Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राज्यात दोन वर्षांत दुष्काळमुक्ती- मुख्यमंत्री;पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेचे बॉलीवूड च्या गराड्यात आणि थाटात पारितोषिक वितरण

Date:

 

 

पुणे –

‘जल, जमीन आणि जंगल याची व्यवस्थित राखण केली, तर राज्यात पुन्हा शेतकरी कर्जमाफीची गरज भासणार नाही. जलयुक्त शिवारसह राज्यात आता साडेचार कोटी वृक्षलागवड केली जात आहे. दुसरीकडे राज्यातील ५४ हजार तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या सर्व उपायांमुळे येत्या दोन वर्षांत राज्यात दुष्काळमुक्ती झालेली असेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

सत्यमेव जयते व पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्याच्या ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये घेण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात फडणवीस बोलत होते.

राज्‍याचे जलसंधारण मंत्री  प्रा. राम शिंदे, सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे,  पुण्‍याच्‍या महापौर मुक्‍ता टिळक, जलतज्ञ राजेन्द्र सिंह, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, चित्रपट अभिनेते शाहरुख खान, उद्योगपती नीता अंबानी, राजीव बजाज, अजय पिरामल, जिया लालकाका,  प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ,  पोपटराव पवार  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, एका व्‍यक्‍तीने मनात आणले तर काय काम होऊ शकते, तसेच सर्वसामान्‍य जनतेने निर्धार केल्‍यास काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्‍हणजे सर्वांनी केलेले जलसंधारणाचे कार्य होय. अशाच प्रकारे काम झाल्‍यास येत्‍या दोन वर्षात राज्‍य टंचाईमुक्‍त होईल, असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्‍त केला. जल, जमीन आणि जंगल यांचे संवर्धन केल्‍यास महाराष्‍ट्र जलयुक्‍त होईल, असे सांगून ते म्‍हणाले, यंदाच्‍या वॉटरकप स्‍पर्धेत तीस तालुक्‍यांतील 1300 गावांनी सहभाग घेतला. पुढील वर्षी 100 तालुक्‍यांमध्‍ये ही स्‍पर्धा घ्‍यावी, अशी सूचना त्‍यांनी केली.  राज्‍य जलयुक्‍त झाले तर पुन्‍हा कर्जमाफी करण्‍याची आवश्‍यकता पडणार नाही, असे सांगून त्‍यांनी सर्वांना जलसंवर्धनासाठी एकजुटीने कार्य करण्‍याचे आवाहन केले. पाणी फाउंडेशनच्या पाठीशी शासन पूर्ण ताकदीने उभे असून शासनाच्‍यावतीने साडे सहा कोटींचे पुरस्‍कार जाहीर केले असल्याचे त्‍यांनी  सांगितले.

जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी, महाराष्‍ट्र निर्मितीनंतर जलयुक्‍त शिवार अभियान हे लोकचळवळीच्‍या माध्‍यमातून यशस्‍वी झालेले अभियान असल्‍याचे सांगितले. पाणी चळवळीत अनेक दिग्गज सहभागी झाल्‍याचा उल्‍लेख करुन त्‍यांनी भविष्‍यात समृध्‍द महाराष्‍ट्र घडेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. मा. प्रधानमंत्री यांनी या अभियानाची दखल घेतल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

अभिनेते शाहरुख खान यांनी  उन्‍हा-तान्‍हात काबाडकष्‍ट करणारा शेतकरी हा खरा  हिरो असल्‍याचे सांगून जलसंधारणासाठी मदत करणा-या सर्वांचे कौतुक केले. रिलायन्‍स फाऊंडेशनच्‍या नीता अंबानी यांनी पृथ्‍वी ही माता असून आपण सर्वांनी पाणी संवर्धन करुन मातेचा गौरव केला असल्‍याचे सांगितले. थेंबे थेंबे तळे साचे या म्‍हणीनुसार महाराष्‍ट्राचे परिवर्तन करुन राज्‍य समृध्‍द करु, असे त्या म्‍हणाल्‍या.

शांतीलाल मुथा यांच्या संस्थेने जेसिबी व पोकलेन दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. श्री. मुथा यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री व आमीर खान यांचे कौतुक केले. यावेळी जलतज्ञ राजेन्द्र सिंह यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री व पाणी फाऊंडेशनच्या कार्याबद्ल गौरवोद्गार काढले. अभिनेते आमीर खान प्रकृती अस्वास्थ्यामुळे ‍उपस्थित राहू शकले नाही. त्‍यांचा संदेश अतुल कुलकर्णी यांनी वाचून दाखवला.

याप्रसंगी डॉ. अविनाश पोळ, अजय पिरामल, आर. वेंकट, पोपटराव पवार, राजीव बजाज यांनी  जलसंवर्धनाचे महत्‍त्‍व विशद करणारे मनोगत व्‍यक्‍त केले.

प्रारंभी सत्यजित भटकळ यांनी प्रास्तविक केले. ते म्‍हणाले,  महाराष्ट्राला टंचाईमुक्‍त करण्‍यासाठी 2016 मध्ये आमीर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. पाणी फाउंडेशन ही ना-नफा या तत्वावर काम करणारी संस्था आहे. पाणी फाउंडेशनमध्ये ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाच्या कोअर टीमचा समावेश आहे. केवळ लोकचळवळीतून दुष्काळावर मात करता येते, या विचारातून पाणी फाउंडेशनचे वेगळेपण अधोरेखित होते. जर लोकांना जागृत, प्रोत्साहीत आणि प्रशिक्षित केले तर बिकट झालेला पाणीप्रश्न सोडवण्याची क्षमता आणि ताकद त्यांच्यात येईल, असे त्‍यांनी सांगितले.  हेच ध्यानात ठेवून पाणी फाउंडेशनने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकवण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रॅमची आखणी केली आहे. गावातल्या लोकांना एकत्र आणून ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर गावकऱ्यांनी करावा यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे दरवर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या स्‍पर्धेत 50 लाख रुपयांचे पहिले पारितोषिक काकडदारा (ता. आर्वी) या गावाला प्राप्‍त झाले. दुसरे पारितोषिक भोसरे खटाव आणि जायभायवाडी यांना विभागून देण्‍यात आले. तिसरे पारितोषिक पळसखेडा आणि बिदाल यांना विभागून देण्‍यात आले.  ज्‍या गावांना विभागून पारितोषिके मिळाली, त्या गावांना राज्य शासनातर्फे तेवढीच रक्‍कम जाहीर करण्‍यात आली आहे.

वॉटर कप 2017  मध्ये सहभागी झालेल्या 13  जिल्हयातील 30  तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे:

बीड जिल्हयातील अंबाजोगाई, केज आणि धारुर, लातूर जिल्हयातील औसा आणि निलंगा, उस्मानाबाद जिल्हयातील भूम, परांडा आणि कळंब,  औरंगाबाद जिल्हयातील फुलंब्री आणि खुलताबाद

सातारा जिल्हयातील कोरेगाव, माण आणि खटाव, पुणे जिल्हयातील पुरंदर आणि इंदापूर

सांगली जिल्हयातील खानापूर, आटपाडी आणि जत, सोलापूर जिल्हयातील सांगोला आणि उत्तर सोलापूर

अकोला जिल्हयातील बार्शी-टाकळी, पातूर आणि आकोट, वाशिम जिल्हयातील कारंजा

यवतमाळ जिल्हयातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड, वर्धा जिल्हयातील आर्वी

अमरावती जिल्हयातील वरुड आणि धारणी

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र जोशी व सोनाली कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लोक आले होते.  सुरूवातीला फुलवा खामकर यांच्या नृत्य पथकाने पाणी फाऊंडेशनच्या ‘तुफान आलंया’ या शीर्षक  गीतावर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली.

या कार्यक्रमास उद्योगपती, दानशूर व्यक्ती, चित्रपट जगतातील मान्यवर, जलतज्ज्ञ, वैज्ञानिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती.  यावेळी पाणी फाऊंडेशनच्या यशस्वीतेत ज्यांनी योगदान दिले त्या पाणलोट सेवक, सोशल ट्रेनर, टेक्नीकल ट्रेनर यांचे आगळ्या-वेगळ्या पध्दतीने स्वागत  करण्‍यात आले. तसेच यावेळी स्पर्श संस्था, वॉटर संस्‍था यांच्‍या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचाही  सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी, जिल्‍हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर...

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या १२८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त मोफत आरोग्य शिबीर 

आरोग्य शिबीरात २४५ जणांची तपासणी पुणे : रक्तदाब, वजन, रक्तातील...