Home Blog Page 1299

रॉयल्स, स्पार्टन्सची विजयी सलामी-महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग

पुणे :  पी. पी. रॉयल्स आणि आर. आर. स्पार्टन्स संघाने महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग स्पर्धेत  आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल माॅल मधील फुटबाॅल ग्राऊंड  येथे ही स्पर्धा सुरू आहे. 
सुप्रसिद्ध सनदी लेखापाल ललित पोफलीया व उद्योजक संजय बिहाणी मुख्य प्रायोजक न्याती ग्रुपचे डॉ नितीन न्याती यांच्या उपस्थितीत  स्पर्धेचे उद्घाटन झाले. महेश सेवा संघ युवा समितीचे अध्यक्ष विशाल राठी, सचिव केतन जाजू, रजत दरक, वेदांत कारवा, परम जखोटिया, जय मालपाणी यावेळी उपस्थित होते. 
पहिल्या लढतीत रॉयल्स संघाने एमजेएम ग्लॅडिएटर्स संघावर ४-० ने मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. रॉयल्सच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. लढतीच्या अकराव्या मिनिटाला सर्वेश कारवाने गोल करून रॉयल्स संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर लढतीच्या १९व्या मिनिटाला नवल मालपाणीने गोल करून रॉयल्सची आघाडी २-०ने वाढवली. श्रावण राठीने (२१, २५ मि.) एकापाठोपाठ दोन गोल करून रॉयल्सला ४-०ने विजय मिळवून दिला.

दुसऱ्या लढतीत स्पार्टन्स संघाने दुबई एक्स्पर्ट डायनामोज संघावर ४-१ने विजय मिळवला. लढतीच्या दुसऱ्याच मिनिटाला अंकित मुंदडाने गोल करून स्पार्ट्न्स संघाला आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला अभिनंदन भुतडाने स्वयंगोल केल्याने स्पार्टन्सची आघाडी २-० ने वाढली. लढतीच्या १३व्या मिनिटाला ओंकार राठीने मैदानी गोल करून स्पार्टन्सची आघाडी ३-०ने भक्कम केली. परम जाखोटियाने २३व्या मिनिटाला गोल करून स्पार्टन्सला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच सेकंदांत पार्थ लाहोटीने गोल करून डायनामोज संघाचे खाते उघडले. स्पार्टन्सने ४-१ अशी आघाडी अखेरपर्यंत कायम राखून बाजी मारली.
तिसऱ्या लढतीत अक्षत मुंदडा (११ मि.) आणि स्वराज नवंदरच्या (१६ मि.) गोलच्या जोरावर श्री गणेश वॉरिअर्स संघाने एनपीएव्ही निन्जास संघावर २-०ने मात केली.
यानंतर निहार झंवरच्या दोन गोलच्या जोरावर एमजेएम ग्लॅडिएटर्स संघाने मॉवरिक्स  संघावर २-०ने मात केली. यात निहार झंवरने १७व्या मिनिटाला गोल ग्लॅडिएटर्स संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर २४व्या मिनिटाला निहारने दुसरा गोल करून संघाला विजयी केले. 

निकाल – श्री गणेश वॉरिअर्स – २ (अक्षत मुंदडा ११ मि., स्वराज नवंदर १६ मि.) वि. वि. एनपीएव्ही निन्जास -०.
पी. पी. रॉयल्स – ४ (सर्वेश कारवा ११ मि., नवल मालपाणी १९ मि., श्रावण राठी २१, २५ मि.) वि. वि. एमजेएम ग्लॅडिएटर्स – ०.
आर. आर. स्पार्टन्स – ४ (अंकित मुंदडा २ मि., अभिनंदन भुतडा स्वयंगोल ३ मि., ओंकार राठी १३ मि., परम जखोटिया २३ मि.) वि. वि. दुबई एक्स्पर्ट डायनामोज – १ (पार्थ लाहोटी २३ मि.)
श्री माव्हरिक्स – ३ (अंकीत झव्हर १७ मि., क्षीतिज लोहिया २२, २५ मि.) वि. वि. ट्रुव्हिव्ह विकिंग्ज – ०.
किअॅक किकर्स – २ (श्रेष्ठ माहेश्वरी १६, २० मि.) – वि. वि. तपाडिया थंडर्स – ०
सीएनजी राठी रॉयल्स- २ (शशांक अटल २० मि., संकेत कारवा २२ मि.) वि. वि. मालपाणी पँथर्स- १ (अर्पित मंत्री ९ मि.)
………
१२ ते १६ वर्षांखालील मुले – एनपीएव्ही निन्जास – २ (दर्श जाजू ७ मि., कियान भन्साली ११ मि.) वि. वि. लारा लान्सर्स – १ (कुंज नवंदर २ मि.).
एबीएल विकिंग्ज – १ (कैरव हेदा १६ मि.) वि. वि. महारथी सटोना -०.

महापालिकेला ही संविधानाचा पडला विसर केले कलम १९ चे उल्लंघन – आप चा आरोप

संविधानाच्या कलम 19 चे महापालिकेकडून उल्लंघन; महापालिका आवारात नागरिकांना आंदोलनाचा अधिकार नसल्याचा लावला फलक

पुणे -महानगरपालिकेला भारतीय संविधानाच्या कलम 19 मध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी दिल्या गेलेल्या आंदोलनाच्या मौलिक अधिकाराचा विसर पडल्याचे दाखवून देत आम आदमी पक्षाने आज पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारती बाहेर आंदोलन करत नागरिकांच्या आंदोलनाचा अधिकार काढून घेणारा फलक लावल्याच्या कृतीचा निषेध करत हा फलक काढून टाकण्याची मागणी केली. पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारती च्या प्रवेशद्वारावर महापालिकेतर्फे *भारतीय संविधानाचे जनक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्ध पुतळा लावण्यात आला आहे, या पुतळ्यासमोरच महापालिका प्रशासनाकडून महापालिकेच्या आवारात कोणत्याही प्रकारचे आंदोलन केले जाऊ नये अशा प्रकारचा सूचना देणारा फलक लावला होता. वास्तविक पाहता विधानसभा असो किंवा भारतीय संसद अनेक लोकप्रतिनिधी हे सभागृहाच्या पायऱ्यांवर तसेच सभागृहाच्या आवारात निषेध आंदोलन करत असतात. त्याच अनुषंगाने महापालिकेच्या आवारातही निषेध आंदोलन करण्याची परवानगी सर्वसामान्य नागरिकांना तसेच राजकीय पक्षांना मिळाली पाहिजे, जेणेकरून राजकीय पक्ष तसेच सर्वसामान्य नागरिक महापालिका प्रशासनापुढे त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडू शकतात. परंतु असे न होता महापालिकेतील प्रशासनाने महापालिकेत कोणत्याही प्रकारचे राजकीय अथवा सामाजिक आंदोलन करू नये असा फतवा जारी केला होता व तशा आशयाचा फलक महापालिका आवारात लावला होता. याला आम आदमी पक्षाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला व अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच भारतीय संविधानाच्या कलम 19 ची पायमल्ली होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले तसेच हा फलक तात्काळ काढून टाकावा अशी मागणी केली गेली.

याप्रसंगी आम आदमी पक्षाच्यावतीने मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, अमित म्हस्के, सुरेखा भोसले, अक्षय शिंदे, सतीश यादव, ॲड.अमोल काळे, निलेश वांजळे, अमोल मोरे, संजय कोणे,निरंजन अडागळे, ॲनी अनिश, अनिश वर्गीसे, सेंन्थिल अय्यर, प्रीती निकाळजे, ऋषिकेश मारणे, अल्ताफ शेख, शंकर थोरात, सचिन कोतवाल, रवी लाटे,निखिल खंदारे,मिलिंद सरोदे, अनिकेत सोनवणे, शिवराम ठोंबरे, मायकल मस्केरेनस इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली, पुढील सुनावणी २४ तारखेला

0

नवी दिल्लीः मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली असून लवकरच आरक्षणाच्या संबंधाने सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे.मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरलीय. मात्र राज्य सरकारने हे शक्य नसल्याचं म्हटलं होतं.

मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारनं केलेला कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केला होता. त्यामुळं मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं एसईबीसी आरक्षण रद्द झालं होतं. राज्य सरकारनं या संदर्भात पुनर्विचार याचिका देखील केली होती. ती याचिका देखील फेटाळण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारनं पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. या क्युरेटिव्ह पिटीशनवर २४ जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येईल, असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटीशनवरील सुनावणी सरन्यायाधीश डॉ. धनजंय चंद्रचूड, न्या. एस. के. कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. भूषण गवई यांच्या पीठापुढं होणार आहे. सुप्रीम कोर्टानं ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला होता. आता यापुढील सुनावणीत काय होतं, ते पाहावं लागणार आहे.

खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी;उर्से टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा,१५-१५ मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहने सोडणार..

0

लोणावळा:नाताळनिमित्त शाळा व महाविद्यालये, सरकारी कार्यालये यांना सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत, पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. उर्से टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्ग पोलिसांनी आता पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक १५-१५ मिनिटांसाठी थांबवून त्या लेनवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक कोंडी फोडली जाणार आहे. नाताळ सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे सलग सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होते. त्यामुळे आज शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत जड वाहनांना माहमार्गावर बंद घालण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे वाहतूक अपर पोलीस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांनी दिली आहे.

तरी सर्व जड अवजड वाहन मालक आणि चालक संघटना यांना वाहतूक पोलिसांनी आवाहन करण्यात आले आहे की, शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी १२ नंतर सुरू केल्यास आपला प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल. तसेच वाहतूक कोंडी मुळे वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनचे काम निघणे इत्यादी टळू शकेल. तसेच इंधन आणि वेळची बचत होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

20 जानेवारीला मुंबई चलो:आझाद मैदानावर आमरण उपोषण; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

0

बीड-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे‎ पाटील यांची निर्णायक इशारा सभा बीडमध्ये पार पडत‎ आहे. या सभेसाठी जय्यत तयारी झालेली असून या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जरांगे हे सभास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी 200 जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली तर हेलिकॉप्टरने संपूर्ण सभास्थळावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली.

जरांगे-पाटील म्हणाले, “सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं. त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील.”बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा महाप्रलय जमला आहे. आपण विराट ताकदीनं जमला आहात त्यामुळं मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो, असं जरांगे म्हणाले. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलेल्या बांधवांना जय शिवराय म्हणत मनोज जरांगेंनी अभिवादन केली.

मराठा समाजानं शांतता काय असते ते पुन्हा सिद्ध केलं आहे. आपल्याला डाग लावला गेलाय, शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना डाग लावला आहे. कोणी म्हणतं आमची घरं जाळलं, आमचं हॉटेल जाळलं पण तुम्हीच तुमची हॉटेल जाळली आणि निष्पाप मराठ्यांना गुतवल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला.

आपल्या पोरांनी काय न करताही गुन्हे लावले गेले. निष्पाप पोरांना गुतवण्याचं काम सरकारनं केलं आहे. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. सरकारनं झोपू नये, मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. मराठा समाज शांततेत मैदानात आला आहे, विनाकारण त्याला डाग लावू नका, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचेच सरकार ऐकत असल्याचा दावा केला. भुजबळ मराठ्यांच्या वाटाला कशाला जातात, असा सवाल मनोज जरागेंनी केला. मी लई नमुना बेक्कार असल्याचं जरांगेंनी म्हटलं.गिरीश महाजन यांनी तुम्ही काही बोलू नका छगन भुजबळ यांना समज दिली असल्याचं सांगितल्याचं मनोज जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण मिळाल्यानं कचका दाखवतो. भुजबळ यांच्यात किती दम आहे हे बघायचे आहे, असं जरांगे म्हणाले.मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोण बोलला तर त्यांना सुट्टी देणार नाही. मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरु असल्याचं जरांगेंनी म्हटलं. मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली.

‘येवल्याच्या येडपटाने त्याच्याच पाहुण्याचं हॉटेल जाळलं. ते बधीर आहे, सरकारही त्याचंच ऐकत आहे. बाजारची पिशवी घेऊन त्यात कागदं घेऊन फरत आहे. बघा.. बघा मला कशा शिव्या देतेत, म्हणत आहे. परंतु मी आधीच सांगत होतो माझ्या लादी लागू नको म्हणून. मी लई नमुना बेकारय. तुला आत्ताच खाल्लेलं पचत नाही.”जरांगे पुढे म्हणाले, ”सध्या तो (छगन भुजबळ) बारीक बोलतोय, जसंकाय कळ निघती. जरांगे साहेब म्हणतोय आता. आधी अळी वळवळ करत होती. दिसतंयबी कसलंतरी.. रंग बदलणाऱ्यासारखं.””मला गिरीश महाजनांनी सांगितलं, तुम्ही बोलू नका. मी चार दिवस काही बोललो का? तरी काल बोललं. येडपट बुजगावणं. द्या सगळं त्यांना.. मंत्र्यांचे बंगले बांधा.. असं म्हणालं”

सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार. आजच्या सभेत सर्वकाही सांगणार आहे. संयम किती दिवस पाळायचा आम्हालाही मर्यादा आहे. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे. सरकारने लिहिलेले शब्द सरकार पाळत नाही. आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार आहे. मराठा समाजाने आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत,” असे जरांगे म्हणाले.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील…!

  • मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत येणार आहे. आम्हाला कोणताही त्रास देऊ नका, मुंबईत मराठे आल्यावर पोलिसांनी त्रास देऊ नये.
  • सरकारने आम्हाला अडवू नये, आमरण उपोषणाशिवाय कोणताही शांततेचा मार्ग असूच शकत नाही.
  • मुंबईच्या आत येण्यापूर्वी सरकारने आरक्षण दिलेच पाहिजे, नसता त्यांना अनेक गोष्टीला समोर आले.
  • मराठ्यांच्या संघटना कोणीही स्वतंत्र आंदोलन करायचे नाही. नाटकं बंद करा, मराठ्यांच्या सोबत राहा, असा इशारा देखील मराठा संघटनांना जरांगे पाटील यांनी दिला. वेगळी चूल कोणीही मांडायची गरज नाही.
  • मराठा जात संपविण्याचा डाव सरकारकडून केला जात आहे. पण घाबरु नका, मराठा मागे लागला तर दोन पिढ्या तुम्हाला काहीच सुधारणार नाही, असे म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला.
  • मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कोणी दंगा करायला लागला तर तो आपला नाही, जो हिंसा करेन तो आपला नाही, एवढं मात्र नक्की आहे. ‘प्रश्न मार्गी लावा, नाटक कशाला’.
  • कोणालाही जाळपोळ करू द्यायची नाही. आपले माणसं लक्षात ठेवा, कुठेही जाळपोळ होणार नाही, याची दक्षता घ्या. पंधरा दिवस आपल्यायाला मुंबईत उपोषण करायचं आहे. त्या तयारीनेच त्या जायचे आहे. कोणाला अटक केली तर पोलिसांच्या समोर जाऊन बसा, असा सल्लाही त्यांनी दिला. विनाकारण मराठा समाजाला अडचणीत आणण्याची गरज नाही, असाही इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
  • मराठ्यांचा मुळावर कोण आहेत. जो कोणी मराठ्यांच्या पाठिशी उभा राहिलात तोच नेता आमचा, असा इशारा देखील त्यांनी राजकारण्यांना दिला आहे.
  • गडबड, गोंधळात माणूस फसतो, मागे पुढे पाहून निर्णय घ्यायचा आहे.
  • सरकारला विनंती आहे, मराठा समाजाला आता डिवचवू नका, तुम्ही आंतरवाली सराटीत प्रयोग केला. पुन्हा तसा प्रयोग करू नका, सरकारला वाटलं की, पुन्हा डाव रचला. आयोजकांना नोटीस दिल्या. ट्रॅक्टरवाल्याला देखील पोलिसांनी नोटीस दिल्या.
  • आमच्या लेकराचं मुडदे आम्ही बघू शकत नाही. शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे. शांततेत पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे घेणार नाही. तुम्ही किती दिवस मराठा समाजाच्या मर्यादा आहेत. आपण सगळे आंदोलनाची दिशा ठरवू
  • मराठा समाजाला आरक्षण मागितले तर चूक आहे. मला ते लोक दुश्मन समजू लागले. मी मॅनेज होत नाही, त्यांना हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.
  • सरकारने मराठा समाजाची फसवणूक करतेय. मायबाप सावध व्हावा, आपल्या लेकरासाठी सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारला वठणीवर आणण्याची ताकद आहे. मी कुणालाही गिनतही नाही भीत नाही.
  • मराठ्यांच्या नादाला लागला की संपला, त्याचा विषयच आवरला. जे आपल्या लेकरांच्या बाजूने आहे. तोच नेता आपला बाकी कोणीच आपला नाही. आपलं मतं घेण्यासाठी दारात आला तर त्याला चपल्लेने तुडवा, कारण आरक्षणासाठी किती तरी बळी गेले आहेत.
  • या समाजातील लेकरांना आरक्षण मिळावे हीच मागणी आहे. मी काय चूक केली आहे. दशकाने दशक वाया गेले, पिढ्याने पिढ्या बरबाद झाल्या, एवढीच मागणी आहे. मग आम्ही काय चुकीची मागणी केली. माझं लेकरु मोठं व्हावं, नोकरीला लागावं, एवढीच आशा कोणत्याही मायबापाची आहे. पण आरक्षणाने घात केला. हुशार लेकरू देखील घरी येवून रडू लागले. त्यामुळे आता आरक्षण नक्की मिळणार आहे. याची शंभर टक्के गॅरंटी देतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
  • आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे, यासाठी ही आमची लढाई आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की, आमच्या सर्वांची वेदना एकच आहे. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्या, भुजबळांचे ऐकू नका, एकदा जर संपूर्ण समाज खवळला तर मग तुमचा सुफडा साफ झाला म्हणून समजा. माझ्या मराठ्यांना तडफू नका, तुम्ही एकदा प्रयोग केला. त्यामुळे त्या प्रयोग तुम्हाला भोगावा लागला. आता सावध रहा, कानाकोपऱ्यातली मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे भुजबळचे ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केला.
  • त्याला पाणीच पाजतो, त्याचा खुटाच उपटतो, माझे उलटं आहे, आधी समाज नंतर कुटुंब. त्यामुळे मराठा समाजाशी माझे माय-लेकराचं नातं आहे.
  • तुला म्हटलं होत, नादी लागू नको, मी लयी नमुना बेकार आहे, असा शब्दात जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली. जरांगे साहेब म्हणतो, आता म्हाताऱ्याला काही बोलायची गरज होती. त्याला अक्कल काढतो. महाराष्ट्राला या डबड्याची गरज काय, आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा, या भुजगावण्यात किती दम आहे, बघूच आता, अशा एकेरी उल्लेख करत जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.
  • बीडमध्ये मराठ्यांच्या एकीजुटीचा हा महाप्रलय आहे. ही मराठ्यांची मागणी
  • शांत असलेल्या मराठा समाजावर खोटा डाग लावलाय, यांनी यांचेच हॉटेल जाळले अन् मराठ्यातील निष्पापावर आरोप केले. मराठ्यांना शांतता बघा, असा इशारा सरकारला जरांगे यांनी दिला.
  • मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच छगन भुजबळ यांच्यावर टीका करून केली. एवढी गर्दी पाहून येवल्याच्या यडपटाला .XXXXसंंXX लागल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात टीका करत भुजबळांवर हल्लाबोल केला.

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा-अजित पवार

पुणे, दि. २३:स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे, या मार्गाला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यावर राज्य सरकारच्या हिश्श्यातील निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मेट्रो मार्ग आणि अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र शासन स्तरावर आवश्यक मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. या मेट्रो मार्गावरील स्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करावी. रामवाडी येथून विमानतळापर्यंत मेट्रो लाईन सुविधा देण्याचा विचार व्हावा.

अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती द्यावी. संगमवाडी ते खराडी रस्त्याचे भूसंपादन करण्याची कार्यवाही लवकर करावी. नगररोड परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. पोलीस विभागाने या भागात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, नगर रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची कार्यवाही तातडीने करावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करतांना स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे विचाराधीन आहे. लवकरच त्यास मान्यता मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळेल, यानंतर या मार्गावरील काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मराठी नाट्य संमेलनासाठी २० लाखाचा निधी-अजित पवार

पुणे, दि. २३: पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखाचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज भोसले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी शासनातर्फे १० कोटी रुपये देण्यात येणार आहे. या संमेलनासाठी आमदार निधीतून प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यात येईल. नाट्य संमेलनासाठी मंडप अत्यंत उत्तम दर्जाचा असावा. नाट्य कलावंतांना आवश्यक सर्व सुविधा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उपलब्ध करून द्याव्यात. सर्वांच्या स्मरणात राहील असे आयोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, संमेलनासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही संमेलनाला सहकार्य करण्यात येईल.

यावेळी श्री.भोईर यांनी नाट्य संमेलनाविषयी माहिती दिली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी-अजित पवार

0

पुणे, दि. २३: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, स्मारकासाठी आलेल्या आराखड्याच्या विविध पर्यायांवर विचार करून चांगला पर्याय निवडण्यात येईल. स्मारक विस्तारासाठी जागा संपादन आणि तिथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

भिडेवाडास्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा विचार करावा. जागेची मर्यादा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा. याबाबत लवकरच बैठक घेऊन आराखड्याचे स्वरूप निश्चित करता येईल. स्मारकाची इमारत बाहेरून जुन्या काळातील वाटेल आणि आतल्या बाजूने सुसज्ज असेल, अशी व्यवस्था करावी.

भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक प्रेरणादायी ठरावे यासाठी स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरक कार्य आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांचा अंतर्भाव असावा. या स्मारकासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे श्री. पवार म्हणाले.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, पहिली मुलींची शाळा म्हणून भिडेवाड्याचे महत्व असल्याने याठिकाणी आधुनिक पद्धतीची मुलींची शाळा असावी. शाळेत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा असाव्यात. इमारतीचा दर्शनी भाग जुन्या काळातील वाटावा. इमारतीत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी शिल्पे असावी.

इथे शिकणाऱ्या मुली स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हाव्यात यासाठी आवश्यक सुविधा असाव्यात. मराठी आणि इंग्रजीतील आदर्श शिक्षकांची समिती तयार करून इथे देण्यात येणाऱ्या शिक्षणावर लक्ष ठेवण्यात यावे. स्मारकात परदेशी पर्यटकांना माहिती देण्याची व्यवस्था असावी. या वास्तूचे ‘सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा’ असे नामकरण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत सादारीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

“अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार?” मनोज जरांगेंचा अजित पवारांना प्रश्न

बीड-मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, कोणीही कुठलीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल. कायद्याच्या चोकटीत टिकणारं आरक्षण द्यावं लागेल.या अजित पवार यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, आम्ही कायद्याच्या चौकटीबाहेरचं काही मागितलेलं नाही. ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. इतर कुठल्याही समाजातील लोकांच्या इतक्या नोंदी सापडल्या नाहीत. याआधी ज्यांना आरक्षण दिलं आहे त्यापैकी अनेक समाजांच्या नोंदी नाहीत, अनेक समाज मागास सिद्ध झालेले नाहीत, तरीदेखील त्यांना आरक्षण दिलं आहे. परंतु, मराठ्यांकडे नोंदी आहेत, ते मागास आहेत हे सिद्ध झालं आहे, तरीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलटी आहे का? ज्या समाजांच्या नोंदी नाहीत, जे मागास सिद्ध झालेले नाहीत त्यांना आरक्षण द्यायचं आणि जे मागास सिद्ध झालेत किंवा ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्यायचं नाही, अशी सरकाची उलटी चौकट आहे का? अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार?

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असे खडेबोल सुनावलेत. तुम्ही आतापर्यंत स्वतःला हुशार समजत होता. लोकांना वेड्यातही काढत होता. पण आता चालणार नाही. जनता आता हुशार झाली आहे. आम्ही आता वेड्यात निघणार नाही. आम्हाला आरक्षण हवे असून, आम्ही ते घेतल्याशिवाय सोडणार नाही, असे ते म्हणालेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या राज्याचे राजकारण पेटले आहे. मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याची मुदत दिली आहे. ही मुदत उद्या संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी शनिवारी पुन्हा एकदा सरकारला मराठा समाजाला वेड्यात न काढण्याचा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणावरील सरकारची भूमिका स्पष्ट करताना कुणी कोणतीही मागणी केली, तरी सरकारला कायद्याच्या चौकटचीत राहून काम करावे लागेल, असे ठणकावून सांगितले. त्यावर जरांगे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.

मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेरचे काहीच मागितले नाही. राज्यात आतापर्यंत 54 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. इतर कोणत्याही समाजातील लोकांच्या अशा नोंदी सापडल्या नाहीत. यापूर्वी ज्यांना आरक्षण दिले, त्यापैकी अनेक समाजांच्या नोंदी नाहीत. त्यानंतरही ते मागास असल्याचे सिद्ध झाले. याऊलट मराठा समाजा मागास असल्याचे सिद्ध झाले तरी त्याला आरक्षण दिले जात नाही. असे का?

किती दिवस वेड्यात काढणार?

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलटी आहे का? ज्या समाजांच्या नोंदी नाहीत, जे समाज मागास सिद्ध झाले नाही, त्यांना आरक्षण द्यायचे आणि जे मुळात मागास आहेत, ज्यांच्याकडे नोंदी आहेत, त्यांना आरक्षण नाकारयचे, अशी सरकारची कायद्याची उलटी चौकट आहे का? आम्हाला अजून किती दिवस वेड्यात काढणार? असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

दुसरीकडे, मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. या सभेद्वारे मनोज जरांगे मराठा आंदोलनाची पुढील रणनीती जाहीर करण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या सभास्थळी किल्ल्याची प्रतिकृती असलेले भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी 3 टन खिचडी, 4 लाख पाणी बॉटल आणण्यात आल्या आहेत.

मी गुन्हा केला तर माफी मागेन, पण मला झुकवण्याचा प्रयत्न असेल तर अजिबात मागणार नाही; सुषमा अंधारेंचे गोऱ्हेंना पत्र

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हक्कभंगाच्या मुद्यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी आपल्याकडून एखादा गुन्हा झाला असेल तर माफी मागेन, पण मला झुकवण्याचा प्रयत्न असेल तर अजिबात मागणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.

भाजप आमदार देवयानी फरांदे सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंधारे यांना पत्र लिहून माफी मागा किंवा हक्कभंगाला सामोरे जा असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी गोऱ्हे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे सुषमा अंधारे यांनी आपल्याकडून अनावधानाने चूक झाल्याचे मान्य केले आहे. पण सोबतच तुरुंगात जावे लागले तरी बेहत्तर, पण माफी मागणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. सभापतीपदावरील व्यक्ती शिवाजी महाराज व महात्मा फुलेंपेक्षा परमादरणीय आहेत काय? असा संतप्त सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

खाली वाचा सुषमा अंधारेंचे पत्र जशास तसे

प्रति सभापती, विधान परिषद महाराष्ट्र राज्य

संदर्भ: दिनांक 20 12 2023 रोजी माझ्या संदर्भात सभापती पदाच्या खुर्चीवरून हक्क भंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या निर्देशाबाबत..

प्रिय लोकशाही,

तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळात ही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचे मला भान आहे.

व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संवैधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.

पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील ‘व्यक्तीने’ माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात. मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले, किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला. अगदी तितक्याच अनाहुत, नकळतपणे माझ्याकडून गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे.

सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत. पण जर खरेच अशी गरिमा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना किंवा सभापती पदावरील व्यक्तीला कळत असेल तर मग या सभापती पदाचे किंवा या सभागृहाचे अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे. त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबारमध्ये मंत्री असणारे चंद्रकांत जी पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही. किंवा महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आ .प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही?

सभापती पदावरील व्यक्तीने आठ दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही? किंवा महापुरुषांचा अपमान आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही असे दरेकर किंवा मुनगंटीवार किंवा त्यांच्या सुरात सूर मिसळून सभागृहामध्ये गोंगाट करणारा प्रत्येक सदस्य त्यांनी ही भूमिका का घेतली नाही? की मग सभापती पदावरील व्यक्ती गोऱ्हे या छ. शिवाजी महाराज, म. फुले, राजर्षी शाहू महाराज या सगळ्या महापुरुषांच्या पेक्षाही वरच्या स्तरावर आणि परमादरणीय आहेत का? की जेणेकरून त्यांच्या संबंधाने नकळत निघालेला शब्द सुद्धा अपमान म्हणून गृहीत धरला जातो मात्र राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान सगळे भाजपचे आमदार आणि स्वतः सभापती पदावरील व्यक्ती मूग गिळून सहन करतात.

प्रिय लोकशाही, माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही..!!! भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे.

सुषमा अंधारे

मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार

पुणे दि.२३-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, दीपक मानकर आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल. पुढच्या पिढीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात रहावे आणि याठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे कळावे या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न आहे. बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतल्या बाजूस विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा असाव्यात असा प्रयत्न राहील. वाहनतळासाठीदेखील व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार

महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासंदर्भात श्री.पवार म्हणाले, अडीच एकर क्षेत्रावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले आहे. याठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. महात्मा फुले वाडा १९९३ मध्ये उभारण्यात आला आहे. दोन्ही भाग एकत्र करून विस्तृत स्वरुपाचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा शासनाचा मनोदय आहे. त्यासाठी काही कुटुंबांना स्थलांतरीत करावे लागेल. यापूर्वीदेखील काही कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांचा यासाठी विरोध नाही. मात्र त्यांचे चांगले पुनर्वसन व्हावे, त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. रहिवाशांना आवश्यक सुविधा आणि पर्यायी जागा देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. राज्य शासन आणि महानगरपालिका मिळून पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकूण पाऊणेचार एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे स्मारक उभारेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तत्पूर्वी श्री.पवार यांनी दोन्ही स्मारकाच्या जागेस भेट देऊन तेथील कामांबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यांनी स्थानिक रहिवाशांशी चर्चादेखील केली.

जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना १९५१ च्या कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

पुणे : जिल्ह्यात पौड, लोणावळा व हवेली पोलीस ठाणे हद्दीत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी तसेच १ जानेवारी २०२४ रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा येथे मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून बहुसंख्य अनुयायी मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी २५ डिसेंबर रोजी ००.१० वाजेपासून ते ७ जानेवारी २०२४ रोजी २४.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराअंतर्गत सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, बंदोबस्ताचे अधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत.

रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे त्यांनी वर्तणुक किंवा वागणूक कशी ठेवावी. कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होवू देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे वइतर कर्कश्श वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिपेक्षकाचा (लाऊडस्पीकर) उपयोग करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे याबाबत हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

सक्षम प्राधीकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे ३३, ३५, ३७ ते ४०,४२, ४३ व ४५ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे पुस्तक महोत्सवाला भेट

पुणे : पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देऊन विचार, संस्कृती आणि विज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल; म्हणून राष्ट्रीय पुस्तक न्यासाने राज्यात विभागनिहाय पुस्तक महोत्सव आयोजित करावा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला दिलेल्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सुनिल कांबळे, राहुल कुल, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे  संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.

पुस्तके ज्ञान प्रवाह सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य करतात, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ज्ञान संकुचित ठेवल्यास समाज प्रगती करू शकत नाही. पुस्तकामुळे  विचार आणि व्यक्ती घडतात, व्यक्तीला जीवनाची दिशा सापडते, आपल्या विचारांच्या कक्षा रुंदवतात. पुस्तके आपल्यात सामाजिक जाणिवा निर्माण करतात.

समाजात कोणते साहित्य वाचले जाते यावरून समाजाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून आपली स्वतःची ओळख, स्वातंत्र्याचे मोल समजते. त्यामुळे पुस्तके मोलाचा ठेवा आहे. राष्ट्राकडे संपत्तीपेक्षा पुस्तकरूपी विचारांचा खजिना किती मोठा आहे यावरून राष्ट्राचे वैभव ठरते, असे त्यांनी सांगितले.

पुस्तकांच्या रूपाने पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान पोहोचविणारा पुस्तक महोत्सव समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मितीचे महत्वाचे साधन आहे, असे नमूद करून ते पुढे म्हणाले, पुणेकरांमध्ये ज्ञानसंपादान करण्याची लालसा जास्त असल्याने पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे हे योग्य ठिकाण आहे, हे महोत्सवातून दिसून आले. विशेषतः तरुणांचा प्रतिसाद वाखाणण्यासारखा आहे. तरुणाई महोत्सवाकडे आकर्षित करणे ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले.

हा देशाचा सर्वश्रेष्ठ पुस्तक महोत्सव असल्याचे नमूद करून श्री.मलिक म्हणाले, दिल्ली वगळता एवढा मोठा पुस्तक महोत्सव कुठेच होत नाही. महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने चांगले सहकार्य लाभले. लोकसहभागातून भव्य आयोजन शक्य होते हे पुण्याने दाखवून दिले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.पांडे यांनी प्रास्ताविकात पुस्तक महोत्सवाविषयी माहिती दिली. पुस्तक महोत्सवात चार विश्वविक्रम साकारले असून अशा स्वरूपाचा हा एकमात्र पुस्तक महोत्सव आहे. तरुणांनी पुस्तक खरेदीला दिलेला प्रतिसाद हे महोत्सवाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. अशी माहिती त्यांनी दिली. महोत्सवात पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी श्री.फडणवीस यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. त्यांच्या हस्ते ‘पुस्तकवारी’ या वार्तापत्राचे प्रकाशन करण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकारसंघाच्या पदाधिकारी, बासरीवादक अमर ओक आणि ‘श्रीमंतयोगी’ प्रयोगाचे अभिषेक जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

भारती विद्यापीठाच्या कल्पेश पाटील, संकेत नस्कुलवार, स्वप्नाली बिरुंगी आणि गणेश चव्हाण या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे  व्यंगचित्र रेखाटून त्यांना भेट दिले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

000

महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

0

राष्ट्रपतींच्या हस्ते ९ जानेवारी २०२४ रोजी पुरस्काराचे वितरण

नवी दिल्ली : वर्ष 2023 साठीचे  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि  क्रीडा  मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.  यावर्षी दोन खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 26 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यासह एकूण 9 खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ व ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यासोबतच ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील तीन  खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. ‘मौलाना अबुल कलाम आझाद चषक’ गुरू नानक विद्यापीठ, अमृतसर, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र या तीन संस्थांना घोषित करण्यात आला आहे.

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्रचे बॅडमिंटन पटू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा समावेश आहे. तर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांना आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे, तर ‘अर्जुन पुरस्कार’ हा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देखील दिले जाते.

ऑगस्ट 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत 21 वर्षीय ओजसने सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून आणखी एक विक्रम केला. नागपूरचा गोल्डन बॉय तिरंदाज ओजस देवतळे याच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी त्याचे नाव जाहीर झाले आहे.

सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये 720  पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

सलग चारवर्ष कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते.  खेळात तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी ‘अर्जुन पुरस्कार’ दिला जातो.  खेळाडूंच्या मागील चार वर्षांतील उत्तम प्रदर्शन, नेतृत्व, खेळ आणि त्यातील शिस्तीसाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळातील प्रशिक्षण देण्यासाठी आणि खेळाडुंकडून स्पर्धांसांठी उत्कृष्ट कार्य करून घेणा-या क्रीडा प्रशिक्षकांची ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’साठी शिफारस केली जाते.

खेळ आणि स्पर्धेमधील आजीवन कामगिरीसाठी ‘ध्यानचंद पुरस्कार’ दिला जातो. यामध्ये खेळाडूंच्या चांगले प्रदर्शन आणि सेवानिवृत्तीनंतरही संबंधित क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देत राहण्यासाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते. खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कॉर्पोरेट संस्था ज्या खेळाडू आणि खेळांना प्रोत्साहन देतात अशा संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन’ पुरस्काराने गौरिवण्यात येते. आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी दिली जाते.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी

मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन) अर्जुन पुरस्कार:ओजस देवताळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बोल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). ’

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब).

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ’

ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)

0000

‘जे एन-१’ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

0

मुंबई, :  राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.

‘जेएन-१’ साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर रुग्णालयांतील यंत्रणेचे गांभीर्याने मॉकड्रिल करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करण्याचे असे निर्देश प्रा. डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा पुणे येथे आढावा घेतला. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

‘जेएन-१’ हा व्हेरियंट धोकादायक नसला तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. नागरिकांमध्ये अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी जिल्हा स्तरापासून घेण्यात यावी. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. ‘जेएन-१’वर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे गांभीर्याने आणि वस्तुस्थितीला धरून मॉकड्रिल करावे. हलगर्जीपणा न करता आरोग्य यंत्रणा, विलागीकरण कक्ष, ऑक्सिजनची सुविधा, अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटर आणि महत्त्वाची उपकरणे कार्यरत असल्याबाबत प्रत्यक्ष जाऊन तपासणी करावी आणि त्याबाबतचे व्हिडिओ तयार करून राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावेत. प्रत्येक जिल्ह्यात संशयित रुग्णांच्या चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असून चाचणी, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, अशा सूचना डॉ. सावंत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमासह जिल्हा रुग्णालय, आपला दवाखाना येथे फलक लावण्यात यावेत. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरू नये यासाठी माध्यमांना माहिती देण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्यामार्फतच याविषयीची अधिकृत माहिती देण्यात यावी. जेणेकरून अफवा आणि चुकीची माहिती प्रसारित होणार नाही. प्रसारमाध्यमांनीही याविषयीचे वृत्त देताना वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भीती पसरेल अशी चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

0000