासार्ह अपीलीय यंत्रणेची तरतूद यात करण्यात आली आहे. व्यवसाय सुलभतेवर भर देताना ठाकूर म्हणाले की, शीर्षक नोंदणी प्रक्रियेला कधीकधी 2-3 वर्षे लागतात, ती आता 60 दिवसांत पूर्ण केली जाईल.
अनुबंधन-
वृत्तपत्रे आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 मधील काही ठळक वैशिष्ट्ये:
हे विधेयक मालकी हक्क पडताळणीसाठी अर्ज करणे तसेच प्रेस रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून नियतकालिकाला नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे या बाबी एका साध्या ऑनलाईन यंत्रणेच्या मदतीने एकाच वेळी होणारी प्रक्रिया म्हणून सोय करून देते.
केंद्र सरकारची पूर्व परवानगी घेऊन तसेच प्रेस रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून नोंदणी केल्यानंतर एखाद्या परदेशी नियतकालिकाच्या नक्कल आवृत्तीची भारतात छपाई करता येईल.
नियतकालिक छापणाऱ्याने प्रेस रजिस्ट्रार जनरल आणि स्थानिक अधिकाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने माहिती देणे आवश्यक असणार आहे.
या विधेयकामध्ये नोंदणी प्रमाणपत्र आणि मालकीहक्क वितरण यांच्या मंजुरीसंदर्भात जिल्हा दंडाधिकारी / स्थानिक अधिकारी यांची भूमिका कमीतकमी असेल अशी संकल्पना मांडली आहे.
वृत्तपत्रे तसेच पुस्तके नोंदणी कायदा 1867 आणि वृत्तपत्रे तसेच नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 यांच्यातील फरक
पीआरबी कायदा 1867 चा भाग असलेल्या पुस्तकांना पीआरपी विधेयक 2023च्या कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवण्यात आले आहे, कारण पुस्तके हा विषय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीत ठेवण्यात आला आहे.
ज्यावेळी एखादे नियतकालिक नोंदणी प्रमाणपत्राशिवाय छापले जात असेल आणि प्रेस रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून छपाई थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर सहा महिन्यांचा काळ उलटल्यावर देखील प्रकाशक अशा प्रकाशनाची छपाई थांबवण्यात अयशस्वी झाल्याचे निदर्शनास आले असेल तर, अशा तीव्र कायदेभंगाच्या प्रकरणात आरोपींना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद 2023 च्या विधेयकात करण्यात आली आहे.
पुणे- नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील भव्य राममंदिराचं उद्धाटन होणार आहे. पण तत्पूर्वीच स्रियांप्रतीच्या रामाच्या न्यायिक भूमिकेतून रामराज्याप्रमाणेच आपल्या या मोदीराज्यात लिहिली जातेय… नव्या कायद्यांची नवी परिभाषा..असे भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी म्हटले आहे. महिला ,मुलीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देखील होणाऱ्या कायदे बदलांचे देखील त्यांनी स्वागत करत सरकारचे जोरदार अभिनंदन केले आहे .
चित्रा वाघ यांनी नेमके काय म्हटले आहे ते वाचा आणि ऐका त्यांच्याच शब्दात
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील भव्य राममंदिराचं उद्धाटन होणार आहे. पण तत्पूर्वीच स्रियांप्रतीच्या रामाच्या न्यायिक भूमिकेतून रामराज्याप्रमाणेच आपल्या या मोदीराज्यात लिहिली जातेय… नव्या कायद्यांची नवी परिभाषा..
हा नवा भारत खऱ्या अर्थाने सुदृढ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी १५० वर्ष जुन्या कायद्यांमध्ये योग्य तो बदल करून समाजाच्या सुलभ कायदेव्यवस्था व सुरक्षिततेसाठी नवे आणि अधिक कठोर कायदे बनवले जात आहेत.
देशाच्या सर्वांगीण विकासाच्या व सुदृढ लोकशाही व्यवस्थेच्या प्रक्रियेचा भाग असल्याचा सार्थ अभिमान वाटतोय.. कारण समाजात स्रियांच्या अन्याय- अत्याचारा विरोधात त्यांना निःपक्षपाती, स्वच्छ, स्पष्ट आणि तितकाच जलद न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करत त्या कायद्यांची नवी परिभाषा मांडली आहे.
या नव्या कायद्यांनुसार महिलांविरोधातील अन्याय- अत्याचाराच्या घटनेत आता गुन्हेगाराला कसलीच माफी नसेल ना असेल कायद्याची पळवाट…
समाजातील पाशवी प्रवृत्तींना कायमचाच चाप बसावा यासाठी बदललेल्या कायद्यानुसार आता…
गॅंगरेप (सामूहिक बलात्कार) च्या गुन्ह्यांत २० वर्षांची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या प्रकरणांमध्ये जन्मठेप किंवा फाशीचीच शिक्षा
खोटी आश्वासने देऊन किंवा ओळख लपवून लैंगिक संबंध ठेवल्यास हा देखील आता गुन्हाच असेल.
स्रियांबाबत धाडसी आणि संवेदनशील अशा केंद्र सरकारच्या- आमच्या मोदी सरकारच्या आपल्या मोदी सरकारच्या या निर्णयाचे खूप खूप अभिनंदन आणि समस्त महाराष्ट्रातील मातृशक्तीकडून आभार
मुंबई, दि. 21 : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री 26 डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. 26 डिसेंबर ते 8 जानेवारी अशा दोन आठवड्यांच्या कालावधीत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचतगटांना सक्षम करणाऱ्या सरस प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या दीड दशकात सुमारे 8 हजार बचत गटांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. याशिवाय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो.
या प्रदर्शनात भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बूट,ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी, कार्पेट आणि पडदे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, शिवाय ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील. मुंबईकर आणि संपूर्ण देशाने ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
सरस प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील तांबडा-पंढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थही उपलब्ध असतील. याशिवाय राज्याच्या विविध भागातील मसाले आणि हातसडीचे तांदूळ प्रदर्शनात असतील. अधिकाधिक नागरिकांनी सरस प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले आहे.m
व्यावसायिक प्रगतीला सामाजिक कार्याची जोड द्यावी-अजित गुलाबचंद पुणे : “बांधकाम क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा, कलात्मकतेचा अंतर्भाव होत असून, बांधकामाची गुणवत्ता वाढली आहे. घरांच्या वाढत्या मागणीमुळे व्यावसायिक प्रगती वेगाने होत आहे. ही प्रगती साधतानाच सामाजिक जबाबदारीचेही भान जपायला हवे. सामाजिक कार्याची आणि सकारात्मक विचारांची जोड मिळाली, तर चांगल्या शहरांचे व समाजाचे निर्माण होईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे आयोजित ‘बीएआय-शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२३’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात अजित गुलाबचंद बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘बीएआय’ पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष सुनील मुंदडा, ‘बीएआय’ महाराष्ट्रचे अध्यक्ष सचिन देशमुख, डब्ल्यूबीएससीचे अध्यक्ष हरप्रीत सिंग आनंद, बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष डी. एस. चौधरी, उपाध्यक्ष व डब्ल्यूबीएससीचे संयोजक सुनील मते, मानद सचिव अजय गुजर, खजिनदार राजाराम हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाचा ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड’ श्रॉफ उद्योग समूहाचे जयप्रकाश प्रवीणचंद्र उर्फ जेपी श्रॉफ यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख अकरा हजार रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ‘बीएआय’च्या इंजिनीअरिंग डायरीचे प्रकाशन करण्यात आले.
बांधकाम क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये एस्कॉन प्रोजेक्ट्सला निवासी श्रेणीत, रोहन बिल्डर्स हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि बी. जी. शिर्के यांना निवासी सोसायटी श्रेणी, रत्नरूप प्रोजेक्ट यांना व्यावसायिक इमारतीत दोन पुरस्कार, रतिलाल भगवानदास कन्स्ट्रक्शन आणि सुरज बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना औद्योगिक श्रेणी, टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड आणि अजवानी यांना इन्फ्रास्ट्रक्चर श्रेणी, बी. जी. शिर्के आणि शुभम एपिक प्रायव्हेट लिमिटेड यांना सरकारी प्रकल्प, मिलेनियम इंजिनियर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यांना वर्क अप टु बेअर शेल श्रेणीत दोन पुरस्कार, सुगम कन्स्ट्रक्शन यांना लँडस्केप (हॉर्टिकल्चर) या श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह, शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
जेपी श्रॉफ म्हणाले, “बीएआयच्या वतीने गुलाबचंद यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतो आहे. नव्वदीच्या दशकात बांधकाम क्षेत्रात एक छोटा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम सुरु केले. आज याचे उद्योग समूहात रूपांतर झाले आहे. माझ्या वाटचालीत घरच्यांचा सहभाग मोलाचा आहे. वर्ल्ड स्कीलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या निमित्ताने मला तरुणांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.”
सचिन देशमुख म्हणाले, “बीएआय पुणे सेंटरचा आदर्श महाराष्ट्रातील इतर सेंटरने घ्यायला हवा. यातून बांधकाम विभागातील नावीन्यता सर्वांसमोर सिद्ध करता येते. काळ बदलतो, तसेच बांधकामातील सुधारणाही वाढत आहेत. बांधकामाचा दर्जा आज उंचीवर पोहोचला आहे. आज बांधकाम क्षेत्रातील उणीव भरून निघताना दिसत आहे.”
सुनील मुंदडा म्हणाले, “देशात बीएआयचे कार्य एकूण २२२ सेंटरमधून सुरु आहे. पुणे सेंटर अधिक मजबूत आणि वेगाने प्रगती करत आहे. बांधकाम विभागातील वाढत्या दर्जामुळे ‘रेरा’ अंतर्गत प्रकल्प सहजरित्या पूर्ण होत आहेत. शासनाचे प्रकल्पही उच्च दर्जाचे होताहेत, ही चांगली गोष्ट आहे.”
डी. एस. चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्वागत-प्रास्ताविक हरप्रीत सिंग आनंद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रशांत देशमुख आणि संजय आपटे यांनी केले आणि आभार अजय गुजर यांनी मानले.
· ३१ डिसेंबरपर्यंत कुटुंबासोबत ख्रिसमस सोहळ्याचा आनंद घ्या.
· मुलांसाठी जिंजरब्रेड हाऊस, अपसाईड-डाउन फोटो झोन, स्नोमॅन बिल्डिंग, पेपा पिग ऍक्टिव्हिटीज आणि इतर अनेक मजेदार खेळांची रेलचेल.
· शॉट आणि हॅमलेज प्लेसारख्या नवीन ब्रँड्समुळे सणाचा आनंद द्विगुणित होईल.
· कोपा मॉलमध्ये आपल्या फरी मित्रांसोबत पेट-फ्रेंडली ऍक्टिव्हिटीजचा आनंद घ्या.
पुणे, महाराष्ट्र – २१ डिसेंबर २०२३: पुण्यातील प्रीमियर लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशन, कोपा या कोरेगाव पार्कमधील मॉलने आयोजित केला आहे पुण्यातील पहिला ख्रिसमस कार्निवल, यामध्ये ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुले आणि कुटुंबातील सर्वजण मिळून जादुई आनंद मिळवू शकतील.
कोपा ‘विंटरशायर’ चे सर्वात मोठे आकर्षण आहे २८ फीट उंच शानदार ख्रिसमस ट्री. क्रॉसवर्ड, किटस्टर्स आणि पिझ्झा एक्स्प्रेसच्या सहयोगाने आयोजित करण्यात येणार असलेल्या मजेदार ख्रिसमस ऍक्टिव्हिटीजच्या वातावरणनिर्मितीची सुरुवात या ख्रिसमस ट्रीने होते. क्रॉसवर्डने मुलांसाठी ख्रिसमस लायब्ररी ठेवली आहे, यामध्ये गोष्टी सांगणे, स्नोमॅन बिल्डिंग, पेपा पिग ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. किटस्टर्सने ख्रिसमस डूडलिंग, वूडन ऑर्नामेंट मेकिंग, मग मारबलिंग आणि बॉटल लाईट पेंटिंगचे आयोजन केले आहे. पिझ्झा एक्स्प्रेसने स्पेशल किड्स ख्रिसमस मेन्यू तयार केला आहे, चॉकलेट ट्रीट्स व डोबॉल्समुळे मुले खुश होणार हे नक्की. ऑगमेंटेड रियालिटी किंवा व्हिडिओ बूथ्समार्फत मुले सांताक्लॉजसोबत फोटो देखील घेऊ शकतील. अनोख्या जगात घेऊन जाणारा हा अनुभव अतिशय रोमांचक ठरेल.
कोपा ‘विंटरशायर’ चे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे जिंजरब्रेड हाऊस, ज्यामध्ये मुले या ऋतूचा उत्साह व गोडी यांचा स्वाद चाखू शकतील. अतिशय मजेशीर सेटिंग्ससह, मुले रॉकिंग चेयर्सवर बसून फायरप्लेसजवळ आरामात बसून स्वादिष्ट कूकीजचा आनंद घेऊ शकतील.
सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कोपामध्ये आले आहेत नवीन ब्रँड्स आणि खानपानाची नवी ठिकाणे. पुण्यातील पहिले शॉट हे गेमिंग आणि एंटरटेनमेंट झोन, मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे हॅमलेज प्ले भरपूर इंटरॅक्टिव्ह व एंगेजिंग ऍक्टिव्हिटीज घेऊन आले आहे. नुकतेच कोपामध्ये ब्रुक्स ब्रदर्स, चिलीज, कायमा आणि हेड्स अप फॉर टेल्स हे नवे ब्रँड दाखल झाले आहेत. याखेरीज ट्रू रिलिजन, मायकेल कोर्स आणि टीरा ब्युटी हे ग्लोबल ब्रँड देखील या महिन्यात येतील. यंदाच्या सुट्ट्यांमध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मॉल सज्ज आहे.
एकमेव पेट-फ्रेंडली मॉल असणे ही कोपा मॉलसाठी अभिमानास्पद बाब आहे. विंटरशायरमध्ये ग्राहक आणि त्यांचे फरी दोस्त देखील सहभागी होऊ शकतील. सांता नसेल तर ख्रिसमस कसा साजरा होईल? याठिकाणी तुम्ही सांताला भेटून तुमची पत्रे त्याच्या मेलबॉक्समध्ये टाकू शकाल.
मुंबई, दि. २१ : देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसाठी सन २०२३ -२४ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले होते, मात्र नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या योजनेसाठी अर्ज करण्यास ४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम(IIM), आयआयआयटी (IIIT), एनआयटी(NIT),आयआयएससी (IISc), आयआयएसइआर (IISER) इन्स्टीट्यूट ऑफ नॅशनल इंपार्टन्स व इतर कॉलेज या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे रुपये १० हजार दोन टप्प्यात देण्यात येणार आहेत.
या योजनेविषयी अधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन कागदपत्रासह ४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य,३ चर्च पथ पुणे येथे करावा. पदवी, पदव्युतर पदवी, पदव्युतर पदविका पूर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्याना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे- महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत टॉयलेट सेवा ॲपच्या माध्यमातून स्वच्छ शौचालय स्पर्धा भरविण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार आणि उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.टॉयलेट सेवा ॲपच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असताना त्यांनी हि माहिती पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी स्वच्छ पुणे चे ब्रांड अॅम्बेसिडर संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी,तसेच अॅप चे अमोल भिंगे यावेळी उपस्थित होते .
खेमनार म्हणाले कि,’ पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयीसुविधांबाबत अधिक प्रमाणात जनजागृती होणेकरीता अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधणे, वापरानंतर या शौचालयास Feedback देणे किंवा तकारी नोंदविणे इ.सुविधा उपलब्ध असलेले Toilet Seva app तयार केले असून या App द्वारे टॉयलेट्स search करणे, टॉयलेट add करणे, ओव्हरऑल रेटिंग नुसार results sort करणे, टॉयलेटमध्ये असणाऱ्या सुविधा पहाणे किंवा त्यानुसार search results चे filtering करणे उदाहरणार्थ वॉशबेसिन, पाणी, liquid soap किंवा sanitizer, डस्टबिन, lights, महिलांसाठीच्या सनिटरी नॅपकिन्स, टॉयलेट कुठे लोकेटेड आहे हे तपासणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स, community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही माहिती शहरातील नागरिक, तसेच प्रवास करणाऱ्यांना उपयोगी पडणार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांविषयी नागरिकाना आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत देणे आणि आपल्या तक्रारी नमूद सरपणे सोयीचे होणार आहे. दिनांक २२/०६/२०२३ रोजी महापालिका आयुक्त यांचे हस्ते या Toilet Seva app घे लॉचिंग करण्यात आली होती व ते नागरीकांना वापरासाठी खुले करण्यात आले होते.
तसेच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत Clean Tollet Challenge २०२३ च्या अनुषंगाने आवश्यक कामकाज करणेविषयी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सुरक्षित स्वच्छतेसाठी वेगवान बदल करणेकरिता Clean Toilet Challenge प्रक्षेपित करण्यात आले आहे. या अंतर्गत पाच आठवड्यांचा (१९ नोव्हेंबर २०२३ ते २५ डिसेंबर २०२३) संपूर्ण शहरभर सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचे मोठ्या प्रमाणावर सामूहिक स्वच्छता व देखभाल दुरुस्ती अभियान राबविण्यात येणार आहे. शौचालयांचे वापरकर्त्यांना अपेक्षित सेवा सुविधा देणे व उत्कृष्ठ शौचालयांना सर्वज्ञात करणे असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
सध्या सुरु असणारया Clean Toilet Challenge २०२३ च्या अनुषंगाने Toilet Seva App च्या माध्यमातून शौचालय प्रतवारी करून शहर पातळीवर स्वच्छ शौचालाय स्पर्धा राबविल्यास शौचालय व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होऊन नागरिकांना योग्य सोयीसुविधा देण्यात येतील. याकरिता स्वच्छ शौचालय स्पर्धा संपूर्ण शहरभर राबविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून उकृष्ट पाच शौचालयांपैकी एका शौचालयाची निवड अंतिम फेरीकरिता केली जाणार आहे. शहर पातळीवर १५ शौचालयामधून तीन उत्कृष्ट शौचालय निवडले जातील. सदर स्पर्धेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ते ३० जून २०२४ असा असणार आहे. एकूण १०० गुणांकरिता Toilet Seva App Rating/ मानाकन- 30गुण, Toilet Seva App वापर ३० गुण व प्रत्यक्ष निरीक्षण (FACES Parameters (मापदंड)- ४० गुण हे स्पर्धेचे निकष असतील,
स्पर्धेचे परीक्षण करण्याकरीत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी एक अश्या एकूण १५ समिती मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती कार्यरत असतील. केंद्रित स्तरावर अपेक्स कमिटीचे सदस्य पत्रकार स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, सफाई कर्मचारी आयोग प्रतिनिधी इत्यादी सदस्य असणार आहेत व विकेद्रित स्तरावर मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक प्रतिनिधी, निवृत अधिकारी इत्यादी सदस्य असणार आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष राहतील व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती चे अध्यक्ष उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन असणार आहेत. परीक्षणाबाबत सदस्यांमध्ये मतभिन्नता अढळल्यास अंतिम निर्णय अध्यक्षांचा असेल.
या स्पर्धेची व Toilet Seva App च्या दुसऱ्या पर्वाची सुरवात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित माहे डिसेंबर २०२३ मध्ये मा. स्वच्छता बॅन्ड अॅम्बेसिडर डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येईल व स्पर्धेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ असा असणार आहे. माहे जुलै २०२४ मध्ये परीक्षण पूर्ण करण्यात येईल. या स्पर्धेविषयी पुणे महानगरपालिका सोशल मिडिया व प्रिंट मिडिया द्वारे जनजागृती करण्यात येईल.