पुणे : पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे जिल्ह्यात 28 जानेवारी आणि 11 मार्च 2018 रोजी पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शून्य ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली.
पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पोलिओ लसिकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पल्स पोलिओ समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झाली, त्यावेळी श्री. राव यांनी ही सूचना केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.के. शेळके, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चेतन खाडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राव म्हणाले, जिल्ह्यात 28 जानेवारी आणि 11 मार्च 2018 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील शून्य ते ५ वयोगटातील पाच लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या वयोगटातील ग्रामीण भागातील 4 लाख 32 हजार 46 तर नागरी भागातील 81 हजार 147 असे एकूण 5 लाख 13 हजार 193 इतक्या बालकांना ही लस देण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 हजार तसेच शहरी भागामध्ये ३88 असे एकूण 4 हजार 388 पोलिओ बूथ कार्यान्वित केले जाणार आहेत. तसेच ट्रान्जिट बूथ (चार दिवसांसाठी) 398 तर मोबाईल बूथ (एका दिवसांसाठी) 419 असणार आहेत. या बूथसाठी एकूण 10 हजार 887 कर्मचारी तर 879 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार, वीट भट्टी कामगार, रस्त्यांची कामे करणाऱ्या मजूरांची बालके तसेच झोपडपट्टी भागातील बालकांना लसीकरण करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.
ही मोहीम झाल्यानंतर ग्रामीण भागात तसेच शहरी भागात घरी जाऊन लसीकरण केल्याची खात्री केली जाणार आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी दक्षता घेण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ.माने यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चेतन खाडे यांनी सादरीकरण केले.