राज्याचा पर्यटन विभाग तसेच मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर महापालिकेचा उपक्रम
मुंबई :
कोरोना महामारी नंतर पहिल्यांदाच धुमधडाक्यात साजऱ्या होणारा गणेशोत्सव आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तराज्याचा पर्यटन विभाग व स्थानिक महापालिकांनी संयुक्तपणे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर या महानगरांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. दिनांक ०१, ०२, ०५, ०६ व ०७ सप्टेंबर २०२२ या पाच दिवशी ही यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा व गणेशोत्सवाच्या मंगलकाळात श्री गणपती दर्शन घ्यावे, असे आवाहन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा समजला जातो. राज्यभरातील गणेशोत्सव मंडळे आपापल्या परिसरात नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम इत्यादी माध्यमातून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करतात. कोरोना महामारीदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यावर देखील स्वाभाविक मर्यादा आल्या होत्या. परंतु दोन वर्षांनंतर प्रथमच राज्यभरात मोठ्या उत्साहात व निर्बंधरहित वातावरणात गणेशोत्सवाचे आयोजन होणार आहे.
राज्याच्या पर्यटन विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शहरांतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेश मंदिरांची यात्रा घडविली जाईल. यासाठी बृहन्मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर महानगरपालिकेकडून वातानुकूलित बसेस, आरोग्यसेवक, गाईड व न्याहारी अशा सुविधा दिल्या जातील. तसेच सर्व मंडळे व मंदिरात श्री गणपती दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाईल.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी नागरिकांनी पर्यटन महासंचालनालयाच्या खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
मुंबई : सुहास 7738694117 / अजिंक्य 8779898001
ठाणे : प्रशांत 9029581601 / कल्याणी 7030780802
पुणे : अजय 7887399217 / पुजारी 8888363647
नागपूर : पंकज 9665852021 / रजनी 9764481913