गणेश चप्पलवार यांची माहिती; पर्यटन विभाग व परभन्ना फाउंडेशनचा पुढाकार
पुणे : पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य आणि परभन्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ व २७ सप्टेंबर २०२२ या दोन दिवशी पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या लघुपट महोत्सवाचा पुणेकर रसिकांना आनंद घेता येणार आहे. या लघुपट महोत्सवात लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग, छायाचित्रण या माध्यमातून सहभागी होता येईल. सहभाग घेण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२२ अशी आहे, अशी माहिती लघुपट महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार यांनी दिली. याप्रसंगी महोत्सवाच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
गणेश चप्पलवार म्हणाले, “दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी परभन्ना फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारत हा विविधतेत एकतेने नटलेला देश आहे. भारताच्या पर्यटनाचे विविध रूप, छटा लोकांनी पाहिल्या व अनुभवल्या पाहिजेत. यावर लिहिले आणि वाचले गेले पाहिजे. जगाला भारताच्या पर्यटनाची ओळख व्हावी आणि पर्यटनात नवीन संकल्पना, धोरणे कशी राबवता येतील, यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण कायमच सर्वाना आकर्षित करत असतात. त्याची जगाला ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांनी भारतात येऊन हे पाहावे, ही यामागची भावना आहे.”
लघुपट महोत्सवाचे परीक्षक म्हणून ‘एफटीआय’चे माजी अधिष्ठाता अमित त्यागी, माहितीपट व चित्रपट निर्माते आदित्य शेट, ऐतिहासिक चित्रपट अभ्यासक मोनिया अचारी (जर्मनी), लेखक आणि चित्रपट निर्माते अक्षय इंडीकर, प्रा. वैशाली केंदळे, लेखक आणि दिग्दर्शक जुनेद इमाम, चित्रपट निर्माते अमर देवकर, संजय दानाईत काम पाहणार आहेत. पर्यटन क्षेत्रातील आजीवन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्तम माहितीपट, सर्वोत्तम छायाचित्रण, सर्वोत्तम दिग्दर्शक, विशेष जूरी उल्लेख पुरस्कार देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ९७३०४६४३२९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन चप्पलवार यांनी केले आहे.
पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले, सिम्बायोसिस विद्यापीठातील प्रा. राजीव घोडे, सल्लागार सचिन इटकर, यशदा येथील प्रशासकीय अधिकारी डॉ. बबन जोगदंड आदींचे या महोत्सवासाठी सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवामुळे भारतीय संस्कृती, परंपरा, भारतातील ऐतिहासिक पर्यटन स्थळे, गड किल्ले, अजंठा आणि वेरुळ सारखी जागतिक वारसास्थळे आणि कला यांची ओळख जागतिक स्तरावर होणार आहे. तसेच नवनवीन संकल्पना आणि पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होवुन कोरोना नंतर मरगळ आलेल्या पर्यटनास नव्याने उत्साह आणि चालना मिळणार आहे.
– श्री. दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.