पुणे, दि.९ ऑगस्टः “संगीत साधनेतून शांतरसाचा अनुभव येतो. सरस्वती नदीच्या उगम स्थानी निर्माण केलेल्या श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान धामामध्ये विश्वगानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. लतादीदींचा प्रत्येक सूर म्हणजे गानदेवी सरस्वतीचा उच्छ्वास होता.” अशी भावना माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचा ब्राँझचा सुवर्णांकित पुतळा उत्तराखंड जवळील माणा या गावी उभारण्यात आलेल्या श्री सरस्वती मंदिरात स्थापित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथील श्री विश्वदर्शन देवता मंदिरात या पुतळ्याच्या पाठवणी प्रसंगी ऐतिहासिक स्वरसुमनांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी परमपूज्य कर्वे गुरूजी, आदिनाथ मंगेशकर, गायिका साधना सरगम, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. सुनीता कराड, पं. वसंतराव गाडगीळ, मुकेश शर्मा, डॉ. एस.एन.पठाण, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एडीटीचे प्र कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव व महेश चोपडे उपस्थित होते.
या मंदिरात ठेवण्यात आलेल्या लता मंगेशकर यांचा सुवर्णांकित पुतळा सर्व नागरिकांना पाहण्यासाठी व आदरांजली वाहण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत खुला ठेवण्यात येणार आहे. येथे पुष्पांजली अर्पण करून मानवंदना देता येईल. तसेच कोणीही आपली कला सादर करू शकतील.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “देवी शारदेच्या भगिनीसमान असलेल्या लतादीदी परत आपल्या भगिनीगृही गेल्या अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली.आज माऊलीच्या आशिर्वादाने जगातील सर्वात मोठ्या डोमची निर्मिती झाली आहे. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या भाकितानुसार २१ व्या शतकात भारत विश्वगुरू म्हणून उदयास येणार आहे. त्याच दिशेने ही वाटचाल सुरू आहे.”
यानंतर पं. उपेन्द्र भट यांनी मिले सूर मेरा तुम्हारा, तो बने सुर हमारा…व बाजे मुरलिया..या गीताचे सादरीकरण करून उपस्थितांना सप्तसुरांच्या अनोख्या जगात घेऊन गेले. गायिका साधना सरगम यांनी विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले…, व मिरा के प्रभू गिरिधरनाथ… या गीतांचे सादरीकरण करून जणू लता दिदीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर गायक रवींद्र यादव यांनी स्वरसुमनांजली वाहली. तसेच कवयित्री तत्वदर्शी प्रज्ञावंत वै. उर्मिला विश्वनाथ कराड यांनी शब्दबद्ध केलेल्या अंतिम कवितेचे सादरीकरण संगीतकार निखिल महामुनी व गायिका श्रृती देशपांडे यांनी केले. तसेच, संगीतकला अकादमीच्या गायिका श्रेयसी पावगी व गायत्री गायकवाड यांनी स्वरांजली अर्पण केली.
त्यानंतर कर्वे गुरूजी, आदिनाथ मंगेशकर, साधना सरगम, प. वसन्तराव गाडगीळ, मुकेश शर्मा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांनी लता दिदींच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ. संजय उपाध्ये यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, या देशाला मंगेशकर गाण्याची संस्कृती मिळाली आहे. डॉ. विश्वनाथ कराड यांनी इंद्रायणी नदीच्या तिरावरून सुरू केलेला प्रवास पांडव जिथून स्वर्गात गेले तेथील स्वर्गारोहणापर्यंत पोहचला आहे.
सूत्रसंचालन डॉ. महेश थोरवे यांनी केले.