- सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत ‘एड्स संपवूया’वर पोस्टर प्रदर्शन व एड्स जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सन्मान
पुणे : “एड्स जनजागृतीची सेवा करणाऱ्या संस्थांचा सन्मान केल्याचा आनंद आहे. समाजाला दिशा देण्याचे, सुधारण्याचे काम करणाऱ्या, तसेच उपेक्षित घटकांसाठी झटणाऱ्या संस्थांचा सन्मान केला पाहिजे. गेल्या ३०-३५ वर्षात एड्स बाबत जागृती झाली. रुग्णसंख्या शून्यावर आणण्याचे ध्येय आपण ठेवावे. या कार्यात काँग्रेस पक्ष कायम सोबत आहे,” असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केले.
श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत पियुष शहा यांच्या पुढाकारातून ‘एड्स संपवूया’ यावर जागृतीपर पोस्टर प्रदर्शन व एड्स जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सन्मान सोहळा अयोजिला होता. सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी, अखिल बुधवार पेठ देवदासी महिला संस्थेचे प्रकाश यादव, वंचित विकास संस्थेच्या आरती तरटे, उडान संस्थेच्या कशीश भालके, अलका फाउंडेशनच्या अलका गुजनाळ, जॉन पॉल संस्थेच्या धनश्री जगताप यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे, शहर चिटणीस सुरेश कांबळे, कसबा ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, चेतन अगरवाल, राजुभाई शेख, आयुब पठाण, तिलेश मोता, गणेश भंडारी, धनंजय भिलारे, संदीप अटपालकर, अंजली सोलापूरे आदी उपस्थित होते. एड्स जनजागृती करणाऱ्या पोस्टरचे प्रदर्शन, तसेच एड्स जागृतीची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.
तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, ‘एचआयव्ही समूळ उच्चाटन होईस्तोवर जागृतीचे काम करावे लागेल. या रोगावर नियंत्रण मिळवण्यात शरीरविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी यांचे योगदान मोलाचे आहे. यंदाची संकल्पना ‘समानता’ अशी असून, सर्वांना समान वागणूक देण्यासाठी आपण काम करायला हवे.”
प्रकाश यादव म्हणाले, “एड्सवर अजूनही उपचार नाहीत, त्यामुळे जनजागरण आणि प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे आहेत. जनजागरण करताना अनेक अडचणी आल्या; मात्र कार्यकर्त्यांनी न डगमगता नेटाने काम केले.” पियुष शहा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुरेश कांबळे यांनी केले. प्रवीण करपे यांनी आभार मानले.