पुणे-पीएमपीएमएलच्या कात्रज आगारातील श्रीमंत सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हेल्पिंग हँड सोशल फाउंडेशन संचलित
“आसरा” या संस्थेला पिठाची गिरणी भेट म्हणून देण्यात आली. पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा
पोतदार-पवार यांच्या हस्ते आसरा संस्थेच्या संचालिका सौ. स्वाती डिंबळे यांना पिठाची गिरणी सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मा. स्मिताताई कोंढरे, पीएमपीएमएलचे कामगार व जनता
संपर्क अधिकारी श्री. सतिश गाटे, कात्रज आगार व्यवस्थापक श्री. गोविंद हांडे, रामराज्य बँकेचे संस्थापक श्री. विजय
मोहिते, उद्योजक श्री. नितीन दळवी, श्रीमंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. भरत गिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देव दिवाळी निमित्त फराळाचे वाटप देखील करण्यात आले. गेली १० वर्षे श्रीमंत
सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूर वारीतील वारकऱ्यांना अन्नदान केले जाते. तसेच गेली ३ वर्षे सैनिकांसाठी रक्तदान
शिबीर घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. श्रीमंत सेवा प्रतिष्ठानचे श्री. सुभाष जगताप यांनी सूत्रसंचालन केले तरश्री. निलेश जगताप यांनी आभार मानले.
“आसरा संस्थेच्या माध्यमातून स्वाती डिंबळे यांनी शब्दाला कृतीची जोड दिली आहे. ज्यांना कुणीच नाही अशा
लोकांसाठी ही संस्था खरोखर मोठा आधार आहे. उत्तरदायित्वाची भावना कृत्रिम नसते तर ती अंगी असावी लागते.
निराधारांना गरजेच्या वस्तू भेट म्हणून देण्याचा श्रीमंत सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य आहे.”
– प्रज्ञा पोतदार-पवार,सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.
“एखादी व्यक्ती एखादे काम सुरू शकते. परंतु त्याला साथ मिळाल्याशिवाय ते काम पुढे जाऊ शकत नाही. आत्तापर्यंत ३५
निराधार लोकांना “आसरा” च्या माध्यमातून आधार व उपचार मिळाले आहेत. ३५ पैकी १० लोकांना त्यांच्या
कुटुंबियांपर्यंत सुखरूप पोहोचवले आहे. श्रीमंत सेवा प्रतिष्ठानने दिलेली पिठाची गिरणी आमच्यासाठी नक्कीच उपयुक्त
भेटवस्तू आहे.” – सौ. स्वाती डिंबळे, संचालिका, आसरा.