तब्बल १ हजाराहून अधिक भक्तांचा सहभाग ; महाराष्ट्रातील पहिला सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा पुणे : श्री स्वामी भक्त मठाधिपती दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू शंकर बाबांच्या एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्क हॉटेल येथे सकाळी १० पासून हा पारायण सोहळा होणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा आहे.
एक दिवसीय शंकरगीता पारायण समिती, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार पुणे शहर, श्री शंकर महाराज भक्त परिवार पुणे शहर, श्री सद्गुरु चिले महाराज भक्त परिवार पुणे शहर यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता इष्टदैवत पीठ पूजन होऊन दुपारी ३ वाजता शंकर गीता पारायणाला सुरुवात होणार आहे. पारायणास बसणा-या भक्तांनी श्री शंकरगीता पोथी, बसण्याचे आसन, पोथीसाठी स्टॅन्ड किंवा पाट, १ नारळ असे साहित्य घेऊन यायचे आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती होऊन रात्री ८ वाजता भजन सेवेला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
मुंबई दिनांक ३० डिसेंबर २०२३ राम वर्गणीची चेष्टा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने केली. राम वर्गणीच्या विषयावर कुचेष्टा करणारे लेख त्यांच्या वर्तमानपत्राने लिहिले. राम मंदिर बांधायला सुरुवात होताना जागेसंबंधी ज्यांनी वादविवाद केले अशा व्यक्तीची तळी उचलणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राम मंदिराशी संबंधच काय ?असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, राम मंदिर कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही आणि ती असू शकतं नाही. ती समस्त हिंदू समाजाची आहे. साधुसंत महंत तसेच ज्या सामान्य माणसांनी राम मंदिरासाठी एक एक रुपया स्वतःच्या खिशातून दिला त्या सर्वांचे राम मंदिर आहे. खऱ्या ग्राम भक्तांची आहे. ही प्रॉपर्टी नक्की उद्धव ठाकरे यांच्या गटाची नाही. भगवान राम हा काल्पनिक आहे असे म्हणणारे कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांचे वकील आहेत. रामसेतू असं काही प्रकार नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे यांची हातमिळवणी आहे. राम मंदिर ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही आम्ही तसे समजत नाही. ती हिंदू समाजाची, राम भक्तांची, साधुसंतांची, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची आहे. उद्धव ठाकरे यांचा राम मंदिरांशी तिळमात्र संबंध नाही कारण त्यांची मैत्री राम मंदिराला विरोध केला त्यांच्याशी आहे.
हा श्रद्धेचा उत्सव आहे…..
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, राम मंदिराचा राजकीय इव्हेंट होऊच नये आणि कुणी तसे करतही नाही. हा श्रद्धेचा उत्सव आहे. इतके वर्षे भारतीय मनामध्ये जे साठले आहे त्याचा उत्सव आहे. या आनंद उत्सवामध्ये सर्वांना सहभागी झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. ज्यांचा या उत्सवामध्ये तिळमात्र संबंध नाही त्यात निमंत्रित नसलेल्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे बोलणे हा थयथयाट आहे. राजकीय भूमिकेतून त्याला विरोध करण्यासाठी उद्धवजी तुम्ही का पुढे आहात ? असाही सवाल त्यांनी केला. त्यातून कुठली मते तुम्हाला मिळवायची आहेत?त्याची चादर कुठल्या रंगाची आहे? हे तुम्ही स्पष्ट करा असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.
खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे ‘नटसम्राट’
इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलणे ही महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ उद्धव ठाकरे करू शकतात. कुणाच्या वजनावर, व्यक्तिमत्त्वावर, वक्तृत्वावर टीकाटिपणी आलोचना करणे आणि घालून पाडून बोलणे हा उद्धव ठाकरे यांचा ठेका आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नटसम्राट उद्धव ठाकरे आहेत. तुम्हाला याच्यामुळे मते मिळणार नाहीत. देवेंद्र फडणवीस राम मंदिराच्या लढाईमध्ये बाल स्वयंसेवक असल्यापासून आहेत. उद्धवजी तुम्ही कधी कारसेवेत दिसलात का नाहीत. कधी तुम्ही शीलापूजन केले का नाही तर नाहीत. कधी तुम्ही गंगापूजन केले का नाही. एक रूपया राम वर्गणीला दिलात का तर नाहीत. तुमचा केवळ राजकीय संबंध अयोध्येशी होता. देव देश आणि धर्मासाठी तुम्ही राजकीय घोषणा दिल्यात. केवळ राजकीय हेतूने मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसल्यावर तुम्ही देव, देश आणि धर्म विसरलात. ज्यांनी राम ही कल्पना सांगितलं त्या काँग्रेससोबत गेलात. तुम्ही रंग इतका बदलला की, ज्या समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंह यादवांनी राम भक्त कोठारी बंधूंवर शरयू नदीकिनारी गोळ्या झाडल्या त्यांच्याशी तुम्ही संधान साधले. समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंह यादव यांचे हात राम भक्तांच्या खुनाच्या रक्ताने रंगले आहेत त्याच्याशी तुम्ही हातमिळवणी केली. तुम्ही कारसेवक आणि राम भक्तावर बोलू नये असा टोलाही त्यांनी लगावला. जो स्वतःला हिंदू समजतो त्याने राम मंदिरात जातील उद्धव ठाकरे दर्शन घेणार असतील तर ती चांगली गोष्ट आहे असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.
संजय राऊत यांना काँग्रेसचे लोक सहन करतील असे वाटत नाही
महायुतीच्या जागा वाटपासंबंधी निर्णय तिन्ही पक्षाची नेते घेतील. ज्या पद्धतीचा कलगीतुरा ठेवणीतले शब्द दाखवण्याचे काम संजय राऊत करत आहेत. त्यावरून हे स्पष्ट होते की, संजय राऊत यांना काँग्रेसचे लोक सहन करतील असे वाटत नाही परंतु तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमच्याकडे चर्चा, विमर्श चालू आहे. तिन्ही नेते आपली भूमिका स्पष्ट करतील. लोकसभा निवडणुकीच्या कामाला आम्ही लागलो आहोत. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र प्रदेशची अतिशय महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, लोकसभा संयोजक सहभागी झाले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याच्या दृष्टीने विचारविनिमय झाला. भाजपा केंद्रस्तरावरून आलेल्या निर्देशानुसार प्रत्यक्ष तयारी आणि आयोजनबाबत चर्चा झाली. केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोप केला, अशी माहिती दिली.
पुणे- कोथरूड येथील सर्वे नंबर ८७ पार्ट येथील रुग्णालयाचे आरक्षण उठविण्याची कार्यवाही बेकायदा असल्याचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात माध्यमांना सांगितले कि,’महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने जर निर्णय करायचा झाला तर पुणे शहरातील विकास आराखड्यातील बहुतांशी आरक्षण ही उठवावी लागतील.मुळात या प्रस्तावाला प्रशासनाचा अभिप्राय नाही.शहर सुधारणा समितीमध्ये मंजूर झालेल्या ठराव क्रमांक 271 दिनांक 11/ 2/ 2022 या ठरावाला सूचक अनुमोदक नाही त्यामुळे मुळात हा ठराव आणि त्याच्या पुढची कार्यवाही ही बेकायदेशीर आहे त्यामुळे या ठरावाच्या अनुषंगाने झालेले सर्व कार्यवाही रद्द करून पूर्ववत आरक्षण ठेवावे.
पुणे-कोथरूड सर्व्हे नंबर ८७ (पार्ट) येथील हॉस्पिटलचे आरक्षण (एच ९) उठविण्याचा उद्योग नेमका कोणासाठी सुरु आहे आणि त्यातून कोणाकोणाचे आर्थिक हित साधले जाणार आहे ?असा सवाल आप ने केला आहे आणि हे आरक्षण उठविण्यास विरोध दर्शविल आहे.
या संदर्भात आप ने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे कि,’
कोथरूड येथील सर्व्हे नंबर ८७ (पार्ट) येथील हॉस्पिटलचे आरक्षण (एच ९) मनपाच्या विकसित हॉस्पिटलचे क्षेत्र वगळून हॉस्पिटलचे आरक्षण रद्द करण्याबाबत पुणे महानगरपालिकेने वर्तमानपत्रात दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या जाहिरात क्रमांक १/१३५४ दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ अनुसार जाहीर प्रकटन केलेल्या नियोजित फेरबदलास आम आदमी पार्टीचा आक्षेप आहे. याबाबतची मनपाची कार्यवाही बेकायदेशीर असून इस्पितळाचे आरक्षण रद्द करू नये अशी आम आदमी पार्टीची भूमिका आहे. याबाबतचे आम आदमी पार्टीचे सविस्तर निवेदन असे आहे-
१) सार्वजनिक सेवांसाठी घालून दिलेल्या आरक्षणाला रद्द करण्याचा प्रकार हा दुर्मिळ पैकी दुर्मिळ असायला हवा असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तसे सबळ कारण या प्रकरणी दिसून येत नाही.
२) माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हील अपील क्रमांक १९८-१९९/२००० गिरीश व्यास विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मापदंडांचे, नियमावलीचे, आदेशाचे उल्लंघन सदर प्रकरणात होत असून हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे.
३) कोथरूड परिसराची इस्पितळ आरक्षणाची गरज पूर्ण झाली आहे हा जाहीर प्रकटनातील दावा पूर्णपणे चुकीचा आहे. कोथरूड इथे मनपाचे केवळ प्रसूतिगृह असून तिथे ही अजून इमरजन्सी सीझर ऑपरेशन होत नाही. सुतार हॉस्पिटलवर किमान ६ लाख लोक अवलंबून आहेत पण मनपाचे एकही मल्टी स्पेशालिटी रुग्णालय कोथरूड भागात नाही. याबाबत आम आदमी पार्टीने अनेक निवेदने दिलेली आहेत. सुतार हॉस्पिटल बाहेर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण, आंदोलने केलेली आहेत. पुणे शहरात आणि कोथरूड येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या निकषानुसार अद्यापही सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरेशा नाहीत.
४) शहर सुधारणा समितीमध्ये मंजूर झालेल्या ठराव क्रमांक २७१ दिनांक ११/ ०२/ २०२२ या ठरावाला सूचक- अनुमोदक नाही. त्यामुळे हा ठराव बेकायदेशीर आहे. त्याआधारे दिलेली जाहिरात बेकायदेशीर आहे. त्यामुळे सदर प्रकरणी आरक्षण रद्द करण्यासाठी चालवलेली कार्यवाही पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
५) पुणे महानगरपालिकेने जाहिरात क्रमांक १/१३५४ दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ दिलेल्या जाहीर प्रकटन हे अर्धवट आहे. या जाहीर प्रकटनामध्ये कोथरूड येथील सर्व्हे नंबर ८७ (पार्ट) मधील नेमक्या किती आकारमानाच्या क्षेत्राचे आरक्षण रद्द करण्याचा ठराव आहे याचा उल्लेख नाही. आरक्षण रद्द करण्यासाठीच्या प्रस्तावित क्षेत्राच्या चतु:सीमा लिहिलेल्या नाहीत.
६) शहर सुधारणा समितीमध्ये मंजूर झालेल्या ठराव क्रमांक २७१ दिनांक ११/ ०२/ २०२२ या ठरावामध्ये उल्लेख केलेले आरक्षण रद्द करण्यासाठीचे कारण हे जाहिरातीमध्ये पूर्णत दिलेले नाही. त्यामुळे सदर जाहिरात ही दिशाभूल करणारी आहे.
७) पुणे महानगरपालिकेने जाहिरात क्रमांक १/१३५४ दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ दिलेल्या जाहीर प्रकटनामध्ये आक्षेप नोंदवण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी दिला आहे. एम आर टी पी कायद्याच्या सेक्शन २९ अनुसार हा कालावधी किमान दोन महिने असायला हवा.
८) पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेने ठराव केला आहे म्हणून आरक्षण रद्द करायची झाली तर पुणे शहरातील अनेक आरक्षणे नाहीशी होतील. एकंदरीत शहराच्या सार्वजनिक नियोजनाचा बोजवारा उडेल. त्यामुळे त्यास आम आदमी पार्टीचा आक्षेप आहे.
९) पुणे शहरातील आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्यावर आरक्षणानुसार सार्वजनिक सेवा- सुविधा सुरु करण्यात पुणे मनपाला अपयश आले आहे. सदर प्रस्तावामार्फत पुणे मनपा स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालू बघत आहे.
तरी, कोथरूड येथील सर्व्हे नंबर ८७ (पार्ट) येथील हॉस्पिटलचे आरक्षण (एच ९) मनपाच्या विकसित हॉस्पिटलचे क्षेत्र वगळून हॉस्पिटलचे आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव बेकायदेशीर असून याबाबतची कार्यवाही तातडीने रद्द करावी, ही आम आदमी पार्टीची मागणी आहे. प्रत्यक्ष भेटून बाजू मांडण्याची संधी द्यावी, ही विनंती.
कोथरूड येथील सुतार दवाखान्याशेजारील भूखंडावरील रुग्णालयासाठीचे आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यास विरोध करत आरक्षण कायम ठेवा, अशी मागणी सुरू झाली आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून घरे आहेत. ही जागा ताब्यात न घेता आल्याने हे आरक्षण रद्द करण्याचा खटाटोप प्रशासनाने सुरू केला आहे. कोथरूड येथेल सव्हें क्रमांक ८७ (पार्ट) येथे रुगणालयाचे (एच- ९) आरक्षण आहे. या आरक्षणातील सुतार दवाखान्याचे क्षेत्र वगळून उर्वरित जागा निवासी करावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्याचे जाहीर प्रकटन दिले आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या या प्रस्तावाला हिंदू महासंघाने विरोध केला आहे. महासंघाचे आनंद दवे म्हणाले, “कोथरूड येथील सुतार दवाखान्यात सुसज्ज, अत्याधुनिक रुग्णालय करणे आवश्यक आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून रुग्णालयाची जागा निवासी करून कोट्यवधींचा मलिदा लाटण्याचे नियोजन प्रशासन व राजकीय पदाधिकारी करत आहेत. या बदलाला आम्ही हरकत घेतली आहे.”
आंबेगाव – येथील निरगुडसर – शिंगवे येथील रोहिदास रंगु गोरडे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना, सापडलेली वीस ते पंचवीस दिवसाची तीन बिबट्याची पिल्ले वनविभागाला अवघ्या सव्वा तासात आईच्या कुशीत सोडण्यात यश आले. ही घटना आज सकाळी घडली.
शिंगवे येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी चालू असताना ऊसात बिबट्याची साधारण वीस ते पंचवीस दिवस वयाची तीन पिल्ले आढळली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारीसह रेस्क्यु टिम मेंबर व निसर्ग अभ्यासक दत्तात्रय माधवराव राजगुरव शिंगवे व कु. शारदा दत्तात्रय राजगुरव हे घटनास्थळी पोहचले. सापडलेली बिबट्याची पिल्ले ताब्यात घेऊन वजने घेतली, पिल्ले चांगली सूद्रूढ व तंदुरुस्त होती.
त्यानंतर सकाळी दहा वाजुन दहा मिनिटांनी कॅमेरा ट्रॅप लाऊन पिल्ले बिबट्याच्या मादीकडे सोपवण्याची तयारी केली. त्यावेळी शेजारच्या ऊसाच्या शेतातून बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. त्यानंतर ताबडतोब सर्व ऊसतोडणी कामगारांना ऊस तोडणी थांबवण्याची सुचना दिली.
साधारण एक तासाने अकरा वाजुन दहा मिनिटांनी मादी बिबट्या पहिले पिल्लू नेण्यासाठी आली व पाच दहा मिनीटांच्या अंतराने उरलेली दोन्ही पिल्ले बिबट्या मादीने सुरक्षीत ठिकाणी घेऊन गेली व सव्वा तासात बिबट्याची पिले सुरक्षीत मादीकडे पोहचली.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स च्या वतीने मोफत कार्यशाळेचे आयोजन पुणे : संगीत हे विविध राग, सुर आणि तालांनी बनलेले आहे. संगीतामुळे आपले आयुष्य तालमय बनते. आयुष्याला एक वेगळी दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी संगीत किंवा नृत्य हे केवळ एखाद्या संस्थेचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी शिकू नये, तर त्याचा आपल्या आयुष्यात योग्य वापर करून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य तालमय करण्यासाठी वापर करावा, असे मत ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे पं. सुरेश तळवलकर यांच्या तबलावादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, प्राध्यापक प्रवीण कासलिकर, देविका बोरठाकूर, लीना केतकर, रोहित कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
सुरेश तळवलकर म्हणाले, ताल आणि लय यांचे ज्ञान आले म्हणजे आपल्याला संपूर्ण संगीत समजले असे नाही. संगीत हे महासागर आहे तो एका आयुष्यात कोणालाही समजू शकत नाही. कलाकार कितीही मोठा झाला तरी तो कायम संगीताचा विद्यार्थीच असतो. आपण विद्यार्थी म्हणूनच संगीताची सेवा केली तरच संगीत आपल्याला समजू शकेल आणि त्याचा आपण योग्य प्रकारे आनंद घेऊ शकतो व तो आनंद आपण आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांना देऊ शकतो.
भारती विद्यापीठाने संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. आम्ही जेव्हा संगीताची सेवा सुरू केली त्यावेळी अशा प्रकारच्या उत्तम सुविधा उपलब्ध नव्हत्या. भविष्यात देशाचे नाव जगाच्या पटलावर गाजवणारे अनेक कलाकार निर्माण होऊ शकतात, याची मला खात्री आहे, असा विश्वास पं. सुरेश तळवलकर यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रा.शारंगधर साठे म्हणाले, विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा आणि त्यांच्या कलेची देवाणघेवाण करता यावी यासाठी आम्ही कार्यशाळा आयोजित करतो. यामुळे विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रामध्ये प्रवास करताना प्रेरणा मिळते आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे उद्दिष्ट गाठायचे आहे याचीही कल्पना येते. संस्थेच्या माध्यमातून आम्ही केवळ क्लासरूम शिक्षणावर भर देत नाही तर प्रत्यक्ष संगीत विद्यार्थ्यांना आत्मसात करता आले पाहिजे, यासाठी कार्यशाळांचे आयोजन करतो त्यामधून अनेक मोठे कलाकार घडतात.
सुरेश तळवलकर यांनी विद्यार्थ्याना लयकारीची तयारी करण्याची सोपी सूत्रे समजावली, तसेच गायन,वादन, नृत्य या बरोबर साथ करताना संगीत आणि नृत्य काय विषय मांडत आहे याचे भान ठेवून कशी साथ केली पाहिजे हे उदाहरण देत सांगितले. या कार्यशाळेला तबला, पखवाज, गायन, नृत्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
पुणेः विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास (होलिस्टिक डेव्हलपमेंट) आणि समाजिक संलग्नता या दिशेने एक महत्त्वाची वाटचाल करताना, काफिला एडव्हेंचर्स आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाने एका दूरदर्शी सामंजस्य करारावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले. विद्यार्थ्यांसाठी साहसी उपक्रमांद्वारे प्रायोगिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी भागीदारीचे उद्घाटन एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी काफिला एडव्हेंचर्स तर्फे श्रुती देशमुख, अभिषेक निला, आदर्श देशमुख, तुषार कुमार, वैभव कळसकर आणि एमआयटी एडीटी एडव्हेंचर क्लबचे प्रा.आनंदराव जाधव व प्रा. निशिगंधा पटेल आदी उपस्थित होते. काफिला ऍडव्हेंचर्स ही साहसी क्रीडाप्रकारांत मार्गदर्शन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून गड-किल्ले मोहिमा, जंगल सफारी, ट्रेक, बॅकपॅकिंग टूर आणि तरुणाईमध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी रॉक कल्याम्बिंग, रिव्हर राफ्टिंग इ. सारख्या साहसी उपक्रमांचे आयोजन करत असते.या करारावर स्वाक्षरी करताना प्रा. डॉ.कराड यांनी काफिला एडव्हेंचर्स सोबतच्या धोरणात्मक भागिदारीबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच यावेळ त्यांनी, सर्वसमावेशक विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास समृद्ध करण्यासाठी हा करार अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे मत मांडले. हा करार विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता इत्यादी गुण वाढविण्यासाठी मदत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रा.डॉ. सुराज भोयर यांनी या सामंजस्य कराराच्या उद्दिष्टांची माहिती दिली. साहसी-आधारित शिक्षणाला शैक्षणिक चौकटीत समाकलित करणे, विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, सर्वायवल टेक्निक आणि पर्यावरणीय शिक्षण यासारख्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यास सक्षम करणे हे युतीचे उद्दिष्ट आहे. हे प्रयत्न विद्यार्थ्यांमध्ये सांघिक कार्य, अनुशासन, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि पर्यावरणविषयक चेतना यासारखी अमूल्य कौशल्ये विकसित करण्यासाठी नक्कीच मोलाचा वाटा उचलतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जालना, दि. 30 – जालना-मुंबई वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे आजपासून सुरु झाली आहे. जालनेकरांसाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी काढले. जालना-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-ठाणे ते मुंबई असा जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा प्रवास असून या रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा मानस आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
अयोध्या रेल्वे स्थानकावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
या सोहळ्यानिमित्त जालना रेल्वे स्थानकाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात श्री. फडणवीस व श्री. दानवे यांनी सदर प्रतिपादन केले. मंचावर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालना येथून आज वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरू झाली आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार. वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सुविधांनीयुक्त रेल्वेप्रमाणे आहे. महाराष्ट्रात सध्या सहावी वंदे भारत ट्रेन जालन्यातून सुरू झाली आहे. याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त करतो. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सध्या 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी ही ट्रेन दोन वर्षात 250 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल. महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची रुपये एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरु आहेत. यावर्षी 13 हजार कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. अशा प्रकारे रेल्वेचा अभूतपूर्व विस्तार करण्यात येत आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील नागरिकांना राजधानी मुंबई येथे कामानिमित्ताने जाण्याची उत्तम सोय व्हावी या उद्देशाने जालना येथून वंदे भारत रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरपासून ते जालना दरम्यानचे इलेक्ट्रीकचे काम पूर्ण झाले असल्याने जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत रेल्वे सुरु करता आल्याने समाधान वाटत आहे. जालना-छत्रपती संभाजीनगर- नाशिक-ठाणे ते मुंबई असा या रेल्वेचा प्रवास असणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा मानस आहे. या रेल्वेची 530 प्रवासी क्षमता असून एकूण 8 डबे जोडले आहेत. भारतामध्ये वंदे भारत रेल्वेंची संख्या 34 झाली आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या रेल्वे दुहेरीकरणासाठी जवळपास 1 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मार्चपर्यंत काम सुरु होणार आहे आणि पुढील मार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. त्यालाही पैसे उपलब्ध करुन दिले आहेत.
जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभानंतर याच रेल्वेतून देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांनी प्रयाण केले.
जालना – मुंबई (सीएसएमटी) वंदेभारतएक्सप्रेसचापरिचय – जालना – मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वंदे भारत एक्सप्रेस ही मराठवाड्यातून चालवण्यात येणारी पहिली वंदे भारत ट्रेन सेवा आहे. ही ट्रेन मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) सारखी महत्त्वाची शहरे केवळ राज्याची राजधानी मुंबईशीच जोडणार नाही तर मनमाड, नाशिक, कल्याण, ठाणे आणि दादर या राज्यातील महत्त्वाच्या शहरांशीही जोडणार आहे. या स्वदेशी विकसित सेमी-हाय-स्पीड ट्रेन सेवेचा परिचय हा केवळ तांत्रिक मैलाचा दगड नाही तर आपल्या स्वदेशी प्रतिभेच्या पराक्रमाचा आणि आपल्या माननीय प्रधानमंत्री यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी ही एक मोठी झेप आहे. जागतिक दर्जाच्या मानकांशी जुळणाऱ्या अत्याधुनिक सुविधांनी भरलेली ही ट्रेन रेल्वे वापरकर्त्यांना सर्वात जलद, सोयीस्कर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय देते.
वंदेभारतरेल्वेसेवेचीठळकवैशिष्ट्ये – प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी ट्रेनला आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे एकूण आठ डबे आहेत. स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे असून सर्व श्रेणीमध्ये आरामदायी आसने आहेत. चेअर कारमध्ये रिक्लाइनिंग एर्गोनॉमिक सीट्स आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये 360 डिग्री रिव्हॉल्व्हिंग सीट्स आहेत. संपूर्ण रेल्वे वातानुकूलित आहे. रुंद आकाराच्या खिडक्यांमुळे प्रवासादरम्यान दोन्ही बाजूचे दृश्य दिसणार आहे. प्रत्येक आसनासाठी एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये मॅगझिन बॅग पुरवल्या आहेत. जीपीएस सक्षम प्रवासी माहिती सुविधा प्रवासा दरम्यान ट्रेनची थेट माहिती देते. सुधारित प्रवेशयोग्यतेसह प्रत्येक सीटसाठी मोबाइल चार्जिंग सॉकेट, हॉटकेस, बॉटल कुलर, डीप फ्रीझर आणि हॉट वॉटर बॉयलरच्या तरतुदीसह प्रत्येक कोचमध्ये मिनी पॅन्ट्री आहे. सर्व डब्यांमध्ये दिव्यांगजनांना अनुकूल सुविधा देण्यात आल्या आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत सुलभ प्रवेशासाठी सुधारित हॅमर बॉक्स कव्हरसह, आपत्कालीन उघडण्यायोग्य खिडक्या, प्रत्येक कोचमध्ये अग्निशामक यंत्रासह सुधारित एरोसोल आधारित आग शोधणे आणि दमन प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सर्व कोचवर इमर्जन्सी अलार्म पुश बटणे आणि टॉकबॅक युनिट्स आहे. व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधेसह ड्रायव्हर-गार्ड संवाद आणि कॅश हार्डन मेमरी सुविधा आहे. टच फ्री सुविधांसह आधुनिक बायो-व्हॅक्यूम टॉयलेटही आहेत.
एकादृष्टिक्षेपातरेल्वेसुविधा – ट्रेनने जालना ते मुंबई 436.36 किलोमीटरचे अंतर सहा तास 50 मिनिटांत कापले जाईल. रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस दोन्ही दिशेने ही रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमध्ये एकावेळी 530 प्रवासी क्षमता आहे, एकूण आठ डबे आहेत. जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस जालना येथून पहाटे 5.05 ला सुटेल. ती छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर येथे थांबेल. मुंबई येथे सकाळी 11.55 ला पोचेल. तर मुंबई येथून दुपारी 1.10 वाजता जालन्याकडे निघेल व जालन्यास रात्री 8.30 वाजता पोहोचेल.
जालना, दि. 30 :- बदनापूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथा कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले की, येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे. यामुळे संपूर्ण भारत पुन्हा राममय होतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. बदनापूर येथे आयोजित श्रीरामकथेला भेट देण्याची संधी मिळाली, याचे खरोखर समाधान वाटत आहे. श्रीराम कथा ज्यांनी ऐकली तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुधार करू शकतो आणि जीवनात तारला जाऊ शकतो. ही रामकथा आपल्या सर्वांना ऐकायला मिळते, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
प्रारंभी श्री. फडणवीस हे स्वत: टाळ वाजवत मंचावर आले. यावेळी पाच जेष्ठ वारकऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
जालना, दि. 30 :- पोलीस आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जालना पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समिती व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या 14 चारचाकी आणि 20 मोटारसायकल वाहनांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.
जालना येथील रेल्वे स्थानक परिसरात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आदी उपस्थित होते.
पुणे-नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी चोरटेही मागे राहिले नसल्याचे दिसून आले आहे. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी चोरट्यांनी थेट वाइन शॉपमधील दारूचे बॉक्स चोरून नेल्याची घटना मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विरांश वाईन शॉपमध्ये घडली आहे. चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम आणि दारुच्या बाटल्यांचे बॉक्स चोरट्यांनी चोरुन नेले आहे.
मुंढवा परिसरात केशवनगरमधील विरांश वाईन्स शॉपचे शटर उचकटून अनोळखी चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. ड्रॉव्हरमधून 4 लाख 19 हजार 500 रुपयांची रोकड आणि 41 हजार रुपये किमतीचे दारुच्या बॉटलचे बॉक्स चोरुन नेले. याप्रकरणी सुरेश कचरुलाल देवतवाल (वय- 56 रा. मांजरी बुद्रूक,पुणे ) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस जोरे पुढील तपास करीत आहेत. तर विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाईन शॉपतूनही अज्ञात चोरट्यांनी 96 हजारांची रोकड चोरून नेली. अभिनेश विजय अगरवाल (वय-38 रा. विठ्ठल नगर, खराडी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
टाटा मेमोरियल केंद्राचे वैज्ञानिक आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्यातून, भारतातील मर्केप्टोप्यूरिनचे पहिल्या आणि एकमेव मौखिक औषध झाले उपलब्ध
मुंबई-
मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नवी मुंबईतील, कर्करोग संशोधन आणि शिक्षण प्रशिक्षणाचे अत्याधुनिक केंद्र, (ACTREC) यांनी बंगळुरूच्या आयडीआरएस लॅब्स सोबत, सहकार्य करत, देशात, मर्कॅप्टोप्यूरिनचा पहिला आणि एकमेव मौखिक डोस, 6 – मर्कॅप्टोप्यूरिन (6-एमपी) विकसित केले आहे. 6-एमपी हे रक्तपेशींच्या गंभीर स्वरूपाच्या कर्करोगात, जो साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळतो, त्यात किमोथेरपीचे औषध म्हणून वापरले जाते. त्यामुळे, लहान मुलांना सहजपणे घेता येईल, असं हे भुकटीस्वरूपातील मौखिक औषध, प्रीव्हल (PREVALL) या नावाने बाजारात आले आहे.
प्रीव्हल, सहजपणे 10 मिलि ग्राम/मिलि लीटरचा डोजपासून 100 मिलीचे मौखिक औषध तयार केले जाऊ शकते. प्रीव्हल सोबत एक सिरिंज आणि एक प्रेस इन बॉटल अडॅप्टर (पी. आय. बी. ए.) असते, यामुळे रुग्णाच्या शरीराच्या वजनाच्या किंवा शरीराच्या आकारमानानुसार अचूक डोस देणे शक्य होते. यामुळे सायटोटॉक्सिक संयुगांच्या संपर्कात येण्याचा धोका देखील यामुळे कमी होऊ शकतो.
प्रीव्हल विकसित होण्यामुळे, संशोधकांनी, कर्करोग उपचार प्रवासातला एक मैलाचा दगड गाठला आहे. करण सध्या या औषधाच्या गोळ्या उपलब्ध आहेत, मात्र, त्यामुळे, अचूक मात्रा, लवचिकता, रुग्णाची सहन करण्याची क्षमता, अशी सगळी आव्हाने असतात.
आतापर्यंत, मुलांमधील मात्रेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोळी कुटून त्याची भुकटी देणे किंवा एक दिवसाआड डोस देणे अशा पद्धती अवलंबल्या जात होत्या.
नियामक मान्यता : प्रीव्हलला भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून मान्यता मिळाली आहे. या नियामक मंजुरीत, प्रीव्हलची सुरक्षितता आणि अनुपालनावर भर देण्यात आला असून, त्यामुळे आरोग्यसेवा देणारे व्यावसायिक आणि रुग्ण दोघांनाही त्याची परिणामकारकता आणि गुणवत्तेबद्दल खात्री बाळगता येईल. टाटा मेमोरियल सेंटर आणि आय. डी. आर. एस. लॅब्सने संयुक्तपणे क्लिनिकल अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केले. अलीकडेच पीडियाट्रिक ब्लड अँड कॅन्सर या वैज्ञानिक नियतकालिकात या निष्कर्षांना नियामक मान्यता मिळाली आहे.
बाजारातील उपलब्धता : 6-मरकॅप्टोप्युरिनचे ड्राय पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असलेले फार्मास्युटिकल सस्पेंशन हे आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडचे पेटंट नोंदवलेले तंत्रज्ञान आहे. आयडीआरएस लॅब्सने 25 नोव्हेंबर 2023 रोजी चेन्नई येथे PHOCON परिषदेत PREVALL या कर्करोगावरील औषधाचे अधिकृत अनावरण केले. हे औषध डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आणि लवकरच ते देशभरातील सर्व प्रमुख रुग्णालयाच्या औषधालयात उपलब्ध असेल. ॲक्युट लिंफोब्लास्टीक ल्युकेमिया (ALL) या कर्करोगाच्या प्रकाराचे निदान झालेल्या 1-10 वयोगटातील अंदाजे 10,000 मुलांना दरवर्षी PREVALL चा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.
ॲक्युट लिंफोब्लास्टीक ल्युकेमिया सारख्या सर्व बऱ्या करता येण्याजोग्या कर्करोगाचे निदान झालेल्या मुलांची सर्वोत्तम संभाव्य काळजी घेतली जावी, आणि औषधाच्या मात्रेचे सर्वोत्तमीकरण करणे, औषध घेण्याच्या नियमांचे पालन सुधारण्यासाठी आणि औषधांचा प्रभाव जास्तीत जास्त वाढवण्यात PREVALL सारखी औषधे मदत करतील, असे टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख, डॉ. गिरीश चिन्नास्वामी, यांनी सांगितले.
PREVALL हे भारतीय परिस्थितीसाठी सर्वात अनुकूल अशी औषधे तयार करणाऱ्या भारतीय बायोफार्माच्या अंतर्निहित सामर्थ्याचे आणि गहनतेचे प्रकटीकरण आहे, असे निरिक्षण टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या कर्करोग उपचार, संशोधन, आणि शिक्षण संस्थेतील (ACTREC) क्लिनिकल फार्माकोलॉजी या विषयाचे प्राध्यापक डॉ. विक्रम यांनी नोंदवले. “ओरल सस्पेन्शनसाठी (तोंडावाटे दिले जाणारे औषध) वापरली जाणारी पावडरची परिणामकारकता उष्ण किंवा दमट हवामानात देखील कायम राहील याप्रकारे ही पावडर तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय ही पावडर जगात इतरत्र उपलब्ध असलेल्या द्रवरूप औषधांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे,” असेही त्यांनी सांगितले.
PREVALL ने बालरोग हिमॅटो-ऑन्कोलॉजीमधील (रक्तपेशींचा कर्करोग) वैद्यकीय उपचारांमध्ये पोकळी भरून काढली आहे, अशी टिप्पणी मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटरसधील शैक्षणिक विभागाचे संचालक तसेच जेष्ठ पेडियाट्रिक हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. बाणावली यांनी केली. 6-मर्कॅपटोप्युरिनचे द्रवरूप औषध युरोप आणि अमेरिकेत बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. अशी माहिती त्यांनी दिली. भारत आणि इतर विकसनशील देशांमधील मुलांना विकसित देशांमध्ये कर्करोगाचा मानक उपचार म्हणून वापरली जाणारी औषधे उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
मुंबई येथील टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी उत्तम सहयोगी प्रयत्नांची प्रशंसा केली आणि नवीन औषधे आणि फॉर्म्युलेशन उपलब्धता सुधारण्यासाठी शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यात अशा अधिक सहकार्याची गरज आहे यावर भर दिला. CAR-T या पेशी आधारित उपचार पद्धतीचे उदाहरण देऊन टाटा मेमोरियल सेंटर नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. टाटा मेमोरियल सेंटरने अलीकडेच अशा सहकार्याच्या माध्यमातून या उपचार पद्धतीचा पाया घातला आहे, असेही ते म्हणाले.
हा विकास आरोग्यसेवेतील गरज आणि नवोन्मेष यातील अंतर भरून काढण्यासाठी शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगाच्या हितसंबंधांच्या एककेंद्राभिमुखतेचे फलित आहे, असे अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी सांगितले.समाजाच्या कल्याणासाठी नवोन्मेष प्रयोगशाळेतून प्रत्यक्षात साकारण्याच्या उद्देशाने विभागाच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय स्ट्रीट फूड फेस्टिव्हल 2023 चे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी 28 राज्यांतील रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या उत्साही समुदायाला शुभेच्छा दिल्या. भारतीय राष्ट्रीय फेरीवाला संघटने (NASVI) तर्फे 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा स्ट्रीट फूड महोत्सव जआयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी फेरीवाल्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री फेरीवाले आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कोविड महामारीदरम्यान सुरू करण्यात आलेली पीएम – स्वनिधी योजना अनेकांसाठी आशेचा किरण बनली आहे, असेही ते म्हणाले.
या योजनेचा 57.83 लाख फेरीवाल्यांना लाभ झाला आहे, असे पुरी यांनी योजनेच्या यशाचा संदर्भ देताना सांगितले. या योजनेअंतर्गत 80.77 लाख जणांना कर्ज मंजूर करण्यात आले असून सूमारे 10,058 कोटी रुपये 76.22 लाख जणांना कर्जाच्या रुपात वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेंतर्गत कर्ज मिळालेल्या महिला फेरीवाल्यांची टक्केवारी सर्व वितरित कर्जाच्या सुमारे 45% (25.78 लाख) इतकी आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे सुमारे 72% लाभार्थी उपेक्षित वर्गातील आहेत, असेही त्यांनी नमूद केले. भारताच्या स्वच्छता चळवळीच्या अनुषंगाने भ पहिल्या ‘शून्य कचरा स्ट्रीट फूड महोत्सवाची’ संकल्पना मांडल्याबद्दल पुरी यांनी भारतीय राष्ट्रीय फेरीवाला संघटनेचे (NASVI) अभिनंदन केले.
पुणे, दि. ३० : केंद्र शासनाने आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी ‘प्रधानमंत्री जनमन योजना’ सुरू केली असून भोर तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ नागरिकांना देता यावा यासाठी त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षणात माहिती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आदिवासी प्रवर्गातील कातकरी वस्तीला भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून योजनेच्या अंमलबजावणीसाठी कातकरी कुटुंबाच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली.
या योजनेअंतर्गत आदिवासी प्रवर्गातील सर्व लाभार्थ्यांना आधार कार्ड, जातीचे दाखले, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड आधी योजनेचा लाभ देण्यात येत असून १ जानेवारी २०२४ रोजी वस्तीवर सर्वांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या वस्तीवरील जागाधारकांना शासकीय योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्याबाबतदेखील प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. आदिवासी बांधवांनी प्रधानमंत्री जनमन योजनेचा लाभ घ्यावा व सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन श्री.कचरे यांनी केले आहे.