Home Blog Page 111

राज्यात मेघगर्जना , वीजांचा कडकडाट ,वादळी वारे , गारपीट व हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता

🌦️ कृषी हवामान सल्ला: महाराष्ट्र राज्य
कालावधी: 31 मार्च ते 3 एप्रिल 2026
आधारित स्रोत: IMD प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व नागपूर
हवामान सारांश
राज्यातील वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून अनेक भागांमध्ये मेघगर्जना ⛈️, वीजांचा कडकडाट 🌩️, वादळी वारे 🌪️, गारपीट 🌨️ व हलका ते मध्यम पाऊस🌧️होण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे.

📅 31 मार्च
(⚠️ अलर्ट: ऑरेंज अलर्ट🟠)
⛈️🌨️गारपीट + मेघगर्जना + 🌩️ वीजांचा कडकडाट + 🌪️वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
• नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली
(⚠️ अलर्ट: यलो अलर्ट 🟡)
⛈️मेघगर्जना + 🌩️वीजांचा कडकडाट + 🌪️वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
• नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया
• उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

📅 १ एप्रिल
(⚠️ अलर्ट: यलो अलर्ट 🟡)
⛈️ मेघगर्जना + 🌩️वीजांचा कडकडाट + 🌪️वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
• सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे.
• उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

📅 2 एप्रिल
(⚠️ अलर्ट: यलो अलर्ट 🟡)
🌧️मेघगर्जनेसह पावसाची शक्यता+ जोरदार वारे🌪️
• सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदुरबार, धुळे, ठाणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, नंदुरबार, परभणी, हिंगोली.
• उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

📅 3 एप्रिल (⚠️ अलर्ट: यलो अलर्ट 🟡)
🌧️ मेघगर्जनेसह पावसाची शक्यता + जोरदार वारे
• जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

📢 सामान्य सल्ला
• मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे.
• शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे.
• वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत.
• शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात.

🌾 रबी पिके (काढणी अवस्था)
सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत.
• काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे.
• पुढील २४ तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
• शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे.
• ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.

🍇 द्राक्ष
• ज्या बागांमध्ये द्राक्ष काढणीच्या अवस्थेत आहेत, त्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या मण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. अशा मण्यांमध्ये पुढे बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता असते. पाऊस पडल्यानंतर दुपारच्या वेळेस चांगले ऊन पडून बागेत बऱ्यापैकी वारे वाहत असल्यास क्रॅकिंगचा धोका राहत नाही. काहीही करण्याची गरज नाही. क्रॅकिंगचा धोका जास्त वाटल्यास घडांवर कायटोसॅन ३ मि.ली. अधिक ट्रायकोडर्मा २.३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारावे.
• बागेत पावसाचे पाणी साचून राहिल्यास द्राक्ष वेलींची वाढ मंदावते. त्यामुळे बागेत पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा.
• द्राक्ष घडांचे गारापासून संरक्षणासाठी शक्य असल्यास हेलनेटचा वापर करावा.
• पावसाचे पाणी बेदाणे शेड मध्ये आल्यास बेदाणे पावसाच्या पाण्याने भिजू शकतात व त्यामुळे त्यांची प्रत खराब होऊन नुकसान होऊ शकते. द्राक्षांपासून बेदाणे तयार करणाऱ्या शेड मध्ये पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून शेड झाकून घ्यावे. पावसाचे पाणी बेदाणे शेड मध्ये आल्यास त्वरित बाहेर काढावे जेणे करून शेडमधील आर्द्रता वाढणार नाही.

🥭 आंबा
• केऱ्या तसेच पक्व होत असलेल्या आंबा फळांना इजा होऊन फळे खराब होऊ शकतात त्यांची प्रत खालावू शकते. पावसापासून बचावासाठी पक्व झालेल्या आंबा फळांची त्वरित काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.
• आंब्याच्या आकाराच्या फळांना फक्त माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळगळ झालेली असल्यास पहिली फळे गोळा करून नष्ट करावीत व दररोज फळ माशी सापळे @ २ प्रति एकर या प्रमाणात लावावेत. आकर्षणासाठी हायड्रोलायझेट प्रोटीनचा वापर करावा.

🍌केळी
• जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने केळी झाडे उन्मळून पडू नये म्हणून केळी झाडांना काठीच्या किंवा बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा.
• गारांची शक्यता असल्याने शक्य असल्यास हेलनेटचा वापर करावा.

🥬भाजीपाला पिके
• गारपीट आणि पावसाची व जोराच्या वाऱ्याची शक्यता असल्याने, वेलवर्गीय भाज्यांना आधार द्यावा जेणेकरून वारा आणि पावसामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. शक्य असल्यास उघड्यावर असलेली रोपवाटिका प्लास्टिक पेपरने झाकून घ्यावी. शक्य असल्यास हेलनेटचा वापर करावा.

🐄 पशुधन
• वीजांच्या कडकडाटाच्या वेळी जनावरे झाडाखाली किंवा धातूच्या कुंपणाजवळ बांधू नयेत.
• जनावरे शक्यतो बाहेर चरावयास नेऊ नयेत.

🌩️शेतात असताना जर मेघ गर्जना होत असेल तर काय करावे काय करू नये
काय करावे
➤ मेघगर्जना व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने फळबागांना व भाजी पाला पिकाला आधार द्यावा.
➤ जर शेतकरी शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परिसरातील सर्वात उंच वस्तू टाळून जर फक्त तुरळक झाडे जवळपास असतील तर सर्वात चांगले संरक्षण म्हणजे उघड्यावर दड घालून बसावे (आपले पाय पोटाशी धरून बसावे).
➤ मेघ गर्जना होत असल्यास झाडाखाली उभे राहू नये.
➤ प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा विहिरीपासून दूर ठेवावे.
➤ प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूच्या शेतीच्या उपकरणापासून दूर ठेवावे
➤ शेतातील उभ्या पिकामधून अतिरिक्त पावसाचे पाणी काढून टाकावे.
➤ जर शेतातील पिक / उत्पादन शेतात राहिले असल्यास पॉलिथिन शीटने झाकून ठेवावे.

हे करू नका
➤ विद्युत उपकरण किंवा वायर/केबल यांचा संपर्क टाळा.
➤ कोणत्याही धातू ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुकाचीचा संपर्क दूर ठेवा जे धातू वा इतर पृष्ठभाग विद्युत वाहक आहेत.
➤ आपल्या प्राण्यांना झाडाखाली जाऊ देऊ नका. प्राण्यांकडे लक्ष ठेवा आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

📩 संदेश
दिनांक 31 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे गारपीट व वादळी पावसाचा धोका जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची सर्व कामे नियोजनपूर्वक करावीत व पिकांचे संरक्षण करावे.

ना.दे.कृ.सं.प्र., मुंबई

कौशल्य विकासाचे नवीन युग: मंत्री  चंद्रकांतदादा पाटील

फ्युएल-एनएसई बेल रिंगिंग सोहळ्यात ‘कमवा आणि शिका’ मुलींसाठी विद्यावेतन जाहीर करण्याचा विचार

पुणे: नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE), मुंबई येथे फ्युएल’ (Friends Union for Energising Lives) संस्थेचा  सोशल स्टॉक एक्स्चेंज (SSE) प्लॅटफॉर्मवरील सूचीकरणाचा (Listing) ‘बेल रिंगिंग’ सोहळा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा  पाटील व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान, फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे आणि कॅपजेमिनीचे अनुराग प्रताप उपस्थित होते.

या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  ४० मुलींसाठी फ्यूल च्या ‘कमवा आणि शिका’ या क्रांतिकारी उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षापासून शासनातर्फे महाराष्टातील विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. राज्य सरकार, एनएसई आणि फ्युएल यांच्यातील ही भागीदारी महाराष्ट्रातील गरजू मुलींसाठी मोफत शिक्षणाची दारे उघडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  विद्यार्थ्यांना स्पष्ट दिशा मिळाल्यावर  ते स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करतात. आम्ही कौशल्य आणि शिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भविष्यात फ्यूल स्किल टेक यूनिवर्सिटीच्या सहाय्याने हजारो कोशल्याने परिपूर्ण विद्यार्थी तयार होतील.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी फ्युएलचे कौतुक करताना सांगितले की कौशल्य विकास आणि शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील मार्गदर्शक म्हणून फ्युएल स्किल्स टेक यूनिवर्सिटी नावारूपाला येईल. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून फ्यूल आता स्किल टेक यूनिवर्सिटी म्हणून सुरू होईल. आजच्या एनएसई लिस्टिंगमुळे मुलीच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.

आशिष कुमार चौहान यांनी सांगितले की, फ्युएलने एसएसई प्लॅटफॉर्मद्वारे सुमारे ९९ लाख रुपये यशस्वीरित्या उभे केले आहेत. सामाजिक गुंतवणुकीच्या लोकशाहीकरणावर भर देताना त्यांनी नमूद केले की, या निधीपैकी ३७% वाटा किरकोळ देणगीदारांचा (Retail Donors) आहे. एनएसई प्लॅटफॉर्म आता देशातील ९९.८५% पिन कोडपर्यंत पोहोचला असून सामान्य नागरिकांनाही सामाजिक बदलात सहभागी होण्याची संधी मिळत आहे.

फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या फ्युएलच्या प्रवासापासून ते आता स्किल टेक युनिव्हर्सिटी होण्यापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षण आणि रोजगार यातील दरी कमी करण्यासाठी सेंजेटटा आणि Global Capability Centers (GCC) सोबत नवीन धोरणात्मक भागीदारी जाहीर केली. भविष्यात शंभर कोटी चा इशू आणणार आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचे ध्येय आहे.

मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.

अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी चौथ्या जहाजाचे नौदलाकडे हस्तांतरण

नवी दिल्‍ली-

कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई)ने स्वदेशी आरेखन आणि बांधणी केलेल्या अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी आठ जहाजांपैकी, चौथ्या जहाजाचे आज नौदलाकडे हस्तांतरण केले. जीआरएसई, कोलकाताने अशा प्रकारच्या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी जहाजांची ‘इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग’ (IRS) च्या नियमांनुसार रचना आणि बांधणी केली असून यामधून ज्यामधून स्वदेशी संरक्षण जहाजबांधणीचे यश अधोरेखित होत आहे.77 मीटर लांबीच्या या युद्धनौका भारतीय नौदलातील वॉटरजेट तंत्रज्ञानाने संचार करणाऱ्या सर्वात मोठ्या युद्धनौका आहेत. वजनाने हलके असलेले अत्याधुनिक पाणतीर(टॉर्पेडो), स्वदेशी बनावटीचे रॉकेट लॉन्चर्स आणि उथळ पाण्यात पाणबुड्यांचा शोध घेणारी सोनार यंत्रणा यांनी त्या सुसज्ज आहेत. यामुळे पाण्याखालील पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांचा वेध घेऊन या धोक्यापासून प्रभावी पद्धतीने संरक्षण करणे शक्य होणार आहे. या युद्धनौकांच्या  समावेशामुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी आणि पाणसुरुंग आधारित युद्धक्षमतांमध्ये, तसेच किनारपट्टीवरील टेहळणीच्या क्षमतेत आणखी वाढ होणार आहे.  

ही युद्धनौका म्हणजे पूर्वीच्या 1241 पीई श्रेणीतील आयएनएस अग्रय गस्ती नौकेची सुधारित आवृत्ती आहे, जी नौका 2017 मध्ये सेवेतून निवृत्त करण्यात आली होती. यामुळे आपल्या उल्लेखनीय युद्धनौकांच्या नावांचा वारसा जपण्याची नौदलाची परंपरा पुढे सुरू राहिली आहे.  

अग्रयचा मिळालेला ताबा हा भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या वाटचालीतील आणखी एक मैलाचा दगड आहे. सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार, यामध्ये 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. हे जहाज देशांतर्गत संरक्षण उत्पादन व्यवस्थेची वाढती ताकद आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या निरंतर प्रयत्नांचा दाखला आहे.

जगातील सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा एक एप्रिल 2026 पासून होणार सुरू

देशभरातील जनगणतेत 30 लाखांहून अधिक जनगणना कर्मचारी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी सहभागी असतील

नवी दिल्‍ली-

भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी आज नवी दिल्ली इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘जनगणना-2027’ संदर्भात माहिती दिली. जगातील ही सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत होणार असून याचा पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू होईल. ही जनगणना पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. तसेच नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याचा पर्यायही प्रथमच उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, एनडीएमसी आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोरम, ओडिशा आणि सिक्कीम या ठिकाणी एक  ते 15 एप्रिल या कालावधीत ‘स्व-नोंदणी’ आणि 16 एप्रिल ते 15 मे 2026 या कालावधीत ‘घर-यादी आणि गृहगणना’ केली जाईल. महाराष्ट्रात स्व-गणनेचा पहिला टप्पा एक ते 15 मे आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान होणार आहे.भारताची जनगणना ‘जनगणना अधिनियम, 1948’ आणि ‘जनगणना नियम, 1990’ (ज्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत) यांच्या तरतुदींनुसार घेतली जाते. भारताची शेवटची जनगणना 2011 मध्ये पार पडली होती. जनगणना 2027 ही या मालिकेतील 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असेल.

2027 ची जनगणना घेण्याचा शासनाचा उद्देश 16 जून 2025 रोजी ‘गॅझेट ऑफ इंडिया’मध्ये अधिसूचित करण्यात आला आहे. 2027 च्या जनगणनेची संदर्भ तारीख 1 मार्च 2027 रोजी 00:00 वाजता आहे, (लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी तसेच जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील व उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील बर्फाच्छादित व विषमकालिक अशा क्षेत्रांसाठी ही संदर्भ तारीख 1 ऑक्टोबर 2026 रोजी 00:00 वाजता असेल).

जनगणना 2027 ही दोन टप्प्यांत पार पडेल;  त्यापैकी पहिला टप्पा म्हणजे ‘घर-यादी आणि गृहगणना’ —जो सर्वसाधारणपणे ‘एच एल ओ’ म्हणूनही ओळखला जातो. हा टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांच्या सोयीनुसार 30 दिवसांच्या कालावधीत राबवला जाईल. यासोबतच, घरोघरी जाऊन यादी करण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीच्या अगदी आधी 15 दिवसांचा ‘स्वयं-गणना’ करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. या टप्प्यामध्ये घरांची स्थिती, कुटुंबाला उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि कुटुंबाच्या मालकीच्या मालमत्तेविषयीची माहिती संकलित केली जाईल. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्न जानेवारी 2026 मध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत.

या मोहिमेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये सुरु होईल, त्यावेळी, प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना (पीई) करण्यात येईल (केंद्रशासित प्रदेश लडाख तसेच जम्मू आणि काश्मीरची बर्फाच्छादित विषमकालिक क्षेत्रे तसेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जनगणनेचा दुसरा टप्पा सप्टेंबर 2026 मध्ये राबवला जाईल.) सीसीपीएच्या निर्णयानुसार, जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातींची देखील मोजणी करण्यात येईल. या दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक, स्थलांतरसंबंधी, प्रजननसंबंधी, इत्यादी घटकांच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीकडून माहिती संकलित केली जाईल. या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या नक्की तारखा तसेच विचारण्यात येणारे प्रश्न याविषयी येत्या काळात सूचित करण्यात येईल.  

जनगणना अधिकाऱ्यांचे मानधन तसेच त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स पाठबळ इत्यादी पुरवण्याच्या दृष्टीने पुरेशी तरतूद व्हावी म्हणून केंद्र सरकारने जनगणना 2027 साठी 11,718.24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

डिजिटल मार्गांच्या माध्यमातून जनगणना 2027 मोहिम राबवली जाणार आहे. संकलन कर्मचारी  त्याचा/तिचा स्वतःचा मोबाईल फोन वापरून, मोबाईल अॅपच्या माध्यमातून थेटपणे माहिती संकलित करून सादर करेल. याशिवाय, दोन्ही टप्प्यांमध्ये स्वयं-गणनेसाठी ऑनलाईन तरतूद करण्यात आलेली आहे. हे मोबाईल अॅप तसेच स्वयं-गणना पोर्टल, हिंदी तसेच इंग्रजीसह 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल. जनगणनेशी संबंधित विविध क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच निरीक्षणासाठी एक पोर्टल विकसित करण्यात आले आहे. माहितीच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  

स्वयं-गणनेसाठी, लोक त्यांचे मोबाईल क्रमांक आणि इतर मुलभूत तपशील वापरून एसई पोर्टलमध्ये लॉगिन करू शकतात आणि त्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार जणगणनेचे वेळापत्रक पूर्ण करू शकतात. माहिती यशस्वीपणे जमा केल्यानंतर, एक विशेष स्वयं-गणना ओळख क्रमांक (एसई आयडी) मिळेल जो क्षेत्र-भेटीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला सांगावा लागेल. स्वयं-गणनेमुळे नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या भेटीपूर्वीच स्वतःच्या सोयीनुसार माहिती भरण्याची सुविधा असेल. यापूर्वीच्या जनगणनेप्रमाणेच संकलक त्यांना नेमून दिलेल्या विभागांमध्ये घरोघरी जाऊन जनगणनेचे काम करणे सुरूच ठेवतील, त्याचबरोबर स्वयं-गणना ही नागरिकांना यावेळी देण्यात आलेली अतिरिक्त सुविधा असेल.

दिनांक 01 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी इतर सर्व प्रशासकीय कामे गोठवण्यात आली आहेत. दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी उपलब्ध माहितीनुसार देशातील 36 राज्ये/ केंद्रशासित प्रदेश, 7,092 उपजिल्हे, 5,128 वैधानिक शहरे, 4,580 गणना नगरे तसेच सुमारे 6,39,902 गावांमध्ये जनगणना 2027 मोहिम  राबवण्यात येईल.  

गणना अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या विषय तज्ञांनी सुमारे 2000 मास्टर प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे त्यांच्याकडून 1000 राष्ट्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यात करण्यात आले आहे. हे मास्टर प्रशिक्षक 45000 क्षेत्र प्रशिक्षकांना प्रशिक्षण देत असून हे क्षेत्र प्रशिक्षक 31 लाख प्रगणक तसेच पर्यवेक्षकांनासुमारे 80 हजार तुकड्यांमध्ये प्रशिक्षण देत आहेत. शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणाऱ्या आपल्या क्षेत्रसैनिकांना, प्रगणकांना आणि पर्यवेक्षकांना कालबद्ध पद्धतीने गुणवत्तापूर्ण माहिती संकलित करण्यात कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी सर्व संभाव्य प्रशिक्षण साहित्य प्रादेशिक भाषांमध्ये तयार करण्यात आले आहे.

वापरून झालेल्या बॅटरी साहित्याचा पुनर्वापर करण्यात शास्त्रज्ञांना यश

नवी दिल्‍ली-

वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून मिळवलेल्या स्पेंट ग्रॅफाईटच्या पुनर्वापरासाठी नवे तंत्रज्ञान शोधण्यात आले असून या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बॅटरीपासून निर्माण होणाऱ्या टाकाऊ साहित्याचे इंधन सेलची कार्यक्षमता सुधारणाऱ्या उच्च-मूल्याच्या कार्यकारी साहित्यात रुपांतर करणे शक्य झाले आहे.

लिथियम-आयन बॅटऱ्या आणि इंधन सेल तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे बॅटरीपासून निर्माण होणाऱ्या टाकाऊ साहित्याचे व्यवस्थापन तसेच किफायतशीर दरातील, टिकाऊ इंधन सेल उत्प्रेरकांची गरज ही गंभीर आव्हाने बनली आहेत.

इंधन सेल्सच्या महत्त्वाच्या कार्यावरील मर्यादांवर मात करण्यासाठी पुनर्वापर करता येणाऱ्या बॅटरी साहित्याचा उपयोग करता येऊ शकेल का याचा शोध शास्त्रज्ञांतर्फे घेण्यात येत होता आणि आता त्यांनी प्लाटिनम-आधारित ऑक्सिजन रिडक्शन रिअॅक्शन (ओआरआर)  इलेक्ट्रोकॅटलिस्ट असलेल्या ग्रॅफाईटवर लक्ष केंद्रित केले आहे.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) अखत्यारीतील स्वायत्त संस्था असलेल्या पावडर मेटॅलर्जी आणि न्यू मटेरियल्स वरील आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रातील (एआरसीआय) संशोधकांनी वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून ग्रॅफाईट मिळवले आणि त्याचे पृष्ठभाग क्षेत्र वाढवण्यासाठी तसेच एज कार्यकारी गटांची संख्या वाढवण्यासाठी रासायनिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया केली.

यापूर्वीच्या अभ्यासांमध्ये केवळ आम्लारीधर्मी माध्यमे अथवा बॅटरीच्या पुनर्वापरावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते त्याऐवजी आता या पद्धतीमध्ये पुनर्नवीकरणीय ग्रॅफाईटचा वापर करून आम्लधर्मी माध्यमामध्ये मिथेनॉल-टॉलरंट ओआरआर ची प्रक्रिया केलेली दिसते.

यामुळे लिथियम-आयन बॅटऱ्यांच्या शाश्वत पुनर्वापराला चालना मिळण्यास मदत होईल, महागड्या उत्प्रेरक साहित्यावरील अवलंबित्व कमी होऊन स्वच्छ उर्जा तंत्रज्ञानांचा वापर वाढेल.

‘सदर्न कमांड’च्या लष्करी कमांडरांनी पुणे येथे ऐतिहासिक वास्तू आणि प्रगत प्रशिक्षण सुविधेचे केले उद्घाटन

पुणे-

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम) यांनी आज पुण्यात दोन कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान भूषवले. सेठ यांनी पुणे लष्करी तळावर ‘सुदर्शन चौक’ आणि ‘कोणार्क चौक’ यांचे उद्घाटन केले; तसेच ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग’ इथे त्यांनी एका अत्याधुनिक कृत्रिम लष्करी अडथळा शर्यत मार्गाचे‌ उद्घाटनही  केले.सुदर्शन आणि कोणार्क चौकांचे उद्घाटन: लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी ‘दक्षिण विभागाच्या पराक्रमी तुकड्या—’सुदर्शन चक्र काॅर्प्स’ आणि ‘कोणार्क काॅर्प्स’—यांचे शौर्य, उत्कृष्ट सेवा आणि लढाऊ वृत्तीला आदरांजली म्हणून ‘सुदर्शन चौक’ आणि ‘कोणार्क चौक’ यांचे उद्घाटन केले. पुणे लष्करी स्टेशनच्या प्रतिष्ठित परिसरात वसलेल्या या दोन्ही वास्तू देशातील सर्वात जुन्या लष्करी ठाण्यांपैकी एक असलेल्या पुण्याच्या समृद्ध आणि वैभवशाली इतिहासात लष्करी कर्तृत्वाची भर घालणाऱ्या ठरल्या आहेत.

दक्षिण विभागाच्या लष्करी कर्तृत्वाच्या वारशा मोठे योगदान देणाऱ्या या दोन्ही वास्तू, दलांच्या जिवंत मूल्यांचेही प्रतिनिधित्व करतात. त्यांची स्थापना, पराक्रमाच्या स्मृती जतन करणे, अभिमान जागृत करणे आणि तिच्या युद्ध-अनुभवी दलांच्या वारशात कमांडची विद्यमान ओळख दृश्यरूपात स्थापित करणे या जाणीवपूर्वक केलेल्या संस्थात्मक प्रयत्नांचे द्योतक आहे.

लष्कराच्या शारीरिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अत्याधुनिक कृत्रिम लष्करी अडथळा शर्यतमार्गाचे उद्घाटन : लष्कर कमांडरांनी अत्याधुनिक कृत्रिम लष्करी अडथळा शर्यतमार्गाचे उद्घाटन केले. अधिक तंदुरुस्त, कणखर आणि युद्धसज्ज सैन्यदल तयार करण्याच्या सदर्न कमांडच्या निरंतर प्रयत्नांमधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

बारमाही काळात सुरू राहणाऱ्या  या अडथळा शर्यतमार्गावर विविध परिस्थितींमध्ये वास्तववादी, उच्च-तीव्रतेचे आणि दीर्घकाळ टिकणारे शारीरिक प्रशिक्षण सुलभ व्हावे, यादृष्टीने काळजीपूर्वक केलेले अडथळे आणि रात्रीच्या प्रशिक्षणाची क्षमता यांचा समावेश आहे.युद्धाच्या बदलत्या स्वरूपामुळे शारीरिकदृष्ट्या कणखर, मानसिकदृष्ट्या चपळ आणि कारवाईत जुळवून घेणाऱ्या सैनिकांची आवश्यकता आहे, यावर सेठ यांनी आपल्या भाषणात भर दिला. अशा प्रकारच्या विशेष प्रशिक्षण पायाभूत सुविधा एक कणखर, चपळ आणि भविष्यासाठी सज्ज सैन्यदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.  या कार्यक्रमांतून लष्करी वारसा जतन करण्याप्रती आणि भविष्यातील युद्धसज्जता वाढवण्याप्रती दक्षिण विभागाची कटिबद्धता अधोरेखित झाली. 

५०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २५० टनांच्या दोन स्वतंत्र निविदा काढा – विरोधीपक्षनेते निलेश निकम

पुणे- ५०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २५० टनांच्या दोन स्वतंत्र निविदा काढा अशी मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे विरोधीपक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे.

ते म्हणाले,’पुणे महानगरपालिकेद्वारे शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी ५०० टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, शहराच्या भविष्यातील गरजा आणि तांत्रिक सुरक्षितता विचारात घेता आणि निविदेत पुरेशी स्पर्धा होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक वाटते.
या प्रस्तावाबाबत खालील काही तांत्रिक व व्यावहारिक मुद्दे विचारात घ्यावेत अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे पहा कोणते मुद्दे :
तांत्रिक जोखीम (Technical Risk): जर आपण ५०० टनांचा एकच प्रकल्प कार्यान्वित केला आणि काही तांत्रिक कारणास्तव तो बंद पडला, तर संपूर्ण ५०० टन कचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन शहरात कचरा साठण्याची शक्यता असते.
विकेंद्रीकरण आणि सातत्य: ५०० टनांऐवजी २५० टनांचे दोन स्वतंत्र प्रकल्प असल्यास, एका प्लांटमध्ये बिघाड झाला तरी दुसऱ्या प्लांटमध्ये प्रक्रिया सुरू राहील. यामुळे कचरा व्यवस्थापनात खंड पडणार नाही.
कार्यक्षमता आणि स्पर्धा: दोन वेगवेगळे ठेकेदार किंवा दोन स्वतंत्र प्लांट असल्यास कामात स्पर्धा राहील आणि व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. तसेच, शहरातील वेगवेगळ्या भागात हे प्रकल्प उभारल्यास वाहतुकीचा खर्चही कमी होऊ शकतो.
निलेश निकम यांची मागणी:
पुणे शहराची स्वच्छता आणि आरोग्य अबाधित राखण्यासाठी, कृपया ५०० टनांची एक निविदा काढण्याऐवजी, २५० टनांच्या दोन निविदा मागवण्यात याव्यात. यामुळे शहराच्या कचरा प्रश्नावर एक कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल.
या विषयावर सकारात्मक विचार होऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे.


अवकाळी पावसाने निर्माण झालेल्या समस्या आपत्ती विभागाने तातडीने दूर कराव्यात: महापौर

पुणे

अवकाळी पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मा. महापौर मंजुषा दीपक नागपूरे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

महापौरांच्या निर्देशानुसार शहरातील झाडांची छाटणी, धोकादायक फांद्या हटविणे, तसेच नाल्यांची व गटारांची साफसफाई ही कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. पावसामुळे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

यासोबतच आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच महानगरपालिकेच्या १ ते ५ परिमंडळातील उपायुक्तांना तत्काळ आणि प्रभावी कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक :
📞 02025506800
📞 02025501269

तुळशीबाग–मंडई परिसरात भगवान महावीर स्वामींच्या २६२५व्या जन्मकल्याणका निमित्त भव्य उत्सव

दिवसभर दर्शन; सायंकाळी महाआरती व दिमाखदार वरघोडा
पुणे, :
पुण्यातील तुळशीबाग–मंडई परिसर जैन संघाच्या वतीने भगवान महावीर स्वामींच्या २६२५व्या जन्मकल्याणकानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रभूंच्या दर्शनी मूर्तीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या निमित्ताने भगवान महावीर स्वामींची आकर्षक व दर्शनीय मूर्ती तयार करून ती दिवसभर मंडई परिसरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. जैन समाजाबरोबरच इतर नागरिकांनाही प्रभूंचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सायंकाळी प्रभूंची भव्य महाआरती आयोजित करण्यात येणार असून “कौन बनेगा भाग्यशाली” या लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच लक्ष्मी रोडवरून दिमाखदार वरघोडा काढण्यात येणार असून, मागील २५ वर्षांपासून पुणे सकल संघाच्या वरघोड्यात या मंडळाचा बक्षीसपात्र सहभाग राहिला आहे.
उत्सवाबाबत माहिती देताना मोहन साखरिया यांनी सांगितले की, तुळशीबाग–मंडई परिसर जैन संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रभूंच्या दर्शनी मूर्तीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा उत्सव जैन समाजाच्या श्रद्धा आणि एकात्मतेचे प्रतीक असून अधिकाधिक भक्तांनी उपस्थित राहून दर्शन, आरती व वरघोड्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

महापालिका देऊ शकत नसेल तेव्हा, ३२ गावातील नवीन प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी बिल्डरचीच-अनिरुद्ध पावसकर

पुणे-समाविष्ट ३२ गावातील नवीन प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी बिल्डरचीच आहे. तसे हमीपत्र देखील बिल्डर देतात. मात्र प्रत्यक्षांत पाणीपुरवठा करत नाहीत. त्यामुळे मुबलक पाणी देण्याबाबत बिल्डरला खरेदी करारनाम्यात ही बाब नमूद करावी लागणार आहे. तसेच मान्य प्रस्तावांची यादी महापालिका वेबसाईट वर टाकण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी जारी केले आहेत.

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये नविन ११ गावे (उरुळी देवाची व फुरसुंगी वगळून ९ गावे) व २३ गावे असे एकूण ३२ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. नव्याने समाविष्ठ गावांकरीता पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत संपूर्ण पाणीपुरवठा योजना विकसित करण्याची कामे प्रगती पथावर आहेत. नव्याने समाविष्ठ ३२ गावांमधील प्राप्त विकसन व बांधकाम प्रस्तावांमध्ये विकासकामार्फत संबंधित प्रकल्पाचे विकसन पूर्ण झाले नंतर निवासी/व्यापारी वापरासाठी पुणे मनपामार्फत पुरेसा पाणी पुरवठा पुरेशा दाबाने उपलब्ध होईल तोपर्यंत विकसकामार्फत मुबलक पाणीपुरवठा सदर प्रकल्पास करणार असे हमीपत्र विकसक पुणे महानगरपालिकेस सादर करतात.

हमीपत्रानुसार पुणे मनपामार्फत कोणताही पाणीपुरवठा न झाल्यास किंवा अपुरा पाणीपुरवठा झाल्यास सदर प्रकल्पातील सदनिका धारकांना सदनिका खरेदी करारनाम्यामध्ये पाणीपुरवठ्याबाबत वरील प्रमाणे सर्व वस्तुस्थिती विशेष बाब महणून नमूद करून घेण्याची जबाबदारी विकासकाची आहे. तसेच ३२ गावांमधील पुणे मनपास हमीपत्र सादर करून विकासकामार्फत प्राप्त विकसन व बांधकाम प्रस्तावांना देण्यात आलेल्या मान्य प्रस्तावांची यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून वेळोवेळी सदर यादी अद्ययावत करण्यात येणार आहे. शहर अभियंता यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

हिंगणेमळ्यात नशेड्यांचा उपद्रव: श्री काळभैरवनाथ मंदिरात PI मानसिंग पाटलांनी दिली महिलांना ग्वाही,म्हणाले त्यांची आता खैर नाही…

पुणे:हडपसर- हिंगणेमळा येथील कॅनाल च्या भरावावावरील निर्जन रस्त्यावर व कॅाक्रिट च्या भिंती वर रोज रात्री काही समाजकंटक रोज दारु पिऊन नशा करतात तसेच येणा-या जाणाऱ्या नागरिकांना महिलांना अश्लील शिवीगाळ करतात. या विरोधात या पुर्वी नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशन ला माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे यांच्या नेतृत्वाखाली जाऊन गाऱ्हाणी मांडली त्यावेळी त्या प्रकारात थोडासा फरक पडला होता , परंतु हल्ली हा त्रास भयंकर वाढला आहे त्या मुळे पुन्हा एकदा योगेश बापू ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काळेपडळ पोलीस स्टेशन चे पोलीस इन्पेक्टर मानसिंग पाटील यांनी हिंगणेमळ्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता हिंगणे मळा येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात लोकअदालत घेतली.या लोकअदालतीमध्ये परिसरातील असंख्य महीला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
त्या वेळी काळेपडळ पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी महीलांना सायबर क्राईम , ११२ नंबर वरील कॅाल , बीट मार्शल बाबत माहिती, अर्थिक गुन्हे तसेच सोशलमेडीया वरील गुन्हे इं बाबत माहिती अवगत करून दिली तसेच सर्व नागरिकांना आश्वस्त केले की अशा नशेड्यांची ज्ञ आता पोलीस करणार नाही. कायदा सुव्यवस्था बाबत कधीही तक्रार करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
तसेच सर्वांना स्वतःचा मोबाईल क्रमांक त्यांनी यावेळी दिला
या वेळी सौ. अनिता हिंगणे, सुचिता हिंगणे,रुपाली हिंगणे,एैश्वर्या हिंगणे ,सुरेखा हिंगणे, लक्ष्मी हिंगणे, मंदाबाई हिंगणे,जयश्री हिंगणे, शोभा हिंगणे, सुलभा हिंगणे, अर्चना हिंगणे,कुसुम हिंगणे ,स्वप्नाली हिंगणे तसेच सर्वश्री ज्ञानेश्वर हिंगणे, सतीश हिंगणे,राजेंद हिंगणे,संदीप हिंगणे,आण्णा वाडकर ,शुभम हिंगणे,विनोद ससाणे इत्यादी नागरिक उपस्थित होते.
आभार प्रदर्शन योगेश हिंगणे यांनी केले व मानसिंग पाटील तसेच योगेश बापू ससाणे यांचे श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

शेतजमिनींचे रूपांतर बिगरशेती जमिनीत होणे अन्नसुरक्षेसाठी गंभीर

  • प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून शून्य प्रहरात मुद्दा उपस्थित; शेतजमिनींचे संरक्षण करण्याची मागणी

पुणे: देशातील कृषी क्षेत्र झपाट्याने अकृषी क्षेत्रात रूपांतरित होत असून, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण कमी होणे चिंताजनक आहे. १४० कोटी नागरिकांच्या अन्नसुरक्षेसाठी भारताला सक्षम बनवायचे असेल, तर शेतजमिनींचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत शून्य प्रहरात बोलताना मांडले. 

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “देशातील अनेक जिल्हे आणि शहरांमध्ये शेतीजमिनींची प्लॉटिंग करून निवासी प्रकल्प उभारले जात आहेत. यामुळे पेरणीयोग्य क्षेत्रात सतत घट होत आहे. पंजाबमध्ये मागील काही वर्षांत एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन अकृषिक घोषित करण्यात आली. सध्या भारतात केवळ सुमारे ४५ टक्के जमीनच शेतीखाली असून, त्यात सुमारे ९ टक्क्यांची घट झाली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास अन्नसुरक्षा, शेतकऱ्यांची उपजीविका, जीएसटी उत्पन्न आणि पर्यावरणीय संतुलन यावर परिणाम होऊ शकतो.” एका अभ्यासानुसार लोकसंख्येत एक टक्क्याने वाढ झाली, तर शेती क्षेत्र ०.४५ टक्क्यांनी कमी होते, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन जपून ठेवत पुढील पिढीसाठी ती सुरक्षित करावी. आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण बियाणे, सूक्ष्म सिंचन आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊन उत्पादन वाढवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. शेतजमिनीचे अकृषी क्षेत्रात रूपांतर केवळ व्यापक जनहिताच्या पायाभूत प्रकल्पांसाठीच मर्यादित असावे. उपजाऊ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायदे लागू करावेत, तसेच जमिनींच्या वापरातील बदलांवर सॅटेलाइट व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रण ठेवावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे कुलकर्णी यांनी केली. 

तसेच शेतजमीन शेतीसाठीच वापरली जावी. त्यातूनही शेतकऱ्यांना जमीन विकावी लागल्यास सरकारने योग्य मोबदला देऊन ती खरेदी करून शेतीसाठीच वापर सुनिश्चित करावा, असेही त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्र हे भविष्यातील महत्त्वाचे उद्योग ठरणार असल्याने त्याचे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घोषणा

मुंबई -अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी घोषणा करण्यात आली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिका-यांना रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. चव्हाण यांनी सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, उपाध्यक्ष साई घोगळे, सचिव शरद येटम, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राऊत, निशांत गायकवाड यांच्यासह कमर्चारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणीही घोषित करण्यात आली.
यावेळी श्री. रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रशासन समन्वयातून सर्वांनी मिळून काम करायचे आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय आम्ही करणार नाही या भूमिकेतून काम करण्याची पद्धत अवलंबत न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीमध्ये संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, उपाध्यक्ष किरण पवार, युहान केर्सी दोराबाजी आणि सुजित न्यायनिर्गुणे यांची तर सचिव म्हणून प्रभुदास भोईर, मुखांश नाईक, गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणी घोषीत झाली त्यात रायगड जिल्हा अध्यक्षपदी जितेश शिंदे, भिवंडी पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन जोशी, ठाणे उरण उपाध्यक्षपदी विक्रांत भोसले, दक्षिण मुंबई उपाध्यक्षपदी राहुल लहासे, वरळी विधानसभा अध्यक्षपदी शैलेश तोडकरी आणि वरळी विधानसभा सरचिटणीस पदी समीर शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

“पुणे तिथे काय उणे, नीलम गोऱ्हे यांनी ओळखले; आता पुढचा मुक्काम ठाणे!” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र विधानपरिषद अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६: संसदीय लोकशाहीचे संवर्धन आणि जनहिताचे ठोस निर्णय
— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा

पुणे | दिनांक: ३० मार्च २०२६

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई येथील विधानभवनात यशस्वीपणे संपन्न झाले. या अधिवेशनात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि संतुलित भूमिका बजावत सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडले. अनेक प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांना दिशा देत त्यांनी संसदीय लोकशाही अधिक बळकट केली. अधिवेशनाच्या समारोपानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

​मुंबई येथे संपन्न झालेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ निमित्त महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे आणि २५ लाख महिलांना ‘लखपती दिदी’ बनवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी ७.५ HP पर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज आणि पीक कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदींमुळे राज्याच्या शाश्वत विकासाला गती मिळणार असून, हे अधिवेशन खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या हिताचे साध्य करणारे ठरले असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या सन २०२६–२७ च्या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना डॉ. गोऱ्हे यांनी तो ऐतिहासिक आणि सर्वसमावेशक असल्याचे नमूद केले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू असलेल्या योजनांची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेतील तरतूद, तसेच थकीत वीज बिलांवरील व्याज सवलत या उपाययोजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ठरतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील तरतुदींनाही त्यांनी विशेष महत्त्व दिले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारण्याचा संकल्प, तसेच ‘एचपीव्ही लसीकरण’ मोहिमेसाठी करण्यात आलेली तरतूद ही महिला आरोग्याच्या दृष्टीने क्रांतीकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसह युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत तरुणांना विद्यावेतन देण्याचा निर्णय हा रोजगारक्षमतेला चालना देणारा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

या अधिवेशनात राज्याच्या हिताची अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर झाली. त्यामध्ये ‘भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२६’ हे विशेष ठरले असून, डिजिटल माध्यमांतून महिलांवर होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था सुधारणा विधेयकामुळे शहरी विकासात सुसूत्रता येणार आहे, तर शेतकरी संरक्षण विधेयकामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण होणार आहे.

अधिवेशनाच्या निरोप प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी राजकीय घडामोडींवर स्पष्ट भाष्य केले. “एका नेतृत्वाखालून मोठ्या प्रमाणावर सहकारी बाहेर पडत असतील, तर त्या प्रक्रियेचे आत्मपरीक्षण आवश्यक असते,” असे त्या म्हणाल्या. सत्य मांडल्यामुळे टीका होऊ शकते, मात्र जनहितासाठी ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

सामाजिक प्रश्नांबाबतही त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. बदलापूर परिसरातील महिलांचे शोषण करून बीजांड विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटची गंभीर दखल घेत त्यांनी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचे निर्देश दिले. दोषी रुग्णालयांवर कठोर कारवाई, परवाने रद्द करणे आणि IVF केंद्रांसाठी कडक SOP तयार करण्यावर त्यांनी भर दिला.

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ‘उभारी’ प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रशासकीय पारदर्शकतेच्या दृष्टीने समृद्धी महामार्गावरील सुविधांची पडताळणी प्रत्यक्ष व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे करण्याचे निर्देश देत त्यांनी उत्तरदायित्वाची नवी पद्धत रुजवली.

पुणे जिल्ह्यातील पर्यटन, महिला सुरक्षा आणि शहीद कुटुंबीयांच्या प्रश्नांवरही डॉ. गोऱ्हे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. शनिवारवाडा, लोहगड किल्ला आणि आगाखान पॅलेस यांसारख्या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी त्यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय वाढवण्याची मागणी केली. या स्थळांच्या देखभालीसह मूलभूत सुविधा उभारून पर्यटनाला चालना देण्यावर त्यांनी भर दिला, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोणीकंद येथील हुंडाबळी प्रकरणात मृत विवाहिता वैष्णवी लाटे हिला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेत तपासात फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वेळेत न्याय मिळणे अत्यावश्यक असल्याचा ठाम संदेश त्यांनी दिला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नांचीही त्यांनी दखल घेतली. त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे हिला पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे संबंधित कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला. शासनाची शहीद कुटुंबीयांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारे हे कार्य ठरले.

डॉ. गोऱ्हे यांच्या संसदीय भाषणांना आणि सामाजिक भूमिकांना मोठा जनसमर्थन लाभला. “दुःख एका पक्षाचे नसते” हे त्यांचे विधान व्यापक चर्चेचा विषय ठरले. ‘माय मराठी कलासंगम’ सारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी तरुण पिढीला भाषा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन केले.

वृद्ध पत्रकारांसाठी असलेल्या ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ अधिक सुलभ करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. तसेच आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये “लिंगसमानता हा लोकशाहीचा पाया आहे” हा ठाम संदेश त्यांनी दिला.

या संपूर्ण अधिवेशनाने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संसदीय कौशल्याचा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना “सभागृहाचे शक्तिस्थान” असे संबोधून गौरव केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत विशेष उल्लेख केला.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपली ही धडपड भविष्यातही कायम राहील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

मी खरातला भेटल्याच्या बातम्या खोट्या – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे- नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला ६-७ वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत.असे स्पष्टीकरण विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी पुढे असे म्हटले आहे कि,’ गेल्या चार दशकांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द एका स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी राहिली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्वे कधीही कोणापासून लपलेली नाहीत.माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲड. श्रीपाद देशपांडे आणि माझी आई लतिकाताई गोऱ्हे व शास्त्रज्ञ वडील डॅा. दिवाकर गोर्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, त्याचे मी काटेकोरपणे पालन करत आले आहे. “कोणत्याही ढोंगी, ‘गुरूचा’ अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही,” हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थ , साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील श्री दत्त महाराजांवर आहे.
महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर काम करत मी राजकारणात आले .मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते . राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्याही तांत्रिक ‘गुरू’ची किंवा बुवाबाजीची गरज भासलेली नाही.

नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला ६-७ वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत.

माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधानपरिषदेचे उपसभापती पद आणि मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. अधिवेशन काळातील माझे संसदीय कार्य, सातारा एस.पी. निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली, ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत.

ज्यावेळी ही बातमी आली, त्यावेळी २३ तारखेला अधिवेशन नुकतेच सुरू झाले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची ‘SIT’ चौकशी आधीच म्हणजे १३ मार्च रोजी जाहीर केली होती. अशा वेळी पीठासीन अधिकारी (Presiding Officer) म्हणून मी काहीही भाष्य करणे हे संसदीय नियमांनुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. म्हणूनच, मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र, अधिवेशन संपताच २६ तारखेला आयोजित कार्यक्रमात मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. मी समाजात चांगल्याप्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे.याप्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे.

​सत्याच्या बाजूने उभे राहून, अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढेही अशीच कायम राहील.असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.