मागील वर्षीच्या तुलनेत ३ बिलियन युरोंची वाढ नोंदवत, ३०.५ बिलियन युरोंच्या अनुमानित संपत्तीसह, हिंदुजा परिवाराने यावर्षीच्या युकेमधील एशियन रिच लिस्टमध्ये सलग आठव्यांदा अव्वल स्थान मिळवले.
वेस्टमिन्स्टर पार्क प्लाझा हॉटेलमध्ये पार पडलेल्या २४व्या वार्षिक एशियन बिझनेस अवॉर्ड्समध्ये लंडनचे माननीय महापौर श्री. सादिक खान यांनी हिंदुजा समूहाचे सह-अध्यक्ष श्री. गोपीचंद हिंदुजा यांच्या कन्या श्रीमती रितू छाब्रिया यांना ‘एशियन रिच लिस्ट २०२२’ ची प्रत सुपूर्द केली. सलग आठव्यांदा या यादीमध्ये हिंदुजा कुटुंब सर्वात आघाडीवर आहे.
श्रीमती रितू प्रकाश छाब्रिया या मुकुल माधव फाऊंडेशनच्या (एमएमएफ) संस्थापक सदस्य आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. १९९९ सालापासून एमएमएफ ही भारतस्थित धर्मादाय विश्वस्त संस्था आशा आणि आनंद फुलवण्याचे, पसरवण्याचे कार्य करत आहे. युकेमध्ये लंडनमध्ये देखील त्यांचे कार्यालय आहे. भारतात धर्मादाय कार्य ज्याप्रकारे केले जाते त्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी गेली दोन दशके एमएमएफसोबत काम करत श्रीमती छाब्रिया वंचितांना सन्मानपूर्वक मदत पुरवण्यासाठी अथक प्रयत्नशील आहेत. समस्याग्रस्त आणि वंचित समुदाय व व्यक्तींसह तळागाळातील स्तरापर्यंत जाऊन ही संस्था काम करते. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, जल संवर्धन या क्षेत्रांमधील विविध उपक्रम, अपूर्ण राहिलेली प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी तसेच लक्षात येईल ती प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेतात आणि या कामातून त्यांनी आजवर अनेक व्यक्तींच्या जीवनावर, रोजगारावर प्रभाव निर्माण केला आहे. विविध ठिकाणच्या, विविध वयोगटातील, विविध कामे करणाऱ्या, वेगवेगळ्या धर्मांच्या, स्त्री-पुरुषांना मदत करून जीवनात पुढे जाण्यासाठी त्या मदत करत असतात.
त्यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मिशन सेरेब्रल पाल्सीचा समावेश आहे, ज्यामध्ये ही संस्था महाराष्ट्र व गुजरातेतील सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त लहान व किशोरवयीन मुलांच्या सक्षमीकरणाचे काम करते. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात मुकुल माधव विद्यालयात ६५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गिव्ह विथ डिग्निटी उपक्रमात या फाऊंडेशनने महामारीच्या काळात आशेचे किरण निर्माण करण्यासाठी धनधान्य, स्वच्छता किट्स, पीपीई किट्सचे वाटप करून समाजाची मदत केली.