Home Blog Page 103

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग सहकारी बँकेकडून मदत

पुणे : मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ‘मुख्यमंत्री सहायता निधी‘साठी १ कोटी रुपयांच्या धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. तर, सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला हा मदतीचा हात देण्यात आला.

मुंबई येथे हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी, तुकाराम रासने आदी उपस्थित होते.

ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले, आपला शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो. कोरोनासारख्या संकटातही खंबीरपणे उभा राहिलेला बळीराजा आज अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालदिल झाला आहे. या संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तो पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून कोयना, लातूर भूकंप सारख्या आपत्तीच्या वेळी तसेच मा.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत यांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वेळोवेळी मदत देत ट्रस्टने संवेदना दाखविली आहे.

सत्याचा आवाज दाबला जात आहे – प्राध्यापक अभिजित देशपांडे

पुणे-रामजन्मभूमी आंदोलन हे हिंदुत्ववादी यांनी उभारलेले आंदोलन असत्याच्या  आधारे उभारलेले आहे.अयोध्या मधील विविध जमिनीचे वाद पूर्वी पासून होते त्याचा मूळ राम जन्मभूमीशी वाद नव्हता. पण १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषद यांनी याबाबत आंदोलन सुरू केले. शाहबानो प्रकरणामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर अल्पसंख्याक लांगुलचालन बाबत आरोप झाले आणि धार्मिक दबावाने अयोध्या मध्ये मंदिरांचे कुलूप उघडले गेले. नंतर उन्मादी धार्मिक वातावरणात बाबरी पाडण्याचा पुढील प्रकार घडला गेला. न्यायालयाचे पक्षपाती निर्णय, संघाचे कट्टरवादी आक्रमण, काँग्रेसचा छुपा पाठिंबा आणि बेजबाबदारपणा यामुळे हे घडले गेले. वेगवेगळ्या भूमिका त्या विविध प्रकारे मांडत असतात.लव्ह जिहाद सारखा प्रकार अस्तित्वात नाही पण याबाबत जाणीवपूर्वक प्रोपागंडा निर्माण केला जातो.असत्याचा किलकिलाटा मध्ये सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. बहुमताची दहशत आज प्रचंड असून अल्पसंख्याक आवाज दाबले जात आहेत असे मत लेखक, प्राध्यापक अभिजित देशपांडे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे ” राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन गांधी भवन कोथरूड याठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये” सत्य असत्याशी मन केले ग्वाही  “या विषयावर लेखक आणि मराठी विषयाचे प्राध्यापक अभिजित देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.शिवाजीराव कदम, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी  चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन ,तेजस भालेराव, चिन्मय कदम उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, आज आपण अशा काळात जगतो जिथे सत्य आणि असत्य याची सरमिसळ केली जात आहे. संभ्रम निर्माण केला जाणाऱ्या वास्तवात आपण भागीदार आहे. संभ्रम संपविण्यासाठी आपली बुद्धी आणि विवेक जागृत ठेवणे आवश्यक आहे. बहुमतापेक्षा आपले म्हणणे वेगळे आहे सांगण्यासाठी विवेक जागृत असणे महत्त्वपूर्ण आहे. बहुमत शहाणपणाचे हवे पण सध्या ज्या बाजूला बहुमत आहे त्याच बाजूला सहज जाणे होत आहे.
वेगवगेळ्या झुंड समाजात तयार झाल्या असून त्याने सत्य दडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोनम वांगचुक हे साधी राज्याची गांधी मार्गाने मागणी करूनही त्यांच्यावर दडपशाही करण्यात येत आहे. बहुमत आधारे सरकार निवडून येतात पण आता समाजात वेगवेगळ्या टोळ्या बनवून जाणिवपूर्वक टोळ्यांचे राजकारण सुरू आहे. चिकित्सा जागृत ठेवून पुढे जाणे आवश्यक आहे.

पुढे ते म्हणाले, मी मूळचा परभणी मधील रहिवासी आहे.लहानपणी माझ्या घरी कट्टर हिंदुत्ववादी आणि धार्मिक वातावरण होते. त्याकाळी मी देखील अनेक ठिकाणी कीर्तन करत होतो. घरात संघाच्या कार्यकर्त्यांचा नेहमी वावर होता. परभणी मध्ये संघाची शहर जबाबदारी देखील मी स्वीकारली. त्याकाळी अयोध्या मधील रामजन्मभूमी आंदोलन सुरू होते. १९९० साली माझी आई आणि काका कारसेवा करण्यासाठी गेले होते.२ डिसेंबर १९९० रोजी मी देखील कारसेवा करण्यासाठी गेलो होतो.पुढे तीन दिवस आम्ही अयोध्या फिरलो. ६ डिसेंबर रोजी कारसेवा सुरू झाली. अनेक नेत्यांची भाषणे सुरू झाली. मी देखील ढाचा पर्यंत जाऊन पोहचलो.प्रत्यक्ष नियोजनरित्या सर्व काम विविध तुकड्या मध्ये सुरू होते,परंतु बांधकाम पाडणे उत्स्फूर्त प्रतिक्रिया नव्हती हे मला जाणवले.  नऊ डिसेंबर रोजी परभणीत आलो तेव्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली . त्यामुळे माझ्या मनात चुकीची भावना निर्माण झाली. गावातील चांगले वातावरण बिघडले होते. एक वर्षाने शिक्षणासाठी मी मुंबईत गेलो. ग्रंथालयात मी विविध पुस्तके वाचन केल्यावर धर्म, देश, संस्कृती बाबत अनेक गोष्टी समजल्या गेल्या.भारतीय संस्कृती केवळ वैदिक नसून ती व्यापक असल्याचे समजून आले. प्रश्नांचा गुंता देखील उलगडत होता. धार्मिक उन्माद यावर ” एक होता कारसेवक” असे एक पुस्तक मी त्याकाळी लिहिले. त्यातील गोष्ट अद्याप लागू होतात याची लेखक म्हणून मला लाज वाटते. धर्म व्यवस्था, राजकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि भांडवलशाही याच्या संगनमताने जो उन्माद सुरू तो चिंताजनक आहे.

डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले, आजचे लेखक यांनी समाजातील सद्यस्थिती बाबत परखड मत मांडले आहे. आजचे व्याख्यान देशातील वाटचाली बाबत ऊहापोह करणारे आहे. महात्मा गांधी यांनी जे सत्याचे प्रयोग तत्वे मांडले त्यादिशेने सर्वांनी जाणे महत्वपूर्ण आहे.असे ते शेवटी म्हणाले 

महिंद्राची नवीन बोलेरो आली

0

·   नवीन टॉप-एंड व्हेरिअंट – बोलेरो बीआणि बोलेरो निओ एन11

• एक्स-शोरूम किंमत: नवीन बोलेरो ₹ 7.99 – 9.69 लाख

नवीन बोलेरो निओ ₹ 8.49 – 9.99 लाख

नवीन बोलेरो

·   बोल्ड डिझाइन

o नवीन ग्रिल आणि फ्रंट फॉग लॅम्प

o डायमंड-कट R15 अलॉय व्हील्स

o रंगातही नवीन पर्याय – स्टील्थ ब्लॅक

·   आरामदायी प्रवास

o    लेदरेट अपहोल्स्ट्रीसह वाढत्या आरामासाठी नवीन सीट कॉन्टूर्स

o    नवीन 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि स्टीअरिंग-माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स

o    आरामदायी प्रवासासाठी आणि सोप्या हाताळणीसाठी राइडफ्लो टेक

नवीन बोलेरो निओ

·  आधुनिक शैली

o    आकर्षक आडव्या रेषांसह नवीन आकर्षक ग्रिल

o    डार्क मेटॅलिक ग्रे R16 अलॉय व्हील्स

o    नवीन रंगाचा पर्याय – जीन्स ब्लू, ड्युअल-टोन पर्यायांसह काँक्रीट ग्रे

·         स्मार्ट तंत्रज्ञानासह प्रीमियम आराम

o    इंटीरियर थीमचे दोन नवीन पर्याय – लुनर ग्रे, मोचा ब्राउन

o    लेदरेट अपहोल्स्ट्रीसह वाढलेल्या आरामासाठी नवीन सीट कॉन्टूर्स

o    रीअर-व्ह्यू कॅमेरासह 22.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट

o    स्मूथ, नियंत्रित ड्राइव्हसाठी MTV-CL आणि FDD सस्पेंशनसह राइडफ्लो टेक

मुंबई7 ऑक्टोबर 2025: भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज बोलेरोची नवीन श्रेणी सादर केली. नवीन बोलेरोची किंमत 7.99 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते तर नव्याने सादर केलेल्या टॉप-एंड B8 प्रकाराची किंमत 9.69 लाख (एक्स-शोरूम) आहे. नवीन बोलेरो निओची किंमत 8.49 लाखांपासून (एक्स-शोरूम)आणि नवीन टॉप-एंड प्रकार N11 ची किंमत 9.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. या लाँचसहबोलेरो श्रेणी सौंदर्यशास्त्रअधिक आरामदायी प्रवास आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह तिचे आकर्षण कायम ठेवते आहे.

25 वर्षांचा वारसा आणि 16 लाखांहून अधिक समाधानी ग्राहकांसह, बोलेरो ही एक वैविध्यपूर्ण एसयूव्ही आहे. शहरातील गजबजलेल्या रस्त्यांपासून ते खडकाळ ग्रामीण लँडस्केपपर्यंत विविध भूप्रदेशांमध्ये तिचा वावर सहज असतो. कारण, कोणत्याही भूप्रदेशांत सहज ऍडजस्ट होईल अशी तिची अनुकूलता आहे. आणि यामुळेच ती ग्राहकांसाठी मौल्यवान आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “काळाच्या कसोटीवर बोलेरोने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळेच 25 वर्षांहून अधिक काळ भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि मजबूत एसयूव्हींपैकी एक म्हणून तिने आपले स्थान निश्चित केले आहे. या चिरस्थायी वारशाच्या पायावर नवीन बोलेरो गतिमान आणि वेगाने विकसित होणाऱ्या नवीन भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन केली गेली आहे. कणखरपणाआधुनिक रचनावाढीव आराम आणि आधुनिक वैशिष्ट्यांचे परिपूर्ण मिश्रण असलेली नवीन बोलेरो आणि बोलेरो निओ एक शक्तिशाली अनुभव देतातजो शहरातील रस्त्यांवर आणि आव्हानात्मक भौगोलिक प्रदेशांमध्ये देखील सारखाच असतो.”

नवीन बोलेरो

नवीन बोलेरोमध्ये वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनआधुनिक वैशिष्ट्ये आणि वाढीव आराम यांचा उत्तम मिलाफ आहे. नवीन बोल्ड ग्रिलफॉग लॅम्प आणि डायमंड-कट अलॉय व्हील्ससहबोलेरो भारतातील मजबूत आणि विश्वासार्ह एसयूव्ही म्हणून ओळखली जाते. अधिक मजबूत आणि स्टायलिशआराम आणि विश्वासार्हतेसह मजबूत वाहनाला महत्त्व देणाऱ्यांसाठी ती आदर्श आहे. ग्रामीण तरुणउद्योजक आणि कुटुंबांसाठी बोलेरो हा एक विश्वासार्ह पर्याय आहेजी यश आणि अभिमानाचे प्रतीक आहे.

बोलेरोमध्ये नवीन 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि म्युझिक सिस्टम, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि वाढीव सीट आरामासह लेदरेट अपहोल्स्ट्री आहे. प्रगत राइड आणि हँडलिंग तंत्रज्ञान – राइडफ्लो – कोणत्याही भूप्रदेशासाठी डिझाइन केलेले सुधारित सस्पेंशन आर्किटेक्चरसह वाढीव स्थिरता आणि नियंत्रण प्रदान करते. बोलेरोचा मूळ डीएनए अपरिवर्तित आणि अखंड राहतो, mHAWK75 इंजिनद्वारे समर्थित आहे. बॉडी-ऑन-फ्रेम बांधकामासह 55.9 kW ची शक्ती आणि 210 Nm टॉर्क प्रदान करते. नव्याने देण्यात आलेल्या रंगांमध्ये विद्यमान डायमंड व्हाइट, DSAT सिल्व्हर आणि रॉकी बेजसह स्टील्थ ब्लॅकचा समावेश आहे.

 

नवीन बोलेरो निओ

नवीन बोलेरो निओमध्ये मजबुती आणि शहरी अत्याधुनिकता यांचा उत्तम मेळ आहे. आधुनिक सोयीसुविधा तसेच क्षमता असलेले कणखर आणि व्यावहारिक वाहनाच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ते योग्य आहे. आकर्षक आडव्या रेषा आणि डार्क मेटॅलिक ग्रे R16 अलॉय व्हील्समुळे नवीन ग्रिल बोलेरो निओ अधिक आकर्षक वाटते आणि तिला इतरांपासून वेगळे ठरवते. यात दोन नवीन इंटीरियर थीम पर्याय आहेत – लुनर ग्रे आणि मोचा ब्राउन – जे या गाडीचा एकूणच लूक अधिक आकर्षक करतात. तरुण, महत्त्वाकांक्षी शहरी आणि निम शहरी ग्राहकांसाठी बोलेरो निओ हा उत्तम पर्याय आहे, जे प्रगत तंत्रज्ञान, समकालीन स्टाइल तसेच आरामदायी प्रवासाच्या शोधात आहेत. आरामदायी प्रवास आणि अन्य सुविधा असल्या तरी यात बोलेरोचा मजबूत डीएनए कायम आहे.

लेदरेट अपहोल्स्ट्री आणि सुधारित सीट एर्गोनॉमिक्ससह आरामदायीपणाला प्राधान्य दिले जाते. 22.8 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये रिअर-व्ह्यू कॅमेरा आणि यूएसबी सी-टाइप चार्जिंग पोर्ट आहे. प्रगत राइड आणि हँडलिंग टेक – राइडफ्लो – एमटीव्ही-सीएल आणि फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पिंगमुळे (एफडीडी) खडकाळ रस्त्यांवरही सुरळीत प्रवास सुनिश्चित होतो. याशिवाय सुधारित स्टीअरिंग फीडबॅक, हाताळणीतील अचूक आणि सुधारित ब्रेक डायनॅमिक्स अशा वैशिष्ट्यांचा देखील चालवताना फायदा होतो. 73.5 किलोवॅटची शक्ती आणि 260 एनएम टॉर्क तसेच mHAWK100 इंजिनद्वारे समर्थित बोलेरो निओमध्ये लॉकिंग डिफरेंशियलमुळे खडकाळ रस्त्यांवरील वाढत्या ट्रॅक्शनसाठी क्रूझ कंट्रोल आणि मल्टी-टेरेन टेक्नॉलॉजी (एमटीटी) समाविष्ट आहे. सध्या असलेल्या डायमंड व्हाइट, स्टील्थ ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि रॉकी बेज या रंगांसह जीन्स ब्लू, काँक्रीट ग्रे आणि तीन ड्युअल-टोन पर्याय नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

 

किंमत आणि प्रकार
नवीन बोलेरो (एक्स-शोरूम) नवीन बोलेरो निओ (एक्स-शोरूम)
प्रकारकिंमतप्रकारकिंमत
बोलेरो B4₹ 7.99 लाखबोलेरो निओ N4₹ 8.49 लाख
बोलेरो B6₹ 8.69 लाखबोलेरो निओ N8₹ 9.29 लाख
बोलेरो B6(O)₹ 9.09 लाखबोलेरो निओ N10*₹ 9.79 लाख
बोलेरो B8₹ 9.69 लाखबोलेरो निओ N11₹ 9.99 लाख

* N 10 पर्यायी प्रकार वेगळ्या किमतीत उपलब्ध. अधिकृत महिंद्र डीलरशिपवर संपूर्ण माहिती मिळेल.

परिशिष्ट

नवीन बोलेरो – प्रमुख वैशिष्ट्ये

B4B6B8 (new variant)
·         अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)·         ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर एअरबॅग्ज·         रिव्हर्स पार्किंग सेन्सर·         सीट बेल्ट रिमाइंडर(समोरील सीट्स)·         स्पेअर व्हील कव्हर·         पॉवर स्टीअरिंग·         इंजिन स्टार्ट-स्टॉप(मायक्रो हायब्रिड)·         डिजिटल क्लस्टर·         7-सीट (व्हिनाइल)·         तिसऱ्या रांगेतील फोल्ड करण्यायोग्य सीट नवीन भर·         बोल्ड नवीन ग्रिल·         नवीन रंग (स्टील्थ ब्लॅक)·         राइडफ्लो टेक B4 च्या वैशिष्ट्यांसोबतच·         पॉवर विंडोज·         रिमोटसह चावी·         7-सीट (फॅब्रिक)·         12 व्ही चार्जिंग पॉइंट·         सेंट्रल लॉकिंग नवीन भर·         डीप सिल्व्हर व्हील कॅप्स·         17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम·         स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स·         यूएसबी सी-टाइप चार्जिंग पोर्ट B6(O) च्या वैशिष्ट्यांसोबतच ·         डायमंड कट अलॉय व्हील्स·         लेदरेट अपहोल्स्ट्री 
B6 (O)
B6 च्या वैशिष्ट्यांसोबतच·         स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प·         ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम·         रीअर वॉश आणि वायपर नवीन भरसमोरील फॉग लॅम्प्स

नवीन बोलेरो निओ – प्रमुख वैशिष्ट्ये

N4N10N11 (new variant)
·         बॉडी कलर बंपर्स·         एक्स-शेप स्पेअर व्हील कव्हर·         8.9 सेमी एलसीडी क्लस्टर डिस्प्ले·         7-सीट (व्हिनाइल)·         तिसऱ्या रांगेत फोल्ड करण्यायोग्य सीट·         इको मोड·         पॉवर स्टीअरिंग·         पॉवर विंडो फ्रंट आणि रियर·         इंजिन स्टार्ट-स्टॉप (मायक्रो हायब्रिड)·         12 व्ही चार्जिंग पॉइंट·         ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर एअरबॅग्ज·         एबीएस + ईबीडी·         कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल·         फोल्ड करण्यायोग्य तिसऱ्या रांगेतील सीट नवीन भर·         आकर्षक नवीन ग्रिल·         नवीन रंग (काँक्रीट ग्रे)·         नवीन इंटीरियर थीम(मोचा ब्राउन)·         राइडफ्लो टेक N8 च्या वैशिष्ट्यांसोबतच·         स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प·         हेडलॅम्पमध्ये DRL·         फॉग लॅम्प·         फ्रंट आर्मरेस्ट·         दुसऱ्या रांगेत आर्मरेस्ट·         ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट·         22.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम·         क्रूझ कंट्रोल·         इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल ORVM·         फॉलो मी होम हेडलॅम्प·         रियर ग्लास वायपर आणि डिफॉगर·         चाइल्ड सीटसाठी ISOFIX माउंट्स नवीन भर·         R15 सिल्व्हर अलॉय व्हील्स·         रियर व्ह्यू कॅमेरा·         USB C-प्रकार चार्जिंग पोर्ट N 10 (O) – मल्टी-टेरेन टेक्नॉलॉजी (MTT) सह  N10 च्या वैशिष्ट्यांसोबतच ·         ड्युअल टोन कलर·         R16 डार्क मेटॅलिक ग्रे अलॉय व्हील्स·         नवीन इंटीरियर थीम(लुनर ग्रे)·         लेदरेट अपहोल्स्ट्री (लुनर ग्रे) 
N8
N4 च्या वैशिष्ट्यांसोबतच·         व्हील आर्च क्लॅडिंग·         ड्युअल टोन ORVM·         7-सीट (फॅब्रिक)·         फोल्ड करण्यायोग्य दुसऱ्या रांगेतील सीट·         म्युझिक प्लेअर(ब्लूटूथ, USB, AUX)·         स्टीअरिंग माउंटेड ऑडिओकंट्रोल्स·         रिमोट की एंट्री·         व्हर्सा व्हील नवीन भर·         नवीन रंग (जीन्स ब्लू)

वीज यंत्रणेचे ‘एआय’ आधारित डिजिटायझेशन; महावितरण व ‘जीईएपीपी’मध्ये सामंजस्य करार

वीज वितरण यंत्रणेच्या कार्यक्षमतेच्या वाढीसह विविध फायदे

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर २०२५: वीज वितरण यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपकेंद्र, वीजवाहिन्या, रोहित्र आदींचे आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या आधारे डिजिटायझेशन करण्यासाठी महावितरण आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट (जीईएपीपी, भारत) कंपनी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र आणि ‘जीईएपीपी’चे उपाध्यक्ष (भारत) श्री. सौरभ कुमार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरणची कार्यक्षमता वाढविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वीज यंत्रणेचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वीज क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा नवा मानदंड ठरणाऱ्या या डिजिटायझेशनसाठी मुंबई येथील सांघिक कार्यालयात मंगळवारी (दि. ७) सामंजस्य करार झाला. यावेळी महावितरणचे संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (वाणिज्य) श्री. योगेश गडकरी, कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर यांची उपस्थिती होती.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, डिजिटायझेशनच्या माध्यमातून वीज यंत्रणेच्या व्यवस्थापनात आणखी अचूकता येईल. त्याआधारे महावितरणची आर्थिक व वीजहानी कमी करण्यासोबतच ग्राहकांना तत्पर व दर्जेदार वीजपुरवठा करता येईल. यासह हरित ऊर्जेचा वापर व वीज यंत्रणेचे जाळे भक्कम करण्यासाठीही हे डिजिटायझेशन अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. यावेळी ‘जीईएपीपी’चे उपाध्यक्ष श्री. सौरभ कुमार म्हणाले की, महावितरणच्या वीज यंत्रणेचे डिजिटायझेशन व त्या माध्यमातून मिळणारे विविध फायदे देशातील इतर वीज कंपन्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

या सामंजस्य करारानुसार ‘जीईएपीपी’कडून महावितरणच्या राज्यभरातील वीज वितरण यंत्रणेच्या डिजिटायझेशनसाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्स व मशीन लर्निंगचा आधार घेतला जाणार आहे. या डिजिटायझेशनमुळे वीज वितरणाच्या सर्व यंत्रणेचे व्यवस्थापन आणखी अचूक होईल. वीजहानी कमी होईल. वीज खरेदीची संभाव्य अचूक गरज कळेल. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत तसेच भार व्यवस्थापन किंवा अतिभारित यंत्रणा आदींबाबत रिअल टाइम विश्लेषणात्मक माहिती उपलब्ध होणार आहे. त्याआधारे दर्जेदार वीजसेवा व वीजपुरवठ्यासाठी आणखी प्रभावीपणे यंत्रणेचे व्यवस्थापन करता येणार आहे.    

शासन पुरस्कृत धर्मांध शक्ती आता थेट न्यायपालिकेवर हल्ला करू लागली- जगताप

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पुणे-सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसने येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.यावेळी जगताप म्हणाले,’भारताचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे सुपुत्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे न्या. बी.आर. गवई यांच्यावर न्यायालयात झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे.शासन पुरस्कृत धर्मांध शक्तींना मिळालेली मोकळीक आता थेट न्यायपालिकेवर हल्ला करत आहेत. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून भारताच्या सामाजिक समतेवर, संविधानावर झालेला हल्ला आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी
या आंदोलनाच्या माध्यमातून धर्मांध शक्तींना बळ देणाऱ्या व संविधानिक मूल्यांना कमकुवत करणाऱ्या सरकारचा, सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर यायलाच हवे कारण हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरील नसून, हा संविधानावर झालेला हल्ला आहे, हा देशाच्या सामाजिक समतेवर झालेला हल्ला आहे, दलित समाजावर धर्मांध शक्तीने केलेला हल्ला आहे.” अशी प्रतिक्रियाही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षना सलगर, पंडीत कांबळे, मनाली भिलारे, भगवानराव साळुंखे, lसुनील माने, किशोर कांबळे, आशा साने, पांडुरंग लव्हे, अजिंक्य पालकर, गणेश नलावडे, शैलेंद्र बेल्हेकर, मजहर माणियार, लखन वाघमारे, अर्जुन गांजे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवाजाचे फटके उडविण्यास बंदी – १०० पेक्षा जास्त फटाक्यांच्या माळांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी

पुणे- रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवाजाचे फटके उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे तसेच १०० पेक्षा जास्त फटाक्यांच्या माळांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज येथे स्पष्ट केले आहे.

आज त्यांनी माध्यमांना कळविले आहे कि,’दिवाळी सणानिमित्त दरवर्षी तात्पुरते फटाके विक्री परवाने या कार्यालयाकडून देण्यात येतात. फटाके विक्री करतेवेळी व फटाके वाजवितेवेळी कोणताही धोका अथवा अपघात होऊ नये यासाठी कायद्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद असून त्याप्रमाणे नागरीकांनी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
१. महाराष्ट्र शस्त्र अधिनियम (१५४) (३) अन्वये सरकारने कागदात स्फोटक पदार्थ ठेवलेले व त्याभोवती ४२.५३४ ग्रॅम वजनाचा ५.७१५ सेंटीमिटर लांबीचा व ३.१७५ सेंटीमिटर व्यासाचा दो-याने गुंडाळलेला अॅटमबॉम्ब म्हणून ओळखल्या जाणा-या फटाकांच्या उत्पादनावर जवळ बाळगणा-यावर आणि निबंद घालण्यात आले आहेत.
२. फटाके परवाने दिनांक २७०/१०/२०२५ ते २४/१०/२०२५ पर्यंतदेण्यात येणार आहेत. मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेची दारु विक्री करता येणार नाही. तसेच शिल्लक राहिलेले फटाके अथवा साठा हा परवाना असलेल्या गोदामामध्ये किंवा घाऊक परवाना धारण करणा-याकडे परत करणे आवश्यक आहे.
३. पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्रामध्ये कोणत्याही रस्यात किंवा रस्यांपासून १० मीटर अंतराचे आत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ पोट कलम ३३ यु मधील तरतुदी नुसार कोणत्याही प्रकारची शोभेची दारु अगर कोणत्याही नावाने ओळखले जाणारे फटाके फेकणे, सोडणे, उडविणे, अगर फायर बलून किंवा अग्निबाण उडविणे ही कृत्ये करण्यास मनाई आहे. सदर कलम २ चे पोट कलम १५ अन्वये रस्यांत कोणत्याही महामार्ग/पूल सेतू मार्गावर नेमलेले मार्ग, सेतू कमानीवजा घाट, धक्का किवा कोणताही आळी किंवा वाट मग ती रहदारीची असो अथवा नसो याचा समावेश होतो. या आदेशाचे उल्लंघन जी व्यक्ती करेल ती. वरील कायदयान्वये (कलम१३१ (ए) (1)) कायेशीर कारवाईस पात्र ठरेल.
४. मा. सर्वोच्च न्यायालयाने याचीका क्रमांक ७२/१९९८ मध्ये दिनांक २७/०९/२००१ रोजी सुमावणीच्या दरम्यान दसरा, दिवाळी, व इतर सणांच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदूषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके बाजविण्यावर निर्बंध घालणे बाबत अंतरिम आदेश दिलेले आहेत. त्या नुसार व सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषणाबाबतचे निर्देश दिनांक १८/०७/२००५ नुसार.
अ) केंद्र शासन, केंद्र शासित प्रदेश आणि राज्य शासन यांनी भारत सरकारच्या राजपत्र क्रमांक जीएसआर ६८२-इंदिनांक ०५/१०/१९९९ नुसार प्रकाशित केलेल्या पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अंतर्गत पर्यावरण (संरक्षण) नियमातील तरतुदीची मुख्यत्वे करुन या नियमातील सुधारीत नियम ८९ ची ज्या फटाक्यांच्या आवाजांच्या मार्नका बाबत आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यानुसार,
1) एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसीबल आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.
ii) जर सखाली फटाका ५० ते १०० तसेच १०० व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ०४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमें ११५/११० व १०५ डेसीबल एवढी असावी. यापेक्षा जास्त आवज निर्माण करणा-या तसेच १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाका उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे

ब) ध्वनी निर्माण करुन आवाजाचे प्रक्षण करणा-या फटाक्यांवर रात्री १०.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत संपूर्ण बंदी घालण्यात येत आहे. परंतु जे फटाके विविध रंग निर्माण करतात किंवा सोडतात किंवा आवाज करित नाहीत अश्या फटाक्यांवर निर्बंध नाही.
क) शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्याचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ नये. शांतता प्रभागामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवातालचे १०० मीटर पर्यतचे क्षेत्र येते.
५. पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटन, नागपूर यांचेकडील परिपत्रक क्र.आर-४ (२) १८३/सी.सी. १९४/२०१५, दिनांक १५/१२/२०१५ अन्वये परवानाधारक यांनी विदेशी मुळ फटाके विक्री करु नये अशा सूचना दिलेल्या आहेत.
६. ज्या ठिकाणी तात्पुरत्या फटाका स्टॉलकरिता परवानगी देण्यात आली आहे त्या ठिकाणी ५० मिटरच्या परिसरात संयुक्त नियंत्रक, विस्फोटके, मुंबई यांचेकडील अधिसूचना क्रमांक जीएसआर-६८७ (इ) दिनांक २७/०९/१९८४ मधील परि क्र.५ अन्वये फटाक्यांची आतिषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
तरी, वरील नियमाचे काटेकोरपणे पालन करुन कोणताही अपघात अथवा धोका होणार नाही याबाबत कृपया नागरिकांनी दक्षता घ्यावी. असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, महायुती सरकारने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले: हर्षवर्धन सपकाळ

अदानीला घाबरून पंतप्रधानांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देणे टाळले,विमानतळ उद्घाटनानंतर नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी करणार का?

पनवेलमध्ये ‘कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर २०२५’ कार्यक्रम संपन्न.

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर २०२५

अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसानभरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असून उद्ध्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका करून सरकारने सरसकट नुकसानग्रस्त शेतक-यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी व आश्वासन पाळून कर्जमाफी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज पनवेल येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत संविधान संवाद यात्रा काढण्यात आली. त्यानंतर पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित ‘कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर २०२५’ या कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र आबा दळवी, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, पनवेल काँग्रेसचे प्रभारी व वरिष्ठ प्रवक्ते गोपाल तिवारी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आर. सी. घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव श्रुती म्हात्रे, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल शहर युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, मा. नगरसेवक हरेश केणी, पनवेल अर्बन बँक संचालक जनार्दन पाटील, शाहीर संभाजी भगत तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यातील ३० जिल्ह्यातील जवळपास ३०० तालुक्यात अतिवृष्टी व महापूराने थौमान घातले आहे. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करावी अशी मागणी केलेली असताना सरकारने मात्र शेतकऱ्यांना वाटाण्याचा अक्षता लावल्या आहेत. अदानी अंबानींच्या फाईलवर कसलाही विचार न करता तात्काळ सह्या करणारे शेतकऱ्यांना भरीव मदत देताना मात्र त्यांच्या हाताला कंप मारतो काय?, असा संतप्त सवाल सपकाळ करून हे सरकार शेतकरी व गोरगरिब जनतेचे नसून फक्त मुठभर धनदांडग्यांसाठी आहे हे पुन्हा दिसून आले आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधान नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार का..
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येत असून नवी मुंबई विमानतळाचे ते उद्घाटन करणार आहेत. या विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे पण सरकारने अद्याप नाव दिले नाही. अदानीला घाबरून दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले असताना देशाच्या पंतप्रधानांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही, नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी ते करतील काय?, असा सवाल करून केवळ श्रेय घेण्याच्या कामासाठीच पंतप्रधान पुढे येतात पण संकटातील लोकांसाठी येत नाहीत, असेही सपकाळ म्हणाले.

राहुल गांधींबद्दलचे शब्द अयोग्य…
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेले शब्द अयोग्य आहेत. राहुल गांधी यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठीच जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी आग्रही मागणी केलेली आहे. काँग्रेस पक्षानेच सर्वात पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आताही सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. पण निवडणुकीच्या तोंडावरच आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो कसा? असा प्रश्नही सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच पनवेल शहरातील विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

सरन्यायधीश भूषण गवई यांचा अवमान सहन केला जाणार नाही — रमेश बागवे

मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निषेध
पुणे- सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला सहन केला जाणार नाही .केंद्र सरकारने तत्काळ त्या दोषी व्यक्तीवर कारवाई करावी अन्यथा मातंग एकता आंदोलनाच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलनात उभा करणार असल्याचा इशारा मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी दिला आहे .

भारत देशाचे सरन्यायधीश भूषण गवई यांच्यावर काल एका माथेफिरूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध म्हणून आज पुण्यात तीव्र निषेध करून जाहीर निषेध सभा आयोजित केली होती .
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हा हल्ला म्हणजे भारतीय संविधानावरील हल्ला आहे .या हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध गरजेचे आहे .अशा लोकांमुळे भारत देशाची एकात्मता धोक्यात येऊ शकते त्यामुळे सदर व्यक्तीला व त्यामागील सूत्रधारास कडक कारवाई झाली पाहिजे असे यावेळी रमेश बागवे म्हणाले .
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करून सदर व्यक्तीवर
कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली .
यावेळी सरन्याधीश भूषण गवई यांच्या हल्ल्याचा निषेध करून मातंग एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाचे व निषेध सभेचे आयोजन मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले होते .यावेळी अरुण गायकवाड सरचिटणीस महाराष्ट्र,महेंद्र कांबळे रिपब्लिकन पार्टी पुणे शहर,विठ्ठल थोरात मातंग एकता आंदोलन समन्वयक महाराष्ट्र राज्य,रिपाईचे माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे ,फुरशीदभाई शेख रवी पाटोळे,बाबासाहेब भालेराव ,इस्माईल शेख ,,दयानंद अडागळे सादिक लुकडे,बबलू सय्यद उपाध्यक्ष पुणे शहर ,राजश्रीताई अडसूळ,महिला अध्यक्ष पुणे शहर,सुरेखा खंडाळे अध्यक्ष महिला आघाडी पुणे शहर व पुणे शहरातील व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

पुणे पत्रकार प्रतिष्ठानकडून पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजारांची मदत

  • जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे धनादेश सुपूर्द

पुणे-
मराठवाड्यासह सोलापूर, नांदेड अन्य जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने ५१ हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली आहे.जेष्ठ पत्रकार उमेश शेळके
यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मदतींचा धनादेश करण्यात सुपूर्द करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने सोलापूर, मराठवाडा, नांदेड अशा अनेक भागात मोठी हानी झाली आहे. जीवित व वित्तहानी मुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरग्रस्ताना संघटनेच्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशाने पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. यापूर्वी राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या कालावधीत पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली होती.
दरम्यान सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पुणे पत्रकार प्रतिष्ठानने केलेल्या मदतीबद्दल जिल्हाधिकारी डुडी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, खजिनदार सुनीत भावे, विश्वस्त राजेंद्र पाटील, ,मुस्तफा अत्तार, गजानन शुक्ला आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अखेर तिजोरी उघडली:31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

मुंबई-राज्य सरकारच्या मदती कडे आस लावून बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने अखेर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा जास्तीत जास्त पैसा दिवाळीच्या आधी, शेतकऱ्यांना देता येईल, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.

राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती, घरे आणि जनावरांचे नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली असून, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन पाण्यात वाहून गेली आहे, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदतीचं मोठे पॅकेज जाहीर केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शेतकरी, जनावरे आणि घरमालकांना मिळणार थेट मदत

या पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ जमिनीच्या नुकसानी साठीच नव्हे, तर घरांचे व जनावरांचे नुकसान भरपाई म्हणूनही मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान, वाहून गेलेली जमीन, कोसळलेली घरे आणि मृत जनावरे यासाठी स्वतंत्र अनुदानाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामपंचायत आणि महसूल यंत्रणेकडून पंचनामे पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा शेती उभी करण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

29 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत

फडणवीस म्हणाले की, राज्यातील 1 कोटी 43 लाख 52 हजार हेक्टर जमिनीवर यंदा लागवड झाली होती. त्यापैकी 68 लाख 79 हजार 756 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने तत्काळ मदत कार्याला गती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ज्या भागात नुकसान झाले आहे, तिथे 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 महसूल मंडळांचा समावेश आहे. त्या सर्व भागात मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पुढच्या रब्बी हंगामावरही परिणाम

अतिवृष्टीमुळे केवळ खरीप पिकांचेच नव्हे तर येणाऱ्या रब्बी हंगामाच्याही उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणी जमीनच खरडून गेल्याने शेतकऱ्यांना पुढील काही महिन्यांत पिके घेता येणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी विशेष योजना

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारकडून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर पीक पुनर्लागवड, बी-बियाणे वितरण, सवलतीचे कर्ज आणि कृषी यंत्रसामग्री पुरवठा अशा सर्व बाबींसाठी विशेष योजना सुरू करण्यात येतील. याशिवाय, जिल्हा प्रशासन आणि कृषी खात्याच्या माध्यमातून पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम जमा करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना सरकारकडून पूर्ण मदत मिळेल

राज्य सरकारकडून नुकतंच 31 हजार कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीस म्हणाले, ही मदत ही केवळ आर्थिक आधार नाही, तर शेतकऱ्यांना पुन्हा आयुष्य उभं करण्याचा संकल्प आहे. कोणत्याही शेतकऱ्याला निराश होऊ देणार नाही.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत

राज्यभर 1 कोटी 43 लाख 52 हजार हेक्टर लागवड.
त्यापैकी 68 लाख 69 हजार 756 हेक्टर शेतीचं नुकसान.
एकूण 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 मंडळांतील शेतकरी या योजनेत लाभार्थी.
65 मिमी पावसाची अट ठेवलेली नाही; सर्व नुकसानग्रस्तांना मदत लागू.
पीकनुकसान भरपाईसाठी 6175 कोटींची तरतूद.
पीकनुकसान भरपाई दर

कोरडवाहू शेती – ₹18,500 ते ₹35,000
हंगामी बागायती शेती – ₹27,000
बागायती शेती – ₹32,500
रब्बी पिकांसाठी – अतिरिक्त ₹10,000
विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना – ₹17,000 प्रती हेक्टर
विमा उतरवलेल्या 45 लाख शेतकऱ्यांना – संपूर्ण नुकसानीसाठी भरपाई लागू
पशुधन आणि कुक्कुटपालन मदत

दुधाळ जनावरांना – ₹37,500 प्रती जनावर
ओढकाम करणाऱ्या जनावरांना – ₹32,000 प्रती जनावर
कुक्कुटपालनासाठी – ₹100 प्रती कोंबडी
एनडीआरएफमधील 3 जनावरांची मर्यादा रद्द, सर्व जनावरांसाठी मदत लागू
घरं, दुकाने आणि इतर पायाभूत मदत

पूर्णतः पडझड झालेली घरं – प्रधानमंत्री आवास योजनेत नवं घर समजून पूर्ण अनुदान
अंशतः पडझड झालेली घरं – प्रमाणानुसार मदत
डोंगरी भागातील घरांसाठी – ₹10,000 अतिरिक्त मदत
दुकान / व्यवसाय नुकसानीसाठी – ₹50,000 मदत
गोठ्यांच्या नुकसानीसाठी – ₹50,000 मदत
इतर विशेष तरतुदी

गाळ भरलेल्या विहिरींसाठी – ₹30,000 प्रती विहीर
खरडून गेलेल्या जमिनींसाठी – ₹47,000 प्रती हेक्टर रोख + ₹3 लाख हेक्टरी नरेगा अंतर्गत मदत
पायाभूत सुविधांच्या नुकसानीसाठी – ₹10,000 कोटींची तरतूद
ओला दुष्काळ म्हणून मदतीचा दर्जा

महसुलात सूट
कर्ज पुनर्गठन
शेतीशी निगडीत कर्ज वसुली स्थगित
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी
इतर दुष्काळसदृश सर्व सवलती लागू

शिवसेना कुणाची? :बुधवारी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी; धनुष्यबाण कोणाकडे राहणार? याकडे राज्याचे लक्ष

मुंबई- ‘खरी शिवसेना कुणाची?’ या ऐतिहासिक प्रश्नावर उद्या म्हणजेच बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी पार पडणार आहे. गेली तीन वर्षे चालत असलेल्या या वादावर अखेर उद्या न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम युक्तिवाद होणार असून, त्यानंतर न्यायालय आपला निकाल राखून ठेवेल किंवा तत्काळ जाहीर करेल हे पहावे लागणार आहे. या सुनावणीकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये शिवसेनेच्या नाव आणि पारंपरिक ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद गेली तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. शिवसेनेत 2022 मध्ये मोठी बंडखोरी झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या या आदेशांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले होते. या प्रकरणात अनेक प्राथमिक सुनावण्या झाल्या असून, उद्या होणारी सुनावणी ही अंतिम टप्प्यातील निर्णायक कार्यवाही मानली जात आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंकडून सविस्तर युक्तिवाद पूर्ण झाले असून, उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.

या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे यांनी मोदी आणि शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. दिनांक 8 ऑक्टोबरला न्यायाधीश सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांधून तयार नसलेल्या विमानतळाचे नवी मुंबईत दिखाऊ उद्घाटन करणार आणि त्याचवेळी संविधानासोबत अनैतिकता करून सत्तेच्या हवेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का? लवकरच कळेल असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.


दरम्यान, उद्धव ठाकरे गटाने जुलै महिन्यातच न्यायालयात याचिका दाखल करून “शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादावर लवकर निर्णय द्या” अशी मागणी केली होती. त्यावर त्यावर 14 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी करताना न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील असं सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले होते. मात्र राष्ट्रपती-राज्यपाल वादातील खटल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली. आता उद्या आता न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर हा खटला अंतिम निर्णयासाठी येत आहे.

गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चीट, म्हणाले ‘ ती मोटारीत नव्हतीच

गौतमीचा ड्रायव्हर स्वतःच गाडी चालवत होता -सहप्रवाशाचा किंवा मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींना सहआरोपी करा अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही-पुणे पोलीस

पुणे-पुण्यातील नवले उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघात प्रकरणात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला अखेर पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. अपघाताच्या वेळी ती स्वतः त्या गाडीत नव्हती हे पोलिस तपासात स्पष्ट झाले असे पोलिसांनी सांगितले आहे . पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर गौतमी पाटीलचा या अपघाताशी प्रत्यक्ष संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिच्यावर कोणतीही गुन्हेगारी जबाबदारी येत नाही, असा निष्कर्ष तपास अधिकाऱ्यांनी काढला आहे.

नवले पुल परिसरात गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने रोडवर उभ्या असणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली होती. 30 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या भीषण अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात ठिय्या देत, गौतमी पाटीलविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. “सेलिब्रिटी असल्याने पोलिसांकडून चालढकल होते आहे,” असा आरोपही त्यांनी केला होता.

कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील डीसीपींना फोन करून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अपघाताच्या तपासासाठी विशेष अधिकाऱ्याची देखील नेमणूक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलला पोलिसांनी नोटीसही बजावली होती. मात्र, तपास जसजसा पुढे गेला, तसतसे वेगळे चित्र समोर आले. पोलिसांनी अपघाताच्या परिसरातील तब्बल 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात अपघातावेळी गाडीत फक्त चालकच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच पोलिसांनी गौतमी पाटील निर्दोष असल्याचे सांगत तिला क्लीन चिट दिली.

या अपघाताबाबत माहिती देताना डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले की, अपघातातील कार ही गौतमी पाटीलच्या नावावर आहे. गाडीचे काही पेपर्स आपल्याला इन्शुरन्ससाठी लागतात, त्यामुळे हे डिटेल्स मिळवण्यासाठी कदाचित कोथरूड पोलिस ठाण्याकडून गौतमी पाटीलला पत्र पाठवलं असेल. चौकशीसाठी संबंधित व्यक्तीची गरज असेलच तर पोलिस अधिकारी तिला बोलावू शकतात. पण जर पोलिसांकडे आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आली तर संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी बोलावण्याची गरज पडत नाही. पण जर गरज भासलीच तर भविष्यातही तपास अधिकारी त्यांना बोलावू शकतात.

जेव्हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळाचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यानुसार गौतमीचा ड्रायव्हर स्वतःच गाडी चालवत होता हे निष्पन्न झाले. अपघातावेळी गौतमी पाटील प्रत्यक्ष गाडीत असल्याचे प्राथमिकदृष्टया दिसत नाही. पण जरी असली तरी हा अपघाताचा प्रकार आहे. यामध्ये ड्रायव्हरने जर गुन्हा केला, तर कायद्यानुसार गाडीत बसलेल्या सहप्रवाशाचा किंवा मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींना सहआरोपी करा अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही. अपघाताच्या गुन्ह्यात गंभीर अपघातप्रकरणी शिक्षाच 3 वर्षांपेक्षा खाली असते, त्यामुळे त्यामध्ये अटकेचा विषयच येत नाही, असेही डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले.

रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांच्या आरोपांवर काय म्हणाले पोलिस? पहिल्या दिवसापासून तपास पारदर्शीप्रमाणे होत आहे. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 5 ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना वडगाव पुलाच्या सर्व्हिस रोडला झाली आहे. यामध्ये तपासात जो आरोपी निष्पन्न झाला त्याचा लोकेशनवरील सीसीटीव्ही फुटेज किंवा सीडीआर लोकेशन असतील या सर्व गोष्टीवरुन फिर्याद दाखल केली आहे. रिक्षावाल्याच्या सहकाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन त्याच दिवशी त्यांची फिर्याद आपण घेतली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे, असे डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

धनगरांनी सामाजिक व राजकीय ओळख प्रस्थापित करावी लढवय्या धनगर समाजाने ‘ओबीसी’चे नेतृत्व करावे

पुणे : धनगर समाज लढवय्या, इतिहासात त्यांची नोंद राज्यकर्ता अशी आहे. समाजाने आपला इतिहास समजून घेत होळकरांनी दिलेली शिकवण अंगीकारत लढवय्यापण दाखवायला हवे. समाजाची सामाजिक व राजकीय ओळख प्रस्थापित करायला हवी. सत्तालोलुप राजकारण्यांनी धनगरांचा, ओबीसींचा वापर करून सत्ता मिळवली आणि तुम्हाला प्रवाहाबाहेर फेकले. आरक्षण हा उन्नतीचा मार्ग असून, तो सुरक्षित ठेवायचा असेल, तर धनगरांनी सर्व ओबीसी समाजाला एकत्रित करून त्यांचे नेतृत्व करावे. आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवादी समूहांची सत्ता आपल्याला आणायची आहे. त्यासाठी सर्वानी एकजूट व्हा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यापुढे माझे मत ओबीसी, आरक्षणवादी किंवा मुस्लिमांनाच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकल धनगर समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात आयोजित कार्यक्रमावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष विजय मोरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके, काँग्रेसचे नेते डॉ. यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन गावडे, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, प्राप्तिकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, संयोजक ॲड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते, संतोष शिंदे, यशपाल रायभोगे, ज्ञानेश्वर नरुटे, गणेश सोनटक्के, गणेश दुगाने, धुळदेव टेळे, अनुजा जानकर, शंकर ढेबे, महादेव वाघमोडे, संतोष ढवळे, शालिनी शिंदे, ॲड. शिवाजी मदने, संतोष वरक, रमेश टकले, यशवंत गोवेकर, मनिषा दुगाणे, रसिका माने, प्रियंका सोनटक्के, अहिल्या गोफणे, स्वाती देवकाते, पूजा सोलनकर, स्वाती लवटे, अर्चना लाळगे, सुरेखा खरात, मनिषा मदने आदी उपस्थित होते.

यावेळी अहिल्यारत्न पुरस्कार वितरण, तसेच आरक्षणासाठी उपोषण केलेल्यांचा सन्मान करण्यात आला. बापूसाहेब शिंदे (सामाजिक कार्य), रामककिसन रौंदळे (शैक्षणिक), जयश्री वाक्षे (आरक्षण लढा), रुपाली जोशी (सेवाभावी संस्था), डॉ. सोमनाथ सलगर (वैद्यकीय सेवा), घनश्याम हाके (आदर्श समाजयुवक), भारत कवितके (पत्रकारिता), रामभाऊ लांडे (इतिहास संशोधन / साहित्य), कु. अक्षता ढेकळे (क्रीडा), डॉ. स्नेहा सोनकाटे (राजकीय), सुरेखा चौरे-गावडे (शासकीय सेवा), विवेक बिडगर (आदर्श उद्योजक), सैनाली गंगाराम उचाळे (महिला संघटन), धुळाभाऊ कोकरे (आधुनिक शेती), दत्ताभाऊ डोंबाळे (कामगार क्षेत्र), मुकुंद कुचेकर (वधू-वर परिचय उपक्रम), कु. यशोदा नाईकवडे (युवा व्याख्याते / प्रबोधनकार), सुनीता अर्जुन, रेखा धनगर-नरोटे (बास्केट बॉल) यांना सन्मानित करण्यात आले.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “अहिल्यादेवी होळकर यांना धार्मिकतेमध्ये अडकवून ठेवण्याचे काम झाले. खरेतर त्या राज्यकर्त्या म्हणून महान आहेत. महापुरुषांनी घडवलेले हे राज्य त्यांचे विचार अंमलात आणतय का?, यावर विचार केला पाहिजे. इमानदार राज्यकर्ते मिळत नाहीत, समाज केवळ अनुकरण करण्यावर भर देतोय, हे अयोग्य आहे. राज्य करणारा समाज म्हणून धनगरांची ओळख निर्माण व्हायला हवी. होळकरांचा उज्ज्वल इतिहास समोर आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल.”

“धनगर आणि धनखड हे वेगळे असल्याचे सांगून आपला अधिकार हिरावला आहे. १९५० पासून १९९० पर्यंत जवळपास ४० वर्षे आपल्याला आरक्षणापासून वंचित राहावे लागले. मिळालेल्या आरक्षणातही कुणबी-मराठ्यांना घुसवण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकप्रकारे ओबीसी आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे. त्यामुळे तेलंगण व तामिळनाडूप्रमाणे ओबीसी समाजाने सत्ता काबीज करून २७ टक्के आरक्षण ६०-७० टक्क्यांवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.

डॉ. विकास महात्मे म्हणाले, “धनगर समाज आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी नेहमीच एकवटलेला आहे. त्यांचा हा अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही. धनगर समाजाने शिक्षण, संघटन आणि हक्क यांची त्रिसूत्री अंगीकारली पाहिजे. समाजातील युवकांनी शिक्षणाच्या बळावर आपले स्थान निर्माण केले तर आरक्षण आणि आर्थिक उन्नतीचे प्रश्न सोडवणे अधिक सोपे होईल. समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकसंघ व्हावे.”

प्रास्ताविकात ॲड. विजय गोफणे यांनी अधिवेशनाचे स्वरूप विशद केले. ‘आर्थिक सक्षमीकरण, उद्योगाच्या संधी व गरज, संस्थात्मक निर्मिती’, ‘सामाजिक सुधारणा, रूढी व परंपरा, विवाह पद्धती बदल, प्रबोधन व शैक्षणिक सुधारणा’, ‘समाज संघटन, संघटनात्मक संरचना, शाखा कार्यपद्धती, वार्षिक उपक्रम व नियोजन, केडर बांधणी’, ‘महिला सक्षमीकरण, चळवळीतला सहभाग, प्रबोधन व प्रशिक्षण, कुटुंब व्यवस्थापन आरोग्य, कायदे विषयक, प्रगतीच्या वाटा’, ‘नेतृत्व निर्मिती काळाची गरज राजकीय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व अन्य स्वरूपाच्या नेतृत्वाचा विकास’, ‘धनगर एसटी आरक्षण: वर्तमान स्थिती, भविष्यातील लढ्याचे नियोजन, छत्तीसगड प्रकरणाचे वास्तव’, ‘माध्यमातील धनगर समाजाचे स्थान, अडथळे, संधी, माध्यम हाताळणी, व्यवस्थापन व भागीदारी’ आदी विषयांवर चर्चासत्रे झाली. 

माझे मत आरक्षणवाद्यांना: आंबेडकर

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत दलित, ओबीसी, आरक्षण समर्थक आणि मुस्लिम समाज यांचे हक्क धोक्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे माझे मत फक्त ओबीसी, आरक्षणवादी किंवा मुस्लिम उमेदवारांनाच असेल. आपल्याला विचारसरणीपेक्षा हक्क आणि अस्तित्व महत्त्वाचे आहेत. ज्यांनी समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला आहे, त्यांनाच आपला पाठिंबा हवा. आज देशात समानता आणि सामाजिक न्याय टिकवण्यासाठी बहुजन, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाज एकत्र येणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्ष सामाजिक न्यायाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जनतेने आता विचारपूर्वक मतदान करून समाजहिताचे नेते निवडले पाहिजेत.

एस. एन. बी. पी. विद्यालय आयोजित गायन-वादनाच्या मैफलीस रसिकांची दाद

पुणे : येरवडा परिसरातील प्रतिष्ठीत एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि एस. ई. सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वरयज्ञ संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-वादकांचे बहारदार सादरीकरण झाले. या अनोख्या सादरीकरणातून रसिकांना एक वेगळी सांगीतिक भेट मिळाली.

महोत्सव येरवडा येथील एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सरस्वती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.

महोत्सवाच्या सुरुवातीस प्रास्ताविकात एस. एन. बी. पी. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. वृषली भोसले म्हणाल्या, पूर्व पुणे परिसरातील रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा तसेच भारतीय शास्त्रीय कला व संस्कृतीच्या वारशाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने स्वरयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या करिता शाळेतील विद्यार्थ्यांनाही या महोत्सवात सहभागी करून घेण्यात येते.

मैफलीची सुरुवात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी सुरुवातीस राग गौड मल्हार रागातील विलंबित तीन तालातील ‘मानन करिए तुमरे कारन’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर द्रुत तीन तालातील ‘बैरि भयो सजनिया’ ही बंदिशी अतिशय सुरेलपणे ऐकविली. सानिया पाटणकर यांनी आपल्या गायन मैफलीची सांगता द्रुत आडाचौताल मधील ‘उमड घन गगन आयो रे’ या पारंपरिक बंदिशीने केली. उत्तम फिरत असलेला सुमधुर आवाज, बहारदार ताना, सुश्राव्य गायनाने त्यांनी मैफलीत रंग भरले. विनायक गुरव (तबला), माधव लिमये (संवादिनी), वेदवती परांजपे (सहगायन), नितीन महाबळेश्र्वरकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

या नंतर सत्याजित तळवलकर यांचे एकल तबला वादन झाले. त्यांनी तबल्यावर जोरकस वादन करून तीन ताल सादर केला व रसिकांची वाहवा मिळविली. त्यांच्या वादनातील दाया बायाचे उत्तम संतुलन, आकर्षक लय आणि वादनातील चपळता पाहून रसिक मंत्रमुग्ध झाले. अभिषेक शिनकर (लेहरा) यांनी समर्पक साथ केली.

शेवटच्या सत्रात मेवाती घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मधुश्री नारायण यांचे सुश्राव्य, सुमधुर गायन रंगले. त्यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात मेवाती घराण्यातील प्रसिद्ध राग नट नारायणमधील विलंबित एकतालातील ‘जब से छब देखी’ या बंदिशीने केली. त्यानंतर झपतालात ‘निरंकारा’ ही रचना सादर केली. मैफलीची सांगता ‘माता रानी भवानी जगत्‌ जननी माँ’ या रचनेने केली. विनायक गुरव (तबला), संतोष घंटे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस एस. एन. बी. पी. शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन-वादनाचे बहारदार सादरीकरण केले. कलाकारांचा सत्कार डॉ. वृषली भोसले, प्राचार्य रश्मी शुक्ला यांनी केले.

तरुणांमध्ये सेवाभाव रुजवून विधायक मार्गावर नेणे गरजेचे-खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

: उदय जगताप यांना समर्थ प्रतिष्ठानतर्फे ‘समर्थ गौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे : सध्याच्या काळात तरुण अधिकाधिक भौतिक सुखाच्या मागे धावताना दिसत असताना, समर्थ प्रतिष्ठान सारखी संस्था तरुणांना एकत्र करून सामाजिक कार्यात सहभागी करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. समाजपरिवर्तनासाठी अशा संस्थांची नितांत गरज आहे. तरुणांमध्ये सेवाभाव रुजवून त्यांना विधायक मार्गावर नेणे अत्यावश्यक आहे, असे मत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

समर्थ प्रतिष्ठानच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल १६ वा समर्थ गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृह  येथे प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रसेनजीत फडणवीस, शाहीर दादा पासलकर, भावार्थ देखणे, किरण साळी, भूषण पंड्या, पराग ठाकूर, विवेक खटावकर, प्रमोद आडकर, जोत्स्ना सरदेशपांडे, ॲड. प्रताप परदेशी आणि डॉ. मिलिंद भोई, वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत बहिरट, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, तसेच पीयुष शहा, नितीन पंडित, शिरीष मोहिते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते उपस्थित होते.

रुपये ११ हजार रोख, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी ७५ हजार रुपये, पुणे विद्यार्थी गृहाला ४१ हजार रुपये, हिरामण बनकर विद्यालयाला ४१  हजार रुपये आणि महाराष्ट्रीय मंडळाला १५  हजार रुपये अशी देणग्या देण्यात आल्या.

डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आपला धर्म आपल्याला पंचमहाभूतांची पूजा करायला शिकवतो. पण आपण तो धर्म विसरत चाललो आहोत. त्यामुळेच पंचमहाभूते पुरासारख्या माध्यमांतून आपल्याला जाग आणत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी तरुणांना विधायक कार्यात गुंतवणे आवश्यक आहे.

उदय जगताप म्हणाले, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणे हे आव्हानात्मक असले तरी एक ध्येय ठेवून काम केल्यास समाज नक्कीच पाठीशी उभा राहतो. समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी हे कार्य यशस्वीपणे पार पाडू शकलो.

प्रसेनजीत फडणवीस म्हणाले, गणेशोत्सव मंडळ जशी सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतात, तसेच समर्थ प्रतिष्ठान सारख्या ढोल-ताशा पथकांनीही सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. इतर पथकांनीही समर्थ प्रतिष्ठानचा आदर्श घ्यावा.

या कार्यक्रमात समर्थ प्रतिष्ठान चे हितचिंतक विकास कड आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लहू या गावातील १४० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. समर्थ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अथर्व कुलकर्णी यांनी आभार मानले.