पुणे-“बदलत्या काळानुरूप बांधकाम क्षेत्राला केवळ देवाण-घेवाणीचे स्वरूप राहिले नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षात यात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळेच सेवा क्षेत्राबरोबरच दीर्घकालीन नातेसंबंधांवर आधारलेला व्यवसाय म्हणून बांधकाम क्षेत्र नावारूपाला येत आहे” असे मत गोयल गंगा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल यांनी येथे व्यक्त केले.
बोट क्लब येथे झालेल्या प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे वेल्फेअर असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सल्लागारांशी त्यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विचारलेल्या शंकांचेही त्यांनी निरसन केले.
यावेळी गोयल म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांविषयी ग्राहकांचे अनेक समज आणि गैरसमज असल्याचे दिसून येते. परंतु, नुकतेच रियल इस्टेट विधेयकास मंजुरी मिळाल्यामुळे बांधकाम विकसकांची जनमानसात प्रतिमा उंचविण्यासाठी मदत होईल. या विधेयकामुळे केवळ प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विकसक या क्षेत्रात तग धरू शकतील. वित्तीय संस्थाकडूनही घराची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अर्थसहाय्य उपलब्ध होईल, गुंठेवारीसारख्या प्रकारांना आळा बसेल परिणामी, याचा फायदा संपूर्ण बांधकाम क्षेत्राच्या विकासाला होणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
पीएमआरडीएच्या रूपाने शहराचा विकास होणार असून या अंतर्गत बांधकाम क्षेत्राला नव्याने उभारी घेण्याची संधी प्राप्त होणार असल्याचेही गोयला यांनी यावेळी सांगितले. बांधकाम सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या व नव्याने या क्षेत्राकडे येणाऱ्या उपस्थितांसाठी हे चर्चासत्र मार्गदर्शनपर ठरले.