पुणे दि.१५: सप्टेंबर महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात ३ हजार ९८७ नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.
त्यानुसार बुधवार १४ सप्टेंबर रोजी आयोजित फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला असून या फेरफार अदालतीमध्ये साध्या ३ हजार ३४४ , वारस ५७० आणि तक्रारी ९९ अशा एकूण ३ हजार ९८७ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.
बारामती तालुक्यात सर्वाधिक फेरफार नोंदी निर्गत
बारामती तालुक्यात सर्वाधिक ७९५ तर जुन्नर तालुक्यात ४३३ नोंदी निर्गत करण्यात आल्या. हवेली तालुक्यात ३०४, पुणे शहर ९, पिंपरी चिंचवड १६४, शिरुर ३४७, आंबेगाव ३५०, इंदापूर ३४०, मावळ १०४, मुळशी १०५, भोर ६१, वेल्हा ९२, दौंड ३०२, पुरंदर २४० आणि खेड तालुक्यात ३४१ फेरफार नोंदी निर्गतीचे काम पुर्ण करण्यात आले.