नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू येथील केएसआर रेल्वे स्थानकावरुन म्हैसूर आणि पुराची थलाईवार डॉ एमजीआर चेन्नई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशातील ही पाचवी वंदे भारत एक्सप्रेस असून दक्षिण भारतातील अशा प्रकारची पहिली रेल्वेगाडी आहे. पंतप्रधानांनी आज बेंगळुरू येथील केएसआर रेल्वे स्थानकावरुन भारत गौरव काशी दर्शन रेल्वेगाडीला देखील हिरवा झेंडा दाखवला.
मेक इन इंडियाच्या यशोगाथेतील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वेने भारतातील पहिली स्वदेशी, सेमी-हाय स्पीड, नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर धावणारी – वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली होती जिला 15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला होता. पुढे, वंदे भारत एक्सप्रेस गाड्या नवी दिल्ली-माता वैष्णो देवी कटरा, गांधीनगर राजधानी-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल आणि अंब अंदौरा-नवी दिल्ली मार्गांवर सुरू करण्यात आल्या आहेत.
या रेल्वेगाडीमुळे औद्योगिक केंद्र असलेले चेन्नई आणि तंत्रज्ञानाचे केंद्र असलेतले सॉफ्टवेअर -स्टार्ट अप संकुल बेंगळुरू तसेच जगविख्यात पर्यटन स्थळ असलेले म्हैसूर शहर एकमेकांशी जोडले जातील. म्हैसूर – बेंगळुरू – चेन्नई असा प्रवास करणार्या नियमित प्रवाशांव्यतिरिक्त सॉफ्टवेअर आणि व्यावसायिक , तंत्रज्ञ, पर्यटक, विद्यार्थी यांना या गाडीचा लाभ होईल. हा रेल्वेप्रवास विमान प्रवासाप्रमाणे आरामदायी असेल आणि रेल्वेमधील प्रवासाला एका वेगळ्याच अनुभूतीची जोड देईल.
वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये
ही एक जागतिक दर्जाची अत्याधुनिक सोईसुविधा असलेली रेल्वेगाडी आहे. चेन्नई येथे पेरांबूर येथील एकीकृत रेल्वे कारखान्यात स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली वंदे भारत ट्रेन – भारतीय अभियंत्यांच्या सक्षमतेची साक्ष आहे आणि मेक इन इंडिया उपक्रमाचा कळस आहे. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नांमध्ये हा एक मैलाचा दगड आहे.
बेंगळुरू – वाराणसी भारत गौरव काशी दर्शन
बेंगळुरू ते काशी ही भारत गौरव रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे जी सर्वसमावेशक पॅकेजमध्ये आरामदायी आणि सोयीस्कर रेल्वे प्रवास, राहण्याची व्यवस्था , मुक्काम आणि दर्शन सुविधा यांनी युक्त आहे. ही रेल्वेगाडी हुबळी, बेळगावी, मिरज आणि पुणे या मार्गे जाणार आहे, ज्यामुळे केवळ बेंगळुरूच्या भाविकांनाच नाही तर काशीला जाण्याची इच्छा असलेल्या उत्तर कर्नाटकातील भाविकांनाही लाभ होईल. ही ट्रेन प्रयागराज आणि अयोध्या या मार्गावरून देखील जाणार आहे.
भारत गौरव काशी दर्शन ट्रेनचा एक डबा
या सहलीचा खर्च 20,000 रुपये इतका असून त्यातील 5000 रुपये अनुदान राज्य सरकारकडून दिले जाणार आहे . या गाडीच्या पहिल्या रेल्वे प्रवासात सुमारे 600 यात्रेकरू असतील; हे यात्रेकरू काशीव्यतिरिक्त अयोध्या आणि प्रयागराजलाही जातील. भारतासह जगभरातील लोकांना भारताचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक स्थळांचे दर्शन व्हावे हे भारत गौरव रेल्वेगाडी (संकल्पनेवर आधारित टुरिस्ट सर्किट ट्रेन्स) चालवण्याचे उद्दिष्ट आहे.