पुणे, ता. १० : कोविडच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली जात असली, तरी पुढील दीड-दोन वर्षांत हळूहळू पण निश्चितपणे मानवी जीवन पूर्वपदावर येऊ शकेल असा आशावाद मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मेघा देऊसकर यांनी व्यक्त केला.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने ‘कोविड नंतरचे मानसिक आरोग्य’ या विषयावर डॉ. देऊसकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
डॉ. देऊसकर म्हणाल्या, ‘कोविड लाटेच्या तडाख्यात अनेकांना जीवलग नातेवाईकांना गमवावे लागले, आजारपणाचा सामना करावा लागला. एकाकीपणा, उदासिनता, असुरक्षितता आणि नैराश्याने मानवी मनाला ग्राले. जगाची आर्थिक व्यवस्था, उद्योग संकटात आले. आपण कृत्रिमपणे काम करीत होतो, परंतु निखळ आनंदाला मुकावे लागले. या सर्वांचा मानसिक आरोग्यावर परिणाम झाला.’
डॉ. देऊसकर पुढे म्हणाल्या, ‘एकाकीपणामुळे मानसिक आजाराच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा एकत्र येऊन त्यावर मात करता येतील. सामाजिक अंतर ठेवून काम करावे लागणार असले तरी विविध प्रकल्पांवर एकत्र येऊन काम केल्याने मानवी मनाला मिळणार्या उर्जेमुळे पुन्हा मोठी उभारी घेता येणार आहे.’ उपप्राचार्या स्वाती जोगळेकर यांनी प्रास्ताविक आणि डॉ. शीतल रुईकर यांनी परिचय करून दिला.