Home Blog Page 1273

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथील पर्यटनसुविधांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला आढावा

सिंदखेड राजा येथील वास्तूंच्या संवर्धनासाठी
सर्वसमावेशक बृहत आराखडा तयार करावा

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मोती तलावातील झाडे-झुडपे काढून
तलावाचे तातडीने सुशोभीकरण करा

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. ९ :- राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी सिंदखेड राजा येथील वास्तूंच्या संवर्धनाची कामे तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. केंद्राच्या व राज्याच्या पुरातत्त्व विभागाने या वास्तूंच्या जतन-संवर्धनाच्या कामात समन्वय ठेवावा. लोकप्रतिनीधींना विश्वासात घेऊन कामांचे प्राधान्य ठरवून करावयाच्या तातडीच्या कामांचा सर्वसमावेशक बृहत आराखडा तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊसृष्टी मातृतीर्थ सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे पर्यटकांकरिता विविध सुविधा निर्माण करण्यासंदर्भात मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय रायमूलकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद डॉ. अरूण मलिक, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा आदी उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोरे आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

सिंदखेड राजा येथील पर्यटन सुविधांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने सिंदखेड राजा विकास आराखड्याचे ४५४ कोटींचे सुधारित प्रारुप मंजुरीसाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठविले आहे. हा विकास आराखडा उच्चस्तरीय समितीकडे आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी शिखर समितीकडे जाईल. तोपर्यंत राज्य शासनाने आणि जिल्हा विकास समितीने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पुरातत्त्व विभागाने संवर्धनाची दर्जेदार कामे करावीत. राजे लखोजीराव जाधव समाधी व रामेश्वर मंदिराजवळील जागेची आवश्यकता असल्यास त्याठिकाणी भूसंपादन करावे. आराखड्यातील सर्व कामे हेरिटेज दर्जानुसार करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.

सिंदखेड राजा-जालना रस्त्यावर ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असलेल्या मोती तलावाच्या भिंतींवर झाडे, झुडपे उगवल्यामुळे त्याचे विद्रुपीकरण झाले आहे. मोठ्या झाडांची मुळे तलावासह इतर हेरिटेज वास्तूंच्या भिंतींमध्ये गेल्यामुळे ऐतिहासिक स्थळांची दुर्दशा होते. पुरातत्व विभागाने या ठिकाणी असलेली झाडे, झुडपे मुळासकट तातडीने काढून टाकावीत. त्यावर कायमस्वरूपी नियंत्रणाकरिता रासायनिक प्रक्रियेसारख्या विविध उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, सिंदखेडराजा विकास आराखड्यामधील केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभागाकडील वास्तूंच्या संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यानंतर इतर सौदर्यीकरणाची कामे हाती घ्यावीत. या आराखड्याच्या रस्त्यांच्या कामांचा समावेश नसावा. शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते, बाह्यवळण रस्त्यांची कामे राज्य रस्ते विकास महामंडळ, नगरविकास विभागाच्या निधीतून करण्यात यावीत.

क्रीडागंणाचे आरक्षण उठवून कात्रज डेअरीलाभूखंड देण्यास कॉंग्रेसचा विरोध:आयुक्तांचा निषेध करत महापालिकेसमोर आंदोलन

 पुणे- महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात मैदानासाठी दर्शविण्यात ३.५९१ हेक्टरचा भूखंड पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (कात्रज डेअरी) देण्याचा निर्णय झाला आहे. ही जागा मुलांना खेळासाठीच राहू द्यावी अशी मागणी आज महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करून करण्यात आली. कात्रज येथील क्रीडागंणाचे आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियेसाठी आरक्षण टाकणार असल्याच्या निषेधार्थ पुण्याचे पालकमंत्री व पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने  महानगरपालिकेसमोर आंदोलन घेण्यात आले. ह्या वेळी वेगवेगळे खेळ रस्त्यावर खेळण्यात आले. बरेच खेळाडू तिथे उपस्थित होते. त्यानंतर कात्रज येथील डीपीतील मैदानाचे आरक्षण उठवू नये याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले.

     यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘दूध डेअरी व प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागाशी संबंधित आहे. महापालिकेच्या डीपीमध्ये या प्रकारचे आरक्षण नाही. शहरात खेळासाठी मैदानाची कमतरता भासत असताना ही जागा कात्रज डेअरीच्या व्यावसायिक वापरासाठी काढूण घेणे योग्य नाही.

     पुणे शहरामधे मुलांना खेळण्यासाठी पुरेसे क्रीडांगण नाही असे असताना जी जागा क्रीडांगणसाठी आरक्षित आहे आणि जर त्या जागेवरच आरक्षण काढून कात्रज डेरीला ती जागा पुणे महानगरपालिका देणार असेल तर ते पुणेकरांच्या हिताचे नाही. तसेच कात्रज, धनकवडी या भागात दाट लोकवस्ती आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान हक्काचे मैदान आवश्यक आहे त्यामुळे महाविकास आघाडी पुणेकरांच्या हितासाठी आज रस्त्यावर उतरुन आपला विरोध दर्शवत आहे.’’यावेळी पुणे शहराध्यक्ष माननीय अरविंद शिंदे, शिवसेना गटाचे (उध्दव ठाकरे गट) गजानन थरकुडे, संजय मोरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी, गोपाळ तिवारी, लता राजगुरू, शिवा मंत्री, अजित दरेकर, रजनी त्रिभुवन, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, अक्षय माने, राजू ठोंबरे, कृष्णा सोनकांबळे, संतोष पाटोळे, NSUI अध्यक्ष अभिजित गोरे, प्रियंका रणपिसे, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, सतिश पवार, यशराज पारखी, बाळासाहेब मारणे, लतेंद्र भिंगारे, मुन्नाभाई शेख, यासीन शेख, अभिजीत महामुनी, आशुतोष शिंदे, आकाश माने, ओम भंवर, उषा राजगुरू, रेखा घेलोत, नलिनी दोरगे, छाया जाधव, सुंदर ओव्हाळ, मोतीबाई उडते, सिमा महाडिक, शारदा विर, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, दिलीप लोळगे, सेल्वराज ॲन्थोनी, नागेश खडके, संजय कवडे, दत्ता जाधव आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते

न्यायाधीशच आरोपीला भेटले, तर काय अपेक्षा करावी; अपात्रता प्रकरणाचा निकाल काय लागणार हे जनतेला समजले-उद्धव ठाकरे

मुंबई-

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष उद्याही वेळकाढूपणा करतील, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.

दरम्यान नार्वेकर यांनी दोनदा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायमुर्ती 2 वेळा आरोपीला भेटले, असे म्हणत त्यांनी शिंदे आणि नार्वेकर यांच्या भेटीवर टीका केली आहे. यामुळे उद्या काय निकाल लागणार हे जनतेला समजले आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे.

सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, दीड वर्षांपासून ही सुनावणी सुरू आहे. आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा आहे. वेडावाकडा निकाल लागला तर जनतेला सर्व माहिती असायला हवे. भरत गोगावले यांची प्रतोद पदाची निवड बेकायदेशीर आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तर अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड वैध ठरवण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

उद्धव ठाकरे म्हणाले की, जर न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

..तर कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत. याचा अर्थ होतो की न्यायाधीश आरोपीला​​​ जाऊन भेटले. ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत तुम्ही ऐकायला हवी ते सांगत आहेत की किती वेळ काढला जात आहे. लोकशाहीचा खून यामुळे होतोय की काय अशी परिस्थिती आहे. त्यात ते उघड उघड भेटत आहेत.आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की तुमच्या डोळ्यादेखत हे घडत आहे. देशात लोकशाही आहे की नाही, हे ठरवणारा निर्णय असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बुधवारी शिवसेना अपात्रतेप्रकरणी निर्णय येणार आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे.

अमित ठाकरेंनी मारहाण केली, माथाडी कामगार नेते महेश जाधवांचा आरोप

मुंबई-

ज माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला. माथाडी कामगाराचे नेते महेश जाधव या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या समर्थकांसाठी मनसैनिकांना पळवून पळवून हाणले. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा आरोप जाधव यांनी केला. राज ठाकरे यांची टीम ही खंडणी गोळा करत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. महेश जाधव हे मनसेचे उपाध्यक्ष आणि मनसे माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत. 

मनसेचे माथाडी कामगार नेते असलेले महेश जाधव यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेश जाधव यांच्यावर सध्या खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या मनसैनिकांना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. एका सोसायटीमध्ये लपायला गेले असता सोसायटीच्या सिक्युरिटी रूमच्या काचा माथाडी कामगारांनी फोडल्या. मनसेच्या दोन गटात झालेल्या या मारहाणीमुळे खारघर परिसरात काहीसे तणावाचे वातावरण आहे. 

फेसबुक वर महेश जाधव यांनी lIVE केलेला हा व्हिडीओ…त्याची हि लिंक https://www.facebook.com/MaheshJadhavMNSofficial/videos/3220518928251062

अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

महेश जाधव यांनी आमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. राज ठाकरे यांच्या घरी बोलवून आपल्याला अमित ठाकरे यांनी शिविगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला आहे. 

महेश जाधव यांनी म्हटले की, मी माथाडी कामागारांची बाजू घेतली म्हणून मला मारहाण करण्यात आली. अमित ठाकरे यांच्याकडून राजगड या कार्यालयात मारहाण करण्यात आली. मला माथाडी कामगार संघटनेतून कमी करण्याचा प्रयत्न झाला. आपण पक्षातून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण, राजगड कार्यालयात आपण काही माथाडी कामगारांसह गेलो. त्यावेळी माझी बाजू ऐकून न घेता अमित ठाकरे यांनी आपल्याला शिविगाळ केली आणि एका भारदस्त वस्तूने मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सहा टाके लागले असल्याचे जाधव यांनी म्हटले. 

आमचे सरकार आजही आहे, उद्याही राहणार:राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील; देवेंद्र फडणवीस

नागपूर –

आमदार अपात्रेतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थीर राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

नेमके काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थीर असून सरकार कालही स्थीर होते आणि उद्याही ते स्थीर राहणार आहे, असा पूर्ण विश्वास मला असल्याचे फडणवीस म्हणाले. निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होईल त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर मालदीव आणि लक्षद्वीप या पर्यटन स्थळांची जोरदार चर्चा होत आहे. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने हे प्रकरण चांगलेच पेटले. यादरम्यान आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. फडणवीसांनी हे मालदीव नव्हे म्हणत कोकणातील फोटो शेअर केले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी कोकणाला भेट देण्याचे आवाहन केले असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला सिंधुदूर्ग आणि अरबी समुद्रातील वॉटर स्पोर्ट्स अनुभवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी ही पोस्ट केली आहे.हे मालदीव नाही! महाराष्ट्राला लाभलेले हे आपले सुंदर कोकण! फोटो सिंधुदुर्गचे आहेत.. जेव्हा तुम्ही #IndianIslands भेट द्याल, तेव्हा कोकणाला भेट द्यायला विसरू नका आणि सिंधुदुर्ग किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य कौशल्याचे सर्वात मोठे उदाहरण पाहून मंत्रमुग्ध व्हा.

एकाच दिवसात १.५९ कोटींच्या वीजचोऱ्या उघड

महावितरणकडून पश्चिम महाराष्ट्रातील वीजचोरांना दणका

वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंड व ३ वर्षांपर्यंत कैदेची तरतूद

पुणे, दि. ०९ जानेवारी २०२४: वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून एकाच दिवशी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरीविरोधी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १२७६ ठिकाणी सुमारे १ कोटी ५९ लाख रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले. वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून ८६९ ठिकाणी ९६ लाख ५८ हजार रुपयांची थेट वीजचोरी झाल्याचे आढळून आले.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार शनिवारी (दि. ६) एकाचवेळी दिवसभर वीजचोरीविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. त्याप्रमाणे सकाळी ९ वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहीमेला सुरवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये (कंसात रक्कम) पुणे जिल्हा- ६५३ (१ कोटी २१ लाख ८४ हजार), सातारा- १५१ (१२ लाख ३४ हजार), सोलापूर- १७० (८ लाख २९ हजार), कोल्हापूर- १३४ (७ लाख ३ हजार) व सांगली जिल्ह्यात १६८ (९ लाख ६१ हजार) अशा एकूण १२७६ ठिकाणी १ कोटी ५९ लाख ११ हजार रुपयांचा अनधिकृतपणे वीजवापर उघडकीस आला.

वीजचोरी व अनधिकृतपणे वीजवापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड व नवीन वीजबिल देण्यात येत आहे. या बिलाचा ताबडतोब भरणा करावा अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. वीजचोरी केल्यास विद्युत अपघाताचा मोठा धोका असतो. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन सुरक्षित वीजपुरवठा घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंड व तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

सध्या वीजबिलांच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी सुरू आहे. यामध्ये अन्य ठिकाणाहून थकबाकी असलेल्या ठिकाणी वीजवापर होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येत आहे. तसेच वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह वीजचोरीच्या संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

११३ पदांसाठी भरती

पुणे:महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आता ११३ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यापैकी १३ पदे माजी सैनिक अनुशेष भरून काढण्यासाठी ठेवली आहेत. सर्व संवर्गासाठी १०० पदे असणार आहेत.

महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाइटवर १६ जानेवारीपासून उपलब्ध होतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.

कनिष्ठ अभियंतासाठी ३ वर्षांची अनुभवाची अट ठेवली होती. याबाबत बऱ्याच दिवसांपासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवली आहे. पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल.

डेहराडूनमध्ये वायू गळती, श्वास घ्यायला त्रास, अनेकजण बेशुद्ध पडले

डेहराडून: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये मंगळवारी पहाटे एक दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार येथील झाझरा परिसरात क्लोरीन वायू गळतीमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर झाझरा परिसरातील चंदन नगर परिसर निर्मनुष्य करण्यात आला. वायू गळतीमुळे अनेक लोक बेशुद्ध झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. न्यूज एजन्सी एएनआयने वायू गळती थांबवण्यासाठी कार्य करत असलेल्या पथकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हे पथक क्लोरिनचे सिलिंडर जमिनीत गाडण्याचं काम करत आहे जेणेकरुन वायू गळतीवर नियंत्रण मिळवता येईल.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.वायू गळतीमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आजूबाजूच्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. डेहराडूनचे एसएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, तेथून वायू गळती होणारा सिलेंडरही काढला जात आहे. परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी खड्डा खणून हे सिलेंडर त्यात पुरण्याचा प्रयत्न सुरू आहेप्रेमनगर पोलिस ठाण्यांतर्गत झाझरा परिसरात एका मोकळ्या भूखंडात हे गॅस सिलिंडर ठेवले होते, त्यातून अचानक वायू गळती सुरू झाली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली.

ठाकरेसमर्थक आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड

मुंबई: उद्धव ठाकरे यांचे समर्थक आमदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकली. ईडीच्या या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरु आहे. वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीची छापेमारी सुरु असून यामध्ये त्यांच्या भागिदारांच्या घरांचाही समावेश आहे.जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने ईडी रवींद्र वायकर यांच्यावर अटकेची कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.यानिमित्ताने ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात सापडला आहे. यापूर्वी संजय राऊत, अनिल परब या ठाकरे गटातील नेत्यांच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या होत्या. यापैकी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती आणि त्यांना तब्बल तीन महिने तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. रवींद्र वायकर यांची यापूर्वी ईडी चौकशी झाली होती.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यामुळे रवींद्र वायकर लवकरच तुरुंगात जातील, असा इशाराही सोमय्या यांनी अनेकदा दिला होता. परंतु, वायकर यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, आज ईडीच्या पथकाने वायकर यांच्या घरावर धाड टाकून निर्णायक कारवाईच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या सुनावणीचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर ईडीची रवींद्र वायकर यांच्याविरोधातील कारवाई सूचक आणि महत्त्वाची मानली जात आहे.

चैतन्यस्पर्श हा देशातल्या १२ शक्तिपीठांच्या पादुकादर्शनाचा सोहळा संपन्न

पुणे-भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे चैतन्यस्पर्श हा देशातल्या १२ शक्तिपीठांच्या पादुकादर्शनाचा अभूतपूर्व सोहळा आयोजित करण्यात आला होता.यादरम्यान भव्य भजन स्पर्धेचे आयोजनदेखील संस्थेतर्फे करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

लहू बालवडकर यांना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, लहू बालवडकर दरवर्षीप्रमाणे भजन स्पर्धा आयोजित करत आहेत. दोन ते तीन दिवस चालणाऱ्या भजन स्पर्धेत खूप दूरवरून मंडळी येतात. लहू बालवडकर यांची लोकप्रियता इतकी आहे की, त्यांच्या कार्यक्रमाला लोक आवर्जून उपस्थित राहतात. तसेच लहू बालवडकर यांची प्रतिमा अशीच वाढत जावो आणि त्याचा कुठेतरी सामाजिक लाभ झाला पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, आज दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी लहू बालवडकर यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. यावेळी भाजपचे महासचिव विक्रांत पाटील, उपाध्यक्ष राजेश पांडे, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांना यावेळी लहू बालवडकर यांनी राम मंदिराची प्रतिकृतीही भेट दिली.

स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी भजनी मंडळाला योग्य ति पारितोषिक वितरण करण्यात आली. पुरूष भजन स्पर्धा पहिले बक्षिस – आषाढी वारी भजनी मंडळ पापळवाडी, राजगुरूनगर आणि स्वरांजली भजनी मंडळ मारुंजी ( विभागून )द्वितीय पुरस्कार- ताजुबाई भजनी मंडळ ताजे मावळ आणि विठ्ठल प्रासदिक भजनी मंडळ शुक्रवार पेठ ( विभागून )तृतीय पुरस्कार – संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ शेटेवाडी तळेगाव दाभाडे, आणि माऊली संगीत भजनी मंडळ, घरकुल, चिखलीचुतरार्थ पुरस्कार- स्वरागिनी भजनी मंडळ, आळंदी पाचवा पुरस्कार – विजय कांबळे भजनी मंडळ खरपुडी राजगुरुनगर

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ७६८ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : सन २०२४-२५ या आथिक वर्षाकरिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी ७१२ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ५१ कोटी रुपये तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी ५.७७ कोटी रुपये असा एकूण ७६८.७७ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीस मंजुरी देण्यात आली, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

चेतना कॉलेज, वांद्रे (पूर्व) येथे मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. या बैठकीला मुंबई उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नामनिर्देशित, विशेष निमंत्रित सदस्य, विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नागरी दलित्तेतर वस्त्यांमध्ये सुधारणा, शासकीय भूखंडांना कुंपण भिंती बांधणे, वने, मत्स्यव्यवसाय, कौशल्य विकास, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या इमारतींची बांधकामे, शासकीय महाविद्यालयांचा विकास, शासकीय निवासी इमारती, व्यायामशाळा व क्रीडांगणांचा विकास इ. विविध योजनांसाठी एकूण ६३०.०३ कोटी रुपयांच्या वाढीव नियतव्यय मिळण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मागणी करण्यात येईल, असे पालकमंत्री  श्री. लोढा यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या, त्यानुसार संबंधित विभागांनो बैठकीत करण्यात आलेल्या मुद्यांची दखल घेऊन विनाविलंब कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.लोढा यांनी दिले.

मुंबई उपनगर जिल्ह्यात राज्य शासनामार्फत सुरु असलेल्या विविध विकासकामांबद्दल राज्यशासनाच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीत प्रथम १२ जुलै २०२३ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हयाच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत हाती घेण्यात आलेली विविध कामे, माहे डिसेंबर २०२३ अखेर देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता व झालेला खर्चाचा आढावा आणि सन २०२४-२५ मध्ये राबवावयाच्या विविध योजना, हाती घ्यावयाची वैशिष्टयपूर्ण कामे व त्यासाठी प्रस्तावित नियतव्यय याबाबतचे सादरीकरण मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर ९२०.०० कोटी रुपये मंजूर नियतव्ययापैकी २२८.०० कोटी रुपये निधी सन २०२२-२३ मधील मंजूर कामांसाठी (Spill Over) वितरीत करण्यात आला असून उर्वरीत ६९२.०० कोटी रुपये नियतव्ययाच्या अनुषंगाने डिसेंबर २०२३ अखेर ६१०.०० कोटी रुपये रक्कमेच्या (८८ टक्के) कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. उर्वरित कालावधीत १०० टक्के प्रशासकीय मान्यता व खर्च होण्याच्या दृष्टिने नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नमूद केले. सन २०२४-२५ या वर्षासाठी नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांनी निर्धारित केलेल्या कमाल नियतव्यय मर्यादेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२४-२५ या आथिक वर्षाकरिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी ७१२.०० कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ५१.००  कोटी रुपये तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी ५.७७ कोटी  रुपये अशा एकूण ७६८.७७ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबई उपनगर जिल्ह्याचा क्षेत्रनिहाय विकास दर वाढविण्याकरीता जिल्हा विकास आराखडा

विकसित भारतासाठी राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याकरिता “बॉटम अप” दृष्ट‍िकोन वापरून विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्याचा क्षेत्रनिहाय विकास दर वाढविण्याकरीता नियोजन विभागाकडून जिल्हा विकास आराखडा (District Strategic Plan) तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यांस अनुसरून मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समिती कार्यालयामार्फत स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने मुंबई उपनगर जिल्ह्याचा ‘जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत असून याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

गुरुवारी दिल्लीत पुणे महापालिकेला मिळणार स्वच्छतेबाबतचा ‘फाईव्ह स्टार’ पुरस्कार

शहराला स्वच्छतेसाठी सेव्हन स्टार मिळसाठी प्रयत्न करणार-अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार

पुणे-शहराला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच पहिल्यांदाच फाईव्ह स्टार प्रमाणपत्र मिळाले आहे. आगामी काळात आपण सेव्हन स्टार मिळसाठी प्रयत्न करणार आहोत. फाईव्ह स्टारमध्ये देशातील ८ ते ९ शहरे आहेत. त्यामध्ये आपला समावेश असणे, ही पुणे महापालिकेच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. महापालिकेने केलेल्या चांगल्या कामगिरीवर केंद्र सरकारने मोहोर उमटवली आहे. मागील वर्षीपेक्षा खूप सुधारणा आपण केल्या आहेत. महापालिका आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.असे येथे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

शहर स्वच्छ शहर ही संकल्पना ठेवून चांगले काम करणाऱ्या पुणे शहराला ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच शहराला स्वच्छतेचे फाईव्ह स्टार रेटिंगदेखील मिळाले आहे. शहराला हा राष्ट्रीय पुरस्कार येत्या गुरूवारी (दि. ११) देशाची राजधानी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात महापालिकेला दिला जाणार आहे. स्वच्छतेसंदर्भात पुणे महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे शहराला यश मिळाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित केले जाणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेत पुणे महापालिकेने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महापालिकेला पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून विविध उपक्रम आणि उपाययोजना राबविल्या जात आहेत. या स्पर्धेसाठीचा सर्वे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडून करण्यात आला होता. यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीचे निकष तपासण्यात आले. त्यानुसार घरोघर कचरा जमा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे यासह २४ प्रकारच्या विविध घटकांचा समावेश होता.
या सर्व गोष्टीत महापालिकेने चांगली कामगिरी केल्याने पुणे शहराला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे प्रशासनाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता प्रशासनाची जबाबदारी वाढली असून शहराला अधिक स्वच्छ व सुंदर कसे करता येईल यासाठी अधिक जोमाने काम करावे लागणार आहे.

केंद्र सरकारकडून दिल्लीमध्ये येत्या गुरूवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्सात आले असून यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबई या‌ तीन शहरांनाच निमंत्रित केले आहे. यामध्ये शहराची स्वच्छ सर्वेक्षणमधील रँकिंगदेखील कळणार आहे. पुणे महापालिका याआधीच ‘ओपन डिफिकेशन’मुक्त झाले आहे. याबाबत महापालिकेला मानांकनदेखील मिळाले आहे. मात्र महापालिका अजून कामगिरीत सुधारणा करत असून रँकिंग पहिल्या पाचमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे कदम यांनी सांगितले.

पुणे शहराला यापूर्वीच देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून नावलौकिक प्राप्त झाला आहे. त्यात आणखी एक भर पडली आहे. आजपर्यंत थ्री स्टारमध्ये असलेल्या पुण्याला महापालिकेने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पहिल्यांदाच फाईव्ह स्टार शहराचा मान मिळाला आहे. महापालिका आणि पुणे शहरासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. फाईव्ह स्टार मिळवण्यासाठी महापालिका २०१९ पासूनच प्रयत्न करत होती. मात्र काही ना काही कारणाने हे मानांकन हातून सुटत होते. तरीही सातत्याने प्रयत्न करीत अखेर महापालिकेने ही उपलब्धी मिळवली आहे. पुणे महापालिका आगामी काळात सेव्हन स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जायका प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची कामे पूर्ण झाल्यावर महापालिका यासाठी पात्र क़रू शकते.

पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार-अट्रोसिटीचा गुन्हा

पुणे : मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका दलित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. तसेच, तिला जातीवरून अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार १० जुलै २०२३ ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधी दरम्यान नंदनवन लॉज या ठिकाणी घडला.

युवराज शिंदे आणि त्यांची पत्नी काजल शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. युवराज शिंदे हे मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला बाणेर येथे राहण्यास आहे. तिची आणि उपनिरीक्षक शिंदे यांची ओळख झाली होती. त्या ओळखीतूनच पुढे शिंदे यांनी या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तिचा विश्वास संपादन केला गोड बोलून तिला नेहमी महागड्या वस्तू देण्यास भाग पाडले. 

तिला वेळोवेळी सातारा रोड येथील नंदनवन लॉज मध्ये घेऊन जाऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतराने त्याने तिच्यासोबत संपर्क ठेवण्यास आणि बोलण्यास टाळाटाळ सुरू केली. याबाबत तिने त्याच्याकडे जाब विचारला असता शिंदे यांची पत्नीने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तिच्या जातीचा उल्लेख करून तो टाकून दिलेल्या जातीची आहेस असे बोलून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अंगावर धावून जात झटापट केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा तपासासाठी स्वारगेट पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहाय्य पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.

राणे पिता-पुत्रामध्ये मतभिन्नता? नारायण राणे म्हणाले शरद मोहोळ गुंड: नितेश राणे म्हणाले मोहोळची चुकीची प्रतिमा नको, त्यांचं काम आभाळाएवढं

पुणे:कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरणी राणे पिता पुत्रामध्ये दुमत असल्याचं दिसून आले. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी शरद मोहोळवर टीका केली होती, तो देशाचा मोठा नेता आहे का अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

तर त्याचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी सोमवारी शरद मोहोळचे उदात्तीकरण केल्याचं दिसून आलं. शरद मोहोळने हिंदुत्वासाठी आभाळाएवढं काम केल्याचं सर्टिफिकेट देताना त्याची प्रतिमा चुकीची दाखवू नका असंही आवाहन केले. मोहोळवरून राणे पिता-पुत्रात मतभिन्नता दिसून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

कोण तो गुंड? काय म्हणाले नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद मोहोळला देण्यात येणाऱ्या प्रसिद्धीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ती एक हत्या झाली, कोण तो मेला, मोहोळ. तो काय कुणी विद्धान होता का? तो काय देशाचा मोठा नेता होता का? सकाळ संध्याकाळ त्याच्याच बातम्या दाखवल्या जात आहेत.

मोहोळचं काम आभाळाएवढं – नितेश राणे
एकीकडे नारायण राणे यांनी शरद मोहोळला गुंड म्हणत त्याच्यावर टीका केली. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळ याचे काम आभाळाएवढं असल्याचं गुणगाण गायलं. ते म्हणाले की, रात्री बेरात्री कुठेही हिंदु समाजावर संकट आलं तरी शरद मोहोळ कुटुंबीय उभे राहिले आहेत. शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावं. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो तपास करत आहेत.

नितेश राणे पुढे म्हणाले की, शरद मोहोळ यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची आहे, त्या बद्दल मोहोळ कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी करू नये अशी विनंती मी करतो.कुख्यात गुंड शरद मोहोळची गेल्या आठवड्यात भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या साथिदारांनीच त्याची हत्या केली असल्याचं समोर आलं. त्यानंतर मात्र काही राजकीय नेत्यांनी तो कसा मोठा होता याचे गुणगाण गायला सुरू केलं. शरद मोहोळ हा हिंदुत्ववादी होता, त्याने हिंदुत्वासाठी काम केल्याचं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले. त्या आधी भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी सोलापुरातील हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या वेळी शरद मोहोळ हा हिंदुत्ववादी असल्याने त्याची हत्या झाल्याचं सांगितलं

‘मुंबई फेस्ट‍िव्हल २०२४’ करिता नोंदणीचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

मुंबई,  :  राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये  २० ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचा समाविष्ट असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की,राज्यातील पर्यटनाला चालना देऊन मुंबई शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्ट‍िव्हलच्या धर्तीवर 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे मुंबईत शहर व उपनगरातील विविध विभागात आयोजित करण्यात येणार आहे. दर दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. राज्य शासन आणि मुंबई महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाद्वारे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या सहअध्यक्षतेखाली सल्लागार समिती देखील गठित करण्यात आली आहे.

या महोत्सवात राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सायकलिंग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्ट‍िव्हीटीज्,  पॅरामॉटर शो, जुहू बीच येथे बीच फेस्ट‍िव्हल याअंतर्गत फुटबॉल, व्हॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता मोहीम, मुव्हीज् स्क्रीन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दररोज विविध कार्यक्रम आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे, असेही पर्यटनमंत्री श्री. महाजन यांनी म्हटले आहे.