पुणे, दि.१०:-शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ८ ऑक्टोबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरण न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिली मात्रा व देय असलेल्या लाभार्थ्यांना दुसरी मात्रा लवकरात लवकर देण्याकरीता ‘मिशन कवच कुंडल’ कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात करण्यात आले असून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
पुणे जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, तालुकास्तरावर तालुकास्तरीय टास्क फोर्स यांची बैठक तात्काळ आयोजित करावी. यामध्ये सर्व विभागांचे अधिकारी विशेषतः शिक्षण, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, महसूल, पोलीस आणि इतर आवश्यक विभागांचा सहभाग घेण्यात यावा. ग्रामीण भागामध्ये प्रा.आ. केंद्र हे नियोजनाचे केंद्र असावे. तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी गावनिहाय शिल्लक लाभार्थीप्रमाणे सुक्ष्म कृती आराखडा तयार करावा. एका गावाचे लसीकरण पुर्ण झाल्यानंतर दुसऱ्या गावाचे लसीकरण सुरु करावे.
मोहिमेचे आयोजन करीत असताना लसीकरण सत्राची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी. आरोग्य विभागाने लसीकरण करण्याची जबाबदारी पार पाडावी आणि इतर विभागांनी शिल्लक लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रांवर घेवून येण्याची आणि सत्र व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये या विशेष मोहिमेमध्ये मनुष्यबळाअभावी लसीकरण मोहिम पार पाडण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: सलग ७५ तास कोविड लसीकरण:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत बारामती तालुक्यातील महिला रुग्णालय, दौंड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, हवेली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लोणीकाळभोर, खडकवासला, वाघोली, खेड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय चाकण, मुळशी तालुक्यातील उपकेंद्र हिंजवडी या केंद्रावर सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ दुपारी ११ वाजेपर्यंत सलग ७५ तास कोविड लसीकरण राबविण्यात येणार आहे.
विक्रमी उद्दिष्ट ५ लक्ष लसीकरण:- पुणे जिल्ह्यात एकंदरीत ८९८ खाजगी व १ हजार १६ शासकीय कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून एकंदरीत प्रशिक्षित मनुष्यबळाचा व खाजगी संस्थांचा सहभाग लक्षात घेता एकाच दिवसात ५ लक्ष लाभार्थ्यांचे कोविड लसीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोविड लसीकरण आपल्या दारी:- दुर्गम व वाहतुकीसाठी कठीण असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण: शासकीय वा खाजगी संस्थांकडील उपलब्ध रुग्णवाहीकामध्ये लस व लसीकरण पथकाची व्यवस्था करुन दुर्गम व वाहतुकीसाठी कठीण असलेल्या कायक्षेत्राकरीता विशेष सुक्ष्म नियोजन करण्यात येईल. सदर कार्यक्षेत्रातील शिल्लक लाभार्थी निश्चित करुन १०० टक्के उद्दिष्टपुर्ती होईल याकडे अधिकचे लक्ष देण्याच्या सूचना डॉ.देशमुख यांनी दिल्या.
लाभार्थ्यांसाठी वाहतुक व्यवस्था ज्याठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण शक्य नसेल आणि कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुक व्यवस्था नसेल अशा ठिकाणी कार्यान्वयीन यंत्रणांनी लाभार्थ्यांना ने-आण करण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्गम व दळण वळणाची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
गृहभेटीद्वारे लसीकरणासाठी समुपदेशन घरोघरी भेटी देवून शिल्लक लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत घेवून येणे, या करीता कार्यान्वयीन यंत्रणांनी नगरपालिका, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शिक्षण व महसुल विभाग यांचे सहभागातुन गृहभेटीचे टिमनिहाय सुक्ष्मकृती नियोजन करतील.
ध्येय महिलांच्या १०० टक्के लसीकरणाचे:- महिलांचे लसीकरण हे पुरुषांच्या लसीकरणापेक्षा कमी प्रमाण झाल्याचे दिसून येत आहे. ही तफावत दुर करण्यासाठी प्राधान्याने कार्यक्षेत्रातील सर्व महिलांचे १०० टक्के लसीकरण होईल असे सुक्ष्मकृती नियोजन करुन यासाठी महिला बचत गट, महिला मंडळ, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य प्राप्त करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
१०० टक्के पहिला व सर्व शिल्लक देय दुसरा डोस:- सद्यस्थितीत ग्रामीण भागातील कोविड लसीकरणाचे अवलोकन केले असता, ८१ टक्के नागरिकांचे पहिला डोस व ४५ टक्के नागरिकांचे दुसरा डोस पुर्ण झाल्याचे निदर्शनास येत आहे. मिशन कवच कुंडल या अभियानाअंतर्गत उर्वरित नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे. कार्यक्षेत्रातील शिल्लक राहीलेल्या लाभार्थ्यांची पहिला डोस व दुसरा डोस याची स्वतंत्र यादी गाव निहाय तयार करावी, यासाठी कोवीन प्रणाली, लसीकरण केंद्रावरील लाभार्थी याद्या तसेच गृह भेटी या माध्यमातून शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांची परीपुर्ण यादी तयार करावी. मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर १०० टक्के कोविड लसीकरण करण्यात यावे.त्याचप्रमाणे शिल्लक देय दुसरा डोस पुर्ण करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
खाजगी संस्थांचा सक्रीय सहभाग:- मोहिमेच्या यशस्वीतेसाठी कार्यक्षेत्रातील खाजगी स्वयंसेवी संस्था, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, नर्सिंग कॉलेजेस/शाळा, महाविद्यालये इत्यादींचा सहभाग घेण्यात यावा. लायन्स क्लब, रोटरी, आयएमए यांचा देखील मोहिमेमध्ये सहभाग मिळवावा. तालुकानिहाय खाजगी लसीकरण केंद्रांची पडताळणी करावी. खाजगी रुग्णालये, औद्योगिक क्षेत्रे, खाजगी उद्योग केंद्रे इत्यादी ठिकाणी शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार विशेष कोविड लसीकरण अभियान राबविण्यात यावे.
कोविड लसीकरणाने पूर्ण संरक्षित गाव:- गावातील संपुर्ण पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करुन घ्यावे व एकही लाभार्थी कोविड लसीकरणाविना शिल्लक राहणार नाही याची खातरजमा करण्यात येणार आहे.
मोहिमेचा प्रचार व प्रसिध्दी: कार्यान्वयीन यंत्रणांनी मिशन कवच कुंडल अभियाना अंतर्गत विशेष लसीकरण सप्ताहमधील लसीकरणाच्या सप्तपदीचा प्रचार व प्रसिद्धीवर भर देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
मिशन कवच कुंडल अभियान पुरस्कार योजना:- मिशन कवच कुंडल योजनेमध्ये कोविड लसीकरणाचे सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या प्रथम ३ प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, नगरपालिका, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालये, तालुके, ग्रामपंचायतींना यथोचित पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
मिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत विशेष कोविड लसीकरण मोहिमेमध्ये पुर्ण संरक्षित झालेल्या गावांमधील सरंपच व ग्रामसेवक यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत यांनी याबाबत विशेष नियोजन करण्याचा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.