Home Blog Page 1274

तलाठी भरती परीक्षा 200 गुणांची:काही उमेदवारांना मिळाले 214 गुण

पुरावे द्या, परीक्षा रद्द करूउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ही परीक्षा राज्यात पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. त्यात गैरव्यवहाराचा पुरावा दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.

मुंबई-ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ दरम्यान खासगी एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेतील आश्चर्यकारक निकाल समोर आले आहेत. २०० गुणांच्या या परीक्षेचे गुणांकन नॉर्मलायझेशन पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे काही उमेदवारांना २०४ ते २१४ पर्यंत गुण पडल्याचे यादीत दिसत आहे. त्यामुळे उमेदवारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, आधीच पेपरफुटीमुळे ही परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यात निकालातही घोळ स्पष्ट झाल्याने परीक्षाच रद्द करावी, यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला आहे. विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका करत हीच मागणी लावून धरली आहे.

४७९२ तलाठी पदासाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत राज्यभर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. सुमारे ११ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते.

नॉर्मलायझेशन : गुण वाढू शकतात, कमीही होऊ शकतात

नॉर्मलायझेशन म्हणजे सरासरी गुण. जे संबंधित पेपरच्या काठिण्य पातळीवर अवलंबून असते. काही विद्यार्थ्यांचे गुण वाढू शकतात आणि काही विद्यार्थ्यांचे गुण कमी होऊ शकतात, परंतु परीक्षा २०० गुणांची असताना राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्यापेक्षा जास्त गुण कसे काय मिळू शकतात? असा प्रश्न उमेदवारांमध्ये आहे

एसआयटी चौकशी करा

२०० पैकी २१४ गुण मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील हे एक आश्चर्य आहे. “तलाठी भरती परीक्षा’ हा मोठा घोटाळा आहे. त्याची एसआयटी चौकशी व्हावी. – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मास्टरमाइंड समोर आणाआमदार कैलास पाटील

तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत. प्रक्रिया पारदर्शक झाल्याचा सरकार दावा करत असेल तर गुन्हे कसे दाखल झाले? सरकारने सगळ्या चुकीची जबाबदारी घेऊन घोटाळ्यामागचा मास्टरमाइंड समोर आणावा.

8 महिला पोलिसांवर,अधिकारी साहेबाच्या बंगल्यावर अत्याचार:अशी कोणतीही घटना घडलेली नाही, पोलिस उपायुक्तांचे स्पष्टीकरण

मुंबई : काही प्रसार माध्यमे व समाजमाध्यमांवर मुंबई पोलीस दलातील महिला शिपाई यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त प्रदर्शित झाले. या प्रकरणी सखोल माहिती घेण्यात आली. याप्रकरणी तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता असा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व सही कुणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीपूर्वक सदरचे कृत्य केले असल्याचे समजून आले आहे.

या अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करण्याऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, असे स्पष्टीकरण मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी केले आहे.

काय होती ती बातमी—

8 महिला पोलिसांवर,अधिकारी साहेबाच्या बंगल्यावर अत्याचार,दारूच्या नशेत व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यासाठी धमकी

मुंबई पोलिसांच्या नागपाडा वाहतूक विभागातील आठ महिला वाहनचालकांनी पोलिसांच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बलात्काराचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करून त्यांनी या अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, खळबळ उडवून दिली आहे.
पीडित महिला पोलिसांनी पत्रात लिहिले की, ‘आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातील आहोत. आमचे आई, वडील हे गरीब शेतकरी आहेत. काही मैत्रिणींचे आई, वडील मृत झालेले आहेत. म्हणून आम्ही चांगल्या नोकरीच्या आशेने गावाहून मुंबईत आलो व पोलिस खात्यात भरती झालो आहे. सध्या आम्ही नागपाडा मोटार परिवहन विभाग येथे चालक म्हणून कार्यरत आहोत.परिचलन कक्षातील पोलिस निरीक्षक अविनाश हराळ व प्रभारी इन्चार्ज सीताराम खांडे व तेथील लेखनिक या तिघांनी नोव्हेंबरपासून आमचे मानसिक व लैंगिक शोषण सुरू केेले आहे. पोलिस उपअधीक्षक बढे यांच्या सरकारी वाहनातून व त्यांच्याच सरकारी निवासस्थानी हराळ व खरे आम्हाला घेऊन गेले होते. तिथे या तिघांनी आमच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
‘आम्ही मुंबईला आमच्या बायका- मुलांना साेडून एकटेच राहत असतो. जर तुम्ही आमच्याशी शारीरिक संबंध ठेवले तर आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये काहीच काम देणार नाही’, असे ते आम्हाला सांगायचे. इतकेच नव्हे तर हराळ व खरे यांनी आमचे अश्लील व्हिडिओ बनवले. त्याआधारे आम्हाला वारंवार ब्लॅकमेल करीत आहेत. रोज रात्री दारू पिऊन आम्हाला अश्लील मेसेजेस व व्हिडिओ पाठवत असतात. कधी कधी आम्हाला विवस्त्र होऊन व्हिडिओ कॉल करण्यासाठी ब्लॅकमेल करतात. तसे न केल्यास बढे साहेबांना सांगून तुमची बदली करीन, अशा धमक्याही देतात.सामूहिक बलात्कारामुळे महिला पोलिस कर्मचारी गरोदर राहिल्या. त्यानंतर तिला सात हजार रुपये देऊन गर्भपात करण्यास सांगण्यात आले. याबद्दल आम्ही वरिष्ठांकडे आवाज उठवला असता आम्हाला निलंबित करण्याची धमकीही देण्यात अाली, असेही एका महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना परिक्षेत पास करण्यासाठी पैसे घेणाऱ्यांवर कारवाई कधी करणार ? अतुल लोंढे

अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत चुका झाल्याचे मान्य करता, मग गुन्हा दाखल का केला नाही?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ.

मुंबई, दि. ८ जानेवारी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत पास होण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार नुकताच उघड केला. अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीतही चुका झाल्याचे स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे तरीही अद्याप संबंधित दोषींवर गुन्हा दाखल केलेला नाही. इंजिनिअरिंग व फार्मसीसारख्या विभागात असा सावळा गोंधळ होत असेल तर कोणतीही कंपनी महाराष्ट्रातील इंजिनिअर व फार्मसिस्टना नोकरीवर घेणार नाही हे अत्यंत गंभीर आहे, या प्रकरणी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अन्यथा काँग्रेस आपल्या मार्गाने प्रश्न सोडवेल असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, इंजिनिअरिंगचे पेपर ऑनलाईन तपासले जातात व ऑनलाईन नापास केले जाते. या नापास विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी पैसे द्या असे मेसेज टेलिग्रामवरून पाठवले जातात. अकॅडमिक कौंसिलच्या बैठकीत अशा प्रकारच्या चुका झाल्याचे स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे पण कारवाई मात्र केलेली नाही. फेरतपासणीचे निकाल लागले नसतानाच दुसरी परिक्षा घेण्यात आली. फेरतपासणीत हे विद्यार्थी पास झाले तर काय करणार ? तुम्ही पास होणार नाही असे विद्यार्थ्यांना सांगितले जाते, म्हणजे विद्यार्थ्यांना ठरवून नापास करता का? आणि फेरतपासणीचा निकाल न लावता परीक्षा कशी घेतली ? या विद्यापीठातील जवळपास ११ हजार विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, एवढ्या विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? संबंधित लोकांवर गुन्हा दाखल का केला नाही? कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. ऑनलाईन पेपर तपासणाऱ्या खाजगी कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये का टाकले नाही? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळऱ्यांवर काय कारवाई केली? FIR का दाखल केला नाही? याची उत्तरे मिळाली पाहिजेत.
राज्यपाल महोदय हे कुलपती आहेत, त्यांच्याकडे याप्रश्नी वेळ मागितला आहे, ते विद्यार्थ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या विद्यापीठात असे प्रकार होत आहेत हे अतिशय गंभीर आहे, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

‘पंचक’ला दिलेल्या प्रेमाबद्दल माधुरी दीक्षितने मानले प्रेक्षकांचे आभार

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही ‘पंचक’चे भरभरून कौतुक होत आहे. सर्व वयोगटातून या चित्रपटाला पसंती मिळत असताना चित्रपटाचे निर्माते डॉ. श्रीराम नेने, माधुरी दीक्षित, दिग्दर्शक, कलाकार प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहांना भेट देत आहेत.

चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर पुणे, ठाणे, दादरमधील काही चित्रपटगृहांना माधुरी दीक्षित यांनी भेट दिली. या वेळच्या प्रतिक्रिया खूप कमाल होत्या. अनेक ठिकाणी ‘माधुरी, माधुरी’ असा आवाज देत माधुरी दीक्षितचे जंगी स्वागत झाले. काहींनी माधुरी दीक्षित यांना नाव घेण्याची विनंतीही केली. माधुरीनेही त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली. यावेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत संवाद साधला. चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहाण्याचा आनंद लुटला, धमाल केली. प्रेक्षकांनी सिनेमात प्रचंड आवडलेल्या काही सीन्सवर चर्चाही केली. मग तो पायात कळशी अडकण्याचा सीन असो किंवा दिलीप प्रभावळकर यांना वेगळ्या अवतारात बघून कॅरेक्टर्सची उडालेली भंबेरी असो. ओपेरा तर सिनेमाचा हायलाईट आहे आणि मुंडावळ्याचा सीन हसून हसून पोटात गोळा आणतो आणि जाता जाता एक सुंदर मेसेज देऊन जातो. एका शो दरम्यान आदिनाथ कोठारे भावुक झाला. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा चित्रपट अप्रतिम झाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. ‘पंचक’ला भरभरून प्रेम दिल्याबद्दल माधुरी दीक्षित यांनी यावेळी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.

जिल्हास्तरीय ऑलिंपिया गेम्स क्रीडा महोत्सवाचे आयोजन : फिरोज शेख

बुधवारी ऑलिंपिक वीर पै. मारुती आडकर यांच्या हस्ते डॉ. हेगडेवार क्रिडा संकुल येथे उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि. ८ जानेवारी २०२४) माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच जिल्हास्तरीय ऑलिंपिया गेम्स क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. १० जानेवारी) ऑलिंपिक वीर पै. मारुती आडकर यांच्या हस्ते पिंपरी, अजमेरा कॉलनी येथील डॉ. हेगडेवार क्रिडा संकुल येथे ऑलिंपिया गेम्स क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी दिली.
पिंपरी येथे सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर, आकांक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष तृप्ती धनवटे, महामंडळाचे सचिव महादेव फपाळ, खजिनदार निळकंठ कांबळे, पदाधिकारी मुकेश बिरांजे, राकेश प्रसाद, आशिष मालुसरे, राम मुदगल, राधिका काळे, वैशाली इंदलकर, रेणू शर्मा आदी उपस्थित होते.
या उद्घाटन समारंभास आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अजितेश रॉय तसेच क्रिडा अधिकारी महादेव कासगावडे, दादासाहेब देवकाते, चंबादास स्वामी, अनिता केदारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी ४ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत शहरातील विविध भागातील शाळांमध्ये क्रिडा ज्योत नेण्यात आली आहे. यामध्ये सांघिक गटात फुटबॉल, (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले मुली);बास्केटबॉल (१०,१२,१४ वर्षे मुले, मुली); क्रिकेट (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले, मुली)
हँडबॉल (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले, मुली); हॉकी (१२, १४ वर्षे मुले, मुली); खो-खो (१२,१४ वर्षे मुले, मुली) व लंगडी (१०, १२, १४ वर्षे मुले, मुली) या स्पर्धा आणि वैयक्तिक गटात मैदानी स्पर्धा कराटे (८ ते १४ वर्षे मुले, मुली); रोप स्किपिंग (१०, १२, १४ मुले, मुली) व स्केटिंग (५ ते १४ वर्षे मुले, मुली) या स्पर्धा होणार आहेत. विजेत्या खेळाडू व संघाना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महामंडळाचे मान्यताप्राप्त काम पाहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी www.mahamandal@games.com ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी निवृत्ती काळभोर (९८८१३६५११३) किंव्हा महादेव फपाळ (९८२२६१६७४९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महादेव फपाळ यांनी केले आहे.

फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 8 :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा तसेच फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.

देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून शैक्षणिक, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात क्रांतीकारी कार्य करणाऱ्या फुले दांपत्यासारख्या महामानवांचे स्मारक त्याच्या कार्याला न्याय देणारे असले पाहिजे. त्यासाठी हेरिटेज दर्जा आणि आधुनिक वास्तूकलेचा सुरेख मिलाप साधून हे प्रेरणादायी स्मारक तयार करण्यात यावे. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा तर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व्हीसीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशात स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने वावरताना दिसतात त्याचे श्रेय सर्वस्वी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचे कार्य, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, केलेला त्याग याची माहिती शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. त्यातून युवा पिढीला मार्गदर्शन, प्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी प्रस्तावित स्मारकांमध्ये फुले दांपत्याच्या जीवनकार्याबद्दलची माहिती देणारे थिएटर, युपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा असल्या पाहिजेत. नवे स्मारक पुण्याच्या हेरीटेज वास्तुसौंदर्यात भर घालणारे असले पाहिजे, त्यासाठी आराखड्यावर अधिक काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे लक्ष्य-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

केंद्रासह राज्याच्या निधीचे योग्य नियोजन करा;
आकांक्षित तालुक्यांसह जिल्ह्यांना अधिकचा निधी

विदर्भातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी;
नागपूर-अमरावती विभागात टुरिझम सर्कीट विकसीत करा

मुंबई, दि. 8 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या ‘टॉप-5’वर पोहोचली आहे. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था ‘पाच ट्रिलियन’ डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने ‘एक ट्रीलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खासगी गुंतवणुक आकर्षित करणे, निर्यात वाढविणे तसेच राज्यासह केंद्राच्या योजनांचा अभिसरणाद्वारे अधिकाधिक निधीचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. विदर्भात पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहेत, विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूरसह अमरावती विभागातील महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांची एकत्रित सांगड घालून टुरिझम सर्किट विकसीत करण्याच्या सूचना त्यांनी आज दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील अकरा‍ जिल्ह्यांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. याबैठकीला व्हिसीद्वारे चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकात पाटील, अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, बुलडाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील (प्रत्यक्ष उपस्थित), गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यांचे पालकमंत्री संजय राठोड (प्रत्यक्ष उपस्थित), भंडाऱ्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, गोंदीयाचे जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, अकोल्याच्या जि. प. अध्यक्षा संगीता अडाऊ, वाशीमचे जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय (प्रत्यक्ष उपस्थित), नागपूरचे पालकसचिव असीम गुप्ता (प्रत्यक्ष उपस्थित), वर्धा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. अनुपकुमार यादव, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर, वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, गोंदीयाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, चंद्रपूरचे प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, संबंधित लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा वार्षिक योजनांमधील निधी खर्चाचे प्रमाण अल्प राहून त्यामध्ये वर्षाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांनी वित्त विभागाने निधी वितरीत केल्यानुसार निधी खर्चाचे प्रमाण राहील याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. निधी वेळच्यावेळी खर्च करतानाच विकासकामे दर्जेदार पध्दतीने पूर्ण करावीत.

केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु आहेत. या योजना निती आयोगाच्या माध्यमातून सनियंत्रित करण्यात येत आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री पोषण अभियान, प्रधानमंत्री स्कूल रायझिंग इंडिया, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अमृत योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जल जीवन मिशन, हर घर जल, ट्रॅव्हल फॉर लाईफ, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आदींचा समावेश आहे. या केंद्राच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

आकांक्षित जिल्ह्यांसह तालुक्यांना भरघोस निधी
राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, वाशीम, धाराशिव या जिल्ह्यांचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश होतो. या जिल्ह्यांव्यतीरिक्त अमरावती, बीड, चंद्रपूर, हिंगोली, जालना, नांदेड, नाशिक, पालघर, सोलापूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील अठरा तालुक्यांचा आकांक्षित तालुक्यात समावेश होतो. या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या‍ विकासासाठी 25 टक्के निधी राखून ठेवण्यात येतो. या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या निर्देशांकात वाढ करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात यावा. या आकांक्षित जिल्ह्यासह तालुक्यांना भरघोस निधी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

केंद्रासह राज्याच्या निधीचे प्रभावीपणे अभिसरण करा
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे आपले उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खासगी गुंतवणुक आकर्षित करणे, निर्यात वाढविणे तसेच राज्यासह केंद्राच्या योजनांच्या अभिसरणाद्वारे निधीचा अधिकाधिक वापर करावा. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात आलेला निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषत: शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बाल कल्याण, कृषि, मृद व जलसंधारणाच्या क्षेत्रात खर्च करावा.

‘डिपीसी’च्या माध्यमातून गत वेळपेक्षा वाढीव निधी
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जिल्ह्यांनी विविध यंत्राणांकडून आलेल्या मागणीनुसार निधीची मागणी केली आहे. जिल्ह्यांची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रावर आधारीत तयार करण्यात आलेल्या सूत्रानुसार निधीचे वितरण करण्यात येईल. तथापि गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निधीपेक्षा यंदा अधिकचा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

विकासकामांच्या गुणवत्तेत तडजोड नको
राज्य सरकार जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यांना देत असलेला निधी हा सर्वसामान्यांच्या कराच्या पैशातून देण्यात येतो. त्यामुळे या निधीचा विनियोग योग्य पध्दतीने झाला पाहिजे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करु नये, प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

विदर्भात टुरिझम सर्किट उभारा
विदर्भात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प नागपूर विभागात आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने विदर्भात येत असतात. त्यांना अधिकच्या सुविधा देतानाच, या सर्व पर्यटनकेंद्रांना जोडून टुरिझम सर्किट उभारण्यात यावे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्य, मेळघाट यांसारख्या पर्यटन क्षेत्रांना अधिकची सुविधा देण्याबरोबरच त्यांची अधिक प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिध्दी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

कोथरुड मधील नागरिकांना अक्षता वाटपाद्वारे निमंत्रण

पुणे-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आज रामसेवेत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळालं. नामदार पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील शिवपार्वत आणि गिरीजा सोसायटीतील नागरिकांच्या घरी जाऊन अक्षता वाटपाद्वारे राम मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण दिले.

सध्या संपूर्ण देशात अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण दिले जात आहे.

कोथरुड मध्येही प्रभू श्रीरामांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. अनेक मंदिरांमध्ये राम प्रतिष्ठापनेवेळी विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. तसेच, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा सर्वांना पाहता यावा; यासाठी अनेक मंदिरांमध्ये एलईडीची व्यवस्था करुन लाईव्ह प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे.

आज आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे देखील रामभक्तीत तल्लीन झाले असून, रामसेवेत सहभाग घेत आहेत. आज कोथरुडमधील शिवपार्वती आणि गिरीजा सोसायटीतील नागरिकांच्या घरोघरी जाऊन राम मंदिर अक्षता वाटप करुन निमंत्रण दिले. यावेळी नागरिकांकडूनही प्रभू श्रीरामांच्या आगमानाचा आनंद व्यक्त केला. पाचशे वर्षांपासून आपलं आराध्य दैवत प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होत असल्याने अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले.

मागील वर्षात २.३४ लाखांवर विक्रमी नवीन वीजजोडण्या

महावितरणची पुणे परिमंडलामध्ये वेगवान कामगिरी

पुणे, दि०८ जानेवारी २०२४नवीन वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाने वेगवान व तत्पर कार्यवाही करीत सन २०२३ मध्ये सर्व वर्गवारीमध्ये विक्रमी २ लाख ३४ हजार ८१० नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. सन २०२२ च्या तुलनेत तब्बल ५७ हजार ५७९ अधिक वीजजोडण्या दिल्या आहेत. एका वर्षात दोन लाखांपेक्षा अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची पुणे परिमंडलाने प्रथमच कामगिरी केली आहे.

पुणे परिमंडलामध्ये दरवर्षी दीड ते पावणेदोन लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र मागीलवर्षी जानेवारीपासून वीजजोडण्या देण्यास नियोजनपूर्वक वेग देण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकसेवा गतीमान करण्यासोबतच प्रामुख्याने नवीन वीजजोडण्यांना आणखी वेग देण्याची सूचना केली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनीही राहणीमान सुलभता (Ease of Living) प्रमाणे ग्राहकसेवा गतिमान करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्यांचा वेग वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.

नवीन वीजजोडण्यांसाठी मीटरचा आवश्यकतेनुसार व तात्काळ पुरवठा व्हावा यासाठी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी मागील जानेवारीपासून दर आठवड्यामध्ये दोनदा विभागनिहाय नवीन वीजजोडण्या व मीटर उपलब्धता याबाबत आढावा घेणे सुरु केले आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया अधिक गतीमान झाला व जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये तब्बल २ लाख ३४ हजार ८१० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. या तुलनेत सन २०२२ मध्ये एकूण १ लाख ७७ हजार २३१ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या होत्या.

सन २०२३ मध्ये घरगुती- १ लाख ९८ हजार ६५९, वाणिज्यिक- २६ हजार ८६६, औद्योगिक- ३ हजार ७६८ आणि कृषि व इतर ५५१७ अशा एकूण २ लाख ३४ हजार ८१० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यामध्ये पुणे शहरात १ लाख ४४१, पिंपरी चिंचवड शहरात ७२ हजार ४६६ आणि ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये ६१ हजार ९०३ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. पुणे परिमंडल अंतर्गत यापूर्वी दरमहा १५ ते १६ हजार वीजजोडण्या देण्याचा वेग होता तो आता सन २०२३ मध्ये १९ हजार ५५० वर गेला. तर मागील एप्रिलपासून हा वेग २० हजार १०० वर गेला आहे.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल – सन २०२३ मध्ये २.३४ लाखांवर नवीन वीजोडण्या देण्यात आल्या ही पुणे परिमंडलासाठी समाधानाची व आनंदाची बाब आहे. हा वेग आणखी वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत.

पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मतदारसंघ निहाय नियोजन करा

  • भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रवक्त्यांच्या बैठकीत आवाहन

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्र व राज्य सरकारची कामगीरी पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करा, त्यासाठी टीम तयार करा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले. प्रदेश भाजपातर्फे झालेल्या प्रवक्ते व प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, अजित चव्हाण उपस्थित होते.

श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, आगामी काळात मीडिया, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया यासाठी संघटना स्तरावर स्वतंत्र नियुक्त्या केल्या जातील. पक्षवाढीसाठी समर्पित वेळ देणा-या विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तिंचे सहकार्य घेऊन त्यांच्या मार्फत पक्षाची वाढ जिथे म्हणावी तशी झालेली नाही अशा ठिकाणी पक्षाची भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न माध्यम विभागाने करावा.
पक्षाविषयी चांगली मते असणाऱ्या निवृत्त पत्रकार, लेखक, विचारवंत अशा लोकांना एकत्र आणत विशेष उपक्रम राबवावे तसेच मतदारसंघ निहाय महत्वाचे विषय हाती घेऊन प्रवक्त्यांनी विविध माध्यमांतून व्यक्त व्हावे, पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करावा असे आवाहनही श्री. बावनकुळे यांनी केले.

दिवसभर झालेल्या या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीचा ढाचा पाडतानाचे छायाचित्र कॅमे-यात टिपणारे ज्येष्ठ कॅमेरामन व पक्ष प्रवक्ते मोहन बने यांचा यावेळी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अवधूत गुप्तेच्या संगीत रजनीला तूफान प्रतिसाद

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची दमदार सांगता 

पिंपरी, पुणे (दि.८ जानेवारी २०२४) गणाधीशा..,  राधा ही बावरी.., मधूबाला, काय सांगू राणी मला गाव सुटना…   अशी एकाहून एक बहारदार गाणी. अवधूत गुप्ते आणि त्यांच्या सहकार्यांचे सुरेल सादरीकरण याने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची सांगता अविस्मरणीय ठरली. 
नाट्य संमेलन हस्तांतरण सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्य सभामंडपात संपन्न झालेल्या या संगीत रजनीला नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, युवा उद्योजक हर्षवर्धन भोईर आदि उपस्थित होते. 
अवधूत गुप्ते संगीत रजनीची सुरुवात पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे हीच्या ‘ही गुलाबी हवा’ या गाण्याने झाली, प्रेक्षकांना मुग्धाच्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध केले. पुढे लिटिल चॅम्प फेम कौस्तुभ गायकवाडने राधा ही बावरी हे गाणे सादर करत  रसिकांची मने जिंकली. त्या नंतर गायिका मानसी घुले – भोईर यांनी ‘आता गं बया का बावरलं’ आणि सार्थक भोसले च्या साथीने ‘बहरला हा मधुमास नवा’ हे गाणे सादर करत आपल्या आवाजाची जादू उपस्थित प्रेक्षकांना दाखवत त्यांची मने जिंकली.
अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार आणि पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी ‘गणाधीश’ या गाण्यातून श्री गणरायाला  वंदन करत आपल्या गायनाची सुरुवात केली. पुढे त्यांचे गाजलेले ‘तुझे देख के मेरी मधूबाला’, ‘सखे तुझ्या नावाचं गं वेड लागलं’ हे गीत सादर करत वातावरणात जोश निर्माण केला. त्यांनी काय सांगू राणी मला गाव सुटना …. म्हणताच पिंपरी चिंचवडकरांनी एकच जल्लोष करत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी अभिनेता प्रतीक लाड, गौरव मोरे, अभिनेत्री जुई आणि दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी एन्ट्री करत गाण्यात रंगत भरली. पुढे अवधूत आणि मुग्धा यांनी ‘उन उन व्हटातून’ हे गाणे सादर केले. या बहारदार संगीत रजनीचे निवेदन अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी केले.

भाजपाने गुंडांना आश्रय दिल्याचे स्पष्ट – धंगेकर

पुणे : कोथरुड भागात भरदिवसा गुंड शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. कोथरुड भागाची शहरात वेगळी ओळख आहे. या भागातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाने अनेक गुंडांना आश्रय दिल्याची टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी केली.आमदार धंगेकर यांनी सोमवारी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालीन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. गुंड मोहोळचा भरदिवसा कोथरुड भागात खून झाला. वाढत्या गुन्हेगारीमुळे कोथरुडची ‘अशांत कोथरुड’ अशी ओळख निर्माण झाली आहे. कोथरुड भागात साहित्यिक, कलावंत वास्तव्यास आहेत. अनेक महत्त्वाच्या संस्था कोथरुड परिसरात आहेत. शिक्षणानिमित्त या भागात विद्यार्थी वास्तव्यास आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळाली आहे. कोथरुडसह पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, असे धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

”माझा नवरा वाघ होता, मी त्याची वाघीण”

पुणे : शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याची पत्नी आणि भाजप नेत्या स्वाती मोहोळ यांनी आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. माझे पती हिंदुत्वासाठी काम करत होते म्हणून त्यांची हत्या झाली, असं त्यांनी म्हटलं आहे.माझा सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. माझे पती हिंदुत्वाचं काम करत होते, म्हणून त्यांच्याबाबत अशी घटना घडली. परंतु कुणाला वाटत असेल, मी खचून जाईल. तर तसं होणार नाही. माझा नवरा वाघ होता, मी त्याची वाघीण आहे. हिंदुत्वासाठी मी लढत राहणार, अशी प्रतिक्रिया स्वाती मोहोळ यांनी यावेळी दिली.

भाजप आमदार नितेश राणे यांनी सांत्वनासाठी मोहोळ कुटुंबाची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.

माझा नवरा हा हिंदुत्ववादी होता, त्यामुळेच त्याची हत्या झाली असल्याचा आरोप कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी केला आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण असल्याचा उच्चार त्यांनी केला. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत आपण हिंदुत्ववादासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माझा नवरा वाघ मी वाघीण
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज स्वाती मोहोळ यांची भेट घेतली. त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, सरकार आणि प्रशासनावर आपला पूर्ण विश्वास आहे. कायदा आपल्याला न्याय देईल. आपला नवरा हिंदुत्ववादी होता, हिदुत्ववादासाठी काम करत होता म्हणून त्याची हत्या झाली. समोरच्याला जर असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाणार तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

काल फडणवीसांची घेतली भेट
स्वाती मोहोळ यांनी रविवारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली.

चुकीची प्रतिमा दाखवली जातेय
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, आज कोणतीही राजकीय किंवा अन्य चर्चा न करता मोहोळ कुटुंबीयांचे सांत्वन करायला आलो आहे. शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावं. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो तपास करत आहेत.”

मोहोळ कुटुंबीयांचे हिंदु समाजासाठी मोठं काम असल्याचं सांगत नितेश राणे म्हणाले की, “शरद मोहोळ यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची आहे, त्या बद्दल मोहोळ कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी करू नये अशी विनंती मी करतो.”

स्वाती मोहोळ भाजपच्या पदाधिकारी
शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.

”मोहोळ कुटुंबासोबत मी खंबीरपणे उभा,हिंदू म्हणून माझी ती जबाबदारी” नितेश राणे यांचे वक्तव्य

पुणेः आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली. शरद मोहोळ यांचं हिंदुत्वासाठी मोठं काम होतं, असंही नितेश राणे म्हणाले.

मोहोळ कुटुंबाचं हिंदुत्वासाठी निर्विवाद काम आहे. कुठलाही प्रश्न निर्माण झाला की मोहोळ कुटुंब कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं आहे. या संकटाच्या काळात वहिनींबरोबर उभं राहाणं माझी नैतिक जबाबदारी आहे. हिंदू म्हणून माझी ती जबाबदारी आहे. आज आधार देण्यासाठी मी आलो आहे. हिंदुत्वाचं काम असंच पुढे घेऊन जावं, अशी विनंती मी त्यांना केली आहे.

राणे पुढे म्हणाले की, हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुठेही खचून जाता कामा नये. आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत. पोलिस योग्य तो तपास करत आहे. या तपासामध्ये टप्प्याटप्प्यात काय होतं, ते येणाऱ्या काळात कळेलच.

रात्री-बेरात्री कुठेही हिंदू समाजावर संकट आलं तर ताई आणि त्यांचे पती उभे राहिलेले आहेत. या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही नितेश राणेंनी दिली.

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार नाही!:मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

पुणे-

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. वास्तविक, मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात निवडणूक आयोगाला पुणे लोकसभा जागेसाठी तातडीने पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. पुणे लोकसभेची जागा खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे 29 मार्च 2023 पासून रिक्त आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे, त्यामुळे यावेळी पोटनिवडणूक घेण्यास काही अर्थ नाही. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिलीच, पण पोटनिवडणुकीच्या विलंबावरही प्रश्न उपस्थित केले. या संदर्भातील पुढील सुनावणी सात आठवड्यांनी होणार आहे. पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू असेही निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

गिरीश बापट यांच्या निधनामुळे जागा रिक्त

भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. यामुळेच येथे पोटनिवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले होते. गिरीश बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाले होते. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. म्हणून पुढच्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एक वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असल्यास निवडणूक घेणं बंधनकारक असते.

पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

1951 मध्ये गाडगीळ या जागेवरून काँग्रेसचे पहिले खासदार होते. त्यानंतर मधल्या काळात ते प्रजा सोशालिस्ट पार्टी, संयुक्त सोशालिस्ट पार्टी, भारतीय लोकदलाचे खासदारही झाले. काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपने 1991 मध्ये आव्हान दिले होते. अण्णा जोशी येथून भाजपचे पहिले खासदार झाले. 1996 मध्ये सुरेश कलमाडी पहिल्यांदाच या जागेवरून खासदार झाले.त्यानंतर 2004 आणि 2009 मध्येही कलमाडी काँग्रेसच्या तिकिटावर येथून खासदार झाले. कॉमनवेल्थ घोटाळ्यात नाव पुढे आल्याने कलमाडी यांचे तिकीट रद्द करण्यात आले. 2014च्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली होती. 2014च्या मोदी लाटेत लोकसभेतच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. 2014 मध्ये काँग्रेसची ही परंपरागत जागा पूर्णपणे भाजपच्या रंगात रंगली.

पुणे लोकसभा निवडणूक 2019चा निकाल

भाजप- गिरीश बापट – 6,32,835 मते काँग्रेस- मोहन जोशी – 3,08,207 मते बीएसपी- उत्तम पांडुरंग शिंदे – 4792 मते