पुणे-
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या सेवकांपैकी ७६ सेवकांना महामंडळाच्या १३ डेपोंमध्ये वर्कशॉप विभागाकडे रुजू करून घेण्यात आले आहे. या ७६ सेवकांना व एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी इंजिनिअर म्हणून घेण्यात आलेल्या ८ सेवकांना कामकाजाची माहिती देण्याबाबत महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेशित केले होते. त्यास अनुसरून महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी स्वारगेट मुख्यालयातील प्रशिक्षण हॉल मध्ये बैठक आयोजित करण्याची सूचना दिली होती. त्याप्रमाणे दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सदरची बैठक घेण्यात आली व वर्कशॉप विभागाकडील ७६ सेवकांना सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी मार्गदर्शन केले.
परिवहन महामंडळामध्ये सेवेत असताना ज्या सेवकांचे निधन झाले, त्या सेवकांच्या पत्नी/मुलगा/मुलगी यांना अनुकंपा तत्वावर परिवहन महामंडळात विविध पदांवर नोकरीस घेण्यात आले. निधन झालेल्या सेवकांच्या कुटुंबातील व्यक्तींना नोकरीची संधी मिळाल्याने संबंधित संपूर्ण कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
याप्रसंगी या ७६ सेवकांना कामकाजाचे स्वरूप, करावयाचे कामकाज, त्यांच्याकडून प्रवाशांची होणारी सेवा, त्यांना मिळणारे आर्थिक फायदे, कामकाजामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, आय.टी.एम.एस. यंत्रणा, पीएमपीएमएल कडील डिझेल, सीएनजी, ई-बस बाबतची माहिती, काम करताना घ्यावयाची काळजी, महामंडळांतर्गत मिळणारे इतर लाभ इ. सर्व माहिती
देण्यात आली.
यावेळी महामंडळाचे जनरल मॅनेजर श्री. सुनिल गवळी, चिफ मेकॅनिकल इंजिनिअर श्री. सुनिल बुरसे, झोनल मॅनेजर कैलास गावडे यांनी देखील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा संस्थेची प्रगती होण्यासाठी व चांगली प्रवाशी सेवा देण्यासाठी कामकाज कसे करावे याबाबत वाहतूक विभाग व मेंटेनन्स विभागाची माहिती दिली.