पुणे, ता. ९ – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरातील लॉकडाउन काळातील पथारी व्यावसायिकांचे भाडे शुल्क आणि दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय आज स्थायी समितीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने पुढे म्हणाले, ‘गेल्या आर्थिक वर्षातील लॉकडाउनमुळे पथारी व्यावसायिकांचे भाडे आणि दंड माफ करण्यात यावा असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे चर्चेला आला होता. त्यानुसार भाड्याच्या रकमेपोटी १६ कोटी २ लाख रुपये आणि या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत दंडापोटी ३ कोटी ७४ लाख रुपये असे एकूण १९ कोटी ७६ लाख रुपये माफ करावे लागत होते.’
रासने म्हणाले, ‘या प्रस्तावावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्या काळात व्यवसाय करायला परवानगी देण्यात आली होती तो काळ वगळून उर्वरित काळासाठीचे भाडे शुल्क आणि दंड माफ करावा असा निर्णय करण्यात आला. त्यानुसार कोरोना काळात बिल बजावू न शकल्याने आगाऊ शुल्क न भरलेल्या एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीसाठीचे शुल्क ८ कोटी ३२ लाख रुपये आणि दंड ३ कोटी ६८ लाख रुपये असे १२ कोटी एक लाख रुपये माफ करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे हातावर पोट असणार्या आणि कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या पथारी व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.’
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी निधी मंजूर
कात्रज येथी राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी आरसीसीमध्ये सिमाभिंत बांधणे आणि सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्यासाठी एक कोटी ५३ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला अधिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष काम करण्यासाठी ९३ लाख २८ हजार रुपये खर्च येणार आहे. ११ लाख १९ हजार रुपये जीएसटी आणि टेस्टिंगसाठी ८५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तरस खंदक
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तरस खंदक उभारण्यासाठी १ कोटी ९६ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय प्राणीसंग्रहालयाच्या निकषानुसार हा खंदक उभारण्यात येणार आहे.
प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी. पी. रस्त्याला मंजुरी
प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी. पी. रस्ता करण्यासाठी आवश्यक असणार्या निधीला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या विकासकामासाठी १ कोटी ७६ लाख ७६ हजार रुपये निधीच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.