ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. कोह सामुई, थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचा मृत्यू झाला. वैद्यकीय कर्मचार्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही शेन वॉर्नला वाचवण्यात अपयश आले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पण मग या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.
शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. वॉर्न हा जगातील महान स्पिनर मानला जात होता. त्याने जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली होती.
वॉर्नच्या कसोटीत ७०८ विकेट
१९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने २००७ मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे.