शनिवारी मध्यरात्रीनंतर खोदाई पूर्ण – सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या प्रयत्नांना यश
पुणे– विधी महाविद्यालयासारख्या वाहत्या रस्त्यावर एम.एन.जी.एल ला खोदाईला आणि विशेषत: रोड क्रॉसिंग खोदाईला परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे भक्ती मार्ग, दामले पथ, अशोक पथ, शांतिशीला सोसायटी, कांचन गल्ली, प्रभात रस्ता यासह मोठ्या परिसरात नागरिकांना पैसे भरून देखील गॅस कनेक्शन मिळत नव्हते. माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी याबाबत मनपा अधिकारी, एम.एन.जी.एल अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी व नागरिक अशी संयुक्त पाहणी केली व संपूर्ण शहर खोदले असताना येथे मात्र खोदाईला परवानगी न मिळणे अयोग्य असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जय जोशी, नितीन आपटे,शेखर जोशी यांच्यासह ह्या भागातील नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणीत सहभाग नोंदवून नागरिकांची बाजू समर्थपणे मांडली. यानंतर अधिकाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली व कॅनॉल रस्ता तसेच विधी महाविद्यालय रस्ता शुक्रवार, शनिवार मध्यरात्रीनंतर खोदण्याची परवानगी दिली. त्यानुसार काम पूर्ण झाले व ह्या भागातील हजारो नागरिकांचा प्रलंबित प्रश्न सुटला. आमदार सिद्धार्थ शिरोळे,पथ विभागाचे प्रमुख व्ही जी कुलकर्णी,वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर, मनपाचे उपायुक्त राजेंद्र मुठे, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित डोंबे,यांच्या सहकार्याने हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सुटला असल्याचे मंजूश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
वाहतूक पोलीस निरीक्षक बापूसाहेब शिंदे, मनपा पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंता कविता पाटील,एम. एन. जी. एल चे अभियंता शरद शिंदे यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळे पहाटे 2 वाजता वाहतुकीस अडथळा न होता हा प्रश्न मार्गी लागला याबद्दल देखील सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.पुढील दोन महिन्यात अंतर्गत रस्ते खोदाई व वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण होईल व नागरिकांना मागणीनुसार घरपोच गॅस मिळेल.सौ. मंजुश्री खर्डेकर,श्री. जय जोशी यांनी व्यक्तिशः पाठपुरावा करून काम पूर्णत्वास जाईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.