पुणे, दि. २३ एप्रिल २०२२: महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागातील जिल्हा परिषदेच्या २७७ शाळांचा वीजपुरवठा शनिवारी (दि. २३) पूर्ववत करण्यात आला आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे या शाळांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता.
पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी- ९०, मंचर- ८६ व राजगुरुनगर विभागांमध्ये १०१ अशा एकूण २७७ जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला होता. दरम्यान राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांच्या थकीत वीजबिलांपोटी महावितरणला १४ कोटी १८ लाख रुपये देण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित शाळांचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्याचे निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. त्याप्रमाणे पुणे परिमंडल अंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा खंडित केलेल्या २७७ शाळांचा वीजपुरवठा शनिवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे.